मृगजळ

Submitted by Girish Kulkarni on 11 January, 2010 - 01:43

****************************************************
****************************************************

नमस्कार मंडळी...मी या कथेचा सुत्रधार्...कथा कसली चांगल्या तीन कथा सांगणारय -एकमेकांशी नात सांगणार्‍या....एकाच सुत्रात गुंतलेल्या......समाजाच्या तीन वेगळ्या थरात अन वेगळ्या जाणीवांच्या पसार्‍यात घडत असलेल्या या वास्तविका आहेत.......सुरुवात कुठुन करायची हा विचार करत होतो......मला वाटत गौतमपासन सुरुवात करुया.....

**********************************************
:१:

गौतम देव,वय वर्षे पस्तीस,लग्न केलेल नाही अन करायची इच्छाही नाही असा "मै ही मै हुं" वाला प्रकार.इनवेस्टमेंट बँकींगच छानसं करीअर....खर्‍या अर्थान हुशार पण संधीसाधू, लाघवी अन करारीही अशा इंनवेस्ट्मेंट बँकर्सच्या वेगळ्याच गोतावळ्यात वावरायची उत्तम सवय झालेला स्मार्ट अन हँडसम माणूस.लग्न ही एक भग्न संस्था झालीय हे मानुन चालणार्‍या वाढ्त्या समुहाचा भाग होता अन त्याबद्दलच त्याच पक्क अन आखीव तत्वज्ञान होत.
"मॅरेज अ‍ॅज अ‍ॅन इंस्टीट्युशन डिफाईज लॉजीक...." तो हे ब्रम्हवाक्यासारख नेहेमी वापरायचा.
"सगळीकडे बघा.... अमेरीका-युरोपच सोडुन दे..ते विकसीत देश आहेत पण आपल्याकडे बघा ..अरे नुसत हे शतकांपासुन चालत आलय म्हणून आपण अजुनही जपायच्या नावाखाली सगळ चालवतोय....लग्न हे कधी शारीरीक अत्याचाराच,कधी भावनिक अतिरेकाच तर कधी दोन्ही एकत्र करण्याच परमिट झालय आता" त्यान एकदा ऑफीसच्या ख्रिसमस पार्टीत या विषयावर धमाल उडवुन दिलेली.
"आज मुबईतच लग्नाच्या पहिल्या वर्षीच घटस्फोटासाठी अर्ज करणार्‍यांची संख्या बारा टक्क्यांवर आलीय्...म्हणजे वर्षात जर १०० लग्न झालेली असतील तर त्यातली १२ वेगवेगळ्या कारणांनी विभक्तीसाठी कोर्टात आलीयत...यातन स्पष्ट दिसतय की लग्न/विवाह ही एक संस्था म्हणुन मोडकळीस येऊ बघतेय याची ही नांदी आहे...नविन पिढ्या जसजश्या जास्त शिकतील, त्यांचा अनुभवांचा परीघ जसाजसा मोठा होईल तसतस हे चित्र आणखी स्पष्ट अन विदारक होत जाईल्....मग का करायचा अशा गोष्टींचा पाठपुरावा..." - तो अतिशय तयारीनं कुठल्याही विषयावर बोलत असे.तर्काला तिलांजली देण त्याच्या स्वभावात नव्हत. व्यवसायातले गुण कधी कधी व्यक्तीगत आयुष्यातही जमेची बाजू ठरतात ते असे.

"अरे जरा फटाफट आटपा...वेळ होतोय..." गौतमन सामान अनपॅक करणार्‍या रिलोकेशन कंपनीच्या माणसांना जरा दरडावुनच सांगितल. तो सामान शिफ्ट करत होता बंगलोरहुन मुंबईला.त्याला येवुन जवळ जवळ महीना झालेला मुंबईत पण तो अपार्टमेंट तयार झालेल नव्हत म्हणुन थांबलेला.हवा असलेला रंग,अपहोलस्ट्री. सोफ्यांच डिझाईन अन लाईटींग सगळ त्यान मनासारख करुन घेतलेल सामान आणायच्या पहीले. ही एकदम अपमार्केट वस्ती होती. जिथे बरोबर राहाणारे फक्त लिफ्टमध्ये किंव्हा भुकंप वा आगीमुळे बिल्डींग खाली करतांनाच दिसतात-बोलतात असाच तोही एक 'सहनिवास' होता. चाळीस मजल्याचा प्रचंड पसारा अन गौतमचा फ्लॅट पस्तीसाव्या मजल्यावर.छान सी-व्ह्यु , दिवस्-रात्र अखंड हैदोस घालाणारा वारा अन समोर आपल्या अफाट अस्तीत्वाची ग्वाही देणारा दर्यासागर्..सगळ गौतमन छान जमवुन आणल होत.

तेव्हढ्यात दारावरची बेल वाजली म्हणुन तो दरवाजा उघडायला गेला...
बाहेर एक मोठ्ठा फुलांचा बुके. त्यान मिळाल्याची पावती आणणार्‍याला दिली अन तो बुके घेऊन आत आला.
"काँग्रॅटस ऑन अकवायरींग युवर फर्स्ट अबोड इन धिस मॅड सिटी...- फ्रॉम : गेस व्हु ????.."
तो बुचकळ्यात पडला..नक्की कोण असाव हे...कारण त्याला फुल पाठवणारे बरेच ( म्हणजे बर्‍याच) होते त्यापैकी कोण असाव हा विचार करतच होता की त्याचा फोन वाजला...
"हे डुड्...मॉर्नींग्...गॉट द फ्लॉवर्स्..हमने सबने भेजे है...श्यामको 'ओपियम्'मे पार्टीभी रखी है तेरे आनेके खुशीमे...आठ बजे आ जाना...चल्...चाओ..." समीर मलकानी होता...त्याचा ऑफीसमधला मित्र अन सहकारी. त्याला ऐकुन बर वाट्ल्..

