दूरचित्रवाणी....

Submitted by पल्ली जुनी on 9 December, 2009 - 05:15

ह्या आधी प्रकाशित झालेला लेख ह्या ठिकाणी http://www.maayboli.com/node/5298

सध्या सर्वत्र किती तरी वाहिन्या, त्यावर कितीतरी मालिका. मालिकांमधुन किती तेच ते विषय. तोच विषय शंभरदा वेगवेगळ्या पद्धतीनं आणि वेळ काढुपणानं दाखवत राह्यचं. वर कडी म्हणजे त्यांची नावं, अर्थातच टायटल्स! नाव आहे की अख्खा निबंध? कुठेतरी चंद्र उगवला असेल, कारण तीही कधी सासु होती, जयंतराव जोशांचे जोडलेले जीवन्...
हिंदीत तर मालिकांचा राक्षस धुडगुस घालत असताना मराठी मालिकाही जणु पावलावर पाउल ठेउन निघाल्या आणि भले भले दिग्गज कलाकार असल्या चार आण्याच्या मालिंकांमध्ये दिसु लागल्या. फेस व्हॅल्यु की काय म्हणतात ना ते! मोठा कलाकार ज्या मालिकांत काम करत असतो आपसुकच बिचारा प्रेक्षक ती मालिका बघण्याचे धाडस करतो आणि त्या मालिकेच्या नशिल्या जंजाळात नकळत गुंतुन पडतो. नावात सुख पण मालिकेत नुसती दु:खाची लांबलचक रांग. नावात संसार पण मालिकेत कुठेही धड संसार नाही. चार्-चार पुरुषांशी जोडले जाउनही एका मालिकेच्या नायिकेला तर काही कळतच नाही. चार दिवस कुठले? कित्येक वर्ष झाली तरी संघर्ष संपतच नाही, कधी घरातच संघर्ष तर कधी बाहेर.
मराठीतल्या काही मालिका तर एकदम भन्नाट. मला तर बर्‍याचदा वाटत आलंय की ह्या मालिकांच्या लेखकांना किंवा निर्मितीशी संबंधीत सर्वांना मानसिक उपचारांची गरज आहे. इतकं विकृत, इतकं सुडबुद्धीनं पेटलेलं, इतकं हिडीस कसं लिहता येतं ह्यांना? कुटुंबातलीच काही माणसं घरातल्यांचा विनाष कसा होइल ह्याचाच सतत विचार करत असतात. रात्र नाही दिवस नाही सतत मेक अपनं लडबडलेल्या असतात. झोपेतुन उठतानाही दागिन्यांचा संपुर्ण डबा घालुन ह्यातल्या नायिका दिसतात. ह्यांच्याकडे घरकामाला नोकर्-चाकर असतातच. काम नाही धाम नाही, कसला व्याप नाही, फक्त सतत बोलत राह्यचं, रडत राह्यचं, छद्मीपणानं हसत राह्यचं! कुठली जिद्द नाही, काही करुन दाखवायची उमेद नाही, कुठला संदेश नाही की कसला आनंद नाही. आहे फक्त नात्यांचा गुंता, श्रीमंती घरं आणि दागिने - साड्या! ह्या मालिकांमधले पुरुष ऑफिसमध्ये सुद्धा घरच्या चर्चा करत बसतात, तर्क्-वितर्क, मोबाईलवरुन संभाषण ह्यातच त्याचा दिवस संपतो. समाजात घडणार्‍या कुठल्याही विषयाशी ह्यांचा संबंध नाही.
कधी हा हिचा नवरा, कधी हा तिचा नवरा. ती कधी ह्याची बायको, ती कधी त्याची बायको, त्याचे आणिक तिसरीवर प्रेम. तिसरीला चवथ्यापासुन मूल! आई आणि प्रेयसी सारख्याच वयाच्या वाटतील अश्या. कहर म्हणजे कुणी एक मरतो आणि येन केन प्रकारेण पुन्हा जिवंत होतो! किंवा चेहरा बदलुन येतो. देवा! झेपत नाही हो... Sad
बरं इथवर मी जे काही लिहिलंय हे सगळं तुम्हालाही वाटत असणार, फक्त ह्या लेखाद्वारे पुन्हा एकदा ह्या विषयावर नव्याने विचार करायला लावायचा आहे.
अनंत चॅनेल्स, त्यावर अनंत पण त्याच त्या प्रकारच्या मालिका. हे सगळं पाहतांना कुठ्लं ज्ञान वाढीस लागलं? कुठली सामाजिक बांधीलकी वाढीस लागली? कोणत्या प्रकारचं सृजन झालं? कसलं निखळ, निर्मळ मनोरंजन झालं?
