अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या बैलाला

Submitted by pkarandikar50 on 16 March, 2010 - 22:52

अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या बैलाला ......

सुप्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी भारतीय नागरीकत्व सोडून दिले आणि ते आता कतार देशात स्थायिक झाले आहेत. त्या निमित्ताने अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा झडल्या. ते मुसलमान आहेत आणि त्यांनी हिंदु देवतेचे [आदिशक्तिचे] नग्न चित्रण केले हा त्यातला महत्वाचा मुद्दा ठरला. ते हिन्दु असते किंवा त्यांनी त्या चित्रात त्यांनी आदिशक्तिची त्रिशूल वगैरे प्रतीके वापरली नसती तर कदाचित त्यांची चित्रे एव्हढी वादग्रस्त ठरली नसती. तसे पाहू गेले तर खजुराहो किंवा कोनार्कच्या मंदिरातल्या शिल्पातही नग्नता आहे आणि कित्येक हिंदु देव-देवतांची नग्नावस्थेतली किंवा मिथुनावस्थेतली चित्रणे त्यात आढळतात. पण तेवढ्याखातर ’ह्या मंदिरात प्रवेश बंद करा किंवा ती पाडून टाका’ असा ’आदेश’[फतवा?] एखाद्या हिंदुत्ववादी संघटनेने दिल्याचे अद्याप ऐकले नाही. म्हणजेच, हुसेन जन्माने मुसलमान आहेत हाच या वादातला सर्वात मोठा मुद्दा असावा. त्यांच्या चित्रांची कलात्मक कसोट्यांवर समीक्षा करून, ‘ती तद्दन टाकाऊ आहेत म्हणून त्यांना आमचा विरोध आहे ‘असे कोणी म्हटलेले नाही. समजा, एखाद्या कला-समीक्षकाने म्हटले असते की ’ही चित्रे अतिशय सामान्य दर्जाची आहेत किंवा ’फसलेली’ आहेत’ [मराठी साहित्य-समीक्षकांचा हा एक आवडता शब्द-प्रयोग] तर त्या विधानाची सार्वजनिक स्तरावर फारशी चर्चा झाली नसती. बांगला देश युद्धानंतर याच हुसेन यांनी इंदिरा गांधीना दुर्गा-मातेच्या स्वरूपात रेखाटले होते, तेंव्हा काही गहजब झाला नव्हता. इंदिरा गांधींच्या कट्टर राजकिय विरोधकांनीही त्यावर त्यावेळी काही टिका-टिप्पणी केली नव्हती. याचे एकमेव कारण हेच असावे की भारताने पाकीस्तानी सैन्यावर निर्णायक विजय मिळवला होता आणि जनमानसात इंदिरा गांधींची लोकप्रियता कळसाला पोहोचलेली होती. फक्त एम.एफ.हुसेन ’इंदिरा-भक्त’ असल्याची नोंद कुठेतरी घेतली गेली होती. पुढे त्याच इंदिरा गांधींनी लादलेल्या आणिबाणीच्या विरोधात हुसेन यांनी चित्रे काढली नव्हती, म्हणून ती नोंद पक्की झाली असणार. आता ह्या तथाकथित इंदिरा-भक्ताविरूद्ध गदारोळ माजवण्याची चांगली संधी चालून आली, तिचे राजकिय भांडवलही केले गेले असावे.

याच संदर्भात सलमान रश्दी यांच्या ’सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकाची आठवण होणे साहजिक आहे. ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर काही महिन्यांनी आपल्याकडे काही मुस्लीम धर्म-मार्तंडांनी जाहीररित्या कुरकूर करायला सुरुवात केली होती पण तेवढ्यातच भारत सरकारने त्या पुस्तकावर बंदी घालून एका आंदोलनातली हवा काढून घेतली होती. पुढे इराणच्या आयातुल्ला खोमेनींनी फतवा काढल्यामुळे सलमान रश्दींचा जीव वाचवण्यासाठी ब्रिटिश सरकारला धावाधाव करावी लागली आणि सलमान रश्दींना सरकारी संरक्षणाखाली अद्न्यातवासा’त जावे लागले. सुप्रसिद्ध बांगला देशी लेखिका तस्लीमा नसरीन यांच्या पुस्तकांवर तिथल्या सरकारने बंदी घातली आणि त्यांच्या विरोधात स्थानिक मुस्लीम संघटनांनी ’फतवा’ जारी केल्यामुळे त्यांना आपला देश सोडावा लागला. त्यांना भारतात ’राजकिय आश्रय’ मिळाला खरा पण पुढे कोलकत्त्यातल्या मुस्लीम संघटनांनीही त्यांच्या विरोधात गिल्ला सुरू केल्यावर भारत सरकारचेही पाय लटपटले. शेवटी तसलीमांना कोलकत्ताही सोडावे लागले. सलमान रश्दी आणि तस्लीमा यांना मुस्लीम दहशतवाद्यांच्या विरोधामुळे निर्वासित व्हावे लागले. आता त्यांच्याच रांगेत एम.एफ.हुसेन. यांनाही नेऊन बसवले याचा अभिमान फार तर हिंदुत्ववाद्यांना बाळगता येइल.’ आमच्याकडे कामाला येणाया बाई झोपडपट्टीत राहतात. त्यांचा नवरा त्यांना रोज रात्री दारू पिऊन मार-हाण करतो, त्याबाबत मी काही करू शकत नाही. पण आता मीच माझ्या बायकोला मार-हाण सुरू केली आहे’ असे म्हणण्यासारखाच हा प्रकार! अशा पुरुषार्थाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