नाहीतर या घरातली पहीली संध्याकाळ एकटी घालवण म्हणजे कहरच होता...तस तो या ऑफीसच्या गँगला बोलवायचाच विचार करत होता पण ही पार्टीची आयडीया त्याला जास्त चांगली वाटली. त्यांना नंतरच्या वीकेंड्ला बोलावता येणार होत...त्यान ड्रायव्हरला फोन करुन रात्री उशीर होईल या तयारीन रहायला सांगितल अन तो बाथटबच पाणी सुरु करायला वळला..तेव्हढ्यांत परत फोन वाजला...आता कोण असाव अस म्हणत गौतमन रिसीव्हर उचलला...
"हाय रॉकी...वेलकम टू द सिटी ऑफ ड्रीमस्....जो तुमको मेरे साथ देखने है...."...ओह म्हणजे श्वेता...
"हे बेबज्....थॅक्स...क्या हो रहा है लाईफमे..." त्यान सहजच विचारल....
"तुम्हारा इंतजार यार्...और क्या ? तुला आज पार्टी द्यायचीय मला... ब्लु-फ्रॉग चलते है...खुप दिवसांत गेलेलो नाही....आज तुझ्या येण्याच्या खुशीत.... व्हॉट से ?" तिचा संध्याकाळचा कार्यक्रम तयार दिसतोय हे त्यान ओळखल..
"आज नाही श्वेता...आज मी कलीग्जबरोबर जातोय....त्यांनी अगोदरच सगळ अ‍ॅरेंजही केलेल आहे".. त्यान तिला अडखळतच सांगितल
"तो फिर कब मिलेंगे....मला पक्का वेळ दे...तुझ्याबरोबर व्होडक्यात डुंबुन कित्ती दिवस लोटलेयत माहीतीय्....तेरे साथ व्होडका-बातें अन ते बीटल्सच 'हे जुन'....सगळ दुसर्‍या कोणाबरोबर मझाच देत नाही रे...." तिन त्याला एकदम घेरलाच..
"नेक्स्ट वीकेंड..." म्हणत त्यान कसबस संभाषण आवरत घेतल...
त्याला मुंबईत येण महागात पडणार याची ही नांदी होती. गौतमच्या मैत्रीणींचा गोतावळा बराच मोठा होता अन बहुढा सगळ्या शहरांत जिथे जिथे त्याच येणजाण असे कामाच्या निमित्ताने तिथे तर होताच होता. मुंबईत जास्त कारण तो जरी बंगलोरला होता तरी त्याचा अर्धा महीना मुंबईतच डील्स करण्यात जायचा. मग इथल्या पार्टीज अन त्याबरोबर येणार सगळ ओघान आलच. श्वेता हे असच मुंबईतल ओघानेच आलेल पण मग बरच रुळलेल प्रकरण होत...
------------------------------
ओपियम माणसांनी फुललेला होता...सगळीकडे रंगीबेरंगी कपडे घातलेली , आपल्याच नादात-मस्तीत असलेली माणसं..ओपियम ओबेरॉयजचा एक "मोस्ट टॉक्ड अबाऊट"असा लाऊंज होता..एक टोक
समुद्राकडे होत तर दुसर बंदीस्त्...खालचा फ्लोअर मात्र पुर्ण बंदीस्त...गौतमला जागा आवडली...समीर मलकानी अन गँग कुठे दिसते का बघत तो पुर्ण लाऊंजचा फटका मारत होता...सगळीकडे पसरलेल हे चैतन्य त्याला फार आवडायच...
"हे चिफ...." तो समीर मलकानी होता...त्यांनी समुद्राकडच टेबल रिझर्व्ह केल होत्...गौतमन हात हलवुन येतोय सांगितल..
"गुड प्लेस यार्...आय रीअली लाईक्ड इट..." - गौतमन समीरला पावती दिली...
"ऑल फॉर यू मेट्...चिअर्स टू अस !!! " - समीर बोलला अन त्यान आपला ग्लास उंच नेला समीरच्या ग्लासजवळ..... अन सगळ्यांनी आपले ग्लास त्यांच्या ग्लासजवळ आणले चिअर्सच्या आरोळीसहीत.....
सगळे मस्त मुडमध्ये होते...लाऊंज म्युझीकन दणाणलेला..गौतम त्याच्या नाचण्यासाठी प्रसिध्द होता...
"चल गौतम्...शल वी डान्स...." ग्रुपमधल्या रश्मी नारंगला हुरुप आलेला की बारुणी रंगात यायला लागलीय हे कळायला मार्ग नव्ह्ता..
"आय अ‍ॅम ओके बट आर यु रीअली ऑन ..." - गौतमन तिला अप्रत्यक्ष सांगायचा प्रयत्न केला..
"ओ येस ...लेट्स गो "... अन ती दोघही डान्स फ्लोअरला आले...
भरपुर नाचुन झाल्यावर गौतमन रश्मीला आता बास म्हणुन खुण केली अन ते आपापल्या जागेवर परतले.
"फाईव्ह स्टार होटेल्स आपल्या मुडला पुरक असतात बरेचदा....तिथले ते परीटघडीतले श्वांस..मंद्-मंद प्रकाशयोजना..सोबतीच ते हवहवस संगीत्...अगदी जेवणाची मांडणी अन सजावट हे सगळ जगायला एक वेगळीच धुंदी देतं" गौतम त्याची आवडती स्कॉच पिता-पिता विचार करत होता. त्याला आपल्या आवडीनिवडी बरोबरीच्या लोकांत बिनदिक्कत सांगायला आवडायच्या. पण आम मध्यमवर्गीय या वातावरणात किती बुजतात ते त्यान बरेचदा आपल्या टीमच्या लोकांना अशा ठिकाणी आणल्यावर बघितल होत.सोफ्यावर सैल झोकुन देता देता गौतमन घड्याळात नजर टाकली...चार वाजत होते...
"हे समीर... मी निघीन आता...थकलोय जरा... वाँट टू स्लीप अर्ली...चल सी यु ऑल.." त्यान सगळ्यांशी हात मिळवले अन जायला निघाला...लॉबीतन येता येताच त्यान ड्रायव्हरला फोन करुन गाडी आणायला सांगितल...अन तो बाहेर पोर्चमध्ये गाडी येण्याची वाट पाहात थांबला..
गाडी येतांना दिसली तसा तो पुढे निघाला...
"अरे श्वेता तू ?" तो गाडीत अगोदरच बसलेल्या श्वेताला पाहुन दचकलाच...त्यान ड्रायव्हरकडे पाहील..
"साब मॅडमने मना किया बतानेको...." तो बिचारा चांगलाच बावरलेला ..
"गौतम..मीच सांगितल त्याला की मी गाडीत वाट पाहातेय तुझी अन तुला कळवायची गरज नाहीय म्हणुन्..मला आज तुला भेटायचच होत कसही करुन मग म्हटल वाट पाहीन इथच तुझी पार्टी संपेपर्यंत्..अन सरळ इथे आले अन ड्रायव्हरबरोबर गाडीत बसले.."तिनं सगळ प्रकरण सांगितल..
"अरे हे काय श्वेता...सांगायच तर फोन करुन .. निदान मेसेज तर करायचा...एनिवेज...आता कुठे सोडु तुला..."गौतमला जे सुचल ते तो बोलुन गेला..
"तुझ्या घरी...आज व्होडक्यात तुझ्याबरोबर डुंबल्याशिवाय अन बीटल्स ऐकल्याशिवाय मी जाणार नाहीय तशीही....अन आज मला काही बोलायचय तुझ्याशी... कम व्हॉट मे..." ती ऐकेल अस वाटत नव्हत तिच्या बोलण्यातन्...अन तसही ती त्यापुर्वीही त्याच्याबरोबर आलेली अन राहीलेली त्यामुळे गौतमला हे नविन नव्हत...
"ओके बेबी...लेटस गो" त्यान ड्रायव्हरला घरी चलण्याचा इशारा करत सीटबेल्ट लावायला घेतला...
मरीन ड्राईव्ह नेहमीप्रमाणे नटलेला होता अन रात्रीच्या तुरळक वाहतुकीमुळे 'अपने पुरे शबाबपर था'....रात्रीची मुंबई पाहाण.... त्या सुनसान रस्त्यांवर गाडी पळवण गौतमला फार आवडायच्..रात्रीच्या मुंबईच ते गुढ रुप त्याच अत्यंत आवडत होत....आज तर श्वेताही बरोबर होती...
"हिला भेटुन झाले असतील आता चार वर्ष..." गौतम मनातल्या मनात विचार करत होता...अशाच एका पार्टीतली ओळख्....तिला एनर्जी सेक्टरवर माहीती हवी होती अन नव्या मर्जर्सबद्दल काही बाईटसही..गौतम त्यावेळेस अश्या दोन डिल्सवर काम करत होता...तिथन झालेली सुरुवात...मिळते-जुळते स्वभाव्..दोघांची स्वछंदी जीवनशैली...यातन मैत्री वाढत गेली अन मग ती अगदी निकटच्या मैत्रीत कशी बदलत गेली दोघांनाही कळल नाही....
"सर गाडी पार्कींगमे लगाऊ या बाहरही रखु..." ड्रायव्हरच्या प्रश्नान तो एकदम भानावर आला...ड्रायव्हरला मालकाच अस रात्री-बेरात्री ड्रायव्हिंगला जाण माहीती होत त्यानुसार त्याचा प्रश्न होता.
"पार्कींगमे डाल दो और तुम संभलके जाओ.."त्यान उतरता उतरता श्वेताला हात दिला अन ड्रायव्हरला जायला सांगितल..
--------------------------------------------------
"हा व्होडका... ही बीटल्सची सीडी.. अन हा मी तुझ्यासमोर ..... आता बोल..." त्यान दोघांचे ग्लास भरले अन म्युसिक सुरु करता करता तिला हसुनच विचारल...
"नथिंग रे... तुला खुप मिस करत होते ऑफलेट्....म्हटल का होत असाव अस्...तु काही पहीला पुरुष नाहीस जो माझा मित्र राहीलाय मग तुझ्याबद्दल ही प्रचंड ओढ का वाटतेय....." काही सुचत नव्ह्त म्हणुन म्हटल जरा वेळ घालवावा तुझ्या बरोबर जरा बर वाटेल..." तिन प्रांजळ सुरुवात केली...
श्वेता आज सुंदर दिसतेय नेहेमीपेक्षा हे आपल्या लक्शात कस आल नाही अजुन....तो मनाशीच पुटपुटला..
"श्वे.... हे सेंटी होण चांगल नाहीय बेबी आपल्यासारख्यांसाठी ...ऐसा तो वो लोग करते है जिनको शादी वादी करनी होती है....." त्यान गंम्मत करायच्या अविर्भावात उत्तर दिल...
"तसही कधी कराव म्हणतेय गौतम.... का नको तस बघायला आयुष्याकडे.. हे स्वतःसाठीच जगण..मजा मारण्...अन मग लो वाटायला लागल की व्होडकात बुडवण स्वतःला ... हेही तर अंतिम ऑब्जेक्टीव्ह नसाव आयुष्याच्...मी तुला इतकी मिस करते म्हणजे मला तुझ्याबद्दल ती आत्मीयता वाटतेय्..शारीरीक आकर्षणापलीकडची...आज मला तुला हेच सांगायच होत्....अन विचारायच होत की व्हाय नॉट गिव्ह इट अ शॉट वन्स..." ती एका दमात बोलुन गेली..
गौतम बुचकळ्यात पडला.... हे त्याच्यासाठी नवच होत्...तो तयारच नव्हता अशा संवादासाठी...
"वॉव्..हे नविनच श्वे..बघ तु जर लग्नाबद्दल म्हणत असशील तर मला वाटत मुश्कील आहे...तुला माहीतीय मी लग्न अगदी अनावश्यक मानतो आयुष्यात्...लग्न हे माझ्यासाठी नुसत रिच्युअल नाहीय श्वे..तो एक अतिशय गुंतागुंतीचा अन इंटीमेट असा एक न्यास आहे ज्यात तुमचा स्वताचा तारतम्याचा सेंस अन जोडीदाराची निवड हे अतिशय क्लिष्ट अन जिकीरीच काम असत..... तुला प्रामाणिकपणे सांगायच तर ते तारतम्य माझ्यात अजुन आलेल नाहीय अन म्हणुन जोडीदार शोधायचा प्रयत्नच मी केलेला नाहीय आजपर्यंत..." तो तिला समजावत म्हणाला
"तो येऊन जाईल गौतम प्रोव्हायडेड आपण एकमेकाला पसंद करत असू तर...बाकीच सगळ होईल कालापरत्वे...." तिला जे मनापासुन वाटत होत ते ती बोलत होती..
"हिच चुक समाजात सगळे करतायत...तुला माहीतीय आपल्याकडे लोक लग्न करतात समाजासाठी,समाजातच अन मग ती टिकवतात समाज काय म्हणेल म्हणुन्.. नातेवाईक काय म्हणतील्..मित्र काय म्हणतील अन मुल काय म्हणतील म्हणुन्...स्वतःसाठी कोणीच ते टिकवायला बघत नाही.....मग ती संस्था कशी चालणार ....लग्नाचे फायदे अन चांगुलपणाच्या गोष्टी करतांना समाजातली लोक हेही सांगत असतात की जर हे नियम अन शिस्तीच चक्र तुटल अन स्त्री-पुरुषांना मुक्तसंचाराच स्वातंत्र्य दिल तर समाज रसातळाला जाईल्...मला हे म्हणायचय की जर तुम्ही या अ‍ॅरेंजमेंटबद्दल इतके आश्वस्त आहात अन त्यात आनंदीआनंदच आहे तर मग कुणाला अस बांधायच कारणच काय.... तो आनंद -हॅपीनेस सगळ्या गोष्टींची काळजी घेईल आपोआप...." गौतम मनापासन बोलतोय हे ती पाहात होती..
"अन म्हणुनच माझा लग्न या संस्थेवर विश्वासच नाहीय्....करवा चौथ रोमांसेस सिनेमात ठीक ग पण प्रत्यक्षात मला तो एक वेगळ्याच दास्यत्वाचा प्रकार वाटतो......तू वाईट वाटून घेऊ नकोस पण मला तु मित्र-सहचर म्हणुन आवडतेस ग पण त्याला अस फॉर्मल स्वरुप द्यायला मला नाही आवडणार्....सारी गंमत निघुन जाईल बघ काही काळानंतर..."
" मला अशा एकट्या जगण्याची सवय झालीय श्वे आता... तुझ्यासारखे मित्र-मैत्रीणी आहेत जे हाकेला धावुन येतात अन बरोबरीला माझ काम आहे त्यात आयुष्य मजेत चाललय्...मला यात आणखी वैविध्य आणायचच नाहीय..... मी असाच राहीन शेवटपर्यंत..." त्याला सगळ स्पष्ट सांगण संयुक्तीक वाटत होत...
"ठिक आहे गौतम... तु म्हणतोयस तर मी मागे नाही लागणार्...आपण मित्रच राहू पण एक सांगावस वाटतय तुला....जेव्हां गात्र शिथील होतील्...कामाच ग्लॅमर संपेल तेंव्हा तुला जाणवेल की अस कोणी आपण जवळच जोपासायला हव होत्...अरे लग्न म्हणजे हे असच जोपासत राहायच असत एकमेकाला...एखाद्या माळ्यासारख... हृद्यपणे..मग ते बहरतं अन संध्याछाया जेंव्हा भेडसावायला लागतात तेंव्हा तो बहर खुप कामास येतो ..पण असो तुला हे परत एकदम सेंटी वाटेल सगळ बोलण्...बट आय गेस...आय हॅव्ह गॉट अ राँग ऑडीयंस...." अस म्हणत ती उठली...
"अरे हे काय ...तु निघालीस्...'हे जुन' न ऐकताच....चल मी सोडतो तुला " अस म्हणत तोही गाडीच्या चाव्या घायला उठला....
"आता कम सप्टेंबर बघीन-ऐकीन म्हणते...." तिन एक डोळा बारीक करत हसतच सांगितल..

