माझं गाडीपुराण

Submitted by सुपरमॉम on 21 January, 2010 - 12:10

दहा वर्षांपूर्वी, नवर्‍याचं अमेरिकेला 'सह' यायचं नक्की झालं नि तर्‍हेतर्‍हेच्या शेर्‍यांना, सल्ल्यांना जणू ऊत आला.

'नशीब काढलं हो पोरीनं...' ( म्हणजे? भारतात संसार करणारे सगळे फुटक्या नशिबाचे की काय?)

'आता काय, मज्जाच मज्जा तुमची...तिथे सारी कामं रोबोट करतात म्हणे.( हा रोबोट म्हणजे मीच हे इथे आल्यावरच कळलं.)

'पोरीचा पायगुण चांगलाय हो. घरात आल्याआल्या नवर्‍याचं नशीब उघडलं.' (इति मायकेवाले)

'अहो, पायगुण वगैरे काही नसतो हं बायकोचा. उलट त्याच्या नशिबानं हिला सुख मिळतंय.' (हे वाक्य कोणाचं हे सांगायलाच हवं का?)

'हं... तशीही तिला नटायमुरडायची आवड... आता काय.. एकदम मॉडर्न बनून येईल.' (हे ऐकून माझा उगाचच अमेरिकेच्या रस्त्यांवरून सगळ्या बिपाशा, प्रियंका वगैरेच फिरत असतात असा समज व्हायला लागला.)

तर इकडे यायचं नक्की झालं नि एक मोठ्ठा यक्षप्रश्न उभा ठाकला माझ्या समोर. म्हणजे खरंतर नवर्‍याच्याही समोर. अमेरिकेत यायचं म्हणजे कार चालवता आलीच पाहिजे.

नवर्‍याचं बालपण नागपुरात नि त्यानंतरचं वास्तव्य मुंबापुरीत झाल्याने दुचाकी शिवाय कुठलं वाहन चालवायची त्याला सवयच नव्हती. अमेरिकेत जायचं तर इंटरनॅशनल लायसन्स हे हवंच. तशी अटच होती मुळी नेमणूकपत्रात.

मग अर्थातच नव्वद टक्के भारतीय जे करतात ते करणं आलं. म्हणजे एजंट गाठणं.

'होऊन जायल सायेब. उद्याला या गिरगावातल्या हापिसात.'

'पण मला नुसतं लायसन्स नकोय. गाडी चालवायला पण शिकायचीय.' इति नवरा.

'चालेल की. तिथल्या सायबानं विचारलं की फकस्त रिवर्स घेता येईल न तुमाला?'

'अरे बाबा, मला स्टार्ट पण करता येणार नाही.'

'होऊन जायल सायेब. उद्याला दीड हजार रुपये घेऊन या की बास... गाडीची नंतर बी करता यील प्राक्टीस'

असे अनेक विनोदी संवाद झाल्यावर, घाईघाईने काही लेसन्स घेऊन, शेवटी 'लायसेन' मिळालं एकदाचं.

उभयतांपैकी एक चक्रधर झाला म्हटल्यावर खुशीतच विमानात बसले मी. भारतात साताठ वर्षं केलेल्या नोकरीचा खूप कंटाळा आलेला... त्यात एच फोर व्हिसा असल्याने गेल्यागेल्या पूर्णवेळ गृहिणीचा रोल करावा लागेल ही कल्पना होतीच. त्या सार्‍या सुखस्वप्नांमधे गाडी चालवावी (च)लागेल या भयाण विचाराला थारा नव्हता.

आल्याआल्या काही दिवस तर एकदम मजेत गेले. नवं अपार्टंमेंट, ते सजवणं, नवीन नवीन ओळखी, ते वीकेंडला मॉल्स मधे फिरणं.. सुरुवातीला बरं वाटलं. पण नवर्‍याचा प्रोजेक्ट जोमानं सुरू होऊन तो कामाला जुंपल्या गेला नि एकटेपणा माझ्या मनाला भिडायला सुरुवात झाली.

'अहो, आज जरा लवकर याल का? ग्रोसरी करायचीय.'

'बघतो ग. आज कठीण आहे. खूप काम आहे...'

'ते तर रोजच असतं हो. पण कणीक, तेल नि तांदूळ तिन्ही संपत आलंय.'

मी तेल संपले, तूप संपले या चालीवर...

'अन रोज रोज कसा हो उशीर होतो तुम्हाला?'

'मग ? मी काही एल आय सी त नाहीये म्हटलं. पाच वाजले की साहेबाच्या पुढे फाईल फेकायला...'

असे अनेक सुखसंवाद रोजच झडू लागले.

आता मग हळूहळू शेजारपाजार्‍यांशी ओळखी व्हायला लागल्या त्यातून इथे बरेच 'इंडियन्स' आहेत नि त्यातल्या बहुतेक बायकांना अजून आपल्यासारखीच गाडी चालवता येत नाही हे 'नोलेज' प्राप्त झालं. एक मात्र नवीन नवीन का होईना चालवायला शिकली. मग सगळ्यांची तिच्याशी दाट मैत्री झाली हे सांगायला का हवं?

रोज दुपारी सगळ्यांचे नवरे कामावर गेले की धीरे धीरे एकेकजण छान तय्यार होऊन घराबाहेर पडू लागली. गाडीवालीच्या घरी सगळ्यांनी जमायचं नि भरपूर चकाट्या पिटत गाडीत कोंबायचं स्वतःला. इतक्या निरनिरळ्या प्रांतातल्या, वेगवेगळ्या स्वभावाच्या नि सवयींच्या बायका....पण केवळ गाडी नि शॉपिंग या धाग्यांनी एकमेकांशी घट्ट बांधल्या जायच्या. कोण म्हणतं बायका बायकांच्या वैरी असतात म्हणून्?साफ खोट्टंय...'

'ए आज इंडियन जाते है हा (इथे इंडियन म्हणजे इंडियन स्टोअर्स) मेरेको पुर्रे महिने की ग्रोसरी करनी है.'

'याने की एकेक बोरा चावल दाल और सांबार मसाला इतनाही ना?' (एका मराठमोळीने काढलेला चिमटा)

'और मॉल भी जाते है रे... मेरे पास काली जीन्स नही है. कितने दिनों से लेनी है...'

'ये क्या पहनके तो आयी है तू.'

'ए केमार्ट नही वॉल्मार्ट जायेंगे. उधर झिप्लॉक बॅग्ज पचास सेंट से सस्ता है.'

अशा अनेक सूचना, बडबड ऐकत गाडी चालवणं म्हणजे कौतुकच. पण ही मैत्रीण ते काम सफाईनं पार पाडत असे. ती लग्नानंतर दोन वर्षं सासवा, चुलतसासवा अशा एकत्र कुटुंबात राहिलेली असल्याने तिच्या सहनशीलतेचं गमक काय हा प्रश्न पडायला नको.

तर या सगळ्या मजेशीर कॅरेक्टर्स सोबत (त्यात मी पण आलेच) एकदाची खरेदी पुरी व्हायची. पण एक दोन वर्षातच कोणाचे 'पाव भारी' तर कोणाच्या बोटाशी चिमुकले आल्यानं या बाजारातल्या ट्रीपा कमी होऊ लागल्या. त्यात आमच्या 'ड्रायवर' चे ही दिवस भरत आले. मग पुन्हा नवर्‍याचं डोकं खाणं आलंच.

मग धीरे धीरे नवर्‍यानं प्रस्तावना सुरू केली.

'आता तू पण शिकून घे बरं गाडी....'

माझ्यासाठी ही सूचना म्हणजे पोटात गोळा आणणारी. लहानपणापासून मी वाहन चालवायच्या बाबतीत कच्चं लिंबूच. सगळया बहिणी, मैत्रिणी मस्त लूना वा कायनेटिक वर भुर्र जायच्या तेव्हा मी मात्र कोणाच्या तरी मागे ओढणी सांभाळत बसलेली असायची.

