पान पान....

Submitted by दाद on 10 March, 2008 - 03:37

पान पान मी....

मला तरी अनेकवेळा वाटतं.... मी म्हणजे एक पुस्तक आहे... मीच नाही.... आपण सगळेच.....

नेहमीच्या पुस्तकात अन आपल्यात फरक इतकाच की, वाचणारा प्रत्येकजण एक बारकिशी का होईना टीप लिहून, काही पाउलखूण ठेवून जातोच जातो....

कुणी कुणी, कुठलीतरी मधलीच एक-दोन पानं अर्धवट कशीतरी वाचून आपल्या येण्याची, वाचण्याची खूण ठेवून जातो.
’अगदिच भिक्कार’, ’वाचनीय’.... किंवा एखादा अख्खा परिच्छेदच.... थोडं स्वत:विषयी, थोडं तो किंवा ती आणि मी ह्या दोघामधलं काहीतरी लिहून.... किंवा कधी कधी तो किंवा ती अन तिसरच कुणी ह्यांच्यामधलं लिहून...

कुणी कुणी काही वाचत नाहीतच.... पण दिसेल त्या कोर्‍या पानावर.....
कधी अगदी वरवरचं.... नुस्तच ’मी बरीये, तू कशीयेस?’ पासून ’कालचा कार्यक्रम अगदिच सुमार हो’ पर्यंत....
आणि कधी कधी अगदी आतून उमळून आलेलं.... ’कुठे आहेस सखी... किती वाट बघितली तुझी काल’ पासून.... ’तुझं-माझं हे असं आहे बघ. नुस्तं बोललं तरी बरं वाटतं....’ पर्यंत काहीही.

कुणी इतक्या उद्वेगाने किंवा उन्मादातही असं काही लिहितात की.... त्याची निशाणी सताठ पानं ओलांडूनही उमटते... खोलवर.

एखादं कुणी येतं.... लिहितं काहीतरी.... थोडं बाहेरचं, थोडं आतलं.....अन आपल्या खुणेसाठी पान दुमडून ठेवून जातं... परत उघडून वाचायला परत ते माणूस येतच असं नाही.... पान मात्रं दुमडलेलं.... तसंच....

पण कोणत्याही पुस्तकाचं काय्यै.... अशी दुसयाने दुमडलेली पानच इतरेजनं आधी उघडून वाचतात....

काही पानं अगदी खास.... जादुची शाई, वेगळी शैली... फक्तं ज्यानं लिहिली तो किंवा ती अन मी.... ह्या वेगळं कुणाला वाचता यायची नाहीत अशी... अन तशीही सुकलेल्या आसवांची लिपीही वेगळीच असते नाही?....

कुणी कधीकाळी ठेवलेली... आता जाळी पडलेली छान पानं.... त्यातून मला दिसणारं बाहेरचं जग अन बाहेरच्या जगाला दिसणारं पुस्तकाचं पान....
एक सुकला बकुळीचा वळेसर.... ह्याची फुलं मी अन सखीनं मिळून वेचलेली, एक दणकट मनगटावरून तुटून गळला काळा गोफ.... ती एक कथा वेगळीच, एक त्यानं बुकमार्क म्हणून ठेवलेला ढेरपोट्या लाफिंग बुद्धा.... हसायचं विसरून गेलेला... एक उजव्या कोपयावरली महिरप.... लाल शाईतली ...काळ्या पेनानं खोडलेली.... एक ’फक्तं तुझाच’.....एक ’ग म भ न’.....

गंमत म्हणून शोधायला गेले तर..... ’श्री’ काही सापडेना...

म्हटलं ते काहीनाही.... आपलं आपल्याला सापडेना म्हणजे काय?.....अन परवा कधीतरी वाचायला घेतलं... स्वत:लाच.....

बाई गं! मुळचं लिखाण किती पुसटलय.... माझं मलाच वाचता येईना.... पुसटल्या जागी नेमके लिहून गेलेत काहीजण अगदी नको नको ते...

.....नको नको ते आणि हवं हवं ते.... कसलं काय... आपल्याला नक्की काय नकोय आणि काय हवय ते कळलं की पुस्तक मिटायचीच वेळ म्हणायची...

मुळचं काही नाहीच.... हे लोकांनी गिरपटलेलंच झालय की सगळं....... मग हेच असलं वाचून... तिथेच किंवा कुठेही आपल्या मताची पिंक टाकून जाणारेच जास्तं....
ह्यातूनही मला शोधणारे, वाचणारे थोडेच.... फार थोडे.....

कंटाळा आला मग....

