टोचणी

Submitted by tilakshree on 23 February, 2008 - 06:29

तिच्या आयुष्यातला 'तो' खास दिवस उजाडला! सनईच्या मंगलमय स्वरांनी सकाळ्च्या प्रसन्न वातावरणात रंग भरले. जुई, मोगर्‍याचा सुगंध सर्वत्र भरून राहिला होता. सगळ्यांची लगबग सुरू होती. तिचं मन मात्र काहीशी उत्सुकता, थोडीशी हुरहूर आणि भावी आयुष्याची गुलाबी स्वप्न; अशा संमिश्र पण सुखद विचारांनी भरून येत होतं. आई-वडीलांच्या छत्रछायेत; मायेच्या सुरक्षित, उबदार घरट्यांत ती आजपर्यंत वाढली. लहानाची मोठी झाली. आज मात्र ती या घरट्याचा उंबरठा ओलांडून जाणार होती. आपल्या जोडीदाराच्या ओंजळींत ओंजळ गुंफून तिला आता स्वतःचं घरटं उभारायचं होतं.

आपल्या इच्छा- आकांक्षांना मुरंड घालून बर्‍याचशा ओढाताणीनंच तिच्या आई वडलांनी तिला वाढवलं. शिकवलं. ज्या मुलाकडे म्हातारपणाची काठी म्हणून अपेक्षेनं बघायचं त्याचंच आयुष्य मद्याच्या पेल्यांत हिंदकळंत होतं. तेजाबांत हळूहळू विरघळंत अंताकडे निघालेल्या पत्र्याच्या तुकड्यासारखं... नर्सिंगचं प्रशिक्षण घेऊन तिनंच आपलं घर सावरांयला हातभार लावला होता.प्रेम आणि समाधानाची ठिगळं लावून एकमेकांची उसवलेली आयुष्य सांधायचा प्रयत्न केला होता. मात्र आज तिचं क्षितिज विस्तारलेलं होतं. आता आपल्या जीवनसाथीच्या साथीनं तिला 'आपलं' घरटं साकारायचं होतं.

नव्या स्वप्नांना उराशी कवटाळूनंच ती बोहल्यावर चढली. अग्निच्या साक्षीने 'ती' आज 'त्याची' झाली. नव्या उमेदीने, नव्या आशेनं आणि नव्या अपेक्षांनी तिने नव्या आयुष्यांत पाऊल टाकलं. आपल्या माता-पित्याच्या घराची चौकट ओलांडून तिने नव्या घराला, नव्या माणसांना नव्या नात्यानं आपलंसं केलं.

या घरांतल्या लोकांनाही आपल्याबद्दल वाटणारं आपलेपण, कौतुक, जिव्हाळा पाहून ती हरखूंन गेली. तिच्या स्वागतासाठी सगळं घर सजलं होतं. या नव्या आयुष्याचा खर्‍या अर्थाने प्रारंभ होतो तो पहिल्या रात्रीच्या उत्साहाच्या, उत्सुकतेच्या आणि उत्स्फुर्ततेच्या प्रणयोत्सवाने!! आपल्या शरिराबरोबर आपलं अस्तित्व, आपलं सर्वस्व जोडीदाराच्या ओंजळीत समर्पित करून आयुष्याला नवा अर्थ देणारा महोत्सव!!!

