बघे

Submitted by आशूडी on 1 February, 2010 - 00:37

गेल्या रविवारी रांजणगावला गेलो होतो. सुटीचा दिवस असल्याने कौटुंबिक गर्दी बरीच होती. शिवाय अष्टविनायक सहलीतले वयस्कर लोक. दर्शनासाठी असलेल्या रांगेचे जवळपास चार पदर झाले होते. रांगेत उभं राहून ऊन लागू नये म्हणून वर शेड टाकलेली होती. पाठीमागच्या भिंतीवर रांजणगावच्या महागणपतीची मूळकथा सुंदर रंगांत चितारलेली होती. त्या चित्राखाली त्याचे वर्णन करणार्‍या दोन ओळी पण होत्या. रांगेत पुढं सरकता सरकता ती पाहून वेळ बरा जात होता. शिवाय करमणूकीसाठी रांगेतल्या लोकांचं निरीक्षण चालू होतंच. अर्ध्या तासात देवळाच्या मंडपाजवळ आल्यावर अचानक एक गाणारा सुरेल आवाज कानी पडला. थोडं पुढं गेल्यावर आवाज अधिक स्पष्ट ऐकू आला. कोणत्याही वाद्यवृंदाशिवायही ते कोणत्यातरी जुन्या मराठी चित्रपटातलं भजन काळजाला भिडत होतं. शोधता शोधता तो गाता गळा सापडला. गाभार्‍यातल्या मूर्तीच्या बरोबर समोर मंडपाबाहेर तो उभा होता. वय साठीच्या आसपास. अंगातले कपडे फाटके नसले तरी थोडेसे मळके. पांढरा शर्ट व पँट. खांद्यावर शबनम. गाता गाता घशाला कोरड पडलेली.
ओलावा येण्यासाठी एकेका ओळीनंतर तो तोंड मिटून लाळ गिळत होता. वर रखरखीत ऊन. तरीही डोळे वर लागलेले. म्हणजे त्याला दिसत नसावं. त्याच्या जवळपासची माणसं गाणं ऐकत होती, चेहर्‍यावर 'व्वा!काय आवाज आहे!' असे भाव होते .. पण ते त्याला दिसणार नव्हते. रांगेतली मुलं मधेच हात सोडून बाहेर पळत होती. त्याच्या आजूबाजूला वावरायला लागली की त्यांचे आईबाप त्यांना खसकन ओढून घेत होते. कुणीतरी मधेच त्याच्या हातात पैसे टेकवत होतं. त्याचे हात पुढे पसरलेले नव्हते. नोट्-नाणी पुढे केली तरी गपकन घ्यायला त्याला कोण , कुठल्या बाजूने पैसे देतंय ते दिसत नव्हतं. ते केविलवाणं दृष्य पाहून मला गलबलून आलं. पुढं सरकत सरकत मी आता त्याच्या जवळ येऊन थांबले. याच्या घरी कोण असेल? याच्या मुलांनी याला हाकलून दिलं असेल की ते ही असेच कुठेतरी.. देवळाबाहेर बसलेल्या कुष्ठरोगी, अपंग यांच्या बाबतीत घरातून हाकलून दिल्याचीच शक्यता जास्त असते. हा इतका व्यवस्थित वाटतो की हे आंधळेपण जन्मापासूनचं नसावं. थोडंफार शिकलेला, कुठेतरी कामही केलेला असा एक समंजस पणाचा भाव त्याच्या चेहर्‍यावर आहे. आंधळेपण आलं तेव्हा त्याचं पर्यवसान अशा प्रकारे होईल असं त्याला वाटलं असेल का? पहिल्यांदा भीक मिळाली तेव्हा त्याला आत्महत्याच करावीशी वाटली नसेल कशावरुन? मग जगण्याची उमेद कुठून आली? घरी बायको आजारी असेल.. माझेच प्रश्न, माझीच उत्तर. थातूरमातूर. कशालाच अर्थ नाही. डोक्यात मात्र नुसतंच अर्थहीन विचार आणि प्रश्नांच थारोळं. आता त्याचं गाणं ऐकू येतंच नव्हतं. फक्त दिसत होतं. दोरीच्या अलीकडची मी आणि पलीकडचा तो. मी काय करु शकणार होते त्याच्यासाठी? तो ज्याच्या दारात उभा आहे , तो समोरुन त्याला पाहत नव्हता का? मग ही असहय्यता का? माझ्या आणि त्याच्या दोघांच्याही नशीबी? ज्याच्या समोर 'सर्वशक्तिमान' 'सुखकर्ता दु:खहर्ता' म्हणून मान झुकवायला आलो तोच जर नुसतं बघत राहण्याशिवाय काही करु शकत नसेल तर 'काहीतरी करायचंय' अशी वांझोटी इच्छा बाळगणारे आपण कोण? नुसतेच प्रश्न. रांग पुढे सरकली. मी त्याच्यापासून पुढे जायला लागले. आणि झटका बसावा तशी खसकन पर्स उघडून हाताला येईल ती नोट त्याच्या हातात सरकवली. ती कितीची असावी हे मी पाहिलं नाही, त्याला दिसलं नाही पण आजूबाजूच्या लोकांच्या विस्फारलेल्या नजरांनी नको तो अंदाज दिलाच. पुढे गेल्यावर मग चांदीच्या पत्र्यावर आरती, सोन्याच्या पत्र्यावर अथर्वशीर्ष त्याखाली देणगीदारांची नावं, फरशीवर फरसबंदी करणार्‍यांची नावं, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सढळ हातानं मदत करण्याचं भाविकांना आवाहन, अभिषेक काऊंटर वगैरे दिसलंच. मला एकाएकी सगळं फोल वाटायला लागलं. मूर्तीसमोर उभी राहिले आणि मनातल्या मनात 'जो जे वांछिल तो ते लाहो' एवढं म्हणून हात जोडले. बाकी काही मनोमनीची देवाणघेवाण नव्हतीच. पोटात एक खूप मोठा खड्डा घेऊन परतले.