-----------------------------
तर ही पहीली वास्तविका...गौतम्-श्वेता या मुक्त आयुष्य जगणार्‍या मॉडर्न युगलाची. आता पुढे वळुया..पुढच्या वास्तविकेत आता मी ओळख करुन देणारय एकदम वेगळ्याच जोडप्याची..

****************************************************
:२:

मीना-माधव हे जोडप खोतवाडीतल आदर्श अस जोडप असाव. माधवचा कॅटरींगचा व्यवसाय. मीना शिकलेली पण घर सांभाळणारी ,वाचन-मुलं-लेखन करणं यात छान रमलेली. लग्नाला दहा-बारा वर्ष झालेली तरीही त्यांच अगदी तसच होत जे इतर सगळ्या"छान"लग्नांमध्ये होत.पण ती अन तो हे सगळ छानपण फार तारतम्यान सांभाळायचे. मुलांची शिक्षण, त्यांच्यावरचे संस्कार वैगरे जबाबदार्‍या हे एक चांगल कारणही होत हा सगळा मामला सांभाळुन ठेवायच.
त्यांच एक अतिशय समंजस विश्वही होत...तो तिच्या लेखनाची/कवितांची आवर्जुन चौकशी करणार...तारीफही करणार...
"तू मराठी वेबसाईटसवर लिहीत जा ना... तिथे कोण्-कोण अन काय काय कविता म्हणुन टाकतात... तुझ्या त्यामानान खुप चांगल्या वाटतात...." अस म्हणुन तो तिला चिडवायचाही...
"दुपारचा चहा तर फक्त बायकोबरोबर...त्याशिवाय दिवसाच समाधानच होत नाही" हे त्याच मात्र अगदी ठरलेल होत...शहरात असेल तर तो कसही करुन तेव्हढा अर्धा-पाऊण तास घरी यायचाच तिच्याबरोबर घालवायला...त्यांच जे काही मस्त चालल होत त्याला या छोट्या-छोट्या गोष्टी बर्‍याच अंशी कारणीभुत असाव्यात.
ती तर माधवपेक्षा जरा जास्त स्मार्ट अन अचुक्...तिच्या कवितांसारखी. ती लग्न हा अतिशय देत्-घेत राहायचा मामला आहे हे आईकडुनच शिकुन आलेली त्यामुळे कुठे किती सोडायच्-अडायच हे तिला चांगल अवगत होत. त्याच्या व्यवसायात ती कधीही नाक खुपसत नसे...पैशांचे व्यवहार सगळे माधवच करायचा... तिला महीन्याची काही ठराविक रक्कम दिली की ती त्यात घर चालवणार..लागले अजुन तर मागुन घेणार्...त्यापलीकडे काही नाही...कुठली बँक्..कसल लोन्..कसली गुंतवणुक यात ती कधी पडत नसे..

थोडक्यात काय तर त्यांच्या सुखी संसाराची किल्ली त्यांच्या समंजस वागण्याच्या पेटीत असावी. त्यांच्या मर्यादीत विश्वाला पुरक असाच त्यांनी अपेक्षांचा पसाराही ठेवलेला त्यामुळे त्यात गॅप निर्माण व्हायचा तसा धोका कमीच्.

लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात त्याच धंद्याच जेमेतेमच चाललेल पण एक दिवस काहीतरी हातात येईल यासाठी मेहनत करायची त्याची तयारी असे. त्याकाळात त्यान तिच्यासाठी कधीही काही आणल-बिणल नव्हत पण रोज एक गुलाबाच फुल मात्र न चुकता आणायचा...त्याला तांब्याभर पाण्यात ठेवायचा अन सकाळी तिची आंघोळ झाल्या झाल्या ती देवघरात देवासमोर आली की हा मागुन येऊन तो गुलाब तिच्या केसात माळायचा...
"प्रत्येकाची दिवस सुरु करायची एक पध्दत असते.... तू देवबाप्पासमोर करते तर मी माझ्या देवीला फुल देऊन करतो... आखीर मामला तो एकही हुवा ना...."- हे असल डायमंडपेक्षा जास्त काम करुन जायच दोघांकरता...
"नात्यातला हेतु स्पष्ट दिसायला हवा मीना.... त्यालाच हे आजकाल 'कम्युनिकेशन' वैगरे म्हणतात्...अरे जर इंटेंट सरळ दिसत असेल ना तर कुठल नात फेल होऊ शकत मला सांग..." माधव कधी कधी रंगात असेल तर अस काहीतरी मनापासुन बोलायचा अन ते तिला फार आवडायच...
तेव्हढ्यावर त्यांची पहीली काही वर्ष मजेत निघुन गेली. कधी चुकुन पाव-भाजी, तिला आवडतो म्हणुन मसाला डोसा अस तो एकदम करायचा...माधवच हे सरप्राईज एलीमेंट तिला छान चेंज वाटायचा.

अस सगळ आटोपशीर चाललेल असल्यामुळे निदान त्यांना दोघांना विवाह्संस्थेबाबत भक्कम आस्था वाटायची. दोघ त्याची खंदी समर्थकपण होतीच.... अन सगळ्यात महत्वाच म्हणजे त्यांची स्वतःची संस्था उत्तम चाललेली असल्यान त्यांना ते नैतिक पाठबळपण आपोआपच आलेल..
"माधव सगळे पुरुष तुझ्यासारखे समजदार झाले ना तरीसुध्दा लग्न या संस्थेची गरज राहाणार नाही बघ.." ती हसुन म्हणायची...तिला आसपासच मध्यमवर्गाच चित्र चांगल ठाऊक होत...लग्नानंतर नवरा-बायकोनी आपल्या नात्यात त्या ओढुन्-ताणुन आणलेल्या भावनांच कौतुक वाटे तिला...
"कस टिकत असेल हे सगळ आपोआप्..इतकी वर्ष...विनातक्रार...हे काही अपेक्षा न ठेवण्यामुळे की दोघही सरावुन जातात यापध्दतीच्या जगण्याला...." ती स्वताशिच विचार करी अन आपल अस नाही म्हणुन मोहरुन उठे.

मग मुलं झाली अन सगळ घर मुलांच्या प्राथमिकतांभोवती फिरायला लागल. दोघांनी आपापल्या भुमिका पण तशा दुय्यम करुन घेतल्या - मुलांसमोर्..मुलांकरता..ज्यायोगे मुलांना त्यांच घरातल स्थान कळाव अन त्यांचीही बांधीलकी त्या घराशी-संसाराशी तेव्हढीच असावी हा हेतु. तो पण छानच जमलेला.
"तु मुलांना काय हव ते पहिले करत जा.... मला डावलल तरी चालेल आता..." तो हटकुन सांगायचा
तिलाही मग सगळ त्या क्रमान करता यायला लागल.....
दोन मुलांची शाळा-अभ्यास्-खाणी आणि माधवच व्यवसायात अजुन काय जास्त करता येईल हा धोशा यात त्यांच्या दिनचर्या कशा बदलत गेल्या हे दोघांनाही कळलच नाही.अर्थात यासगळ्यात सकाळच गुलाबाच फुल, दुपारचा चहा यातल सातत्यही कमी व्हायला लागल.
"सगळ ठिकच तर आहे मग आजच्यादिवस नाही फुल तर काय्....आज नाही घेतला चहा बरोबर तर काय झाल......"हे सगळ एकमेकांबद्दल एकतर्फी ठरवुन घेण वारंवार व्हायला लागल. माधवचा व्यवसायही स्थिरावत होता त्यामुळे तो आजकाल जरा जास्त नेटान सारं करतोय अस तिला वाटायच.
"पण यात आपल्यातल्या ओलाव्याला का कमी करा - निदान तो दाखवायच्या पध्दती का बदला "असही तिला नेहमी वाटुन जाई. माधवच जगण्याच तत्वज्ञान बदलतय का या धंद्याच्या चढाओढीत की आपण उगाच बाऊ करतोय सगळ्याचा...की दहा-बारा वर्षांचा तोचतोचपणा डोक वर काढु बघतोय अशा विचारातन्.....ती बर्‍याचदा या विचारांत वेढलेली असे..अन अचानक मुलं शाळेतन येत मग त्यांच करता करता तीला सगळ विसरायला होई. यासगळ्यातन स्वतःला अबाधीत ठेवायच हेही काम होतच. मग तिन आपल लेखन आणखी वाढवायला सुरुवात केलेली. इंटरनेट वैगरेसारख्या सोप्या व्यासपीठांमुळे तिला लगेच आपल लिखाण लोकांपर्यंत पोहोचवताही येऊ लागल्याच तिला फार समाधान वाटे....आयुष्यातल्या अनुभवांमुळे असाव पण तिच लेखनही आता बरच बहरायला लागल होत...

