दोन फुल एक हाफ

Submitted by मेधा on 18 February, 2008 - 18:25

एक

शनिवारी भल्या पहाटेच फोन वाजला. कोण ते स़क्काळी आठवण काढतंय म्हणून जरा वैतागूनच फोन उचलला मी.
'मला माहीत आहे तुम्ही सगळे लोळत पडला आहात अन काहीतरी डोरा किंवा बॉब बघण्यात वेळ दवडताहात.' कुठल्याही वेळी बौद्धिक घ्यायला कसं सुचतं याला देव जाणे. सकाळी सकाळी फोन करून पिडतोय तेव्हढं कमी आहे का.
'मतलबाची गोष्ट सांगायला काय घेशील?' माझ्या आवाजात तुटकपणा भरलाय.
'फक्त एक कप कॉफी. मी तुमच्या आवडीचे क्रिस्पी क्रीम डोनट घेऊन अर्ध्या तासात पोचतोय. तुझ्याशी जरा महत्त्वाचं काम आहे. आता उठा सगळे अन ब्रेकफास्ट साठी तयार व्हा. आलोच मी. अन हं तुझ्या नवरोबाला पण उठव बरं. नाहीतर लोळत पडेल लंच पर्यंत.' मी हो-नाही करेपर्यंत फोन कट. हा असला नवर्‍याचा कॉलेजमधला मित्र. त्या दिवसात नवरा उशिरापर्यंत लोळत पडत असे खरंय. पण हा ओरिजित बाबू काही ते विसरायला तयार नाही. नवर्‍याला उठवून त्याला सगळं दोनदा सांगितलं तरी त्याच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह ही तसंच अन आठ्याही तशाच. शेवटी 'ओरिजित, डोनटस , पंधरा मिनिटात' येवढं म्हटल्यावर जरासा उजेड पडला असावा. मुलांनी फक्त ओरिजित अन डोनट ऐकल्याबरोबर पलंगावरून उड्या मारून बाथरूम गाठली होती. मी सगळं आवरून खाली येईपर्यंत नवर्‍याने कॉफी लावली होती, पेपर आणून वाचन चाललं होतं अन मुलं परत 'डोरा' ची पारायणं करत होती.

ओरिजित म्हणजे नवर्‍याचा मित्र. कलकत्त्याला अकरावी पर्यंत शिकून बारावीत मुम्बईला आलेला. पण ज्याना माहित नसे त्यांना असं वाटावं की ओरिजित चक्रवर्ती ची आई मुम्बई-पुण्याकडची असणार अन तो आपल्या आजोळी वाढला असणार इतकं सुरेख मराठी बोलत असे. बारावी नंतर दोघेही इंजीनीयरिंग ला एकत्रच होते. वर्षभर पुण्यात नोकरी केली तिही एकाच कंपनीत. मग ओरिजीत शिक्षणासाठी म्हणून अमेरिकेला गेला. तेंव्हाच काय ती दोघांची ताटातूट.
ओरिजित अमेरिकेला गेल्यानंतर दोनेक वर्षात आमचं लग्न ठरलं. आमच्या लग्नाचा मुहूर्त ओरिजितला यायला जमेल असा काढायचा येवढी एकच अट होती नवर्‍याची. आमच्या लग्नाच्या थोडं आधी मी ओरिजितला पहिल्यांदा भेटले. अगदी पहिल्या भेटीत आमची मैत्री जुळली. तेंव्हापासून दोघेही मला ' तू माझ्या मित्राला पळवलंस' म्हणून दमदाटी करत असतात.

'एकटाच येणारे का?' नवर्‍याला प्रश्नच फार पडतात. डोनट घेऊन येणार आहे. आपल्याला फक्त कॉफी लावायला लागेल. येईनात का सहकुटुंब! मुलं खेळतील एकमेकांशी - तेव्हढीच डोरा अन बॉब ना सुट्टी.
'हो मला तरी तसंच म्हणाला.'
'बुधवारीच त्याचे काका आले ना इकडे. मला वाटलं की त्यांना पण घेऊन येतो की काय?'
'ओरिजितचे काका? इकडे त्याच्या घरी? या बुधवारी?' मला पण नवर्‍याचीच सवय लागत चालली आहे. एकदा सांगून उमजत नाही.
' हो, अचानकच ठरलं म्हणे. मला काल ऑफिस मधे फोन आला होता त्याचा. काका जरा अस्वस्थ वाटताहेत म्हणाला. वीकेंडला सगळे भेटूया, तू किंवा चेतू जरा त्यांच्याशी बोललात तर काय गडबड आहे ते कळेल म्हणत होता.'
'मग हे सगळं मला कधी सांगणार होतास?' मी जरा वैतागूनच विचारलं.
'विसरलोच गं . आता येईलच ना तूच विचार त्याला.'

