चारी मुंड्या चितपट

Submitted by यशवन्त नवले on 4 December, 2009 - 10:25

चारी मुंडया चितपट
कोल्हापुरच्या एस.टी. स्टँड वर उतरलो तेंव्हा सकाळचे दहा वाजले होते. प्रवासाने सगळं अंग कस आंबून गेलं होत. देवीच्या दर्शनाला जायच तर ते सर्वसामान्य भक्ता प्रमाणे एस.टी. च्या लाल डब्यातूनच जायचे हा हट्ट. या हट्टा पायी स्वारगेट वरून ड्रायव्हरला गाडी घेऊन परत पाठविला. आता त्याचा पश्चाताप होत होता. एस.टी.स्टँड च्या बाहेर रस्त्यावर येऊन चोहिकडे नजर फिरवली. जवळपास एकही रिक्शा दिसली नाही. हातात ताज्या हिरव्यागार भाजीची पिशवी घेऊन जाणार्‍या एका ईसमास हटकले ..

" ओ ~~ भाऊ ! ईथं रिक्शा स्टँड कुठं आहे ? "

त्या ईसमानं तोंड फिरऊन माझ्या कडे पाहिलं . नजरेला नजर भिडली आणि मी प्रचंड वेगाने भूत काळात ढकलला गेलो. त्या ईसमाची अवस्थाही मझ्या सारखीच झाल्याचे त्याच्या चेहेर्‍या वरचे भाव सांगत होते. मझे मन reverse gear मधे प्रचंड वेगाने धावत होते. जेमतेम अर्ध्या मिनिटात पुर्‍या चाळीस वर्षांचा प्रवास करून ते शेवटी एका बिंदूवर स्थिरावले. त्याला मी ओळखत होतो. खात्री करून घेण्या साठी मी प्रस्तावना केली ....

"तुम्ही बापुराव बनसोडे कां ? "

समोरचा चेहरा उमलला अन आम्हा दोघा भोवती चार तपां पुर्वीचा सुगंध दरवळला. त्या दरवळीचा आस्वाद घेण्या पूर्वीच त्याचे शब्द कानावर धडकले ...

"कोन ! नान्या तू व्हय ? किती दिसानी भेटतुयास मर्दा ? "

कानाची छिद्र बोटांनी बंद करून स्वतःच उच्चारलेला दीर्घ ॐ कार ऐकल्या सारखे वाटले. त्या शब्दांनी माझे हल्ली "हळवे" झालेले कान तॄप्त झाले.

बाप्या माझा शाळेतला जोडीदार. धावत्या युगात आम्ही एकमेकांना पूर्णपणे विसऊन गेली होतो. आज चाळीस वर्षा नंतर अशी अचानक भेट व्हावी ही नियतीची किमया म्हणावी लगेल. त्याच कारण असं कि, नव्या बंगल्यावर राहायला जाऊन मला पुरी दहा वर्षे झाली. मात्र शेजारच्या बंगल्यात रहाणार्‍या माणसांना मी आज तागायत ओळखत नाही. अशा युगात, चाळीस वर्षा पूर्वीचा सहकारी भेटावा अन आम्ही दोघांनी एक-मेकांना ओळखावे ही नियतीची किमया नाहीतर दुसर काय ?. एके काळी आम्ही दोघांनी एक-मेकांचे "प्रतिस्पर्धी" म्हणून शाळा गाजवली होती. अभ्यास, परीक्षा, स्पर्धा, गँदरिंग, मैदान ईतकेच नव्हे तर हाणामारी सुध्दा !. प्रत्येक क्षेत्रात हा बाप्या माझा प्रतिस्पर्धी म्हणून लढत होता, पडत होता, पुन्हा उठून माझ्या समोर उभा ठाकत होता, पण कधीच जिंकत नव्हता. स्वतः हरल्याचं दुखः सुध्दा हा मझ्या बरोबरच "सेलिब्रेट " करीत होता. हाँटेलात वडा-पाव खाऊन ! . बाप्या हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व. प्रवाहाच्या दिशेन वहात जाणं त्याला कधीच मान्य नव्हतं. विरुध्द दिशेने पोहून, नाका-तोंडात पाणी जाईपर्यंत गटांगळ्या खाल्याच दुखः त्याला कधी झालच नाही.

