बाईफोबिया

Submitted by नविना on 19 January, 2010 - 00:18

आताच फोनवर ताईशी बोलणं झालं. ती फारच त्रस्त होती. "अगं मी ना कंटाळली आहे. घर हे एवढं मोठं. त्यात हा पोरगा कोणाचं काही ऐकत नाही. ह्याच्याकडून होमवर्क करून घेणं म्हणजे सगळ्यात कठीण काम आहे माझं. सदैव पसारा करून ठेवण्यातच सगळी एनर्जी जाते ह्याची. आणि मग तो आवरण्यात माझी. त्यात हे नेहमीचे पाहुणे. मी मोठी सून म्हणून माझ्यावर सगळे नातेवाईक पण जास्तच प्रेम करतात बहुतेक. आणि हे कमी म्हणून आमची बाई पण गायब आहे २ दिवस झालेत.. वाट बघायला लावून वाट लावतात आपली...........". हे डॉट्स म्हणजे तिच्या उरलेल्या सगळ्या तक्रारी होत्या. त्यातल्या ९५% तक्रारी ह्या तिच्या आवडत्या बाईच्या होत्या. मी हळूच तिला म्हटलं "तुला नाही का वाटत तुला पण बाईफोबिया झालाच फायनली!!!!!" आणि ती अगदी छान हसली. आणि मला एकदम बरं वाटलं. चला बी पी कमी झालं एकदाचं..

बाईफोबिया!! आमचा एकदम आवडता शब्द होता हा लहानपणी. कधीही जेव्हा आया आणि काकवा जमतील तेव्हा नक्की चर्चिला जाणारा विषय म्हणजे "आमची बाई!!!" कधी ही हे २ शब्द ऐकायला मिळाले की आम्ही सगळी लहान मुलं तिथून पळ काढत असू. जेव्हा अगदी पहिल्यांदा आम्ही आयांना हे चघळताना ऐकलं तेव्हा कदाचित ते ऐकलं ही असेल पण समजायला लागल्या पासून आम्ही सगळी लहान जनता तिथून पळून जाण्यात जास्त धन्यता मानायचो. कारण मग त्यान्चे डायलॉग आम्हीच मारायचो. मग त्या चिडायच्या. आम्हाला अजून ओरडा मिळायचा. सांगितलंय कोणी!! भागो यहासे उससे अच्छा.पण आईची नक्कल करण्यासाठी मात्र ते डायलॉग खूप मस्त वाटायचे.

"अहो जयाताई तुम्हाला सांगते नं ह्या मंदाला कितीहि सुट्या दिल्या तरी ही आपली वेळेवर चाट मारणार ती मारणारच. किती ही काहीही करा हो. ह्यांना सुट्या द्या, खायला प्यायला द्या, पोराबाळांसाठी द्या. ऐन तुम्ही लोक येणार तेव्हा ही निरोप पाठवते पोराच्या हातून, ' बाई आज आई येणार नाही.' झालं. मुलगा पाठवला म्हणजे तिला हेपण माहिती असतं बरं, की मी त्याला काही काम सांगणार नाही. मुलीला म्हणून ती पाठवतच नाही. मी घासतेच आहे आपली भांडी."
ह्यावर तिच्या जयाताई," अगं हो नं, माझी बाई तशी चांगली आहे, इतर वेळेला काही नाही पण सणासुदीला हमखास चाट. मग आपण आपला तो पुरणा-वरणाचा स्वैपाक पण करा आणि ती धुणी भांडी पण करा. " मग गाडी हळूच आमच्यावर घसरणार, "आणि ह्या पोरींना पण काही मदत करायला नको." तेव्हा आपण मग समजून जायचं, आता पुन्हा काहीतरी नवीन ऐकायला मिळणार. आणि मग काकु तिच्या घरी गेली की मग आपली आणि चुलत बहिणीची तुलना पण होणार. "शिका जरा त्यांच्या कडून, आईला किती मदत करतात. नाही तर तुम्ही बघा" म्हणजे आता आम्ही मधे कशाला आठवलोय असंही होणार. आणि मला लहान असतान एक अजून प्रश्न पडायचा, तिच्या घरी पण तर सण असेलच ना, पण अशी शंका पण काढणं म्हणजे पुढच्या धपाट्याची तयारी करणं असतं हेपण हळूहळू कळलंच.

थोडं मोठं झाल्यावर मग आम्ही आईशी वाद पण घालायचो की त्या पण तर कामच करतात ना, त्याना सुट्टी नको का मिळायला. थोदा वाद झाल्यावर मग आईपण हळूच म्हणायची "त्या बाईसाठी भांडता आहे कधी मला पण सुट्टी द्या ना, मग बघू तिच्या सुट्टीचा किती विचार होतो." मग आम्ही हळूच तिथून काढता पाय घ्यायचो. कारण माहिती असायचं आता गाडी आमच्यावर घसरणार आहे हळूहळू. तेव्हा इथून सटकलेलं बरं. पण तरीही थोडे दिवसानी पुन्हा हेच बोलणं व्हायचच.

