छंद दे..

Submitted by प्राजु on 12 January, 2010 - 12:59

गर्दकाळी रात्र सारी, तेवणारा चंद्र दे
जीवघेणी ही निराशा, जीवनाला स्पंद दे..

ध्येय नाही फ़ार मोठे जीवनाचे माझिया
सत्य व्हावे, स्वप्नं ऐसे, पाहण्या आनंद दे..

कोसळ नको भिजवणारा तापलेल्या भूमिला
चार थेंबानी खुलावा, आगळा मृदगंध दे..

बधिर झाल्या भावनांची कास का मीही धरू?
वेदनेला पेलण्याला, या उरी आक्रंद दे..

रोज जोडूनी तुटावे हे असे धागे नको
जीवनाला बांधणारा एक प्रेमऽबंध दे ..

मी न मीरा, मी न राधा, ना तयाची प्रेमिका
दर्शनाने मुग्ध व्हावे, तोच देवकिनंद दे..

स्तोम नाही प्रार्थनांचे, दक्षिणेची लाच ना
लीन व्हावे ज्या पुढे मी, त्या तुझा बस्स! छंद दे..

- प्राजु

गुलमोहर: 

प्राजु : काय जमलीय .... आख्खी कविताच एकदम एकदम अप्रतीम !!!! दिवसाची काय सुरुवात झालीय... बिग थँक्स टू यू !!!!!

क्या बात है प्राजू...अगदी स्पर्शुन गेली हृदयाला..

ध्येय नाही फ़ार मोठे जीवनाचे माझिया
सत्य व्हावे, स्वप्नं ऐसे, पाहण्या आनंद दे..

>>>>मला वाटलं माझंच मागणं मागितलंस देवाकडे!!

थेट निवडक १० त!

व्वा! आज वेळ काढून सहज डोकावलो तर एकदम खजिनाच दिसला. आधी वाचून दाखवली होतीस; पण येथे अजून छान वाटतेय. आम्हालापण 'दे' तुझ्या प्रतिभेचा परीसस्पर्श!

मी न मीरा, मी न राधा, ना तयाची प्रेमिका
दर्शनाने मुग्ध व्हावे, तोच देवकिनंद दे..

स्तोम नाही प्रार्थनांचे, दक्षिणेची लाच ना
लीन व्हावे ज्या पुढे मी, त्या तुझा बस्स! छंद दे..

अतिशय सुंदर पल्ली.

मी न मीरा, मी न राधा, ना तयाची प्रेमिका
दर्शनाने मुग्ध व्हावे, तोच देवकिनंद दे.

झक्कास. ही ओळ खूप आवडली. आणी अख्खी कविताच छान आहे.