S.S.C.ला बाप्याचा "निकाल" लागल्याच मला मित्रांकडून समजलं. नंतर तो कुठ गायब झाला हे कुणालाच समजलं नाही. मी काँलेज मधे रमलो.हळुहळू मझ्यातील बाप्या धूसर झाला. पदवी नंतर नोकरी निमित्ताने मी गांव सोडल. काही वर्षात पुण्याला स्थाईक झालो. तो पर्यंत माझ्यातील "धूसर" बाप्या पूर्ण नष्ट झाला होता. चाळीस वर्षात या जगात आणी विषेशतः माझ्यात बरीच उलथा-पालथ झाली होती. माझ्यातील "मी" पूर्ण पणे बदलला होता. त्यातील बहुतांशी बदल हे, परिस्थिती नुसार हेतुपुरस्सर घडविले गेले होते. भरगच्च "अर्थ-प्राप्ती" साठी "अर्थ-हीन" आयुष्य मी केंव्हा स्विकारलं हे मला कधी समजलच नाही. बदललं नव्हतं ते माझ शरीर आणि मनातील एक छोटासा कोपरा !

असा कोपरा कि ज्याला जपण्या साठी मी जिवापाड तगमगलो होतो !
आईच्या शुध्द, सुसंक्रुत संस्कारांचा कोपरा !
सामाजिक क्रांतीच्या प्रदुषणा पासून सुरक्षित ठेवलेला तो कोपरा !
चाळीस वर्षात हळू-हळू, हपत्या-हपत्याने "कोमात" गेलेला तो कोपरा !
स्थितप्रज्ञ ! स्तब्ध ! असा तो कोपरा !

बाप्याच्या आठवणी त्याच कोमातल्या कोपर्‍या दडलेल्या असाव्यात. कारण आज बाप्याला समोर पाहून त्या कोपर्‍यात क्षीण हालचाल जाणवली.
कोमातून बाहेर पडण्याची निष्फळ हालचाल !
बाप्याने मला आवेगानं मिठी मारली. त्या कोमच्या कोपर्‍यात हवी-हवीशी वेदना जाणवली.

"नान्या ! आदि घरी चल. हितं जवळच र्‍हातुया ! "

बाप्याच्या शब्दांनी मी भानावर आलो. पाय आपोआप बाप्याच्या पाठोपाठ चालू लागले. एसटी स्टँड पासून पांच मिनिटांच्या अंतरावर, अनेक प्रकारच्या झाडांनी वेढलेल्या एका जुनाट कौलारू घरा समोर बाप्या थांबला.

"आलं बग आपल घर ! "

बाप्या आमच घर म्हणाला नव्हता. आपल घर म्हणाला होता. घरा भोवतीचा सर्व परिसर पाँश बिल्डींगनी व्यापला होता. मधेच ही बाप्याची भली मोठी जागा आणि त्यावर उभं असलेल जुनाट कौलारू घर लोकांची नजर खेचून घेत होतं. घराच्या अवती-भवती सर्व प्रकारच्या झडा-झुडपांनी खच्चून भरलेल जंगल. तारेच्या कुंपणातून आत आलेवर हिलस्टेशन ला आल्या सारखं वाटलं. आजच्या या कोल्हापूर शहरात बाप्याच घर म्हणजे एक पुरातन वास्तु वाटत होतं. बाप्याच्या वया पेक्षा घराचेच वय जास्ती वाटत होतं. अंगणात शेणाने सारवलेल तुळशी वृंदावन, त्यातील ताजे-तवाने तुळशीचे रोप, सांजवातीने काजळी धरलेली दिवळी, वृंदावना भोवती सडा, त्यावर काढलेली पांढरी शुभ्र रांगोळी, त्यावर वाहिलेलं हळदी-कुंकू. या सर्व प्रथमदर्शनी गोष्टी त्या घरात वावरणार्‍या गृहल्क्षमी बद्दल बरच काही सांगून गेल्या. मी एकटक कितीतरी वेळ पाहात उभा होतो.

त्या कोमातील कोपर्‍या पुन्हा क्षीण हालचाल !
कोमातून बाहेर पडण्याची निष्फळ धडपड !

बाप्याच्या आवाजाने मी भानावर आलो. सारवलेल्या पडवीत बाप्या शेजारे टेकलो. भाजीची पिशवी पडवीतल्या खांबाला टेकवीत बाप्याने आवाज दिला ..