-------------------------------------
"आजकाल तुझ्या लिखाणात एक तक्रारीचा सुर जाणवतो ग..." - माधव तिला बर्‍याच दिवसांनी लेखनाबद्दल काही बोलला...घरी दोघच असतांना...
"अरे...म्हणजे तुला वेळ मिळाला तर वाचायला...ग्रेट.." - मीनाचा टोला तो ऐकुन न ऐकल्यासारखा करत माधवन तिला बसायला सांगितल..
"मीना ...काय झालय...तुला काहीतरी सांगायचय का जे तु तुझ्या लिखाणातन कळवु बघतेयस्.... निदान मला तरी अस वाटतय गेल्या काही महीन्यांपासन..." त्यान तिला सरळच विचारल
"बर केलस तु विषय काढलास माधव...मीही बोलणारच होते तुझ्याशी...मला कित्येक दिवसांच हे फिलींग छळतय की आपण रेट्ले जातोय एकमेकांबरोबर्...मुलांकरता..समाजाकरता..अन कोण काय म्हणेल याकरताही..आपण आपल्याकरता जगतच नाहीय..."मीनान सुरुवात केली
"बघ मीना...आता दहा वर्षापुर्वीसारखी परिस्थिती नाहीय ना धंद्यात्-ना नात्यात ना कुठेही....आता पुर्वी इतकेच पैसे कमवायला अन आपल स्थान टिकवायला पुर्वी करायचो त्याच्या चारपट मेहेनत करावी लागते. मग थोड घरात दुर्लक्ष आलच.." त्याचा सुर समजावणीचा होता
"नात्यातलही बघ... आता मुलं आहेत..त्यांच्या जबाबदार्‍या आहेत...सगळ्यात वाटेकरी आहेत मीना अगदी एकमेकांना द्यायच्या वेळेत अन प्रेमातही.. होप यु अग्री ..." माधव तस मनातल बोलतोय अस तिला वाटल.
"तुला अस नाही वाट्त माधव या समंजसपणाच्या आवेशात आपण जगण्यातल काही "रीअल फन" मिस करतोय ते....तू व्यवसायाच म्हणतोयस पण इतक्या वर्षांनीही जर असच पळायच असेल तर मग प्रगती काय केली आपण? उलट तेंव्हा निदान एकमेकांबद्दलची ओढ बर्‍याच उणीवा झाकुन टाकायची..." - मीनालाही मनातल त्याला सागायचच होत..
"तसच आपल्या संबधातलही....तोही एक उतरत्या भाजणीचा हिशेब ठरतोय तुझ्या व्यवसायासारखा...पण फरक हा की व्यवसाय नव्यान बांधता येतो रे..नात्यांत ती शक्यता अगदीच धुसर..
मला अस वाटत असत की सगळ काही आहे पण तरी काहीतरी मिस करतोय आपण.... हे प्रकर्षान जाणवत असत आजकाल...." मीना थांबायला तयारच नव्हती..
"आता बारा-तेरा वर्षांनी वाटतय की अरे हे आणखी वेगळ्या पध्दतीन करता-जगता आल असत का?आपले ओलावे असे अवचित निघुन जाण्याला जबाबदार कोण? कोण कुठे कमी पडतय का? की यालाच आयुष्य म्हणतात अन हे असच होत जात काळापरत्वे?.....खुप सारे प्रश्न आहेत... उशीर झालाय का ते माहीत नाही पण वाटुन जात खर...." मीना जरा गंभीर होतेय अस वाट्ल त्याला.
"मला कधी कधी असही वाटुन जात माधव यातन की मी माझ अस काही आयुष्य जगलेच नाही...पहीले काही वर्ष तुझ्याभोवती पिंगा घालण्यात गेला मग मुलांकरता...स्वतःसाठी अस काही जगलेच नाही आजपर्यंत्...अन तुला हे कधीच जाणवल नाही हे आपल्या नात्याच अपयश आहे अस मी मानते...........
तु मला"लग्न झालय" या एकमेव सबबीखाली गृहीत धरीत गेलास अस मला आता अगदी ठामपणे वाटायला लागलय..मला स्वतासाठीही थोड जगायचय माधव..अँड आय होप यू विल अंडरस्टँड दॅट...!!!!" मीनान त्याच्या डोळ्यात बघतच आपल बोलण थांबवल.
माधवपण गंभीर झाल्यासारखा दिसत होता. त्याला काहीतरी बिनसलय याची जाणीव झालेली पण ते या थराच असेल हे मात्र तो जाणुन नव्हता. यावर काहीतरी आश्वासक करायला हवय हे मात्र तो तिच्या निर्वाणीच्या वाटणार्‍या बोलण्यातन ओळखुन गेला.त्यान स्वताहुन काही सुचवण बहुधा तिला मान्य होणार नाही इतक तो मीनाला ओळखुन होता.
"बघ मीना तू जे काय म्हणतेयस ते खरही असाव बहुधा पण यात मुद्दामहुन दुर्लक्ष करायचा उद्देश नव्हता. आता यावर काय कराव अस तुला वाटतय ज्यायोगे आपल्यातला हा जो,ज्याला मीतरी तात्कालीकच म्हणीन-दुरावा झालाय तो नष्ट होईल अन आपण सगळ पुर्ववत करायचा प्रयत्न करु..." त्यान चेंडु तिच्याचकडे टाकला... त्याला बघायच होत ती किती तयारीन बोलतेय ती...
" मलाही माहीत नाही माधव... मला ही घालमेल माहीतीय....त्यावरची उत्तरं नाही माहीत.." तिनं स्पष्टच सांगितल...
"उत्तरं माझ्याकडेही नाहीत मीना... अस करुया का... लेटस कन्सल्ट अ स्पेशियालिस्ट... आपण मॅरेज काऊंसिलरकडे जाऊयात्...बघु तो त्रयस्थ अन सुझ भुमिकेतुन काय सुचवतो ते ...." माधवला आता तिला काही चांस द्यायचा नव्हता. अन खर म्हणजे तोही जरा गडबडलेलाच या सगळ्यात्...त्याला कळलच नव्हत की पैसे कमवायच्या लालसेन त्याच काय नुकसान झालय ते.... ना धंदा नीट मार्गी लागलाय ना संसार...
"साऊंडस गुड माधव...लेटस डू दॅट!!!!" मीनान होकार दिला त्यात तिच कन्व्हीक्शन किती होत ते तिलाही कळल नाही पण त्यातल्या त्यात तिला हेच जरा संयुक्तीक अन रिलायेबल वाटुन गेल.

------------------------------------
तर मंडळी ही मीना-माधवची कथा..... नात्यांमधल अपुर्णत्व कस-का अन केंव्हा उफाळुन येईल सांगता येत नाही ना....असो आता तिसर्‍या भागाकडे नेतो तुम्हाला... हा मामला एकदम वेगळा आहे म्हणजे जरा चाकोरीबाहेरचा आहे.....मामला आहे अनिकेत अन सारीकाचा...

***************************************************
:३:

अनिकेत सावळे आपल्या आयटी करीअर मध्ये खुश होता की वाहत जात होता याबद्दल त्यान विचार करण केंव्हाच सोडुन दिलेल होत. हेच आपल्याला आयुष्यभर करायचय की आपल्याला दुसरा काही पर्यायच नकोय-सुचत नाहीय हे सगळे मुद्दे गौण वाटायला लागले इतका तो या नोकरीच्या आणि त्याअनुषंगाने आलेल्या जीवनपध्दतीचा गुलाम झालेला होता.
"चालत रे...नथिंग ग्रेट्..पण आणखी आता करणार काय...तूच सांग" - सारीकान त्यादिवशी ऑफीसला आल्या-आल्या सकाळच्या कॉफी सेशनला याच वाक्यान सुरुवात केली.
"तुला माहीतीय घरी सगळ असतांना मी तुझ्या जवळ येत गेले तेही या नोकरीमुळेच ना...नाहीतर मला कुठे तुला इतक जवळून बघायला मिळाल असत्...आता तर अस वाटत आपण कित्ती कित्ती वर्षांपासन एकमेकांना ओळखतो...मी तुला जास्त अन संजयला कमी ओळखते आता तो नवरा असुनही .....इतका वेळ आपण बरोबर घालवतो.... हे सगळ या आयटीच्या नोकरीमुळेच ना..." सारीका तस खरच बोलतेय हे अनिकेतलाही पटल.
"येस ग पण कधी कधी हे काम नसल की बेंचवर काही न करता बसुन राहाण...काम मिळाल्यावरही ते क्लायंटच्या मताप्रमाणेच सगळ करत जाण याचा कधी जाम कंटाळा येतो बघ्...तू नसतीस ना तर मी काय केल असत ते कळतच नाही...अन मीही अंजलीला कमीच मिळतो तुझ्यापेक्षा समजल्...पण दॅटस द कॉल वी हॅव टेकन बेबी... हे सगळ माहीत असुन आपण यात पडलो कारण ते आपल्याला सोयीच वाटल्...अ‍ॅम आय राईट???" - अनिकेतने तिच्याकडे बघत विचारल.
"हो रे ...यात राईट-राँगचा प्रश्नच नाहीय अनिकेत... त्याच्या आपण केंव्हाच पुढे गेलोय्...अन खर सागु याची आता भीती बीतीही वाटत नाही... सुरुवातीला वाटायच आपण जे करतोय ते योग्य का...आपण संजयला फसवतोय...पण आता तेही वाटेनास झालय्..मग त्याला गेल्या दहा वर्षांत आमच्या नात्यात आलेला तोचतोपणा कारण आहे, संजयच आपल्यातच गर्क असण आहे की मला ते आता प्रकर्षान जाणवायला अन नेमकी तुझ्याशी गाठ होण काय कारण असाव ते शोधायच्या फंदात मी पडत नाही.........ते म्हणतात न 'कावळा बसायला अन फांदी तुटायला' तस काहीस झाल बहुधा... आज मला तुझ्याबरोबर राहुन आनंद मिळतोय ना मग्...लेट्स टेक इट.. मग ते तुझ्याबरोबरच तासनतास बोलत बसण असो...संध्याकाळच ड्राईवला जाण असो....मला ते सगळ सगळ आवडतय्...मला वाटत हे सगळ मला उपभोगायला हवही आहे अन मी तेच करतेय... त्यात आपण एकमेकांना आवडतो-जपतो हा आणखी जमेचा भाग...." सारीका मनापासन बोलली.
अनिकेतन तिच्या डोळ्यात नजर घातली... त्याला बघायच होत बाई आज काय मुड घेऊन आल्यायत घरुन....
"हे बेबी... तुम तो सिरीयस हो गयी यार्...पण खर सांगत्येयस्...माझही फारस वेगळ नाहीये...माझही लग्न झालेल असतांना मी तुझ्यात गुंतत गेलो त्याला काय कारण असाव याचा शोध घेण मीही केंव्हाच बंद केलय. आपल्या आयटीच्या करीअरसारख मी 'आज'मध्ये जगतोय...मलाही तुझ्याबरोबर वेळ घालवायला अन ते सगळ करायला आवडत्..कारण नाविन्याचा शोध की तुझ्याबद्दलच आकर्षण की नुसत थ्रिल माहीत नाही ...पण जे होतय ते मला सुखावतय ... अन दॅटस व्हॉट आय.. नव्हे वी वांट फ्रॉम लाईफ......" अनिकेतही तिला पुरेस बळ देता याव म्हणुन की काय सगळ बोलुन गेला जे त्यान अजुन कधीच उघड केल नव्हत तिच्यासमोर..
"यावेळेस वीकएंड्ला कुठ जायच आपण.." सारीका
"बघु या कस ते...या वीकेंडला आशीष येतोय मलेशियातन...तु ओळखतेस का त्याला...तो पुर्वी इथेच काम करायचा अगदी मी जॉईन व्हायच्याही पुर्वी...बरेच तीनेक वर्ष वैगरे होता तो इथे" त्यान तिला आठवतय का या अविर्भावात विचारल..
"अरे हो... मी विसरलेच तू सांगितलेल.. नाही मी फक्त नावान ओळखुन आहे...तो तसाही वेगळ्या व्हर्टीकलला काम करत असे...पण तू कस ओळखतोस त्याला" तिन विचारल...
"ह्म्म्म्म.... अरे मी नुसता ओळखतच नाही तो यार आहे माझा...आम्ही बालमित्र्..मग इंजिनिअरींगही बरोबरच केल...मला मात्र त्याची भरपुर खातीर करायचीय यावेळेस...त्यामुळे हा वीकेंड आशीषला समर्पीत असेल मॅडम".....अनिकेतन जाहीर केल
-------------------------------------
अनिकेत अन सारीका जवळजवळ एक वर्षापासुन एकमेकांबरोबर अशी जवळ आलेली... दोघही एका स्टेबल कुटुबांचे भाग होते..दोघांचीही लग्न होऊन काही वर्षांचा काळ लोटलेला. पण ते ऑफीसात काम करता-करता , एकमेकांच्या अडचणी सांगता-सांगता केंव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले... त्याला एक वर्षाहुनही अधिक काळ लोटला असावा. बदलत्या समाजात जी स्थित्यंतर होऊ घातलीयत त्याच हे एक छोटस उदाहरण होत. दोघांचही आर्थिक स्वातंत्र्य हेही यासगळ्याच्या मागे असेलच असेल...की त्यांना खरच अस काही या नात्यात सापडलय जे त्यांना आपापल्या विवाहीत आयुष्यांत मिळालेल नाही....सगळच विचार करायला लावणार होत....