काल, पुन्हा सारसबागेत गेलो. इथल्या देवळात गेले की मला नेहमीच शांत वाटत आलं आहे. मूर्तीपासून पायर्‍यांपर्यंत ओघळलेल्या संगमरवरी पांढर्‍या रंगामुळं असेल कदाचित. जिन्यावरच 'चप्पलचोरांपासून सावधान. चप्पल स्टँडवर ठेवा' अशी सूचनेची पाटी. या चप्पल स्टँडचं वैशिष्ट्य म्हणजे इथे काम करणारे अपंग असतात. तरीही तो विनामूल्य आहे. इच्छुकांनी मदतनिधी दानपेटीत जमा करायची सोय आहे. काल पुन्हा रविवार संध्याकाळ. आरतीची साडेसातची वेळ. तुडुंब गर्दी. स्टँडवर काम करणारा मनुष्य एकच. एका हाताचा. एक हात गेलेला. शिवाय बोलण्यात दोष असलेला. त्यामुळे भराभरा बोलता येत नव्हतं, बोललेलं इतरांना समजत नव्हतं. एका हाताने शक्य तितक्या वेगाने तो बिल्ला घेऊन त्यावरचा नंबर पाहून, तो कप्पा शोधून त्यातल्या चपलांची चळत काउंटरवर ठेवत पुन्हा तो बिल्ला त्या रिकाम्या कप्प्यात सरकवत होता. मधेच एखादी चप्पल पडली तर पुन्हा खाली वाकून ती वर द्यायची. असं सतत अगणित वेळा चालू होतं. त्याला पाणी प्यायचं होतं. दोन वेळा समोरची पाण्याची बाटली त्यानं उचलली पण समोर एकदम घोळके आल्यानं त्यानं ती बाजूला ठेवली. एव्हाना आत घंटानाद सुरु झाला होता. लोकांना थेट मूर्तीसमोर उभं रहाता यावं म्हणून कासावीशी होत होती. काहींना आरती सुरु व्हायच्या आत तिथून कटायचं होतं. कारण मग आरती सुरु असताना निघणं म्हणजे स्वतःला श्रध्दाळू, भाविक समजंणार्‍या लोकांचे तुच्छ कटाक्ष झेलणं. त्यामुळे सगळेच आपल्या चपला, आपले बिल्ले जे काही द्यायचे होते ते त्या स्टँडमधल्या माणसापुढे नाचवत होते. 'हे घ्या , हे घ्या ' म्हणून ओरडाआरडा करत होते. तो बिचारा अजून वेग वाढवत होता. पण ते इतक्या झटपट करणं त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्याचं 'थांबा जरा, देतो' म्हणणंही लोकांच्या दृष्टीनं वेळखाऊपणाचं ठरलं असतं. इतका शहाणपणा त्याच्या जवळ होता त्यामुळे तो गप्प होता. मला ती सारी गजबज, किचकिच असह्य व्हायला लागली. इतक्यात आरती सुरु झाली. "सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची.. " चप्पल काढलेले लोक धावत मंडपात घुसले. ज्यांच्या चपला दिल्या /घेतल्या गेल्या नव्हत्या त्यांनी त्या माणसाकडे तो एक अत्यंत कामचुकार माणूस असावा, कशाला ठेवतात अशा लोकांना इथे अशा अनेक अर्थांचे