उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सागर म्हणजे तो कृपासिंधू. पाणी ओतणं, समरस होणं म्हणजे पुर्ण शारण्यभाव. पाणी म्हणजे चांगलं वाईट प्रारब्ध.
मी म्हणजे देह नाही. पण ज्या देहामुळे मनाच्या तरंगांतून प्रारब्ध निर्माण होते त्याचे चलनवलनाचे अधिकार त्याच्याकडे सोपवणे त्यासाठी आधी मी म्हणजे माझा आत्मा हा त्याचाच एक अंश आहे ही जाणीव असणे आवश्यक आहे. तो मधे तेव्हाच पडतो. तेव्हाच देह हे केवळ माझे माध्यम ठरते. प्रारब्ध त्याच्या हवाली केले की देहाच्या माध्यमातून घडणारे व्यवहार देखिल त्याच्या अखत्यारीत येतात.

असा शारण्यभाव थोडाजरी असेल तरी तो त्याचे आपल्या देहावरील स्वामित्व जाणवून देतो मग संपुर्ण शारण्यभाव आपले कर्मस्वातंत्र्य त्याच्या हवाली नक्कीच करु शकतो.

अश्विनी,

>>>असा शारण्यभाव थोडाजरी असेल तरी तो त्याचे आपल्या देहावरील स्वामित्व जाणवून देतो मग
संपुर्ण शारण्यभाव आपले कर्मस्वातंत्र्य त्याच्या हवाली नक्कीच करु शकतो.

'देह हा प्रारब्धानुसार चालतो', हे सत्य आहे की नाही? म्हणजेच देहावर अधिकार कोणाचा त्याचा(परमेश्वराचा) की प्रारब्धाचा?:)

संपूर्ण शारण्यभाव,, म्हणजेच समरस झाल्यावर, स्वतंत्र त्याच्या(परमेश्वराच्या)हवाली करण्यासारखे 'कर्म आणि त्याचे स्वातंत्र' असा प्रश्न अजूनही रहातो की नाही रहात? Happy

अधिकार प्रारब्धाचा असला तरी जेव्हा प्रारब्धच त्याच्या हवाली केलं की ते ज्याने निर्माण होतं ते कर्मस्वातंत्र्य देखिल त्याच्या हवाली आपोआपच जातं ना? आपले अन् त्याच्यातले अंतर कमी होत गेले की त्याचा आपल्या त्रिदेहांवरचा अधिकार वाढतच जाणार ना?

अश्विनी,
>>>
मी म्हणजे देह नाही. पण ज्या देहामुळे मनाच्या तरंगांतून प्रारब्ध निर्माण होते त्याचे चलनवलनाचे अधिकार त्याच्याकडे सोपवणे

आजचा 'देह' हा 'कालच्या' प्रारब्धानुसार आहे, हे जर सत्य असेल, तर मग आजचा देह..त्याचे मन्..त्या मनातील तरंग आणि आजचे होणारे कर्म आणि कर्मफळ यांचा संबध कसा काय असू शकतो? आणि या आजच्या मनातील-तरंगाचे स्वामित्व त्याच्याकडे सोपवले तर कालच्या प्रारब्धानुसार मिळालेल्या, अगोदरच भोगण्यासाठी तयार असणार्‍या देहावर, त्याचा कसा काय फरक पडतो?:)

ते तर भोगायचेच आहेत पण त्याचा दाह होणार नाही आणि पुढचं प्रारब्ध उत्पन्न झालंच तरी ते तोडायची जबाबदारी त्याची असेल.

>>>ते तर भोगायचेच आहेत पण त्याचा दाह होणार नाही आणि पुढचं प्रारब्ध उत्पन्न झालंच तरी ते तोडायची जबाबदारी त्याची असेल

म्हणजे भोगायला लागणारच का? भोगताना 'दाह' होईल की नाही हा वेगळा प्रश्न आहे.:)

अश्विनी,

>>>मी म्हणजे माझा आत्मा हा त्याचाच एक अंश आहे ही जाणीव असणे आवश्यक आहे. तो मधे तेव्हाच पडतो. तेव्हाच देह हे केवळ माझे माध्यम ठरते. प्रारब्ध त्याच्या हवाली केले की देहाच्या माध्यमातून घडणारे व्यवहार देखिल त्याच्या अखत्यारीत येतात.

'मी म्हणजे देह' ते 'मी म्हणजे आत्मा' हा जाणीव प्रवास कसा करायचा?केंव्हा करायचा? कारण आपण सांगितल्यानुसार त्यानंतरच परमेश्वर मध्ये पडतो. त्याच्याअगोदर नाही..मग हा प्रवास अगोदर पहायला लागेल. आणि तो 'जर' मधे नाहीच आला तर आपण सांगितल्याप्रमाणे 'प्रारब्ध' त्याच्या हवाली करता येणार नाही...मग पूढच 'जर-तर' सगळच वाया जाईल.:)

अश्विनी,

>>>जे ऑलरेडी उद्योग करुन ठेवलेले असतात या किंवा गेल्या जन्मात ते निस्तरायला हवेतच ना?