"का गरज वाटली असावी दोघांना एकमेकांमध्ये काही विरंगुळा शोधण्याची... दोघांच्या लग्नानंतरच्या आयुष्यात उणीव असावी का ज्यामुळे अस करावस वाटल असाव... काय असाव ते... की पंधरा-पंधरा तास एकत्र असण्याचा परीणाम असावा हा.. बरोबर काम-जेवणं-वेळ घालवणं अन त्या प्रोक्झीमिटीतुन निर्माण झालेल हे आकर्षण असाव का...दोघही शिक्षीत अन पुरेस आयुष्य पाहीलेली -जगलेली आहेत तरी ...."
"अन सगळ्यात महत्वाच ... दोघांच्या वैवाहीक स्टेटसला असल काही नुकसान करु शकत हे दोघांनाही कळत असुनही ही दोघं यात पडलीय्त म्हणजे परीणामांचा पुरेसा विचार दोघांनीही केलेला असावा का?

-----------------------------------------------------

बारा वाजत आले होते.मलेशियन एअर्लाईंसच विमान वेळेवर होत. अनिकेत विमानतळावर हजर होताच.त्यालाही आशिषला भेटुन तीन्-चार वर्ष झालेली त्यामुळे खुप गप्पा मारायच्या होत्या....लॅंड झाल्याची घोषणा होऊन बर्‍यापैकी वेळ झालेला. थोड्याच वेळात आशिष बाहेर येताना दिसला...
"हे बडी..वेलकम होम..." अनिकेतन आशिषला भरगच्च हग देत म्हट्ल.
"अरे यार अपना देस और उसकी हवा....ओह मस्त वाटल्...कसा आहेस?" - आशिष सगळ्या कामासाठी/पोटासाठी देशाबाहेर राहाणार्‍या लोकांसाराखाच भारावुन बोलला...
"मी मस्त रे...बेंचवर आहे सध्या पण एक बेल्जियमच प्रोजेक्ट मिळतय तिथे जाव लागेल बहुधा दिड्-दोन वर्षांसाठी..." अनिकेतन त्याच सामान गाडीच्या मागच्या सीटवर टाकत सांगितल..
"आता घरी जाऊयात्...तू घरीच उतर..." अनिकेत
"नोप मेट्...मला काही मिटींग्जही आहेत तेंव्हा हॉटेललाच घे...मी जेवायला येत जाईन घरी पण राहीन हॉटेलला...अन तुही वीकेंडला रहा माझ्यासोबत्...मस्त गप्पे मारेंगे...मुद्दत हो गयी .." आशिषन सगळा प्लॅन त्याला सांगितला....
"ठिक आहे तर ...मी अंजलीला कळवतो की मी इकडेच थांबतोय अन आम्ही जेवायला येऊ रात्री ते..." अस म्हणत अनिकेतन गाडी हॉटेलकडे वळवली.
"अनि...तुझा फोन सारखा बीप करतोय बघ बहुधा एसेमेस असावेत ...पण इतक्या फ्रिक्वेंटली कोण करतय्...अंजली का ? .."आशिषन डॅशबोर्डवर पडलेल्या सेलफोनकडे नजर टाकत विचारल...
"नाही रे.. ऑफीसमधन असेल कुणी...सोड.." ...अनिकेतला माहीत होत ते सारीकाचेच एसेमेस आहेत म्हणुन..

हॉटेलला चेक इन करुन दोघ आत आले...तु खायच अन ड्रींक ऑर्डर कर तोवर मी बाथ घेऊन येतो..
अनिकेतन सगळ ऑर्डर केल अन त्यान सारीकाला मेसेज पाठवला त्याच्या अन आशिषच्या प्लॅनबद्दल म्हणजे तिला कल्पना येईल स्गळी. त्यान घरीही फोन करुन आशिषच जेवण वैगरे सगळा प्लॅन कळवला अन तो आशिषच्या येण्याची वाट पाहात सोफ्यावर पहुडला..
"आपण आशिषला सारीकाबद्दल सांगाव का सगळ्...तो काय म्हणेल.." पडल्या-पडल्या अनिकेतच विचारचक्र सुरु झालेल......
"सो आर वी रेडी टू गेट ड्रंक मेट.." आशिष बाथरोबसहीत बाहेर येत म्हणाला..
"ओह येस...वेटींग फॉर यु मॅन..." अस म्हणत अनिकेतन बीअर ओतायला सुरुवात केली.
"भारतातल्या संडे आफ्टरनुन बीअरची चवच वेगळी लागते रे..आठवतय आपण नोकरी लागल्यावर बेगम अख्तरच्या गझला अन किती किती बीअर्स रिचवल्यायत अशा रविवारच्या संगतीत....." आशिष नोस्टालगिक होत म्हणाला...
अन मग गप्पांचा फड रंगत गेला...कॉलेज नोकरीतले सुरुवातीचे दिवस अन सगळ काही..अनिकेतच मधन मधन सायलीला मेसेजेस करण सुरुच होत्...
"हे काय चाललय अनिकेत... मी केंव्हाच तुला बघतोय्...तु कुठे भलतीकडेच लक्ष ठेऊन आहेस्...दर पाच मिनिटाला फोन्...मेसेजेस......इज देअर अनिथिंग दॅट आय डोंट नो मेट..."- आशिषन सरळच प्रश्न विचारला...त्याचा स्वभावच तसा..
"ह्म्म्म्म ... यप आशिष्...देअर इज समथिंग दॅट आय हॅव टु टेल यु...आय हॅव अ‍ॅन अफेअर मेट्...आय हॅव समवन इन लाईफ अपार्ट फ्रॉम अंजली..." अनिकेतला कस सांगाव ते सुचत नव्हत..
"व्हॉट.... यु मीन एक्सट्रामॅरीटल्....काय बोलतोयस तू ? अन कोणाबरोबर??? अंजलीला माहीतय ?" त्यान एकामागोमाग एक प्रश्नांची माळच लावली..
अन मग अनिकेतन त्याला सगळ सुरुवातीपास्न सांगितल...... अन त्यान हात पुढच्या बीअरला घातला..
"लेटस वेट यार्.. नो मोर बीअर....मी सारीकाला चांगल ओळखतो....मी तीन वर्ष काम केलय त्या कंपनीत...जस तु म्हणलास ती मला नावान ओळखते...पण राँग चॉईस मॅन्...शी इज अ मॅन ईटर्...यापुर्वीही तिन दोनदा असच केलय..एक समजदार होता म्हणुन लवकर सावरला अन वाचला दुसरा हकनाक वाया गेला या बाईमुळे...जरा सेंसीटीव्ह होता तुझ्यासारखाच त्यामुळे त्याला काय कळल तिच्याबाबत कोण जाणे त्यान नोकरी सोडली अन बाटलीत बुडाला नंतर त्याच काय झाल ते कळलच नाही..."- आशिष एका दमात सगळ बोलुन गेला.त्याच्या चेहेर्‍यावर एक विचित्रशी आठी स्पष्ट दिसत होती.
"दॅट कांट बी टृ यार्...तिन कधीच सांगितल नाही मला हे.... मला एव्हढच माहीतय-जे तिनेच मला सांगितलय की तिचा काही पास्ट होता जो सगळ्यांचाच असतो...पण हे अस काही असेल अस तिन कधीच मला सांगितल नाही....उलट तिच्या बोलण्यात ज्या पास्टबद्दलही ती बोलली ते म्हणजे अगदीच थिल्लरस अफेअर असाव अस मला वाटल......" अनिकेत पुरता चक्रावला होता.
" अरे बाबा आपण वाद घालण्यापेक्षा तु सरळ तिलाच का नाही विचारत...." आशिषन सुचवल ते अनिकेतलाही पटल असाव...
"येस्स... मी तिलाच बोलावतो संध्याकाळी अन सगळ विचारतो..."
यासगळ्या गप्पात चार केंव्हा वाजले ते दोघांनाही कळलच नाही...