कटाक्ष टाकले. ते नाईलाजाने तिथेच बाजूला चपला काढून उभे राहिले. मनोभावे आरती म्हणत. तो माणूस तिथेच आत असलेल्या खुर्चीवर टेकला. घटाघटा पाणी प्यायला. जोडायला, टाळ्या वाजवायला दोन हात नाहीत म्हणून एकच हात छातीशी धरुन बसला. जमेल तशी त्या न वळणार्‍या, जड जीभेने आरती म्हणायला लागला. माझं लक्ष मूर्ती, आरती याकडे नसल्यानंच पुन्हा एकदा गलबलणं, भडभडणं ओघानं आलंच.परमेश्वराच्याच दारात हा सगळा खेळ पाहिल्यानं समाज,माणूसकी, देवत्व या सगळ्यावरचा विश्वास उडायला लागतोय की काय असं वाटलं. विश्वास म्हणजे तरी काय? की आपल्याला जे अनुभव येतात त्यांना प्रमाण मानून आपल्या मनाची घातलेली समजूत. आज हा अनुभव आला म्हणून हे काही नाहीच असं वाटतंय. उद्या याहून वाईट अनुभव येईल. असंच होत राहिलं तर मग कशावरच विश्वास उरणार नाही. एकदम पायाखालची जमीन सरकल्या सारखी वाटली. असं अधांतरी जगण्याइतकं धारिष्ट्य नाही माझ्यात. निदान मला तरी, जगायला आधार हवाच. मग त्या समजुती कुणी भंपक, भ्रामक म्हटल्या तरी बेहत्तर. शेवटी हा सगळा डोंबार्‍याचा खेळ. समोरच्या गाभार्‍यात बसलेला अनिमिष नेत्रांनी पाहतोय. आणि आपण त्याच्याकडे बघतोय. मधल्या रिंगणात कोण आहे ते आपल्याला तरी ठाऊक नाही. त्याला तरी माहित आहे की नाही कुणास ठाऊक. बहुतेक कधी आपण दोरीवर असू बाकीचे बघत असतील, कधी आपण बघत असू. म्हणजे शेवटी सगळे बघेच. तोही. आपणही. काहीच बदलणार नाही. ना दृष्य, ना दृष्टी. भयाण निष्क्रीयता आली. आरती संपली.
त्या दानपेटीत पुन्हा एक नोट सरकवली, आजचा तो खेळ फुकट पाहिल्याचं पाप माथी नको म्हणून. रात्री झोपताना स्वतःलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभं रहायला लागू नये म्हणून .आपल्याला शक्य तेवढं केल्याचं फालतू समाधान बाळगता यावं म्हणून.
पायर्‍या उतरले. खाली आले. एका अनाम दु:खानं मन भरुन आलं होतं. हे जड ओझं घेउन वावरणं अशक्यच होतं. थोडी दूर जिथे फार वर्दळ नव्हती अशा ठिकाणी एका झुडुपाकडे तोंड करुन ढसाढसा रडले. काय होतंय हे कळत नव्हतं. पण कुणी बघत नाहीये ना हे ही रडतारडता बघितलं जात होतं. रडतानाही गोळा होणारे बघे असतातच. आपल्याला कशातही अपमान, हीन, टुकार वाटू शकतं.
हे असं गहिवरणं आजकाल फार व्हायला लागलंय. देवळात जाणंच बंद करायला हवं थोडे दिवस.

