माझे क्वांग चौ

Submitted by वर्षू. on 13 December, 2009 - 23:34

आठ वर्षांपूर्वी जेन्व्हा आम्ही आपल्या सामानासुमानासकट चीन च्या या शहरात कायम ठोकायला आलो तेंव्हा अगदी अनोळखी अश्या या शहराने प्रेमाने 'नी हाओ'..(कसं काय?बरय ना??) असं म्हणत आपल्यात सहजपणे सामावून घेतलं आणी बघता बघता क्वांग चौ आमचं झालं सुद्धा!
क्वांग चौ चीन च्या दक्षिणपूर्व भागात असलेल्या 'क्वांगतुंग' प्रांताची राजधानी आहे.या शराला राजनैतिक,आर्थिक,औद्योगिक आणी सांस्कृतिक महत्व आहे. इतर विश्वासाठी हे चीन चे दक्षिणेकडील प्रवेश दार आहे.पर्ल नदीच्या डेल्टात उत्तरेकडे आणी साऊथ चायनाच समुद्राच्या किनार्यावर वसलेले हे शहर नैसर्गिक धनसंपतीने पुरेपूर आहे.

येथे बाराही महिने फळाफुलांची रेलचेल असते.वर्षातून तीन वेळा भाताचे पीक होते. इथल्या लीची,पोपई,लोंगान (छोट्या लीची सारखे फळ),अननस आणी केळी यांची चव तर निव्वळ साखरेसारखी आहे.विशेष म्हणजे येथील लीचीच्या बिया ,बारीक लवंगी इतक्या असतात.

या शहराला २००० वर्षांचा इतिहास आहे. अजून ही मधून शहरामधे नवीन बांधकाम होत असतांना एखादा प्राचीन पुरावा सापडला की लगेच बांधकाम थांबवून ,त्याच जागी वास्तू उभारून तीत त्या त्या जागी सापडलेल्या पुरातन वस्तूंचे संग्रहालय उभारतात.इतिहासाचा एव्हढा आदर पाहून मन भरून येते. त्याचबरोबर चीन एव्हढीच जुनी संस्कृती असलेल्या आपल्या देशात ,जिकडे तिकडे विखुरलेल्या ,कोणी कधीही दखल न घेतलेल्या ,पडक्या वास्तूंची,भिंतींची आठवण येऊन उदासही वाटते.२००६ साली मांडवगढ ची दशा पाहतांना ही जाणीव आधिकच तीव्रतेने टोचली होती.

चीनमधे गेल्या दशकात इतका झपाट्याने बदल झाला आहे कि आम्हालाही हा बदल डोळ्यादेखत ,प्रत्यक्ष अनुभवाने जाणवत गेला.इथे इतक्या मोठ्या प्रमाणात परदेशी लोकांनी येऊन आपापले उद्योग स्थापन केले, तशी शहराची भरभराट होऊ लागली. जिकडे तिकडे उंच काचेच्या इमारती,मोट्ठे मॉल्स दिसू लागले.ज्या रस्त्यांवर १५ वर्षांपूर्वी फक्त सायकली दिसत ,तिथे आता देशी ,विदेशी मोटारी सुसाट धावू लागल्या.

सबंध युरोपात दिसणार नाहीत इतक्या चकचकीत मेट्रोज आणी त्यांना शोभेसे अति स्वच्छ प्लॅटफॉर्म्स आले.कौतुकाची गोष्ट म्हणजे शहराची अशी वाढ होणार हे फार पूर्वीच उमजून आधीपासूनच चौपदरी,सहा पदरी रस्ते, एकावर एक असलेले ३,४ उड्डाण पुलांचे जाळे,रुंद फुटपाथ, रस्त्यांत डिव्हायडर्स मधे सुंदर,रंगीत फुलांनी गच्च भरलेली झाडे ,रस्त्यांच्या कडेने ओळीने डेरेदार ,सावली देणारे मोठाले वृक्ष सर्व जय्यत तयारी आधीपासूनच झालेली होती. प्रत्येक अ‍ॅरियाला मोठाले पार्क्स आणी त्यात मुबलक प्रमाणात सर्व प्रकारची एक्सर्साईज चे इक्विप्मेन्ट्स आणी वॉकिन्ग ट्रॅक्स ,फुकट वापरता येतात. एन्ट्री फी सुद्धा नाही. आणी विशेष म्हणजे हे सर्व सामान नेहमी सुस्थितीतच असतं. उगाच येताजाता झुडुपांना झोडप,पार्कमधील दिवे तोड, सार्वजनिक वस्तूंची नासधूस कर अश्या गोष्टी मी इकडे कद्धी म्हणजे कद्धीच पाहिल्या नाहीत..