खूप लहान असताना मी एका मैत्रिणीचा वाईट्ट अॅक्सिडेंट बघितलेला होता त्यात माझ्या भीतीचं मूळ असावं असं घरातल्यांना उगाचच, माझ्या प्रेमापोटी वाटायचं पण मी तशी त्या बाबतीत भित्रीच.

'गाडी शिकायलाच हवी का पण? मी बसची चौकशी करते त्यापेक्षा....'

'काहीतरीच काय? इथे काय इंडियासारखं नाहीय. एकटदुकटं बस स्टॉप वर उभं रहाणार का तू? इथे फारसं कोणी बस बीस घेत नाही...'

'मग आपण शनिवारी रविवारीच करू या ना ग्रोसरी.....' माझा एक दुबळा प्रयत्न.

'पण मी म्हणतो इतकं घाबरायला काय होतंय तुला... मी शिकवेन की. नाहीतर इंस्ट्रक्टर कडे जा.'

ही नवर्‍याची एक युक्ती. दोन ऑप्शन्स दिले की एक तरी बायको उचलते हे त्याला एव्हाना ठाऊक झालेलं.

पण यातले दोन्ही पर्याय मला धडकी भरवणारेच असल्याने मी एकालाही हात लावत नाही.

'त्यापेक्षा भारतात गेले की शिकेन ना... आत्ता जाऊ दे.'

मी असा ठाम नकार दिल्याने वैतागलेल्या नवर्‍यानं माझं बरंच बौद्धिक घेतलं. 'आजकी नारी' ला या बाबतीत कसं घाबरायला नको याची वारंवार गीता वाचून झाली. अगदी

'कृष्ण म्हणे बा अर्जुना,
हा कसला रे भेकडपणा....' या चालीवर...

पण मी पक्का निर्धार केलेला. मी कसली ऐकतेय? फारच भुणभुण लावली नवर्‍यानं की..

' जा हो, कांदेबटाटे घेऊन या बरं. मस्त बटाटेवडे करते. कालचे लाडू आहेतच सोबत...' असा फतवा काढायची मी. काय बिशाद तो पुन्हा दिवसभर तरी गाडीचं नाव काढेल?

तर असे दिवस जात होते. या अवधीत दोन तीन घरं, नि राज्यं बदलून झाली. पण प्रत्येक ठिकाणी कुणीतरी बेस्ट फ्रेंड भेटायचीच मला. 'मै हूं ना ' म्हणणारी. दुपारी कधी ग्रोसरी, तर कधी शॉपिंग ला घेऊन जाणारी. संध्याकाळी फिरायचा मूड आला तर नवरा आहेच तयार हक्काचा.

'या... या तुझ्या जिवलग मैत्रिणींमुळेच तू गाडी शिकत नाहीयेस. किती दिवस... छे, वर्षं झाली इथे येऊन आपल्याला....'

'अहो, माझ्या नशिबी किनई राजयोगच आहेत. त्याला काय करायचं? माझे बाबा पण लग्नाआधी हेच सांगायचे आईला...' मान वेळावत मी म्हणून टाकायची.

अगदी फारच हातघाईवर आलं प्रकरण, तर बायकांचं नेहमीचं अस्त्र उपसायचं.

मग काय, अगदी सिनेमातल्यासारखा--

'यह क्या... तुम्हारी आंखों मे पानी?' असा डायलॉग नसला तरी

'रडू नकोस.. रडू नकोस बाई. तुझं(च)खरं..' असं नवर्‍याला म्हणावंच लागायचं.

बरेच दिवस गेल्यावर... माझ्या रडण्याभेकण्याकडे लक्ष द्यायचं नाही हे ठरवून नवर्‍यानं माझं एका ड्रायव्हिंग स्कूल मधे नाव घातलं.

'हे बघ, तीन दिवसांचा कोर्स आहे फक्त. नंतर मी शिकवेन तुला वीकेंडला....' असंही ठासून सांगितलं.

पहिल्या दिवशी ती बाई आली शिकवणारी... नि मी तिच्याकडे बघतच बसले.