गुलमोहर: 

आशु, संवेदनशील लेखन !

>>>ज्याच्या समोर 'सर्वशक्तिमान' 'सुखकर्ता दु:खहर्ता' म्हणून मान झुकवायला आलो तोच जर नुसतं बघत राहण्याशिवाय काही करु शकत नसेल तरे 'काहीतरी करायचंय' अशी वांझोटी इच्छा बाळगणारे आपण कोण?
>> शेवटी हा सगळा डोंबार्‍याचा खेळ. समोरच्या गाभार्‍यात बसलेला अनिमिष नेत्रांनी पाहतोय. आणि आपण त्याच्याकडे बघतोय. मधल्या रिंगणात कोण आहे ते आपल्याला तरी ठाऊक नाही. त्याला तरी माहित आहे की नाही कुणास ठाऊक. बहुतेक कधी आपण दोरीवर असू बाकीचे बघत असतील, कधी आपण बघत असू. म्हणजे शेवटी सगळे बघेच. तोही. आपणही.<<<
Sad :(!

परमेश्वराच्याच दारात हा सगळा खेळ पाहिल्यानं समाज,माणूसकी, देवत्व या सगळ्यावरचा विश्वास उडायला लागतोय की काय असं वाटलं. विश्वास म्हणजे तरी काय? की आपल्याला जे अनुभव येतात त्यांना प्रमाण मानून आपल्या मनाची घातलेली समजूत. आज हा अनुभव आला म्हणून हे काही नाहीच असं वाटतंय. उद्या याहून वाईट अनुभव येईल. असंच होत राहिलं तर मग कशावरच विश्वास उरणार नाही. एकदम पायाखालची जमीन सरकल्या सारखी वाटली. असं अधांतरी जगण्याइतकं धारिष्ट्य नाही माझ्यात. निदान मला तरी, जगायला आधार हवाच. मग त्या समजुती कुणी भंपक, भ्रामक म्हटल्या तरी बेहत्तर. >>> खरयं गं.. Sad Sad

खुप संवेदनशील लिहिणं आहे हे. रात्री झोपताना स्वतःलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभं रहायला लागू नये म्हणून कधी जे काय करत असतो आपण, त्याचा नंतर नीट विचार केला तर सारं फोल, निरर्थक वाटतं. विशेषतः देवाच्या पेटीत पैसे टाकले, एखादा अभिषेक केला, चेंगराचेंगरीत उभे राहून देवाचे दर्शन घेतलं, तर नंतर भयानक अपराधी वाटतं. हे अपराधीपण, यातला फोलपणा माझ्याच घरात मी स्पष्ट करून सांगू शकत नाही, तेव्हा पुन्हा ठरलेलीच घुसमट.

पुढल्या वेळी मी पुन्हा तयार होतोच- एखाद्या देव-देवीसाठी मैलोगणती दूर जाऊन, रांगेत उभे राहून, पायर्‍यांवरचे भिकारी-रोगी-अपंग ओलांडत, गाभार्‍यातल्या माशा, दुर्गंध सोसत, पुजार्‍या-बडव्यांचे गाभार्‍यातल्या व्यवहारांचे सोहळे बघायला.

एखादा मित्र म्हणतो- 'चंगळवाद आहे हा. भावना, श्रद्धा नावाचा प्रकार राहिलेला नाही तुम्हाला..' एखादी घुसमट सहन न होऊन आशूसारखंच एकांतात ओरडायला, रडायला झाल्यावर वाटते- हीच का ती, मित्र म्हणत असलेली असंवेदनशीलता?

Happy छान लिहीलं आहेस आशु. तगमग पोचली. साजि-या तुझीही.
एक गंमत सांगु? "तो" जर यत्र तत्र सर्वत्र आहे तर देवळात न जाऊनही फारसं साध्य होणार नाही.

शेवटचं मला वाटतं तिरूपतीच्या देवळात गेले असेन. तिथे ती नाझींच्या छळछावणीसारखी रचना...
कटीवरी हात विटेवरी उभा हे बाकींच्यांना दिसतं तर आपल्यालाच पैशाची उधळपट्टी, सोन्यारुप्यामोत्यांचे अलंकार, त्याचे दलाल इ.इ. दिसतं हे आता मान्य केलय. त्याचबरोबर काही जवळच्या व्यक्तिंना "त्या"च्या असल्यासारख्या वाटण्याने ( असण्याने म्हणु शकत नाही) दिलासा मिळतो, मनोबल मिळतं हेही पाहिलय. To each his own opium ज्याला ज्याची व्यसनाधीनता आवडते त्याला ती ती नशा करु द्यावी. To be drunk on 'God' हे सुद्धा कित्येकांचे प्राक्तन.

रडतानाही गोळा होणारे बघे असतातच. आपल्याला कशातही अपमान, हीन, टुकार वाटू शकतं.>>>>> Sad

ललित आवडलं.

ललित आवडलं आशु, मनापासून आलेलं पोचलं

साजि-या उगाच थांबलास लिहायला हवं होतंस पुढे अजून.

असं लिहिणारे लोक बघितले की अजून जगात माणुसकी जिवंत असलेलं जाणवतं आणि त्या च्या असण्याची खात्री होते.

बाकी रैनाला अनुमोदन.

आशु, खूप मनापासून लिहिलंस.

परमेश्वराच्याच दारात हा सगळा खेळ पाहिल्यानं समाज,माणूसकी, देवत्व या सगळ्यावरचा विश्वास उडायला लागतोय की काय असं वाटलं. विश्वास म्हणजे तरी काय? की आपल्याला जे अनुभव येतात त्यांना प्रमाण मानून आपल्या मनाची घातलेली समजूत. आज हा अनुभव आला म्हणून हे काही नाहीच असं वाटतंय. उद्या याहून वाईट अनुभव येईल. असंच होत राहिलं तर मग कशावरच विश्वास उरणार नाही. एकदम पायाखालची जमीन सरकल्या सारखी वाटली. असं अधांतरी जगण्याइतकं धारिष्ट्य नाही माझ्यात. निदान मला तरी, जगायला आधार हवाच. मग त्या समजुती कुणी भंपक, भ्रामक म्हटल्या तरी बेहत्तर.>>>> हे अगदी खरं.

Pages