ओरिजितचे काका म्हणजे एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्यांना कुठलंही क्लासिफिकेशन लागू पडत नाही.
ओरिजितचे वडील अन काका दोघेही आर्मीत होते. वडिलांच्या सारख्या बदल्या होत- त्याने शिक्षणाची आबाळ होते म्हणून ओरिजित कलकत्याला होस्टेल वर राहून शिकत होता. धाकटी तोरुलता आईवडिलांबरोबर असायची. तिलासुद्धा सहाव्या-सातव्या वर्षी हॉस्टेलवर ठेवायची तयारी होती. त्याच्या अगोदरच एक वर्षी दुर्गापूजेच्या सुमारास सगळेजण कलकत्त्याला येत होते तेंव्हा ट्रेनच्या अपघातात आईवडिल दोघेही दगावले. तोरूलतालासुद्धा बरंच लागलं होतं. पण आईच्या अंगाखाली झाकली गेल्याने ती वाचली. ओरिजित तेंव्हा दहा वर्षांचा होता. आजोळचे कोणी मुलांची जबाबदारी घ्यायला तयार होत नव्हते. वडिलांकडनं एकुलते एक काका तेही आर्मीत. त्यांनीच शेवटी पुढाकार घेतला. तोरुलताला पण एका हॉस्टेल मधे ठेवलं अन स्वतःची आर्मीतली नोकरी सांभाळून जमेल तसं मुलांकडे बघत असत . ओरिजितच्या अकरावीच्या वर्षी ते आर्मीतनं निवृत्त झाले अन मुंबईमधल्या कुठल्याशा कंपनीत नोकरीला लागले. 'आर्मीच माझी बायको' म्हणत लग्न केलंच नव्हतं. मुंबईमधे शिक्षण चांगलं मिळेल, मुलांना पण घरी रहाता येईल म्हणून त्यांनी ओरिजित अन तोरुलता दोघांना मुंबईला आणलं. ओरिजित अन अजितच्या मैत्रीला काकांनी चिकार खतपाणी घातलंय.

एकदा कॉलेजच्या कसल्याशा पार्टीत सगळी मुलं दारू पिणार अशी काकांना कुणकुण लागली. कॉलेजमधली मध्यमवर्गीय मुलं ती. कुठून तरी देशी दारू नाहीतर हातभट्टीची पितील. एकमेकांशी चढाओढ करत वेड्या सारखे दारू पितील पण दारूची लज्जत ओळखणार नाहीत. शिवाय आपली कुवत न ओळखता पितील अन चढली की दुसर्‍या दिवशी कॉलेजला दांडी. हे सर्व ओळखून त्या पार्टीच्या दोन चार दिवस आधी काकांनी ह्या दोघांना अन अजून एक दोन मित्रांना आपल्या घरी उंची स्कॉच पाजली होती. इंजीनीयरींग च्या पहिल्या वर्षातली गोष्ट आहे ती. आयुष्यात कधी दारू पाहिली पण नसेल त्या मुलांनी. काकांनी नुसत्या बर्फाच्या खड्यावर ओतलेल्या स्कॉच ची चव अशी काही तोंड कडवट करून गेली होती की त्यातल्या कोणीही कॉलेज संपेपर्यंत दारू हा शब्द सुद्धा तोंडातून काढला नसेल.

मी स्वतःसाठी एक कप कॉफी ओतेपर्यंत बेल वाजलीच. एरवी शंभर हाकांना ओ न देणारी मुलं डोरा विसरून टुणकन उड्या मारून दार उघडायला पळाली.

'मॉम, एव्हरी वन इज हियर.' लेकीचा चित्कार अन पाठोपाठ खरोखर एव्हरीवन आल्या निमित्त त्यांच्या अन माझ्या मुलांचा चिवचिवाट सुरू झाला. काकांनी नेहेमी प्रमाणे मिठाई, मुलांकरता कपडे, नव्या क्लासिकल सीडी असं काय काय सगळं भरलेली बॅग माझ्या स्वाधीन केली अन अजितकडे मोहरा वळवला. सगळ्यांच्या पाठोपाठ बिंदू आली. तोपर्यंत अजित, ओरिजित, सगळी बच्चे कंपनी मिळून डोनटसचा फडशा पाडत होते. सगळ्यांचे आवडते प्रकार ओरिजितने आठवणिने आणले होते. दोन दोन डोनट हाणल्यावर मुलांना अचानक टी व्हीची आठवण आली अन चारी जणं गायब झाली. सगळ्यांच्या आवडीचं टॉम ऍंड जेरी लागल्याबरोबर फक्त खिदळ्ण्याचे आवाज ऐकू यायला लागले. आता निदान अर्धा तास तरी शांतता!

