आदिबंधः प्रकाशन.

Submitted by pkarandikar50 on 17 December, 2009 - 02:04

मी मा.बो. वर केलेल्या लिखाणाला मा.बो.करांनी अगदी अनपेक्षित आणि भरपूर प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच मी एक कादंबरी लिहिण्याचं धाडस केलं - आदिबंध.

मला अमुक यश, तमुक सुख किंवा पद मिळायलाच हवं अशा महत्वाकांक्षेने झपाटलेली माणसं जीवापाड धडपडतात, वाट्टेल ती किंमत मोजायला आणि तडजोडी करायला तयार होतात. ते सगळे एका अटळ शोकांतिकेची वाट तुडवत असतात का? सामान्य आणि असामान्य माणसं यांच्यात नेमका फरक कोणता? 'प्रेम, ध्येय, आशा' या पुनःपुन्हा भंगणार्‍या मूर्ती का पुजायच्या? श्रेयस आणि प्रेयस यांच्यातलं संतुलन कसं साधायचं?

कॉर्पोरेट जगातली माणसं जंगली श्वापदांसारखी का वागतात? आपल्या प्रत्येक सहकार्‍याला स्पर्धक मानून एकमेकांचे पत्ते काटण्याच्या 'कॉर्पोरेट गेम्स' मधून नेमकं काय साध्य होतं? अधिक प्रगल्भ आणि सुसंस्कृत तत्वांवर उद्योगांची व्यवस्थापनं ऊभी करता येणार नाहीत का?

निसर्गाने स्त्री आणि पुरुष जन्माला घातले ;माणसानं लग्न नावाच्या संस्थेला जन्म दिला. एखादी संस्था किंवा व्यवस्था केवळ टिकून राहिली म्हणून तिच्यातली कृत्रिमता नाहीशी होते का? संस्कार म्हणजे बहुमतानं स्वीकारलेल्या वहिवाटी निरंतर टिकवण्याचं आणि आपल्या मागून येणार्‍या पिढ्यांवर त्या रूढी लादण्याचं एक गोंडस शस्त्र आहे का? वेगळी वाट चालून बघण्याचं साहस दाखवणार्‍यांना धडा शिकवणं हेच कायद्याचं प्रयोजन आहे का? स्त्री-पुरुषांच्या आनंदी सहजीवनाचा पाया कोणता? शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक सलगी का सरकारी सही-शिक्क्याचा एक कागद?

'आदिबंध' असे असंख्य प्रश्न उपस्थित करते आणि त्यांची उत्तरं आपापल्या परीनं शोधण्यासाठी वाचकाला अंतर्मुख करते . . . . .

प्रफुल्लता प्रकाशन, [१३ अ 'कामेत', रामबाग कॉलनी, पौद रोड, पुणे ४११०३८ दूरध्वनी: ०२०२५४२३१८८] पुणे 'आदिबंध'प्रकाशित करत आहे. प्रकाशन मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते, एस.एम. जोशी सभागृह पुणे येथे ३० डिसेंबर २००९, संध्याकाळी ०६-३० वाजता आहे. सर्व मा. बो. करांना सस्नेह आणि सप्रेम आमंत्रण.

मा.बो.च्या ऑन-लाईन पुस्तक-खरेदी योजनेत 'आदिबंध' उपलब्ध करून देण्याचा [माझा हट्ट आणि] प्रकाशकांचा मानस आहे. MyVishwa ह्या पोर्टलवरून मराठी ई-पुस्तक योजना लौकरच सुरू होते आहे. वाचकांना पुस्तक डाऊनलोड करण्याची सुविधा ते देणार आहेत. त्या योजनेचा शुभारंभ 'आदिबंध' ने व्हावा आणि एकाच वेळी छापील आणि ई-पुस्तक अशा दोन्ही आवृत्यांचं प्रकाशन व्हावं असे प्रयत्न सुरू आहेत. अवधी थोडा असल्याने [काही तांत्रिक बाबींची समाधानकारक पूर्तता व्हायची आहे] कदाचित ई-पुस्तक आवृत्तीचं प्रकाशन ३० डिसेंबरला होऊ शकलं नाही तर पुढल्या महीन्यात होईल असं मला सांगण्यात आलं आहे.
-बापू करंदीकर

गुलमोहर: