संस्कार

Submitted by सुनिल परचुरे on 18 December, 2009 - 02:36

संस्कार
``साहेब आत बॉडी ढकलु कां ?“
डॉ. आनंदने मानेनेच होकार दिला. बॉडीला स्ट्रेचरवरुन हळूच धक्का दिल्यावर ति सेकंदातच आत इलेक्ट्रीक भट्टीत गेली. जातानाच भर्र भर्र आवाज करत बॉडीवरचा पांढरा कपडा पेटु लागला.
``आईss ग “ अस म्हणत आनंदच्या बायकोने आपले डोके त्याच्या छातीवर ठेऊन अश्रुंना वाट मोकळी करुन दिली.
``अस्थि न्यायला कधी येणार ?“
``कधि मिळतील ?“
``आता वेळ असेल तर तास-दिड तास थांबा. लगेच देतो“
``आम्ही थांबतो, घेऊनच जाऊ“.

डॉ.आनंद आपल्या बायकोला म्हणजे रोहिणीला, दूरवर एका बाकावर घेऊन बसला. तिचे दोन्हि हात त्याने आपल्या हातात घेतले . अतिश्रमाने त्यांनि आपले डोळे मिटून घेतले. त्यांच्या डोळ्यापुढे गेल्या सहा महिन्यातल्या सर्व अतर्क्य घटना फेर धरु लागल्या. त्यांच्या आयुष्यात जे घडले ते कुणालातरि सांगावे हे लागणारच होते. कारण हे दु:ख त्यांना आता सहन होत नव्हते. तुम्हाला सांगुन ते थोडेतरि हलके होइल म्हणुन तेच तुम्हाला सांगतो.

मी डॉ . आनंद देवधर. मी आणि रोहिणी एकाच मेडिकल कॉलेजात होतो. एम.बी.बी.एस. झाल्यावर एम.एस. करता मला (ENT) इएनटीची साईड मिळाली तर तिला गायनीक. आमच्या मैत्रीच रुपांतर प्रेमात आणि प्रेमाच लग्नात कधी झाल हे खरोखर कळलच नाही. माझ्या वडलांचा पुण्यात स्वतंत्र व्यवसाय होता. प्रभात रोडवर एक दुमजली बंगला होता. पुढे त्याच रुपांतर आम्ही आमच्या हॉस्पीटलमध्ये केल. म्हणजे तळमजल्याला हिच मॅटर्निटी होम सुरु केल व पहिल्या मजल्यावर माझे छोटेसे 10 बेडच हॉस्पिटल सुरु झाल. दुस-या मजल्यावर आम्ही दोघे व आई वडिल राहायचो. माझा मोठा भाऊ जो सिव्हिल इंजिनीयर आहे तो नोकरी निमित्ताने मुंबईतच स्थाईक झाला होता.

रोहित , माझा मुलगा. तो झाला आणि रोहिणीची आणखीनच धांदल होऊ लागली. तरी बर घरात आजी आजोबा होते. रोहितच सर्व करुन डीलीव्हरीकरता कधीही खाली हॉस्पीटलात जाण, आल गेल, हे करता करता दिवस कसे जात होते कळतच नव्हंत. मी ही काही खाजगी हॉस्पीटल्समध्ये ऑपरेशनकरता जात होतो. त्यात माझे स्वतचे पेशंटस् होतेच, आणि अधेमधे रोहित . खरच लहानपणि इतक्या खोडया करायचा. मला आठवतय एकदा मे महिन्याच्या सुट्टीत एक दिवस मला आई सांगायला लागली की अरे मुलाचे पाय पाळण्यात दिसतायत. मी आईला म्हटले म्हणजे काय ? तर म्हणाली अरे आज सर्वजण आलेली लहान मुल म्हणजे माझ्या भावाची, चुलत मामे बहिंणींची मुल मिळून सर्वजण खेळ झाल्यावर डॉक्टर पेशंट खेळायला लागले. रोहित नेहमीप्रमाणे डॉक्टर झाला. आणि काय सेम तुझी ऍक्टिंग करतो. पेशंटला तपासण, बोलण, औषध देण अगदी तुझ्यासारखच. शेवटी त्या गौतमीला म्हणाला माझि फी दे , तर गौतमी म्हणाली अरे माझ्याकडे पैसे नाहीत ही फक्त चॉकलेटस आहेत तर हा म्हणाला चालतिल हि फक्त चॉकलेटसहि चालतिल. सगळ्यांची हसता हसता पुरेवाट झाली.