'ऑलरेडी' करून ठेवलेले उद्योग म्हंटले की 'भूतकाळ' आला... आणि 'या' जन्मातील उद्योग म्हंटले 'वर्तमानकाळ' आला...आणि ते भोगण्याकरिता म्हटल्यावर नवीन देह आला की नाही? मग दोन्ही 'काळ' एकच कसे असतील?:)

संचित कर्म, क्रियमाण कर्म आणि प्रारब्ध कर्म योग्य त्यावेळीच आणि योग्य ती परिस्थिती आल्यावरच भोगलं जातं. गेल्या जन्मातील कर्मफल तेव्हा तशी situation तयार नसेल तर पुढच्या जन्मासाठी carry forward होतं. त्यामुळे एकदा त्याच्या हवाली सर्व केलं की काय पेंडिंग असेल ते याच जन्मी भोगून मोकळं व्हायचं आणि नविन निर्माण होणार नाही याची काळजी तो घेईलच.

अश्विनी,:)

>>>संचित कर्म, क्रियमाण कर्म आणि प्रारब्ध कर्म योग्य त्यावेळीच आणि योग्य ती परिस्थिती आल्यावरच भोगलं जातं. गेल्या जन्मातील कर्मफल तेव्हा तशी situation तयार नसेल तर पुढच्या जन्मासाठी carry forward होतं. त्यामुळे एकदा त्याच्या हवाली सर्व केलं की काय पेंडिंग असेल ते याच जन्मी भोगून मोकळं व्हायचं आणि नविन निर्माण होणार नाही याची काळजी तो घेईलच.

जेव्हा जूना देह पडलेला असतो व अजून नवीन 'देह' मिळालेला नसतो, आणि अजूनही 'भोगायचे' बरेच पेंडीग असते.. अशा स्थितीत सगळ जे पेंडीग असते, ते म्हणजे सगळेच 'संचितकर्म' असते..असे नाही काय?:)

मग जी काय 'भेळमिसळ'(पुण्य-पाप) संचितकर्मात असते.. त्यातील काही भाग भोगण्यासाठी बाजूला काढला जातो. हा जो बाजूला काढला जातो त्याच्यानुसारच नवीन 'देह' मिळतो..त्यालाच 'प्रारब्ध' म्हणतात. पण हे बाजूला काढूनही अजूनही शिलकीत असते ते संचित पुढे भोगण्यासाठी 'वाट' पहात असते. (भोगणे म्हणजे तसे शरिर आणि त्याचे सुख-दु:ख मिळणे होय)

हे जे चांगल-वाईट भोगण्यासाठी बाजूला काढलेले 'प्रारब्ध' असते..त्यात..
१) जर 'पुण्याचा' भाग अधिक असेल तर 'देव' शरिर मिळते,
२) जर 'पापांशाच' अधिक्य असेल मानव सोडून इतर 'देह' मिळतात,

३) जर 'पुण्य आणि पाप' सम असेल तर 'मानव' शरिर मिळते.

हे सम असण दुर्लभ आहे म्हणूनच हे 'मनुष्य' शरिर ही दुर्लभ आहे.

आणि हे मनुष्यशरिर मिळाल्यानंतर जे 'मी' कर्ता अशा भावनेने अजून नवीन कर्म या जन्मात तयार होत त्याला 'क्रियमाण' म्हणतात.. हे परत जुन्या राहीलेल्या 'संचिता' मध्ये जावून अधिक होते.

धन्यवाद अश्विनी..तुम्हाला बराच त्रास झाला.:)

गौरी,

तुमच्या ...

जेव्हा ८४ लक्ष योनींनंतर मनुष्याचा जन्म मिळतो, तेव्हा त्याच्या संचित, प्रारब्ध कर्मांची पाटी कोरी असते का? कारण बाकी योनीत कर्मांची उत्पत्तीच होत नाहि.

या प्रश्नाच उत्तर दिलय.:)

वरचं सगळं डिस्कशन पटलं तरी मनुष्य नव्हता तेंव्हा कर्माचा निचरा कसा होत होता , हा प्रश्न अनुत्तरीतच रहातो.... आजदेखील संपूर्ण ब्रह्मांडाचा विचार केला तर मनुष्य हा खूप क्षुल्लक घटक आहे.... सगळ्या सृष्टीचा पाप पुण्याची चोपडी या माणसांच्याच हातात कशी? हेही समजत नाही..

