ओ डय़ूऽऽड! भाग १- तरूण मुलांच्या मनाची स्पंदनं- लॊकसत्तातील लॆख मालिका

Submitted by मोहना on 18 December, 2009 - 13:12

ओ डय़ूऽऽड! भाग १
ओ डय़ू.. ड! लेखमालिका म्हणजे भारतीय पालकांच्या अमेरिकन असलेल्या तरुण मनांच्या स्पंदनाचा आलेख आणि आईने मुलाला पत्र लिहून तिला काय वाटतं हे व्यक्त करण्याचा केलेला प्रयत्न. यातून ओळख होईल ती हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांच्या जीवनशैलीची, समस्यांची प्रगतीची, शाळांमार्फत नवीन नवीन राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची.

परागला विचारू का नको अशा संभ्रमातच शुभम् गाडीत बसला. इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि एकदम शुभम्ने त्याच्या घनिष्ट मित्राला विचारलं.
‘तू ड्रग डीलिंग करतोस?’ आजच शाळेत त्याला हे समजलं होतं आणि पराग भेटला तसं शुभम्ला राहवलं नाही.
परागचा चेहरा कावरा बावरा झाला. घाबरून त्याने समोर बघितलं. रेडिओच्या आवाजात वडिलांनी काही ऐकलं असेल असं वाटत नव्हतं.
‘स्टुपिड! तुला कुणी सांगितलं?’ रूक्ष स्वरात त्याने विचारलं.
‘नेवर माईंड.’ शुभम्ला त्याला कुणाकडून हे समजलं ते सांगायचं नव्हतं.
‘नाही. तू मला उगाच काहीतरी विचारू नकोस.’ परागच्या घोगऱ्या पण ठाम आवाजाने शुभम्च्या अंगावर काटा आला. तो एकदम गप्प झाला. रेडिओचा आवाज गाडीत घुमत राहिला. दोघांच्या घरातलं कुणी ना कुणी, आळीपाळीने त्यांना एकत्र शाळेत आणायचं, सोडायचं (कारपूलिंग). कधी खूप गप्पा नाही तर मग काहीच नाही. त्यामुळे त्या शांततेतही थोडंसं अवघडलेपण सोडलं तर फार वेगळं काही नव्हतं. शुभम् गाडीतून उतरला पण समजलेली बातमी घरात सांगायची की नाही हे त्याला ठरविता येईना. तरीही आत आल्या आल्या त्याच्या मनातला अस्वस्थपणा बाहेर पडलाच.
आई लगेच म्हणाली,‘आपण परागच्या घरी सांगितलेलं बरं.’
शुभम्ला कुठून या फंदात पडलो असं झालं. बाबांनी समजल्यासारखं म्हटलं.
‘केवढी घाई करतेस प्रतिक्रिया व्यक्त करायला? असं सांगून कसं चालेल लगेच. काही ठोस पुरावा आहे का आपल्याकडे, आणि त्याचे आईवडील त्याला विचारणार, तो शुभम्ला जाब विचारेल, त्यातून नेहाही मधल्या मध्ये अडकेल, परागवर राग काढेल ती.’
आई एकदम गप्प झाली. शुभम्च्या लगेचच कारण लक्षात आलं. बाबा तिला कधीही म्हणतो ना, ‘फार घाई करतेस प्रतिक्रिया व्यक्त करायला’, ते अजिबात आवडत नाही आईला.
आई तणतणलीच. ‘मी काय लगेच धावलेले नाही सांगायला. नुसतं माझं मत व्यक्त करतेय. आपल्याला माहीत असून त्याच्या पालकांना अंधारात ठेवलं, तर त्या मुलाचं आयुष्य नाही का फुकट जाणार? पुन्हा तसं काही झालं तर आपण आधीच सांगायला पाहिजे होतं असं वाटत राहणार.’’
आता त्या दोघांचं चांगलंच वाजणार हे लक्षात आलं शुभम्च्या. ही घरातली खासियतच. एक सांगायला जायचं, तर दुसरंच सुरू होतं आणि शेवट काहीतरी तिसराच.
कसं वागायचं घरात तेच त्याला कळेनासं झालं होतं. दोघांचा वाद आता रंगणार हे लक्षात आलं तसा शुभम् सटकलाच तिथून.
