प्रार्थना

Submitted by सिद्धार्थ राजहंस on 1 February, 2010 - 02:56

देवा आज मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलणार आहे. मी, माझे आयुष्य, त्यातील शक्यता, माझी स्वप्ने, माझे विचार, माझ्यातील दडुन बसलेली भीती, माझे अस्तित्व आणि मी जे जे काही करु शकतो ते सगळे काही.
देवा...
कुठुन सुरुवात करु.... तुझ्याशी बोलायचे म्हणजे काहीतरी मागण्यापसुनच सुरुवात करतो...
अ...ह....हा!!
देवा या हिवाळ्यात रोज सकाळी माझी गाडी वेळेत सुरु होऊदे.
देवा मंदीनंतर मला चांगली नोकरी किंवा पगारवाढ मिळुदे.
देवा सगळ्यांचे कल्याण होऊदे.
आणि... खरं काहीतरी सांगू का???
म्हणजे....
देवा मी फटाके वाजवत असताना बाकीचे जगही फटाके वाजवु देत, म्हणजे मला त्रास होणार नाही.
देवा माझ्या घराजवळ एक मोठ्ठा मॉल असुदे, तो सर्व बाजुंनी सारखाच दिसुदे, मी जगात कुठेही गेलो तरीही.
देवा मी जगात जिथे जाईन तिथे इन्टरनेट असुदे, आणि मी डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करताच बातम्या, ऑरकुट, फेसबुकची आणि बाकीची सर्व पाने रिफ्रेश होऊदे.
देवा अजुन खरे बोलु का???
देवा माझी मुले रोज संध्याकाळी शुभंकरोती म्हणुनसुध्दा त्यांचे आणि माझे भले का होत नाही. मी पण शुभंकरोती म्हणायला हवी का??
देवा रहदारी व गर्दीने बोथट झालेल्या माझ्या संवेदना परत तिक्ष्ण कर.
देवा माझ्या मुलांना ’मॉल संस्कृती' सोडुन एखादी संस्कृती असुदे.
देवा हिंदी ही महाराष्ट्राची राष्ट्रभाषा आहे, तू तीचा अपमान सहन करु नको पण जमल्यास मराठीचाही मान राख.
देवा माझ्या मराठीचा उद्धार होवो, माझी मुले कॉन्वेन्टला गेली तरीही.
देवा माझ्या कॉन्वेन्टमधल्या मुलांना तुझ्यातला आणि लॉर्डमधला फरक कळु दे. माझा देव तोच माझ्या मुलांचा देव ना ?
देवा माझ्या समजाला शिस्त लवकरात लवकर लागुदे, नाहीतर मलातरी देशाबाहेर पाठव.
देवा तिकडे गेल्यावर सगळया समस्या संपतात का?
देवा माझ्या समाजातली अंधश्रद्धा दुर व्हावी म्हणुन तू सश्रद्ध भावनेने प्रार्थना कर.
देवा मला कधीकधी खुप प्रश्न पडतात.........मग भीती वाटते.
देवा म्हणुन परवा मी अवकाशशास्त्रावर असाच एक चित्रपट पाहिला. तुला माहीती आहे खुप पुढे गेले आहे विज्ञान! महास्फोटातुन निर्माण झालेले विश्व, १३ मिती, प्रचंड ब्रम्हांड, करोडो अवकाशगंगा आणि सुर्यमालिका, कृष्णविवरे ते अगदी छोट्यातल्या छोट्या कणापर्य़ंत !!! एव्हडेच नाही तर या सगळ्यांचे पुरावे पण !!! आणि पृथ्वीसदृश ग्रहावर माणसारख्या प्राण्यांचे अस्तित्वसुध्दा म्हणजे त्यांचापण एक दे...
देवा मला जास्त विचार करायला लावु नको माझी तुझ्यावरची श्रद्धा तशीच अबाधित ठेव, म्हणजे काहीही झाले तरीही मी तुझ्याकडेच येईन... आजच्यासारखा..
देवा मी जास्ती विचार नाही करणार, एक अज्ञात शक्ती म्हणुनतरी मी तुला मानणारच आणि तुझ्या आवडीचा नैवेद्य तुला देणारच!
देवा,..तु खरंच माझ एकतोस का???
देवा तुझ्या अस्तित्वाचा एक तरी पुरावा दे... मला चमत्काराची अपेक्षा नाही, साधेच काहीही चालेल ..समोरचे फुल खाली पाडशील ? कोणताही दे .....तो मी मानेन.