उलट वैवाहीक संबंधांबद्दल नव्या पिढीसमोर संभ्रम निर्माण झाला. इतकी फुटकळ असतात का वास्तवातली नाती? जिला वहिनी म्हणावं अशी स्त्री वास्तवात अशी असते का? ह्या मालिकांमध्ये दाखवलं जाणारं आयुष्य समाजाच्या नक्की कुठल्या थरांत घडतं? ह्या मालिकांमध्ये काम करणार्‍या कलाकांना कसं वाटत असेल असली कामं करताना? त्यांना डीप्रेशन येत असेल का? मालिकेतल्या स्त्रीचं दु:ख पाहुन रडणार्‍या स्त्रिया समाजात आहेत तसेच न चुकता अशा टायपाच्या मालिका बघणारे महाभाग पुरुषही आहेत. नायिकेचा नवरा सोडुन गेल्यावर ढसाढस्सा रडणार्‍या एखादीला आपल्या बाळाचे रडणे म्हणजे कोण मोठा व्यत्यय वाटतो अश्या वेळी! टि.व्ही. वरचं नेपथ्य (इंटेरीअर) पाहताना स्वतःच्या घराचं नेपथ्य किती दिनवाणं झालेलं असतं! त्याच त्या प्रकारच्या रटाळवाण्या, रडक्या एकापाठोपाठ एक मालिका बघुन कंटाळा कसा येत नाही? नसेल येत बहुधा. चॉइस चा प्रश्न आहे. एकतर वाहिन्यांचा रग्गड चॉइस त्यावर मालिकांची भाजी मंडई!
पण ह्याच्या आहारी जाताना आपण विसरतोय ते आपल्या कुटुंबाला वेळ देणं. नवर्‍याच्या दिनचर्येत आज काय घडामोड झाली बायकोला माहीत नाही आणि बायकोने आज दिवसभर काय केले नवर्‍याला माहीत नाही. मुले तर अलिकडे ट्युशनमध्येच होमवर्क करुन येतात मग तेही मालिका बघायला बसतात. एवढ्या एवढ्या जिवाला कळतही नसेल आपण काय पाहतोय म्हणुन. हळुहळु मालिकेत दाखवलं जाणारं जीवन हेच सत्य आहे असं ते मुल धरुन चालतं. मग त्याला चांगल्या वाईटाची पारख कोण आणि कशी करुन देणार? आपले आई-वडील किती आपल्या जडण घडणीत जाणिवपुर्वक लक्ष घालीत असत. त्यामानाने तेवढा वेळ आपण आपल्या मुलांना देतो का? एक मालिका संपली की रीमोटने आपण दुसर्‍या वाहिनीवरचे कार्यक्रम तपासु लागतो. नव्या नव्या टेक्नॉलॉजीने तर एखादा न बघता आलेला कार्यक्रम रेकोर्ड करुन नंतर बघता येतो. अरे पण काय फरक पडतो एखादा कार्यक्रम असा चुकला तर!
ऐतिहासीक मालिका दाखवतांना त्याचा तितका परखड अभ्यास ह्या प्रकारच्या मालिका लेखकांनी केलेला असतो का? त्यात जे दाखवलेलं असतं त्यालाच नवी पिढी प्रमाण मानते आणि इतिहासाला नव्याने नवे संदर्भ जोडले जातात. काही धार्मिक मालिका तर अधिकाधीक प्रसंग टाकुन वाढवल्या जातात. ते सत्य असते का?
अलिकडे नव्याने पेव फुटलेल्या रीऍलिटी शोज वर तर माझा निक्षुन निषेध आहे. कला राहते एकीकडे आणि बाजार सर्वात पुढे. त्यातली विधानं ठरवुन बोललेली. भांडणही च्यायला ठरवुन करतात! परिक्षक म्हणुन बसलेली मंडळी ज्यांना आपण कलेच्या क्षेत्रातले चांद तारे समजतो ते अशा कार्यक्रमांत कुत्र्या-मांजराप्रमाणे भांडताना बघुन त्यांची कीव कराविशी वाटते. किती पैसे मिळत असतील भांडणाचे? आय मीन परिक्षणाचे? त्यासाठी स्वत:ची ओळख घालवायची? त्यात कधी कधी तर परिक्षक म्हणुन निवड करण्यात आलेल्या व्यक्तीला त्या क्षेत्राची कितपत माहिती असते हाही एक मोठा प्रश्नच आहे.
आमच्या परिचितांपैकी एकाने टी.व्ही. वरील एका गाण्याच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. संयोजकांनी त्याला त्यांचे लिहिलेले डायलॉग बोलायला सांगितले पण ते न पटण्यासारखे असल्याने त्याने ते बोलायला नकार दिला त्यावर संयोजकांनी आक्षेप घेतला. स्पर्धकाने काय बोलायचे हे सुद्धा स्क्रिप्ट मध्ये ठरलेले असते. कसला हा रीऍलिटी शो? हा तर काहीच रीअल नाही. नुसता रील आहे. अशा काही रीऍलिटी शोजमध्ये तर स्पर्धकांची टिंगल टवाळी केली जाते. इतकं अपमानास्पद बोललं जातं की ऐकवत नाही. नसेल एखाद्याला ते अंग, पण तुम्ही त्याला तशी समज द्या किंवा स्पर्धेत प्रवेश नाकारा ना पण कुत्सित टिकेला काय म्हणावं? खास करुन जेव्हा सहृदय गीतकाराने असल्या टीकास्त्राचा भाग बनावं हे फार बोचतं मनाला.