हिंदु धर्मातले देव आज माणसागत दिसतात. मुंडकं, हात, पाय, सगळे अवयव माणसागत असतात.... अजून हजारो वर्षानी उत्क्रांतीने माणसाचा शेप बदलला, तर देवांचं काय होणार? आणि सध्या आस्तित्वात असणारी मनुष्यजातही समजा तेंव्हा शिल्लक राहिली, तर ती उत्क्रांत माणसं या माणसाना किडा मुंगीत जमा धरणार का? Proud

आणि हिरवे, पांढरे, निळे या धर्मातल्या लोकांचं काय? त्यांच्या देवाना आकारच नाहीत...

मीनः स्नानरतः फणी पवनभुक् मेषस्तु पर्णाशने नीराशी खलु चातकः प्रतिदिनं शेते बिले मूषकः ।
भस्मोद्धूलनतत्परो ननु खरो ध्यानाधिरूढो बकः सर्वे किं न हि यान्ति मोक्षपदवीं भक्तिप्रधानं तपः ॥

मासळी सतत पाण्यात स्नान करते, साप वायू भक्षण करून राहतो, बकरा पाने खाऊन राहतो, चातक तहानलेला राहतो, उंदिर बिळात राहतो, गाढव अंगाला राख फासतो, बगळा डोळे बंद करून बसतो म्हणजेच ध्यान करतो; परंतु ह्यांच्यातील कोणालाही 'तप' करूनही मोक्ष मिळत नाही. कारण तपात भक्ति प्रधान आहे.

हे नेटवर मिळाले.... अर्थात ते एक रुपकात्मक सुभाषित आहे.. पण सगळं जंगलबुक त्यात गोळा झालं आहे.... Happy

एकंदर, माणूस जे काही करतो, ते 'तप' आणि उरलेली सगळी करतात ते म्हणजे 'ताप' .. ही कल्पना काही मला पटत नाही... माशानं माशासारखं राहिलं तर त्याचं आयुष्य सफल झालं.. आंब्याच्या झाडानं आंब्याच्या झाडागत राहिलं की त्याचंही आयुष्य सफल झालं... प्रश्न फक्त माणसाचाच आहे.. माणूस माणसागत राहतो का???? अरे मानसा मानसा कधी व्हशील रे मानूस..? हाच तर प्रश्न आहे... सगळ्या निसर्गातलं माणूस हे एकमेव प्रॉब्लेम चाइल्ड आहे... ( आणि मायबोलीवरचं प्रॉब्लेम चाइल्ड म्हणजे मी.. Proud कायम किरकिरत असतं.. )

माणूस जे करु शकतो, त्यानुसार इतरांच्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करायची आणि इतराना तसं येत नाही म्हणून त्याना नापास करायचं.. हा अधिकार माणसाला कुणी बरं दिला?

अश्विनी,
शतशः धन्यवाद, गुरु आणि सद्गगुरुबद्द्ल विस्ताराने सांगितल्याबद्द्ल.
आणि खरच अस वाटत का की सावट हे सगळे मला सांगत होते? ते सगळ्यांनाच सांगत होते. अग, हाडाचे शिक्षक आहेत असे आपणच म्हणतो ना? काही शिक्षक सरळ उत्तर देतात आणि काही उत्तरापर्यंत घेऊन जातात. सावट, बरोबर ना? Happy

सावट,
प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्द्ल खुप आभार!
आमच्या मनात उठलेले विकल्प म्हणजे मुख्य रस्त्याला फुटलेल्या पायवाटा आहेत. त्या पायवाटांवर जास्त रेंगाळु न देता सर्वांना एकत्र करुन पुनः मुख्य रस्त्याला लावण्याचे कार्य आपण करताय, त्याबद्द्ल विशेष आभार!

अगं त्यांच्या डोक्यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर अराइव्ह होणं आहे हे मला त्यांनी तुझा उल्लेख केला तेव्हा कळलं. अर्थात या बाफवरील सगळ्यांनाच आपण सगळे काहीतरी लिहित असतो, कुणा पर्टिक्युलर एकाला नाही Happy

अश्विनी, Happy
तुम्हालाही _/\_!

गौरी,

धन्यवाद! तुम्ही समजत आहात तसे काही नाही..खर तर स्वतःलाच तपासणे चालू आहे.:) आपली 'उत्तरे' ही
ज्याची त्याने निवडून घ्यायची असतात.