"ए~~ हिरा ! भाईर ये ! बग तरी कोन आलयां !"

दाराच्या चौकटीत काचेच्या बांगडया किणकिणल्या. नऊवार साडी अन लाल भडक कुंकवाचा भरगच्च टिळा ल्यालेली एक पंचविशिची मुलगी माजघराचा उंबरठा ओलांडून पडवीत आली. समोर अनोळखी व्यक्तीला पाहून झटकन एक पाऊल मागं घेऊन डोक्या वरचा पदर सावरला. चेहर्‍यावर निरागस हास्य अन कुतुहूल. बाप्याने ओळख करून दिली.

"ही माझी सून ! हिरा ! आन बरकां हिरा, हा माझा लंगोटी यार, नान्या ! यकाच साळंमंदी शिकलो बग आमी दोगबि !"

हिरानं चट्कन पुढे येउन वाकून नमस्कार केला. मला एवढ्या respect ची सवय नव्हती. किंबहुना या प्रकारच्या सवई त्या कोमातील कोपर्‍यात झोपल्या होत्या. मी पुरता भांबाऊन गेलो. मोठया प्रयत्नांनी आशिर्वादाचे शब्द आठऊन मी तोंड उघडलं ....

"अखंड सौभाग्यवती भवं !"

बाप्या मात्र अखंड पणे बोलत होता ....

"नान्या ! ही सातार्‍याची बरकां ! पोरानं माझ्या पसंतीला मान दिला. म्हनून ही या घरात आली बग!. ग्रँज्युएट झालिया ! मंजी माझ्या परीस लय हुषार काय ? हा~हा~हा~~! आता समद घर हिच सांभाळती ! मला पन, माझ्या पोराला पन आन घराला पन ! "

सुनेच कौतुक बाप्याच्या चेहेर्‍यावर ओसंडून वाहात होतं. सासर्‍याने स्वतःच्या बालमित्रा समोर, अगदी मोजक्या शब्दात केललं भलमोठ कौतुक ऐकून हिरा सुखावली होती. मनापासून आनंद झाल्यावर चेहर्‍यावर उमलणार स्मितहास्य घेऊन ती माजघरात गेली. परत आली ती स्वच्छ चकचकीत पितळी मध्ये गुळाचा खडा अन भुईमुगाच्या शेंगा घेऊनच. काळ्या मातीत कडक उन्हात वाळविलेल्या भुईमुगाच्या शेंगा. सोबत स्वच्छ पितळेच्या तांब्यातील थंडगार पाणी. अनोळखी वाटसरूला पाणी देण्याची ही खूप जुनी परंपरा ईथं अजून जिवंत होती. मोठया आदबीन पितळी अन तांब्या माझ्या समोर ठेउन हिरा आंत गेली. तसा मी अवेळी काही खात नाही. परंतू कित्येक वर्षापासून दुरावलेला गावरान मेवा पाहून मला मोह आवरला नाही. आत्ता पर्यंत मी खाण्याच्या विविध ठिकाणांचे अन विविध प्रकारचे मेनू चाखले होते. रस्त्या वरील हातगाडीवाल्या पासून ते पंचतारांकित हाँटेल पर्यंत आणी अडीच बाय चार चे फोल्डींग डायनिंग टेबल बाळगणार्‍या मध्यम वर्गीय कुटुंबा पासून ते हजार चौरस फुटांचा स्वतंत्र "डायनिंग हाँल " बाळगणार्‍या उच्चभ्रू फँमिली पर्यंत. परंतू हिराने पितळी मधे सर्व्ह केलेला मेनू अन त्या मागच्या भावना मला कुठं गवसल्या नव्हत्या अन गवसणारही नव्हत्या.

त्या कोमातील कोपर्‍या पुन्हा क्षीण हालचाल !
कोमातून बाहेर पडण्याची निष्फळ धडपड !