त्याचं घर म्हणजे कुण्या राजपुत्राचा राजमहाल नव्हता. तिला तशी अपेक्षाही नव्हती. घराला घरपण घरातल्या माणसांच्या मनातला ओलावा प्रदान करतो हेच ती आजवर शिकली, अनुभवत आली. आपल्या अस्तित्वाने आपल्या घरांत स्वर्ग निर्माण करण्याचं स्वप्न घेऊनंच तिने या घरात प्रवेश केला. चाळीतल्या तीन खोल्यांच्या घरातंच त्यांचा मधुचंद्र साजरा होणार होता. त्यासाठी त्यासाठी एक छोटीशी खोली सजवण्यात आली. चाफा, मोगरा, गुलाबाचा सुगंध खोलीभर दरवळंत होता. कॉटवरच्या गाद्यांना बर्‍यांच काळानंतर मऊसूद नव्या चादरीचं आवरण मिळालं. त्यावर गुलाबाच्या टवटवीत कळ्या-पाकळ्यांचा गालिचाच जणू अंथरलेला! आपल्या जावा, नणंदा आणि कोण-कोणत्या बाया बापड्यांकडून होणारी चेष्टा- मस्करी ऐकताना लाजेने चूंर चूंर होतंच एका अनामिक हुरहुरीत; तरीही उत्सुक मनाने तिने शयनगृहात प्रवेश केला. हातात केशरी दुधाचा प्याल घेऊन ती धडधडत्या काळ्जाने त्याची वाट पहात होती...

अखेर जवळ जवळ दीड तासांनी तिची प्रतीक्षा संपली. त्याने खोलीत प्रवेश केला. तिने थरथरत्या हातांनी दुधाचा प्याला त्याच्या समोर धरला. मात्र त्याची प्रतिक्रिया अनपेक्षित होती. त्याने थंडपणे तो प्याला तिच्या हातातून घेऊन कोपर्‍यात ठेऊन दिला आणि तितक्याच निर्विकारपणे कॉटवर जाऊन लवंडला. पडल्या पडल्या एवढंच म्हणाला; " अजून पूजा व्हायचीय..." त्याच्या या उद्गाराबरोबरंच त्याच्या उच्छ्वासातून लडबडलेला दारूचा वास त्या 'रंगमहाला'तल्या मोगरा, गुलाबाच्या सुगंधाला छेदून गेला... जीवाचा कोंडमारा दूर करण्यासाठी तिच्या काळजातल्या वेदनेने डोळ्यातल्या आसवांमधून व्यक्त व्हायला वाट करून घेतली. त्या उशीचे निर्जीव अभ्रेसुद्धा तिच्या आसवांनी पाणवले. तिचं दु:ख केवळ 'पहिल्या रात्रीचं' स्वप्न भंगल्याचं नव्हतं. अगदी आजंच परिपूर्णतेचं वरदान मिळावं असा तिचा आग्रहही नव्ह्ता आणि अपेक्षाही... पण त्याचा थंडपणा, निर्विकारता तिचं काळीज पिळवटून गेली. या नव्या नात्याची, नव्या आयुष्याची आपल्या मनांत असलेली असोशी; आपण मनाशी रंगवलेली स्वप्न याचा लवलेशही आपण ज्याला 'जीवनसाथी' म्हणून निवडलंय त्याच्या खिजगणतीत नसावा या दु:खाने तिचं मन ठसठसंत राहिलं. शरिराचं समर्पण तर दूरंच; पण धड ओळख करून घेण्याची ओढ नाही. चार ओळींच्या संवादातून आपल्या भावी वैवाहिक आयुष्याच्या स्वप्नांची देवाण- घेवाण नाही... तिच्या मनात विचारांनी थैमान घातलं... मन अमर्याद असलं तरी शरिराला मर्यादा असतातंच! विचार,वेदनांच्या वावटळीत भरकटंत असतानाच केव्हातरी तिच्या मेंदूने मनाला शिणवलं आणि त्या ग्लानीतंच तिचे डोळे जडावले... मनांत एवढं वादळ थैमान घालत असूनही ती सकाळी लवकरंच उठली. नव्या घरात पदार्पण केलेल्या कुठल्याही मववधूसारखी! रात्रीच्या प्रसंगाचा कुठलाही मागमूस चेहेर्‍यावर न दाखवता चटचट कामाला लागली. कालच्या अनुभवानंतरही तिला आत्मविश्वास होता की आपण आपल्या प्रेमाच्या बळावर आपल्या नवर्‍याला आपलांसा करू. कुठल्या तरी 'रडक्या' चित्रपटांतल्या 'सोशिक' सुनेला असतो तसांच... तो तिची नजरही टाळंत होता. त्याचं आपापलं आवरण्याचं काम चालू होतं. त्याचं आवरून तो घरातून चालता झालासुद्धा.