एकदम पॉश ड्रेस, पायात उंच टाचांचे बूट, सुरेख रंगवलेली लांबसडक नखं...एकदम 'अहा' होती दिसायला. पण गाडी शिकवायला सुरुवात झाली नि गाडीशीच काय, या बाईशीही आपलं जमणं कठीण हे कळलंच मला.

गाडी सुरू करण्यातलं माझं अगाध ज्ञान नि रिव्हर्स घेणं नामक भयचकित करणारा प्रकार पाहून शेवटी तिनं गाडी दिली सुरू करून.

कशीबशी डुगडुगत काढली बाहेर रस्त्यावर नि बाई ओरडली... 'टर्न टर्न टर्न.. टर्न द व्हील...'

'अग हो बये, पण टर्न म्हणजे किती?' मी मनात.

या सार्‍या गोंधळात राईट टर्न म्हणजे जागच्या जागेवर घेतलेला यू टर्न झाला. त्यानंतरचे तीनही दिवस बाईनं मला शुकशुकाट नसलेल्या रस्त्यावर नेऊन गाडी शिकवायचा सपशेल अयशस्वी प्रयत्न केला. शेवटी ती नि मी दोघीही थकलो. तिनं माझ्या गाडी चालवण्याबद्दल केलेल्या कॉमेंट्स ऐकून नवराही प्रचंड थकला नि गाडीचं नाव काढेनासा झाला.

अशीच पाच वर्षं गेली अमेरिकेतली. या अवधीत मुलं झाली.. नि मग काय. कित्ती कित्ती बिझी झाले मी बाई.
'वेळ तरी आहे का काही शिकायला?' हे पालुपद एकदोनदा म्हटलं की झालं.

गाडीचा विषय मग मागेच पडला.

पाच वर्षांनी परत भारतात जायचं ठरलं नि कोण आनंद झाला मला. अगदी एकटी असताना भांगडाच करून घेतला मी. आता कशाला गाडी शिकावी लागणार होती मला? तसंही पुण्यामुंबईच्या ऑटो नि टॅक्सीवाल्यांचं पोट माझ्यामुळेच भरतं हे माझ्या सासर माहेर दोन्हीकडचे नेहमीच म्हणतात. चालायचंच. लोकांचा उद्धार करायचा तर असं काहीबाही ऐकून घ्यावंच लागणार की.

भारतात आल्यावर गाडी शिकायची गरज नव्हतीच. घरची गाडी, ड्रायव्हर, ... नि नाक्यानाक्यावर उभे असणारे रिक्शा, ऑटोवाले या सार्‍यामुळे खरेदी, नातेवाईकांच्या भेटी अगदी सुरळीत होत होत्या. अगदी एक दिवस कुटुंबासोबत असताना ड्रायव्हरला उतरायला लावून घराजवळच्या मोकळ्या मैदानावर मी पण गाडी चालवून बघितली.

'लई झ्याक चालवता बगा तुमी म्याडम' इति ड्रायव्हर.

मी उगाचच फुलून गेले. पण घरी येताना ड्रायव्हर चहा प्यायला गेल्यावर...

'उगाच फुशारून जाउ नकोस. तो काय सांगतोय? तू जे केलंस त्याला गाडी चालवणं म्हणत नाहीत...' अशा दुष्ट शब्दात नवर्‍यानं माझी पार हवाच काढून टाकली.

तर अशा तुरळक गोष्टी वगळता गाडीशिवाय माझं आयुष्य अगदी मज्जेत चाललं. होतं. पण एक दिवस नवरा घरी आला तोच हातातलं पत्र फडकावत...

'चला, तयारी करा. परत जायचंय यू एस ला आपल्याला....'

ज्या गोष्टीला आपण भयंकर घाबरतो ती गोष्ट फार दिवस दूर ठेवता येत नाही हे सत्य मला तेव्हाच कळून चुकलं.

मग जायच्या आधी गाडी भारतातच शिकायचं ठरवलं. नातेवाईकांचीच ड्रायव्हिंग स्कूल असल्यानं फारसा प्रश्न नव्हता.

