राशी करती काशी ... अर्थात दैनंदिनीची

Submitted by देवनिनाद on 22 February, 2010 - 02:44

रोजचं राशी भविष्य ऐकल्याशिवाय बहूतेकांचा दिवस सुरु होत नाही ....

गृहीणींची चहा-पाण्याची गडबड, कामावर जाणार्‍यांची नेहमीची घाई, आजीची देवपुजेची तयारी, आजोबांचा योगा इत्यादी इत्यादी कितीही चालू असलं तरी चॅनेलवरचं रोजचं राशी भविष्य ऐकायची सवय आता बहुतांशी मंडळीना लागलेली दिसते. अहो, हातातली कामं बाजूला टाकून आधी भविष्य, मग काम असा पायंडा पाडण्यार्‍यांची संख्या ही दिवसें दिवस वाढतच चाललेयं. अर्थात, कार्यक्रमाचा टी.आर.पी वाढवणारी हिच ती मंडळी.

आपण नाही का, स्टॉपवर आलेल्या बसचा नंबर किंवा स्टेशनात शिरलेल्या ट्रेनचं इंडीकेटर पाहून चढतो, अगदी तस्सच असतं ह्या राशी भविष्य ऐकणार्‍या मंडळीचं. ज्याचं पटतं त्या त्या ज्योतिषाचं भविष्य ऐकायचं आणि मगच आपली दिनचर्या सुरू करायची हे आता नित्याचचं झालयं.

खरचं गमंत वाटते, एक माणूस एकेका राशीचं नावं जाहीर करून कोट्यवधी लोकाचं भविष्य एकाचवेळी कसं काय सांगतो हे मात्र गुढच आहे.

कुणी एका राशीला प्रवास करा सांगतं तर त्याच राशीला कुणी प्रवास टाळा सांगतं. कुणी राशीला शुभ फल सांगतं तर त्याच राशीला कुणी साडेसाती सुरु झालेय असं सांगतो. लकी कलर लकी नंबर ते ही बरेच. कुणी कबुतराला चणे घाला सांगतं, कुणी माशाला पाव घाला सांगतं, काय काय अन काय काय ...

परीणामी, आपापल्या कामाला सुरूवात केल्यावर आपलं बाजूलाच राहतं ह्याचंच भविष्य डोक्यात राहतं. उठणं, बसणं, वागणं, खाणं, पिणं ह्या सर्वच बाबींवर ह्यांनी सांगितलेल्या भविष्याचा परीणाम.

रोज रोज ह्यांना हे नित्य भविष्य, लकी कलर, लकी नंबर, उपाय, तोडगे सांगण्यासाठी किती होमवर्क करायला लागत असेलं. असो. हा एक वेगळाच विषय.

जितकी चॅनेल्स तितके तज्ञ, एखादा वगळता तितकेच ते नाटकी वाटावे असे त्यांचे गेटप, आवाज इत्यादि इत्यादी ...

मग, आपणच का मागे रहावं. म्हणून ही वरील प्रस्तावना.

नमस्कार आणि सुप्रभात रसिकहो, मी स. दा. जगणे आपणा सर्वांचे `राशी करती काशी 'ह्या कार्यक्रमात मन:पुर्वक स्वागत करतो.

आज दिनांक : २२ फेब्रूवारी, २०१०
सुर्य उत्तरायन, शिशिर ऋतू
फाल्गुन शुक्ल ८
आज चंद्राची तब्बेत ठीक नसल्याने तो कोणत्याच राशीतून भ्रमण करणार नाही.
आजचा राहू काल : १ ते २.३० वाजेपर्यंत आहे पण सकाळी की दुपारी निश्चित माहीती नसल्याने काळजी करण्याचे कारण नाही.

वाफाळलेला चहा, वर्तमान पत्र किंवा रोजचा व्यायाम करता करता आपण आपलं राशी भविष्य ऐकण्यास उत्सुक असाल. चला तर पाहूया, आजच आपलं राशी भविष्य.

मेष रास - आजचा दिवस तुम्हाला अतिशय छान जाणार आहे. आजचा दिवस खरेदीसाठी उत्तम आहे. गृहीणींनी माझा सल्ला आहे की आपल्या नवर्‍याकडून १००० / २००० रुपये मागा आणि मनसोक्त खरेदी करा. नवर्‍याला शक्यतो बरोबर घेऊन जाऊ नका, नाहीतर काहीच आवडलं नाही असं म्हणत त्याने खरेदीसाठी दिलेले पैसे पुन्हा त्याच्याच खिशात जातील. तुमचा लकी कलर आहे काळा आणि लकी नंबर १

वृषभ रास - सकाळपेक्षा आजची दुपार तुम्हाला शुभ आहे तेव्हा सकाळी लवकर उठून कोणतही काम सुरू करु नका. दुपारपर्यंत मस्त ताणून द्या. बेल वाजवून दुधवाला, भाजीवाला, पेपरवाला दारावर हैराण करणार असेल तरी ही लक्ष देऊ नका. तुमचा लकी कलर आहे निळा आणि लकी नंबर २

मिथुन रास - आजचा दिवसच काय हा आठवडाच मिथुन राशीला खुप चांगला आहे. तेव्हा आठवडाभर सर्व कामातून सुट्टी काढा सर्व नातेवाईकांकडे जाऊन हवं ते खा आणि जिभेचे चोचले पुरवून घ्या. कारण नेहमी हगवणीने त्रास देणारं तुमचं पोट ह्या आठवड्यात एकदम शांत रहा. तुमचा लकी कलर आहे लाल आणि लकी नंबर ३.