असेच दिवसामागून दिवस घरंगळंत होते. एखाद्या टेकाडाच्या उतारावरून सोडलेल्या गरगरीत गोट्यासारखे... ती ही बाकी सगळं विसरून नवीन घर, नवीन माणसं समजून घेण्याचा मनापासून प्रयत्न करंत होती. तो मात्र अगदी त्रयस्थाप्रमाणे वागंत होता. सकाळी उठून चालतं व्हायचं आणि रात्री उशीरा तर्र होऊन घरी येऊन आडवं व्हायचं...मुडद्यासारखं...

अखेर एक दिवस पूजेचा मुहूर्त निघाला. पै-पाहुण्यांच्या जेवणावळी झडल्या. गोंधळ्यांनी गोंधळ घातला. यांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून देव-देवतांना साकडं घालण्यात आलं. नव्या सुनेचं वागणं, बोलणं आणि कामाचा उरक याचं सगळ्यांनी कौतुक केलं. पण....
दिवसभराच्या दगदगीने ती अगदी थकून गेली होती. जागरण-गोंधळ, जेवणाच्या पंगती हे सगळं उरकेपर्यंत मध्यरात्रही उलटून गेली होती. तिने सगळी उस्तवार उरकून अंथरुणाला पाठ टेकली. तो आधीच येऊन पहुडला होता. पूजेच्या निमित्ताने आज त्याने 'घेतली' नव्हती. पडल्या पडल्याच तिच्या पापण्या मिटू पहात होत्या. मात्र मिटत्या पापण्यांच्या पलिकडे तिला जणवला तो तो त्याने तिच्याकडे क्षणभरंच का होईना...टाकलेला कौतुकाने ओसंडून वाहणारा कटाक्ष... सासरी आल्यापासून पहिल्यांदाच ती अपार समधानाने झोपी गेली. शरीर थकलं असलं तरीही...
रात्री उशीरा थकून भागून झोपली असूनही ती दुसर्‍या दिवशी सकाळी तशी लवकरंच उठली. तिच्या चेहेर्‍यावरची खुशी लपंत नव्हती. त्याबद्दल काही कौतुकमिश्रीत टोमणेही तिने सलज्ज्पणे हसर्‍या चेहेर्‍यावर झेलले. दिवस खुशीत गेल्यानंतर तिला प्रतीक्षा होती ती त्याच्या आगमनाची. काल सगळ्यांकडून कौतुकाचे शब्द ऐकूनंही राहीलेलं अपुरेपण तिला त्याच्या शब्दातून पुरं व्हायला हवं होतं. तो नेहेमीच्याच वेळेत आला. नेहेमीसारखांच. तर्र होऊन... तिच्या चेहेर्‍यावर दिवसभर तळपणारी टवटवी क्षणार्धात लोप पावली. तो नेहेमीसारखाच सरळ त्यांच्या 'रंगमहाला'कडे गेला आणि तिची पावलं स्वयंपाकघराकडे वळली... त्याचे ताट वाढून आणायला... यंत्रासारखी... ती पान वाढत असतानांच तिच्या कानावर त्याची हाक ऐकू आली. त्या परिस्थितीतही क्षणभर का होईना; पण तिचं मन मोहोरून उठलं त्याने तिला आज तिच्या नावाने हाक मारली होती. लग्नानंतर पहिल्यांदाच... ती त्वरेने त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. त्याने तिला आपल्या शेजारी बसायला खुणेनेच संगितलं. तिने ताट वाढून येते म्हणताच त्याने जेवायला नको असल्याच सांगितलं. ती कॉटच्या एका टोकाला कोपर्‍यात कशीबशी टेकली. तिने नजर वर करून त्याच्या डोळ्यात बघितलं तसा तो चपापला. त्याने आपली नजर खाली वळवली. तो बावरलेला होता. रडवेला झाला