मालपुवा

Submitted by तृप्ती आवटी on 19 December, 2009 - 18:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या मैदा, चांगले पिकलेले अर्धे केळे, एक डाव मोहन, दोन वाट्या साखर, तळणासाठी तेल, चिमुटभर केशर, अर्धा टी स्पून वेलदोड्याची पूड, मुठभर पिस्ते/काजू/बदामाचे काप.

क्रमवार पाककृती: 

मैद्यात डावभर तेलाचे मोहन घालावे. त्यातच केळे चांगले कुस्करुन घालावे. पाणी घालुन भज्याच्या पीठाप्रमाणे भिजवावे. १५-२० मिन. झाकुन ठेवावे. हे झाले पुव्याचे पीठ.

एका भांड्यात साखर घ्यावी. साखर जेमतेम बुडेल इतके पाणी घालुन एक उकळी काढावी व बाजुला ठेवावे. त्यात केशर, वेलदोड्याची पूड, सुकामेव्याचे काप घालुन हलवावे.

एका कढईत पुवे तळायला तेल गरम करुन घ्यावे. तेल तापल्यावर मोठ्या पळीत पीठ घेऊन पळी गोल गोल फिरवत पुरीच्या आकारात पीठ कढईत सोडावे. मंद आचेवर पुवा दोन्ही बाजूंनी गुलाबी रंगावर तळुन घ्यावा. तेल नीट निथळुन मग पाकात घालावा. दुसरा पुवा तयार झाला की आधी पाक निथळुन पहिला काढुन घ्यावा.

वाढणी/प्रमाण: 
४-५ मोठे
अधिक टिपा: 

_सुकामेवा, केशर इत्यादी माल माल घालतात म्हणुन ह्याला मालपुवा म्हणतात. पीठातच साखर घालुन जे करतात ते नुसते पुवे.
_ह्या मालपुव्यावर आणखी रबडी घालुन खातात. बिहारमधे मालपुवे आणि दाट घट्ट रबडी हा होळीचा खास मेनु असतो.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, बरोबर म्हणतेस. पण ते पीठ भिजवायचे असते १५-२० मिन. सुरुवात करुन सगळे तळुन होइतो तास लागतोच.

सुन्दर. त्या पाकात बडिशेप घातली थोडी तर वेगळा स्वाद येतो. माझी कल्पना ते तव्यावर थोडे थोडे डोश्यासारखे घालायचे अशी होती. पुढ्च्या रविवारी ट्राय मारणार.

मामींना अनुमोदन. बडीशेपचा मस्त स्वाद येतो. पुवे धिरड्यासारखे घालूनही बनवता येतात. चिन्नुनी म्हटल्याप्रमाणे मैद्यातच थोडे दूध,साखर, बडीशेप आणि खोबर्‍याचे काप घालूनही पुवे करतात, मग पाक करण्याचा त्रास(?) वाचतो. असे मालपुवेही छान लागतात.

आत्ताच मालपुवे करुन खाऊन झाले . खाली फोटो देतेय , मी मैद्याऐवजी कणिक वापरली बाकी सगळे तू लिहिल्याप्रमाणेच केले . Happy पहिला मालपुआ मी जरा पांढरा असतानाच बाहेर काढला तर आतून जरा कच्चा वाटला , म्हणून पुढचे अशा रंगावर तळलेत . Happy

IMG_0014_0.JPG

अरे वा संपदा. मी भारतातुन आल्यापासून करेन म्हणते आहे, तू केले पण Happy

पाकात बडिशोपचा स्वाद मला पण आवडतो.

आहाहा, माझ्या एका बिहारी मैत्रिणीनेच एका होळीला खाऊ घातले होते गरम गरम मालपुवे ... त्याची आठवण झाली.

बिहारमधे मालपुवे आणि दाट घट्ट रबडी हा होळीचा खास मेनु असतो.>>
बिहार मधे एकुणच दुध दुभते जास्त असल्याने, रबडी चा वापर करायला निमीत्तच हवे असते Happy
पण तो पुवा पाक फक्त दाखवलेला असतो. पाकात भिजवलेला नाही.

मला पण एका बिहारी मित्राच्या बायकोने दोन्ही प्रकारचे एकाच दिवशी खाउ घातले होते. Happy

जंगली महाराज रोडच्या मयुर मधे छान मिळतो

मी एकदाच कुठल्याश्या कार्यक्रमाला खाल्ले होते. खूपच आवडले पण दुसर्‍या लोकांकडे कार्यक्रम असल्याने हात राखून खाल्ले. Wink
आता या मस्त पदार्थावर रबडी म्हणजे लगेच व्यायामाला पळावं लागेल.
रेसिपी तर छानच आहे.