जेम्स लेनच्या पुस्तकाला विरोध म्हणून भांडारकर इन्स्टीट्यूटवर हल्ला चढवणे हे अशाच सांस्कृतिक दहशतवादी पुरुषार्थाचे आणखी एक उदाहरण! याचीच पुढची पायरी म्हणजे ’माय नेम इज खान’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला झालेला विरोध. त्या चित्रपटातल्या एखाद्या दृश्याला किंवा संवादाला विरोध म्हणून ही बंदी नव्हती तर त्यातल्या शाहरूख खानने म्हणे ’पाकीस्तानी क्रिकेट खेळाडूंना आय. पी. एल. स्पर्धेत खेळायला बंदी घालायला नको होती’ असे एक वादग्रस्त विधान केले होते! आनंद यादवांनी लिहिलेल्या संत तुकाराम-चरित्राच्या संदर्भात ऊठवलेले वादळ हीसुद्धा काही भूषणावह बाब नव्हती.

आपण स्वतंत्र होताच संसदीय लोकशाही राज्यपद्धती अवलंबली, तेंव्हा जगभरातून अनेक समाजशास्त्रद्न्यांनी आणि ज्येष्ठ पत्रकारांनीही ही व्यवस्था कितपत टिकेल याविषयी साशंकता व्यक्त केली होती पण गेली सहा दशके तरी आपण ही व्यवस्था टिकवून धरली. लोकशाहीच्या यशासाठी समा्जात सहिष्णु्ता असावी लागते, परस्परविरोधी मते आणि विविध वर्गाच्या, गटाच्या हितसंबंधांना थोडाफार तरी न्याय देणारी एक तडजोडवादी समंजस भूमिका राजकारणी मंडळींना स्वीकारावी लागते. त्यामुळे साहजिकच, लोकशाही राबवण्यार्‍या समाजाची प्रगल्भता सर्वच क्षेत्रात उत्तरोत्तर वाढत जावी अशी अपेक्षा धरली जाते. गेल्या सहा दशकात आपण लोकशाही यशस्वीपणे राबवलीच पण आर्थिक प्रगतीही साधली, समाजातल्या तळा-गाळापर्यंत साक्षरतेची आणि शिक्षणाची गंगा पोहोचवली. हे यश मानायचे, तर मग आपला समाज दिवसेंदिवस असहिष्णु का होत चालला आहे?

केवळ मुस्लीम दहशतवादाची प्रतिक्रिया म्हणून आपल्याकडे तसल्याच प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद फोफावतो आहे का? कदाचित ही फार वरवरची कारण-मीमांसा होईल. मला वाटते की आपल्याकडच्या राजकारण-प्रक्रियेचेच हे एक अनौरस अपत्य असावे. आपल्याकडे ’राजकारण म्हणजे फक्त आणि फक्त निवडणुका ’ असे एक समीकरण दृढ झाले आहे. दिवसेंदिवस निवडणुका जिंकणे म्हणजे सट्टाबाजाराइतकेच बेभरवशाचे काम होऊन बसते आहे. जुन्या लोकसभेतले जेमतेम ६०% सुद्धा खासदार नव्या लोकसभेत दिसत नाहीत. विधानसभातून तर हे प्रमाण ५०% किंवा त्याहून कमी इतके घसरत चालले आहे. एकदा निवडणूक जिंकायची तर केवढा आटापीटा करावा लागतो, मग पुन्हा दुसर्‍यांदा निवडून यायचे म्हणजे आणखीनच कठीण. या परिस्थितीचे दोन परीणाम दिसतात. एक तर ’ एकदा निवडून आलो आहोत तर याच पाच वर्षात जेवढी माया जमवता येईल, तेवढी जमवून घ्या. पुढचे कोणी पाहिले आहे?’ ह्या विचाराने केलेला अनिर्बंध भ्रष्टाचार. दुसरे म्हणजे, निवडणूका जिंकण्यासाठी समाजातल्या विविध गटा-तटांमध्ये जेव्हढी म्हणून तेढ पसरवता येईल तेव्हढी पसरवायची, त्यासाठी सतत काहीतरी नवनवीन तत्कालीक मुद्दे घेऊन माध्यमांतून आपली छबी लोकांपुढे आणायची, निवडणूकीत फायद्याची ठरेल अशा कोणत्या ना कोणत्या तरी ’व्होट बॅंके'त आपली ’पत ’ वाढवायची अशी व्यूहरचना पक्ष आणि व्यक्ति आखताना दिसतात. ’राडा’ संस्कृतीचा उगम यातूनच झाला असावा. त्यामुळे बिनबुडाच्या आंदोलनांची संख्या आणि व्याप्ती वाढते आहे. सामाजिक सांमजस्य आणि एकी वाढवून काही निवडणूका जिंकता येत नाहीत, त्यापेक्षा भागाकाराचे तंत्र जास्त फायदेशीर ठरते, असा अनुभव आल्यामुळे कदाचित असे घडत असावे.

डॉ. नितीश नंदी यांनी या संदर्भात केलेले एक निरीक्षण मला महत्वाचे वाटते. ते म्हणतात की, ‘भारतात Democracy [लोकशाही]ची जागा Psephocracy [निवडणूकशाही] ने घेतली आहे. त्यामुळे निवडणुका पार पडतात, सरकारे येतात-जातात, सत्ता-बदलही होतो पण तेव्हढ्याने लोकशाही जीवन-शैली दृढमूल होते आहे असा निष्कर्ष काढणे धाडसाचे ठरेल.‘ सामाजिक किंवा आर्थिक प्रश्नांवर विविध पक्ष, माध्यमे किंवा व्यक्ति फक्त तात्कालीक स्वरूपाचे posture [आव] घेताना किंवा आंदोलने छेडताना मी पहातो, तेंव्हा मला नितीश नंदींचे म्हणणे पटू लागते.

