ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना ४

Submitted by स्वप्ना_राज on 22 December, 2009 - 02:12

मै खुद हैरां हू इन पन्नोंसे
क्यों खुदका चेहरा बेगाना लगता है
कहानी तो मेरीही है इनमे
लेकिन ये मोड अनजाना लगता है

-----

मी जन्माने हिंदू पण खरं सांगायचं तर सण/धार्मिक दिवस (संकष्टी, एकादशी वगैरे) सोडले तर आपल्या धर्माविषयी मला जास्त माहिती नाही. कधी करून घ्यायचा प्रयत्नही केला नाही हे कितीही कटू असलं तरी सत्य आहे. त्यामुळे हिंदू धर्मात इस्लामसारखी "zakat" ची प्रथा आहे की नाही मला नक्की माहित नाही. पण नसेल तर असायला हवी. कारण धर्मातच सांगितलं आहे म्हणून तरी जास्त लोकांनी दान दिलं असतं - कदाचित.

अर्थात ह्या हाताने दिलेलं त्या हाताला कळू न द्यायला आपण सगळेच काही धर्मराज नसतो. मग कोणाला कधी मदत केलीच तर उगाच आपण काहीतरी मोठं काम केलंय आणि समाजाप्रती आपलं असलेलं कर्ज फेडतोय असली "मिस युनिव्हर्स" छाप धारणा होऊन बसते - निदान माझीतरी, कधीकधी.

ही घटना घडून खूप वर्ष झाली नाहियेत. पण मनाचं कसं आहे ना? कपाटात कसं नको असलेल्या वस्तू आपण मागे कोंबून ठेवतो तसं आपल्याला नकोश्या वाटणार्‍या आठवणी पण कुठेतरी कोपर्‍यात असतात. पण एके दिवशी कपाट उघडल्यावर सगळं धप्पकन अंगावर पडावं तश्या कधीकधी एकदम समोर येतात. आणि आपण अगदी ओशाळून ओशाळून जातो. Sad

तपशील फार पुसट झालेत. कुठल्यातरी चॅरिटीबद्दल वाचून मी त्यांना काहीतरी द्यायचं ठरवलं - बहुतेक CRY असावं. पैसे नाहीत - वह्या असणार, कारण एक बाई येऊन घेऊन जाईल असं मला सांगण्यात आलं होतं. दुपारी दुसरं कोणी घरात नसताना बेल वाजली. दरवाजा उघडते तर एक बाई आणि एक छोटा मुलगा. ती त्या चॅरिटीकडून आली होती. मी काय द्यायचं होतं ते दिलं. तिने पाणी मागितलं. माझा मुंबईकर आत्मा सावध झाला. त्यांना बाहेर तसंच उभं करून बाहेरचं दार लावून घेतलं, आतलं उघडं होतं. पाणी आणल्यावर बाहेरचं दार उघडून त्यांना दिलं. पाणी प्यायले आणि ते दोघं निघून गेले.

पुढचे दोन दिवस मात्र माझे फार वाईट गेले. राहूनराहून वाटायला लागलं की असं बाहेर उभं करून त्यांना पाणी द्यायला नको होतं. निदान त्या छोट्याला एक चॉकलेट तरी द्यायला हवं होतं मी. शहरात राहून आपला किती औरंगजेब झालाय, कोणावरच विश्वास नाही. ह्या शहरीपणाचा राग यायला लागला. मग वाटलं आपली तरी काय चूक? पाणी मागून घरात घुसून मारण्याच्या काय कमी घटना घडतात? Better safe than sorry. नाही का?

पण आतून वाटतंय की आपण चूक केलीय. म्हणजे चूक झाली असणारच कारण मनाचा कौल आपल्याला पाहिजे तसाच पडला नाही तरी अचूकच पडतो. बरोबर ना?