' चेतू, फ्रेश कॉफी बनाना बेटा.' काका कॉफीचे रिकामे कप, मुलांच्या खरकट्या प्लेट सगळं उचलून सिंकपाशी आणू लागले. 'तुम्ही बसा, मी आवरते' वगैरे सांगायची सोय नाही. 'ओरिजितचा काका म्हणजे मी अजितच्या काका सारखा आहे ना. मग घरचाच आहे मी पण.' असं उत्तर पहिल्यांदा ऐकलं तेंव्हा माझ्या डोळ्यासमोर माझे चुलत सासरे माझ्या घरी उष्ट्या कपबशा उचलतात असं दृष्य तरळलं होतं. अजितच्या वडिलांनी, कुठल्याही काकांनी आयुष्यात कधी एक कप उचलून सिंक मधे ठेवला नसेल. अजितचे तर जाउदे, माझे काका जरी कधी इथे आले तरी ते असली कामं करणार नाहीत. पण हे काका वेगळेच.

ओरिजित अन बिंदुच्या लग्नासाठी ते अमेरिकेत पहिल्यांदा आले होते, तेंव्हापासून ते आले की ओरिजितची अन पर्यायाने आमची जेवणा खाण्याची चंगळ असते. बाहेर जाऊन खाण्याची अन घरी तरतर्‍हेचे पदार्थ बनवण्याची दांडगी हौस. कोणाकडून शिकायची तयारी पण तितकीच. बिंदूच्या आई कडनं, बिंदू कडनं त्यांनी अनेक गुजराती प्रकार शिकून आत्मसात केलेत. ' तुम्हा बायकांना वाटतं की पुरुषांना स्वैपाक जमत नाही. पण आर्मीची पोटं कोणाच्या जिवावर चालतात? फॅमिली पोस्टींग असतं ना तेंव्हा सुद्धा कोणाच्या बायका स्वतः स्वैपाक करत नाहीत. सगळ्यांकडे खानसामाच सगळं सांभाळतो. अन हे लोकं काही तुमच्या सारखे पुस्तकात वाचून शिकत नाहीत.' हा शेवटचा टोमणा मला. एमेरिल च्या पुस्तकावर त्याची सही घेण्यासाठी मी एका शनिवारी चार तास एकाच दुकानात लाइनीत काढल्याची सुरस कहाणी ओरिजित अन अजित रंगवून रंगवून सांगत असतात.

मी सगळी भांडी आवरेपर्यंत काका इकडच्या तिकडच्या गप्पा करत होते पण त्यात त्यांचं लक्ष नव्हतं. काही तरी दुसराच विषय काढायचाय पण कुठून सुरुवात करावी हे न कळल्याने गडबडले आहेत ते कळत होतं. तेव्हढ्यात बिंदूकडे लक्ष गेलं माझं. एकटीच दोन्ही हातात कॉफीचा कप धरून मागच्या दारातून बाहेर बघत उभी होती. डोळे इतके भरून आलेले की नुसता पाठीवर हात ठेवला तरी गालावर ओघळणार. मी तिच्याकडे बघतेय म्हटल्यावर काकांची पण नजर तिच्यावर गेली. त्यांचा चेहरा अजूनच कसानुसा झाला.

'बिंदू, तुला हवीये का कॉफी अजून?' तिचं लक्षच नव्हतं माझ्याकडे, त्यामुळे मी तिच्याकडे न बघताच विचारून घेतलं.
' अं हं . ऩको इतक्यात.' म्हणत ती मुलांच्या बाजूला जाऊन बसली.
'बघ मी आल्यापासून हे असंच चाललंय तिचं. तिच्या आईला पण कळत नाहीये तिला कसं समजवायचं ते'
'पण झालंय तरी काय? तब्येत ठीक आहे ना सगळ्यांची काका?'
'फिजिकली सगळं ठीक आहे सगळ्यांचं.' दरवाज्यावरून नजर न हलवता बिंदूचं उत्तर आलं. हिचं लक्ष इकडेच आहे म्हणायचं.
'डोकी अमेरिकन होऊ लागली आहेत सर्वांची!' लाह्या फुटाव्यात तशी बिंदू फुटफुटली.
'अरे, ओरिजित बिगिन ऍट द बिगिंनंग मॅन. तिचे डोळे भरुन वहाताहेत. काकांचं कॉफी कडे लक्ष नाही. काय चाललंय काय.'
'काकांनाच सांगू देत सगळं! त्यांच्याकडूनच ऐका काय ते!' बापरे, हिचा पारा चढतच चाललाय अजून.
अजितने काकांना आपल्या शेजारच्या खुर्चीवर बसवलं अन म्हणाला 'आता काय ते नीट सांगा. उगाच कोड्यात बोलू नका सगळे.'
काकांनी दोनदा ' अं', 'काय आहे की' वगैरे म्हटल्यावर बिंदू परत भडकली होती. तिला हातानेच गप्प बसण्याची खूण केली अजितने. शेवटी ओरिजित म्हणाला 'काकांनी लग्न करायचं ठरवलंय.'