'मला की नाही खूप भीती वाटते. आधी ग्राऊंडमधेच शिकवाल का?' मी इंस्ट्रक्टरला आवाजात शक्य तितका नम्रपणा आणून..

'अशा ग्राऊंडमदी शिकणार्‍याना मी शिकवत नाय...' सौजन्याची ऐशी तैशी.

तेवढ्यात माझ्या सुदैवानं वहिनीच आल्या बाहेर.

'ए, तिला घाबरवू नकोस रे उगाच. ती म्हणते तसंच शिकव...'

मालकांची नातेवाईक म्हटल्यावर काय करेल बिचारा? मुकाट्यानं रोज मला मैदानात घेऊन जायचा. तिथे अर्थातच माझ्या ड्रायव्हिंगला नि त्याच्या कल्पनाशक्तीला फारसा वाव नसल्याने तो काल्पनिक सिच्युएशन निर्माण करून बघायचा.

जसं....' समजा समोरून ट्रक येतोय म्याडम तर बाजूनं घेऊन दाखवा गाडी' वगैरे....

एकदा त्याच्या नि माझ्या नशीबानं एक बकरी बसली होती ग्राऊंडमधे.

'चला... बकरीच्या अगदी बाजूनं सफाईनं घ्या म्याडम. बकरी उठली नाय पायजे.'

बकरी बेंबाटत उठली हे सांगायला नकोच.

तर हाही प्रयत्न फसला.

परत आल्यावर काही दिवस मी टंगळमंगळ करून बघितली. पण आता मुलं मोठी झाल्याने त्यांचे क्लासेस नि इतर अॅक्टिविटीज साठी मला ड्रायव्हिंग येणं अगदी जरुरीचं होऊन बसलं. मग शेवटी नवर्‍याबरोबर गाडी शिकायचं नक्की झालं.

पहिल्याच दिवशी तो मला घराजवळच्या पार्किंग लॉट मधे घेऊन गेला. माझ्या डोक्यात 'गॉडफादर' मधला अल पसिनो जसा रोमँटिक स्टाईलनं आपल्या बायकोला गाडी शिकवतो नि तिनं लाडिकपणे व्हील कुठेही फिरवलं तरी मुळ्ळीच रागावत नाही तसं काही काही येत होतं. पण कसलं काय...

गाडी कशीतरी रस्त्यावर काढली नि 'उजवीकडे वळ' असा नवर्‍यानं आदेश दिला. हे म्हणजे त्या पहिल्या शिक्षिका बाईंसारखंच झालं. किती वळवायचं पण? ते नको सांगायला? त्यातच माझा नवरा नागपुरी असल्यानं अर्धवट सूचना देण्यात महा हुशार. 'त्याचं ते हे करून टाक जरा...' या वाक्याला खरंतर काही अर्थ आहे का? पण अशी वाक्यं तो अगदी सर्रास वापरतो.

तर झोकात मी व्हील फिरवलं नि दुसर्‍या क्षणाला गाडी फूटपाथवर चढून fire hydrant ला ठोकण्याच्या तयारीत.

'अग ब्रेक.... ब्रेक..' असं पतिदेव ओरडेपर्यंत अगदी इंचभर अंतरावर येऊन थांबले मी.

तिरप्या डोळ्यांनी नवर्‍याकडे बघितलं. त्यानं एक दीर्घ श्वास घेतला नि एवढंच म्हणाला.. 'लेट्स स्विच साइड्स....'

त्यानंतर बरेच दिवस सकाळच्या वेळी त्या पार्किंग लॉट मधे खालील वाक्यं... अर्थातच कुठल्याही क्रमाने ऐकायला येत होती.

'अग हळू जरा... रेस कारची ड्रायव्हर आहेस का तू?'

'पण तुम्हीच तर अॅक्सिलेटर म्हणालात....'

'मी लाख म्हणालो. तुला समजायला नको?'

'काय करतेयस तू? काही कळतंय की नाही तुला?'

'ते कळत असतं तर तुमच्याकडून शिकायला कशाला बसले असते?'