शाळेत रोहितने कधीही पहिला नंबर सोडला नाही. दहावी बारावीतही पहिल्या पन्नासात होता. सिईटीलाही पहिल्या पन्नासात. त्यामुळे त्याला हव्या त्या मुंबईच्या मेडिकल कालेजमध्ये आरामात ऍडमिशन मिळाली. खरोखर आम्हा दोघांनाही त्याचा खुप अभिमान वाटला. तो मेडिकलला गेल्यावर अक्षरशः माझ्या अंगावर मुठभर मास चढले. रोहितच्या ओळखीचा एक मित्र होता, त्याच्या ओळखीचे दोघेजण माहीमला एका फ्लॅटवर पीजी म्हणुन राहात होते. ही दोघे जण गेल्यावर ते चारजण होतील. त्यांचा सर्व खर्चही शेअर होईल. शिवाय काही अडचण पडली तर काका होताच. खरतर मुंबइतल्या भावाला हे पटत नव्हत . पणा म्हणाला हल्लीची मुल, त्यांना त्यांची प्रायव्हसी हवी असते, जी त्याला आमच्या घरात मिळणार नाही. काकांच घर म्हटल की आपोआप काही बंधनही आली. त्यामुळे त्यानेही एवढे आढेवेढे घेतले नाहीत पण सांगितल की कसलीही अडचण आली तर सांग, लगेच येईन. पण मलाही रोहितच म्हणण पटल की तिथे अगदी काका जरी असला तरी त्याला कशाला त्रास द्यायचा. चेंज म्हणुन कधितरि जाइन कि त्याच्याकडे. त्याला मुंबइत सोडायला मिच गेलो होतो. त्याच्या मित्राला मि कधितरि पाहिले होते पण बाकिचे दोघेजण, त्यातला एक पंजाबि होता तर एक गुजराथि तसे ठिक वाटले .

कॉलेज सुरु झाल्यावर पहिले दोन शनिवार-रविवार तो पुण्यात आला. होमसीकच झाला होता. कॉलेजच वातावरण, तिथले प्रोफेसर्स, प्रॅक्टिकल्स, बाकीचे नवीन मित्र ह्याबद्दल भरभरुन बोलायचा. तिस-या आठवडयातल्या शनिवारी म्हणाला येणार नाही. एका मित्राची बर्थ डे पार्टी आहे. शनिवारी आम्हीही त्याला फोन केला नाही. पण रविवारी सकाळी दहा नंतर फोन केल्यावर नुसता मोबाईल रिंगीग-रिंगीग. दुपारी महाराजांनि फोन उचलला. म्हटले अरे काय पार्टी म्हणजे ओली होती की काय? तर म्हणाला हो सर्वजणच ड्रिक्सं घेत होते. मलाही थोडे घ्यावि लागले. मी बावळटा सारखा मागे राहून कस चालेल ?

संध्याकाळी हे सर्व कळल्यावर बायकोचे सुरु झाले की कसली ही मुल, दारु शिवाय यांच्या पार्ट्या होऊ शकत नाहीत कां ? मी म्हटले की अग मी सुध्दा ऑकेजनली घेतो न. अशा पार्टीत थोडी घेतली तर काय झाल ? ही नेक्स्ट जनरेशन आहे, हुषार आहे. त्यांना समजही चांगली आहे. अग त्यांनी आत्ता नाही ऐजॉय करायचे तर केव्हा ?

