गाण्यातला तात्या - ४ - घाल घाल पिंगा..

Submitted by तात्या अभ्यंकर on 22 March, 2010 - 14:46

या आधी,
गाण्यातला तात्या - १ - वृक्षवल्ली आम्हा..
गाण्यातला तात्या - २ - व्हायलीन ब्रदर्सची बंदिश सिंफनी..
गाण्यातला तात्या - ३ - माझे मन तुझे झाले..

घाल घाल पिंगा.. (येथे ऐका)

सुमन कल्याणपुरांचा अत्यंत सुरेल, थेट काळजाला भिडणारा आवाज..

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात..

भादव्यातच जेमतेम वर्ष झालेल्या सासरी सखा तरी कोण मिळणार? त्यामुळे वार्‍यालाच सखा मानलं आहे आणि त्याच्याशी संवाद साधला आहे..

'सुखी आहे पोर' सांग आईच्या कानात..

अतिशय म्हणजे अतिशय हळवी ओळ! इतका सुंदर रिषभ आणि गंधार फार क्वचितच पाहायला मिळतो. 'रे सख्या वार्‍या, माझ्या माहेरी गेलास तर घरात इतर काही मंडळी असतील, वडीलधारी मंडळीही असतील.. त्यांच्यासमोर काही बोलू नकोस.. तसाच थेट माजघरात जा. तिथं माझी आई असेल.. माझं इकडचं सुख हळूच, हलकेच तिच्या कानात सांग.. खूप सुखावेल रे ती..! लगेच तुला खरवस किंवा बेसनाचा लाडू खायला देईल! खूप छान करते रे माझी आई बेसनाचे लाडू! Happy

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे?

धाकटा दीर असावा तसा संवाद आहे हा वार्‍याशी.. 'अरे माझं माहेरही खूप समृद्ध आहे रे.. तेथल्या परसातला पारिजातक मी इथं बसून पाहते आहे.. मला हवी आहेत रे ती सारी फुलं!

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय..

इथे शब्द संपतात..!

मराठी भावसंगीतातलं एक अतिशय सुरेख गाणं..नव्यानेच सासरी गेलेल्या मुलीचं यापरीस हळवं मनोगत ते कोणतं?!

-- तात्या अभ्यंकर.

गुलमोहर: 

<<'रे सख्या वार्‍या, माझ्या माहेरी गेलास तर घरात इतर काही मंडळी असतील, वडीलधारी मंडळीही असतील.. त्यांच्यासमोर काही बोलू नकोस.. तसाच थेट माजघरात जा. तिथं माझी आई असेल.. माझं इकडचं सुख हळूच, हलकेच तिच्या कानात सांग.. खूप सुखावेल रे ती..! लगेच तुला खरवस किंवा बेसनाचा लाडू खायला देईल! खूप छान करते रे माझी आई बेसनाचे लाडू!>>
जबर्‍याच!

मस्त लेख Happy माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक Happy

एक रिक्वेस्ट "देव जरी मज कधी भेटला.....म्हणेन प्रभु रे माझे सारे जीवन देई मम बाळाला.." वर पण लिहाल का असाच एक लेख.