बहिणाबाई मनाबद्दल बोलताना "आता व्हतं भूईवर, गेलं गेलं आभायात" वेगळ्या अर्थाने म्हणाल्या होत्या. पण माझं मन मात्र त्या दिवशी आभा़ळात झेपावणार्‍या पक्षाऐवजी जमिनीवर सरपटणार्‍या किड्यासारखं क्षुद्र्च झालं होतं एव्हढं नक्की. आजही आठवलं की स्वतःचीच खूप लाज वाटते. Sad

-----

काही वर्षांपूर्वी गोव्यात गेलो होतो. सगळी देवळं पाहून झाली - ट्रीपचा मह्त्त्वाचा भाग. मग एकदा देवदर्शन झालं की बीचेस, चर्चेस असले "गोवा दर्शन" कार्यक्रम करायला आपण मोकळे. असंच कुठेतरी चाललो होतो. गाडीत नेहमीप्रमाणे कॅसेट लागली होती. अचानक सिलसिलातलं गाणं लागलं - ये कहां आ गये हम. बोलण्याचा ओघ साहजिकच रेखा आणि अमिताभकडे वळला. ह्या असल्या ट्रीपवर घरगुती गोष्टी थोड्याच बोलतो आपण?

"इंदिरा गांधी आणि राजीव गांधी मधे पडले म्हणून नाहीतर त्या दोघांनी लग्न केलंच असतं" इति आईसाहेब.

"पण काहीही म्हण हा आई, जया भादुरीपेक्षा रेखाच अमिताभला जास्त सूट होते" लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडायचा हक्क आहे हे स्मरून मी.

"सूट होते? हे काय मॅचिंग ब्लाऊजपीसबद्दल बोलतोय का आपण? आणि असं होतं तर जया भादुरीशी लग्न करताना काय त्याचे डोळे फुटले होते?" सर्व हिंदी-मराठी मालिकातल्या बाहेरख्याली नवर्‍यांबद्दलचा आईचा सात्त्विक संताप गोव्यात उफा़ळून आला होता.

"अग, पण ते नुसतं इनफॅच्यूएशन असू शकतं ना? कदाचित रेखा भेटल्यावर त्याला खरं प्रेम काय असतं ते कळलं असेल" मी विरोधी पक्षांसारखा मुद्दा लावून धरायचं ठरवलं होतं त्या दिवशी.

"आपण रेखा, अमिताभ आणि जया सोडून काही दुसरं बोलू शकत नाही का?" बाबा आग लागायच्या आधीच पाणी मारत होते. पण मी नी आई सुरुवात केली की मागे हटत नाही.

"रेखावर तरी प्रेम होतं हे कशावरून? आणि असलं तरी नंतर कळून काय उपयोग? दोन मुलं आणि वार्‍यावर सोडून तिच्याशी लग्न करायचं का?"

आता ड्रायव्हरसुध्दा रेअर व्ह्यू मिररमधून आमच्याकडे पहात होता हे माझ्या लक्षात आलं. ख्रिश्चन असला तरी त्याला मराठी कळत होतं. आज घरी गेल्यावर तो घरच्यांना काय सांगणार हे त्याच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसत होतं. सुदैवाने आम्ही ज्या चर्चला चाललो होतो ते आलं. त्यामुळे ते बोलणं तिथेच थांबलं. आणि मग चर्चच्या पायर्‍यांवर बसलो होतो तेव्हा पुन्हा चालू झालं तेव्हा मात्र त्यात थट्टामस्करी नव्हती.

"तुला एक खरं सांगू का आई, मला नेहमी असंच वाटत आलंय की ज्या लग्नात प्रेम किंवा विश्वास उरला नाहीये त्या लग्नात अडकून राहण्यापेक्षा एक घाव दोन तुकडे केलेले बरे"

"काही तरी बोलू नकोस. बिचारी जया भादुरी. हा तिचा अपमानच नाही का?"

"एव्हढं सगळं होऊन त्याच नवर्‍याबरोबर रहायला लागणं हाच माझ्या मते तिच्यातल्या स्त्रीचा अपमानच नव्हे तर पराभव आहे. मान्य आहे मला की जेव्हा मुलांचा प्रश्न येतो तेव्हा हा मुद्दा गौण ठरतो. पण हे सगळं विसरणं सोपं असेल आई? एक स्त्री म्हणून विचार करून बघ. Maybe you can forgive but can you forget?" इथे मी थोडं थांबल्याचं अजूनही आठवतंय मला. कदाचित पुढं जे म्हणायचं आहे ते म्हणायला धैर्य गोळा केलं असेल. किंवा आपल्याला नक्की हेच म्हणायचं आहे ना ह्याची खूणगाठ पक्की केली असेल. कधीकधी, आपल्याला बोलायचं असतं एक पण शब्द काही वेगळंच सांगून जातात.

