...यांना 'आग्या मोहोळं'च हवा!!!

Submitted by tilakshree on 1 March, 2008 - 05:45

विविधांगी रंगरुपाने सजून धजून निसर्गाने या भरतभूमीवर मुक्तहस्ते आपल्या कृपेची उधळण केली आहे. मात्र कुठेतरी उणेपण हे रहातंच ना! अनेकदा माणूस आपल्या कृत्यांनी परिस्थितीचा रोष ओढवून घेतो तर काही वेळा निसर्गंच अस्मानी संकटांच्या रुपाने आपले डोळे वटारतो. मात्र आपलं भाग्य थोर की आपल्या उणीवा भरून काढण्यासाठी किंवा आपल्यावरच्या संकंटांना तोंड देण्यासाठी 'इटली' या आपल्या परमप्रिय मित्रराष्ट्राने कंबरंच कसलीय जणू! 'जिथे कमी तिथे आम्ही' या भावनेने इटली आपल्या वेळेला धावतोय.
आता उदाहरणच घ्यां ना.... (आपल्या मनात लगेचंच उदाहरण आलंच ना? माफ करा... आपल्या डोक्यात आलेले उदाहरण मला द्यायचं नाहीये) या फुलांवरून त्या फुलांवर भटकंती करणार्‍या मधमाशांचं उदाहरण... या मधमाशा पाळून मधाच्या उत्पादनाचा व्यवसाय आपल्याकडे अनेक वर्षापासून सुरू आहे. पण 'ब्रूड' नावाच्या एका रोगाने या माश्यांवर घाला घातला आणि मधुमक्षिका पालन व्यवसाय अडचणीत आला. भारतातलं मधाचं उत्पादन निम्म्याने कमी झालं. बरं; आजकाल माणसं सौंदर्य आणि आरोग्याबाबत जरा जास्तंच 'कॉन्शस' होऊ लागली आहेत. त्यातून आयुर्वेद आणि वनौषधींचं महत्व इंग्रज-अमेरिकन लोकांना पटतंय. अर्थातच त्यामुळे आपल्याकडेही हल्ली हल्ली त्याचा प्रसार व्हायला सुरुवात झाली आहे. आयुर्वेद आणि वनौषधी म्हणजे मध ही अत्यावश्यकंच गोष्ट! औषधांपासून ते सौंदर्यप्रसाधनांपर्यंत मध हा सगळ्यांतच हवा. आपल्याकडे तर 'ब्रूड्'ने घात केलेला. मधाचं उत्पादन निम्म्यावर आलेलं. पण इथेही हात दिला तो इटलीनेच!
बिहार, यु.पी.वाले भैय्ये दिसण्या, वागण्या, बोलण्यावरून कितीही गावंढळ; खरंतर निर्बुद्ध वाटंत असले तरीही जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन प्रस्थापित होण्यासाठीच्या संघर्षाने त्यांच्यात एक अंगभूत शहाणपण आलं असावं (मा.रेल्वेमंत्री लालू यांनी हे जागतिक पातळीवर सिद्ध करुन दखवलेलं आहे.) तर 'हनी क्राईसेस'वर मार्ग काढण्यासाठी या यु.पी.वाल्या भैय्यांनी थेट इटलीतून मधमाशी आयात केली. तिचं नाव (परत डोकं भरकटू देऊ नका!) 'मेलीफेरी'.
या मेलीफेरी जातीच्या मधमाशीमधे आपल्या 'स्वदेशी' माश्यांपेक्षा अधिक चांगले गुण असल्याचं 'तज्ज्ञ' सांगतात. आपल्याकडे ज्या माश्या आहेत त्या एकतर सदा दुर्मुखलेल्या! वेलची खाऊन गारठणार्‍या आणि लवंग खाऊन उष्माघात होणार्‍या! कुठल्याही रोगाची लागण त्यांना पटकन होते. उणं पुरं तीन महिन्यांच आयुष्यही धडपणे जगण्याची क्षमता नसलेल्या! हा असा एक प्रकार आणि दुसरा प्रकार म्हणजे ज्याच्या नुसत्या नावानेच धडकी भरावी. 'आग्या मोहोळ!' नावाप्रमाणेच उग्र आणि उर्मट! त्यांना भलेपणाने छानपैकी लाकडी पेटीत घरकुल थाटून द्यावं; तर तिथे धडपणाने राहणार नाहीत. त्यांनाच चांगलं चुंगलं खाद्य मिळावं म्हणून एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवावं तर ह्या ते करणार्‍याच्याच जीवावर उठणांर! त्यापेक्षा 'मेलिफेरी' बिचारी गरीब! ठेवाल तिथे; ठेवाल तशी राहील. अगदी पराग आणि मध नाही मिळाला तर साखरपाणी पिऊन आणि गव्हाचं पीठ खाऊन सुखाने जगेल; तरीही तुम्हाला मध तयार करून देईल!
या अशा 'अल्पमोली-बहुगुणी' इटालियन मेलिफेरीला प्रथम यु.पी.वाल्यांनी आपलंसं केलं. पाठोपाठ आपल्या शेजारच्या कर्नाटकाच्या अण्णांनीही तिला स्वीकारलं. पण आपला 'मर्‍हाटी'यांचा 'स्वदेशी' आणि 'स्वाभिमानी' बाणा इथेही आडवा येतोय की काय कोण जाणे! महाराष्ट्रातल्या एक्-दोघा जणांना सोडलं तर बाकी कोणीही हे 'इटालियन वाण' स्वीकारायला तयार होत नाहीये. खरंतर ज्यांनी मेलीफेरीचा स्वीकार केलाय ते तिची 'मधुर' फळं चाखतायत. बरं तिला सांभाळणंही किती सोपं... एका राणीमाशीची उत्तम बडदास्त ठेवली की बाकीचं माश्यांचं अख्खं सैन्य बाजारबुणग्यांसकट आपोआप कह्यात रहातं. पण सुखासुखी मिळेल ते सुखाने उपभोगेल तो 'मर्‍हाटी' माणूस कसला! यांना 'आग्या मोहोळं'च हवा!!!

गुलमोहर: 

धन्यवाद केदार;
विषय गंमतीशीरपणे मांडला असला तरी त्यातली सगळी माहिती १००% खरी बरं का.

तुमच्या लिखाणाला तर जवाबच नाही. मधमाश्यांच्या निमित्ताने खुपच प्रभावी पणे हा मनोवृत्तीतला फरक मांडला आहे. आणि परत एकदा वेगळा विषय घेउन आला आहात.

सुंदर लेख,
मधाबरोबरच पोळ्यातून मिळणारे मेण म्हणजेच बी वॅक्स तसेच मधमाश्यांचे अन्न, रॉयल जेली हे पण औषधाच्या आणि सौंदर्यप्रसाधनाच्या उद्योगात महत्वाचे आहेत. आजकाल मुंबईत मोठ्या इमारतींच्या आधारे वाढलेली पोळी दिसतात. त्यामुळे शहरातही हा उद्योग शक्य असावा.

नेमक्या कुठल्या फुलांमधून मध गोळा केला आहे, ते सांगता येणे कठिण असते, सूक्ष्मदर्शकाखाली तपासून ज्या फुलांचे परागकण त्यात जास्त दिसतात, त्या वरुन मधाचा प्रकार ठरतो.

धन्यवाद रमणि, दिनेश
खरंतर हा व्यवसाय मस्त आहे. सरकारकडून अनुदानही मिळतं. जर घरात फुलझाडं लावली तर मधमाश्या पाळणं शक्य आहे.

रमणि;
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! पण परत एकदा वेगळा विषय घेऊन आलातचा संदर्भ नही समजला. आणि अजून एक.... मला आहो जाहो ऐकणं जड जातं. मला वाटतं आपण मित्र आहोत. मला एकेरीतंच बोला.
श्री

आणि लिहीलंय पण सही एकदम.
तुमच्या लिखाणातली एक गम्मत लक्षात आली. गोष्ट महिती सांगितल्यासारखी सांगायची आणि माहिती विनोदी लेखनासारखी. म्हणजे सगळंच वेगळं. काही असो वाचायला दोन्ही छान वाटतेय.
लिहीत रहा.

शाळेतल्या पुस्तकात शोभावी अशी माहीती खुप रन्जक करुन सान्गितली आहे.मधुमक्शी पालन क्रुशि (<अग्रिकल्चर>कसे लिहायचे?)शास्त्रात
येते का? शहरात वाढलेल्याना अशी आणखीन माहीती वाचायला आवदेल.

छान लेख. महाराष्ट्रात ज्यांनी या मधमाश्या आणल्या आहेत त्यांचा पत्ता मला मिळेल का?

संघमित्रा प्रतिक्रिया मजेशीर आहे!
मी म्हणजे वेगळा... वेगळा नंदू वाटतोय की काय? आठवतोय ना? दिलीप प्रभावळकरांचा नंदू???

तिलकश्री,
वेगळ्या विषयावर आणि चांगली माहिती सांगितलीत. धन्यवाद.
मराठी लोक या इटालीयन माश्यांकडे वळली नाहीत याला काही खास कारणे आहेत का?
की जुने सोडवत नाही एवढच कारण.

खरंतर खास कारण काही नसावं. पण शक्यतो स्वतः रिस्क घेऊन काही करायचं नाही. इतरांच्या प्रयोगातून प्रूव्ह झालं की विचार करायचा ही टिपिकल मनोवृत्तीच आहे ना...

श्री, छान लिहिलंय. नविन महिती मिळाली. पण घरात मधमाअश्या पाळल्या तर त्य डंख करणार नाहीत का? कालच माझ्या मुलीला हातावर काहितरी (बहुधा मधमाशीच) चावलंय आणि चांगली मोठी पूळी आलीय.

मंजू; पुण्या-मुंबईतल्या फ्लॅटमधे किंवा घरात लहान मुलं असताना मधमाश्या नाहीच पाळता येणार. मधमाश्यांना हाताळण्याची एक विशिष्ट पद्धत असते. साप पकडण्या, हाताळण्याची असते तशी.मी पुण्यातल्या शासकीय मधुमक्षिका पालन केंद्रात गेलो तिथे त्यांनी मला प्रात्यक्षिकही दाखवलं. पण मुख्य म्हणजे व्यवसाय म्हणून पाळतात तेंव्हा त्यांच्या पेट्या प्रामुख्याने फळबागा, आमराया किंवा जांभूळ, करवंद असलेल्या जंगलातच ठेवतात.
आणि एक गोष्ट... या माश्या चावल्यानंतर बहुदा त्या ठिकाणी एक काट्यासारखा प्रकार रुतून रहातो. तो काढल्याशिवाय सूज आणि ठणका पूर्ण थांबत नाही. विशेषतः खेडेगावात या माश्या चावतील तिथे तुळशीचा रस आणि तुळशीखालच्या मातीचा लेप लावतात.