दरवर्षी क्वांग चौ मधे भरणार्या चायना ट्रेड फेअर नी नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण केली. या फेअरसाठी दरवर्षी जवळपास दोन मिलिअन लोकं जगाच्या कानाकोपर्यातून येतात. त्यावेळी मात्र शहराचे रुपांतर एका मोठ्या मेळ्यात होते. चीनचे बहुतेक सर्व उत्पादक आपापल्या वस्तूंचे स्टॉल्स लावतात. ट्रेड फेअर ची बिल्डिंग एव्हढी प्रचण्ड आहे आहे की त्यात शिरतांना आपण मुंगीच्या आकाराचे आहोत,असा उगीचच भास होतो. बिल्डिंग मटीरिअल, तयार कपडे, टेक्सटाईल,खेळणी,इलेक्ट्रॉनिक्स, कॉस्मेटिक्स, क्रॉकरी, तयार खाद्य पदार्थ, कॅन्ड फूड, कन्फेक्शनरी, मशिन्स चे सुटे भाग,केमिकल्स.. म्हणाल ते सर्व या फेअरमधे हाजिर असते. या फेअर विषयी सविस्तर लिहायच म्हटलं तर एक सेपरेट लेखच तयार होईल.

इथे युनिव्हरसिटीमधे शिकत असताना जॅपनीज,कोरिअन,थाय आणी शेजारच्या चायनीज मित्रमैत्रीणींना दिवाळीला घरी बोलावले होते. सर्वांना रांगोळ्या, आरास,देवघर ,पणत्या इ. गोष्टींच खूप अप्रूप वाटत होतं. काहीनी तर रांगोळ्या घालून पाहण्याचा प्रयत्न ही करून पाहिला. विशेष म्हणजे नंतर सर्वानी लाडू,चिवडा,समोसे,बटाटेवडे आणी खास भारतीय जेवणावर मस्तपैकी ताव ही मारला.या सर्वांपैकी शाओ तुंग ही चायनीज ,सन जुंग ही कोरीअन, अल्मा ही फिलीपिनो व मी आमची घट्ट मैत्री जमलीयं.. दिवसातून एकदा भेटल्याशिवाय किंवा फोनवर बोलल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही.. या आमच्या जीवाभावाच्या नात्याला कोणत्याही देशा,धर्मा,भाषेची अडचण वाटली नाही.

येथील जनमानसाच्या वृत्ती मधे होणारे बदल आता मात्र प्रकर्षाने जाणवायला लागलेत. सुरुवातीला हे लोक थोडे बुजरे होते. इतकं एक्स्पोजर ही मिळत नव्हतं त्यांना. पण गेल्या ३,४ वर्षात सामान्य जनांवर पश्चीमे कडचा जबरदस्त प्रभाव पडू लागला आहे.

पाश्चिमात्य पोशाख,विचार सरणी, संगीत (इंग्लिश येत नसून ही ) हे लोक सहज आत्मसात करत आहेत.युनिव्हर्सिटीच्या पुष्कळ विद्यार्थ्यांशी बोलतांना समजले कि आताशी कॉलेजच्या बाहेर असलेल्या वसतीगृहांतून बहुतेक मुलंमुली आपापल्या जोडीदारांसमवेत राहातात.. लिव्हिन्ग इन पार्टनर सारखे. पण पुढे या जोड्या आपसात लग्न करतीलच असे काही बंधन नसते. मग त्यांच्यातही काही दिवसांनी कुरबुरीला सुरुवात होते.खोलीचे भाडे,स्वैपाक्,सफाई असे कोणतेही भांडणाचे कारण असू शकते. आपसात प्रेम,जवळीक,विश्वास,स्नेह या गोष्टींचे महत्व कमी झालेले आहे.

क्वांग चौ मधे नुकत्याच झालेल्या एका सर्व्हे मधे पहिल्या क्रमांकावर पैसा असून प्रेमाचा नंबर चक्क अकरावा आहे..या लोकांना आता समाज,लग्न ,कुटुंब या संस्था विशेष सोसवत नाहीत. घटस्फोटांचे प्रमाण,प्रमाणाबाहेर वाढले आहे.

२ वर्षांपूर्वी मी एका जिम ची मेंबर असताना पुष्कळ चीनी बायकांशी ओळख झाली होती. त्यातील बहुतेकांचा डिव्होर्स झालेला होता. त्या सर्व नवीन मिळालेल्या या स्वातन्त्र्याच्या धुंदीत खूश होत्या. मला विचारले असता मी चाचरतच सांगितले कि माझ्या लग्नाला ३० वर्ष झालीत म्हणून..ते ऐकून त्या जाम उडाल्या आणी सर्व जणी नंतर माझ्याकडे माझी कीव आल्यागत पाहू लागल्या मेल्या !!! Proud
मी मात्र (मनातल्या मनात!!) कपाळावर हात मारला.पण माझ्या मनात आल्याशिवाय राहिलं नाही कि अपार संपती,समृद्धी, आधुनिकीकरण,देशाची प्रगती,भरभराट या सगळ्याची किंमत म्हणून नेहमी नैतिकता, जीवनाची मूल्ये,आदर्श यांचाच बळी देऊन मोजावी लागते???