देवा मला कशाचीच का ओढ नाही वाटत ?? बायका पोरांची, कामाची, निसर्गाची, संगीताची , खाण्याची? कशाचीच नाही???
देवा तु ऎकतोयस ना रे.......
देवा जगण्यास कारण व्हावे असे एखादे वेड मला दे.
देवा, ... तुला माझ्या अस्तित्वाच्या दंतकथेविषयी माहीती आहे का???
देवा, तुला आम्हाला निर्माण करुन झाल्यावर कसे वाटले?? मला चॉकलेट चीज सॅडविच खाल्यावर वाटले तसे?
देवा माझ्या जगण्याला काहीतरी अर्थ हवाच का?? तो दुसऱ्यांनीच द्यायला हवा का ??
देवा, दुःखाचे परिमाण काय ?? दुसऱ्याच्या सुखाने माझे दुःख वाढते का???
देवा खरच ऎकतोयस ना रे....
देवा मी म्हातारा झाल्यावर मला काय वाटेल ?? म्हाताऱ्या माणसांना तरुणपणी काय वाटते ? आयुष्याविषयी???
देवा तू माझ्या जगण्याला अर्थ देशील का???
देवा, तू आहेस का तिकडे???
देवा.....
हॅलो, कोणी आहे का तिकडे??
हॅलो......
देवा...........

गुलमोहर: 

आवडलं!
देवा मला जास्त विचार करायला लावु नको माझी तुझ्यावरची श्राद्धा तशीच अबाधित ठेव, म्हणजे काहीही झाले तरीही मी तुझ्याकडेच येईन आजच्यासरखा..>>>>> Happy

Wow!Very unique and thought provoking!
ललित मधे टाका हे.. तिथे जास्त सुट होईल.

ह्म्म्म.. गोंधळलोय मी.. उपहास आहे का प्रामाणिक प्रार्थना आहे हेच कळेनासे झालेय..

>>. माझा देव तोच माझ्या मुलांचा देव ना ? >> एखादेच वाक्य उचलून चिरफाड करणे वाईट, पण ह्या वाक्याईतके घातक वाक्य आणि समाजमान्य प्रथा जगात दुसरी नाही..

उपहास आहे का प्रामाणिक प्रार्थना आहे हेच कळेनासे झालेय >> हो मलाही या बाबतीत गोंधळायला झाले. पण तरी मस्त आहे. आवडले!

जे काही लिहीलय ते मस्त लिहीलय, आवडले.
टण्या म्हणतो तस कळले नाही उपहास की प्रामाणिक, मला वाटत ते दोन्हीच मिश्रण आहे.

अप्रतिम.....सुरेख! जमल आहे मित्रा...प्रत्येक प्रार्थना आणि त्यामागचा प्रश्न आणि नकळत मिळणारे उत्तर सुद्धा....सगळ्यात आवडलेली प्रार्थना म्ह्ननजे
देवा, ...तुला माझ्या अस्तित्वाच्या दंतकथेविषयी माहीती आहे का???
दिवा का लावायचा? देव म्हणजे काय? पासुन ते देव अमुर्त आहे तर मुर्ती का? नैवेद्य का? देव मुर्त तर so called विश्वाच्या कणाकणात का? असले प्रश्न विचारल्याबद्दल खाल्लेले धपाटे आठवत आहेत.देवाने मनुष्याला घडवले ही मनुष्याच्या अस्तित्त्वाची दंतकथा आणि सरतेशेवटी देव हीच दंतकथा असेल तर माझे अस्तित्त्वच एक दंतकथा होत नाही का? माझ्या अस्तित्त्वावर उठलेला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.

@चिंगी ,तृष्णा ,रैना,आशूडी,अजय जवादे ,आऊटडोअर्स >> प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद !!!!!

@नानबा >> प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
ललित मधे टाका हे.. तिथे जास्त सुट होईल. >> मी जे लिहीले ते पद्य नाही. आणि असले "डोक्याला ताप" लिखाण ललित असु शकत नाही अशी एक माझी समजुत आहे Happy . त्यामुळे कथा विभागात पोष्टले.

@suja02 >> Happy

@टण्या, HH,रूनी पॉटर >> माझ्या मते प्रामाणिकपणे प्रार्थना करणार्‍या लोकांना एव्हडे प्रश्न पडत नाहीत. कारण त्यांच्या मते त्यांच्या सर्व प्रश्नांचे समाधान प्रार्थना करुन होते. त्यामुळे प्रार्थना करणे व प्रश्न पडणे यातच मुळात एक विसंगती आहे, त्यामुळे हे लिखाण उपहासात्मक झाले असावे. तसेच साधारण पणे लोक देवाला जसे गरजेनुसार गिर्‍हाईक करतात आणि विसंगतीपुर्ण मागण्या देवाकडे करतात यातपण एक उपहास आहेच.

@टण्या >> माझा देव तोच माझ्या मुलांचा देव ना ? >> एखादेच वाक्य उचलून चिरफाड करणे वाईट, पण ह्या वाक्याईतके घातक वाक्य आणि समाजमान्य प्रथा जगात दुसरी नाही.. >> अगदी बरोबर, तुमच्याशी पुर्णपणे सहमत.

@अमृतवल्ली >> मनापासुन प्रतिसाद दिल्याबद्द्ल धन्यवाद!! "अस्तित्वाच्या दंतकथेविषयी" .... कुठेसे वाचले होते कि बौध्द तत्वज्ञानानुसार तुमचे सर्व आयुष्य हेच एक स्वप्न आहे. तुम्ही एका स्वप्नातुन दुसर्‍या स्वप्नात जाता. त्यामुळे कशाबद्द्ल काहीच न वाटणारा यंत्रवत जगणारा माणुस, त्याचे जगणे हि एक दंतकथा होते. म्हणजे लोक म्हणतील तुम्हाला एक गोष्ट सांगतो "एक माणुस होता, आणि तो जिवंत होता बरंका!!!"

नक्की काय हवय ते माहीत नाही, कुठुन मिळवायचय ते ही माहीत नाही... पण एक श्रद्धा आहे, काय आहे ते "तिथे" मागायचय, तिथे सांगयचय...
ही घालमेल आहे, असं मला वाटतं. (त्यामुळे)चांगलं उतरलय...

''देवा माझ्या समाजातली अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून तू सश्रद्ध प्रार्थना कर '' हे लै भारी .

देवा मला कशाचीच का ओढ नाही वाटत ?? बायका पोरांची, कामाची, निसर्गाची, संगीताची , खाण्याची? कशाचीच नाही???
देवा तु ऎकतोयस ना रे.......बापरे! उपहास म्हणायला मन धजत नाही...

उपहास कम प्रामाणिक.. व्हॉटेवर !!! पण आवडलं खरं.. कुठे कुठे आत टोचलं..,"देवा मला कशाचीच का ओढ नाही वाटत ?? बायका पोरांची, कामाची, निसर्गाची, संगीताची , खाण्याची? कशाचीच नाही???' ..देवा कोणावर अशी पाळी येऊ देऊ नकोस रे!!!

मेघवेड्या कृपया लिहित राहा ..... खूप जास्त आवडता आम्हाला तुझा लिखाण !!!!!!!!!!
मायबाप सरकार पण लई भारी होतं!!!!!!!!!....अजून कुठे काही लिहिला असेल तर लिंक पाठव ...