दैनंदिन जीवनाच्या लढ्यातच समाजातल्या इतक्या मोठ्या संख्येची माणसे इतकी खोल अडकून पडली आहेत की अभिव्यक्ति-स्वातंत्र्यासारख्या प्रश्नांकडॆ गंभीरपणे लक्ष द्यायला कोणाला फुरसत राहिलेली नाही. कोणत्या प्रश्नावरून आजचा ’राडा’ आयोजला आहे, याची खोलवर तपासणी करण्यापेक्षा, ’आज कामावर वेळेवर पोहोचता येईल का आणि सुखरूपपणे घरी परतता येईल का’ याचीच पर्वा बहुसंख्यांना असते. फार तर, ‘पाच वर्षांनी निवडणूक येईल, त्यावेळी बघू काय ते‘ असाच विचार बहुतेकजण करत असावेत. पुढे होऊन ‘राडा‘छाप सांस्कृतिक दहशतवाद्यांचा हात धरणारे कोणी नसतात. त्यामुळे असल्या आंदोलनांना विस्तृत जनाधार असल्याचे भासवणे सोपे होते. अगदी निवडणूका आल्या तरी, आपण काही फरक घडवून आणू शकतो यावर विश्वास न उरलेला एक फार मोठा वर्ग मतदानासाठी बाहेरच पडत नाही. त्यामुळेही आपला समाज असहिष्णु होत चालल्याचे चित्र उभे राहते आहे, ही खेदाची बाब म्हणावी लागेल. ही असहिष्णुता खरेच खोलवर रूजत चालली आहे का तो फक्त एक आभास आहे, हे पडताळून पहावे म्हटले तरी त्यासाठी कोणता मार्ग अवलंबावा हे ठरविणे कठीण आहे.

- प्रभाकर [बापू] करंदीकर.

गुलमोहर: 

खुप छान लिहीलय बापू... विषय गंभीर आहेच पण आपण छान हाताळलाय. "मुफ्त मे मिली आझादीको सस्ता समझने लगे है लोग"... हे कुठल्याशा सिनेमातल वाक्य पण आताशा समर्पक होत चाललय...आपण लोकशाही तितक्याश्या जबाबदारीन पेलतोय का वैगरे प्रश्न अनुत्तरीतच राहातील...हुसेन काय किंव्हा कुठलाही कलाकार काय जिवाच्या आकांतान देश सोडतोय हे आपल्या सहीष्णुतेच्या प्रतिमेला मोठ्ठा तडा देणार आहे यात वादच नाही..

लढ बाप्पू !! >>>>
ह्याचा मतितार्थ असा कि, तुम लडो हम कपडे संभालते है!

आज सकाळीच ह्या कथित जागतिक दर्जाच्या चित्रकाराची चित्रे अन त्याने हिंदु देवतांचा कसा अपमान केला आहे त्याचे सविस्तर वर्णन करणारा मेल आला. मला जे वाटले ते असे कि:
- एका गैर्धर्मियाने दोन चार चित्रे काढुण माझ्या देवतांचा अपमान होऊ शकतो का?
- जर ही मेल आली नसती तर ती चित्रे मला अन माझ्या सारख्या अनेकांना माहितीही झाली नसती. मग आपणहुन आपल्याच देवतांचा अपमान करणारी चित्रे मोठ्या प्रमाणावर प्रसारित का करित आहोत. त्याच्या पापात आपण पण सहभागी?
- भाकरीची लढाई मोठी असल्याने अस्मिता, धर्म, मान्-अपमान ई ई च्या लढाया लढायला वेळ नाही.
-अन ज्यांनी लढायला पाहिजे (तुडुंब पोटे भरलेली नेतेमंडळी) तेच दुसर्‍यांना सांगतात... लढ बाप्पू !!
-भावनिक वाद उकरुन स्वतःची राजकीय पोळी भाजणारे अश्या जनसंपर्क मोहीमा धडाडीने राबवतात, भले सत्ता मिळवता, राबवता अन टिकवता आली नाही तरी...

हुसेन हा काही फार मोठा चित्रकार नाही. पण त्याला गाजावे कसे याचे अचूक ज्ञान आहे. खरे तर तो रंगारीच आहे. सिनेमाची पोस्टरे रंगवायचा. ज्ञानेश्वर नाडकर्णींसारख्या सुमार समीक्षकाने त्याला मोठे केले. दोघांचाही हा प्तसिद्धीचा एक मेका साह्य करू असा पंथ होता. हुसेनच्या या प्रसिद्धी गिमिक्सची तुलना तेंडुलकरांशीही करता येईल. कुठे कसा नेमका बाण मारायचा याचे मात्र याना अतिशय उच्च प्रतिचे ज्ञान होते. यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बाण तर हुकमी एक्का. मग या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने वेळी अवेळी गळे काढणारी एन सी पी ए च्या आसपास फिरणारीही एक जमात आहे. हे सगळे एकमेका साह्य करू पंथातील. त्यात गम्मत झाली हिन्दुत्ववादी यात पडल्याने. त्यामुळे तर हुसेनचा टी आर पी एकदम वाढला. अन्यथा या हुसेनची चित्रे कोणाला माहीत होती. ? जहांगीरच्या आसपास फिरनार्‍या 'बोकडा'ना फक्त. अन तिथे तर सगळा 'तू माझी पाठ खाजव , मी तुझी पाठ खाजवीन' असा मामला. एकदा तर या हुसेनबाबाने ग्यालरीत नुसते पांढरे कापड वाकडेतिकडे पसरून काहीतरी 'फॉर्म' निर्माण केला तर सगळ्यांचीच बोलती बन्द झाली. पण तो हुसेन असल्याने त्यात काहीतरी अर्थ असणारच असे भासवून काहीनी अर्थाचे एरंडाचे गुर्हाळ लावून जर्मनचे पातेले त्याच्या खाली ठेवले !.आणि त्याचेही रसग्रहण छापून आणले.