होता. डोळ्यातून वाहू पहाणार्‍या अश्रूंना त्याने पापण्यांनी बांध घातला. त्याचा असा अवतार बघून ती ही भेदरून गेली. काय बोलावं हे त्यालाही सुचंत नव्हतं आणि कसं विचारावं हे तिलाही कळत नव्हतं. असेच काही क्षण नि:शब्द गेल्यानंतर त्याने धारिष्ट्य गोळा केलं आणि तो भरभरुन बोलत गेला. त्याने त्यासाठी सगळं मनोबळ एकवटलं होतं आणि त्याला दारूच्या धुंदीचा टेकूही दिला होता. त्याच्या एकेका शब्दासरशी ती मात्र खोल खोल दरीत कोसळंत गेली. त्याचे शब्द तिच्या कानात उकळत्या तेलासारखे आणि मनात तापलेल्या सळईसारखे घुसत होते... तो 'गे' होता. शरिराने अन मनानेही तो त्याच्याचसारख्या एका पुरुषामधे गुंतला होता. आपलं हे विचित्र नातं त्याला कुणासमोर उघडही करता येत नव्हतं. म्हणून तर तो घरच्यांच्या आग्रहाला बळी पडून बोहोल्यावरही उभा राहीला. मात्र आपल्यामुळे एका निष्पाप मुलीचं आयुष्य बरबाद होत असल्याच्या बोचर्‍या अपराधी भावनेची टोचणी त्याला अस्वस्थ करंत होती. म्हणूनंच त्याने दारूला जवळ केलं. त्याला कितीही पश्चात्ताप होत असला तरी त्याला तिच्यात काडीचाही रस नाही ही वस्तुस्थिती अटळ होती. या सगळ्यातून 'पुढे काय' हा प्रश्न आ वासून उभा होता आणि त्याच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. खरंतर हा प्रश्न त्याच्यासाठी नव्हतांच. तिच्या पायाखालची वाळू मात्र या प्रश्नाने सरकली ... तो बोलून थांबताच पुढच्यांच क्षणाला ती कॉटवरून धाडकन जमिनीवर आदळली. ती उध्वस्त झाली होती. तरीही तिच्या डोळ्यातून पाण्याचा टिपूसही निघत नव्हता. जणू क्षणभर तिच्या सगळ्या संवेदनांच बधीर झाल्या. तो ही पूर्णपणे हादरून गेला होता. तिच्या शून्य नजरेकडे आणि मृतवत भकास चेहेर्‍याकडे बघून या सगळ्याचे पर्यावसान काय; या प्रश्नाने त्याच्या काळजात चर्र झालं. मात्र बाण सुटून गेला होता. तो ही हतबल होता. इतक्यात ती प्रचंड उद्वेगाच्या आवेगाने उठली. तिने धस्सकन कॉटवरची उशी ओढून घेतली आणि तिच्यात आपलं तोंड खुपसून ती हमसाहमशी रडू लागली. तिचं सांत्वन करण्याचं धारिष्ट्य त्याच्यात नव्हतं...
त्या उध्वस्ततेचा निचरा करण्यात रात्र उलटून गेली. भावनांच्या कल्लोळातून ती वास्तव जगात उतरली. आता प्रश्न होता भविष्याचा! ज्याला आपल्यांत काडीचाही रस नाही त्याच्या आयुष्यात घुसखोरी करून जबरदस्तीने रहायचं; त्यालाही जखडून ठेवायचं आणि स्वतःचाही कोंडमारा करायचा हे तिला मंजूर नव्हतं. याशिवाय आर्थिक स्वावलंबित्व तिला त्या अवस्थेतही काहीसं बळ देणारं ठरलं. बुडत्याला काडीचा आधार!!! पहाटे पहाटेच तिने आपले अत्यावश्यक कपडे आणि माहेराहून लग्नात मिळालेलं किडूक-मिडूक घेऊन तिने आपली पिशवी भारली. तो तिच्याकडे पहातंच राहिला. हताशपणे... तिला काही विचारण्यासाठी त्याने तोंड उघडलं; मात्र त्याचे शब्द घशातंच अडकून पडले...