पुढच्या रविवारी रोहितचा वाढदिवस होता. आधीच आमचे ठरत होते की, शनिवारी रात्रीपासून तो आल्यावर काय काय करायचे, त्याला सरप्राईज कसे द्यायचे? पण गुरुवारीच त्याचा फोन. इथल्या मित्रांनी ठरवलय की ते त्याचा बर्थ डे शनिवारी रात्रीच सेलिबेट करणार आहेत. सॉरी मी तुम्हाला समजाऊ शकतो की मी रविवारी येतोय पण त्यांना समजाऊ शकत नाही. म्हणजे आता याला आमच्यापेक्षाही त्याचे मित्र जवळचे झाले तर. रोहिणीने खुप आकांडतांडव केले. पण शेवटी रविवारी सकाळीच यायचे त्याने कबुल केले. शनिवारी रात्री 12 वाजता मी त्याला विश करायला फोन केला तर इतका गाण्यांच्या धांगडधिंगाण्याचा आवाज येत होता की मी फोन बंदच केला. नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजले तरी ह्याचा पत्ता नाही म्हणून त्याला फोन केला तेव्हा हे महाशय उठले.

त्या दिवशी तो घरी फक्त शरिराने होता , मनाने नाही. सुरवातीला तो भरभरुन बोलत असे. पण आता तो बराच गप्पगप्प होता. रात्री आम्ही सगळ्यांचे जेवण झाल्यावर त्याला आम्ही दोघांनी बरेच समजावले. म्हटले हे बघ हे मित्र, ह्या पार्ट्या म्हणजे संपूर्ण आयुष्य नाही. तुला डॉक्टर व्हायचय हे विसरु नकोस. तिथे बरीच लाखो रुपये खर्च करुन आलेल्यांची ही मुले आहेत. आपण सामान्य आहोत. त्यांच्याशी बरोबरी करु नकोस. तुच तुझ्या मनाला विचार की तु वागतोयस ते बरोबर आहे का ? मला विश्वास आहे की तुझ मन तुला नक्कीच मार्गावर आणेल.

सकाळी जातांना म्हणाला मला पाच हजार रुपये हवेत. म्हटले अरे तुझ्या बँकेत महिन्याच्या सर्व खर्चाचे पैसे ट्रान्सफर केले आहेत. पण म्हणाला त्याला काही पुस्तक व इन्स्ट्रुमेन्टस घ्यायची आहेत. अस म्हटल्यावर जातांना मी त्याला पैसेही दिले.

पुढे असेच दोन आठवडे काहीना काही कारणाने कधी परिक्षेची तयारी म्हणून तर कधी दिवसभर लेक्चर्स, प्रॅक्टीकल्स ने थकायला होते म्हणून त्याने पुण्यात यायचे टाळले.