वाटलं.... एखाद्या मऊ-मवाळशा संध्याकाळी.... सारं जग गर्दीतही गर्द एकलं होत असताना...
किरमिजी उन्हाच्या बटा उडवणारा वारा हवा मात्रं....
आपण अनेक व्हावं..... बांधणी सुटून..... पान पान व्हावं.... वार्‍यावर इतस्तत: उडून जावं... विखरून....

जावं.... ऋतूंची गावं घेत... ऊन-पाऊस झेलत झेलत... दूर कुठेतरी... जिथे... हाती घेतलं पुस्तक वाचून संपवणारी, त्याची पारायणं करणारी वेडी माणसं रहातात... गिरगिरत येऊन पडावी सगळीच्या सगळी पानं.... आपणहून.... कुण्या स्वच्छ सारवल्या, रांगोळी रेखल्या अंगणात....

कुणी अलवार हातानं गोळा करेल.... आपल्यामते क्रम लावेल अन लिहील, ’श्री’.... आपल्यामते पहिल्याच पानावर.....
.....तुळशीकट्ट्याशी... गोपद्मापाशी.... जुन्या लाल आलवणाच्या मऊशार उबेत.... पडून ऐकावी..... उरलेली झिरझिरीत गाथा....

समाप्त

गुलमोहर: 

किती मनातलं.. किती सहज... प्रत्येक वाक्याला सहानुभाव होईल असं.
>> आपल्याला नक्की काय नकोय आणि काय हवय ते कळलं की पुस्तक मिटायचीच वेळ म्हणायची...
खरंच...

कविता आहे ही कविता.. अखंड......... छानच एकदम.

दाद; कशी दाद देऊ? शब्द अपुरे ठरतील... यावर काहीही प्रतिक्रिया देण्यापेक्षा केवळ वाचता वाचता आपल्याच आत खोल-खोल उतरंत जाण्याचा अवर्णनीय आनंद घेणं हेच बरं...

अन तशीही सुकलेल्या आसवांची लिपीही वेगळीच असते नाही?....
>>>>>
आणि फार कमी जणाना वाचता येते...

दाद अगदी मनाला भिडणार!
सुकलेल्या आसवांची लिपी, हसू विसरलेला लाफिंग बुद्धा,हाती घेतलेल पुस्तक संपवणारी, त्याची पारायण करणारी माणस ....सगळच जबरदस्त...
एकच भिती वाट्तेय....ही मतांची पिंक तर नाही ना?
शुभेच्छा!

अन्जलि

बाई ग! काय आणि कितीवेळा जीव घेणारेस तू आमच्यासारख्या वेड्यांचा?
कवितेच्या पुढे कविता नसलेलं पण तरिही कविताच असलेलं काही असेल तर् ते असच असेल बहुतेक (काय लिहिलं मी????) जाउ दे, कळल असेल तुला. Happy

कळेना इतक्या तरल लिखाणाला कुठल्या प्रतिसादानी नटवावं. मला वाटतं, असं छान सुंदर लिहिण्यासाठी अशा पानांची पारायणं करीत झटावं. बस. किमान; नशिबात तसं असावं; साध्य साधलं नाही तरी !! Happy

हे असलं काही "दाद"च लिहू जाणे......

तुझं जे काय लिहिणं असतं ना ते इतकं मनापासून असतं की ते सगळं त्या शब्दात उमटतंच तर कधी बिट्विन दि लाईन्स ही........

असंच लिहित जा .....

कुणी अलवार हातानं गोळा करेल.... आपल्यामते क्रम लावेल अन लिहील, ’श्री’.... आपल्यामते पहिल्याच पानावर.....
.....तुळशीकट्ट्याशी... गोपद्मापाशी.... जुन्या लाल आलवणाच्या मऊशार उबेत.... पडून ऐकावी..... उरलेली झिरझिरीत गाथा....

>>>>>> अप्रतीम!
काही पानं अशीही! वाचकाला श्रीमंत करणारी!!

कुणी कधीकाळी ठेवलेली... आता जाळी पडलेली छान पानं.... त्यातून मला दिसणारं बाहेरचं जग अन बाहेरच्या जगाला दिसणारं पुस्तकाचं पान....
कधी वाटते या जाळीदार पानाच्या खुणेतील कादंबरी वाचता येईल का ? कधी वाटते ती खुण तिथेच पुन्हा ठेवून त्या जाळीवरच पुन्हा उमटू द्यावी एखादी कथा जिचा शेवट ????
जावू दे शेवटचा विचार नकोच सुरवातीला अजून कथा कोठे आलीय त्या वळणावर ..... वळण येईपर्यंत तरी सरळ चालता येईल का ? हाच खरा प्रश्न आहे .....