सकाळी लवकरच आपलं सगळं पटापट आवरून ती तिच्या हॉस्पिटलमधे जाऊन येत असल्याचा बहाणा करून घराबाहेर पडली. निग्रहाने पावलं उचलंत काही अंतर पुढे चालल्यावर तिची नजर आपसूकच मागे वळली. काही दिवसापूर्वीच आयुष्यभरासाठी आपलंस केलेलं घरट एवढ्यातंच परकं झाल्याचं पाहून इतका वेळ आवरून धरलेला भावनावेग अनावर झाला. तिच्या पायातली शक्ती अचानक गळून गेली. ती फुटपाथवरंच मटकन खाली बसली. गुढग्यांत तोंड खुपसून आसवं ढाळंत राहिली... आवेग ओसरतांच ती भानावर आली. 'आता आपणंच आपल्याला सावरायचंय. आपलं आयुष्य आपणंच घडवायचंय...' स्वतःलाच समजावत राहिली. तिने सरळ स्टेशनचा रस्ता धरला. आपली योजना पक्की केली. 'आता सरळ माहेरी जायचं. आई- बाबांना सगळं स्पष्ट सांगायचं. त्यांना त्रास होणार हे नक्कीच! पण किती दिवस लपून रहाणार या गोष्टी! तिखट-मीठ लाऊन सांगोवांगी त्यांच्या कानावर काही जाण्यापेक्षा आपणंच स्पष्ट केलेलं बरं. काही दिवस माहेरी राहू. मग काही नियोजन, तयारी करून आपली भाड्याची का होईना पण स्वतंत्र जागा किंवा होस्टेल वगैरे पाहू...' तिच्या डोक्यात विचारचक्र फिरत होतं. त्या तंद्रीतंच ती प्लॅटफॉर्मवर येऊन लोकलच्या तिकिटांच्या रांगेत उभी राहिली. तिकीट काढलं आणि थोड्याच वेळात आलेल्या गाडीच्या 'लेडीज'च्या डब्यात जाऊन बसली... यांत्रिकपणे...
मधल्या प्रवासात तिने स्वतःला समजावंत निर्धार पक्का केला. आपलं स्टेशन आल्यावर उतरून झपाझप पावलं टाकंत घराकडे निघाली. घरी येऊन बघते तो काय घराला कुलूप... समोरच्या काकींकडे असणारी किल्ली घेऊन तिने दार उघडलं आणि घरात शिरली. रिकामं घर बघून तिचा आत्तापर्यंत गोळा केलेला धीर ढळला. तिच्या पोटात खड्डा पडला. ती आवेगाने कॉटवर कोसळली आणि ओक्साबोक्शी रडू लागली... क्लेश, वेदना, तिरस्कार, उद्वेग, अपेक्षाभंग, विस्कटलेपण आणि भावनिक पातळीवरची का होईना पण असहाय्यता या भावनांच्या कल्लोळात वेळ कसा गेला ते कळलंच नाही. दिवस कधीच मावळला होता. तिला दाराशी खुडबूड ऐकू आली. तिने मान वर करून बघितलं तर तिचा भाऊ उगवला होता. दारूच्या नशेत पूर्ण बुडालेला! धड चालता येत नाही अन बोलता येत नाही अशी अवस्था. तिला शिसारी आली. त्याने आत येऊन दिव्याचं बटण दाबलं आणि तिच्याकडे आ वासून बघत राहीला. तिने एकदा त्याच्याकडे विषादाने नजर टाकली आणि पुन्हा आपल्या विचारात गढून गेली. त्याने त्या अवस्थेतही ती अचानक घरी कशी याची चौकशी केली. तिने सुरुवातीला दुर्लक्षच केलं पण तो पुन्हा पुन्हा विचारत होता. तो मद्यधुंद असला; हतबल असला तरीही त्याच्या विचारण्यात कुठेतरी आस्था आहे असं तिला कुठेतरी जाणवून गेलं. 