येता सयी तुझ्या

Submitted by कौतुक शिरोडकर on 24 February, 2010 - 04:08

तू लाजर्‍या कळ्यांच्या बहरात रोज आता
बेधुंद श्रावणाची, बरसात रोज आता

होते कधी न माझे, ना जाहलो जयाचा
ते स्वप्न ओळखीचे, नयनात रोज आता

स्पर्शात जागले जे रंध्रातुनी शहारे
येता सयी तुझ्या ते, फुलतात रोज आता

मौनातले उखाणे अन लाघवी इशारे
गहिरे कटाक्ष भोळे, छळतात रोज आता

मी बोलतो न काही, बिलगून आठवांना
वेड्यापरी दिशा मज, हसतात रोज आता

जा... शोध जा निवारा, तिमिरा, दुज्या घरी तू
आरास चांदण्यांची, गगनात रोज आता

हे वागणे पथांचे कोड्यात टाकणारे
सारे तुझ्या घरी का वळतात रोज आता ?

गुलमोहर: 

मी प्रत्येक गझलकाराच्या सुरेख, सुबक, सुंदर अशा 'सु' च्या बाराखडीतील गझलेचे विडंबन करतो याबद्दल बर्‍याच जणांनी आक्षेप नोंदवला. त्यामुळे त्या गझलकारांना विडंबन करण्याची एक 'सु'संधी देण्यासाठी मी गझल लिहीली आहे. जाणकारांनी फार खोलात जाऊ नये. नाहीतर माझे गझलज्ञान जगजाहीर होईल. लोभ आहेच तो या या धाडसानंतरही रहावा ही विनंती !

अ‍ॅडमिन, इथे लाजून निळी जांभळी झालेली बाहुली टाकण्यासाठी उपलब्ध आहे का ? (जयवी, दोन शेर कातिल म्हणाल्या.... रानातले वाघ लाजलेत... आधीच त्यांची संख्या रोडावलीय.)

तुझा फ़ोटो टाक फ़क्त बाकी कशाची गरज नाहीये रे कौतुका !
बाकी गझलेबद्दल म्या पामराने काय बोलावे....? साक्षात जयुताईने A+ दिलाय. मी फ़क्त टाळ्या वाजवतो. Wink

व्वा! अतिशय सुंदर ग़ज़ल!

<<<<<<<तू लाजर्‍या कळ्यांच्या बहरात रोज आता
बेधुंद श्रावणाची, बरसात रोज आता

होते कधी न माझे, ना जाहलो जयाचा
ते स्वप्न ओळखीचे, नयनात रोज आता

मौनातले उखाणे अन लाघवी इशारे
गहिरे कटाक्ष भोळे, छळतात रोज आता

मी बोलतो न काही, बिलगून आठवांना
वेड्यापरी दिशा मज, हसतात रोज आता

हे वागणे पथांचे कोड्यात टाकणारे
सारे तुझ्या घरी का वळतात रोज आता ?>>>>>>>

ह्या द्वीपदी खूप आवडल्या!! Happy

शरद

वा क्या बात है ! सुरेख !
>>>मौनातले उखाणे अन लाघवी इशारे
गहिरे कटाक्ष भोळे, छळतात रोज आता<<<
मस्त !

बरसो !!! भाई बरसो .... चॅलेंज ले ने क्या सही मौका है !!

असो ... मी तर बरेच दिवसांनी गझल वाचतोय.. इट्स सिंपली ग्रेट ...

मस्त..

शेवटचा शेर आवडला... बाकीचे पण सफाईदार झालेत पण कल्पना फारश्या नविन किंवा वेगळ्या नसल्याने एवढी मजा नाही आली त्यांच्यात...

कौतुक सुंदर प्रयत्न पण तू अजून चांगले लिहू शकतोस आणि लिहिले आहेस असे वाटते ...

चू.भू.दे.घे.

सारी कविताच लाजवाब आहे
आणि

>>>जा... शोध जा निवारा, तिमिरा, दुज्या घरी तू
आरास चांदण्यांची, गगनात रोज आता>>>

हे तर त्याही पलीकडले!