'हात्तिच्या येवढंच ना! येवढी चांगली बातमी अन तुमम्ही सगळे असे अडखळत अडखळत का सांगताय?' अजितने ओरिजितच्या पाठीवर केवढ्यातरी जोरात थाप मारत म्हटलं.

'बाकीचे डीटेल सांगा न काका? हू इज दॅट लकी गर्ल अं वूमन आय मीन लेडी?' मला त्या सौभाग्यकांक्षिणीला नक्की काय म्हणावं सुचेना.

'येस, येस,वी नीड टू नो ऑल द ज्युसी स्टफ ओल्ड मॅन.' अजितला एकदम चेव आला. नाहीतरी काका आपल्याच वयाचे असल्यागत वागतात दोघे त्यांच्याशी.

कधी नव्हे ते काका चक्क लाजल्यासारखे दिसले.

'ऍन्ड दॅट इज द रूट ऑफ ऑल द प्रॉब्लेम्स.' बिंदू उभी होती त्या दिशेने न बघताच ओरिजितने म्हटलं तरी त्याच्या बोलण्यावरून तिला हे लग्न पसंत नाही अशी आमची दोघांची ट्यूब पेटली.

'विचार ना,लकी गर्ल कोण आहे ते विचार.' मागच्या अंगणावरची नजर न हलवता बिंदू म्हणाली.

काका सांगतात का ओरिजित काही सांगतो म्हणून मी आळीपाळीने दोघांकडे पहात होते. क्षणभरच गेला असेल मधे पण इतकी शांतता होती त्या एका क्षणात. वादळापूर्वीची शांतता म्हणतात ती हीच असावी असा विचारही चमकून गेला माझ्या मनात. काका काही एकदम त्यांच्यापेक्षा फार लहान किंवा फार मोठ्या बाईशी लग्न करणार नाहीत. त्यांच्या वयाला, परिस्थितीला, घरच्या वळणाला शोभेल असंच स्थळ शोधणार. बरं काकांनी लग्न करावं हे ओरिजित अन तोरूलता दोघंही गेली अनेक वर्षं सुचवत आहेत. मग बिंदू का येवढी नाराज?

'सुनंदाशी लग्न करणार आहे मी.' काकांनी नुस्तं ते नाव घेतलं तरी त्यांचा चेहरा झळाळून गेला. मी इतकी चकित झाले की त्यांनी कुणाचं नाव घेतलं त्याचा मला काहीच अर्थबोध झाला नाही. अजितला कळलं पण विश्वास बसला नाही.
'सुनंदा आंटी? सुनंदा पटेल? बिंदुच्या मम्मी?' त्याची प्रश्नांची सरबत्ती सुरू.

'हो त्याच. मी अजून कुठ्ल्याही सुनंदाला ओळखत नाही.' परत नुस्तं त्यांचं नाव घेतलं तर काकांच्या डोळ्यात वीज तळपून गेली. इतकी ओढ, इतकं प्रेम? साधं नाव घेतलं तर वीज तळपतेय. आम्हाला कोणाला कसं काहीच कळलं नाही? की आम्ही खरं खुरं लक्षच दिलं नाही कधी काकांकडे? 'याद अगर वो आये, ऐसे कटे तनहाई, सूने शहर में जैसे बजने लगे शहनाई' फक्त कवितेतूनच असतं असं वाटायचं. पण आत्ता, या क्षणी काकांच्या समोर आम्ही कोणी नाही आहोत. आहे ती फक्त सुनंदा! काका, सुनंदा अन शहनाई. बस! पोटच्या मुलासारखा वाढवलेला ओरिजित नाही, त्याची रुसलेली, रडवेली बायको नाही, मी अन अजित तर नाहीच नाही.

त्यांच्याकडे बघून मला इतकं छान वाटत होतं की अजून शंभर वेळा जरी त्यांनी म्हटलं असतं' मी सुनंदाशी लग्न करणार आहे' मी ते ऐकून घेतलं असतं. अन काका तर कितीही वेळा म्हणायला तयार होते.