'दारुडा असला म्हणून काय झालं भाऊ आहे नं तो आपला. तो भले आप्ल्यासाठीच काय पण स्वतःसाठीही काहीही करू शकत नसला तरी त्यालाही शेवटी भावना आहेतच ना... त्यालाही काही तरी वाटतंच असेल ना...' त्याच्या जडावलेल्या पण आर्जवी विचारणेने तिच्या डोक्यात वेगळे विचार येऊ लागले. तसंही तिला त्याच्याकडून कसल्याही भौतिक मदतीची अपेक्षा होतीच कुठे! तिला आत्ता आवश्यकता होती ती भावनिक आधाराची. विचारांच्या वावटळीतून बाहेर पडेपर्यंतंच. शिवाय आई-बाबांच्या इथे नसण्याने तिला आणखी असहाय्य वाटंत होतं. अशावेळी माणसाला कुठलाही आधार चालतो... तिने पाझरत्या नजरेने तिची कहाणी सांगायला सुरुवात केली. भाऊ तिच्या शेजारी येऊन बसला. त्याने हळू हळू तिच्या केसातून बोटं फिरवायला सुरुवात केली. पण बायकांना एक विशिष्ट 'सेन्स' असतो म्हणतात त्याप्रमाणे तिला त्या स्पर्शामागचा उद्देश लगेचंच लक्षात आला. तिने त्याचा हात झिडकारून त्याच्याकडे एक जळ्जळीत कटाक्ष टाकला. पण कामातुराणां न भयम न लज्जा... त्याने तिला कुस्करणं सुरुच ठेवलं. तिचा विरोध अशक्त ठरला. तिने किंचाळण्यापूर्वीच त्याने आपला पंजा तिच्या तोंडावर दाबला. हळू हळू तिची विरोध करण्याची शक्ती संपली. ती निपचित पडून राहिली. तिच्या डोक्यात आता नवाच कोलाहल निर्माण झाला होता. 'उद्या घराबाहेर पडून जायचं कुठे? बाहेरच्या जगात वखवखलेल्या लांडग्यांना वानवा नाही. कुणा कुणाला कसं कसं तोंड द्यायचं त्यापेक्षा हे घर किमान आपल्या आई-वडलांच तरी आहे आणि आपल्या भावाच्या चाळ्यांना मर्यादा आहेत. धड उभा न रहू शकणारा बेवडा जास्तीत जास्त काय करू शकणार!' तिने परिस्थितीला शरण जात 'प्रॅक्टिकल' विचार करून 'ऍड्जेस्ट' व्हायचं ठरवलं. तेव्हापासून ते किळसवाणे स्पर्श सुसह्य आणि हळू हळू सुखद वाटायला लागले. पुढे कधी काही मिळवण्यासाठी तर कधी आयुष्याशी जुळवून घेण्यासाठी तिने अनेक संबंध ठेवले. पण तिला खरं सुख होतं ते भावाबरोबरच्या संबंधात! ते अनैतिक आणि वरवरचे असले तरी ही!! मात्र या विचित्र नात्याबद्दल अपराधीपणाची एक टोचणी कधी कधी तिचं मन कुरतडते. मग ती आपल्यासारखेच आणखी अपराधी शोधत असते. या पापात आपण एकटेच नाही असा दिलासा स्वतःच स्वतःला देण्यासाठी!!! कधीतरी कुठल्या तरी चॅट रुममधे ती तुम्हालाही भेटेल. विचारेल 'इन्सेस्ट?' तुम्ही बावचळून गप्प झालात तर दुसरीकडे निघून जाईल आणि संवाद सुरू ठेवलात तर हीच आपली कर्म कहाणी तुम्हालाही ऐकवेल. तुम्हालाही तुमची कहाणी विचारेल... तुम्हीही सांगा... खरी खोटी कशीही... तेवढींच तिची टोचणी तिला सुसह्य...!!!