गुलमोहर: 

फारच छान लेख आहे Happy चीन विषयी खूप माहिती समजतेय..

चीन आणि भारत यामधे कायम तुलना होते.. चीन ने झपाट्याने केलेली प्रगती, आधुनिकता, भरभराट, इ. गोष्टी चटकन डोळ्यासमोर येतात..

पण त्याच बरोबर सगळे हे ही म्हणतात कि तेथे अजूनही लोकशाही नाही.. प्रत्येक गोष्टींवर सरकार चा अंकुश असतो..कुणी कोणता व्यवसाय करवा, शिक्षण कोणते घ्यावे याचे स्वातंत्र्य पण नसते..
ओलिंपिक साठी तर अगदी ३-४ वर्षांपासून लहान मुलाना कैदेत डांबल्या सारखे डांबतात.. मेडल नाही मिळाले तर छळ करतात.. स्वतःचे असे वैयक्तिक आयुष्य, आवड्-निवड काही नाही.. जे सरकार म्हणेल तेच करायचे.. अशा आणि बर्‍याच गोष्टी चीन बद्दल ऐकल्या - वाचल्या आहेत..
खरे तर त्यामुळेच चीन एवढी प्रगती करु शकतोय.. असेही म्हंटले जातेय..

याबद्दल तुमचे अनुभव काय आहेत ते नक्की आवडेल वाचायला.

छान लेख..माहितीप्रद..तसही चीन बद्दल खुप कमी वाचायला मिळते..तुम्ही लिहा प्लिज तुमचे अनुभव..अजुन आवडेल वाचायला...
कालच कुठेतरी वाचले की जपानीज, चीनीज हे सगळे भारतीय वंशच आहेत्..मुख्यतः आशियायी ..त्यांच मूळ भारतीय आहे..तुम्हाला अशा काही समान गोष्टि आढळल्या का तुमच्या या वास्तव्यात..त्या लिहा..आम्ही वाट बघतोय..:)

वा! खुप छान लेख.. थोडक्यात चीन आणि क्वांग चौ बद्दल भरपुर माहिती मीळाली Happy

माझ्या मनात एक शंका आहे आपल्या देशात वाढत्या गुन्हेगारीच, बेशीस्तपणाच कारण 'लोकसंख्या'
असही दिल जात/मानल जात... चीन मध्ये हि पॉप्युलेशन खुप आहे तीथेही गुन्हेगारीच प्रमाण जास्त आहे का ? ...(उदा. मुलींची रस्त्यावर छेड वा भर रस्त्यात गुंडगीरी प्रकारचे त्रास/गुन्हे) या बाबतीत तुमचे अनुभव/विचार वाचायला आवडेल Happy

प्रत्येक अ‍ॅरियाला मोठाले पार्क्स आणी त्यात मुबलक प्रमाणात सर्व प्रकारची एक्सर्साईज चे इक्विप्मेन्ट्स आणी वॉकिन्ग ट्रॅक्स ,फुकट वापरता येतात. एन्ट्री फी सुद्धा नाही. आणी विशेष म्हणजे हे सर्व सामान नेहमी सुस्थितीतच असतं. उगाच येताजाता झुडुपांना झोडप,पार्कमधील दिवे तोड, सार्वजनिक वस्तूंची नासधूस कर अश्या गोष्टी मी इकडे कद्धी म्हणजे कद्धीच पाहिल्या नाहीत..>>>>> लोकसंख्या अफाट असुन... हे आश्चर्य आणि कौतुकाच वाटत Happy

वर्षू नील, या लेखाखातर धन्यवाद!

आम्हाला चीन तुमच्या लिखाणातूनच समजतो आहे. आणखीही वाचायला आवडेल.