तर असा हा बाईफोबिया. मला वाटतं समस्त स्त्रियांना हा होत असावा. लग्न करून लगेच इथे आल्यामुळे आणि त्याआधी होस्टेललाच राहिल्यामुळे कदाचित मला अजून ही लागण झालेली नाहीये पण you never know. कल किसने देखा है!!!

गुलमोहर: 

अग नवीन, मला अजुनही तिकडे गेले की एकदा तरी होतोच बाईफोबिया आणि ईथे असतांना त्या बायकांच्या आठवणीने झुरायला होतं दिवसातुन दोनदा तरी:))))) बाकी तुझ्या आईचे म्हणणे 'बाईचा येवढा विचार...' अगदी खरे आहे! बिचार्या आयांना आपण किती 'टेकन फॉर ग्राअण्टेड' घेतो हे समजायला काही वरशं जावी लागतात! छान लिहीलय गं तू!

बाकी तुझ्या आईचे म्हणणे 'बाईचा येवढा विचार...' अगदी खरे आहे! बिचार्या आयांना आपण किती 'टेकन फॉर ग्राअण्टेड' घेतो हे समजायला काही वरशं जावी लागतात!<<
अगदी अगदी...

चांगलं लिहिलंय.

बाई आहेस न, होणारच तुलाही कधी ना कधी हा फोबिया! Proud

त्यांचं न कळवता दांड्या मारणं म्हणजे डोक्याला ताप असतो खरंच.. जाऊदे. तू लिहिलं आहेसच, मी सुरू होत नाही पुढे! Happy

आपल्या सगळ्यांना बाईफोबिया झालेला आहे. नक्कीच.
तरी मी अजून स्वैपाकाला बाई शोधतेच आहे..
(सायो मला जादूची बाई मिळाली नाही.. विचारण्याआधी सांगून टाकते नाहीतर परत जखमेवर मीठ.... Wink )

मस्त लिहीलयस Happy

बाकी तुझ्या आईचे म्हणणे 'बाईचा येवढा विचार...' अगदी खरे आहे! बिचार्या आयांना आपण किती 'टेकन फॉर ग्राअण्टेड' घेतो हे समजायला काही वरशं जावी लागतात!<< हे बाकी खरय

बाईफोबियाच काय पण वेळप्रसंगी यंत्रफोबिया पण होतो (ऐन कामाच्या वेळी मिक्सर, फु.प्रो., मावे सारखे अष्टकासारखे इतर हात जेव्हा दगा देतात तेव्हा) Proud

तसा मी स्वयंपाक स्वःताच करतो ,तरि पण ...........हे खालील वाक्य खरेच ..आहे
आपल्या सगळ्यांना बाईफोबिया झालेला आहे. नक्कीच.

माझ्या घरी निराळाच प्रॉब्लेम. 'मला घर घ्यायचंय, पैसे द्या..' म्हणून आमच्या कामवालीने आठ दिवस रडून गोंधळ घातला होता. मग 'देत नाही जा' सांगितल्यावर आठ दिवस दांडी. अक्षरशः आणिबाणी. Uhoh गयावया करून बोलवून आणावं लागलं. पण त्यानंतर तिने भांडी आपटायला सुरुवात केली. मग 'पोचे परवडले' हे धोरण लागू करावं लागलं. आजकाल ती काम करते तेव्हा घरात कुणीच नसतं. फरशा पण वैतागल्या असतील बहुतेक. Sad

बरोबर आहे, न सांगता बाई ने दांडी मारली की माझ्या आईचं डोकं सणकलच म्हणून समजा..आयत्या वेळेला भांडी घासावी लागतात ना..

ह्म्म्म्म... भारतात पाहिलय ..पाहुणे येणार असले की बाई हमखास गायब होणार,तिच्या गावी असलेली म्हातारी सासू आजारी पडणार इ.इ. वेळा बिळा पाळणे असल्या फालतू गोष्टींवर त्यांचा अजिबात विश्वास नसतो. आठ ला यायची तिची वेळ असते तर ९ शिवाय उगवत नाही.. मग आमचं इन्टरकॉम नॉन स्टॉप वाजू लागतं.. इतर ज्या शेजार्यांकडे ती बाई काम करते त्यांच्याकडून पृच्छा होऊ लागते,'रंजना आली का तुमच्याकडे'.. आमचं 'हो' असं उत्तर आलं की त्यांचा जीव (खरकट्या!!)भांड्यात पडतो Proud खरय 'बाईफोबिया' व्हेरी मच अस्तित्वात आहे गं बाई!!!!

सगळ्यांना धन्यवाद!! हा सगळ्या गृहिणींचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. लहानपणापासून अगदी म्हातारपणापर्यन्त प्रत्येकाला एकदा ना एकदा ह्यातून नक्की जावं लागतं. त्यामुळे मी नेहमी प्रार्थना करते देवाला की पुढे मागे मला जर का हा फोबिया झालाच तर तोवर ह्याचं रामबाण औषध निघू दे!!! कमीत कमी कामवाल्या बाई चे पाय धरावे लागणार नाही एवढी ताकत अंगात ठेव. Happy