विचारधारा

Submitted by sanika11 on 1 April, 2010 - 02:01

गुंतण्याच्या प्रक्रियेतून गुंता होऊ देऊ नये. तर गुंतणे हे असं असावं की त्यातून एक रेशीम वस्त्र तयार व्हावं..दोन धाग्यांचा एकमेकाला स्पर्श जरूर व्हावा पण एकमेकांचे बंधन नसावे.दोन धाग्यांनी एकत्र जरूर यावं..एकजिनसी व्हाव; पण एकमेकांच्या अस्तित्वाचा आदर राखून!
मैत्री म्हणा, प्रेम म्हणा हे असंच असावं.दोघांना एकमेकांची ओढ असावी पण ती आतून असावी. अंतरीकतेने निघालेली साद ही नेहमी ईश्वरनिर्मीतीचा आभास निर्माण करते. तिथे एक वास्तवतेची झालर असते. एक धागा दुसर्‍याला तिथे अडकवत नाही किंवा ओढतही नाही पण दोघांच्यामूळे मात्र त्या वस्त्राला एक मजबूत जोड मिळालेली असते.त्यामूळे पाण्याला ओंजळीत धरा..त्याला मुठीत पकडू नका. मुठीत पकडण्याचा प्रयत्न केलात तर पाणी सांडून जाते! हो का नाही?

-----------------------------------------------------------------
बर्‍याचवेळा प्रश्न पडणे, प्रश्न समोर उभा राहणे हे चांगले असते. हे का, कशासाठी, कधी, कोण या सार्‍या शब्दातून अडचणींची उकल होते. एकादा प्रश्न पडला की तो "काय" आहे असा पहिला प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. त्यानंतर तो "कसा" सोडवता येईल असा दुसरा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे.त्यानंतर तो "कधी" सोडवता येईल असा तिसरा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. त्यानंतर अर्थातच तो प्रश्न "कोणी" सोडवायचा असा शेवटचा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. या "कोण" चे उत्तर "मी" म्हणूनच असले पाहिजे...आणि तोच म्हणजे आत्मविश्वास! माझ्यावरचा माझा विश्वास्.माझा मला वाटणारा अभिमान; गर्व नव्हे. अभिमानाने छाती ताठ होते,मान ताठ होते तर गर्वाने छाती फुगते. अभिमानाला सत्याचा साज असतो तर गर्वाला दांभिकपणाचा बाज असतो!
म्हणून क्रयशक्ती, विचारशक्ती ही प्रश्नचिन्हातल्या खालच्या टिंबाला पाहताच प्रश्न पडताच खुंटीत करावी असे नव्हे तर कोणतीही अडचण समोर येताच आपल्याला मगाचे प्रश्न विचारावेत. त्यातूनच प्रश्नाची उकल होते
इथे एक लक्षात घ्यायला हरकत नाही की ' आप्तस्वकीयांबरोबर मी युद्ध का करू?' हा प्रश्न अर्जुनाला पडला म्हणूनच गीतेची निर्मीती झाली. त्यामूळे माझा कोणताही प्रश्न मीच सोडवायला पाहिजे; अन्यथा कृष्ण आहेच की गीता सांगायला.

-----------------------------------------------------------------
'ऋणानुबंध' या शब्दाचे पॄत्थकरण करावयाचेच झाले तर दोन शब्द प्रामुख्याने सामोरे येतात. एक 'ॠण' आणि दुसरा म्हणजे 'बंध'. आता ॠण म्हणजे कर्ज आणि कर्ज म्हणले की ते फेडणे अश्या अर्थाने तो शब्द घेतला जातो. मग सामोरा येतो व्यावहारीकपणा, व्यावसायिकपणा. खरं तर 'फेडणे' या क्रियापदाच्या अनुषंगाने 'पांग फेडणे' हा शब्द्प्रयोग आपण केला तर तो प्रेमापोटी येतो, आतून येतो, मनापासून येतो. त्यात कोणतीही कृत्रिमता नसते. आता दुसरा शब्द्--तो म्हणजे 'बंध'. यातील बंध हा ' बंधन' अश्या रुढार्थाने न घेता रेशीमबंध या अर्थाने घेतला तर त्यातील नाजुकता सामोरी येते.तरलता मनाला स्पर्शते.
आणि मग प्रगट होते एक अकृत्रिम उपजत फुलणारं भावस्पर्शी विश्व! आपले मन हे नातं जोडत, कधी कधी आपले मन हे विश्व शोधत राहतं; पण हे तेवढचं सत्य आहे की मी जेव्हा हे विश्व शोधत असतो तेव्हा समोरचे मन हे सुद्धा हे विश्व शोधत असते. त्यामुळे मी समोरच्या मनाकडून अशी अपेक्षा धरत असतो तेव्हा आपल्या बोलण्या वागण्यातून ती सहजता समोर येणं हेही जरूर असते. 'दिलेस का प्रेम तू कोणाला, तुझ्याच जे अंतरी आहे' या सुरेश भटांच्या उक्तीप्रमाणे मी दुसर्‍याच काहीतरी देणं लागतो असा विचार मी करणे जरूर आहे नि मग आपल्याला समजू लागते 'ॠणानुबंध' या शब्दाचा अर्थ.
मग ते नाते रक्ताचे असो की नसो; अश्यावेळी कोण कोठून येतो--जन्म जन्माचे नाते फुलवून जातो, मग ते नातं फुलवणारी व्यक्ती कधी जीवनसाथी म्हणून येते, कधी मित्र म्हणून तर कधी गुरू बनून!

-----------------------------------------------------------------
निरपेक्ष प्रेम हा एक आदरणीय संकल्पना. निरपेक्ष म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवणे. निर्व्याज्यपणे प्रेम करीत राहणे. ही विचारसरणी बोलण्यास फार सोपी आहे पण आचरण्यात फार अवघड. कारण, जेव्हा मी तुझ्याकडून काहीही अपेक्षा ठेवत नाही असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्यात आपला 'मी' आडवा येण्याची दाट शक्यता असते. आणि जेव्हा हा 'मी' येतो;तेव्हा त्याला कोठेतरी अव्यक्त अहंकार चिकटलेला असतो. हा अहंकार मग हळूहळू अधिकारात रुपांतरीत होऊ लागतो नि कळत-नकळत आपण दुसर्‍या व्यक्तीकडून अपेक्षा करू लागतो. त्यामूळे निरपेक्षता हा फार अवजड गुणधर्म आहे....
ह्याच्याच जोडीला येतो त्याग. 'मी तुझ्यासाठी हे सोडलं' हे वाक्य बर्‍याचवेळा ऐकू येते. वरपांगी विचार करता हे वाक्य त्याग दर्शवते. पण जेव्हा ह्या विधानाचा आपण सखोल विचार करू लागतो तेव्हा या वाक्यातील दोन शब्द जरा खटकतात. ते दोन शब्द म्हणजे..'मी' आणि 'तुझ्यासाठी'.
ह्या 'मी' मध्ये बर्‍याचवेळा अहंकार डोकावतो आणि इथे खरं तरं प्रेम या संकल्पनेला धक्का बसतो. आणि दुसरा शब्द म्हणजे 'तुझ्यासाठी'.. मला असे वाटते जेव्हा व्यक्ती 'तुझ्यासाठी' म्हणते त्याचा असाही अर्थ निघू शकतो की खरं पाहता ते मला मनापासून पटलेले नाही पण तू म्हणतेस्/ तू म्हणतोस म्हणून मी हे करतो/ मी करते. मला असे वाटते ह्या वाक्याला दुसर्‍या बाजूने असेही पाहता येईल की.." हे तुला आवडत नाही म्हणून मलाही आवडत नाही आणि म्हणून मी ते त्यागतो." ईथे सहजता येते. नैसर्गीकता येते. मग ती गोष्ट मनापासून घडते. मनापासून आलेली कोणतीही गोष्ट सहजसुंदर असते. मग तिथे आपल्याला आईने भरवलेला घास दिसतो, चांदण्याचा प्रकाश दिसतो नि ओमकाराचा नाद ऐकू येतो. हो की नाही?

-----------------------------------------------------------------
'To be or not to be', 'करावे की न करावे' असा हॅम्लेट प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी निर्माण होत असतो. मग हा गोंधळलेला अर्जुन कृष्णाच्या प्रतिक्षेत असतो.पण प्रत्येकाला पाठीशी ऊभा राहणारा कृष्ण प्रत्येकवेळी मिळतोच असे नाही. अश्यावेळी विचारांचे द्वंद्व मनात चालू होते.अश्यावेळी कोणतातरी एखादा निर्णय माणूस घेतो..पण त्यावेळी त्याने तो निर्णय का घेतला याचे समर्पक तात्विक कारण त्याच्याकडे असतेच असे नाही. मग काय होते ती व्यक्ती तो निर्णय घेऊन दोन पावले पुढे जाते नि पुनः विचारांचा गोंधळ चालू होतो.मगाचा आपला निर्णय योग्य की अयोग्य?
बर्‍याचवेळा ती व्यक्ती आपला निर्णय कसा योग्य होता हे मनाला पटवायला लागते. हे त्या व्यक्तीचे स्वतःचेच स्वत:शीच चाललेले युद्ध असते. बर्‍याचवेळा ती व्यक्ती स्वतःला पटवण्याच्या आटापिटा करताना तिला स्वतःला फसवण्याचा मोह होतो. मग ती व्यक्ती आपल्या निर्णयामागचे कारण ईतरांना पटवण्याचा प्रयत्न करते. हे म्हणजे कसं... 'बे दुणे तीन, चार का पाच?' असा विचारांचा गोंधळ चालू असतानाच जर आपण स्वतः मोठ्याने 'बे दुणे पाच' असे दहावेळा घोकले की तेच बरोबर वाटू लागते ना अगदी तस्सचं!
मग ती व्यक्ती त्या वृत्तीला सकारात्मक धोरण म्हणू लागते. ते असे की मी कोणत्याही गोष्टीचा विचार करीत नाही..टेन्शन घेत नाही.पण खरेच ही वृत्ती म्हणजे सकारात्मक धोरण की निर्णयक्षमतेचा वापर न करता मूळ विषयापासून दूर जाण्याची वृत्ती...तो विषय टाळण्याची वृत्ती.
मग नक्की काय? स्वतःच्या निर्णयाशी प्रतारणा की प्रामाणिकपणा ?संकटाला भीडून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची मानसिकता की विचारांची गल्लत करीत संकटापासून दूर पळण्याची पराभूत मानसिकता?
शेवटी काय, ज्याला कृष्णासारखा सारथी,सखा दोस्त, पाठीराखा म्हणून लाभला आहे त्याने त्याच्याशी प्रामाणिक रहावे नि तसा सारथी नसेल तर आपल्या मनातील कृष्णाचा शोध घ्यावा. आरश्यात स्वतःला डोकावून पहावे, समोर मनात दडलेला सुदर्शनधारी युगंधर लख्खं दिसेल!!

----------------------------------------------------------------
लहान मुलांनी काढलेले निसर्गचित्र म्हणले की डोळ्यासमोर येतात दोन्-तीन डोंगर, ऊडणारे पक्षी, ऊगवणारा सूर्य, उगमापासून दिसणारी नदी, एखादे घर, एखादे झाड. हे अगदी ठोकताळे असतात. असे ठोकताळे आपल्या डोक्यात इतके घट्ट घर करून बसलेले असतात. त्यात थोडासुद्धा बदल आपल्याला काहीवेळा आवडत नाही. हे ठोकताळे म्हणजे त्या गोष्टीचे आपल्यावरील झालेले संस्कार, त्या व्यक्तीविषयी अपेक्षीत असलेले मत, त्याच्या खाणाखुणा. हे सारं आपल्या मेंदूवर प्रतिबिंबीत झालेले असते मग त्यात थोडा बदल दिसला की आपल्या नजरेला ते खटकते. भुवई वर होते. कारण प्रत्येकाने आपल्या विचारांनी एक चौकट तयार केलेली असते. ती आपल्या विचारसरणीनुसार योग्य वाटते. मग ही चौकट आपण त्या चित्राला लावून बघतो..शक्यतो चौकट तीच राहते. ती चौकट व्यक्तीसापेक्ष असल्यामूळे प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार, विचारसरणीनुसार ते चित्र आपआपल्या चौकटीत सामावून घेण्याचा प्रतत्न करत असतो.
मग काय होते जर ती चौकट घट्ट असेल तर त्या व्यक्तीला त्या चित्रातील दोष दिसतात. बरं ते दोष चित्राच्या लांबी-रूंदीचे असतील तरी ते चित्र चौकटीत न बसण्याचे कारण समजु शकते; पण होते काय,
बर्‍याच वेळा चित्रातील रंग, नक्षी अश्या असंबद्ध बाबीवर चर्चा होते नि त्यामुळे चित्र त्या चौकटीच्यादृष्टीने दोषी ठरते.
खरं पाहता दोष त्या चित्राचा अजिबात नसतो, दोष असतो तो त्या चौकटीचा! त्यामूळे टीपकागदासारखे चांगले टीपून घेण्याची वृत्ती ठेवली की आपोआप आपल्या चौकटी ह्या कोणत्याही चित्रांना सामावून घेऊ शकतात. फक्त त्यासाठी लागते ते चौकटीच्याबाहेर येऊन कोणतेही चित्र समजून घेण्याची सर्वसमावेषक व्यापक अशी वृत्ती आणि आपली चौकट बदलण्याची मानसिक तयारी.

-----------------------------------------------------------------
वाळूच्या घड्याळातील वाळू वरून हळू-हळू खाली येत असते.सुरवाती सुरवातीला वाळू वरच्या भागात जास्त असते. नंतर हळूहळू ती वरून कमी होत जाते.वरच्या अर्धगोलातून वाळू हळूहळू निसटत असते.क्षणांचे असेच असते..आपण हळूहळू पुढे जात असतो.पण हातातून काहीतरी निसटत असते.जे निसटते त्याला पर्याय नसतो.त्याला आवरण्याचा आपल्याला अधिकारसुद्धा नसतो. अश्यावेळी काय करावे.. खालचा अर्धगोल कधी भरेल याची वाट बघावी. निसटणार्‍या क्षणापेक्षा खाली संचित झालेल्या कणांकडे पहावे.
असं थोडच आहे की गडावर चढताना दोराच्या दोन्ही टोकांना तुम्ही धरू शकता.
काहीतरी मिळवताना काहीतरी सोडावे लागते!

----------------------------------------------------------------शब्दांनी संवाद साधता येतात. संवादांनी मने सांधता येतात. हे जरी खरं असले तरी कधीकधी एका शब्दानेच सारं बिघडू शकते. होत्याचं नव्हतं होतं. मग संवाद करावा की नाही, बोलावे की नाही, असे वाटू लागते.
मग यातून एक प्रश्न निर्माण होतो--वाद होतो म्हणून संवाद साधायाचाच नसता तर ईश्वराने स्वर व व्यंजन का निर्माण केले? खरं तर स्वर व व्यंजनाच्या मिलनातून शब्द तयार झाले.मग संवाद आला नि मग सुसंवाद आला. म्हणजे बोलणं ही तर ईश्वराची देणगी.
मग चुकते काय? संवाद असावा की नसावा? वाद होतो म्हणून शब्दच नसावा की काय?
कारण एखाद्याच्या चांगला शब्द दुसर्‍याच्या दृष्टीने वाईट असू शकतो.एखाद्याला सुखवणारा शब्द दुसर्‍याला दुखवू शकतो. मग येते सापेक्षता. मग सारं पोकळ होऊन जाते. मग काय योग्य नि काय अयोग्य? ह्यात गोंधळ चालू होतो म्हणून कोण अबोल होतो नि कोण बोलका!

गुलमोहर: 

गुंतणे हे असं असावं की त्यातून एक रेशीम वस्त्र तयार व्हावं...>>>
निसटणार्‍या क्षणापेक्षा खाली संचित झालेल्या कणांकडे पहावे....>>>
फारच सुंदर लिहिलंय!!

खूप आवडलं..'निरपेक्ष प्रेम हा एक आदरणीय संकल्पना. निरपेक्ष म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवणे. निर्व्याज्यपणे प्रेम करीत राहणे. ही विचारसरणी बोलण्यास फार सोपी आहे पण आचरण्यात फार अवघड्..अगदी अगदी..

सहजपणे बोलताना आपण बरेच शब्द वापरतो. पण त्याचे इतके छान विचारपुर्वक विश्लेषण क्वचितच वाचायला मिळ्ते. सुंदर.

मस्त बौद्धिक!
माझ्या काही संकल्पना वरील विषयांवर-
निरपेक्ष प्रेम- आपल्याला जेव्हा वाटते की आपण देतोय तेवढे मिळत नाहीय, तेव्हा मी असा विचार करते की अमूक एक गोष्ट मला वाटते म्हणून मी तशी करते; "तुझ्या" मध्ये 'मी' असते म्हणून देवाणघेवाण होते आणि असा विचार करते म्हणूनच मी मग स्वतःला स्वार्थी म्हणवून घेते; कारण त्या देण्यातून मला आनंद प्राप्त होतोय, मग आपोआपच त्यातील त्यागाची भावना निघून जाते.
वाद- लहानपणापासून वादे वादे जायते तत्वबोधः अशी शिकवण असल्यामुळे खूप वेळेला न पटणार्‍या गोष्टींसाठी वाद घातलेला आहे- मोठ्यांबरोबर! परंतु आता म्हणजे मोठेपणी मौन राखणे पसंत करते! अर्थात संवाद असेल तर त्यासारखी मजा नाही; सुसंवाद नक्कीच असावा.
चौकटीवरून डॉ.आनंद नाडकर्णींच्या मला वाटते ' आडवा छेद" हया पुस्तकाची आठवण झाली, त्यातही त्यांनी म्हटलेय, चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची सवय आपण लावून घ्यायला हवी, म्हणजे अपेक्षाभंग होत नाही.
सकारात्मक विचार आणि वास्तवात राहणे हे ही सुंदर.
धन्यवाद सानिका; वाचायला मजा आली.