ओरिजित आळीपाळीने माझ्याकडे अन अजितकडे पहात होता. आमच्या चेहर्‍यावरचे आश्चर्याचे, आनंदाचे, कुतुहलाचे भाव त्याने टिपले अन आम्ही काही बोलायच्या आतच तो बिंदूला म्हणाला ' बघ्,मी तुला सांगितलं होतं ना? ह्यांना पण एकदम आवडणार. काका अँड मम्मी आर पर्फेक्ट फॉर ईच अदर. वी शूड हॅव थॉट ऑफ धिस सूनर.'

खरंच होतं ते. बिंदूच्या आई अन ओरिजितचे काका दोघेही खरंच एकमेकांना अगदी साजेसे होते. बिंदू अन तिची बहीण चौथी, पाचवीत असताना बिंदूचं कुटुम्ब बडोद्याहून इकडे आलेलं. बिंदूचे दोन मामा, दोन-तीन मावश्या, अन वडीलांकडचे पण बरेच नातेवाईक सगळे या भागात होते. बिंदू कॉलेजमधे असताना वडिल वारले. आई नोकरी करत होतीच. पण वडिल गेल्यावर आईने एकटीच्या बळावर मुलींचं शिक्षण, दोघींची लग्नं सगळं व्यवस्थित पार पाडलं होतं. स्वतःची जबाबादारी मुलींवर, जावयांवर पडू नये याबद्दल त्या अतिशय जागरूक होत्या.

काकांनाही कसली जबाबदारी नाही. मुंबईमधल्या नोकरीतूनही ते दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. तोरुलताचं लग्न झालंय, ती तिच्या संसारात रूळलीय. काका दरवर्षी काही महिने अमेरिकेत, काही महिने मुम्बईत असं करत असतात.
बिंदूच्या आई पण एक दोन वर्षात रिटायर होतील. मग दोघेही जोडीने इकडून तिकडे अन तिकडून इकडे खेपा करतील. कशाला बिंदू भडकलीय देव जाणे?

'बिंदू , तू लॉजिकली विचार करतेयस की नुस्तंच इमोशनली घेतेयस सग़ळं? जरा तुझ्या आईच्या बाजूने विचार कर. कुठल्याही वयात माणसाला सोबतीची गरज असते. आपल्या वयाला, शिक्षणाला, आपल्या आवडी निवडींना अनुरूप जोडीदार मिळाला तर हवाच असतो.' शांतपणे इतके छान विचार मांडू शकतो अजित?

'अगं तू अन तुझी दिदी शिकत होतात, तुमची लग्नं व्हायची होती तेंव्हासुध्दा एकटीने सगळं सांभाळलं तुझ्या आईने. सोपं होतं असं वाटतं का तुला? तुझे मामा, मावश्या जवळ होते, अडी अडचणीला त्यांचा आधार होता. पण जबाबदारी आईवरच होती ना? तुला माहितेय ना, तुला प्रपोझ करायच्या आधी ओरिजितने तुझ्या आईला सर्व सांगितलं होतं. तुमचा इथे फार मोठा गोतावळा आहे. ओरिजित परजातीचा, परभाषेचा, आई बापाविना वाढलेला मुलगा. इथेच काय, दुनियाभरात फारसे नातेवाईक नाहीत. असं सगळं असून त्यांनी ओरिजितला एका शब्दाने अडवलं नाही. उलट आपल्या बहीण भावंडांची मनं वळवली.'

'हो, हो, इतकी छान वळवली आहेत मनं की माझे दोन्ही मामा या लग्नाला तयार आहेत.'
'मग तूच का तयार नाहीस? सांग तरी एकदा.' ओरिजितने हा प्रश्न हजारदा विचारला असणार अन बिंदूने ह्जारावर एक वेळा उत्तर दिलं असणार. पण तरी तेढ काही सुटली नसणार. नाहीतर आमच्या कडे मध्यस्थीला यायची काय गरज होती.

'कितीदा सांगू परत परत? आईने या वयावर लग्न करावं हेच मुळी मला पटत नाही. पण तिला करायचंच असेल तर इतर कोणाशीही करावं. काकांशी कसं लग्न करता येईल? ते ओरिजितला वडीलांसारखे आहेत. लोक काय म्हणतील? मुलांना कसं सांगणार?'