बाप्या स्वच्छ अन साध्या शब्दात स्वतःचा मागील चाळीस वर्षातील प्रवास सांगत होता. मी गुळ शेंगाचा आस्वाद घेत त्याचा प्रत्येक शब्द हृदयात साठवीत होतो. S.S.C. ला नापास झालेवर बाप्या काही दिवस शेतात राबला. एक दिवस शेतात किर्डू चावल्याचं निमित्त होऊन त्याचे वडील दगावले. या अकस्मीत घटनेचा धसका घेऊन त्याच्या आईने अंथरूण धरले. एक वर्षाच्या अंतराने तिनेही प्राण सोडले. बाप्या पूर्ण पोरका झाला. गावकीत चांगला जम बसविलेल्या बाप्याच्या so called पुढारी चुलत्याने या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. पुढारीगिरीचा प्रयोग स्वतःच्याच पुतण्यावर करून, तलाठयाच्या मदतीने, वडलार्जित ज़मीन स्वतःच्या नावावर चढऊन घेतली. अगोदरच पोरक्या झालेल्या बाप्याला अनाथ करून टाकले. वैतागून बाप्याने गांव सोडलं. कोल्हापुरच्या एस टी ला पाय दिला. दूरच्या नात्यातील चुलत-मावस मामाच्या ओळखीन एका गँरेज मधे "पडेल ते काम " या प्रोफाईल वर रुजू झाला. चार सहा महिने मामाच्या घराच्या गँलरीत पडून राहिला. झोपायला अन "गिळायला". हो. बाप्या साठी मामी "जेवायला" ऐवजी "गिळायला" हाच शब्द वापरीत होती. हळू हळू आतल्या खोलीतील मामीची धुसफुस जाणीव पुर्वक गँलरीत ऐकू एऊ लागली. मामीचे जिव्हारी रुतणारे विषारी शब्द आळवीत बाप्या रात्र जागवीत होता अन दुसर्‍या दिवशी उशीरा कामाला जाऊन मालकाच्या शिव्या खात होता.

अशाच एका तिरसटलेल्या सकाळी बाप्या उठला अन आठ दिवसांची रजा टाकून परत गावी गेला. वडिलांच्या वाटयाला आलेल आठ खणं वडिलोपार्जित घर आणि आईच्या नावावर होतं म्हणून चुलत्याच्या दाढेतून बचावलेल कष्टार्जित चार बिघा माळरान फुकून टकलं. मिळाले तेव्हडे पैसे घेऊन गावाला कायमचा रामराम ठोकला. पुन्हा कोल्हापुरात दाखल झाला. शेटजीच्या ओळखीन गावठाणा बाहेर माळावर दहा गुंठे जागा घेऊन लगेच पाया खांदायला सुरवात केली. स्वतःच घर बांधायची झिंग बाप्याच्या डोक्यात शिरली होती. गँरेज मधली पोरं त्याला साथ देत होती. गँरेज मधलं काम सांभाळून घराला मूर्त स्वरूप येत होतं. बघता बघता मातीच्या भींती उभ्या रहिल्या. चौकटीचा नारळ फुटला. भंगाराच्या दुकानातून स्वस्तात आणलेल्या चार खिडक्या बसऊन झाल्या. एक दिवस सुट्टीच्या दिवशी गँरेज मधली झाडून सगळी पोरं साईट वर हजर झाली. कौलं टाकली, दरवाजा बसवला. जमीन चोपली. भिंतींना पावडर फासली. परिसर साफसुप केला.....

झालं घर तयार !
स्वतःचं घर ! "कुनाच्या बां चं भ्या " नसलेल घर!

त्या रात्री बाप्यानं गँरेज मधल्या पोरांना हाँटेलात ईर्जिक घातली. मामा-मामीच्या घरातल्या धुमशीनं पेट घेण्या पूर्वी बाप्यानं गँलरीतील वळकटी उचलून प्रस्थान ठेवलं. मामा-मामीच घर सोडण्यापूर्वी त्या दोघांच्या पायाला हात लावायला विसरला नाही. दगडापेक्षा वीट बरी अन सख्या चुलत्या पेक्षा दूरची मामी बरी. बाप्या तिथून एकटाच निघाला ते थेट स्वतःच्या घरात दाखल झाला. तेहि ऐन आमावस्येच्या मुहुर्तावर. कुलूप उघडून आंत गेला. आई-बापाचा फोटो दर्शनी भिंतीवर लावला अन ढसाढसा रडला. एकटा. एकाकी. डोक्यातील झिंग उतरेपर्यंत रड-रड रडून शेवटी कसा-बसा शांत झाला.