चित्रे समजायलाही 'डोळा' लागतो म्हणतात. असेल बुवा. पन हुसेनने हिन्दू देवता सोडून दुसर्‍या देवतांची चित्रे मात्र काढली नाहीत. जरा रुचिपालट म्हणून प्रेषिताचीही सुन्दर चित्रे काढायला हरकत नव्हती. अगदी सवस्त्र देखील काढायला देखील हरकत नव्हती. म्हण्जे ती चित्रेही प्रेषिताचे नाव घेताच निर्माण झालेल्या पवित्र भावनेचे मूर्त रूप समजता आले असते. किमान ख्रिस्त.?
हुसेनने खरे तर हिन्दु संस्कृतीच्या सहिष्णुतेचा आर्टिस्टिक लिबर्टीच्या नावाखाली प्रसिद्धीसाठी गैरफायदा घेतला.कदाचित देवतांचा अपमान करण्याचा त्याचा उद्देश नसेलही.

एका फडतूस रंगार्‍याला अकारण प्रसिद्धी मिळतेय हे दु:खाचे आहे. आता या कतार प्रकरणात तर तो जणू काही पास्तरनाक आणिइ भारतात जणू स्टालीनशाही चालू आहे हे चित्र विनाकारण उभे रहात आहे.आणि इथले विचारजंत टीव्हीवर तावातावाने भारताच्ची चूक झाल्याचे आन्तर राष्ट्रीय समुदायापुढे मांडून त्याला खतपाणी घालत आहे. असे असते तर ती तस्लीमा नसरीन कशी भारतात आश्रयाला आली असती?

हुसेनच्या प्रकरणात खरे तर हिन्दुत्ववाद्यानीही म्हनावा इतका रस घेतलेला नाही कारन या वैचारिक बागुलबुव्याला त्या परिभाषेत उत्तर देण्याइतकी त्यांची तयारी नसावी . त्यामुळे त्याला राजकीय रंग देणेही फारसे योग्य नाही. हे तर मेडिया आणि विचारजंत मंडळीनी ' आज काय खाजवावे' या गरजेतून निर्माण केलेला बेगडी इस्श्यू आहे. त्याला फार मोठ्या वैचारिक पातळीवर नेऊन पोचवणे फसवणूक ठरेल.....

वा टोणग्या !!! अव्वच्या सव्वा किमतीला चित्रांचे सौदे करणारे दलाल कुणाला मोठं करता येईल याच्याच शोधात असतात.

बापूंचा लेखही (उत्तरार्ध) छान आहे, पण हुसेनबद्दलचा त्यांचा पहिला परिच्छेद फारच चुकीच्या अथवा अपुर्‍या माहितीच्या आधावर लिहिला आहे असे वाटते.

कतार हा देश अभिव्यक्तीस्वातंत्र्याबद्दल फार फार प्रसिद्ध आहे. हुसेन यांना असा देश सापडल्याबद्दल ( खर तर भारतीयांनाच) शुभेच्छा आणि त्यांनी त्या व्यक्तीस्वातंत्र्याचा उपयोग करून पूजनीय प्रेषितांचे एखादे अगदी कपड्यातले तरी चित्र जरूर काढावे...

tonaga नी जीएसला अनुमोदन
किम्बहुना बापुन्चा लेख "वैचारिक गोन्धळाचा" आहे अशी प्रतिक्रिया मी देणारच होतो पण वरील दोन पोस्ट्स वाचल्या अन अनुमोदनाला थाम्बलो! Happy

बापू , दुसरे असे की, या प्रकरणात इथल्या हिन्दुत्ववाद्यानी त्यांच्या नेहमेच्या 'फंड्यांऐवजी' खरे तर न्यायालयात केसेस दाखल करून सनदशीर मार्गाने दाद मागितली होती आणि न्यायालयांचा ससेमिरा टाळण्यासाठी (च) हुसेन बाबा परदेशात गेला. निदान या प्रकरणात तरी त्यांच्याशी मुस्लीम मूलतत्ववाद्यांच्या फतव्याशी तुलना करता यायची नाही. न्यायालयांनी उदात्त अशा अभिवय्क्ती स्वातंत्र्याचे योग्य ते इन्तरप्रिटेशन करून कोणाला तरी 'न्याय' दिला असताच ना. या पूर्वीही न्यायालयांनी असे इंटरप्रिटेशन केलेले आहे. मग बाबाने इथल्या न्यायव्यवस्थेवर तरी का विश्वास दाखवू नये?

मुळात इथल्या हिं. वाद्यानाही कुठे वेळ आहे? त्याना त्यांच्या आस्तित्वाचा प्रश्न भेडसावतो आहे.
परवा एका च्यानेलवर प्यानेल डिस्कशनमधे बाबाच्या बाजूने एक चित्रकर्ती बोलत होती. काठापदराची साडी घालून. गळ्यात मोठमोठया मण्यांच्या माळा घालून . मोठ्ठा कुंकवाचा टिळा लावून. अगदी एथनिक फ्याशनीत. इला अरुण टाईप. त्याना तरी अंगभर कपडे का घालावेसे वाटले कुणास ठाउक. खरे तर आमच्या झापडबद विचारसरणीमुळे आम्हाला ड्रेसवरून तरी त्या एकदम ऑर्थोडॉक्स , बुरसटलेल्या ,पुरानमतवादी हिन्दु कुटुम्बातल्या वाटल्या.

लेखातील पूर्वाध कालच्या टाईम्स शी सार्धम्य राखुन आहे. स्कॅन करुन रात्री टाकते. Happy
मी तथाकथित अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या बाजूने आहे, त्यातल्या मर्यादांसकट.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने तर सगळेच आहेत . असायला हवेत. फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य 'टोळी'च्या सदस्यापुरतेच मर्यादित असावे का? आणि टोळी सदस्याने केलेला 'आचरटपणा'लाही त्याचे संरक्षण मिळावे का हा खरा प्रश्न आहे.? जिल्हा स्तरावर ब्लॅक मेल करणारी आणि चारित्र्यहनन करणारी एक कथित पत्रकारांची जमात असते. त्यांची काही लंगोटी पेपरेही असतात. कुठेतरी अति झाले की कोणीतरी त्या 'पत्रकाराला' चोपून काढते. मग ही 'पत्रकारे' स्वतःच एका निषेध मोर्चाचे आयोजन करतात. आणि वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या नावाने शंख करू लागतात. मग जिल्हा पत्रकार संघाला निषेधाचा ठराव आणायला लावतात. निषेध मोर्चाला वरिष्ठ आणि कधी कधी चारित्र्यसंपन्न पत्रकाराना यायची गळ घालतात. नाइलाजास्तव व्यवसाय बंधुत्व (व भविष्यात आपल्यावर असा प्रसंग आल्यास चार माणसे आपल्या बाजूने असावीत म्हणून) हे लोक त्यात सामील होतात . वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या नावाने शंख करीत. घटनेची कलमे वाचत ...
त्याबद्दल कोणी काही बोलले की तो हुकुम शहा, फ्यासिस्ट , वृ.स्वा.चा गळा घोटणारा, वगैरे वगैरे....

ज्याला बदडले त्याच्या चारित्र्याबद्दल अवाक्षरही काढायचे नाही. काढलेच तर विचाराचा लढा विचारानेच लढायचा असतो वगैरे....

'टोळी'च्या बंधुभावामुळे अनेक धर्मराजाना आंधळेपण आले आहे....

हा त्यातलाच प्रकार.....

tonagyaa, या बीबी वर मला भरपुरवेळा अनुमोदन करायला लावतो हेस तू! Lol
असो. वेळ मिळाला की या नाहीतर पुढच्या आठवड्यात मूळ लेखाचा "परामर्ष" घेईन Happy

टोणग्याच्या पोस्टस पटल्या.. प्रयोगची ही पटली..

त्यांना आपल्या देशात कुणी राहून दिलं नव्हतं असं थोडच होतं?

कतार हा देश अभिव्यक्तीस्वातंत्र्याबद्दल फार फार प्रसिद्ध आहे. हुसेन यांना असा देश सापडल्याबद्दल ( खर तर भारतीयांनाच) शुभेच्छा आणि त्यांनी त्या व्यक्तीस्वातंत्र्याचा उपयोग करून पूजनीय प्रेषितांचे एखादे अगदी कपड्यातले तरी चित्र जरूर काढावे...
>>सही एकदम!

चर्चा खूपच रंगली आहे. ते अपेक्षितच होतं म्हणा....
[१] अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा मुद्दा मी एक उदाहरण म्हणून घेतला होता. तसं पहायला गेलं तर म. न.से. च्या आंदोलनामुळे ऐरणीवर आलेला 'भारतीय नागरीकाला भारतात कोठेही वास्तव्य करण्याचा आणि पोट भरण्याचा मूलभूत हक्क' हे उदाहरणही चाललं असतं. किंवा 'गणपती उत्सवाच्या देखाव्यात अफझलखान्-वधाचं चित्र असावं किंवा नसावं' किंवा 'पवन-उर्जा प्रकल्पामुळे मोसमी पाऊस कमी पडतो' किंवा 'पारधी समाजातल्या सगळ्या व्यक्तिंना जिल्ह्याबाहेर हाकलून लावावं [इति.मध्यप्रदेशचे एक मंत्री]' अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. सगळीकडे तत्व तेच लागू होतं. निवडणूकींवर डोळा ठेवून समाजातल्या विभाजनांना खत-पाणी घालून [म्हणजेच भागाकार करून] आपली पोळी भाजून घेण्याचे हे सगळे मार्ग आहेत. ह्या सर्व प्रकारात लोकशाही जीवन-शैलीचा विकास खुंटतो, हे मला प्रामुख्याने म्हणायचं होतं.

[२] लंडनच्या हाईडपार्कमधे जाऊन, आपल्याला हव्या त्या प्रश्नावर आपल्याला हवी ती मतं मांडता येतात. वक्त्याशी असहमत असणारे श्रोते हसत-हसत निघून जातात; फार तर काही जण वक्त्याची टर उडवतात पण त्याला मार-हाण करत नाहीत किंवा मोर्चे काढून त्याच्या अटकेची मागणी करत नाहीत. तो विषय तिथेच सोडून दिला जातो. हे इंग्रजांच्या प्रगल्भ लोकशाही जीवन-शैलीचं एक छोटसं उदाहरण. तिथेही वंश विद्वेषी मंडळींचे [काळी जर्किन्स घालून आणि चकोट करून फिरणारे] जथे अधून-मधून उपटतातच आणि थोडाबहुत हिंसाचारही होतो, नाही असं नाही पण अशा अपवादात्मक उदाहरणातही, राजकिय रंग भरलेले नसतात किंवा निवडणुकांचा काही संबंध नसतो, हे महत्वाचं.