सहावीत गेल्या गेल्याच त्याने ऐकलं होतं की माध्यमिक शाळांमध्ये बरीच मुलं ड्रग्ज घेतात, विकतात. घरात सतत तीच काळजी. तशी शाळा चांगल्या वस्तीतली. पण बंदुका, शारीरिक संबंध आणि ड्रग्ज या तीन प्रश्नांनी सगळ्यावर मात केली होती. या गोष्टींशी कुठली वस्ती, शाळा याचा काही संबंध नाही हे कुणाच्या का लक्षात येत नाही कुणास ठाऊक. एकदा शाळेतल्या बाथरूममध्ये दोन मुलांनी हातबॉम्ब फोडलाच. थोडं घाबरायला झालं पण तसं चित्तथरारकच होतं की. ‘वॉव, कूल!’ असलं धाडस काही सोपं नाही. पुन्हा पुढचे तास झालेच नाहीत. पोलिसांनी ताबडतोब त्या दोन मुलांना ताब्यातही घेतलं. शाळेतून प्रत्येक मुलाच्या घरी काय झालं, ते सांगणारा फोनही गेला. तेवढी एकच घटना त्या तीन वर्षांत. नेमकी ती मुलं वर्गातलीच निघाली. मग काय, आईला भारतीयांच्या पाटर्य़ामध्ये, त्या ‘डॅम बोअरिंग’ लोकांना सांगायला एक किस्साच मिळाला होता वर्षभर. कधी कधी तर तेच तेच विचारायची, तेव्हा वाटायचं माझी काळजी म्हणून विचारलं की मैत्रिणींना सांगायला? पण अशा गोष्टी जे करतात ते लपूनछपूनच. सहजासहजी नाही कळत काही. ड्रग डीलिंगबद्दल गप्पा होतात पण कुणालाच ते कोण आणि कसं करतं ते नव्हतं कळलं. आता हायस्कूलमध्ये आल्यावर खूप मुलांची नावं माहीत झाली आहेत. त्यात आईच्या मते चांगल्या वर्तणुकीची असणारी ‘देसी’ नावंही काही कमी नाहीत. पण ते घरात सांगितलं की पहिला प्रश्न.
‘तू नाही ना घेत? बघ हं. आमचं असतं लक्ष. नाहीतर कानावर येतं इथून तिथून.’
‘अरे एकीकडे तुम्हीच म्हणता की, ‘तू स्वत:हून सांग’. मग इथून तिथून कानावर येईल अशी का धमकी देता? मी घेत असतो तर मी कशाला नावं सांगितली असती?’ असं सरळ विचारलं की गडबडतात पण या मोठय़ा लोकांना आपल्या चुका कबूल करणं फार कठीण जातं. पुन्हा हुकमी एक्का असतोच.
‘आवाज नको वाढवू. समजलं आम्हाला!’ तिथेच संवाद संपवायचा. कधी चुकूनसुद्धा ‘आमचं चुकलं, यू आर राईट!’ म्हणणार नाहीत.
लॅपटॉपवर शुभम्ची बोटं धाडधाड पडत होती. नेहाला एकदा दिवसभरात काय घडलं ते सांगितलं की त्याला वेगळी डायरी लिहायची गरजच उरत नव्हती. लॅपटॉपच्या पडद्यावर तो नजर खिळवून होता. कधी एकदा नेहाची प्रतिक्रिया त्या छोटय़ाशा चौकोनी पडद्यावर वाचू असं झालं होतं.
‘ओ माय गॉड! डय़ूड!.. दीज ग्रोन अप्स.. तू तरी कशाला सांगितलंस पण?’
‘ए, तुला माहीत आहे ना मी सगळं सांगतो घरात. बाहेरून गोष्टी कळल्या की वैतागतात दोघं. माझ्याकडूनच समजलं की रागवत नाहीत, समजून घेतात. तू मला आवडतेस ते स्पष्ट सांगितलं म्हणूनच बोलायला मिळतं आपल्याला हे विसरू नकोस.‘
’ हो माझी आई सारखी सांगते. आम्ही विरोध करत नाही याचा अर्थ तुम्हाला उत्तेजन देतोय असाही नाही.’
‘किती वेळा तेच तेच सांगतात. डोकं उठवतात अगदी.’
‘जी २ जी (गॉट टू गो). उद्या बोलू आपण. काळजी करू नकोस. लव्ह यू.’
शुभम्ला डोकं एकदम शांत झाल्यासारखं वाटलं नेहाच्या शब्दांनी. थोडंसं हवेत तरंगल्यासारखंही. ‘लव्ह यू.’ गुदगुल्या झाल्यासारखं गालात हसत, पुटपुटतच त्याने पलंगावर अंग टाकलं. नेहाशी ऑनलाईन गप्पा हीच त्याची डायरी. मनातलं तिला कळलं की डायरी लिहून झाल्यासारखा तो शांत व्हायचा.
जाग आली ती एकदम दहा वाजता. घरात शांतताच होती. शनिवार. यापेक्षा जास्त वेळ लोळत काढला तर खालून आई ओरडणार याची त्याला खात्री होती. आळसावत त्याने पांघरूण झटकलं. घडी करता करता झटकलेल्या पांघरुणातून पडलेल्या पाकिटाने तो आश्चर्यचकित झाला. इथे कुणी आणून ठेवलं आणि कुणासाठी?
* * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * *

प्रिय शुभम्,
आश्चर्य वाटलं ना पत्र पाहून? काल एकदम ताडकन तोडूनच टाकलंस तू. बाबाची आणि माझी वादावादी सुरू होणार हे लक्षात आलं आणि वैतागलास ना? ठरवलं होतं तू शांत झाल्यावर तुझ्याशी बोलायचं. पण पुन्हा आपलेच वाद सुरू होतात. म्हटलं घरातल्या घरात अगदी छोटीशी चिठ्ठी लिहावी. काल खरंच भीती वाटली मला. ड्रग्ज, बंदुकांचा सर्रास वापर, टीन एज प्रेग्नंसी या इकडच्या शाळांमधल्या समस्या ठाऊक आहेत रे, पण पक्की खात्री असते ना की आपली देशी मुलं यात अडकणारच नाहीत. शाळांमध्ये तरुण मुलं बेछूट गोळीबार करतात. निष्पाप मुलं प्राणाला मुकतात. आपल्याच मुलांच्या शाळेत हे असलं काही होणार नाही यावर ठाम विश्वास असतो प्रत्येकाला. पण तरीही असं कुठेही घडलेलं ऐकलं की पोटातला गोळा कितीतरी दिवस जात नाही. आपण इतक्या चांगल्या वस्तीत राहतो तरी तुझ्याच वर्गातल्या त्या दोन मुलांनी शाळेतल्या संडासात प्रयोग म्हणून हातबॉम्ब फोडण्यचा प्रकार केला होता ना? त्यात अचानक अगदी शेजारचीच मुलं आणि तीही भारतीय; ड्रग डिलिंग करायला लागतात हे समजतं तेव्हा नको का त्यांच्या पालकांना जागृत करायला? परागची आई तर मला सारखी भेटते. मुलांबद्दल कौतुकाने काही सांगायला लागली की वाटतं सांगावं तिला, निदान काही सूचित तरी करावं की आपण फार भ्रमात असतो आपल्याच मुलांबद्दल. पण नुसतं सांगायला हवं म्हटल्यावर आपल्या घरात झालेला गोंधळ आठवतो. काय करायला हवं तेच कळेनासं झालंय. पण माझं चुकलंच. आधी तू काय बोलतोस ते पूर्ण ऐकायला पाहिजे होतं. बघ मला एवढंच सांगायचं होतं. तुझ्याशी बोलल्यासारखंच वाटतंय. माझ्या मनातलं पूर्णपणे तुला समजलं त्याचं समाधानही. नाहीतर मध्ये मध्ये तू इतका बोलतोस ना. बघ मी लिहिलंय ते पटतंय का.
ता. क. : एवढं सगळं असलं तरी हेवा वाटतो हं मला, तुला इथल्या शाळेत शिकायला मिळतं त्याचा. किती साधनं उपलब्ध आहेत रे तुम्हाला शाळेतून आणि भविष्यात काय करायचं त्याच्या मार्गदर्शनासाठी शाळाही किती तत्पर असतात. नकळत भारतात आम्ही शिकत होतो तेव्हाचं शिक्षण आणि इथल्या पद्धतीची तुलना सुरू होते. गळेकापू स्पर्धा, सतत बाकीच्या मुलांचे दिले जाणारे दाखले, हुशार, ढ, बऱ्यापैकी असं नावासमोर झालेलं शिक्कामोर्तब इत्यादी इत्यादी. तो एक वेगळाच विषय आहे. ए, पण आमच्याच एका शिक्षकांमुळे मी लागले हं लिहायला. ते नंतर सांगेन कधीतरी, एकदा तू पत्र वाचतो आहेस ही कल्पना आली की. नीट वाच हं मी काय लिहिलं आहे ते.
तुझी आई

* * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * *

गुलमोहर: 

नमस्कार मोहना,
आपल्याला आवडलेली एखादी साईट किंवा ऑनलाइन लेख बाकीच्या सगळ्यांनी वाचावा, सगळ्यांना कळावे यासाठी मायबोलीवर कानोकानी हा विभाग सुरू केलेला आहे. तिथे तुम्ही या सगळ्या लेखांची लिंक देवू शकता.

Thanks! I will do that. I want to write this message in Marathi....Looks like Sarav karava lagel.

मराठीत लिहीण्यासाठी मदत हवी असेल तर प्रतिसाद लिहीतो त्या चौकटीच्या डोक्यावर एक निळे प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा. सरावाने नक्की जमेल. Happy

चांगली आहे लेखमाला, मी आतापर्यंत ३ भाग वाचलेत, पुढचे वाचावे असे वाटत रहातं...

बाहेर रहाणार्‍या पालकांचा `मुलांना वाढवणे' हा जिव्हाळ्याचा विषय...