गुलमोहर: 

अप्रतिम !!!
खरचं मस्त जमलयं. असं काही घडू शकतं असा विचारच नव्हता आला कधी मनात.
संवेदना बधीर झाल्यात.

इतकं परीणामकारक लिहिलंय..... वाचून शहारे आले अंगावर. कोणाच्या आयुष्यात हे असंही घडू शकतं?

असही घडू शकते? विश्वास नाही बसत.

हं... अनिकेत्,मंजू आणि किशोर;
मी माझ्या यापूर्वीच्या लिखाणाच्या वेळींच एक गोष्ट स्पष्ट केलीय की माझ्याकडे प्रतीभा नावाची चीज नाही. मी कल्पनेने फार काही लिहू शकत नाही. मी फक्त बातमीदार आहे. उघड्या डोळ्यानी जगाकडे बघायचं आणि शक्य तेव्हढ्या प्रभावीपणे मांडायचं एवढंच मी करतो. ही कथा मला समजली तेंव्हा मी सुद्धा हादरून गेलो होतो. लिहिण्याच्या ओघांत जाणवलं नाही पण लिहून संपवल्यावर सगळं अंग थरथरंत होतं. जाम मानसिक थकवा आलाय.

जबरदस्त लिखाण झाले आहे.अंगावर काटा आला.

बापरे! फार भयंकर आहे हे!

कथेचा पाऊण भाग ठिक वाटला पण शेवटचा भाग एकदम वेगळ्या पातळीवर गेला.

वेगळीच कथा. खरंच मानसिकदृष्ट्या थकवणारी.
मधे व्हेरोनिकाज रूम या मूळ नाटकावर बेतलेले, वैशालीची खोली नावाचे नाटक आले होते, त्यात अशीच समस्या वेगळ्या पातळीवर हाताळली होती.

फारच भयानक आहे हे. अंगावर काटा आला वाचुन.
वेगळा विषय आणि परिणामकारक कथा आहे तिलकश्री.

रमणि खरच भयानक आहे. पण हे सत्य आहे. माझी प्रतिक्रिया वाचली असेलच तुम्ही!

हे वाचुन स्वतःच्या पुरुष होण्याची किळस आली.....

तिलकश्री.. कथा फार परिणामकारक मांडली आहेस. तू ही कथा लिहिण्याच जे धारिष्ट्य दाखवल आहेस त्या बद्दल तुला सलाम.

स्त्री ने येवढ हतबल व्हाव हा आपला आणि आपल्या वांझोट्या संस्कृतीचा दोष आहे. मनुष्य हा देखिल एक प्राणी आहे आणि शरिरसुख ही एक महत्वाची नैसर्गीक गरज आहे. मानव सोडलातर ईतर कोणत्याही प्राण्यांमध्ये मादीला आपला जोडीदार निवडायचा पुर्ण अधिकार असतो , पण जो वर स्त्री 'sex' ही तीची शारिरीक गरज आहे आणि साथीदार निवडणे किंवा नाकारणे हा तिचा अधिकार आहे आणि तीने ठरवल्यास ते तो उत्तम रित्या बजावु शकते हे ती जोवर मान्य करत नाही तोवर पर्यंत 'ऍड्जेस्ट', 'परिस्थीती', 'किळसवाणे स्पर्श', 'लैंगिक अत्याचार' हे तिच्या पाचविला पुजलेले असतिल आणि अशी 'कारुण्य कथा' वाचुन 'बिचारी', 'वाईट वाटल', 'दुर्दैवी' अशा पोकळ सांव्तनांत्मक प्रतिक्रीया तिला मिळत राहातील.
काही दशकांन पुर्वी सती जाणार्‍या स्त्रीयांबद्दल पण असच होत असावं. समाज बदलतो आणि तो नक्की बदलेल नैतिकतेचे आणि अनैतिकतेचे आधार पण बदलतील. स्त्री जेवढी दशकां पुर्वी हतबल होती तेवढी आता नाही आहे आणि जेवढी आता हतबल आहे तेवढी उद्या नसेल.

'sex' हे उपभोगतेच साधन नसुन ती एक नैसर्गीक गरज आहे आणि हक्कही. अनैतिक अपराधापासुन स्वता:ला कसे वाचवता येईल? ह्याच बरोबर नैतिक सुख कस मिळवता येईल ह्या बद्दल देखील तितकाच गंभीर विचार व्हायला हवा.

