पंढरी

Submitted by मिल्या on 28 March, 2010 - 14:45

वदंता वाटते आता.. कहाणी जी खरी होती
कधीकाळी इथे प्रत्येक गावी पंढरी होती

तुझ्या माझ्यातले नाते जरासे वेगळे होते
जवळ होतो तरी.. दोघांमधे कायम दरी होती

तसा नव्हताच रस्ता वाकडा अन खाच-खळग्यांचा
अरे पायातली चप्पल.. जराशी चावरी होती

तुझ्या श्वासातले आव्हान इतके वादळी होते
किनारा सोडुनी नौका बुडाली सागरी होती

म्हणे येणार ती झुळकेप्रमाणे ऐकले होते
उडाली उंच आभाळी.. मनाची शेवरी होती

कुणी यावे कुणी जावे, कुणी मुक्काम ठोकावा
हृदय का धर्मशाळेतील पडकी ओसरी होती?

तुला सांगूनही कळलाच नाही अर्थ मौनाचा
तुला तर वाटले केली तुझी मी मस्करी होती

तुला भेटायला येईन का मी रिक्त हातांनी?
तुझ्यासाठीच मॄत्यो आणली मी भाकरी होती

गुलमोहर: 

मस्त

मस्तच.
किनारा सोडुनी नौका बुडाली सागरी होती
-येथे बुडाली सागरी या शब्दांशी अडायला का होतेय?

तुझ्या श्वासातले आव्हान इतके वादळी होते
किनारा सोडुनी नौका बुडाली सागरी होती

तुला सांगूनही कळलाच नाही अर्थ मौनाचा
तुला तर वाटले केली तुझी मी मस्करी होती
>> मस्त.

बरेच दिवसात मा.बो. वर येणे नाही जमले म्हणून उशिरा प्रतिसाद देतोय. क्षमस्व...

प्रतिक्रियांबद्दल सर्वांना खूप धन्यवाद

एकंदरीत प्रतिक्रिया बघून वाटले की फार कमी लोकांना पूर्ण गझल आवडली... पुढच्या वेळी अजून चांगला प्रयत्न करेन..

नेहमीप्रमाणे दर्जेदार.....

सागरी आणि शेवरी हे दोन शेर जास्त आवडले Happy