आवसेच्या मुहुर्तावर विना सवाष्णीचा गृहप्रवेश अनुभवलेली हीच ती वास्तू ! .
अनेक बर्‍या-वाईट प्रसंगांनी mature झालेली ! संपन्न झालेली वास्तू ! .
कष्टाच्या घामाने भिजून चिंब झालेली वास्तू ! .
आई-वडिलांच्या आशिर्वादाने समृध्द झालेली वास्तू ! .
बाप्याच्या अपार प्रेमाने न्हालेली वास्तू ! .
सहकार्‍यांच्या निरपेक्ष, निष्कपट सहकार्याने उभी केलेली वास्तू ! .
एक जिवंत वास्तू ! .

बाप्याच्या शब्दांचा झरा माझ्या कानांत खळखळत होता. हिराने फेसाळलेल्या गरम-गरम चहाचे पेले आमच्या समोर केंव्हा आणून ठेवले ते समजलेच नाही. त्या साठी बाप्याला " दोन कप चहा टांक ! " अशी आँर्डर द्यायची गरज पडली नव्हती. तशी ही गोष्ट किरकोळ. पण या वास्तूत सुसंस्क्रूत रिती-भाती रुजल्याची जाणीव करून देण्यास पुरेसी. चहा करीत असताना, पडवीत चाललेल्या आमच्या संभाषणावर हिराचे पुर्ण लक्ष होत हे तिच्या बदललेल्या चेहर्‍यावर उमटल होतं. घरंदाज सासुरवाशीण, आपल तोंड न उघडता, श्रवण शक्तीच्या जोरावर माणसाची अचुक पारख करू शकते हे खरं. हिराच्या तोंडून अजून एकही शब्द बाहेर पडला नव्हता. तरी सुध्दा तिचे निष्पाप डोळे माझ्याशी खूप काही बोलून गेले. डोळ्यांची भाषा जाणण्याची माझी शक्ती त्या कोमाच्या कोपर्‍यात जागॄत झाली होती. पुढच्याच क्षणी हिराने मौन सोडले.

"मामंजी ! आता जिउनच जायच बगा ! मी सयपाकाला लागलिया !"

हिराच्या शब्दात आदब होता, अधिकार होता, प्रेमळ आज्ञा होती आणि सर्वात सुखद धक्का म्हणजे तिने मला "जेवणार का ? " अस विचारलं नव्हत. सरळ स्वतःचा निर्णय जाहीर करून ती स्वयपाक घरात अंतर्धान पावली होती. हिराचा प्रत्येक शब्द त्या कोमाच्या कोपर्‍यात जाऊन धडकला होता.

त्या कोमातील कोपर्‍या पुन्हा क्षीण हालचाल !
कोमातून बाहेर पडण्याची निष्फळ धडपड !

मी चुळ-बुळ करीत काही बोलण्यासाठी तोंड उघडणार तोच बाप्याने मला हाताच्या ईशार्‍याने गप्प केले.

"कायपन उपेग व्हनार नाय बोलून ! ती यकदा जिउन जा म्हनली कि गुमान जिउनच जायच बग ! तिच्या म्होरं आजुन माजं काय चालत नाय तर तू कुटला कोन ? हा~ हा~ "

खरं होत बाप्याचं. मी कुठला कोण, पण त्याच्या सुनेन, केवळ तासाभराच्या परिचयात मला मामंजी बनवलं होतं. किती सुखद वाटला तो शब्द ! कुठली कुणाची अनोळखी पोर. क्षणात स्वतःची मुलगी वाटायला लागली. मला उद्देशून "मामंजी" हा आदरयुक्त भावनेनी उच्चारलेला शब्द मी प्रथमच ऐकला होता. माझ्या कानांना सवय होती ती, पिझा-बर्गर च्या राशीतील, डँड-पाँप सारख्या उथळ शब्दांची. अर्थात शब्दातील फरकाने नातं बदलत असं नाही. मात्र त्या शब्दाची खोली किती आहे, त्याचा उगम जिभेवर झाला कि र्‍हुदयात हे समजत. या दोन्हीतील फरक जाणून घ्यायचा असेल तर त्याला "माझा जन्म" घ्यावा लागेल. "मामंजी आता जिउनच जायचं " या हिराच्या चार शब्दांचा उगम तिच्या र्‍हुदयात होता. म्हणुनच ते शब्द माझ्या मनात घुसून सरळ त्या कोमातील कोपर्‍यावर जाउन धडकले.