आपल्या मनात विकल्प आहेत, म्हंटल्यावर सर्वप्रथम आपल्याच 'मनाकडे' आपल लक्ष गेले पाहीजे... हे न सांगताही कळायला हवे....म्हणजेच जे काही आपले प्रश्न-विकल्प आहेत त्याची 'उत्तरे' आपल्याजवळच आहेत. आपले चुकते कोठे..तर त्या प्रश्नांची उत्तरे आपण 'मी' म्हणजे स्वतःकडे न पहाता...इतरात किंवा सभोवती शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा. आणि तिथे उत्तरे नसल्यामूळे आपली पुर्ण फसगत होते आणि विकल्प वाढतच जातात... म्हणून तर परमार्थात पहिला 'बोध' हा 'अहं ब्रह्मास्मि' म्हणजे 'मी' दुसरे काही नसून स्वतः 'ब्रह्म' च आहे, असाच आहे, अर्थात 'मी' वरच अगोदर लक्ष केंद्रीत करणे जरूरी आहे. अन्यथा आपल्या मनातील 'गोंधळ' भेसूर रुप धारण करतो.:)

मानवी मन तपशिलात फारच रमते....
आंबे खायचे सोडून..झाडे मोजत बसते!
Happy

हे अगदी खरे आहे!

आपण 'अज्ञानी' आहोत..म्हणजे सगळे आत्मज्ञानी संत जे 'सार'(आंबा)सांगून गेले ते खरे आहे.. आणि आपल्याला ते कळत नाही... त्याकरीता आपण, त्यांनी सांगितलेल्या मळलेल्या मार्गाने गेलो की 'गंतव्या' पर्यंत पोहचू..अशी एकदा मनाची तयारी झाली की पुढचा प्रवाच चालू होतोच... आणि प्रवास करताना 'अनुभव' ..मैलाचे दगड, हे येतातच...आणि आपला मार्ग बरोबरच आहे याची खात्री देतात..आणि मग परत नव्या दमाने 'पुढचा' प्रवास ही चालू होतो.:) प्रवास जर केलाच नाही..तर 'अनुभव' येणारच नाही..आणि मग श्रीभगवंत निराकार आहेत की साकार... निर्गुण आहेत की सगुण.. हे काही आपणास कळणार नाही... हे मात्र नक्की!:)

म्हणूनच हा प्रवास कसा करायचा? हे जाणणे जरूरी आहे.:)

जा'मोहन्'प्या,
धन्यवाद!
>>>वरचं सगळं डिस्कशन पटलं तरी मनुष्य नव्हता तेंव्हा कर्माचा निचरा कसा होत होता , हा प्रश्न अनुत्तरीतच रहातो.... आजदेखील संपूर्ण ब्रह्मांडाचा विचार केला तर मनुष्य हा खूप क्षुल्लक घटक आहे.... सगळ्या सृष्टीचा पाप पुण्याची चोपडी या माणसांच्याच हातात कशी? हेही समजत नाही..

जे डीस्कशन पटले..ते काय व कसे? हे कृपया सांगाल का?:)

या विश्वाच्या ..मती गूंग करणार्‍या.. प्रचंड विस्ताराकडे पाहून आपण 'थक्क' होतो..आणि या महाप्रचंड विस्तारात आपल... नगण्य..जणू नसलेलच... .. 'स्वतंत्र' अस्तित्व शोधणारा माणूस पाहिला की, अजूनच 'थक्क' व्हायला होते!

डोळ्यासमोर रोज किडामुंगी सारखी माणसे मरताना पाहिली..तरिही हा माणूस.. जणू आपण कधीही न मरण्याचा अमरपट्टा घेऊन आलोय अशा थाटात वावरताना पाहील की, हसाव की रडाव कळत नाही!:)...असो!

मनुष्य नव्हता तेंव्हा कर्माचा निचरा कसा होत होता ? याचे उत्तर अजून आपल्याला मिळालेच नाही..ते 'माधव' यांना मिळाले आहे का? हे त्यांचे 'उत्तर' आल्यावरच कळेल.:)

हसरी,:)

तुमचा प्रश्न चुकीचा नाही..तर अतिमहत्वाचा आहे..म्हणूनच 'तो'आपला होकार गृहीत धरून ( कृपया क्षमा असावी!) तो इथे 'पेस्ट' करत आहे.

>>>आपल्याला ह्या जन्माची कर्म फळे ह्या जन्मातच नाही फेडता येत? पुढचा जन्म पुर्ण नविन नाही का मिळत?
धन्यवाद!

सावट क्षमा कशाला मागता Happy मला काही प्रश्न पडतात ते बरोबर आहेत की नाही ते मलाच माहित नसते म्हणुन मि ते विपुत विचारते Happy ते बरोबर असल्यास ईथे देउ शकता

प.पू. श्रीज्ञानेश्वरीची सुरुवात खालील प्रमाणे आहे...

श्रीज्ञानेश्वरी..अध्याय पहिला.. श्रीअर्जून विषादयोग!