एकदा तर दोन्ही मुलं मागे बसलेली असताना आमचा 'लेसन' सुरू होता. मुलगी आपल्या भावाकडे वळून विचारती झाली...

'व्हाय आर दे फाइटिंग?'

'ओ, अवर पेरेंट्स नेव्हर फाइट. दे अर्ग्यु...' इति चिरंजीव.

कालांतरानं आपण ऑफिसात कितीही लोकांना ट्रेनिंग देत असलो तरी घरचा विद्यार्थी फारच मठ्ठ नि नाठाळ आहे ही नवर्‍याला खात्री पटली नि त्याने माझा नाद सोडला.

आता पुन्हा इंस्ट्रक्टर शोधणं आलं.

यावेळी 'बाई' नसून 'बुवा' होता. पण ह्या वयस्कर बुवानं मात्र आपलं काम चोख बजावलं. त्यानं पहिल्याच दिवशी सांगून टाकलं की तो शाळेत तीस वर्षं शिकवत होता नि त्याच्या दोन टीन एजर मुलींनाही त्यानंच गाडी शिकवलीय. त्यामुळे त्याच्यात भरपूर सहनशक्ती आहे.

तर शेवटी त्याच्याकडून एकदाची गाडी शिकले मी. अर्थात त्याच्या सहनशक्तीचा पुरेपूर वापर करून घेतला. इतका की माझ्यानंतर माझ्या एका मैत्रिणीनं त्याला फोन केला तेव्हा तो आता फारच जास्त फी आकारतो हे पण कळलं. काय करेल बिचारा...

तर आता मी अगदी मजेत गाडी चालवते. 'मॉलमधे ने' म्हणून सारखी बायकोची कटकट नसल्यानं नवरा खूषच खूष. इतका की त्या भरात क्रेडिट कार्डाची बिलं वाढलीयत हे त्याच्या फारसं लक्षातही येत नाही.
त्यातून त्यानं जरा कुरकुर केलीच तर 'अहो ते हे घ्यायचं होतं...' म्हणून मी त्याला गप्प करून टाकते.
क्लासेसना जाते. मैत्रिणींकडे जाते. मराठी मंडळात जाते.

अन हो, एखादं नवं कपल आलं भारतातून अमेरिकेत की त्यांना जेवायला बोलावते. नि जाताना आवर्जून सांगते नव्या मैत्रिणीला...'गाडी येत नाही? का..ही काळजी नको करूस ग. मै हूं ना....'

-समाप्त.

गुलमोहर: 

Proud मजा आली वाचायला. मी ही भारतात दोनदा शिकलेय. तरीही जपानमध्ये चालवायला भिती वाटतच होती म्हणून तिथेही अगदी लर्नर्स पर्मीट पासून शिकले पण मग निदान कॉन्फिडन्स तरी आला चालवायचा.

जबरी !! फार इन्स्पायरिंग लिहीलेस.. मी सद्ध्या याच कटकटीत आहे. त्यामुळे फारच 'भावला' लेख! Happy
पुण्यातल्या माजोरड्या रिक्षावाल्यांची सुद्धा रोज आठवण काढते मी..
स्टिक शिफ्ट गाडी भर चौकात गिअर न पडल्यामुळे, चढावर , सिग्नल सुटल्यावर बंद पाडल्यापासून आणि नंतर ती हळू हळू गाडी खाली जातीय हे दृश्य आठवून, आठवून माझा उत्साह अगदी मावळतो.. वैताग आहे साला.. Angry

Rofl
खतरनाक आहे लेख.
सुरवातीचे डायलॉग तर जबराट. Lol

<<<'व्हाय आर दे फाइटिंग?'

'ओ, अवर पेरेंट्स नेव्हर फाइट. दे अर्ग्यु...' इति चिरंजीव.>>> Rofl
हा सगळ्यात जबरी डायलॉग आहे...

इतकी तपस्या करून शेवटी फळली. मागच्याच महिन्यात लेक म्हणाला की 'मॉम ड्राइव्ज बेटर दॅन डॅडी....'
या..हू..!!!!!!!!

मस्त लेख. गाडी शिकल्याबद्दल अभिनंदन. आता 'मातोश्री टॅक्सी सर्व्हिस' सुरू झाली असेल. मुलांना ने आण, किराणा-भाजी, बँकेची कामं, डॉक्टरांकडे नेणे... सगळं गळ्यात! Happy

अगदी अगदी मृ. लेक म्हणतेच..'माय मॉम वॉज कुक अँड क्लीनर.. नाऊ शी इज शोफर टू.'

छान लिहीलय.
माझ्या गाडीपुराणावरुन मी घेतलेला धडा म्हणजे नवर्‍याकडून गाडी शिकू नये.

राजसी, १००० मोदक.
आपण कितीही चांगली गाडी चालवायला शिकलो तरी नवर्‍याला 'इंप्रुव्हमेंट'करता जागा आहे असंच वाटत असतं नी सूचनाही चालू असतात त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करावं.

माझ्या गाडीपुराणावरुन मी घेतलेला धडा म्हणजे नवर्‍याकडून गाडी शिकू नये >>>

राजसी हा धडा मी दुसर्‍यांच्या उदाहरणावरून गाडी शिकायच्या आधीच घेतला त्यामुळे मी ड्रायव्हिंग स्कुल मध्येच गाडी चालवायला शिकले. Happy

मस्त लिहिलयस!
मज्जा आली वाचायला..
अमेरिकेत आल्या आल्या एका मित्रानं सांगितलेलं 'यू कांट लिव विदाऊट टू थिंग्ज हियर. १. ड्रायव्हिंग २. क्रेडिट कार्ड' मी अजून पर्यंत तरी दोन्ही शिवायही जगते आहे! Lol

अगदी अगदी, मी पण नवर्याकडुनच शिकले गाडी. पण त्याला त्याच पूर्ण श्रेय बर का.. माझ्या मागे इतका लागला कि मी हात टेकले. आणि आता काय मृ म्हणते तशी सगळी काम असतातच गळ्यात.
शिकवुन ९ वर्ष झाली पण सुचना अजुनही चालु आहेतच. Wink

लेख एकदम झकास Happy

'गाडी येत नाही? का..ही काळजी नको करूस ग. मै हूं ना....' >>>ह्याने खुप छान वाटते नविन असताना Happy
बाकि लेख छान जमलाय.

मलाही माझे शिकवणीचे दिवस आठवले. म्हणजे मी चालवत असताना प.पू.पि. आणि बायकोला शिकवताना मी. पण बायकोला शेवटी ड्रायव्हिंग लेसन्स घेऊन शिकायला लावले.

मस्त. माझे दिवस आठवले. मीही स्कूल मधेच शिकले. पहिल्या रोड टेस्ट मधे लायसन्स पण मिळाला. पण त्यानंतर बरेच दिवस गाडीला हात नाही लावला. शेवटी जेंव्हा आता गाडी चालवल्याशिवाय गत्यंतर नाही अशी वेळ आली तेंव्हा नवर्‍याबरोबर पुन्हा प्रॅक्टिस सुरु केली :). नवर्‍याचा एक मित्र अगदी कळकळिने सांगायचा भाभी लायसन्स ले लीजीये, बहोत जरुरी हे, आणि मग हा येऊन गेला की थोडे दिवस नवरा पण डोकं खायचा कधी शिकणार आहेस गाडी चालवायला?

पहिल्या दिवशी तो इन्स्ट्रक्टर आला आणि म्हणाला बस गाडीत आणि कर सुरु मी अगदी गरीब चेहरा करुन त्याला विचारले होते आज लगेच पहिल्या दिवशी मी चालवायची गाडी त्याला तेंव्हा घबाड मिळाल्याचा आनंद झाला असणार नक्की Proud

अरे वा सगळ्यांकडे पण हेच झालं होतं वाचून बरं वाटल. राजसी ला १०० % अनुमोदन. नवर्या कडून कधीही गाडी शिकायला सुरूवात करू नये.

Pages