पटलं सत्यजित तुझं म्हणणं. विशेषतः शेवटचा परिच्छेद! खरंतर हा खूप गुंतागुंतीचा आणि वादाचा विषत आहे. यावर वादातून का होईना पण विचारमंथन व्हायला हवंय. पण आपला भोंदू समाज बेगडी नैतिकतेखाली हे सगळं टाळतो. समस्येला सामोरं जायच्या ऐवजी पळू पहातोय आपण!

"तिने परिस्थितीला शरण जात 'प्रॅक्टिकल' विचार करून 'ऍड्जेस्ट' व्हायचं ठरवलं. " ते "पुढे कधी काही मिळवण्यासाठी तर कधी आयुष्याशी जुळवून घेण्यासाठी तिने अनेक संबंध ठेवले" या दोन वस्तुस्थितींमधे एक भयानक कथानक दडलेलं आहे. एका स्त्रीचं सशक्तीकरण या काळात झालं आहे. तीने स्वत: साठी काही निर्णय घेतले आणि त्यांवर अमल केला. त्या निर्णयाचं मॅनिफिस्टेशन नैतिक किंवा अनैतिक हा वेगळा प्रश्न... पण या निर्णयाप्रत ती कशी पोहोचली? यात एक नाट्य आहे... बघ कधितरी या अंगानी विचार करून...

आशिष दामले
वरीष्ठ सल्लागार, मानवाधिकार आयोग, अफगाणिस्तान

वेगळीच आहे कथा...
विशेष करून नायिकेचे कौतूक वाटले, कारण तिने स्वत।च्या नैसर्गिक गरजांचा आदर केला....
त्यासाठीचा मार्ग जरी अयोग्य असला तरिही.

एकुणच प्रकार विचित्र आहे. अस होउ शकेल यावर माझा विश्वास बसत नाही,तुम्ही हे फक्त चॅटवरुन तर ठरवल नाहिये ना???

i m totally blank yaar.
this real or just mind judjement.
if any but its raelly fact???????????
its very shocking for me yaar.
i dont have any word for this kinds of things.?????

बाप रे! Sad अंगावर आली हो कथा तिलकश्री!

कठीण आहे हो! सत्यजीतचे आणि दामल्यांचे म्हणणे पण पटले.

मनाला चट्का देउन गेली, ज्वलंत लिहिले आहात..पण पटलि कथा, कहिवेळा परिस्थितिशी खुप जणी तडजोड करतात..
तुम्हि लिहित जा. छान लिहिता तुम्हि...

बापरे...भयानक अति भयानक...पण जगात असं होतंच नसेल असं मला तरी वाटत नाही. बायकांना रोजच्या जगण्यातच खूपदा इतके विचित्र अनुभव येतात की हा अनुभव येणार्या ही भरपूर बायका आपल्या "संस्कृती प्रधान" देशात नक्किच असतील ह्यात शंका नाही!

तिलकश्री, एकदम जबर्दस्त लिहीलंत!!

========================
बस एवढंच!!

कथा वाचुन काय प्रतिक्रिया लिहु हेच कळत नाही....किती भयानक आहे हे सगळं. ...सत्यजीत आणि दामलेंचे म्हणणं १००% पटलं. खरंच नैतिकतेचे आणि अनैतिकतेचे आधार बदलतील समाजात..बदलायला हवेतच...
झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणुन ज्या गोष्टी आपल्या पर्यंत पोचत नाहीत त्या घडतच नाहीत असा अर्थ नसतो..अकश्रीलाही मोदक...अशा बर्‍याच स्त्रीया असतील आपल्या समाजात...

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

सत्य हे फार भयानक असतं.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

जळजळित वास्तव

ही कथा दिसत का नाही??? वाचायची खुप उत्सुकता आहे... कुणी सांगु शकेल का? धन्यवाद.... Happy

तिलकश्रि कथा दिसत नहिये Sad Sad ,आम्हाला कथा वाचायचि उत्सुकता आहे, काय प्राब्लेम आहे बघा ,आणी कथा परत एकदा पेस्ट करा

Pages