त्याच्या पुढच्या शनिवार मी विसरुच शकणार नाही. सकाळीच त्याचा फोन आला की आज सर्व मित्र मिळून अभ्यास करणार आहोत. दुपारी भावाचाही सहज फोन होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर म्हणाला कालच रोहित भेटून गेला. त्याला काही पुस्तकांकरता व इन्स्ट्रुमेन्टस करता पाच हजार रुपये हवे होते. मी त्याला दिले. बापरे मला काहीतरी वेगळाच संशय यायला लागला. अस कधीच झाल नव्हत. माझ्या मुलाने अगदी माझा भाउ असला म्हणून काय झाल, पैशा करता त्याच्यापुढे हात वेंगाडावे ? मला कां नाही सांगितले ? शिवाय गेले 2-3 आवठडे त्यांच वागणही बरोबर वाटत नव्हते. मी तडक गाडी काढली व त्याच्या रुमवर गेलो. 3-4 वेळा बेल वाजवल्यावर त्याचा रुममेटने दार उघडले. आत जाऊन बघतो तर तिथल्या त्यांच्या बेडवर हा झोपलेला. बाजुला दोघेजण असेच अस्ताव्यस्त पडलेले आणि बाजुलाच 2-3 रिकाम्या सिरिंजस पडलेल्या. आयुष्यात मी एवढा कधीच हादरलो नव्हतो. म्हणजे माझा मुलगा ड्रग्स घेतो ? माझ्या अंगाची लाहीलाही झाली. तसच त्याला उठवला आणि अक्षरशः रागाने आठ दहा थोबाडीत दिल्या . पण रोहित शुध्दितच नव्हता. त्याला मी मारलेल काहीच कळत नव्हत. मला समजेचना. परत कॉटवर बसून त्याला मिठीत घेऊन हमसाहमशी रडलो. काय ही अवस्था झाली होती पोराची. आजुबाजुची त्याच्या फ्लॅटची स्थिति पाहून मनाशि ठरवल. त्याच्या बँगेत त्याचे जे जे सामन दिसले ते भरले. त्याला व त्याचे सामान कसे बसे खाली गाडीत टाकले आणि त्याला पुण्यात घेऊन आलो. येताना एक्स्प्रेस हायवेवर मी ढसढसा रडत होतो. मी गाडी पुण्यात व्यवस्थित कशी आणली हे मलाच ठाऊक नाही.

घरात त्याला आणल्यावर जे काही झालय ते . बायकोने तर हायच खाल्या सारखे केले. दुस-याच दिवशी एकाच्या ओळखीने पुण्याजवळच एक रिहॅबिलिटेशन सेंटर होते तिथे त्याला ऍडमीट केल. आम्हा दोघांचीही अवस्था अगदी वेडयासारखी झाली होती. तो दहावी झाल्यावर माझी आई गेली व वर्षभराने बाबा. हे सर्व बघायला ते दोघेही नाहीत हे किती बर झाल. नाहीतर ह्या वयात त्यांनी हे बघितल असते तर त्यांची काय अवस्था झाली असती ह्याची मला कल्पनाही करवेना.

पहिल्याच दिवशी संध्याकाळी मी त्याला भेटायला म्हणून तिथे सेंटरमध्ये गेलो. पण बघतो तर त्याचे हातपाय कॉटला बांधून ठेवले होते. कारण तो सारखा ड्रग्सकरता आरडाओरडा करत होता. मोठमोठयाने रडुन सांगत होता मला इंजेक्शन लौकर द्या हो ,इंजेक्शन लौकर द्या . माझ्या पायाखालची जमीन सरकल्या सारखि झाली होती. ह्या गोष्टी मी नुसत्या ऐकुन होतो त्या आज प्रत्यक्ष माझ्या घरात घडत होत्या.

आपण जे आपल्या मुलांवर लहान असतांना संस्कार करतो ते इतके वरवरचे असतात कि ते सोडवून घेऊन ही मुल आरामात पुढे जातात ?

जवळ जवळ महिनाभर त्याला तिथे ठेवले होते. ह्या काळात एकदा तर असे झाले की माझ्या हॉस्पीटलमध्ये रोहित एवढया एका मुलाच ऑपरेशन मला करायचे होते. तो अगदी रोहित सारखाच दिसत होता. आयुष्यात पहिल्यांदाच माझे हात ऑपरेशन करतांना थरथरु लागले. मी माझ्या मदतीला दुस-या डॉक्टरांना बोलावले होते म्हणून बरे झाले. पण मग मीच मनाशी ठरवले की आपण असे करुन चालणार नाही. कुणाच्या जिवाशी खेळण्याचा आपल्याला अधिकार नाही. काही दिवस मन शांत होईस्तो मी हॉस्पीटलमध्ये फक्त कन्सलटन्सी ठेवली. ऑपरेशन्स बंद केली.