ॐ नमो जी आद्या| वेद प्रतिपाद्या| जय जय स्वसंवेद्या| आत्मरूपा ||१||
देवा तूंचि गणेशु| सकलार्थमतिप्रकाशु| म्हणे निवृत्तिदासु| अवधारिजो जी ||२||

हें शब्दब्रह्म अशेष| तेचि मूर्ति सुवेष| जेथ वर्णवपु निर्दोष| मिरवत असे ||३||
स्मृति तेचि अवयव| देखा आंगीक भाव| तेथ लावण्याची ठेव| अर्थशोभा ||४||
अष्टादश पुराणें| तींचि मणिभूषणें| पदपद्धति खेवणें| प्रमेयरत्नांचीं ||५||
पदबंध नागर| तेंचि रंगाथिले अंबर| जेथ साहित्य वाणें सपूर| उजाळाचें ||६||
देखा काव्य नाटका| जे निर्धारितां सकौतुका| त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका| अर्थध्वनि ||७||
नाना प्रमेयांची परी| निपुणपणें पाहतां कुसरी| दिसती उचित पदें माझारीं| रत्नें भलीं ||८||

तेथ व्यासादिकांच्या मतीं| तेचि मेखळा मिरवती| चोखाळपणें झळकती| पल्लवसडका ||९||
देखा षड्दर्शनें म्हणिपती| तेची भुजांची आकृति| म्हणौनि विसंवादे धरिती| आयुधें हातीं ||१०||

तरी तर्कु तोचि फरशु| नीतिभेदु अंकुशु| वेदांतु तो महारसु| मोदकु मिरवे ||११||
एके हातीं दंतु| जो स्वभावता खंडितु| तो बौद्धमतसंकेतु| वार्तिकांचा ||१२||
मग सहजें सत्कारवादु| तो पद्मकरु वरदु| धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु| अभयहस्तु ||१३||
देखा विवेकवंतु सुविमळु| तोचि शुंडादंडु सरळु| जेथ परमानंदु केवळु| महासुखाचा ||१४||
तरी संवादु तोचि दशनु| जो समता शुभ्रवर्णु| देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु| विघ्नराजु ||१५||
मज अवगमलिया दोनी| मिमांसा श्रवणस्थानीं| बोधमदामृत मुनी| अली सेविती ||१६||
प्रमेयप्रवाल सुप्रभ| द्वैताद्वैत तेचि निकुंभ| सरिसेपणें एकवटत इभ- | मस्तकावरी ||१७||
उपरि दशोपनिषदें| जियें उदारें ज्ञानमकरंदे| तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें| शोभती भलीं ||१८||

अकार चरण युगल| उकार उदर विशाल| मकार महामंडल| मस्तकाकारें ||१९||
हे तीन्ही एकवटले| तेथ शब्दब्रह्म कवळलें| तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें| आदिबीज ||२०||

सर्वांना वंदनीय असणार्‍या श्रीभगवान गणेशांच 'मानव' रुपातील वर्णन प.पू.श्रीसद्गूरू आत्मज्ञानरुपी श्री ज्ञानेश्वरमाउली करत आहेत..कृपया आपले 'पुर्ण-अवधान' असावे ही नम्र विनंती..

सुरुवात चुकवू नका..आणि शेवट विसरू नका, या उक्तीप्रमाणे शेवट पाहिला तर..

अकार चरण युगल| उकार उदर विशाल| मकार महामंडल| मस्तकाकारें ||१९||
हे तीन्ही एकवटले| तेथ शब्दब्रह्म कवळलें| तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें| आदिबीज ||२०||

जर शब्दातले 'ब्रह्म' कवळायचे असेल...जर त्या आदिबीजाला आदराने नमस्कार घडायचा असेल..तर अगोदर 'श्रीगुरुकृपा' झाली पाहीजे. हे सत्य श्रीमहाराजांनी सुरुवातीलाच अगदि ठळकपणे सांगूंन ठेवले आहे. Happy

धन्यवाद!

(हसरी..आपण श्रीगणपतींच्या उपासनेबद्द्ल सुरुवातीला विचारल होतत...त्यांचे खरे वरील रुप पहाल..तर दंग होऊन जाल.:))

सावट, अश्विनी
धन्यवाद!
लिहिताना बर्‍याच वेळा चुकीचे लिहिले जाते, कृपया गैरसमज करुन घेऊ नका किंवा राग मानु नका. आपण लिहिताय त्यामुळे खुप चांगल्या गोष्टी कळत आहेत, ज्ञानात भर पडत आहे, असेच लिहित राहा.

