पुन्हा एकदा फिरुन..'बोकास देल तोरो' ची सहल-भाग १

Submitted by वर्षू. on 25 March, 2010 - 02:40

माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो ..तुमच्या आग्रहाला मान देऊन 'बोकास' ट्रिप चं डीटेल वर्णन करत आहे.

१५०२ मधे पॅसिफिक मधे शिरायची वाट शोधत असता कोलंबसने 'अलमिरांते' बे चा शोध लावला. या बे वर असलेल्या ३२० बेटांपैकी 'बोकास देल तोरो' हे पनामाचं एक प्रॉव्हिंशिअल बेट आहे. याच्या उत्तरपूर्व किनार्याला करेबिअन सी आहे तर दक्षिणपश्चिमेकडे कोर्डियेरा तालामांका ही ज्वालामुखी रहित पर्वत माला
पसरलेली आहे.
पनामाहून आम्ही सहलीसाठी जायला 'बास्तीमेंतोस' हे बोकास चे एक डिस्ट्रिक्ट बेट निवडले. कोलंबस ला लागणारे अन्नधान्य,शस्त्र या बेटावरून पुरवले जात म्हणून त्यानेच या बेटाचे नाव 'बास्तीमेन्तोस (इन्ग्लिश अर्थ ,''सप्लाईज") ठेवले. या बेटावर कोरल रीफ, मासे, विविध वन्य प्राणी ,गोल्डन आणी रेड फ्रॉग भरपूर संख्येत आढळतात.
बोकासला जाण्यासाठी अलमिरांतेवरून बोटी सुटतात. म्हणून पनामापासून १७६ किमी. वर असलेल्या अलमिरांते बे कडे कारने ने सकाळी ५ वाजता प्रस्थान केले. या दहा तासाच्या प्रवासात वाटेत अनेक छोटी छोटी खेडी लागत होती. खेड्यांमधली घरे ब्राईट पिवळ्या,निळ्या,लाल रंगांनी रंगवलेली होती. हिरव्या बॅकराउंड मुळे अधिकच उठून येत होती. खेडी जवळ आली की दोन्ही बाजूला ऊस,केळ्यांची बने लागत .खेडी मागे पडली की रस्त्याच्या दुतर्फा असलेले घनदाट,हिरवेगार रेन फॉरेस्ट आणी दूरवर दिसणारी तालामांकाची निळसर ,धूसर पर्वतमाला लांबपर्यंत सोबत देत होती.

almirante cha dhuka.jpg

तालामांकावर चढत असतांना रस्त्यावर उतरलेल्या धुक्यात ७,८ फुटावरचंही काही दिसेना.त्यामुळे उतरणीवर अगदी जपून गाडी चालवावी लागली.
अलमिरांतेला पोचल्यावर मात्र शिरडीला पोचल्यावर जसे भिकारी,फुलं विकणारे, हॉटेलवाले आपल्यावर झडप घालतात तसेच इकडल्या नावाड्या,वाटाड्यांनी आमच्यावर चारी बाजूने हल्ला केला. त्यांना शिताफीने चुकवत,आम्ही आधीपासूनच बुकिंग केलेल्या आमच्या बोटीच्या धक्क्यावर ,धक्के खात,आणी इतरांना धक्के देत सुखरूपपणे पोचलो.
आम्हाला घ्यायला हॉटेलचा मालक स्वतःच आपली बोट आणी चालक घेऊन आला होता. त्या छोट्याश्या मोटरबोटीत आम्ही ८,१० जण आरामात आपल्या सामानासकट मावलो. मालकाने दिलेले (जरासे घामटे!! Sad ) लाईफ जॅकेट चढवले आणी पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो

we r in boat w lifejacket.JPG

आमची बोट एकदम भर्र्र दिशी सुटली की एकदम!! गडद हिरव्या,पाचूच्या रंगाचं पाणी कापत भराभरा जात होती. थोड्या अंतरावर गेल्यावर बोट,येणार्या लाटांबरोबर हॉप स्कॉच खेळू लागली.अथांग समुद्रात इतक्या उड्या मारत असलेल्या बोटीत प्रथमच बसले असल्यामुळे मला तर इतकी भीती वाटत होती ना..गप्पा मारायला ही धड सुचेना!!
शेवटी ठेचकाळत एक तासाचा हा प्रवास संपला आणी आम्ही बास्तीमेंतोस च्या अगदी टोकाकडील ' माकाबाईट' या लहानश्या बेटावर येऊन पोचलो. हे बेट अतिशय शांत होते.इथे फक्त एक पाण्यावरचे दुमजली , लाकडी, पिवळ्या रंगाचे हॉटेल होते. बोटीतून उतरल्यावर लाकडी फळ्यांनी बांधलेल्या अरुंद ,बिन कठड्याच्या पुलावरून चालताना लक्षात आले कि पुलाच्या डावी आणी उजवीकडे चार खोल्या पहिल्या मजल्यावर तर ४ खोल्या खालच्या मजल्यावर बांधलेल्या होत्या. अश्या एकूण सोळा खोल्यां आणी एक रेस्टॉरेन्ट होतं.

bocas10hotel.jpg

या हॉटेलच्या एकुलत्या एक रेस्टॉरेन्ट मधे जायलाही लाकडी फळ्यांचा पूलच होता. चारी बाजूला,समोर जिकडे पाहावे तिकडे हिरवागार समुद्र . खोल्यांच्या समोर असली लांब ,कॉमन बालकनीत उभं राहून खाली पाहिललं तर इकडून तिकडे आरामात पोहणारे,सुळकन पळणारे छोटे मोठे मासे दिसत होते.
बालकनीतून सरळ पाण्यात उतरणारी ४,५ फळकुटांच्या पायर्‍या असलेला शिडीवजा जिना होता.
मग काय! भराभरा पोहण्याचे कपडे घालून आम्ही स्नॉर्कलिन्ग साठी त्या शिडीवरून सरळ पाण्यात उतरलो.
मी पहिल्यांदाच स्नॉर्कलिन्ग करत होते म्हणून पहिली पाच मिनिटे मास्क आणी ट्यूब शी झटापट करण्यात गेले. जमलं एकदाचं!! थेट समुद्रात उतरण्याची पहिलीच वेळ ,तरी हिम्मत करून पाण्यात शिरले. लगेच नाकासमोरून मोरपंखी,पिवळे,काळे-पांढरे पट्टे असलेले,चंदेरी पोटाचे छोटे मोठे मासे जाऊ लागले.. 'तो तिकडचा बघ्,हा इकडचा बघ' असं आम्ही सारखं एकमेकांना बोटाने दाखवू लागलो. थोडा वेळ गेला तरी गंमत काही ओसरतच नव्हती. इतक्यात एका मित्राला एक भल्ला मोठा खेकडा आमच्या दिशेने येतांना दिसला. या काळ्या खेकड्याचे पाय चांगले फूट फूट लांब होते.. त्याने इशारा देताच आम्ही सर्वांनी धूम ठोकली आणी धडपडत जिन्यावर चढून वर आलो.
इतकी मेहनत करेस्तोवर खूप भूक लागली होती. या हॉटेलच्या रेस्टॉरेन्टमधे गेलो आणी ताज्या मासळीवर ,रेड बीन्स टाकून केलेल्या नारळाच्या दुधात शिजवलेल्या भातावर ताव मारला. हे रेस्टॉरेन्ट म्हणजे बिन भिंतीचे, ८,१० बांबूंच्या आधारावर झापांचे छप्पर टाकलेले होते. फरशीच्या जागी लाकडी फळकुट्या (ज्यांच्या फटीतून खालचं पाणी दिसत होतं) तर खुर्च्या,टेबलं सर्व लाकडीच. लटकवलेले लँपशेड पण बांबूंपासून बनवलेले . झालच तर रिकाम्या शहाळ्यात माती ,खत भरून रंगीत फुलांची झाडे,मनीप्लॅन्ट त्यांतून लावली होती.
क्रमशः

गुलमोहर: 

मस्त आहे. आता दुसरा भाग वाचते. पण वर्षा, त्या रेड बीन्स टाकून केलेल्या नारळाच्या दुधात शिजवलेल्या भाताची क्रृती मिळवलीस का ग? असेल तर मला मेल कर ना :G. आता तू म्हणशील हिला एव्हढ्या सगळ्या लेखात ही एकच गोष्ट बरी लक्षात राहिली. पण काय करणार? खाण्यासाठी जन्म आपुला Wink