[३] एम्.एफ्. हुसेन यांचा एक चित्रकार म्हणून काय दर्जा आहे, याबाबत मी कोणतंही वैयक्तिक मत-प्रदर्शन केलेलं नाही, कारण तो मुद्दा काहीसा गैरलागू आहे असं मला वाटतं. माहिती अधिकार कायद्याचे एक 'अ‍ॅक्टिव्हिस्ट' सुरेश शेट्टींचा खून झाला, ही घटना निषेधार्हच आहे. बर्‍याच दिवसांपासून, त्यांचे विरुद्ध काही गुन्हेगारी तक्रारी [ब्लॅक-मेलींग वगैरे]पोलीस-ठाण्यावर नोंदवल्या गेल्या होत्या, त्यांची शहानिशा करण्यात पोलीसांकडून दिरंगाई झाली अशी माहिती बाहेर आली आहे. कदाचित त्या तक्रारीत थोडेफार तथ्य असेलही पण म्हणून, खूनाच्या गुन्ह्याचं गांभीर्य कमी होत नाही. तसंच, 'हुसेन एक टुकार चित्रकार आहेत' असं कित्येकांना वाटत असेलही पण त्यांना निर्वासित करण्याऐवजी, त्यांचेवर 'अश्लीलते'चा किंवा 'जाणून-बुजून जातीय वैमनस्य पसरवण्या' चा आरोप ठेवून, त्यांना न्यायालयात खेचता आलं नसतं का? अर्थात, त्यानंतर न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी तो बिनतक्रार स्वीकारण्याचीही तयारी हवी. तसं काय, मर्ढेकरांवरही आणि 'सखाराम बाईंडर' वरून तेंडुलकरांवरही अश्लीलता-प्रतिबंधक कायद्याखाली खटले झाले होतेच की. मर्ढेकर किंवा तेंडुलकरांचे बाबतीत एक न्याय आणि एम्.एफ. हुसेनांना वेगळा न्याय [ते मुसलमान आहेत म्हणून?] हे काही मला प्रगल्भ लोकशाही जीवनशैलीचं उदाहरण वाटत नाही.

[४]शेवटी, 'म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो' ह्या आपल्या जुन्या म्हणीतही काही तथ्य असेलच की!

- प्रभाकर [बापू] करंदीकर

बायकोला मारहाण करणे वगैरे उपमा काही पटत नाही. त्याऐवजी अशी उपमा कशी वाटते?
एखादा माणूस खूप सोवळे ओवळे पाळतो आहे. त्याच्या देवघरात शुचिर्भूत झाल्याशिवाय जाताच येत नाही. जर कुणी तसा विचारही केला तर तो आकाशपाताळ एक करतो. मात्र हाच माणूस शेजार्‍याच्या घरात जातो, बिनदिक्कत चपला घालून त्याच्या देवघरात जातो आणि शेजार्‍याच्या सोवळ्याओवळ्याला धाब्यावर बसवतो. मग शेजारी खवळतो.
हे बघून तिसरा कुणीतरी शेजार्‍याच्या सोवळ्याओवळ्याला नाक मुरडतो. पहिल्या माणसाच्या अतिरेकी सोवळेपणाकडे सोयिस्कर दुर्लक्ष करुन केवळ त्या शेजार्‍याच्या रागावण्यावर टीका करतो. हा दुटप्पीपणा नाही काय?

हुसेन हा मुस्लिम धर्माचा अनुयायी आहे. त्याने त्या धर्माचा त्याग केलेला नाही. त्यामुळे काही प्रमाणात तो त्या धर्माचा प्रतिनिधी आहेच. मुस्लिम धर्म आपल्या दुखावणार्‍या धार्मिक भावनांकरता प्रसिद्ध आहे. सलमान रश्दी, हॉलंडचा थेओ व्हॅन गोघ, डेन्मार्कचा कार्टूनिस्ट, तस्लिमा वगैरे उदाहरणे आहेतच. तर आपला धर्म इतका हळवा असताना खुशाल परधर्माच्या आदरस्थानाची असली विटंबना करणे किती योग्य आहे?

अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे थियरी ठीक आहे. पण एका धर्माकरता कायदे बदलायचे, नियम बदलायचे, नमते घ्यायचे आणि दुसर्‍या धर्माची वेळ आली की त्यांना अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे डोस पाजायचे हा दुटप्पीपणा का?
एकाची दाढी कुरवाळायची आणि दुसर्‍याची धोतरे, लुगडी फेडायची. अशाने हिंदूत्त्ववादी डोकेफिरू बनणार नाहीत तर काय होणार? मुस्लिम धर्म संघटित आहे म्हणून सरकार त्यांचे ऐकते. मग आम्हीही असेच संघटित होऊ. असाच डोकेफिरुपणा करू. असा विचार गेली ६०-७० वर्षापासून दिला जात आहे. मग आज ते होताना दिसते ह्यात आश्चर्य काय?

आपल्या या देशात धर्मा-धर्मांतले संबंध संवेदनशीलच नाहीत तर स्फोटक व विनाशकारी होऊ शकतात
याची जाणीव नसणं हे कोणत्याही धर्माच्या कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीबाबत अक्षम्य ठरतं. हुसेननी अत्यंत गंभीर औचित्यभंग केला आहे हे अधोरेखित न करता, केवळ ते मुसलमान आहेत म्हणून त्यांच्या विरोधात गदारोळ उठवण्यात आला , असं म्हणण कितपत योग्य आहे ? अभिव्यक्ती स्वातत्र्याबाबतच म्हणायचं तर हुसेननीच त्या स्वातंत्र्याच्या विरोधकांच्या भात्यात एक प्रभावी व हुकमी अस्त्र ठेवण्याचंच काम केलं आहे ![ तेंडूलकर, मर्ढेकर वाद हा अश्लीलतेसंदर्भात होता; हुसेन यांच्या वादग्रस्त चित्रांतली अश्लीलता हा दुय्यम व गौण मुद्दा आहे. "अश्लीलता" हा शब्द इथं कायदेशीर नव्हे तर सर्वसाधारणपणे वापरतात त्या अर्थाने घ्यायचा आहे]
झुंडशाही, "राडा"संस्कॄति या प्रवॄत्ति घॄणास्पदच आहेत. पण, तो प्रश्न तळमळीन घसास लावण्यासाठी
केलेली हुसेन प्रकरणाची निवड मात्र खटकते, हे नम्रपणे नमूद केल्याशिवाय राहवत नाही.

भाऊ, अनुमोदन!
नेमक्या शब्दात मान्डलत!
उद्या याच न्यायाने स्वातन्त्र्य प्रिय शिवाजीस देखिल "गुन्ड व अफजलखानाचा खूनी" ठरवतील हे लोक!
ठरवतील काय? वाट चुकलेला देशभक्त म्हणून ठरवुन झालच आहे की! Proud

लिम्बुटिम्बु,

शिवाजी महाराजांना 'वाट चुकलेले देशभक्त ठरवले' म्हणजे कुणी ठरवले? 'हे लोक' म्हणजे कोण?

दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हतेच असे नवे 'संशोधन' प्रसिद्ध झाले आहे! त्याचा परीणाम म्हणून महाराष्ट्र शासनाकडून इतकी वर्षे क्रिडा-शिक्षकांना दिला जाणारा 'दादोजी कोंडदेव' पुरस्कार बंद करण्यात आला आहे, हे तुम्हाला माहीत आहे काय? अशा संशोधकांचे आणि त्यांच्या संशोधनाचे काय करणार?

संत रामदास आणि शिवाजी महाराज यांची साधी भेट सुद्धा झाली नव्हती, त्यामुळे संत रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु वगैरे कोणी नव्हते असेही नवे 'संशोधन' मांडले जात आहे. त्याचे काय करायचे?

आणि समजा, शिवाजी महाराजांविषयी 'वाट चुकलेला देशभक्त' असे मत कुणा संशोधकाला किंवा इतिहास तज्ञाला मांडावेसे वाटलेच तरी त्याचा प्रत्यवाय करण्याचे, खंडन करण्याचे स्वातंत्र्य इतरांना आहे किंवा नाही? का तसे करण्याऐवजी, त्या माणसाच्या घरादारावरून गाढवाचा नांगर फिरवून, त्याला हद्दपार करणार? लोकशाही जीवन-शैलीत काय बसते?

अफझलखानाचा वध झाल्यानंतर, शिवाजी महाराज म्हणाले होते [म्हणजे मला ज्ञात असलेल्या इतिहासावरून तरी] की 'वैरी मेला की वैर संपते'. महारा़जांच्याच हुकुमावरून त्याचा इस्लाम धर्माच्या प्रथेनुसार आणि पूर्ण इतमामाने अंत्यविधि पार पडला आणि त्याच ठिकाणी अफझलखानाची कबर बांधली गेली. पुढे त्याला 'दरगा' असे स्वरूप प्राप्त झाले. दरवर्षी उरुस भरू लागला. उरूसाला जाऊन दरग्यात नवस बोलला की निपुत्रिकांना संतती प्राप्त होते असा समज दृढ झाला. त्यामुळे हजारोंच्या संख्येने [बहुसंख्य हिंदु] लोक येऊ लागले. चेंगराचेंगरी होऊ लागली. तिथल्या 'कायदा आणि सुव्यवस्थे'चा प्रश्न निर्माण झाला म्हणून इंग्रज सरकारने एक ट्रस्ट स्थापन केला आणि त्यावर पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मामलेदाराची नेमणूक केली. त्या परीसराची व्यवस्था ट्रस्टकडे सोपवली. हे सांगोवांगी नव्हे. ते मूळ दस्तावेज सातार्‍याच्या कलेक्टर ऑफिस मधे उपलब्ध आहेत. [मी पाहिलेले आहेत]. आता, वर्षानुवर्षे त्या दरग्यात जाऊन नवस बोलणार्‍या [आणि नंतर पुन्हा जाऊन नवस फेडणार्‍या] सर्व जाती-धर्माच्या हजारो-लाखो खेडूत, भाविक लोकांना तुम्ही काय 'देशद्रोही' आणि 'धर्मद्रोही' ठरवणार काय?

रावणाची व्यक्तिरेखा दक्षिण भारतात कशी मानली जाते, तुम्हाला माहीत आहे ना? तेव्ह्ढ्यावरून यत्च्ययावत दक्षिण भारतीयांना दिसतील तिथे धोपटून काढावे असे म्हटले तर ते लोकशाहीत बसणारे आहे काय?

- प्रभाकर [बापू] करंदीकर.

बापू या वर्णनाचा हुसेनभाईचा काय संबंध आहे कळला नाही.

काही म्हणा पण ह्या हुसन्याचे व्यक्तिमत्व मला लई आवडते.वयाच्या ९४ व्या वर्षी हा इसम एवढा फिट कसा राहतो कळत नाही. काठी नाही की काही नाही. मस्त फ्याशनेबल जीनचे जाकीट वगैरे. फिटनेस म्हणजे काय विचारावे चक्क हाताला क्रॅम्प नाही (बरीवाईट :फिदी:) चित्रेही काढतो. दिसतो साला एकदम लव्हेबल कलन्दर.....

तसंच, 'हुसेन एक टुकार चित्रकार आहेत' असं कित्येकांना वाटत असेलही पण त्यांना निर्वासित करण्याऐवजी, त्यांचेवर 'अश्लीलते'चा किंवा 'जाणून-बुजून जातीय वैमनस्य पसरवण्या' चा आरोप ठेवून, त्यांना न्यायालयात खेचता आलं नसतं का? >>>> तेच तर केलं होतं की.

पण हुसेनसायबाला न्यायालयात येण्यामधे कमीपणा वाटला होता. निर्वासित होणं हा त्याचा स्वतःचा निर्णय आहे. कतारचे नागरिकत्व घेणं हादेखेएल त्याचा निर्णय होता.

कतारने देखील ते फार मोठे चित्रकार आहेत यापेक्षा ते मुसलमान आहेत म्हणून तयाना नागरिकत्व दिलेले आहे!!!

नन्दिनीच्या ह्या मुद्द्यात तथ्य आहे. कतार हा देश कधी उदारमतवादी असल्याचे ऐकले नाही. हुसेन भाइने नेपाळ ब्रम्हदेश, जपान, निरुपद्रवी स्विस, ध्येयवादी बर्तानिया :फिदी:, सर्व स्वातंत्र्ये मानणारी अमेरिका यांचे नागरिकत्व का पसंत केले नाही. बहुधा त्याने निवडीचे स्वातंत्र्य वापरले असेल. Happy

अहो, पण तो गेलाय तरी पूर्णपणे कुठे अजून? त्याने एन.आर. आय. भारतीय म्हणून दर्जा मिळावा ह्यासाठी अर्ज केल्याचे वृत्त वाचले होते. म्हणजे साहेब कतार मध्ये राहून आपले अभिव्यक्तीस्वातंत्र्य व त्याला भारतात मिळालेली मूठमाती कुरवाळून तमाम मुस्लिम धर्मीयांची सहानुभूती मिळवणार व दुसरीकडे एन.आर.आय. भारतीय नागरिकत्वाचा लाभही! चांगलंय!

Proud

म्हणजेच, हुसेन जन्माने मुसलमान आहेत हाच या वादातला सर्वात मोठा मुद्दा असावा. >>>

काय राव ? Happy समाजवादी का कॉन्ग्रेस ? Happy
रागवू नका पण त्याना चान्गल आणी आपल्याला वाईट म्हटल की उदारमतवादी अस झालय हल्ली
काहीपण वाइइट झाल कि तो "त्या" धर्माचाआहे म्हणुन झाल .
काय अन्याय होतोय ओ त्यानच्यावर ?

आमीर , शाहरुख, सल्मान .... कोण आहेत ?
झहीर खान , युसुफ, इर्फान ..... सानिया , एपीजे,...अल्लरखान , रह्मान, झाकिर ......

अहो रहमान ला ऑस्कर मिळल तेव्हा नाचलो आपण आपला माणुस म्हणून ..
तो त्या धर्माचा म्हणून वाईट अस आपण कधिच मानत नाहित .

एवढ असुन्ही कायम भारतात अन्यायच होतो ?
दहशतवादी सापडले परवा तर म्हणे गोध्रा दन्गल मुळे ते तसे झाले
काश्मिरि पन्डीत ही जमात माहित आहे का कुणाला ?

त्याना Equal समजा , नव्हे ते आपल्यासारखे आहेतच ... पण त्यान्चे लानुल्चालन नको एवढेच.

आणी कुणी काही ही म्हणा पाक पेक्षा इथले ते ( त्या तरी नक्किच) जास्त सुखी असतील . सुदैवाने त्याना ते कळत असु दे Happy

थोड्या विशयान्तराबद्दल क्षमस्व Happy

कतार हा देश अभिव्यक्तीस्वातंत्र्याबद्दल फार फार प्रसिद्ध आहे. हुसेन यांना असा देश सापडल्याबद्दल ( खर तर भारतीयांनाच) शुभेच्छा आणि त्यांनी त्या व्यक्तीस्वातंत्र्याचा उपयोग करून पूजनीय प्रेषितांचे एखादे अगदी कपड्यातले तरी चित्र जरूर काढावे...
>>
व्वा जीएस!! अगदी बरोबर बोललास! Happy

बापू, लिहीले चांगले आहे. हुसेनविषयी लिहिलेले काही पटले नाही. 'मुस्लिमांना भारतात कित्ती त्रास होतो' हे ओरडणे ही एक फॅशन झालीये भारतात हल्ली. पण हुसेन, तस्लिमा ह्यांचा निवडणुका आणि राजकारणाशी संबंध काही कळला नाही. ह्या किंवा इतर कोणत्याही निवडणुकांमध्ये हे मुद्दे कोणी वापरले आहेत का? माहीत नाहीये म्हणून विचारतोय.

Pages