शापित गंधर्व

Submitted by tilakshree on 13 March, 2008 - 05:57

मुंबईच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आयुष्याला मी आता कुठे सरावत होतो. नवी मुंबईतल्या बेलापूरपासून हार्बर-लाईनच्या, वेस्टर्न आणि सेंट्रलच्या तुलनेने सुसह्य गर्दीच्या लोकलने प्रवास करून बोरिवलीला वजीरा कोळीवाड्यातल्या घरी पोहोचलो. निवांतपणे शॉवर घेतल्यानंतर दिवसभराचा शिणवठा कुठल्या कुठे पळून गेला आणि छान टवटवी आली. गुलाम अलीच्या अलवार सुरावटींवर आरुढ होत निद्रादेवीची आराधना सुरू होती; इतक्यात दारावरची बेल वाजली. मी आश्चर्यचकीत! मी नुकताच मुंबईत आलेला. या घराचा पत्ता फारसा कुणाला ठाऊक नाही; मग या वेळेला कोण असणार? मी दार उघडून पहातो तो दारात बाळू उभा!
बाळू माझा पुण्याचा चित्रकार मित्र. पुण्याच्या कला महाविद्यालयात तो शिकत असताना एका विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्ताने त्याची माझी ओळख झालेली. खरंतर तसं आमच्यात कोणतंही साम्य नव्हतं पण कशी कुणास ठाऊक त्याची माझी मैत्रीही जमली. बाळू हा कला महाविद्यालयातंला 'एक्स्ट्रॉ-ऑर्डिनरी' विद्यार्थी! त्याच्या बोटांना चित्रकलेचं जन्मजात वरदान असावं. त्याला आपल्या विशेषत्वाचा अभिमानही होता. वाजवीपेक्षा जरा जास्तंच! विद्यार्थीदशेतंच मुंबईचे एक ज्येष्ठ, प्रतिभावान आणि चित्रकलेच्या क्षेत्रात दबदबा असलेले गुरु त्याला मिळाले. त्यांच्याकडे कलेचे बारकावे शिकता शिकतांच बाळू त्यांच्याबरोबर कामंही करायचा. सकाळपासून दुपारपर्यंत कॉलेज करून त्याच्या 'यामाहा'वर स्वार होउन संध्याकाळपर्यंत मुंबई गाठायचा. रात्री उशीरापर्यंत त्याच्या गुरुंकडे काम करून सकाळी परत पुण्यात कॉलेजला हजर! या सगळ्या धावपळीत तो चित्रकार म्हणून वेगाने घडत गेला तसाच त्याच्या हातात चांगल्यापैकी पैसाही खुळखुळत गेला. ज्या काळात त्याच्या वर्गातली मुलं घरून मिळणार्‍या 'पॉकेट मनी'वर अवलंबून असायची त्यावेळी याच्या खिशात हजारो रुपये आणि ते ही स्व-कमाईचे यायचे. अर्थातंच याच्या जोडीने येणारा स्वयंपूर्णतेचा अभिमान; खरंतर दुराभिमान, छानछोकीची राहणी; दारू-सिगरेट सारखे शौक; इतरांच्यापेक्षा वेगळं असल्याची जाणीव आणि पदोपदी आपलं वेगळेपण दाखवून देण्याची वृत्ती हे सगळंही त्याला आपसूकंच येऊन चिकटलं.
पण आज मात्र बाळूचा अवतार काही निराळाच दिसला. जवळ जवळ टक्कल केलं असावं असे बारीक केस, मळकट शर्ट, कळकट पँट, पायात स्लिपर्स अशा अवतारातल्या बाळूला बघून मलाच कसंतरी झालं. मी त्याला घरात बोलावून पाणी दिलं. पाणी पिऊन होताच तो जरा चाचरतच म्हणाला; "भाई एक काम होतं..." त्याच्या आवाजात अजीजी होती. चेहेर्‍यावर काहीशी लाचारी आणि ओशाळलेपण होतं. "बोल ना" मी म्हणालो. "भाई जरा तीनेकशे रुपये हवे होते." बाळू माझ्याकडे पैसे मागतोय! आणि ते ही तीनेकशे रुपये! माझा माझ्याच कानांवर विश्वास बसत नव्हता. पण विचार केला; असेल काही तरी काम! कागद, कॅनव्हास, रंग, ब्रश खरेदीसाठी काही पैसे कमी पडंत असतील...
"ठीकाय ना; होउन जाईल तुझं काम. पण आत्ता रात्री साडेदहाला काय करणार आहेस? इथेच पड आत्ता. सकाळी तुझं काम करतो; मग लाग तू तुझ्या वाटेला! पण जेवलायस का तू?"