अनिकेतन सारीकाला मेसेज टाकला संध्याकाळी सहाला भेटण शक्य आहे का म्हणुन.... तिचा होकार येताच त्यान सरळ त्याच होटेलच्या कॉफी शॉपला ये म्हणुन कळवल अन वॉश घ्यायला बाथरुमकडे वळला....त्याच्या डोक्यात विचारांच वादळ होत्....इतक्या निरागस दिसणार्‍या सारीकाच्या चेहर्‍याआआड आणखी एक चेहरा असेल ???
--------------------------------------------------------------
बरोबर सहाला सारीका कॉफीशॉपच्या दरवाजात बघुन अनिकेतला हायस वाटल...
"हाय...... होप इट वाज नॉट डिफीकल्ट टु कम...." अनिकेतन सुरुवात केली...
" नाय रे...उलट मी वाटच बघत होते तुझ्या निरोपाची ..." तिन त्याला आश्वस्त करायला म्हणुन सांगितल्...अस तो का विचारतोय तिला कळेना...पुर्वी अस कधी तो बोलला नव्हता..
"सारीका...आज जरा सिरीयसली बोलायच आहे....आपल्याबद्दल...."
"ह्म्म्म बोल ना... मी तयार आहे... काय झालय काय पण..." सारीकाला आता मात्र उत्सुकता वाटायला लागलेली...
"अग आज दिवसभर आशिषशी गप्पा मारतोय...तो ओळखतो तुला चांगला...अन त्यान अस काही मला सांगितलय की मला अतिशय अस्वथ झाल ते सगळ ऐकुन..." त्यान कशीबशी सुरुवात केली..
"अस काय म्हणाला तो......" तिला घाई झालेली ऐकायची...
"तुझ्या पास्टबद्दल त्याला बरच माहीत आहे म्हणत होता... जे मी पहील्यांदाच ऐकत होतो...अन मला जाम चिडायला झाल ते सगळ ऐकुन..." अनिकेतला विषय कसा मांडायचा ते जमत नव्हतं....
"सी अनिकेत... मी स्वतः तुला सांगितलय की माझा एक पास्ट आहे लग्नानंतरचा जो मला अतिशय छळतो अन ती एक मोठी चुक आहे माझ्या आयुष्यातली......" सारीकानं त्याला सगळ्याची पुन्हा उजळणी करुन दिली.
"हो पण तु मला हे नव्हत सांगितल की ते एक सिरीयस अफेअर होत ते... यु सेड इट वॉज अ ब्रीफ अन सिली डेव्हियेशन.... यु नेव्हर सेड यु वेअर इनव्हॉलव्हड विथ हिम...उलट आपण जेंव्हाही त्याबद्दल बोललो तेंव्हा तेंव्हा तु मला ते एक अस्पष्टस न आठवण्याजोग चित्र आहे असच सांगितलेल दरवेळी...आज मी आशिषकडन जे ऐकलय ते अगदीच वेगळ आहे त्यापेक्षा.... तो म्हणाला इट लास्टेड फॉर अलमोस्ट अ यर..." त्यान स्पष्ट बोलायच ठरवलेल दिसत होत.
"लुक अनिकेत....सुरुवातीला मला जेव्हढ सांगावस वाटल ते मी तुला सांगितल अन जसजस आपण पुढे गेलो तसतसा तू मला इतका आवडायला लागलास की मला कुठल्याही परीस्थितीत तुला दुर जाऊ द्यायच नव्हत्....भिती होती ती एक की तुला जर सगळ सांगितल तर तूला बहुधा आवडणार नाही अन मे बी यु मे नॉट लाइक टू मीट मी अगेन्...."...सारीकाच्या डोळ्यांत एक विचित्र आर्तता होती हे सांगतांना...
"पण एक सांगते तुला अनिकेत....आय हॅव लव्हड यु होनेस्टली...!!!"सारीकाच्या डोळ्यांत पाणी तारारल...
"म्हणजे आशिषन जे सांगितल ते खरच आहे तर.... यु आर नॉट डिनाईंग ईट..!!!" अनिकेतला अजुनही बहुधा हे खर की खोट यातल द्वंद छळत असाव...
"पार्ट्ली खर अनिकेत्...मी तुझ्यापासन सगळ लपवल हेही गुन्ह्यास पात्र...अन त्यासाठी तू जी काय शिक्षा देशील ती मी स्विकारायला तयार आहे इतकच सांगु शकेन मी..." सारीका अगदीच रडकुंडीला आलेली..
"मी कोण होतो शिक्षा देणारा सारीका.... आय टू लव्ह्ड यु होनेस्टली पण आता मला हे एक प्रचंड फसवल गेल्याच फिलींग जे आहेन ते जाणार नाहीय सहजासहजी....तु मला वापरलस एक आधार म्हणुन तुझ्या त्या अफेअर नंतर अन मी मुर्खासारखा वाहवत गेलो तुझ्याबरोबर्...हे सगळ माझ्यापासुन लपवुन तु फसवलयस मला सारीका" अनिकेत तिच्याकडे न बघतच पुट्पुटला..
"आय नो रे पण मग तुच सांग मी काय करु आता....." तिन त्याला अजीजीन विचारल..
"मला वेळ दे सारीका......मला काहीही सुचत नाहीय्....तुझ्या-माझ्यात अस काही बोलण कधी होईल याची मी स्वप्नातही कल्पना नाही केलेली....मी पुरता हादरलोय अन चिडलोय स्वतावरच...मी तुला उद्याला सांगतो..." अस म्हणत अनिकेतन बिलाच्या फोल्डरमध्ये पैसे टाकले अन तो जायला उठलाही...
"ओके अनिकेत...आय विल वेट फॉर यु पण परत सांगते ...आय वांट यु....आय लव्ह यु !!!" सारीकान उठत उठतच त्याला सांगितल..
"आय विल ट्राय माय बेस्ट मॅडम....." त्याचा आवाज नेहेमी सारखा आश्वस्थ वाट्त नव्हता..
सारीकाला हॉटेलच्या दारावर सोडुन अनिकेत परत आशिषच्या रुमकडे निघाला..
----------------------------------------------
सोमवारी स़काळी सारीकाला एक प्रचंड दडपण जाणवत होत ऑफीसला येताना....पुर्वी कधीही न जाणवलेल्.....अनिकेतन जर सगळ तोडायच ठरवल तर आपण काय करणार्...लाईफ वुड बी हेल विदाऊट हिम......यालाच प्रेम म्हणतात का ? ....तिन ऑफीसमध्ये शिरता शिरता स्वताला मनाशीच विचारल. ती डेस्कवर आली तो तिथे तिला एक पाकीट....तिच्या नावाच....तिन अधीरपणे ते उघडल...ते उघडायला लागलेला वेळ तिला युगासारखा वाटून गेला.पत्र अनिकेतचच होत...
"..... सारीका ,
तूझ आपल्या कृतींच अस समर्थन करण
हा अपवाद नाहीच.......कुठल्याही परिस्थितीत
पण दिशाभूल करणे हा मात्र गुन्हाच ठरतो
अन त्यायोगे केल गेलेल प्रत्येक विवेचन
हा फसवूणीकीचाच प्रयत्न समजला जातो
हे तूला कळायला हव होत...
भ्रम हे शेवटी तयार केले जातात...
शब्दांनी-शब्दांमुळे अन कारणांसाठी
हेही तुला कळायला हव होत
तस झाल असत तर ...
बहुधा मला एव्हढे प्रश्न नसते पडले
तुझ्या असल्या फसव्या अहमिकांचे
पण तुझ अस तर्काला तिलांजली देण
अन वरुन निरागसपणे
तारतम्याचे देखावे निर्माण करण......
किंबहूना अस तर नाहीना
तुला सवयच पडलीय अशा भुलथापांची
वेगवेगळ्या देखाव्यांत अस दुभंगून जगायची
तस असेल तर एव्हढच फक्त ध्यानांत घे .....
अशासाठी शिक्षेची तरतुदही अगदीच वेगळी
अन............. संगीन असायला हवी......!!!!

