बगळ्यांची माळफुले - ४

Submitted by देवा on 27 February, 2008 - 06:40

'वाटेवर काटे वेचित चाललो', कवि अनिल यांची एक अप्रतिम रचना आणि संगीतकार यशवंत देवांनी दिलेली अवीट चाल यातून साकारत जातो एक सुंदर अलंकार आणि त्यात रत्न जडवण्याचं काम करतो वसंतरावांसारखा जादुगार, मग हे गाणं 'लाखात एक' न ठरावं तरच नवल.
वसंतराव गायला सुरु करतात, आणि आपल्यासमोर उलगडत जातं एका कलंदराचं मनोगत.
वाटेवर काटे वेचित चाललो
वाटले जसा फुलांफुलांत चाललो
क्या बात है! हि दाद जाते ती काव्याला, संगीताला अन अर्थातच गाणार्‍या गळ्याला सुद्धा. काय कल्पना आहे. जीवनाबद्दल असलेल्या सकारात्मक दृष्टीकोनाला ह्याहून अधिक चांगल्याप्रकारे व्यक्त करता येईल की नाही कोण जाणे. यशवंतदेवांनीही काय न्याय दिलाय ह्या ओळींना, प्रत्येक शब्दाला असं स्वरांवर तोलत.. ये ब्बात.. आणि त्यात वसंतराव फुलांफुंलात चाललो म्हणतांना, तीच जाणीव ऐकणार्‍यालाही करून देतात.

कवि पुढे सांगतो, या वाटेवर तो कधीच एकटाच नव्हता .सतत कुणाची तरी साथ होतीच.
सतत कुणाची तरी साथ असणं किंवा करणं, अवघड आहे ना. 'मेहफिल में तनहा' बर्‍याचदा ऐकलय पण कधी 'तनहाईमें मेहफिल जमाना' वगैरे ऐकलय? पण आपला कवि आहेच कलंदर,

मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरुनी कधी
आपुलीच साथ कधी करीत चाललो

जशी कुणाची तरी साथ महत्वाची तसचं या इथे साथ करीत चालत राहणं महत्वाचं. एकाच मुक्कामी राहील तो कलंदर कसला.

आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद
नादातच शीळ वाजवीत चाललो

एका मुक्कामी जे काही चांगलं वाईट मिळालं त्यातलं चांगलंच घेऊन कवि आपल्याच नादात पुढच्या प्रवासाला निघतो. तिकडे तो किशोर कुमार म्हणतो ना, 'जींदगी एक सफर है सुहाना" वगैरे अगदी तसंच.

तुमच्याबाबतीत होतं की नाही मला माहित नाही, पण माझ्याबाबतीत असं बर्‍याचदा होतं, घरी मित्र मैत्रींणींची मैफिल जमली आणि पेटीवर एखादं गाणं वाजवायला बसलो ना की समेला हमखास चुकतो, सगळा मुड ऑफ होतो मग कशीतरी वेळ मारून नेत पुढचं गाणं वाजवायचं. हे असंच काहितरी आपला कलंदर मित्रही करतो पण ते गाण्यात नाही जगण्यात.

चुकली तालात चाल, लागला जिवास बोल
ढळलेला तोल सावरीत चाललो
ताल सावरण्यापेक्षा चाल सावरणं कठिण पण जास्त चांगलं. बरोबर ना?
खरंच, असं चाल सांभाळीत, तोल सावरीत 'चालणं' किंबहुना 'पुढच्या मुक्कामी जाणं' अवघड होऊन बसतं. कारण? कारण बरोबर बाळगलेलं ओझं. ओझं कसलं तर सुखदु:खांचं. प्रवासात आलेल्या कडू गोड आठवणींच. नात्यांच, मैत्रीचं, शत्रूत्वाचं. ह्या सगळ्याचं ओझं आपला कलंदर मित्र फेकुन देऊन परतीच्या प्रवासाला निघतोय.

खांद्यावर बाळगिले, ओझे सुखदुःखाचे
फेकुन देऊन अता परत चाललो
वाटेवर काटे वेचित चाललो

गुलमोहर: 

अss हाss हाsss ... झक्कास वटले बघा. Happy ....काय आठवण करुण दिली तुम्ही, जे गाणं मनात खोल रुतुन बसल होतं..... छान लिहीलं आहे. आवडलं. परंतू लेखात त्या सुरावटीचा बहर अजुन येऊ द्या.

पुलेशु.