'अगं लोक काहीही म्हणणार नाहीत फार दिवस. पब्लिक मेमरी इज शॉर्ट. अन उद्या तुझ्या आईला काही मदत लागली तर हे 'लोक' येणार आहेत का मदतीला? तुमच्या लग्नाच्यावेळी सुद्धा किती लोकांनी 'जातीबाहेर मुलगी दिली' म्हणून काही बाही सुनावलं होतं तुझ्या आईला? आईने ते मनावर घेतलं का? '

बराच वेळ उलट सुलट वाद चालत राहिला अजित अन बिंदूचा. ओरिजित मधनं मधनं बोलायचा प्रयत्न करत होता. पण त्याचे व्हेस्टेड इंटरेस्ट आहेत अन तो बायस्ड आहे वगैरे सांगून बिंदू त्याला गप्प करत होती. काका बिचारे गप्प बसून ऐकत होते. माझी कॉफी संपल्याचं निमित्त करून मी उठले तशी काका पण माझ्या मागोमाग उठून आले.
' तुला काय वाटतंय चेतू? चुकतंय का माझं काही?'
' असं काय म्हणता काका? तुम्हाला अन सुंनंदा आंटींना स्वत:चे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहेच ना? बिंदू जराशी बिथरलीय खरी पण दोनचार दिवसात येईल ताळ्यावर.'

'तुला खरंच वाटतं का तसं? ती इतकी विरोध करेल असं वाटलंच नव्हतं गं आम्हाला. सुनंदाचे भाऊ कदाचित नाही म्हणतील अशी आमची कल्पना होती. कुमुद अन बिंदू खुशच होतील असं वाटलं होतं'

'अरे हो, दिदीचं विसरलेच मी! तिचं काय म्हणणं आहे?'

'ती लग्नाच्या तयारीला लागलेय. काय करु अन काय नको असं झालंय तिला. मला म्हणाली "मॉम डिझर्व्स अ लॉट ऑफ हॅपीनेस अँड विथ यू शी विल फायनली गेट इट." फक्त सुंनंदा अन मी थोडे दिवस मुंबईत अन थोडे दिवस इकडे असं करू त्याची तिला काळजी वाटतेय. पण सुनंदाची तयारी आहे असं दोन ठिकाणी संसार मांडायची.'

'काका, माझ्या जनरेशनच्या अनेकांनी हे एकमेकांना सांगितलंय पण कोणीही तुमच्या जनरेशन्च्या कोणाला सांगितलं नसणार, तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवर? एकमेकांसाठी तडजोड करायची तयारी आहे ना? मग घरच्यांच्या विरोधाची पर्वा करू नका. लग्न झालं की मग सगळं नीट होईल. नाहीतरी घरचे सगळे विरोधात नाहीयेत. एकटी बिंदूच काय ती. तिचा विरोधसुद्धा फार टिकणार नाही. तिला हे सगळं एकदम अचानक कळल्यामुळे बावचळून गेलीय ती दुसरं काही नाही.'

'खरंय गं. पण सुनंदाला वाईट वाटतंय ना. माझ्या मुलींच्या मनाविरुद्ध मी स्वतःच्या सुखासाठी काही करणार नाही म्हणते ती.'

'अन तरी बिंदूला काही वाटत नाही?'

'तिला काय वाटतं ते तिचं तिलाच कळत नाहीये. मी आल्यापासून बघतोय. रुसून आहे एकदम. नाक लाल, डोळे वहातायत, भांड्याकुंड्यांची आदळ आपट. काल मुलांनी पण धपाटे खाल्ले विनाकारण.'

'काका, मग असं करा, थोडे दिवस आमच्या कडे रहा. तुम्हालाही थोडा बदल होईल अन आम्हाला पण बरं वाटेल.'

'खरंच म्हणतेस का? आधी नवर्‍याला तरी विचारून घे.'
'काका, तुम्हाला इथे बोलवायचं असेल तर त्यात अजितला विचारायचं काय त्यात. तो एका पायावर तयार होईल. तुम्हाला माहीतच आहे.'
'ते इतर वेळी चेतू. आता ओरिजितकडे माझ्यावरून विश्वयुद्ध सुरू व्हायच्या बेतात आहे. त्यात मी तुमच्याकडे आलो म्हणजे आणखीन भर पडेल. उगीच तुमच्यावर शेकायला नको.'
'आमच्यावर काही शेकत नाही. अन शेकलंच तर आम्ही बघून घेऊ. तुम्ही इथे निवांत दिवस रहा. इथं तुम्हाला आंटींशी निवांत बोलता भेटता येईल. अन तेवढ्यात बिंदू पण निवळेल जरा.'

बिंदू तयार नव्हती पण ओरिजित अन अजित दोघांनी एकदम सम्मती दिली. ओरिजित म्हणाला ' पाहिजे तर त्यांना इथेच राहू दे आता. संध्याकाळी मी त्यांचे कपडे, औषधं वगैरे आणून देईन.' दादू आमच्याकडे रहाणार म्हटल्यावर ओरिजितची मुलं हिरमुसली थोडी, पण त्यांना पण पुढच्या आठवड्यात रहायला पाठवायचं कबूल केल्यावर मग फारशी खळखळ न करता गाडीत जाऊन बसली.