"आणि मला असंही वाटतंय की ह्या सगळ्यात रेखावर नेहमी अन्यायच झालाय. सगळी सहानुभूती जया भादुरीला मिळाली."

"तू 'पती, पत्नी और वो' मधल्या 'वो' च्या बाजूची आहेस वाटतं" बाबांनी मस्करीच्या स्वरात म्हटलं असलं तरी त्यांचा सूर थोडा अस्वस्थच लागला होता हे मला जाणवलं.

"तसं नाहीये बाबा, पण तुम्ही कधी रेखाच्या बाजूने विचार केलाय? ती विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली हा भाग थोडा वेळ बाजूला ठेवला तरी अजूनही तिच्या दु:खावर खपली धरू देतंय का हे जग? कुठलाही अ‍ॅवॉर्ड सेरेमनी पहा. अमिताभवर कॅमेरा आला की पाठोपाठ रेखावर येतोच येतो. जन्मभर हे दु:ख सहन करणं कठिण आहे, फार कठिण आहे."

मला नक्की काय म्हणायचं आहे ते त्या दिवशी मी आई-बाबांना समजावून नाही देऊ शकले. त्यांना बहुतेक अस्वस्थच केलं मी माझ्या विचारांनी. आजही ते नेमकं मांडणं अवघड जातंय. मी कोणी स्त्रीमुक्तीवादी नाही किंवा विवाहबाह्य संबंधांचं समर्थन मुळीच करणार नाही. "और वो" च्या बाजूने मी कधी बोलेन असं मला कोणी सांगितलं असतं तर मी त्याला वेडयात काढलं असतं. पण त्या दिवशी बोलले. मला त्या दोघींची वेगवेगळी दु:खं जशी जाणवली ती तशी असतील किंवा नसतीलही कदाचित. त्यांचं जग वेगळं, आपलं वेगळं. ह्या त्रिकोणातली तिसरी बाजू न्याय्य नसेलही कदाचित. पण म्हणून तसं सगळ्याच त्रिकोणाबद्दल असेल का? नाण्याला नेहमीच दोन बाजू असतात का आपल्याला न दिसलेली एक तिसरी बाजू पण असते?

आजही कधी सिलसिलातलं ते गाणं लागलं की मला आमचा गोव्यातला संवाद आठ्वतो. "हमे मिलनाही था हमदम किसी राहभी निकलते". खरंय, एक वेळ सुख रस्ता चुकेल पण दु:ख मात्र आपला पत्ता शोधत बरोबर येऊन पोचतंच.

-----

कँपसवर पोचल्या पोचल्याच ज्यांच्याशी मस्त दोस्ती झाली त्यातली ती एक होती. तीन मुलांची आई असून सडसडीत होती म्हणून मला तिचं कौतुक वाटलं होतं. त्याहून कौतुक हे की इतक्या वर्षांनी ती एमबीए करायला आली होती. आणि तिचा उत्साह तर काही विचारू नका. कायम हसतमुख. स्वतः मुलांची जबाबदारी घेऊन बायकोला एमबीए करायला देणारा तिचा नवरा नाही म्हटलं तरी थोडाफार कौतुकाचा धनी झालाच होता. "अरे, उसे मिलो तो एक बार. बहोत सही बंदा है" हे तिचं नवर्‍याबद्दलचं मत.

असेच २-३ महिने गेले आणि मग तिच्यात हळूहळू बदल व्हायला लागला. थोडी गप्प गप्प रहायला लागली. कारण विचारावं असं कितीदा वाटायचं पण दुसर्‍याच्या आयुष्यात बोलावल्याशिवाय डोकावायचं नाही हा अस्मादिकांचा नियम. त्यामुळे असाईनमेन्टस, प्रोजेक्ट, अवांतर विषय ह्यावरच बोलणं चालू राहिलं.