केदार्,तुमच्या क्वेरी चं उत्तर मी अजून काही इन्टरव्ह्यूज नंतर निश्चितच देऊ शकेन्.ललिता,बासुरी,सास , चीनी समाजाच्या एकेका पैलूवर प्रकाश टाकण्याचे काम हळूहळू सुरू करेन.. विषय सुचविल्याबद्दल थँक्स हां.. कधी कधी रोज ती गोष्ट समोर दिसत असली तरी त्यावर काही लिहावे असं सुचत नाही पटकन.. सास्..एक मात्र खरय हां मी कधीच इकडे ईव्ह टीजिंग न पाहिले न ऐकले. पीक अवर्स ला गच्च भरलेल्या बसेस,मेट्रोज मधून ही नाही. म्हणून तर इकडे सीट्स अथवा मेट्रोचे डबे फॉर लेडीज असले काही प्रकार नाहीत. उन्हाळ्यात तर आमच्या ऑफिसच्या मुली मायक्रो मिनी शॉर्ट्स आणी हॉल्टर नेक टी शर्ट्स घालून (बसेस्,मेट्रोजमधून प्रवास करून)ऑफिसला येतात आरामात!! Happy

वर्षू , तुम्ही तेथील जीवनातले बारकावे लिहा. कारन आम्हाला समजलेला चीन हा बहुतेक प्रवासवर्णनातून वरवरचा कळालेला आहे . आणि टूरिस्तांशी भुधा सगळे चांगलेच वागतात....खरे तर समाजात काही काळ राहिल्याशिवाय अन त्याना अनुभवल्याशिवाय खरे समाज जीवन कळत नाही.

.

मस्त लेख... एकाच लेखात आधि प्रगतीचे फायदे आणि नंतर तोटे चांगले सांगितले...
एक मात्र खरंय, एवढी शिस्त आणि टापटीप तर युरोपातही नाही... (आपल्या भारताबद्दल तर मला बोलायचंच नाही)

सुरेख लिहिलंय वर्षू. सर्वसाधारणपणे इथेही चीनबद्दल ' a country where people work for a whole day for a bowl of rice' असाच समज आहे. चीन म्हणजे दरीद्री आणि कम्युनिस्ट अशीच प्रतिमा आहे लोकांत. पण तू लिहिलेलं वाचून एकदमच वेगळा चीन दिसला.
आणि हे सगळं वाचून भारत कधीतरी असा होईल का असाही विचार मनात आला.......

अजून येउ दे.

वर्षू, तुमचा 'व्हॉट स्पोर्ट..' वाचला आणि हा लेख नजरेस पडला.

परत एकदा छान. इतकी वर्ष चायना मध्ये राहाताय आणि तिथल्या लोकांमध्येही मिसळताय तर विषयही नक्कीच सापडतील.

केदार म्हणतोय तसं तिथल्या मुलांना लहान असल्यापासून स्पोर्टस अकॅडमी मध्ये घालतात वगैरे बिजींग ऑलिंपिकच्या वेळेस भारतात टी.व्ही.वर बघितले होते.
आत्ता तीन एक महिन्यांपूर्वी म.टा. मध्ये चायनावर एक लेख आला होता. अर्थात त्यांनी केलेल्या प्रगतीबद्दलच. ह्या सगळ्यांचं क्रेडीट त्यांनी तिथल्या एका माणसाला दिलं होतं. नाव आठवत नाही.

सॉरी वर्षू तुझ्या लेखात लुडबूड करायची इच्छा नाही. पण सास, हे मुलींची छेड काढायचे प्रकार मी जपानमध्येही कधी बघितले नाहीत किंवा ऐकले नाहीत.

जे जे कम्युनिस्ट देश आहेत त्यांच्याबद्दल खुप कमि माहिति कळ्ते.पण तुमच्या ह्या लेखांच्या सिरिजनि छान माहिति मिळते आहे.

छान लेख वर्षू. तिथल्या लाईफस्टाईलबद्दल, लोकांबद्दल जितकं वाचायला मिळेल तितकं कमीच वाटतंय तेव्हा अजून येऊ देत.

<<< इथल्या लीची,पोपई,लोंगान (छोट्या लीची सारखे फळ),अननस आणी केळी यांची चव तर निव्वळ साखरेसारखी आहे. >> मग "क्वांग चौ" च आधीचं नाव "छान चव" असणार Wink

>>अपार संपती,समृद्धी, आधुनिकीकरण,देशाची प्रगती,भरभराट या सगळ्याची किंमत म्हणून नेहमी नैतिकता, जीवनाची मूल्ये,आदर्श यांचाच बळी देऊन मोजावी लागते?>>अगदी हाच प्रश्न मनात आला शेवटचे २-३ पॅराज वाचुन. मस्त लिहिलयं,अजुनही वाचायला आवडेल. युरोप्,अमेरिका याबद्दल राहिल्यामुळे म्हणा किंवा इतरत्र वाचुनही जेवढी माहिती कळते तेव्हढी चीनबद्दल माहीती वाचली नाही आहे.भारतीयांचे प्रमाण किती आहे तिथे?

छान लिहिला आहे लेख.... शीर्षक वाचून एखाद्या चायनीज रेसिपीविषयी लेख असेल असेच वाटले होते आधी!! Happy