एक नर.. एक मादी

Submitted by कौतुक शिरोडकर on 30 March, 2010 - 11:23

पाण्याचा हबकारा चेहर्‍यावर मारून क्षण दोन क्षण अ‍ॅना वॉशबेसिनवर तशीच ओणवी उभी राहीली. दुपारचा थकवा आता ओसरायला लागला. पुन्हा तोंडावर पाणी मारल्यानंतर उभं राहून तिने आरशात पाहीलं. चेहर्‍यावरून उरले सुरले थेंब ओघळून गळ्याच्या दिशेन निघालेले. पाण्याचा अपेक्षित गारवा काही मिळाला नसला तरी तिला थोडं बर वाटलं. तिने बाथरुमच्या भिंतीवरील कडीत अडकवलेला नॅपकीन खेचला आणि चेहरा टिपायला सुरुवात केली. चेहरा टिपता-टिपता ती कपाटाकडे वळली. कपाटात फिलिप्सचा प्लेयर. बटण ऑन करून तिने 'प्ले' चा खटका दाबला. वातावरणात सूर दरवळू लागले.

किरमिजी रंगाचा प्रिन्टेड पंजाबी ड्रेस तिच्या मुळच्या गोर्‍या रंगाला शोभेसा होता. तिने मान वळवून ओढणी कुठे टाकलीय ते पहायला सुरुवात केली. ओढणी तिथेच खुर्चीवर निवांत होती. खुर्चीवरची ओढणी गळ्यात अडकवून ती ड्रेसिंग टेबलसमोर बसली. पावडरच्या डब्यातल्या पफने पॉन्ड्सचा हल्का थर तिने चेहर्‍यावर पसरवला. ड्रेसच्या कलरला मॅच होईल अशी किंचित फिकट लिपस्टिक तिला दिसेना. तिने टेबलाच्या खणात शोधाशोध सुरु केली. त्याचवेळी वातावरणात भीमराव पांचाळेंचा स्वर बहरला.

आयुष्य तेच आहे... तेच आहे... तेच आहे
अन हाच ... अन हाच पेच आहे.

क्षणभर थबकली ती. तशी ही गझल पहिल्यांदा ऐकत होती असे नव्हते. पण प्रत्येक वेळी तिचं थबकणं सहज असायचं. सवय झाल्यासारखं. गझलचा शोक नेहाचा. त्याच नादातून तो प्लेयर आलेला. तिच्याकडे उत्तमोत्तम गझल्सच कलेक्शन होतं. ही त्यातलीच एक. पहिल्यांदा ऐकली तेव्हाच ही गझल अ‍ॅनाला आवडली. तेव्हापासून दिवसातून एकदा तरी ती ऐकत असे.

पुन्हा खणातल्या वस्तूंसोबत तिने लपाछपीचा खेळ उकलायला सुरुवात केली. हवी तशी शेड सापडताच ती थांबली. गझलच्या सुरात हरवत तिने लिपस्टिक ओठांवर फिरवली. ओठांवर ओठ दाबले. एकदा आरशात पाहून लिपस्टिक नीट लागल्याची खात्री झाल्यावर तिने मोर्चा फणीकडे वळवला. गझलनवाज सूर आळवत होतेच.

बोलू घरी कुणाशी
तेही सुनेच आहे.....

केसांतून फणी फिरवताना तीही त्यांच्यासोबत गुणगुणू लागली. गुणगुणताना नकळत आरशातील स्वतःच्या प्रतिबिंबाएवजी दिसणार्‍या इतर गोष्टींकडे तिचं लक्ष गेलं. दरवाजा ते बेडच्या दरम्याने बांधलेल्या दोरांच्या वर बरेचसे कपडे निर्वासितांसारखे लटकले होते. पलिकडचं किचन टेबल, त्यावरील गॅस स्टॉव, नेहमी वापरात असणार्‍या वस्तूंचे डबे, भांडयांचा स्टँड, त्यातील तीन ताट, चार प्लेटस, प्लास्टिकच्या छोट्या बरण्या... त्याच्याबाजूला लटकत असलेलं गणपतीचं कॅलेंडर, मागे येशूंची नवीनच आणलेली क्रुसावरील प्रतिमा... हा संसार तिला अपेक्षित नव्हता. पण आता जे आहे.. ते आहे... मनाची चटकन समजूत घालून ती स्वतःच्या प्रतिबिंबाकडे वळली.

वेणी घालून तिने ती पाठीवर भिरकावली. एक लट कपाळावर झुकवून तिने आरशात पुन्हा पाहीलं. सर्व काही आलबेल असल्याचं पाहताच एक गोड स्मित तिच्या चेहर्‍यावर तरळलं आणि दुसर्‍याच क्षणी नाहीसं झालं. विषादाची एक छटा निरभ्र आभाळात एखादा काळाभोर ढग यावा तशी दाटून आली. समोरची स्वत:चीच प्रतिमा अनोळखी वाटू लागली. नेहमीप्रमाणेच हा क्षण आता विचारांच्या मोहाळाला चिथवणार हे जाणवताचं ती चटकन उठली. स्वतःबरोबर एकटं राहण्यातला धोका तिला ज्यादिवशी जाणवला तेव्हापासून ती शक्यतो घरी थांबतच नसे. बेडवरची पर्स उचलून तिने घाई-घाईत प्लेयर ऑफ केला. पायात सँडल्स सरकवून ती दाराकडे वळली तोच बेल वाजली. ती थबकली. घड्याळावर नजर टाकताच 'अजून नेहाची यायची वेळ झालेली नाही' हे जाणवलं.

'कोण असेल या वेळी ? ' चेहर्‍यावरचा त्रासिक भाव आठ्यात बदलला. 'जो असेल त्याला पळवून लावायचं' या ठरावावर मत येताच चेहर्‍यावरच्या नाखुषीला उजाळा देत तिने दार उघडलं. एक शिरशिरी देहात दौडत गेली. समोर सौमित्र उभा होता. पण तो समोर असूनही तिला त्यावर विश्वास ठेवणं जड जात होतं.

"तू ? "

अर्धवट उघडलेल्या दारावरचा एक हात अजून तसाच होता. चेहर्‍यावर आता निव्वळ आश्वर्य होतं आणि ते लपवावं असही तिला वाटतही नव्हतं. त्याच्या चेहर्‍यावर तेच नेहमीचं चिरपरिचित हास्य होतं. तो तिला त्या अर्धवट उघड्या दारातून न्याहाळत होता. ती मात्र स्तब्ध.

"दरवाजा पुर्ण उघडलास तर मला आत येता येईल." तो बोलला. तिने ते ऐकलं. पण ती हलली नाही. कधी कधी जाणिवा अचानक बधिर होतात.

"मला आत येण्याची परवानगी नाही का ? " त्याने शब्द बदलले. अर्थ तोच. तिला आता जाणवलं की ती दार अडवून उभी आहे. ती एका बाजूस झाली. तो आत आला. ती दार लोटायला पुढे सरली. समोरच्या घरातून सावंतीण डोकावत होती. कारणाशिवाय हसल्यासारखं करून अ‍ॅनाने दार लोटलं. कडी लावली तर सावंतीण आख्ख्या इमारतीत बातमी करेल हे एव्हाना तिला अनुभवावरून कळलं होतं. शिवाय लोटलेल्या दारावर त्यांची नजर असणारच याचीही जाणिव होतीच. घरची कामे सोडून अशी दुसर्‍यांची उठाठेव करायला हिला वेळ कसा मिळतो ? त्याही परिस्थितीत अ‍ॅनाला या गोष्टीचं नवल वाटलं. सौमित्राची चाहूल जाणवताच ती घरात वळली.

आपण घर आवरायला हवं होतं, असं चटकन तिच्या मनात आलं. पटकन पुढे सरून तिने बेडवरील कपडे दोरीवर टाकले. दोरीवरील लटकणारे कपडे अस्तव्यस्त दिसताहेत हे जाणवताच ते सगळे एका बाजूस सारले. या सगळ्या घडामोडीत हातातली पर्स मात्र तशीच राहीली आहे याच भान तिला नव्हतं. 'हा.. अचानक... इथे.... कोणी सांगितलं असेल .... पण का ? कशासाठी आला असेल ? .... प्रश्नच प्रश्न... विचारावे वाटत असूनही विचारता न येण्याजोगे.... ती घर आवरत होती. तो शांतपणे तिची हालचाल न्याहाळत होता.

"छान दिसतेस." ती थबकली. त्याच्याकडे वळली. "खरचं, छान दिसतेस." ती आता स्थिर झाली. वरवर तरी. आत मात्र प्रश्नांच वादळ अजू़नही घोंगावत होतं. ओठावर येणारा प्रत्येक प्रश्न ती महत्प्रयासाने मागे लोटत होती.

"तू ?" तिच्या शब्दातलं आश्चर्य अजूनही तसचं अबाधित होतं.
"अवेळी आलो म्हणू की वेळेवर ?" तिच्या आश्चर्याला उत्कंठेची फोडणी देत तो बोलला. ती काहीच बोलली नाही. त्याला जाणवलं ते.
"माझं येण आवडलेलं दिसत नाही." त्याची नजर चौफेर फिरत होती.
"नाही." आपल्याच नादात ती बोलली. त्या स्पष्ट नकारावर तो दचकला. तिला आपण काय बोललो ते लक्षात आलं.
"नाही.....म्हणजे आवडलं नाही अस नाही." तिने स्पष्टीकरणाचा प्रयत्न केला. "तू... इथे... असा अचानक ? "
"मला पाहून घाबरलीस ? " तिने नकारार्थी मान डोलावली." मग आश्चर्य वाटल ? "
"अनपेक्षितपणे जर ध्यानीमनी नसताना सर्वसाधारणपणे कोणी आलं की जे वाटतं तेच वाटलं." आता ती संयत होती. मनावर, भावनांवर आता ताबा होता. सवयीने सगळं जमतं.
"सर्वसाधारणपणे... " त्याने त्या वाक्यातला एक शब्द पुन्हा उच्चारला." मी कधी परत येईन अशी अपेक्षा नव्हती तुला ?" तिने त्याच्या नजरेला नजर देणं टाळलं. तो क्षणभर शांत राहीला.
"बाहेर निघाली होतीस ?" त्याचा रोख तिच्याकडेच होता.
"हो."
"जाणं फार महत्त्वाचं आहे ? " तिने त्याच्याकडे पाहीलं. "म्हणजे उशीरा गेलं तर चालण्यासारखं नाही का ?" तिला त्याच्या प्रश्नाचा रोख कळला. त्याला थांबायचं होतं, बोलायचं होतं.
"चालेल." ती उत्तरली.
"खरचं.... चालेल ?" त्याने खात्री करून घ्यावी अशा पद्धतीने तिला विचारलं.
"हो." तिने नजर त्याच्या नजरेत मिसळली.
"मग अजून बसायला नाही सांगितलस मला ? " तो मिश्किल हसला. तिला तिची चुक जाणवली.

मघापासून असलेला ताण किंचित सैलावला. तो नेमका का आलाय हे जाणवल्याशिवाय सैलावणं शक्य नव्हतचं. पण तरीही ती किंचित रिलॅक्स झाली. पर्स बेडवर टाकून ती त्याच्याकडे वळली. आता कोणत्याही विषयाला तोंड देण्यास ती सज्ज झाली. कधी ना कधी तो येईल अशी एक आशा होतीच मनाच्या एका कप्प्यात. मग बरचं 'बोललं आणि ऐकलं' जाईल हेही ठाऊक होतं. तो दिवस आज आला होता.

"चहा घेणार तू ? "
"मी चहा घेत नाही. विसरलीस... की बसा म्हटल्यावर चहा विचारण्याची औपचारिकता असते म्हणून विचारलसं ? " त्याच्या बोलण्यात उपरोध आहे असं वाटल तिला क्षणभर. पण क्षणभरच. तो त्याच्या स्वभाव आहे हे लक्षात आलं तिच्या.
"लक्षातच आलं नाही माझ्या. बरेच दिवस झाले ना ? "
"फक्त पाच वर्षे. पाच वर्षात पुसल्या जाव्या इतक्या पुसट नव्हत्या माझ्या आठवणी. " त्याने थेट तिच्या पिंगट डोळ्यात पाहील. आठवणींच्या छटा अजूनही तिथे असतील याची खात्री होती त्याला. त्याच्या स्वरातील खात्री जाणवली तिला. तो नेहमीच असा ठामपणे बोलायचा. तिने चटकन नजर वळवली व समोरच्या स्टँडमधून एक छोटी बाटली उचलली.

"कॉफी बनवते मी." डाव्या डोळ्यात तराळलेलं पाणी बाटली काढण्याच्या निमित्ताने तिने खांदा वर उचलून शिताफीने पुसलं.
"नको. राहू दे..." त्याची नजर त्या १८० स्केवरफुटाच्या म्हाडाच्या फ्लॅटवर फिरली. "एकटीच राहतेस तू ? " छोट्याश्या गॅलरीचा दरवाजा बंद होता. कडीवर एक पिशवी लोंबकळत होती.
"नाही. नेहा आणि मी. नेहा, मैत्रीण आहे माझी. शेअरमध्ये घेतलीय. कशी आहे ?" तिने बाटली किचन टेबलवर ठेवली व टेबलाला टेकून उभी राहीली. त्याची नजर घरात, भिंतीवर भिरभिरत होती. तिची नजर नकळत त्याच्या नजरेचा पाठलाग करू लागली.
"छान आहे."
"मलाही आवडली तेव्हा." तिने एक नजर समोरच्या ओघळलेल्या प्लास्टरवर टाकली."पत्ता कोणी दिला तुला ? "
"घरी गेलो होतो तुझ्या. जोत्स्ना भेटली तिथे."
"ज्योत्सा अजून आहे तिथेच. मला वाटलं तिचं लग्न झाल असेल म्हणून."
"लग्न झालय तिचं."
"लग्न झाल तिचं ? कुणाशी ? "
"रविंद्र सोनावणे. पाच वर्षापुर्वी ज्यांना आमचं घर विकलं होत त्यांचाच मुलगा. सासर-माहेर यात फक्त पाच घरांच अंतर. आहे की नाही गंमत ?"
"एकदा बोलली होती ती."
"तू घर केव्हा सोडलस ?" तो मुख्य प्रश्नाकडे वळला.
"वर्ष झालं."
"म्हणजे तुझी ममा येऊन गेल्यावर ? "
"हो."
"अजून ती कुवेतलाच आहे ? "
"हो."
"ममाला माहीत आहे ? "
"माहीत नाही..... कदाचित मर्विनने कळवलं असेल तिला."
"मर्विनने लग्न केलय म्हणे ?"
"हो. त्याच्या मित्राची गर्लफ्रेंड होती ती. मित्राने सोडलं आणि हा तिला लग्न करून घरी घेऊन आला. तिचं आणि माझं पटलं नाही. तसं मर्विनबरोबरही कधी पटल नव्हतं माझं."
"तुही लग्न करणार होतीस ना ? " तिने उत्तर दिलं नाही. प्रश्नोत्तरांच्या वाहत्या ओघाला खीळ बसावी तसं झालं. त्याने तिच्याकडे पाहीलं. त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी बरचं थांबावं लागेल हे त्याला जाणवलं. तो स्वतःशीच हसला. विषय बदलायला हवा हे लक्षात आलं त्याच्या.

"दोघीच राहता इथे ? "
"हो." ती आता त्याच्या पुढच्या प्रश्नाची वाट पहात होती. पण तो शांत होता. तिच्याकडे पहात. आणि त्या नजरेत तिला पुन्हा तेच आढळलं. तेच... तेच प्रेम....तोच आपलेपणा... ती तिच्या डोळ्यात मिसळू पाहणारी स्वप्नाळू नजर.... त्या प्रेमाने ओथंबलेल्या कविता.... ते भारलेलं वातावरण..... पण आता ते सगळं पुन्हा नको होतं. ती नजर तिला असह्य झाली. ती झटकन वळली. त्यासरशी हवेत रेंगाळलेला तिच्या वेणीचा शेपटा पुन्हा तिच्या पाठीवर रुळला. बाटली उचलून पुन्हा वर ठेवली तिने. "पाच वर्षानंतर आलास... तेही अचानक ... काही काम होतं माझ्याकडे ? " ती त्याची नजर टाळत वळली.

"काम ? " तो चमकला. "पाच वर्षानंतर भेटतोय आपण. कसा आहेस, म्हणून साधी विचारपूस नाही. 'काही काम होत का ? ' हे इतक्या परकेपणाने कशी विचारू शकतेस तू ? कामापुरतं स्वार्थी नातं आपल्यात नव्ह्तं कधीच." तिचा प्रश्न त्याच्या जिव्हारी लागल्याचं जाणवलं तिला.
"माझ्या प्रश्नाचा तो रोख नव्हता." स्पष्टीकरण देण्याची तिची इच्छा नव्हती हे तिच्या स्वरातून त्याला स्पष्ट कळलं.
"तसाच होता. किती गोष्टी मनाशी घोळवत आलो होतो. वाटलं होतं मला पाहून बेभान होशील, भावनावेगाने बिलगशील, रुसशील आणि विचारशील 'कुठे होतास इतके दिवस?'.... डोळ्यातल्या आसवांनी माझा शर्ट भिजवशील. पण चुकलं... माझचं चुकलं... तसा मी नेहमीच चुकत आलोय. सॉरी... अवेळी येऊन तुझ्या कार्यक्रमात मोडता घातला त्याबद्दल सॉरी. येतो मी.." तो उठला आणि दाराकडे वळला. गलबललं काहीतरी तिच्या आत. किती रुक्षपणे बोललो, वागलो आपण... आजच्या आपल्या आयुष्याला तो कारणीभूत नसताना.... उलट त्याच्यामुळेच हे जगणं जरा सुसह्य झालय..... पाच वर्षानंतर तो भेटायला आलाय आणि आपण.... ती त्याच्या दिशेला वळली.

"सोमू..." तिच्या हाकेसरशी तो थांबला. वळला. ती मागेच होती. तिच्या डोळ्यातलं पाणी त्याला दिसलं. ओघळण्याच्या बेतात असलेलं.
"सॉरी.. तुला दुखावण्याचा हेतू नव्हता माझा. खरचं नव्हता." त्याच्या हाताला धरून तिने त्याला पुन्हा बेडवर बसवलं. ती त्याच्या समोर त्याच्या शेजारीच बसली.
"तुला पाहीलं आणि काय बोलावं .. काय बोलू नये.. तेच कळेनासं झालय बघ. तसा हल्ली बोलण्यात कडवटपणा वाढलाय जरा." त्याचा हात अजूनही तिच्या हातात होता. त्याने दुसरा हात तिच्या हातावर ठेवला.

"वेळ आहे माझ्याशी बोलायला ?"
"तुझ्यापेक्षा महत्त्वाचं असं काहीच नाही, समजलास. अजून तसाच आहेस रे. हळवा.. मनाला लावून घेणारा. जरादेखील बदलला नाहीस. वयाबरोबर फक्त थोडा पोक्तपणा आलाय. बाकी सगळं तसचं." ती प्रसन्न हसली.
"तुही तशीच आहेस."
"मी ? " ती पुन्हा हसली. मनापासून. "आई कशी आहे रे ?"
"ठिक आहे."
"आणि क्षमाचं कसं चाललय ? तिच्या लग्नाचं जुळलं का कुठे ?"
"नाही. सध्या एका फर्ममध्ये नोकरी करतेय ती."
"खूप दिवस झाले रे तिला भेटून सोमू."
"सोमू.. पाच वर्षांनंतर ही हाक ऐकतोय. मला सोमू म्हणण्याचा अधिकार तुझ्याशिवाय दुसर्‍या कोणालाच दिला नाही मी कधी, आठवतं ना तुला ? "
"आठवतय सारं. एकेक शब्द-न-शब्द. दुसर्‍या कोणी सोमू म्हटलेलं तुला आवडल नाही कधीच. माझ्यामुळे एकदा जोत्स्ना तुला सोमू म्हणाली होती. किती चिडला होतास तेव्हा !"
"मी आजही चिडतो."
"पण कधी ना कधी हा अधिकार कुणाला तरी द्यावा लागेलच."
"अधिकार म्हणजे स्पर्धेत मिळालेली ढाल नाही. आज याला आणि उद्या त्याला द्यायला. तुझा अधिकार शेवटपर्यंत तुझाच राहील अनु."
"अनू... किती गोड वाटायचं तेव्हा तुझं हे अनु म्हणून हाक मारणं. किती सहज नाव बदललं होतस तेव्हा माझं." त्याने तिच्याकडे पाहीलं.

ती जणू आता त्याच्या शेजारी नव्हतीच. भुतकाळात गेलेली. त्या दिवशीच्या प्रहरी.. त्या नेहमीच्या खडकावर....

"आजपासून मी तुला अ‍ॅना म्हणणार नाही... अनु म्हणेन. अनुप्रिया.... मला फार आवडतं हे नाव. लग्नानंतर तुझं नाव मी अनुच ठेवन. अनुप्रिया सौमित्र नाडकर्णी. छान वाटते नाही ?" त्याचा एकेक शब्द स्पष्ट आठवला तिला.
"हुँ.... ! खुप छान !" ती म्हणाली. तिच्याच नकळत.
त्याने तिच्या हातावर हल्केच दाब दिला. ती परतली. "छान वाटलं होत तेव्हा...."
"ते आजही तितकचं सुरेल वाटतं अनु. त्या दिवसांइतकच." ती गप्प झाली. आता तो हरवला होता. ती त्याचं ते हरवत जाणं पाहू लागली.

किनार्‍यावरच्या खडकावर बसून भर उन्हात अनुभवलेला तो चांदण्यांचा कवडसा. एकमेकांच्या सहवासात हरवलेलं सागराच्या अस्तित्वासकट स्वतःचं मीपण. तुझ्या मुग्ध स्वरात गुंतलेल्या माझ्या अबोल कवितांची स्पंदने.....