रोहित बरा होऊन घरी आल्यावर तो बराच सुधारला अस वाटल. नॉर्मल वाटत होता. चेह-यावर जरी पूर्वीचे हास्य नव्हते पण बोलण, वागण व्यवस्थित वाटले, संध्याकाळीही मी त्याला माझ्या बरोबर फिरायला नेत असे पण त्याने कुठेह, कधीही ड्रग्सची परत आठवण होईल अस वर्तन केले नाही.

रोहिणीने दोन आठवडयाची सुट्टी घेतली. त्याला दुसरी एक कॉलेजच्या जवळ रुम बघुन दिली.पंधरा दिवस रोहिणी त्याच्या बरोबरच राहिली. तो व्यवस्थित कॉलेजलाही जाऊ लागला. पण पुर्वीचा जोश त्याच्यात जरी दिसत नसला तरी वागण ही वावग नव्हत. त्याच्या कॉलेजच्या प्रिन्सीपॉलनाही भेटून आम्ही सर्व सांगितले. त्याच्यावर थोडे जास्त लक्ष ठेवण्याची व त्यांना त्याच्या वागण्यात जराही फरक आढळल्यास आम्हाला लगेच फोन करण्याची विनंती केली. दोन आठवडयानी रोहिणीही परत पुण्यात आली. रोज सकाळ संध्याकाळ त्याच्याशी आम्ही फोनवर बोलत होतो. असा महिना अगदी व्यवस्थित गेला.

नंतर लगेच मुंबईत भावाकडे एक लग्न ठरले. वहिनीच्या भावाच्या मुलीच. आग्रहाच बोलावण होत. खरतर आता कुठल्या समारंभात जाण म्हणजे मला संकटच वाटे. हल्ली अशाच 1-2 प्रसंगांना गेलो होतो. लोकांना सगळ माहिती असत पण मुद्दाम आडून आडून बोचक प्रश्न विचारतात. रोहित कसा आहे ? आतां तब्येत बरी आहे न ? एकना दोन, त्यामुळे अशा प्रसंगी मी जाण्याचे टाळू लागलो होतो. पण इथं तर जावच लागेल अशी परिस्थिती. शिवाय मुंबईत गेल्यास रोहितलाही तिथे बोलवू , त्यालाही भेटता येईल असा मनात विचार आल्याने लग्नाला जायचे ठरवले. लग्नाच्या दिवशी दुपारपर्यंत सर्व ठिक होते. जेवण ही झाली. जेवणानंतर भाऊ माझ्या जवळ म्हणाला की सकाळ पासून त्याचे पैशाचे पाकीट हरवले आहे . सकाळी कपडे बदलतांना बाजूला काढून ठेवले होते. आजुबाजुला लग्नातली सगळीच जण होती, पण त्याच्या बोलण्याचा सुर कुठेतरी माझ्या रोहितकडे बोट दाखवत होता. मी विचारले रोहित कुठे आहे ? शोधले तर रोहिणी म्हणाली की तो जेवल्यावर रुमवर अभ्यासाला जातो सांगुन गेला. मला न सांगता ? अस कां ? माझ मन परत सैरभैर झाले. काहीच सुचेना. मी रोहिणीला बरोबर घेतले आणि त्याच्या रुमवर गेलो.

कितीतरी वेळा बेल वाजवल्यावर त्याने दार उघडले, झोपलो होतो अस म्हणाला, मी आधी जाऊन आजुबाजुला पाहिले. त्याची हॅवरसॅक उघडून बघायला लागल्यावर म्हणाला अहो ही माझी बॅग का तपासताय ? मी काय चोर आहे ? आणि आरडा ओरडा करायला लागला. त्याच्या एक थोबाडीत ठेऊन दिली. व बँग उघडली तर आत एक वॉलेट होत, भावाचच. कॅश, केडीट कार्ड सगळ तसच. माझा संताप अनावर झाला. परत त्याच्या दोन चार मुस्कटात मारल्या आणि म्हटल, बस आता खुप झाल. आता शिक्षण बंद. बघु पुढे काय करायच ते. बॅग आवरली आणि तडक त्याला घेऊन घरि आलो.