"भाई... जरा आत्ताच मिळाले असते बरं झालं असतं. जेवण तर व्हायचंय; आणि जरा जायचं होतं;" बाळू रडकुंडीला आल्यासारखं खाली मान घालून बोलला. त्याची ही अवस्था मला बघवेना! दात पाडलेल्या अन नखं काढलेल्या सिंहाची मांजरापेक्षा केविलवाणी अवस्था व्हावी तशी! त्याला कुठे जायचं असेल त्याचा अंदाज मला होताचं. मीच त्याला म्हंणालो; "बाळू एकतर इतक्या दिवसांनी भेटतोयस. परत कधी भेटणारेस काय माहित! चल जरा 'राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा' करुया. मासे-बिसे खाऊया. सकाळी तुला पैसे देतो. आज थांब इथेच!" बाळू तयार झाला. पण त्याच्या चेहेर्‍यावरची नाराजी मला स्पष्ट जाणवली.
बोरिवली स्टेशन बाहेरच्या एका 'विचार-मंथन केंद्रा'त आम्हा 'विचारवंतांची' जोडगोळी रवाना झाली. सुरुवातीला बाळू वरवरच्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारंत होता. त्याच्यात मोकळेपणा नव्हता. मला मात्र बाळूच्या बदलेल्या रुपाबद्दल उत्सुकता होती आणि काळजीही! मात्र आधीच निराशावादी सूर आळवणार्‍या बाळूला मला आणखी डिवचायचं नव्हतं. मी त्याला त्याच्या या अवस्थेबद्दल विचारण्याऐवजी त्याच्या चलतीच्या काळातल्या गोष्टींना उजाळा देत होतो. त्याची चित्रकला, कलेचं झालेलं कौतुक, काळा घोड्याच्या कुठल्याशा गॅलरीमधे नामवंतांच्या चित्रप्रदर्शनात त्याच्या चित्रांचा समावेश, हौशी बघ्यांबरोबरंच नामवंतांकडून त्याच्या पाठीवर मिळालेली शाबासकीची थाप...
"जाऊ दे रे भाई; सोडून दे सगळं. ते सगळं जुनं झालं. आता सगळं बदललंय. ही आक्काबाई पोटातून डोक्यात गेली आणि सगळं वाटोळं झालं..."; 'रम'च्या ग्लासाकडे बोट करून बाळू उद्वेगाने बोलला. आपला आवाज मर्यादेपेक्षा जरा जास्तच वाढल्याचं त्याच्या लगेचं लक्षात आलं आणि त्याने मानेला एक निराशादर्शक झटका देऊन नजर जमिनीकडे वळवली. मी काहीही न बोलता केवळ त्याचा हात दाबला. त्याला दिलासा देण्यासाठी! त्याने झटकन ग्लास उचलून त्यातली सगळी दारु घशाखाली रिचवली. तो पुढे बोलायला लागला. "भाई तुला तर बर्‍यापैकी माहितीच आहे. मराठवाड्याच्या ओसाड गावात चुलत्याकडे लहानाचा मोठा झालो. तो ही अनाथ म्हणून! आश्रितासारखा!! आई-अण्णा लहानपणीच वारले. कसे होते ते कधी बघितलं पण नाही. शाळेतल्या मास्तरामुळे चित्रकलेच्या परिक्षा दिल्या. पुण्याला कला-महाविद्यालयात त्यानंच सोय केली. त्यावेळी कोणी आलं नाही मदतीला. उलट चुलत्याने घराचं दार माझ्यासाठी बंद करुन टाकलं. कायमचं! पुण्याला आलो. कॉलेज जॉईन केलं. आपल्या हातात खरंच कला आहे हे इथे आल्यावरंच कळलं आणि मास्तराने आपल्यावर किती उपकार केले हे ही जाणवलं..." बाळू बोलतंच होता. आजवर काळजात दाबून टाकलेल्या भावनांना वाट करून देत होता. बोलता बोलता त्याला एकदम भरून आलं. कंठ दाटला. डोळे पाण्याने डबडबले. पालथ्या मनगटाने आसवं टिपत तो पुन्हा बोलू लागला. खरंतर मी त्याचं बोलणं कितपत ऐकतोय याचं त्याला भानही नसावं आणि त्याच्याशी त्याला काही देणं घेणंही नसावं. त्याला कबुली द्यायची होती. स्वतः स्वतःशीच! तो बांध फुटल्यासारखा बोलत गेला. 'कन्फेशन बॉक्स'मधे आपल्या अपराधांची कबुली द्यावी तसा... "खूप माज केला भाई; खूप माज केला. जेव्हा कॉलेजमधे नाव निघायचं, प्रदर्शनात कौतुक व्हायचं, चित्रं विकली जायची तेव्हा खूप आनंद व्हायचा. पण तो खरा आनंद नसायचा भाई. आपल्या कर्तबगारीपेक्षा आपण आपल्याला लाथाडणार्‍या चुलत्यावर, पै-पाहुण्यांवर सूड उगवल्याचा असुरी आनंद जास्त असायचा त्यात! एकदा एका पेपरमधे माझ्या चित्राचा फोटो छापून आला आणि माझ्याबद्दल चार ओळीसुद्धा! तो पेपर पोष्टाने पाठवून दिला गावी मास्तरच्या नावाने! का? मास्तरला