मी विचार करायला लागलो. आपल्या कडे आलेल्या व्यक्तीला आपण "जेऊन जा " असं म्हणालो तर ती व्यक्ती लगेच जेवायला बसते कां? मग हे दोन शब्द उच्चारायला आपल्याला असा कितिसां खर्च येतो ? क्षणभराची जिभेची अन ओठाची हालचाल व तोंडातून बाहेर टाकलेली थोडी अशुध्द हवा. बस्स. एवढ्च .दोन्ही फुकटच्या गोष्टी. आणि हे दोन शब्द उच्चारायला वेळ खर्च होणार तो जेमतेम पाव सेकंद! पण हे दोन शब्द समोरच्या माणसावर किती खोलवर परिणाम करतात! त्या माणसाच्या मनातील तुमची प्रतिमा किती उंचावते ! मग कां बरं हल्ली असे शब्द दुर्मीळ व्हावेत ? मी स्वतःला सुशिक्षीत, बुध्दीमान समजतो. मग हिराला जे क्षणात जमलं ते मला आज पर्यंत कां नाही उमगलं ?

बाप्यानं मला पुन्हा भानावर आणलं. हिरा स्वयपाकात गुंतल्याच आतून येणार्‍या भांड्यांच्या आवाजावरून जाणवत होत. बाप्या स्वतःचा प्रवास पुढे सांगत होता.......

अवसेला गृहप्रवेश केलेली वास्तू त्याला धार्जिन झाली होती. शुभशकुनी ठरली होती. गँरेज मधले चार कामगार बाप्याच्या घरात राहायला आले होते. घरभाडयाचं थोडफार उत्पन्न येऊ लागल. गँरेज मधे मनापासून राबणार्‍या बाप्याचा प्रामाणिक पणा शेटजी न बरोबर हेरला. हळू हळू बाप्याचा पगार अन त्याच बरोबर जबाबदार्‍याही वाढविल्या गेल्या. नाहीतरी शेटजी ला बरेच दिवसा पासून गँरेज साठी एका विश्वासू माणसाची तलाश होती. शेवटी एक दिवस गँरेज ची संपूर्ण जबाबदारी बाप्यावर सोपऊन, शेटजीनं महिन्यातून एकदा फक्त नोटा मोजण्याच काम स्वतः कडे ठेवलं. परिसरातील लोक आता त्या गँरेज ला "बापुरावचं गँरेज" म्हणून ओळखू लागले. बाप्याची आर्थिक घडी मजबूत झली. हातात पैसा खेळू लागला. बँक बँलन्स ने फुगवटा धरला. घराचे नुतनिकरण झाले. भोवतालच्या, पोटच्या पोरा प्रमाने वाढविलेल्या, हिरव्या गार झाडांची ऊंची वाढली. त्यांनी घरावर मायेची सावली धरली. शेटजीच्या मध्यस्तीने बाप्याचे दोनाचे चार हात झाले. लग्नाच्या मांडवात शेटजीनं बाप्याच्या हातावर आहेराचं पाकीट ठेऊन त्याच्याशी पहिल्यांदाच हस्तांदोलन केलं. बाप्या नमस्कार करण्या साठी वाकणार तोच शेटजीने त्याला मधेच थांबऊन प्रेमाने मिठी मारली. बाप्याला आजचं हे शेटजीचं वागण जरा वेगळच वाटलं. रात्री गँरेज मधल्या सगळ्या पोरांनी मोठया हौसेन वरात काढली. गुपचुप एक-एक चपटी पोटात रिचऊन सर्वजण वरातीत देधमाल नाचले.