कर्क - प्रवास टाळा असा सल्ला मी कर्क राशीच्या मंडळीना देईन. कारण आज आपल्याला जवळचा प्रवास करायचा आहे. पण आपण जी ट्रेन पकडाल ती यार्डात जाईल. आणि तेथील लोक तुम्हाला किमान चार ट्रेनमधील कचरा झाडायला सांगतील. तेव्हा प्रवास टाळलात तर फार बरं होईल. तुमचा लकी कलर आहे पिवळा आणि लकी नंबर ४

सिंह - सिंह राशीच्या लोकांनी आज जरा घरातल्या पिंजर्‍यातच रहावं उगाचच डरकाळ्या फोडायला घराबाहेर पडू नये कारण आज एखादा बोका किंवा एखादं माजरं स्वभावाचं माणूस सुध्दा तुम्हाला घाबरवू शकतं. तुमचा लकी कलर आहे लाल आणि लकी नंबर आहे ५

कन्या - कन्या राशीच्या लोकांना सतत टेंशन करायची सवय असते पण आज टेंशन घेऊ नका. आजचा दिवस तुम्हाला झकास जाईल. तुम्ही आज तुमच्या शेजार्‍याशी उकरून उकरून जरी भांडण केलतं, किंवा मारामारी जरी केली तरी विजय तुमचाच होईल. तेव्हा आज वेळ काढून शेजार्‍यांशी मनसोक्त भांडा. तुमचा लकी कलर आहे जांभळा आणि लकी नंबर आहे ६

हे होत ६ राशींच भविष्य. आता घेऊया एक ब्रेक ... ब्रेकनंतर पाहूया उर्वरीत राशीचं भविष्य ... तेव्हा कुठेही जाऊ नका पाहात काशी `राशी करती काशी'.

डो-को-मो
झंडू बाम ... एम बाम तीन काम ....

ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत ..... पाहूया उर्वरीत ६ राशींच भविष्य

तुला - तुला राशीच्या लोकांना आजचा दिवस ऊतम आहे. आज बिनधास्त वागा. कुणी विचारलं तुम्ही असं का वागता, तर बिनधास्त म्हणा माझी रास तुला आहे, तुला काय करायचयं. मी कसाही वागेन. थोडक्यात, मी म्हणेन ती पुर्व दिशा असा आजचा तुमचा दिवस आहे. तुमचा लकी कलर आहे केसरी आणि लकी नंबर आहे ७

वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांनी आज खाण्या पिण्याच्या गोष्टी सांभाळून कराव्यात. उगाचच कडक बुंदीचा लाडू, अक्रोड वगैरे हावर्‍यासारखं खायला जाऊ नका. नाहीतर घशातील दंतपक्तीतील काही मेंबर तुटून पडण्याची व आपला साथ सोडून जाण्याची शक्यता आहे. तेव्हा शक्यतो आज नरम, मऊ पदार्थ खावेत असा आपणास सल्ला. तुमचा लकी कलर आहे तपकीरी आणि लकी नंबर आहे ८

धनू - धनू राशीच्या लोकांनी मात्र उगाचच समाजसेवा करण्याच्या फंदात पडू नये. नाहीतर जग जाईल पुढे आणि हे राहतील जगाच्या पाठीवर कासवासारखे मागे. तुमच्याकडे सतत कुणी पैसे मागत असेल तर त्यावर एक उपाय आहे खिसा नसलेले कपडे शिवा तुमचं काम सोप्पं होईल. तुमचा लकी कलर आहे नारंगी आणि लकी नंबर आहे ९

मकर - मकर राशीच्या मंडळीना आज नजर लागण्याची शक्यता आहे, तेव्हा फार नटटा पटटा न करता अतिशय साधारण पोषाख घालावा जेणेकरून येणार्‍या जाणार्‍याला तुम्ही एखादे बी.एम.सी.चे सफाई कामगार वाटाल. तुमचा लकी कलर आहे भगवा आणि लकी नंबर आहे १०

कुंभ - आज कुंभ राशिच्या लोकांचे सर्वजण कौतुक करतील. कारण इतके त्रास देणारा उंदीर तुम्ही आज पकडण्यात यशस्वी होणार आहात. शक्य झाल्यास उंदीर पकडतानाचे प्रयत्न कॅमेर्‍याने शुट करा. कदाचित विभागातील लोक आपला सत्कार करतील. तुमचा लकी कलर आहे राखाडी आणि लकी नंबर आहे ११

मीन - मीन राशीच्या लोकांना चमचमीत खायला फार आवडतं. तेव्हा आज काय खायचं ते ठरवा नाहीतर शेपुची भाजी खायची वेळ येईल. आपण जर नातेवाईकांकडे जाणार असाल तर त्यांना खेकड्याचं सार, किंवा ओले बोंबील करायला सांगा नाहीतर त्यांच्याकडे भेंड्याची भाजी करणार असतील तर तुमची निराशा होईल. तुमचा लकी कलर आहे लाल आणि लकी नंबर आहे १२

आज इथचं थांबूया उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या राशी करती काशी ह्या कार्यक्रमात तोपर्यंत स.दा.जगणेंचा सर्वांना नमस्कार.

- देवनिनाद

गुलमोहर: 

निनाद, नवीन धंदा काय? पोपट दिसला नाही कुठे तो? Proud

बाकी सुटलाहेस सद्ध्या ! नाटक कुठपर्यंत आलय? Keep in touch !

हो रे. पोपट कसा दिसणार चॅनेलवाल्यांनीच पोपटाचा पोपट केलाय, बिच्चारा.

सुटलोय म्हणशील तर खरं आहे आणि नाटकाचं म्हणशील तर स्क्रीप्ट तयार आहेत रे ! पण तसाच चांगला प्रोड्यूसर असेल तर करायचं नाहीतर नाही असं ठरवलंय. यस. संपर्कात राहूच.

तुझं काय चाललयं ..?

शुभेच्छा !!!