सुर्यग्रहण...

Submitted by Shrik on 13 March, 2010 - 08:57

१५ जानेवारीला आपल्याकडे कंकणाकॄती सुर्यग्रहण दिसलं. खरंतर भारतातील दक्षीणेकडील राज्यात ते कंकणाकॄती दिसलं. पुढचं कंकणाकृती सुर्यग्रहण बर्‍याच-बर्‍याच वर्षांनी दिसणार आहे. तेव्हाचे चंद्र-सुर्य बघायला आपण या पृथ्वीवर असायला हवं आणि त्याचीच शास्वती नसल्यामुळे मलासुद्धा ते बघायचं होतं.

माझा ८ वर्षाचा भाचा घरी आला होता. पण ताप असल्याकारणाने याला ग्रहण बघायला बाहेर घेउन जायचं नाही अशी त्याच्या आईची सक्त ताकीद होती, त्याला आणि मलाही.
तरी उत्साह फार म्हणून आमच्या ड्रॉवर मधले २-३ गॉगल डोळ्याला लावून गॅलरीतून वर बघत होता. नंतर त्याने मलाही दाखवलं पण काही व्यवस्थीत दिसलं नाही.

दुपारी ऑफिसला जाण्यासाठी लोकल मध्ये बसलो. फर्स्ट क्लासचा डबा तसा रिकामाच होता. एक गुबगुबित माणुस विंडो सीट वर बसलेला. अधुनमधून खिडकीतून वर पहात होता. मी उत्सुकतेपोटी त्याच्याकडे बघितलं, मग त्याने माझ्याकडे, मग आम्ही दोघांनी वर. आता म्हणाल उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघायला डोकी फिरली आहेत का यांची..पण ती जर्मन बनावटीची लोकल असल्यामुळे तिची काच रंगीत होती आणि त्यातून चंद्राला सुर्याने कवेत घेतल्याचं दृष्य मला बघता आलं. कंकणाकृती सुर्याग्रहणाची अमुल्य आठवण माझ्या गाठी ठेवल्याबदल मी त्या गुटगुटीत गट्टू ला थॅन्क्स म्हटलं आणि पलीकडच्या सीटवर जाऊन ते दृष्य जितका वेळ बघता येईल तेवढा वेळ बघत बसलो.
तर अशा प्रकारे ग्रहण बघायचा माझा योग होता.. हा झाला माझा अनुभव, आता मुळ मुद्याकडे वळुयात.

ग्रहणाच्या दिवशी काही लोक काही गोष्टी कटाक्षाने पाळतात.
उदा:
घराच्या बाहेर न पडणे, गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर न पडणे, अन्नग्रहण न करणे, अन्नावर तुळशीपत्र ठेवणे.
काही जण याला अंधश्रद्धा म्हणतात पण या गोष्टीचा विचार केला आहे का की आपल्या पुर्वजांनी तत्कालीन परीस्थीतीला अनुसरूनच ही बंधने घातली असावीत?

पुर्वीच्या काळी लोकांमध्ये ग्रहणाबद्दल अज्ञान असल्यामुळे घराबाहेर पडल्यावर चुकून किंवा "अचानक अंधार का पडला" या उत्सुकतेपोटी सुर्याकडे बघितल्यावर डोळ्यांना ईजा होऊ नये यासाठी घराबाहेर न पडण्याचे बंधन.

ग्रहणकाळात वातावरणात जिवजंतूंचा प्रादुर्भाव होऊन फ्रीज नसल्यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता जास्त होती व तुळशीपत्र हे निर्जंतुक असल्यामुळे ते अन्नावर ठेवल्यामुळे ते खराब होण्याची भिती नसते (हि माहिती मला सह्याद्री चॅनल वरील एका कार्यक्रमात काही वर्षांपुर्वी मिळालेली).

आजच्या युगात सुर्याग्रहणाबद्दल बर्‍याच लोकांना ज्ञान असल्यामुळे ते या गोष्टी पाळत नाहीत पण वयस्कर लोक बर्‍यापैकी पाळतात.

या लेखाचा उद्देश असा की या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणणार्‍यांनी व त्या अगदी काटेकोरपणे पाळणार्‍यांनीही त्या बाबतीतले शास्त्र व कारणे लक्षात घ्यावीत आणि मगच त्या आजच्या काळाला किती अनुसरून आहेत याचा विचार करावा आणि मगच ती पाळायची कि नाही हे ठरवावे.

मला याविषयी जेवढी महिती होती तेवढी टाइपली, मा.बो.करांकडे याबद्दल अधिक माहिती असल्यास ती मांडावी व या विषयावर प्रकाश टाकावा हि विनंती.

आपल्यापैकी एक मायबोलीकर,
श्रीकांत

गुलमोहर: 

ग्रहणकाळात वातावरणात जिवजंतूंचा प्रादुर्भाव होऊन>>>> हे अजुन झेपत नाही... मग रोज रात्री हा आयट्म व्हायला नको?

तुळशीपत्र हे निर्जंतुक असल्यामुळे ते अन्नावर ठेवल्यामुळे ते खराब होण्याची भिती नसते >>> हे पण अजुन झेपले नाही....

>> ग्रहणकाळात वातावरणात जिवजंतूंचा प्रादुर्भाव होऊन
काही पटलं नाही... मग असा प्रादुर्भाव ढग आल्यावरपण व्हायला पाहिजे!
नेटवरुन मिळालेली माहिती...
Q: Is solar eclipse effect during having any food?
A: No, why should it? We temporarily get less light form the Sun, and that's all. How is this supposed to harm food?

>> तुळशीपत्र हे निर्जंतुक असल्यामुळे ते अन्नावर ठेवल्यामुळे ते खराब होण्याची भिती नसते
हे म्हणजे तापाची गोळी न घेता नुसती डोक्यावर ठेवल्यासारखं आहे...

सूर्यग्रहण का होतं ते माहित नसल्यामुळे भयापोटी या रुढी पडल्या आहेत... पुढचे तुम्हीच बघा...