बाप रे, इथे बरेच विचारमंथन झाले आहे. मझी काही चिल्लर घालतो त्यात. Happy

ह्या विश्वात जे काही आहे ते सगळे तीन मूळ गोष्टींचे मीळून बनले आहे - १.पदार्थ २.उर्जा आणि ३.जाणिव (consciousness). आज मी ज्या पातळीवर आहे तेथून ह्या तीन्ही गोष्टी मला वेगळ्या भासतात कदाचीत त्या एकच असू शकतील आणि भीन्न असल्या तर त्यांचे एकमेकांशी काय नाते आहे ते मला आज माहीत नाही. यापैकी पदार्थ आणि उर्जा यावर माया आधारलेली आहे. आज आपण ज्याला विज्ञान म्हणतो ते देखील याच दोन गोष्टींचा प्रामुख्याने अभ्यास (?) करते. तिसरी गोष्ट विज्ञानमान्य नाही. विज्ञानाकरता जाणीव म्हणजे मेंदूत उमटणारे विद्युतचुंबकीय तरंग.

विज्ञान पदार्थ आणि उर्जा यांचा जो अभ्यास करते तो पण त्यांच्याकडे 'object' या दृष्टीने बघूनच. पण त्यातून त्यांचे खरे ज्ञान कसे होणार? कारण object चा अभ्यास आपल्याला फक्त त्याच्या attributes ची माहिती देते. म्हणजे आपण जेंव्हा सोनचाफा (फूल) म्हणतो तेम्व्हा आपल्याला त्याचा तो सोनेरी पिवळा रंग, त्याचा सुंदर गंध अशी attributes जाणवतात पण ती attributes म्हणजे खरा सोनचाफा आहे का? तर नाही. सोनचाफ्याचे फूल पाकळ्या, देठ, केसर यांचे बनले असते. या सगळ्यांचा एकत्रीत परीणाम म्हणजे सोनचाफ्याचे फूल ! मग पून्हा त्या उपभागांचा - म्हणजे त्यांच्या attributes चा - अभ्यास आला. जसजसे खोल जाउ तसतशी ही attributes कमी होत जातात म्हणजे आण्विक काणांच्या पातळीवर वस्तुमान आणि भार अशी मोजकीच attributes उरतात. म्हणजे समजा आपण अशा मूलकणापर्यंत (मूल 'कण'च आहे हेही मला माहित नाही तरीही) पोहचलो की तो अविभाजनीय आहे तर त्याला एकही attribute नसणार, कारण जर त्याला attribute असले तर ते attribute नसलेले कण तो कसे बनवू शकेल? म्हणजे समजा तो मूलकण लाल रंगाचा असला तर लाल रंगाचे नसलेले कण तो कसे बनवू शकेल? आणि जर का त्याला attribute नसले तर आपल्याला (आणि विज्ञानाला) त्याचे आकलन कसे होणार?

तर ही जी attributes आहेत तीच मायेची मुख्य आयुधं - नाम आणि रुप! ही attributes च प्रत्येक कणाला दुसर्‍यापासून वेगळी अशी ओळख देतात पण खरच प्रत्येक कण दुसर्‍या कणापेक्षा वेगळा असतो का? कसा असेल कारण प्रत्येक कण हा शेवटी एकाच प्रकारच्या मूलकणापासून बनलेला असतो.

'जाणिव' म्हणजे काय याचा शोध म्हणजेच स्वतःचा शोध कारण 'मी' हिच एक जाणीव आहे. जोपर्यंत मला जाणीव म्हणजे काय हे नीटपणे कळत नाही तोपर्यंत जड वस्तूत जाणीव नसते हे म्हणणे धाडसाचे होईल आणि माणसात जाणीव सगळ्यात प्रगत असते हे म्हणणेही. मग आपली शास्त्रे मानवजन्माची महती का गात असतात? माझ्यामते याला सर्वसामान्य माणसाचे अज्ञान आणि मनुष्यस्वभाव कारणीभूत असावा.

सर्वसामान्य माणसाचे अज्ञान: आता जिथे मला 'मी' म्हणजे काय हेच कळत नाही तिथे दुसरा माणुस कसा कळणार? दुसरा माणुस कळत नाही तिथे मानवेतर वस्तू कळण्याची शक्यता नाहीच.