पुढचे सात आठ दिवस असे मजेत गेले! रोज काका काही ना काही नवे प्रकार करत होते. शिवाय मुलांबरोबर प्रॉजेक्ट चालायचे ते वेगळेच. ट्रेन चे ट्रॅक बसवून घेतले, टेलिस्कोप ची फक्त तोंडओळख होती आता पर्यंत. तो कसा वापरायचा याचं अगदी शास्त्रशुद्ध प्रात्यक्षिक झालं. 'ही वॉज अ कमांडो' वगैरे आजूबाजूच्या पोरापोरींमधे मिरवून झालं. तोफा, रणगाडे, वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब इत्यादींवरती तासंतास बोलणं झालं. शुक्रवारी संध्याकाळी ओरिजितने दोन्ही मुलांना पण आणून सोडलं. 'उद्या संध्याकाळी सगळ्यांना घेउन जाईन. आता जरा मेमसाहेबांना शॉपिंगला न्यायचंय' म्हणून बाहेरच्या बाहेर गेला.

त्यादिवशी रात्री चारी मुलं अन काकांनी मागच्या अंगणात तंबू ठोकून 'कॅम्पिंग' केलं. काकांनी त्यांच्या फौजेतल्या दिवसांच्या गोष्टी सांगितल्या. पुढच्यावर्षी खरोखरीच्या जंगलात 'कॅंपिंग' करायचं वचन घेऊन एकदाची बच्चे कंपनी झोपली.

शनिवारी ती सगळी मंडळी जायला निघाल्यावर माझ्या लेकाने बापाच्या गळ्यात गळा घालून सगळ्यांना ऐकू जाईल इतक्या हळू आवाजात कुजबुजत विचारलं 'डॅड, कॅन ओरिजितकाका ट्रेड दादू आजोबा टु अस? वी कॅन गिव्ह युवर सीझन टिकेटस टु देम फॉर वन सीझन.'

नकळत अजित बोलून गेला 'दादू आजोबा इज नॉट फॉर ट्रेड एनी मोअर. नानी बा ओन्स हिम फॉर एव्हर."
आल्यापासून बिंदू गप्प गप्पच होती. अजितचं बोलणं ऐकल्यावर एक मोठा निश्वास सोडून काही न बोलता गाडीत जाऊन बसली.

आठवडाभर दादूआजोबा आपल्याकडे राहिले म्हणजे मुलांना नवल वाटलंच होतं. पण आपल्याबरोबरीने खेळणारं, मदत करणारं, अन हसत खेळत शिकवणारं मोठं माणूस मिळालं म्हणून ती आनंदली पण होती. ओरिजितच्या मुलांना देखील आईचं काही तरी बिनसलंय हे जाणवत होतं. पण नक्की काय ते कळत नव्हतं. अजितच्या एका वाक्याने सगळ्यांना सगळा उलगडा झाला.

ती मंडळी निघून गेल्यावर लेकीने विचारलंच ' मॉम, विल बिंदू आंटी बी द ब्राईडस्मेड व्हेन नानी बा अँड दादू आजोबा गेट मॅरीड?' ह्या मुलांना दर आठवड्याला भारतीय पद्धतीच्या लग्नाची कॅसेट दाखवली पाहिजे. ब्राईडस्मेड म्हणे! 'मे बी.' म्हणून मी गप्प बसले. नरो वा कुंजरो वा कुठच्याही प्रसंगी चालतं, युद्धच पाहिजे असं नाही.

रात्री आम्ही दोघं कुठलातरी सिनेमा बघत बसलो होतो. अकराच्या पुढे फोन वाजला. येवढ्या उशीरा फोन म्हणून जरा घाबरतच फोन उचलला. ' यू गाइज डिड इट! यू गाइज डिड इट!' ओरिजित इतक्या उत्साहाने ओरडत होता फोनवर, त्याच्या शेजारच्या तीन चार घरी तरी कळलं असणार की यांच्याकडे काही तरी चाललंय म्हणून.