तुझ्या आठवणी बहरताना
गुलमोहराची पखरण होते सर्वांगी
फुलला चाफा भिनतो नसनसात
अन तृणपुष्पासम डवरतं मन.....
तू, मी. त्या कविता, ती स्वप्ने आणि त्या क्षितिजापलिकडे असलेलं ते व्यवहारी जग......

"त्या गोष्टी तेव्हा होत्या सोमू." तिने त्याला वास्तवाची जाणिव करून देण्याचा प्रयत्न केला.
"तेव्हा..... आणि... आता... या दोहोंच्या दरम्यान क्षितिजापलिकडील ते जग केव्हा आलं ते कळलच नाही. बघता-बघता त्या जगाचा विस्तार झाला आणि त्या सागराच्या दोन किनार्‍याचे साक्षीदार झालो आपण." त्याने एक सुस्कारा सोडला.
"साध्या सोप्या शब्दांनाही फार गहन बनवतोस. लेखक आहेस ना, म्हणून. मला नाही जमत असं भावनांना शब्दात मांडणं वगैरे. बरं ते सगळं जाऊ दे. तू कसा आहेस ते सांग. नाहीतर म्हणशील की मी साधी विचारपूसही केली नाही." तो हसला.
"कसा आहेस ?" तिचा स्वर हळवा झाला.
"तसाच. पुर्वी तुझी वाट बघताना असायचो तसाच." तिने त्याच्या स्वप्नाळू डोळ्यात पाहीलं.
"लग्न केलस की नाही ?"
"नाही."
"का ? "
"तू का नाही केलस ? " तो तिच्याकडे वळला. ती गप्प बसली तसा तो हसला. "कोणी भेटलच नाही. नवीन असं काही घडलच नाही आयुष्यात. फक्त तू यायचीस अधूनमधून भेटायला. शरीर थकलं आणि स्वप्नांना जाग आली की..." तिने त्याच्याकडे पाहीलं. तो अर्थपुर्ण हसला. एक स्मित तरळलं तिच्या गालावर. पण तिने नजर वळवली. आता भावनांवर नियत्रण ठेवायला हवं. त्या आठवणीनी मोहरायचं नाही. मोहरलो तरी ते दाखवायचं नाही. तो उठून उभा राहील्याचं जाणवलं तिला. चेहर्‍यावर शक्य तेवढा अलिप्तपणा आणून ती त्याच्याकडे वळली. तो कपाटाच्या दिशेला होता. त्याचा हात कॅसेट प्लेयरच्या दिशेला वळला तेव्हा आपण स्वीच ऑफ केला नाही हे जाणवलं तिला. त्याने कॅसेट प्लेयरचा खटका दाबला.

तू भेटशी नव्याने
बाकी जुनेच आहे.....

गझलनवाज पुन्हा गाऊ लागले. त्याने तिच्याकडे अर्थपुर्ण नजरेने पुन्हा पाहीले. तिच्याकडे पाहत तोही गुणगुणू लागला. ती नजर आत खोलवर जाऊ लागली. एकेक दरवाजा उघडून आत.... तिने कोंडून ठेवलेल्या सुखाच्या ठेव्याकडे..... तिथे प्रवेश वर्ज्य होता प्रत्येकाला. त्या आठवणी त्याच्याबरोबरच्या सुखद दिवसांच्या होत्या... त्या उत्कट संध्याकाळच्या होत्या...... उत्स्फुर्त शपथांच्या होत्या.... त्या आठवणी फक्त तिच्या होत्या... आता तिथे त्याला ही प्रवेश नव्हता... त्या कथाचा तो नायक असला तरी.... तिने उठून प्लेयर ऑफ केला. त्याने तिच्याकडे पाहीलं.

"बंद का केलीस ?" त्याने विचारलं. "चांगली आहे गझल."
"हुँ." एक हुंकार भरून ती वळली.
"तुझी मैत्रिण किती वाजता येते कामावरून." काहीतरी विचारावं म्हणून त्याने सहज विचारलं. ती बेडजवळ थांबली. वळून त्याच्याकडे पाहीलं. तो उत्तराच्या अपेक्षेत उभा दिसला तिला.
"रात्री एक दोन वाजता किंवा दुसर्‍या दिवशी पहाटे." बोलताना तिचा आवाज शुष्क होत गेला.
"रात्री एक दोन वाजता ? कुठल्या हॉस्पिटलमध्ये काम करते तुझी ही मैत्रिण ?" फ्लॉवरपॉटमधल्या खोट्या फुलांवरून त्याने हात फिरवला.
"बिअरबारमध्ये." तिचा आवाज थंड होता.
"कुठे ? " तो तिच्याकडे वळला.
"बिअरबारमध्ये काम करते ती." तिची नजर जमिनीकडे वळली होती.
"बिअर बार ? तिला काय दुसरी नोकरी नाही मिळाली." त्याच्या स्वरात आश्चर्य होतं.
"दुसर्‍या नोकरीत किती मिळतात ? ४ - ५ हजार? यात खर्च भागत नाहीत. " तिचा स्वर शांत होता.
"म्हणून बिअरबारमध्ये ? आणि तिच्याबरोबर राहतेस तू ?" तो आवेगाने तिच्यासमोर आला.
"मीही तिथेच काम करते सोमू." ती बेडवर ठिक त्याच्या समोर बसली.
"तू ? " हा धक्का अनपेक्षित होता. त्याला सहनही झाला नाही हे त्याचा चेहराच सांगत होता." अनु तू... ?
"अनु नाही.. अ‍ॅना... अ‍ॅना डिसोजा."
"हेल विथ अ‍ॅना डिसोजा...."चिडून तो उठून उभा राहीला. त्याचा आवाज वाढला. त्याच्या शरीरातली किंचितशी निर्माण झालेली थरथर दिसली तिला."जगासाठी असशील तू अ‍ॅना. माझ्यासाठी तू कालही अनु होतीस, आजही आहेस आणि उद्याही राहशील." आवाजही थरथरला ते बोलताना. त्यालाही आपला आवाज वाढल्याचं जाणवलं. "अनु, आजवर झालं ते पुरेसं नव्हतं म्हणून त्यात हे आणखी."
"त्यात वाईट असं काय आहे ? कितीतरी मुली काम करतात तिथे आणि काम करण्यात लाज कसली ? " तिचा आवाज स्पष्ट वाटला नाही तिला. जणू तिला तिच्याच स्पष्टीकरणाची खात्री नव्हती.
"ज्या कामात सगळी लाजच सोडावी लागते त्यात कसली आलीय लाज." तिला त्याच्या आवाजातला उपहास भिडला.
"तसलं काही करत नाही आम्ही. साधं सरळ वेट्रेसचे काम आहे ते." ती अजूनही शांत होती. तिच्यासाठी हे प्रतिसाद नवीन नव्हते.
"येणार्‍या-जाणार्‍या लोचट नजरा तुझ्या शरीराशी झोंबत राहणार, वासनेचे किडे ज्यांच्या सर्वांगात वळवळत असतात ते... या ना त्या कारणाने शरीरस्पर्श करत राहणार आणि केवळ पैशासाठी त्या गलिच्छ लोकांसमोर तू देहाचं प्रदर्शन मांडणार. या असल्या प्रदर्शनाला तू काम म्हणतेस ? " तो चिडला होता. तिच्या त्या दृष्टीकोनावर. चिडणं स्वाभाविक होतं. त्या वाटेला तो स्वतः कधी गेलाच नव्हता.

"प्रदर्शन ?" ती हसली. " जगाच रहाटगाडगं तर प्रदर्शनावरच चालत सोमू. भिखारी त्याच्या लक्तरांचं आणि डोंबारी त्याच्या कौशल्याचं प्रदर्शन मांडतो. कलाकार त्याच्या कलेचं प्रदर्शन मांडून नाव कमवतो. तू तरी वेगळं काय करतोस ? प्रतिभेचं प्रदर्शन करतोस ना ? लोकांसमोर जे चांगल लिहीतोस, बोलतोस त्याच प्रदर्शन. त्यामुळेच तुला लेखक म्हणून ओळखतात. तुझ्या नाटकांना रंगमचावर सादर करणारे नट अभिनयाचं प्रदर्शन करूनच प्रकाशझोतात आलेत ना ? प्रदर्शन केल्याशिवाय किंमत तरी कुठे ठरते कुणाची ? ज्याच्याकडे जे आहे त्याचा बाजार तो मांडतो. मग मी करते त्यात वेगळं काय ? माझ्याकडे आहेच काय या शरीराशिवाय ? तुझ्या साहित्यिक भाषेत म्हणायचं झालं तर आखीव, रेखीव, मादक, कमनीय, संगमरवरी शिल्प. मग शिल्पाच्या प्रदर्शनात गैर काय ? मंद प्रकाशात धुंदावणारे रसिक पैशाच्या मोबदल्यात सहवासाची, स्पर्शाची अभिलाषा बाळगतात तर त्यात गैर काय ? या सौंदर्याच्या साक्षात्काराने ते व्यवहारी दु:खाशी फारकत घेतात ही काय छोटी बाब आहे. जाहीरातीत दिसणार्‍या अर्धनग्न मॉडेल्सकडे पाहण्याचे नेत्रसुख कोणी घेत नाही का ? लाखों रुपड्यांच्या बदल्यात दहावेळा पडद्यावर आंघोळ करणार्‍या व तोकड्या कपड्यात नाचणार्‍या घरंदाज नट्या अभिनय सम्राज्ञ्या म्हणून नावाजल्या जातात. आमची मात्र हेटाळणी ? का ?" त्याची चीड जिव्हारी लागली तिच्या. कोंडून ठेवलेल्या ज्वालामुखीच्या धगधगत्या लाव्हारसाला जणू वाट मोकळी झाली. सगळा संताप ओसंडून वाहीला. पण त्याला ते पटणं शक्य नव्हतं.

"व्वा ! अप्रतिम समर्थन. स्त्रीच्या अब्रुचे धिंडवडे एका स्त्रीच्या तोंडून." तिचं अधःपतन... पटणचं शक्य नव्हतं. आपण सगळ्या जगाचाच राग त्याच्यावर काढला हे लक्षात आलं तिच्या. तिने स्वतःला सावरलं. ती सयंत होऊ लागली. डोळ्यांच्या कडा पुसल्या तिने.

"समर्थन नाही हे. वस्तुस्थिती आहे. फक्त पाहणार्‍याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. जगाचा विचार करत जगणारे विदुषक होतात म्हणे. शेवटी इतरांना काय वाटते किंवा काय वाटत नाही याचा विचार मी का करावा ? जे मला योग्य वाटते तेच योग्य. बस्स." बोलता-बोलता तिने त्याच्या नजरेला नजर भिडवली.
"माझं तत्त्वज्ञान माझ्याच शब्दात मलाच सांगतेयस." त्याला तिच्या त्या नजर भिडवण्याचा अर्थ लक्षात आला.
"तुझ्या लक्षात आहे तर.. मग तर हे तुला पटायला हवं. की हे फक्त स्टेजवरच्या संवादापुरतचं मर्यादित आहे ? एकदा का चेहर्‍याचा रंग पुसला की पात्रांचे आचारविचारही पुसले जातात का ? मी या भ्रमात होते की लेखकच आपल्या पात्रांच्या तोंडून बोलत असतो." ती अजूनही त्याच्या नजरेला नजर भिडवून होती.
"निदान तुला तरी हा भ्रम वाटायला नकोय." त्याला तिच्या त्या आरोपाचं वाईट वाटलं हे त्याच्या चेहर्‍यावरून जाणवलं तिला. ती शांत झाली. त्याच्या लिखाणात नेहमी तो स्वतः असतोच हे तिला माहीत होतं. तो शांत झाल्यासारखा वाटला तिला. कदाचित तिच्या बोलण्याने तो दुखावला होता. ती उठून त्याच्याजवळ आली.

"तुला आठवत.. तू नेहमी अशा मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायचास. तुझ्याच सहवासात शिकले हे सारं. तेव्हा कळलं नव्हतं. पण आता मी ते अनुभवतेय. अनुभवाने शहाणपण येतं असं म्हणतात." ती आता डोंगरावरून कोसळल्यावर पुढे शांतपणे वाहात जाण्यार्‍या प्रवाहासारखी शांत होती.
"तुझं जे चाललयं तो शहाणपणा आहे असं वाटतय तुला ? मग तुला हे ही माहीत असेल की हे कुठवर चालणार आहे." पण तो मात्र अजूनही रागात होता.
"त्वचेचा रंग गुलाबी आहे तोपर्यंत... तारुण्याची टवटवी त्यात बागडते तोपर्यंत... " तिच्या स्वरात हताशपणा होता.
"त्यानंतर ?" त्याला तो हताश स्वर जाणवला.
"नशिबात लिहिल असेल ते. भुतकाळाच्या काळ्याकुट्ट अंधारात डोकावण्यात जसा अर्थ नसतो तसाच भविष्याच्या पांढर्‍या फटफटीत प्रकाशात रस्ता चाचपडण्यातही काही अर्थ नाही. जे येईल ते आपलं म्हणायचं आणि झो़कून द्यायचं स्वतःला. बरोबर ना ? " तिने त्याच्यासमोर उभं राहून आवेशात वाक्य फेकलं. त्याही स्थितीत तिच्या त्या नाटकी पद्धतीने वाक्य फेकण्याचं हसू आलं त्याला.

"तू नाटक पाहीलस ?" आता आश्चर्यचकीत होण्याची पाळी त्याची होती.
"तुझ नाव वाचल आणि गेले आत. रंगभुमीवर येण्याचं तुझ स्वप्न होतं ना ? मला ते प्रत्यक्षात आलेलं अनुभवायच होतं. पडदा वर गेला आणि रंगमचावर अ‍ॅना डिसोजा सौमित्र नाडकर्णीबरोबर वावरू लागली. प्रेक्षक नाटक पहात होते आणि मी भुतकाळाची उजळणी. शेवटी नायक नायिकेला विचारतो,'अ‍ॅना, तुझं नंतर काय होणार ?" तिच्या डोळ्यासमोर नाटक तरळलं.

"अ‍ॅना तारुण्याच्या गोष्टी कुठवर करशील ? दहा वर्षे... वीस वर्षे.. त्यानंतर.. चेहर्‍यावर सुरकुत्यांच जाळ असेल. डोळ्याभोवती काळी वर्तुळे, केसांना कलपांचा आणि शरीराला काठीचा आधार घ्यावा लागेल. गुलाबी त्वचेचं तारूण्य मुठीतल्या वाळूसारखं निसटून जाईल. ती रिकामी मुठ घेऊन किती काळ बसणार ? माझ ऐक. परत ये... अनु परत ये."

"आणि ती परत येते. अनरिअ‍ॅलिस्टिक ... वेरी वेरी अनरिअ‍ॅलिस्टिक एन्ड. नाही जमलं मला प्रेक्षकांबरोबर टाळ्या वाजवायला. नायकाच्या त्यागाचे, धाडसाचे कौतुक. स्त्रीवर्ग नायिकेच्या आयुष्याचं सोन झालं म्हणून आनंदी. कुणाचं काही चांगल झालं तर लोक आनंद व्यक्त करतात. तसाच आनंद. पण सोमू, तुझ्या नाटकाचा अंत असा परिकथेच्या अंतासारखा का केलास ? ... आणि मग ते सुखात नांदू लागले. तुला काय वाटल अ‍ॅना परत येईल म्हणून ?" तिचा स्वर दृढ होता.
"हो. आणि नाटकाचा एन्ड अनरिअ‍ॅलिस्टिक नव्हता हे सिद्ध करायलाच आलोय मी." त्याच्या शब्दात त्याचा सच्चेपणा होता.
"सोमू तू..... " ती हसू लागली. "मला वाटल होत की तू आता शहाणा झाला असशील. पण नाही. तसाच आहेस. वेडा..."
"हसू नकोस." ते हसणं लागलं त्याच्या मनाला.
"हसू नको... का रे ? मागे केला होतास ना प्रयत्न. काय झाल ते विसरलास ? मी नाही विसरले. एकेक शब्द आठवतोय मला. एखाद्या अपराध्यासारखी तुझ्या आईसमोर उभी होते मी. मी ऐकत होते आणि फक्त ती बोलत होती." तिला तो दिवस, ती वेळ, तो क्षण व्यवस्थित आठवत होता. एखाद्या जुन्या घावासारखा.... भळभळत्या जखमेसारखा.....

"ह्या बाजरबसवीबरोबर लग्न करायचय तुला ? डोळे फुटलेत का काय तुझे ? दहाजणांबरोबर पालथी पडलेली ही. हिच्याशी संसार करणार आहेस तू ? काय माहीत आहे रे तुला हिच्याबद्दल ? तीन वेळा मेलीने पिशवी साफ केली आहे. दहा दगड झाले हिचे. आता तुझ्यावर डोळा आहे हिचा. मेलीला माझचं घर मिळालं तोंड मारायला. चालती हो... चालती हो....."

"अनु आई जे बोलली..." त्याने तिच्या नजरेला भिडवलेली नजर वळवली.
"त्याचा राग नाही बघ. तिच्याबद्दल कसली अढी नाही मनात. कुठल्याही आईला वाटेल तेच तिला वाटलं. आपल्या मुलाने एका चांगल्या मुलीशी लग्न करावं म्हणून... " तिच्या मनात कोणताही रागलोभ नाही हे लख्खपणे तिच्या स्वरात होतं. "सोमू, तु नाटक लिहिण्यापुर्वी मला भेटायला पाहीजे होतस. म्हणजे ते एक पुर्णसत्य झाल असतं बघ. तू प्रेक्षकांसमोर आणलेली अ‍ॅना म्हणजे तुला माहित असलेली अ‍ॅना. उदात्त, त्यागी, परिस्थितीमुळे चारित्र्यहीन झालेली. सत्यघटनेवर लिहिण्याचा पाठपुरावा करणारा तू सत्याकडेच पाठ फिरवून बसलास. अ‍ॅनावर नाटक लिहिण्याआधी अ‍ॅना आहे तरी कशी आणि का, हे तरी जाणून घ्यायचं होतस."
"काय सत्य जाणून घ्यायला हवं होतं ? आई बोलली ते की अधूनमधून इतरांकडून कानावर आलं ते ?" तो आता निवायला लागला. "त्याने काय फरक पडणार होता. मला फक्त इतकच माहीत होतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे."
"अरे इतकच प्रेम होतं तर मग का नाही आलास माझ्या आयुष्यात त्या सगळ्यांच्या आधी... तसं झालं असत तर आज परिस्थिती वेगळी असती." ती पोटतिडकीने बोलली.
"परिस्थिती आजही बदलू शकते अनु." त्याने जवळ जाऊन दोन्ही हातांनी तिचे खांदे धरले.
"नाही, आता काहीच बदलू शकत नाही." तिने भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहीलं.
"का नाही ? हे असलं उपेक्षित, किळसवाणं आयुष्य जगायचय तुला ? हे आवडतं तुला ?" त्याचा स्वर ओलावला.
"आवडीनिवडीचा प्रश्नच नाही रे. आपण करतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात अस आहे का ? आवडीनिवडीचा हक्क प्रत्येकाला जन्माआधी असता तर मग मी एका कुलवंताची लेक म्हणून जन्माला आले असते, एका रखेलीच्या पोटी जन्म घेतला नसता मी." ती फुटलेल्या बांधासारखी वाहू लागली.
"अनु तू.... " त्याने तिला अडवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
"बोलू दे सोमू.. आजतरी... सत्य तुला आजतरी कळायला हवय. माझ्या आईच्या तोंडूनच ऐकलय मी हे. ज्याला बाप म्हणून पहिली हाक मारली, ज्याच्या गळ्यात पहिली मिठी मारली, ज्याचं नाव माझ्या नावापुढे लागत होतं, तो माझ्या आईचा नवरा होता फक्त. ऐकलस तू.. तो माझा बाप नव्हता. माझ्या भावाचे लाड व्हायचे तेव्हा मी कोपर्‍यात उभी असायचे... मायेच्या स्पर्शाला आसुसलेली. माझ्या खर्‍या बापाला जेव्हा मी पहिल्यांदा भेटले तेव्हा माझ्या डोक्यावर हात ठेवून ' अपनी बच्ची है' हे वाक्य त्याने थाटात फेकून त्याचं पुरुषत्व सिद्ध केलं. पत्नी, आई आणि रखेली. माझ्याच आईत मी पाहीलेली स्त्रीची तीन रुपे. ज्या वयात मनावर सुसंस्कार व्हावेत तेव्हा 'ठेवलेल्या बाईची मुलगी' हे माझ्या मनावर बिंबवण्यात आलं. तिच्या दुष्किर्तीचं वलय मला व्यापून होतं. बदचालीच्या बाईची मुलगी तिच्यापेक्षा वेगळी ती काय असणार ... या ओळखीवरच मी वयात आले. वयाच्या चौदाव्या वर्षी माझ्या आयुष्यात आलेल्या पहिल्या पुरुषाने माझं स्त्रीत्व जागवलं आणि पोटातल्या आगीसारखी शरीराची भुक पेटली. तारुण्याचा एकच धर्म मला उमगला. शरीरधर्म.. कदाचित रक्तात असावं ते. आनुवांशिक म्हणतात तस काहीसं. प्रेम म्हणजेच वासना.. हे मनात रुतत गेलं. त्यातच तू भेटलास. मी तुझ्याकडेही आकृष्ट झाले. पण ती एका प्रेयसीची प्रियकरासाठी ओढ नव्हती. ती एका मादीची एका नराकडे असलेली धाव होती." ती बोलता-बोलता थांबली.
"आणि मी तुझ्यावर प्रेम करत होतो. माझ्या सर्वस्वाला विसरून. नितळ प्रेमाच्या शोधात भटकणार्‍या मला तू भेटलीस तेव्हा वाटल की जे हवं ते गवसलं. पण जे मिळालं ते एक आसुसलेलं शरीर होतं." त्याचा खेद तिच्यापर्यंत पोहोचला.
"जे उपभोगणं तर दूर.. तू त्याचा स्पर्शही टाळलास." तिला तो क्षण आठवला.
"प्रेम आणि वासना यातला फरक मला कळत होता अनु. त्याक्षणी तुझ्या वागण्याचा अर्थबोध नीट झालाही नव्हता. कारण माझ्या आवेगात शरीराचं आकर्षण नव्हतचं मुळी. तुला ते उशीरा का होईना जाणवलं. पण तुझं माझं नात हा इतरांसाठी थट्टेचा आणि घरच्यांसाठी तिरस्काराचा विषय झाला. पण माझं प्रेम मात्र अबाधित होतं..." ते त्याच्या डोळ्यात दिसलं तिला.
"माझ्याबद्दल माहीत असून तू मला लग्नाची मागणी घातलीस. तिरस्कार नाही वाटला माझा ? गळा आवळून जीव घ्यावासा नाही वाटला ?" त्याला आपल्याबद्दल इतकं माहीत असेल असं तिला कधी वाटलच नव्हतं.
"नाही."
"का ? का अजूनही प्रेम करतोयस तू ?" तिने मनाच्या पाताळात इतकी वर्षे अनुत्तरीत राहीलेला प्रश्न त्याला विचारलाच.
"कारण तुझ्या शरीराला जरी अनेक स्पर्श झालेले असले तरी तुझ्या मनाला झालेला पहिला स्पर्श माझा होता. मला हेही माहीत आहे की ते तू माझ्यासाठीच राखलं आहेस. मी आज माझी ठेव न्यायला आलोय." त्याने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. पण ती मागे सरकली.
"सोमू, भावनेच्या भरात वाहणं वेगळं आणि समाजात वावरणं वेगळं. जरा विचार कर."
"कसला विचार करू ? रस्त्यावरच्या उकीरड्यावर कचरा गोळा करून जगणारे भणंग देखील लग्न करतात. मी लग्न करायचं म्हणतोय यात विचार कसला करायचा ? तू बोल, करशील माझ्याशी लग्न ?" त्याने निर्वाणीचं विचारलं.
"हे बघ सोमू...."
"हो की नाही ?"
"नाही." तिचा ठाम नकार.
"अनु..." त्याला ते अपेक्षित नव्हतं.
"अ‍ॅना... मला आता अ‍ॅना म्हणूनच जगायचय. हक्काच घर, पत्नीचा दर्जा, समाजात मान वगैरे मला तुझ्याबरोबर येण्याने मिळेल असा जर तुझा समज असेल तर ते डोक्यातून काढून टाक. 'श्री. सौमित्र नाडकर्णी यांनी एका बारबालेशी लग्न करुन समाजाला एका नवा आदर्श दिला.' असे अत्युच्च त्यागाचं सर्टिफिकेट समाजातून तुला मिळेल. पण माझ काय ? त्यागाच्या, बलिदानाच्या चर्चेत माझ्या चारित्र्याची कायम उजळणी होतच राहणार. मिसेस नाडकर्णी म्हणजे पुर्वाश्रमीची बारबाला असला जाहीरातवजा उल्लेख नकोय मला."
"अनु तू...."
"हे बघ सोमू, मला कुणाच्याही त्यागाचा पाया व्हायचं नाही. इथे माझी ओळख अ‍ॅना डिसोजा म्हणून आहे. तुझ्या समाजात मात्र ती ओळख माझ्या गतआयुष्यातल्या व्यवसायाने होणार. मला तो जीवघेणा प्रकार नकोय." तिच्या नकाराला एक समंजस पार्श्वभुमी होती.
"अनु नस्ती कारणं सांगू नकोस. त्या समाजात तुला फक्त पत्नीचाच नव्हे तर आपल्या मुलांच्या आईचाही दर्जा तुला मिळेल. माझ्यावर विश्वास ठेव." त्याने त्या दोघांसाठी पाहीलेल्या स्वप्नांची दुनिया तिला पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न केला.
"सोमू, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असते हे गु़ळगुळीत वाक्य शाळेतल्या फळ्यावर लिहिल्या जाणार्‍या सुविचारापुरते ठिक आहे. वाचा आणि विसरा. वास्तवात स्त्री एक भोगदासीच असते. क्षणापुरती आणि अनंतकाळापुरती. कुणी असेच तर कुणी चार मण्यांनी बांधून जनावरासारखे लचके तोडतात. चार भिंतीत हक्काने वापरता येईल व नको तेव्हा अडगळीत टाकता येईल अशी वस्तू. आजवर हेच पहात आलेय मी पुरुषांच्या नजरेत." तिने त्याला तिच्या अनुभवांचा लेखाजोखा सांगितला.
"अनु मला तुझ्या नस्त्या तत्वज्ञानाचे धडे नकोत." तिचा नकार त्याला टोचत होता.
"मग काय हवय तुला ? चारचौघीसारखं मला घरच्या जोखडात बांधून नवरेशाहीचा अधिकार गाजवायचाय ? मला माझ्यावर वर्चस्व सिद्ध करणारा नकोय कोणी. स्त्रीस्वातंत्र्याला हिरावून घेणारी लग्न ही संस्थाच मला मान्य नाही. पत्नीचा दर्जा मला इथे प्रत्येक रात्री मिळू शकतो. राहता राहीला मातृत्वाचा प्रश्न, तर मुलाबाळांच लेढार सांभाळत चुल फुंकायची नाही मला. माझ्या या मनमोकळ्या अनिर्बंध आयुष्यात मी सुखी आहे." तिच्या स्वरात पोकळपणा असल्याचा भास झाला त्याला.
"बस्स पुरे झाल. स्वतःची फसवणूक करण्याची काहीच गरज नाही. हे नाटक बस झाल." तो आता चिडला होता.
"नाटक वाटते हे तुला ? कमाल आहे तुझी. कागदांच्या पत्रावळीत जगणारा एक साधा लेखक तू. कल्पनेच्या विश्वात वावरणारा. व्यवहारी जगाचे नियम तुला कसे पटायचे ? भोगदासी ही माझी ओळख जगजाहीर आहे. जिथे जाईन तिथे ती सावलीसारखी माझ्या सोबत असणार आहे. मी स्वतः कायमची अंधारात जाईपर्यंत. तुझा आणि माझा काय मेळ ? तू रंगमंचाच्या प्रकाशात वावरणारा. त्या प्रकाशझोतात माझी सावली फार प्रदीर्घ दिसेल. आम्ही दोघी वेगळ्या होऊच शकत नाही."
"अनु तुला मी शेवटचं..."
"..आणि मी तुला सुरुवातीपासून सांगतेय. नाटगृहात पैसे खर्च करून आलेले प्रेक्षक बाहेर पडल्यावर समाजाचे घटक होतात. त्यांचे स्वतःचे काही आदर्श असतात. लक्ष्मणरेषा असतात. त्या ओलांडायचा प्रयत्न करू नकोस."
"अनु, जगाच्या पाठीवर हे एकच शहर नाही.. आपण.....
"कुठे जाणार ? माणसं सगळीकडे सारखीच. पहाण्यासाठी दोन डोळे, उगारण्यासाठी दोन हात, तुडविण्यासाठी दोन पाय आणि वाट्टेल ते बोलण्यासाठी एक तोंड. चेहरे बदलले तरी माणसं तीच, भावना त्याच, विचार तेच. स्वतःच्या घरातल्या शिळ्या कढीला ऊत आला तरी दुसर्‍याच्या घरात काय शिजतय ते पहायाला नाक लावून डोकावणारी माणस सगळीकडेच. या समाजापासून पळणार तू ? आणि माझ्यासाठी तु कमावलेली सारी पत पणाला लावणार ? ज्या स्वप्नांच्या पुर्ततेसाठी आजवर झगडलास त्याच्या पुर्णत्वाची वेळ आल्यावर मार्ग बदलणार ? म्हणजे हा सल उरात ठेवून जगायचं... की माझ्यामुळे तुला तुझं घर, तुझी माणसं, तुझा लौकीक सोडावा लागली. तुला तुझ्या स्थिरावलेल्या जगातून उठवून मी माझा संसार मांडायचा ? माझं स्वतःचं आयुष्य सोडून तू दिलेलं उधार आयुष्य मी जगायचं ? हा नाद सोड तू." ती खंबीरपणे बोलत होती.
"किती आशेने आलो होतो मी. वाटल होतं मला पहाताच हात पुढे करशील आणि म्हणशील, सोमू मी तुझीच वाट पहात होते. तुला पत्नी म्हणून या जगाला माझ्या प्रेमाची ताकद दाखवणार होतो. वाटल होतं की तू फक्त शरीराने विटाळली असशील. पण नाही, तुझ तर मन ही विटाळलय. स्त्रीपुरषांच एकच नात तुला उमगलं. नर आणि मादीचं. इतर नाती तुला कळलीच नाही कधी. तसा प्रयत्नही केला नाहीस. 'क्षणिक सुखासाठी एकत्र येणारे' एवढाच तुझ्या लेखी नरमादी यांचा आलेख. पण तुझ्या-माझ्यात नर मादीचा संबंध नव्हता कधीच. ऐकतेस ना तू ? कधीच नव्हता. स्त्रीचा एक भयानक चेहरा दाखवलास तू आज मला. तुझ्या मनाचा हा र्‍हास सहन होत नाही आता. विचारांच्या या हननामुळे तू आता खरोखरच चरित्रहीन झालीस. स्त्रीची असली व्याख्या तुझ्या तोंडून ऐकल्यावर मला आता तुझ्याबद्दल काडीमात्र आदर उरला नाही. आता इथे थांबण्यात अर्थ नाही. जाण्यापुर्वी एक सागतो. पुन्हा कधी आयुष्यात चुकून समोरासमोर आलोच तर मला सोमू म्हणू नकोस. आज, आता या क्षणापासून मी तो तुझा अधिकार काढून घेतोय. जातो मी...." तो वळला. लोटलेलं दार ओढून बाहेर पडला. मागे एकदाही वळून न पहाता. तो जिन्याच्या दिशेने वळला आणि नजरेआड झाला. ती खाली कोसळली. एवढा वेळ धरलेलं अवसान आता संपलं होतं.

"बरं झालं. जाताना 'येतो' म्हणाला नाहीस. नाहीतर तू पुन्हा परतून येशील ही भीती आयुष्यभर वाटत राहीली असती. तू जरी तुझ्या अनुला संपवल असलस तरी ती मात्र जपणार आहे तिच्या सोमूला. उराशी... पण तू परत येऊ नकोस. तुझ्या येण्याने अनुच स्त्रीत्व पुन्हा उसळी मारून वर येईल. ती तुझ्या प्रेमाला पात्र नव्हतीच कधी. तू एक पुरुष आहेस आणि ती एक मादी. हीच तर तुमच्यातली दरी. मादीला मन नाही की भावना नाही. आहे ते निव्वळ शरीर. तुझ्या प्रत्येक प्रेमळ स्पर्शात तिला त्या बरबटलेल्या हाताची जाणिव झाली असती. स्वतःची किळस वाटली असती. तुझ्या अवतीभवतीच्या किती जणांनी तिच्या आयुष्याशी खेळ मांडला होता. त्यांच्यासमोर तिला तू उभं केल असतस तर त्यांनी काय म्हणून पाहीलं असतं तिच्याकडे ? त्यांना त्या सौभाग्याच्या खुणा दिसल्या असत्या का ? ती अंगभर नेसलेली साडी, तो कुंकुवाचा टिळा, ते गळ्यातलं मंगळसुत्र, तो हिरवा चुडा.. दिसलं असतं का ? नाही रे ..त्यांना दिसलं असतं ते फक्त शरीर... तू तुझ्या पत्नीची ओळ्ख करून देण्याआधीच त्यांना त्या शरीराची ओळख झाली असती. ते तिला नकोय सोमू. पती - पत्नीच्या नात्याचा अवमान नकोय. पतीशी एकनिष्ठेची शपथ घेणार्‍या पतीव्रतेच्या पावित्र्याची थट्टा नकोय. आणि तिच्या मुलांना जर कोणी विचारल की तुमचा खरा बाप कोण... तर... तिच्या मातृत्वाची असली थट्टा सहन होईल का तिला ? नाही सोमू...आणखी एका अ‍ॅनाचा जन्म पाहवणार नाही मला. तू खरच परत येऊ नकोस. कधीही परत येऊ नकोस..."

(एकांकिका हा प्रकार कॉलेजात असताना केला. त्यानंतर काही हौशी मित्रांबरोबर ग्रुप बनवून एकांकिका करण्याचे उपद्व्यापही केले. त्याच काळात ९३-९४ च्या काळात लिहीलेली एकांकिका. फक्त इथे कथेच्या स्वरुपात पोस्टवतोय. हा विषय करायची इच्छा होती. पण शक्य झाले नाही. कधीतरी कुणीतरी माझ्या त्या अतृप्त इच्छेला पुर्ण करेल असा एक विश्वास मात्र आहे.)

गुलमोहर: 

अप्रतिम....
अ‍ॅनाचे प्रॅक्टिकल विचार पटले...
इन्फॅक्ट शेवट फारच आवडला... Happy

मला पण एकांकिका लिहून द्याल का ?
पण मी तुम्हाला मानधन देऊ शकत नाही.

ho pan jinkalo tar mag nakki......

actually mala abhinayache khup ved aahe.
ekankikela NYAY denyachi jababdari MAZI.
Karnar tar ekdam DIL SE nahi tar mag NAHI
ashi mazi savay aahe....

mi vat pahato tumachya uattarachi.....

कथा छानच आहे. पण मी ही वाचली आहे मायबोलीवरच बहुतेक! कदाचित तुम्हीच लिहिली असेल पण अगदी same to same म्हणजे characters ची नाव सुद्धा! तुम्हाला बोल लावायचा हेतू अजिबात नाही. पण तुम्ही ही पूर्वी प्रकाशित केली होती का?

>जगाचा विचार करत जगणारे विदुषक होतात म्हणे.<............खरच कथा कथा खु...प...........खु प ... चांगलि आहे हो ईतकी कथा आवडलि कि > बरं झालं. जाताना 'येतो' म्हणालास< ....... येव्हडि खि ? खि ? आत्ता काय . ..मस्त ........................मस्त ......मस्त ....मस्त .मस्त,, मस्त ..मस्त ....मस्त.., मस्त. ..मस्त .

Pages