कितीतरी मालिका अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. काय आदर्श आहे त्यांचा? आदर्श तर दूरची बात, उद्देश काय आहे?
दहा-बारा लोक एकत्र येउन हलक्या आवाजांत एकमेकांबद्दल बोलत असतात. विनींग स्ट्रॅटेजी, पॉलिसी वगैरे बोलत असतात. त्यांची खूसफूस आपण अगदी कान देउन ऐकायची, त्यात शंभर शिव्यांचे ज्ञान वाढवायचे! बॅक टॉक, बॅक स्टॅबींग, अती प्रसंग, बिभत्स नृत्यं, विक्षिप्त नाटकं, जाहीररित्या वॉटर गेम्स्! हे आहे का कल्चर? काय इंटरेस्टींग आहे ह्यात कोण जाणे? ही रॅट रेस कशासाठी? सगळं प्लॅन्ड?
पुर्वीच्या काळी एक दूरदर्शन होते. संध्याकाळ झाली की सर्व घरातुन एक सूर ऐकु येत. एखादी मालिका (पण एकसंध सलग कथानक असलेली), छायागित, चित्रहार, साडे सातच्या बातम्या, प्रादेशिक चित्रपट, मूक बधिरांसाठीच्या दीड्च्या बातम्या, भजनसंध्या अशा प्रकारचे समाजातील सर्व थरांतील लोकाना डोळ्यासमोर ठेउन कार्यक्रम संयोजन केलेले असे. लहान मुले किंवा कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र बसुन कार्यक्रम बघु शकतील अशी त्यांची रचना असे. हल्ली हा मुद्दा लक्षात घेतला जातो का? सर्व कुटुंबाने एकत्र बसुन पहावे असे कार्यक्रम फार थोडे आहेत. काही कार्यक्रम खरंच दर्जेदार आहेत. स्रीयुत गंगाधर टिपरे एक अतिशय संवेदन्शील कार्यक्रम आहे. ज्यात मनोरंजन, संदेश, उत्तम कथा बीज, सुंदर संवाद, संगित, नात्यांतली सुसूत्रता, वडीलधार्‍यांचा सन्मान, घरातले खेळीमेळीचे वातावरण, तुमच्या आमच्या घरांत घडणारे नेहमीचे प्रसंग सर्व अतिशय कुशलतेने मांडले आहेत. कुठेही अंधश्रद्धा नाही की टी आर पी वाढवण्यासाठी रबर ताणलेले नाही.
भडक वेषभुषा, केशरचना, नेपथ्य, विवाह बाह्य संबंध, रड, छद्मीपणा, सूड, मत्सर ह्यांचं भांडवल नाही. बघा बरं, तरी सुद्धा किती यशस्वी ठरलीय ही केमिस्ट्री. हॅटस् ऑफ टु द टीम.
कुणी कुठला कार्यक्रम बघावा, कुणाला कुठला आवडावा हा सगळा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु विनंती एवढीच आहे की निवड करा, बुद्धी शाबुत ठेवा, माया जालात अडकु नका. निवडक कार्यक्रम बघा, त्यात आपल्या घरातील इतर मंडळीवर काय परिणाम होतो ह्याचा विचार करा. कुटुंबातील व्यक्तींशी अधिकाधीक सुसंवाद साधा. कमी दूरदर्शन म्हणजे सुखी कुटूंबाचे दर्शन.

गुलमोहर: 

सध्या प्रत्येक गोष्ट हि फक्त धंदा ह्या नजरेतुनच बघितलि जाते. जास्त टि आर पि,जास्त जाहिराति ,लोकांत नको त्या विषयावर जास्त चर्चा हेच निकष असल्याने सकस मालिका बघायला मिळ्ण हा योग कठिण दिसतो.

१००% खरं आहे पल्ली तुझं म्हणणं..
अगं, ह्या सगळ्या वाहिन्या आणि त्यावरचे कार्यक्रम तर सोडूनच दे (जसं तू वरती सांगितलंस तसं - त्यांच्या नादालाही न लागणंच शहाणपणाचं)
मला सगळ्यात धक्का बसला तो discovery आणि nat-geo मुळे -
२०१२ movie release व्हायच्या वेळी - ह्यां दोन्ही channels वर २०१२ मधे जग कसं नष्ट होईल - ह्यावर कार्यक्रम होते - म्हणजे २०१२ चित्रपटाची जाहिरातच की! बरोबर त्याच सुमारास! पुन्हा काही दिसलं नाही!