रोहिणीला इतका जबरदस्त धक्का बसला होता की, त्यातुन ती अजून सावरली नव्हती. रात्री अक्षरशः नुसती रडत होती. काय मी पाप केलय की असल मुल माझ्या पोटी आल ? आमचा दोघांचाही रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. ह्या पोराने अक्षरशः शरमेन आमची मान खाली घातली होती. आता भावाला कुठल्या तोंडाने सामोरे जाऊ हेच कळत नव्हत. पहाटे कधीतरी डोळा लागला.

सकाळी उठून बघतो तर आणखी एक धक्का. कपाटातले जवळ जवळ 50 हजार रुपये घेऊन रोहित पसार झाला होता. रोहिणी वेडयासारखी घरभर त्याला शोधत हिंडत होती. आता इतक्या प्रसंगानी तिच्यावर अशी वेळ आली होती कि तिच्या डोळ्यातली आसवही आटली होती.

त्या दिवशीच मला कुठ्ल्याहि वडिलांवर अशि वेळ येऊ नये अस काम कराव लागल. मि पोलिसात जाऊन रितसर तक्रार नोंदवली व दोन लोकल पेपरात ऍडर्व्हटाईझ दिली, अगदी रोहितच्या फोटोसकट. हा माझा मुलगा घरातून पळून गेला आहे. त्याचा माझा आता कसलाही संबंध वा नात नाही. तरी ह्याच्याशी कुणी कसलाही व्यवहार केला तरी त्याला मी बांधील नाही. खरतर माझी सगळी स्वप्न सगळ आयुष्यच उध्वस्त झाल्यासारखे झाले होते. त्या दिवसापासून तो मला मेला. त्याच नांव ह्या घरात उच्चारायच नाही अस मी सर्वांनाच सांगून ठेवले.

मधे 2-3 महिने असेच गेले. मी कधी पोलीस स्टेशनवर चौकशीहि करायला गेलो नाही. पण हिचा आईचा जीव. कधीतरी पोलीस स्टेशनवर फोन करायची.तिला आशा ही होती की, कधीतरी पैसे संपले की रोहित परत येईल म्हणून.

पण आज सकाळीच बंडनगार्डन पोलिस चौकीतून फोन होता. एका बेवारस प्रेताच्या आयडेंटिफिकेशन करता. आम्ही दोघेही गेलो, खर सांगु आता मला धक्का बसला नाही. मला वाटत मी ह्या सर्वांच्या पलीकडे गेलो होतो. तो रोहितच होता. विस्कटलेला चेहरा, काळवंडलेले शरीर. मी सर्व सोपस्कार करुन प्रेत ताब्यात घेतले. आम्ही दोघेच जण वैकुंठ स्मशान भुमीवर आलो. मी हिला निक्षुन सांगितले की आता मी कोणालाही बोलवणार नाही .अगदी भडजींना सुध्दा. ह्याचा माझा काही संबंधच राहिला नाही. प्रथम पासून माझा देवावर विश्वास नव्हताच. कर्मावर होता कर्मकांडावर नव्हता. आपण केलेल्या संस्कारांचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही तर हे असले संस्कार न केल्याने काहीही फरक पडणार नाही असच मि हिला समजावल. त्यामुळे त्याची बॉडी तशीच इलेक्ट्रिकच्या भट्टीत घातली.
``साहेब ह्या अस्थी``
मी एकदम भानावर आलो. मुलाच्या अस्थी घेऊन मला जाव लागेल अस कधी माझ्या स्वप्नातही नव्हत. आम्ही दोघे ओंकारेश्वरावर गेलो. होत्या त्या पाण्यात अस्थी विसर्जन केल्या.
आम्ही मुलावर केलेल्या संस्कारा नंतरही जशी ही वेळ आमच्यावर आली तशी तुमच्यावर येऊ नये हीच इच्छा.
हे सर्व तुम्हाला सांगितल्यावर माझ मन जरि हलक झाल तरि मला आता रोहिणिलाच पुढ्ल्या आयुश्यात खरा आधार द्यावा लागणार होता.