बरं वाटण्यापेक्षा चुलत्याने जळावं म्हणून! मुंबईला दिवस-रात्र एक करून काम केलं. बर्‍यापैकी नाव झालं आणि पैसाही मिळाला. या अवेळी मिळालेल्या पैसा आणि प्रसिद्धीचं भूत शिरलं डोक्यात आणि त्यातंच ही 'आक्काबाई' आली आमच्या आयुष्यांत! भाई कॉलेजमधे चार-दोन चांगले मित्र मैत्रिणी होते. त्यावेळी चार चांगले शब्द सांगायचे. पण तेव्हा वाटायचं 'साले जळतायत आपल्यावर...' दिलं त्यांना झुगारुन! आपल्याच मस्तीत असायचो. आपण, आपलं काम आणि उरलेल्या वेळात ही आक्काबाई होतीच जोडीला. भाई हळू हळू ही पोटातून डोक्यात कधी शिरली ते कळंलंच नाही. पुढे पुढे काम कमी होत गेलं. सालं सुचेनाच रे काही! हातही काम करेनात आणि डोकंही! मुंबईला सरांनी दहा वेळा डोकं फोडून समजावलं तर त्यांच्यावर पण मला शक! शेवटी त्यांच्याबरोबर काम करायचंही सोडून दिलं आणि आता बसलोय गाड्यांच्या नंबर-प्लेट रंगवंत! पुण्याला लोहीया नगरला एक टपरी टाकलीय. कधी चार पैसे मिळाले की निम्म्याची फुटकळ पितो अन उरलेल्याचा आकडा लावतो. मटक्यात कधी पैसे मिळतात; कधी जातात. कधी जास्त पैसे मिळाले की येतो इथे मुंबईत मजा मारायला... हातात बरे पैसे असले तर नव्या मुंबईतल्या सानपाड्याच्या लेडीज बार मधल्या 'रेश्मा'ला घेऊन 'बसतो'. कमी पैसे असतानाही राहावलं नाही तर दाणे आळीत पन्नास रुपयात येणार्‍या 'गंगी'कडे जातो." बाळू न थांबता बोलतंच होता. मी ही त्याला थांबवत नव्हतो. एकदा मोकळा होऊन जाऊ दे त्याला!
बाळू बोलायचा थांबला आणि मी त्याला 'टिपिकल' उपदेश द्यायला सुरुवात केली. "अरे बाळू; तुला एवढं सगळं कळतंय ना! मग आता तरी झालं गेलं विसरुन जा! आपलं आयुष्य नव्याने सुरू कर. जमेल...!" माझं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच त्याने मला तोडलं आणि ताडकन म्हणाला;" अरे भाई जमेल. सगळं जमेल. पण कशासाठी करू हे सगळं? आई-बाप कधी बघायलाच नाही मिळाले! जे नातलग होते त्यांनी मला कधी किंमत नाही दिली. मी ही त्यांना फाट्यावर मारलं. माझ्या चलतीच्या काळांत मित्र गमावले. आता का करू हे सगळं? कुणासाठी करू? तू भले सांगशील की सगळी गाडी रुळावर आण. लग्न कर. संसार कर. मुलाबाळांत रमून जा! पण एवढं सोपं आहे का रे भाई सगळं? आता माझा माझ्यावरंच विश्वास नाही उरला. समजा तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं सुरळीत झालं अन नंतर माझं टाळ्कं सरकलं तर? पुन्हा ही आक्काबाई माझ्या डोक्यात शिरली तर? किती जीवांच्या नरडीला नख लागेल जरा विचार तरी कर!!!" बाळू आपलं पराभूताचं तत्वज्ञान मला सांगत होता. पण मी निरुत्तर! एकीकडे त्याचं म्हणंणं पटत तर नव्हतं पण ते एवढं 'प्रॅक्टिकल' आणि 'लॉजिकल' होतं की त्याचा प्रतिवाद करणंही शक्य नव्हतं. मी अबोलचं! बाळू पुढे बोलतंच होता. "भाई माझ्यापुरतं म्हणशील तर सगळं आयुष्य जगून झालंय. मला ज्यांनी झिडकारलं त्यांच्या नाकावर टिच्चून उभा र्‍हायलो. चित्रकार झालो. नाव कमावलं. पैसा कमावला. नावाचा; पैशाचा माज केला. आता मी कफल्लक आहे.कफल्लकपणाचाही माज करतो. कोरडवाहू शेतकर्‍याचा अनाथ पोर म्हणून जन्मलो. परिस्थितीशी झगडंत चित्रकार झालो. आता चित्रकाराचा 'बाळू पेंटर' झालो. लवकरंच 'बेवडा बाळू' म्हणून मरुनही जाईन." त्याचा युक्तिवाद बिनतोड होता, मी केवळ नि:शब्द! अबोलपणे त्याच्याकडे पहात होतो. एक शापित गंधर्व माझ्या समोर होता! शापातून मुक्त होण्यासाठी वाट बघणारा स्वतःच्या संपण्याची !!!