दुसर्‍या दिवशी बाप्याने शेटजी न दिलेलं आहेराच पाकीट उघडलं. पाकिटातून नोटा ऐवजी स्टँपपेपर निघालेला पाहून बाप्या चक्राउन गेला. मजकुरावरून नजर टाकली अन बाप्याचे डोळे भरून आले. काल मांडवात शेटजी न केलेल हस्तांदोलन अन मारलेल्या प्रेमळ मिठीचं रहस्य उलगडलं होतं. काल पासून बाप्या गँरेजचा आठ आणे मालक झाला होता. शेटजीन केलेला हा आहेर म्हणजे बाप्याच्या प्रामाणिक पणाची पावती होती. बाप्याची बायको लक्ष्मीच्या पावलाने आली होती. बाप्याने लगेच तिचं सासरच नाव "लक्ष्मी" ठेऊन टाकलं. लक्ष्मी ने घराचा ताबा घेतला. तिचा हात घरभर फिरला अन बघता बघता ही वास्तू उमलली, दरवळली, मोहरली. गृहलक्ष्मी शिवाय घराला शोभा येत नाही हेच खरं. लक्ष्मीसारखी जोडीदारीण मिळाली म्हणून बाप्याने कधीनव्हेते महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पहिल्यांदाच डोकं टेकलं. जोडीनं आईची खणा-नारळानं ओटी भरली. लक्ष्मीवहिनीने बाप्याला नस्तिकाचा आस्तिक बनवला. धर्मानं स्री पेक्षा पुरुषाला अधिकारांच ढळतं माप दिलं खरं , पण धर्म टिकऊन ठेवण्यात मोलाचा वाटा स्रियांचाच आहे. कुलधर्म-कुलाचाराच्या बहुतांश जबाबदार्‍या स्रीच सांभाळत असते.
बाप्याला नास्तिकाचा आस्तिक बनविणारी लक्ष्मीवहिनी नक्कीच तेजस्वी गृहिणी असावी .....

हो. असावी. भूतकाळ ! कारण बाप्याची जिवलगी, त्याला अर्ध्या वाटेवर सोडून भरल्या कपाळानं निघून गेली. जाण्या पूर्वी वंशाचा वारस बाप्याच्या पदरात टाकून गेली. कौतुकानं लक्ष्मीने मुलाच नाव "प्रसाद" ठेवलं होतं. महालक्ष्मीचा प्रसाद. नवसाचा प्रसाद बारा वर्षाचा असताना लक्ष्मी अचानक किरकोळ आजाराचं निमित्त होऊन देवाघरी गेली. लक्ष्मी तशी निरक्षरच. लिहिता-वाचता येण्यापुरती "चार बुकं" शिकलेली. पण तिच स्वप्न मात्र प्रसादला ईंजिनिअर करण्याच होतं. ते स्वप्न तिच्या मागे बाप्याने पूर्ण केले. आता प्रसाद एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर नोकरी करीत होता. नोकरीत उत्तमरित्या स्थिर-स्थावर झाल्यावर प्रसादने, वडिलांनी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात डोळे झाकून माळ घातली. "माझं सुख हेच माझ्या वडिलांच एकमेव ध्येय आहे" याची जाणीव प्रसादला होती. त्यांनी पसंत केलेली मुलगीच मला अन मझ्या कुटुंबाला सुखी करू शकते हे प्रसादला पक्क ठाऊक होतं. आणी ते खरं ही ठरलं. हिरा घरात आली अन पुन्हा घर हसायला लागलं. प्रसाद-हिरा नं बर्‍याच वेळा बाप्याला गँरेज दुसर्‍याला चालवायला देऊन आराम करण्याचा आग्रह केला. पण बाप्याचा कायम एकच ठेका...

" आरं पोरानु, नुस्ता घरात बसून काय करू ? खायला कार अन धरणीला भार ! हातपाय हालत्यात तोवर हालवायचं ! मग हायेच की घरात बसनं ".

बाप्याचा नातू आता बालवाडीत जातो. घरात नातू आल्यावर एक दिवस बाप्याने हिरा व प्रसादला समोर बसऊन, गंभीरपणाचा आव आणीत स्वतःची V.R.S. जाहीर केली. बाप्याने घेतलेला VRS चा निर्णय अन त्याचा दिलेला खुलासा ऐकून हिरा-प्रसादला हसू अनावर झालं. पण ते त्यांनी गालातच दाबलं. बाप्याच VRS जाहीर करण्या मागच गुपीत दोघांना चांगलच ठाउक होतं आणी अपेक्षित सुध्दा होतं. नातू झाल्या पासून बाप्या सर्व जग विसरला होता. गँरेज मधे मन लागत नव्हतं. त्याला पुन्हा बालपण आलं होतं. नातवा भोवती पिंगा घालण्यात सर्व वेळ घालवीत होता. VRS शिवाय पर्याय नव्हता. नातवाला अंगा खांद्यावर खेळवीत, सुनेचा भरला सुखी संसार डोळ्यात साठवीत, उर्वरीत आयुष्य आनंदात घालवायच हे बाप्याचं एकमेव ध्येय उरल होतं. त्याचा आपला सधा सोपा सरळ हिशेब ......