आणि मग एक दिवस डिनरला जाताना मला हाक मार असं तिने सांगितलं म्हणून मेसमध्ये जायच्या आधी तिच्या खोलीकडे गेले. दार ठोठावणार इतक्यात तिचा फोनवर बोलतानाचा आवाज आला. ती रडत होती. पुन्हा पुन्हा सॉरी म्हणत होती. १-२ वाक्यं कानावर पडली तेव्हढ्यावरून फोनवर तिचा नवरा होता हे मला कळलं तरी पण पुढे काय करावं ते कळेना. एकदा वाटलं की जोराने दार वाजवावं म्हणजे तिला फोन कट करावा लागेल आणि नंतर नवर्‍याशी शांतपणे बोलता येईल. पण मग विचार केला की इथून निघून जाणंच शहाणपणाचं आहे. तरी दूर जाऊन १० मिनिटं थांबले की ती बाहेर येईल तेव्हा तिला एकटीला जायला लागू नये. मग मात्र स्टडी ग्रूपबरोबर बसायला उशीर होईल म्हणून निघावं लागलं.

माझं जेवण संपत आलं होतं तेव्हा ती मेसमध्ये आली. चेहेरा उतरलेला, रडली आहे हे डोळ्यावरून कळत होतं. अश्या वेळी काय बोलायचं असतं हे शिकवणारा करस्पॉन्डन्स कोर्स असता तर बरं झालं असतं असं वाटून गेलं क्षणभर. मग कसं कोणास ठाऊक - काय करायचं, त्याहीपेक्षा काय करायचं नाही, हे मला समजलं. "अरे, जल्दीमे निकली ना तो तुझे बुलाने आना भूल गयी. सॉरी यार" मी तिला म्हटलं "इट्स ओके. मेरीभी आंख लग गयी थी" तीही म्हणाली. "तुम्हारा डिनर होनेतक बैठू क्या?" "नही रे, तू जा. वैसेभी मै सिर्फ सूपही लेनेवाली हू, पाच मिनिटमे हो जायेगा" निघताना मी फक्त तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि एव्हढंच म्हटलं "टेक केअर". "आय विल, थँक्स यार" तिने म्हटलं. मी मेसमधून बाहेर पडले.

संशयाचं भूत कुठल्याच मांत्रिकाला काढता येत नाही. ग्रूप असाईनमेन्ट करायला तिच्या खोलीत जमलेल्या तिच्या स्टडी ग्रूपमधल्या एका मुलाने चुकून तिच्या नवर्‍याचा लॅन्ड्लाईन वर आलेला फोन उचलला होता. एव्हढंच निमित्त झालं. पुढे काट्याचा नायटा झाला आणि एका महिन्यात कोर्स अर्धवट टाकून तिला जावं लागलं.

आणि मी? मनात आलं ते तोंडावर बोलायची सवय असलेली मी. बायकोला आपली मालमत्ता समजणार्‍या सगळ्या सगळ्यांवर जाम उखडून असलेली मी. खरं तर एक फोन करून तिच्या नवर्‍याला झापावं असं मनात आलं होतं. पण ऐनवेळी पांढरपेशा मनाने कच खाल्ली. मग हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे ह्या सबबीखाली मी तोंड लपवलं. मी बरोबर केलं का चूक?

काय अजब मामला आहे ना आयुष्य म्हणजे? मला नको ते ऐकावं लागलंय हे तिला कळलं होतं आणि ते तिला कळलंय हे मला कळलं होतं. पण मी एक नाटक सुरू केलं आणि संवाद विसरलेल्या नटाने दुसर्‍या नटाकडून क्लू घेऊन बोलायला सुरुवात करावी तसं तिने ते चालू ठेवलं. "हम सब रंगमंचकी कठपुतलिया है जिनकी डोर उपरवालेके हाथोमे है" असं बाबूमोशायला सांगणार्‍या आनंदचं आयुष्य कमी असलं तरी ते त्याला पुरेपूर कळलं होतं, नाही का?