गुलमोहर: 

टिकाश्री लिहित रहा. अगदि व्यवस्थित कळतय कि तुम्हाला काय सांगायचय तुमच्या सगळ्या लेखांमधुन. तुमचा प्रत्येक लेख विचार करण्यासारखा आणि समाजातली खरी परिस्थिती दाखविणारा असतो.

.. .. शब्दच नाही सापडत दाद द्यायला...

उत्तम लिखाण. खरोखर काय दैवी शक्ती असते अथवा परिस्थितीने येते अशा प्रकारच्या लोकांमध्ये कि त्यांची उत्तरे आपल्याच निरुत्तर करतात. जसे बाळूच्या बोलण्याने निरुत्तर व्हायला होते.

छान लिहिलय श्रीकांत. जिवंत चित्रण. पण त्या चित्रकाराचा मनस्वीपणा नाही पटला.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद मित्रांनो!

किशोरजी;
या पराभूतांचंही तत्वज्ञान इतकं अगाध असतं की आपले शब्दंच काय; मतीही खुंटते! अहो बाळूच्या आणि माझ्या खर्‍या-खुर्‍या संवादात असं अजूनही बरंच काही होत जे विस्तारभयास्तव आणि यात नसलेले काही संदर्भ त्यात असल्यामुळे दिलेलं नाही. अक्षरशः पाऊण तास तो बोलत होता आणि मी मूग गिळून ऐकण्याशिवाय काहीही करू शकत नव्हतो.

दिनेशदा;
आमच्या बाळूचा मनस्वीपणा हेच तर या शोकांतिकेचं मूळ आहे ना! दुर्दैवाने काही अशी कलावंत वगैरे मंडळी आपला मनस्वीपणा अभिमानाने मिरवतात. पण शेवटी फलीत काय? चित्रकाराचा पेंटर अन पुढे जाऊन बेवडा!!!

केवळ अप्रतिम.........................

शब्दात व्यक्त करण कठीण आहे.......................

अतिशय सुंदर लेखन. वादच नाही. दारुसारखा दुसरा दुश्मन नाही. या दारुच्या अपायाबद्दल काहीतरी लिहायचा विचार करतोय

खरच छान.......
अशा लोकांना कसे समजवायचे तेच कळत नाही इतके त्यांचे तत्वज्ञान इतकं अगाध असतं......

मस्तच.....

पाहिलेत हो असे लोकं! मरता येत नाही म्हणून जगणारे आणि जगताना असे कणाकणाने मरणारे! Sad