मनुष्यस्वभाव: आपला स्वभाव हा प्रत्येक गोष्ट पडताळून बघण्याचा असतो. जेंव्हा पडताळा येत नाही तेंव्हा आपण त्यावर सहजासहजी विश्वास ठेवत नाही. मग जर वेदांनी 'सर्व वस्तूंनी आपल्या मनावर बुध्हीचा अंकुश ठेवावा' असे म्हटले आसते तर आपण म्हटले असते की जड वस्तूंना थोडेच मन आणि बुध्दी असते? वेद काहीतरीच सांगत आहेत. म्हणजे आत्ता माझा जो थोडाफार विश्वास आहे वेदांवर तो पण राहिला नसता मग तसे आचरण तर दूरच राहिले असते. म्हणून शास्त्रकारांनी मनुष्याला आंजारून गोंजारून त्याचा जन्म श्रेष्ठ ठरवला असावा आणि तो जन्म वाया जाण्याची भिती घालून या जन्मातच साधना सुरु करण्याचे सुचवले असावे. बाकी मलापण माणुस हा प्रॉब्लेम चाईल्डच वाटतो. तो 'प्रगत' आहे - प्र = जास्त, गत = गेलेला!

जास्त लांब गेलेला - कोणापासून? निसर्गापासून? सत्यापासून?

म्हणून शास्त्रकारांनी मनुष्याला आंजारून गोंजारून त्याचा जन्म श्रेष्ठ ठरवला असावा आणि तो जन्म वाया जाण्याची भिती घालून या जन्मातच साधना सुरु करण्याचे सुचवले असावे. बाकी मलापण माणुस हा प्रॉब्लेम चाईल्डच वाटतो. तो 'प्रगत' आहे - प्र = जास्त, गत = गेलेला!

जास्त लांब गेलेला - कोणापासून? निसर्गापासून? सत्यापासून?

बरोबर आहे. अध्यात्मात माणसाला महत्व दिले आहे ते फक्त साधनेपासून लोकांनी दूर जाऊ नये म्हणून..

जोपर्यंत मला जाणीव म्हणजे काय हे नीटपणे कळत नाही तोपर्यंत जड वस्तूत जाणीव नसते हे म्हणणे धाडसाचे होईल
>> बरोबर आहे.. आपल्याला भाजतं - आपण कढीपत्ता फोडणीत घालतो आणि तो तडतडतो - लोखंड तापून लाल होतं: ह्या तिनही गोष्टींचे जर आलेख घेतले तर ते सारख्याच प्रकारचे असतात असं जगदिशचंद्र बोसांनी सिद्ध केल्याचं वाचण्यात आलेलं..

माधव,
धन्यवाद.. छान सांगितले आहे!

'जाणिव' सगळीकडे आहे, हे निर्विवाद असे 'सत्य' आहे!

काही प्रश्न.. Happy

>>>'जाणिव' म्हणजे काय याचा शोध म्हणजेच स्वतःचा शोध कारण 'मी' हिच एक जाणीव आहे. जोपर्यंत मला जाणीव म्हणजे काय हे नीटपणे कळत नाही तोपर्यंत जड वस्तूत जाणीव नसते हे म्हणणे धाडसाचे होईल आणि माणसात जाणीव सगळ्यात प्रगत असते हे म्हणणेही. मग आपली शास्त्रे मानवजन्माची महती का गात असतात? माझ्यामते याला सर्वसामान्य माणसाचे अज्ञान आणि मनुष्यस्वभाव कारणीभूत असावा.

१)मला जाणीव म्हणजे काय हे नीटपणे कळत नाही ..... हे नीटपणे कळण्यासाठी काय करायला पाहीजे?
२)सद-वस्तू, मनुष्य-वस्तू आणि जड-वस्तू यात भेद असतो का? असल्यास तो कोणता?
३)आपली शास्त्रे कोणी लिहली?..असामान्य-सामान्य-सर्वसामान्य हा माणसातला भेद कसा आणि कोणी ओळखायचा?
४)सर्वच सर्वसामान्य माणसाचे 'अज्ञान' सारखे असते का?जर नाही तर या अज्ञानाचे मोजमाप कसे करायचे?
५)सर्वच सर्वसामान्य माणसांचे 'स्वभाव'(मनुष्य) सारखे असतात का? जर नाही तर हा स्वभाव कशावर ठरतो?

>>>म्हणून शास्त्रकारांनी मनुष्याला आंजारून गोंजारून त्याचा जन्म श्रेष्ठ ठरवला असावा आणि तो जन्म वाया जाण्याची भिती घालून या जन्मातच साधना सुरु करण्याचे सुचवले असावे.

१)शास्रकार माणूसच होते का?
२)जन्म वाया जाणे म्हणजे काय? 'साधना' सुरू केल्याने वाया जाणे टळते काय? जर हो तर ज्यांचे हे वाया जाणे टळले आहे..त्यांना काय म्हणायचे? ते माणूसच असतात काय?
३)जन्म वाया जाईल अशी भिती सर्वसामान्य(?) मनुष्य प्राण्याला घालून.. शास्त्रकारांना काय मिळवायचे आहे?
४)आंजारून-गोंजारून-नुसते ठरवून जे कनिष्ठ आहे...ते श्रेष्ठ होते का? जर हो, तर जे अगोदरच ओंजारून-गोंजारून 'श्रेष्ठ' या पदविला पोहचले आहेत.. त्यांना.. 'परत 'साधना' करा' हे सांगण्यामागचा उद्देश तो काय? आणि अशा श्रेष्ठांच्या मनात भिती कशाची असते?

