मी येणार आहे.........!!

Submitted by विस्मया on 4 January, 2010 - 23:49

मी येणार आहे

मी म्हणत होतो ना मी येणार आहे..मी आलो होतो !

पण तुम्ही ऐकले नाहीत माझे. तुम्हाला ऐकू गेले नाही. मी प्रत्येकाला सांगत होतो मॉ येणार आहे ,

तुम्ही न बघता विश्वास ठेवलात माझ्यावर..

खरंतर प्रत्येकालाच मी हवा होतो.

प्रत्येकाने माझी वाट पाहीली.. माझी कल्पना केली.

अंधाराला चिरत छोटीशी प्रकाशशलाका जशी आपले अस्तित्त्व दाखवून देते तशा या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या आंणि मी आलो.

चिंता, भीती, अविश्वास, ताण, निराशा, अपेक्षाभंग ...!

सगळंच तर होतं

शेठजींचा धंदा चालत नव्हता. विश्वासू माणूस मिळत नव्हता. धंद्याची काळजी आणि अविश्वास... शेठजींना मी हवा होतो.. मी गेलो. पण मला त्यांनी ओळखलं नाही. मी येणार म्हणून वाट पाहीली आणि गेल्यावर मात्र ओळख देखील दिली नाही !

तिला मनासारखा जोडीदार हवा होता. सुखात ठेवणारा हवा होता. मी गेलो. माझी खरंच तिनं वाट पाहीली आणि मी गेल्यावर मात्र लक्षही दिलं नाही..

अपत्यहीन जोडप्याच्या चेह-यावरचे दु:ख पाहून मी त्यांच्याजवळ गेलो.. माझी त्यांनी वाट पाहीली होती पण मी गेल्यावर मात्र त्यांनी पाठ फिरवली.

मग इतकी वाट का पाहीलीत ?

शेठजींकडे मी नोकरी मागणारा गरजू तरूण म्हणून गेलेलो. माझ्या फाटक्या कपड्यांत त्यांना मला ओळखता आले नाही. सुखवस्तू घरच्या तरूणाला कामावर ठेवून घेतांना पुन्हा त्यांची पारख चुकली होती. खरंतर तेव्हां मला कामाची खूप गरज होती. देव्हा-यात ठेवलं असतं शेठजींना.

तिच्या सुखाच्या अपेक्षा होत्या. मी तिला तळहातावरच्या फोडासारखी जपणार होतो. तिच्या हसण्यावर लुब्ध होणार होतो, तिच्या रडण्याने कष्टी होणार होतो. मोत्यांची माळ नाही तरी रोज एक गजरा आठवणीने घेऊन देणार होतो... हॉटेलिंग नाही पण स्वतःच्या हाताने तिला भरवणार होतो. महागड्या कार्स नाही तरी तिला वेळ देणार होतो.. रोजच तिच्याबरोबर काही पावले सोबत करणार होतो.. पण तिने मला ओळखले नाही. मर्सिडीज मधे बसताना सायकलवरच्या मला ओळखले नाही.

मूल नाही म्हणून कित्येक डॉक्टर्स, बुवा करून ते दोघेही थकले होते.... मला पाहवले नाहीत त्यांचे हाल. अपेक्षाभंगाचे दु:ख मला पाहवतच नाही. माझी ते वाट पहात होते...मी देवळात त्यांच्ञा पुढ्यात जाऊन उभा राहीलो. मी अनाथ होतो. नाक गळत होते, फाटके कपडे होते...त्यांनी मला पाहीलेही नाही. देवाकडे काहीसे मागणे मागत ते निघून गेले.

आता पुन्हा त्यांचे अपेक्षाभंगाचे ओझे ते माझ्यावर टाकतील...माझी वाट पाहतील ..आणि मी आल्यावर ओळख देखील देणार नाहीत.

मी काय करू ?

मी फक्त सांगणार त्यांना

मी येणार आहे.. ....!!

Maitreyee Bhagwat

गुलमोहर: 

मस्तच आहे.

खरच कोणीतरि येतो पण आपण कधी तिथे नसतो जेव्हा तो येतो.
आपण आपल्याच विश्वात हरवलेले असतो.
अगदि सत्य कथा आहे हि.

छान.

..

खूप दिवसांनी लिहिलस मैत्रेयी!
सही आहे..
फक्त मला दुसरं कथानक नाही पटलं...
म्हणजे, आर्थिक तफावत ही बर्‍याचदा फक्त आर्थिक तफावत नसते - ती सांस्कृतिक तफावत ही असते.. आणि मग त्यात बर्‍याचदा फरफट बाईचीच होते आपल्या समाजात.
अशा तफावत न बघता लग्न करून मग आत्महत्या केलेल्या मुली/आयुष्यभर कुढणार्‍या - खचलेल्या मुली दिसतातच ग आजुबाजुला - अगदी सरसकट नसल्या तरी असतातच.. आणि मग आपल्या करता ती कुणीतरी एक मुलगी असली तरी तिच्याकरता तिचा एकच जीव असतो - आणि तिच्या घरच्यांकरताही..
बर्‍याचदा लग्न करेपर्यंत तिच्या (आणि बहूतेक मुलाच्याही) डोळ्यावर फक्त धुंदी असते - ती उतरते तेव्हाचं वास्तव भयानक असू शकतं.. न झेपणारं- न पेलणारं..

माबो वर मला सर्वांचा खूप छान अनुभव आला. प्रेम, प्रोत्साहन मिळालं...
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

सर्वांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!!!

छानच Happy