आमच्याकडून निघाल्यावर ओरिजितच्या मुलांनी गाडीत त्यांच्या दादूंची उलट तपासणी घेतली होती. ' हाउ कम नानी बा ओन्स यू? मग तू आमचा दादू आहेस की नाहीस? नानी बा फक्त तुझ्याच ग्लास ला चीअर्स करते ते येवढ्यासाठीच का? तू नेहमी नानी बा टेबलपाशी आली की उठून तिची खुर्ची सरकवून देऊन मग बसतोस ते ती तुला 'ओन' करते म्हणूनच का? ती तुला आमच्या घरी केंव्हाही रहायला देईल की ती सांगेल तेंव्हाच तुला आमच्या कडे रहाता येईल? कुमुद मासीच्या मुलांचा पण तू दादू होशील का? त्यांना अजुन एक आजोबा अगोदरच आहेत त्यांचं काय?' घरी पोचेपर्यंत दादू अन नानी बा यांच्याबद्दलच प्रश्न चालू होते. शेवटी सगळ्या प्रश्न्नांची समाधानकारक उत्तरं मिळाल्यावर धाकटीने सांगितलं होतं 'जर नानी बा तुला ऑलरेडी ओन करते आहे तर मग लग्नच करायचं असा हट्ट का धरून बसला आहेस? आई उगीच तुमच्या लग्नावरून भडकलीये अन तुम्ही तेच तेच भांडण करताय. ती ओन करते नं तुला, मग जाऊन रहायचं शहाण्यासारखं तिच्याकडे. अन ती सांगेल तेंव्हाच आमच्याकडे यायचं.'

घरी न जाता मंडळी सगळी बिंदूच्या आईच्या घरी गेली होती. बिंदू ने अजितचं बोलणं अन मुलांचे गाडीतले सगळे संवाद आईला सांगितले. त्यांची हसून हसून पुरेवाट झाली. 'माझ्यासुद्धा लक्षात आल्या नाहीत त्या गोष्टी मुलांच्या लक्षात आल्यात. अती हुषार तुझी मुलं.'

'अरे पण मग बिंदू काय म्हणाली? तिने इतके दिवस एवढा असहकार पुकारला होता ते सगळं एकदम कसं काय बदललं?'

' त्याचं काय आहे, मी सांगितलं असतं सर्व नीट. पण ती अजूनही मला ओन करते अन ओन करत रहावी यातच माझं भलं आहे. त्यामुळे मी जास्त तपशीलात सांगू शकत नाही. उद्या सकाळी मामांशी बोलून लग्नाची तारीख पक्की करणार आहोत. मग काका अन मम्मीच मिठाई घेऊन येतील. गूड नाईट.'

गुलमोहर: 

शोनू, वेगळी कथा.. फ्लो मस्त आहे.. पण बिंदूचा असहकार तिच्या जागी ठीकच आहे ना? Happy आईने दुसरं लग्न करू नये असं नाही, पण चुलत का होईना, आपल्याच सासर्‍याशी लग्न करणे थोडं ऑकवर्ड नाही वाटत? Happy

असो, पण अंत भला तो सब भला Happy

मस्तच आहे कथा.. पुढील भागांची वाट बघते आहे. लवकर लिही हं.

<< फॅमिली पोस्टींग असतं ना तेंव्हा सुद्धा कोणाच्या बायका स्वतः स्वैपाक करत नाहीत. सगळ्यांकडे खानसामाच सगळं सांभाळतो. >>
असं काही नसतं हं. अगदी निवडक हुद्द्यांवरील अधिकार्‍यांनाच खानसामा मिळतो. बाकी आम्हीच रोजचा स्वैपाक करतो. रोजचा स्वैपाक च नाही तर रात्री १-१.३० ला उठवुन ' मॅम हम आलूके पराठे खायेंगे ' अशी फर्माइश करणार्‍या यंगस्टर्स ना गरमगरम पराठेही करुन घालतो. शिवाय पार्टी असेल तर १५-२० जणांचा स्वैपाकही करतो. अगदी स्नॅक्स पासुन ते पुडिंगपर्यंत सगळे...

शोनू, खूपच आवडेश कथा. छोटिशीच. मस्तं रंगवलीये. सगळच आहे- घरगुती वातावरण, एखादा प्रॉब्लेम, तो ही सध्याचा, नाट्यं, त्यातून सुटका, पटेल असा... सुंदर मांडणी, व्यक्तीरेखा छान खुलवल्यायस, संवाद मोजके तरी चपखल बसतिल असे, ....झक्कास शेवट.

लिखते रहो!

अभिप्रायांबद्दल धन्यवाद मंडळी.

शोनु,
एकदम आवडली. पुढचा हाफ येवुदेत. Happy

>>नरो वा कुंजरो वा कुठच्याही प्रसंगी चालतं, युद्धच पाहिजे असं नाही.
:):) शोनू, तुम्हाला कथा सुरेख फुलविता येतात.
विषयही वेगळे असतात. एक छान कथा वाचल्याचे समाधान.

मस्तच.... मध्ये मध्ये थोडे तुटक वाटत होते... पण छान !!!!

छान आहे कथा एकदम!! पटलीही Happy आपल आयुष्य कोणाबरोबर काढायचं हे स्वातंत्र्य हवच की प्रत्येकाला Happy

मस्त

लिही की अजून. मला आवड्ली गोष्ट. चांगले वाचायला मिळावे म्हणून आपण चांगले लिहायलाच हवे.