>>>बाकी मलापण माणुस हा प्रॉब्लेम चाईल्डच वाटतो. तो 'प्रगत' आहे - प्र = जास्त, गत = गेलेला!
जास्त लांब गेलेला - कोणापासून? निसर्गापासून? सत्यापासून?

लांब आणि जवळ, हे कसे ठरवायचे? ही मोजदाद कोठून सुरूवात करायची? आणि शेवट कसा ओळखायचा?

धन्यवाद!

जा'मोहन'प्या,
तुमच्या उत्तराची वाट पहात आहोत.:)

>>>सगळ्या सृष्टीचा पाप पुण्याची चोपडी या माणसांच्याच हातात कशी?
पाप-पुण्य हे ज्याच त्यालाच सांभाळता नाकी नऊ येणारा.. मनुष्य नावाचा शुल्लक प्राणी ,सृष्टीच पाप-पुण्य कस काय सांभाळू शकेल?:)

>>>वरचं सगळं डिस्कशन पटलं तरी मनुष्य नव्हता तेंव्हा कर्माचा निचरा कसा होत होता , हा प्रश्न अनुत्तरीतच रहातो....

या विषयी अजून थोडस पुढ पाहू..

सृष्टी मध्ये जे जीव आहेत..त्यांना 'पिंड' अशी सज्ञा आहे. 'जे पिंडी,ते ब्रह्मांडी' किंवा 'जे ब्रह्मांडी, ते पिंडी' असे शास्त्रवचन आहे. म्हणजे आपण जर 'पिंडाचा' अभ्यास केला तर अनायासे तोच अभ्यास 'ब्रह्मांडाला' ही तसाच लागू होतो.

पिंडाचा..म्हणजे आपल्या किंवा कोणत्याही शरीराचा अभ्यास केला तर असे आढळते की या शरीराला 'सुरूवात,मध्य आणि अतं' अशा तीन ठळक अवस्था आहेत. जर 'मी' म्हणजे कोण हे अंतरंग अनुभूतीचे ज्ञान त्या पिंडाला झाले नाही आणि त्या पिंडाचा अंत झाला.. तर स्वस्वरुपाविषयी 'अज्ञान' अजूनही असल्यामूळे.. परत सुरुवात करणे अटळ असते. म्हणजेच हे चक्र चालूच रहाते.

हाच 'न्याय' ब्रह्मांडालाही आहे तसाच लागू होतो...म्हणजेच सर्व 'अज्ञानी' जीव हे ब्रह्मांडाच्या अंताच्या वेळी एका बीजाप्रमाणे सूक्ष्म होतात ..परत योग्य वेळी... त्याच, पण नव्या जन्माच्या ब्रह्मांडात जन्म घेतात.. आणि हे चक्र परत चालू रहाते.

जसे वडाच्या छोट्याश्या 'बीजा' मधूनच, योग्य वेळ, म्हणजेच तसे वातावरण मिळाल्यानंतर प्रचंड महावृक्षाचा विस्तार घडतो आणि नवीन बीजातून परत नवीन वृक्ष.. अशा प्रकारे हा विस्तार पुन्हा प्रसवतो.... अंताकडे!:)

जा'मोहन'प्या,

>>>ऋग्वेदात एक ऋचा आहे... हिरण्यगर्भ सूक्त... याचा अर्थ खूप गहन आहे...

हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत ।
स दाधार पृथ्वीं ध्यामुतेमां कस्मै देवायहविषा विधेम ॥

यातील हिरण्यगर्भाविषयी थोडस पाहूयात...

प्रत्येक पिंडाला शास्त्रीय दृष्टीकोणातून पाहीले तर त्याचे चार भाग(वेगळी शरीरे) आणि त्यांच्या अवस्था खालील प्रमाणे असतात
१)स्थूलशरीर-जागृत,
२)सूक्ष्म(लिंग)शरीर-स्वप्न,
३)कारणशरीर- सुषुप्ती आणि
४)महाकारणशरीर-तुर्या

आणि 'पिंडी ते ब्रंह्मांडी' या न्यायाने, प्रत्येक ब्रह्मांडाचेही चार देह असतात....

त्यातील दुसर्‍या म्हणजेच ब्रह्मांडाच्या 'लिंग' देहालाच... हिरण्यगर्भ म्हणतात. 'हिरण्य' म्हणजे स्वप्न!:)

Pages