अनिकेत .

****************************************************

तर मित्रांनो अशा या तीन वास्तविका... गौतमला जबाबदार्‍यांची अन त्यामुळे गमावल्या जाणार्‍या स्वातंत्र्याची भीती, माधव-मीनाला वैविध्याची अतृप्ती तर अनिकेत-सारीकाच सगळच अधांतरी.नाती निर्माण होतात ती चांगल्या वाईटाची पर्वा न करता मग ती लग्नानी निर्माण झालेली असोत, की मुक्त वागण्यातन आलेली असोत की कसलीच पर्वा न करता एकमेकांच्या आकर्षणापायी एकत्र जमलेली असोत........... सगळ शेवटी एका पॉईंट्ला येऊन थांबत. अपेक्षांचे रंग वेगवेगळे पण गर्भातला अहम थोड्याफार फरकाने का होईना सारखाच असतो.... तस नसत तर ही तीन जोडगोळी अशी अतृप्त का रहावीत इतक सगळ एकत्र जगुन्....सगळच अतर्क्य !!!
प्रेम हे दिर्घकाळाच्या सहचर्यान किंव्हा एकमेकांना जपायच्या सवयीन येत हे म्हणण धाडसाच आहे. प्रेम हे शेवटी आत्मीक ओढ निर्माण करणार एक अजब रसायन आहे जे दोन जिवांत एका क्षणात निर्माण व्हायला पाहीजे... तस झाल नाही तर तुम्ही कितीही प्रयत्न करा ते अनेक वर्ष गेली तरी तयार होत नाही अन मग हे अव्याहत धावणं सुरुच राहातं कधी गौतमच्या एकेरी डावातनं...कधी मीना-माधवच्या सामुहीक पध्दतीनं तर कधी अनिकेत-सारीकाच्या मनस्वीपणातन....
यात हे सगळे नकी काय मिळवायसाठी हे सगळ करतायत .....
जे वाट्याला आल ते जगु या आनंदे म्हणुन गात राहातायत ....
की जे मिळाल ते मनासारख नाही म्हणुन बंड करुन काही मिळवायला बघतायत.....उत्तर काहीही असो शेवटी सगळे मृगजळापाठीच धावतायत... अप्राप्याच्या प्राप्तीसाठी !!!! असे बरेच जण आपल्या अवतीभोवती तुम्हीही बघत असाल....यासगळ्या कसरतीत तुम्ही काय करायच ते तुम्हीच ठरवायचय पण सगळ करतांना एक आर्जवी सुचना आहे ती नेहेमीच लक्षात ठेवा..आनंदात राहाल्.... एकमेकांबरोबर जगा आपापल्या पध्दतीनं पण Let there be spaces in your togetherness !!!!!!

*************************
***************************
*****************************
*******************************
- समाप्त -

www.maitreyaa.wordpress.com

गुलमोहर: 

हं खुप विचार करायला लावणारं लिखाण्..अन वारंवार दृष्टिस पडणारे, जाणवणारे हे नात्याचे पदर अन मृगजळ्..सुरेख लिहिलय..:)

छान लिहिलयं,एकमेकांबरोबर जगा आपाप्ल्या पध्दतीन पण Let there be spaces in your togetherness !!!!!!
या(किचकट पण सेंसिटिव्ह) विषयावर लिहावे तेव्हढे थोडे. इन्ट्रोस्पेक्शन इज द बेस्ट सोल्युशन!!

आपल्याकडे संसाराचे अधिक प्रमाण हे कथा नं.२ प्रमाणे आहे अस वाटत. काहि प्रमाणात कथा नं.३ हि झालेलि आपण पाहतो,वाचतो. कथा नं.१ च प्रमाण हि हल्लि बरच बघायला मिळते. खरतर लग्न म्हणजे नुस्ते ७ फेरे व हार घालणे नव्हे. एकमेकांशि समजुन-उमजुन वागणे,विश्वास्,आधार देणे,दोघात संवाद होणे व तुम्हि म्हणता त्याप्रमाणे एकमेकांना स्पेस देणे हे जर केले तर नं.२ मध्ये जि उणिव दिसते ति बहुतांशि कमि होइल. खरच खुप विचार मंथन करायला लावणारि कथा आहे. अभिनंदन.

हल्लीच वाचलं ...मेन आर फ्रॉम मार्स आणि वुमेन आर फ्रॉम व्हीनस. त्यामुळे दोघांना एकमेकांबद्दल परग्रहावरचे प्राणी असल्यासारखे वाटणे साहाजिक आहे. नातेसंबंधांचा पोत काळानुसार बदलत जातोय. छान मांडलाय आपण तो!

खुप मस्त लिहीलंय गिरीशजी....
Let there be spaces in your togetherness !!!!!!
>>>ह्या वाक्याने अजुनपर्यंत विचारात पाडलं आहे..

छान आहे.

पण शेवटची उपकथा नाही पटली. अनिकेत त्याच्या बायकोची फसवणूक करतोच आहे की सारिकाबरोबर संबंध ठेऊन मग तिचे भूतकाळात अजून कोणाशी संबंध होते हे कळल्यावर तो इतका त्रागा का करतो? नक्की काय सांगायचे होते त्या उपकथेतून?

स्वतःची संस्था उत्तम चाललेली असल्यान त्यांना ते नैतिक पाठबळपण आपोआपच आलेल.>> येथे "नैतिक पाठबळ" हा शब्दप्रयोग खटकला. नैतीक पाठबळ मीळण्याकरता 'सुरळीत चालू असणे' हाच निकश पुरेसा आहे?

बासुरी-वर्षु नील-चिंगी-सुनिल-तनुजा-विशाल्-नेनीश-सुमेधा-रमणी-माधव-आशू-सचिन :

सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद! जरा सांशक होतो यावेळी - विषयाच्या क्लिष्टतेमुळे असेलय कदाचित.
असही वाटत होत की मी एका प्रयत्नात खुप काही सांगायचा प्रयत्न तर करत नाहीय जो वाचतांना कंटाळवाणा होऊ शकतो...कथेतल्या काही गोष्टींबद्दल मतांतरे असु शकतात अन त्याच स्वागतच आहे.....

सस्नेह : गिरीश

व्हेरी गुड, हम्म, वरच्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी जराशी सहमत
कदाचीत एकाच कथेत तिन्ही कथा टाकुन कंटाळवाणं होतेय असं मलाही वाटलं
पण तरिही छानय, विचारपुर्वक लिहिलय