आजही कधीकधी ती आठवते. आणि तिची पाठ धरून मागोमाग आणखी एक आठवण येते. देवपूजेला लागतात म्हणून चांगली १० रुपयांची फुलं विकत घेतली होती. आणि थोडं अंतर चालून गेल्यावर अचानक प्लॅस्टिकच्या पिशवीचा तळ भस्सकन फाटला. काही कळायच्या आत सगळी पिशवी मातीत रिकामी झाली होती. देवाब्राह्मणांच्या साक्षीने जोडलेल्या तिच्या नात्याचं असंच झालं होतं ना?

फुलाला लागलेल्या मातीच्या वासाला नेहमी सुगंधच म्हणायचं का? Sad

-----

एक विनंती: ह्या लेखातल्या काही विचारांशी आपण सहमत नसू शकता. तसं असेल तर मला जरूर सांगा. पण आपण तो विषय तिथेच सोडून देऊ. ह्यावर कुठल्याही प्रकारचा वाद होऊ नये असं मला वाटतं. आपल्या मायबोलीवर ह्या एकाच गोष्टीची मला भीती वाटते. Sad

-----

ह्याआधीची पानं:

ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना १

ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना २

ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना ३

गुलमोहर: 

पन्ना.. खूप सुंदर अगदी आतून लिहितेस त्यामुळे तू लिहिलेलं खोलवर भिडतं.. कोणाच्याही सहमती,असहमती,वादाची पर्वा न करता बस लिहित राहा..आपलं हृदय ओतून.. तू म्हणतेस ना तश्या प्रसंगांना कधी ना कधी, जवळ जवळ आपण सर्व सामोरे गेलेलो आहो ..

सुरेख!!
प्रामाणिक कथन. खरच अशा कैक गोष्टी असतात. त्यावेळी आपण अस का वागलो हे आताच्या आपल्याला कळत नाही.
लिहित रहा. Happy

लेख छान आहेत- सर्वच. असे अनुभव आपल्या रोजच्या जीवनात येतात;पण संवेदनशील मनच ते जपून ठेवून लिहू शकते.

वर्षू नील, अनिलभाई, अमृता, नंद्या, रूनी पॉटर, मिलिंदा, झकासराव, चिमुरी, चिन्नु, अलका_काटदरे
वेळात वेळ काढून वाचल्याबद्द्ल आणि प्रतिसादाबद्द्ल तुम्हा सगळ्यांचे खूप आभार Happy

आयुष्यातले असे अनजाने मोड़ मनात लपून रहातात ..:) छान लिहिले आहे ... भाषा खुप ओघवती आणि सुंदर आहे ...याच पन्न्यावर आले होते आता बाकीचे पन्ने पण वाचते .. Happy

>>देवपूजेला लागतात म्हणून चांगली १० रुपयांची फुलं विकत घेतली होती. आणि थोडं अंतर चालून गेल्यावर अचानक प्लॅस्टिकच्या पिशवीचा तळ भस्सकन फाटला. काही कळायच्या आत सगळी पिशवी मातीत रिकामी झाली होती. देवाब्राह्मणांच्या साक्षीने जोडलेल्या तिच्या नात्याचं असंच झालं होतं ना? >>
काय ह्रुदयस्पर्शी लिहिलय तू???
हॅट्स ऑफ!!!
केवळ लाजवाब!!
मी एवढं उशीरा का वाचल हे!!!
यु आर सिम्प्ली ग्रेट!!!
Happy

देवपूजेला लागतात म्हणून चांगली १० रुपयांची फुलं विकत घेतली होती. आणि थोडं अंतर चालून गेल्यावर अचानक प्लॅस्टिकच्या पिशवीचा तळ भस्सकन फाटला. काही कळायच्या आत सगळी पिशवी मातीत रिकामी झाली होती. देवाब्राह्मणांच्या साक्षीने जोडलेल्या तिच्या नात्याचं असंच झालं होतं ना?

फुलाला लागलेल्या मातीच्या वासाला नेहमी सुगंधच म्हणायचं का? अरेरे>>>>>>डोळ्यात टचकन पाणि आल हे वाचुन

God Bless you dear Happy