गुलमोहर: 

मला खूप दूख होतय.
अस का व्हाव.
कि इतक करुन सुद्धा पालक कुठ कमी पद्तात???
आनि मुल अशी का वागतात??
मला फार त्रास होतोय.
कि आता ची generation अशी आहे मग आपली मुल कशी असतील.
त्त्यान्चि अस्थी तरी मिलेल का आपल्याला.????????????????????
कस होनार आपल.???????????????
..................................
..........................
.......................
.....................
..................
...............
...........
........
.....
...
.

ओह Sad

सुनिल ! नमस्कार !
कथा मनाला भिडली. अशी सत्य घटना होऊ शकते.
मोठ्या कष्टाने केलेले संस्कार मतीमोल झालेवर काय ??????
>>खर सांगु आता मला धक्का बसला नाही. <<मला वाटत मी ह्या सर्वांच्या पलीकडे गेलो होतो>>
हे शब्द बरच काही सांगून जतात.

ही वेळ कुणावरच येऊ नये.ज्यानी आपले अन्तिम सन्स्कार करायचे त्यान्चे अन्तिम सन्कार करायची वेळ यावी यासारखे वाईट काहीच नाही.

सुनिल.. खरोखर आपल्यावर, आपण आपल्या मुलांवर केलेले संस्कार इतके तकलादू असतात?? बहुतेक नाही!! काही काही अपवाद मात्र दिसून येतात.. माझ्या वडिलांच्या , लांबच्या मावशीचा मुलगाआणी त्यांची बायको दोघं ही नितांत सालस,पापभीरु ,कष्टाळू आहेत. गिरगावाच्या एका चाळीत ,एका खोलीच्या बिर्हाडात गेली ५० वर्षांपासून राहात आहेत. काकी भल्या पहाटे उठून कोणत्या तरी दूध केंद्रात कामाला जाते,दुपारी शिवण केंद्रात जाऊन जॉब वर्क वर कपडे शिवते, काका क्लर्क च्या नोकरीतून आता सेवामुक्त झालेत आणी शरिराने आणी मनाने खचलेत दोघे..कारण त्यांचा एकेकाळी शाळेत हुषार म्हणून नावाजला गेलेला एकुलता एक मुलगा संपूर्णपणे दारूच्या आहारी गेलेला असून आता पैशांसाठी तो आपल्या म्हातार्या आईवडलांना मारहाण करतो.. ही गोष्ट मी या भेटीतच ऐकली.. खूप वाईट वाटलं ऐकून आणी आपल्याला कश्याप्रकारची मदत करता येईल असा विचार सध्या सुरु आहे डोक्यात्..कोणी सुचवेल का उपाय???

सुनील : छान लिहिलीय्...एकदम भिडली कथा... हे फार मोठ विदारक सत्य आहे... कारणांची मीमांसाही तितकीच अवघड!!!!

असं एक कुटुंब मी जवळून पहिले आहे , उत्तर प्रदेशातून आलेल्या मुलीचा भाऊ होता. आणि हे खरच खूप भयंकर आहे. काही घटना अगदी हुबेहूब वाटत आहेत .

उशीरच झाला ही कथा वाचायला. अश्याच वास्तवाशी मी परिचीत आहे फक्त फरक इतकाच त्याचे आई- वडील आधी सहा महिन्यांच्या अंतराने गेले नंतर हा २८ वर्षाचा युव़क अति मद्यपानाने रस्त्यावरच गेला. त्याच्या वडीलांना मी खांदा दिला होता पण रागाने त्याच्या अंतीम विधीला मी गेलो नाही.