" काय करायचय आता पैका कमउन ? पोरगा पोटा पुरत कमावतुया ! नातू अंगा खांद्यावर खेळतुया ! हीच माझी माप कमाई !"

ठराविक मर्यादे पलिकडील अर्थ संचय म्हणजे "जालीम वीष " हे बाप्याने योग्य वेळी ओळखले होते.

माजघराच्या चौकटेतून बाहेर डोकावीत हिराने आवाज दिला...

"आगुदर चार घास खाऊन घ्या अन मग बसा निवांत बोलत ! मी ताट करतिया !"

अंगणातील शिळे शेजारी पाण्याने भरलेलं घंगाळ आणी तपेली तयार होती. सासूबाईंच्या रुकवतातील भांडी हिराने जपली होती. मी हातपाय धुतले. रुमाल काढण्या साठी हात खिशाकडे जाणार तोच हिराचा हात पुढे आला. तिच्या हातात स्वच्छ धुतलेला पांढरा शुभ्र पंचा होता. स्वतःला नेमकं काय हवं हेच मुळी विसरलेल्या आजच्या पिढीत, दुसर्‍याला काय हवं आणि ते केंव्हा हवं याची निश्चित जाण या वास्तूत होती. पंचाला हात पुसत मी बाप्या पाठोपाठ माजघरात दाखल झालो. भिंती लगद घोंगडीची घडी टाकून तयार होती. त्यावर आम्ही दोघं टेकताच हिराची लगबग सुरु झाली. तांब्या भांड मांडल गेलं. दोन वटकावनं ठेवली गेली. पितळेच्या थाळीत काळ्या घेवडयाच्या डाळीची आमटी (कोरड्यास ) आणि शाळूची पांढरी फेक गरम गरम भाकरी. साधाच पण तोंडाला पाणी सुटेल असा बेत. विकतच्या Branded लोणची-चटण्याची सजावट नाही, महागडया dish मधून कल्पकतेने मांडलेले (अर्थात कामवाल्या मावशिंनी) green salad आणी fruits नाहीत, fridge मधे साठविलेल्या sweet dish चा फार्स नाही, calaries आणी fats चा हिशेब नाही कि काटेचमचे अन सुर्‍या नाहीत. समोर होती फक्त आमटी-भाकरी अन बाप्याने बुक्की मारून फोडलेल्या कांद्याचा, माझ्या वाटयाचा अर्धा भाग. तो ही फोलपटा सकट !( salad म्हणा हव तर). तरी सुध्दा मला ते "पूर्णब्रम्ह" वाटलं. हिरा सारख्या सात्विक गृहिणीने, निरपेक्ष वृत्तीने रांधून आपुलकीने वाढलेलं पूर्णब्रम्ह. पहिल्याच घासाला माझ्या तोंडून प्रतिक्रीया उमटली...

"व्वा ! मस्त ! बाप्या, खरंच सुगरण आहे तुझी सून ! "

माझ्या कौतुकास्पद शब्दांनी सुखावलेली हिरा बोलती झाली...

" घाय गडबडीत सादा-सुदाचं सयपाक केलाया मामंजी ! पोर समजून गोड मानून घ्या !"

हिरा चौकटी जवळ बसून आमच्या "उदर भरण " सोहळ्यावर बारीक नजर ठेउन होती. ताटातील भाकरीचा शेवटचा घास तोंडात घाले पर्यंत पुन्हा गरम भाकरी ताटात पडत होती.तिच्या हालचालीत विलक्षण चपळाई होती. आणि खाणार्‍याला पोटभर खाउ घालण्याची ईच्छाशक्ती. नको-नको म्हणून हाताचे तळवे ताटावर पसरून धरायला मुळी ती वेळच देत नव्हती.

माझ्या मनांत एक प्रश्न येऊन गेला. "सुगरण" कुणाला म्हणायचं ?. net वरून गोळा केलेल्या receipe च्या भांडवलावर रुचकर dishes बनऊन, डायनिंग टेबलावर बुफे मांडणार्‍या home minister ला, कि रुचकर पदार्था बरोबर प्रेम, आपुलकी रांधून अथितीला आग्रह पूर्वक पोटभर जेवायला भाग पाडून त्याची शाबासकी मिळवणार्‍या अन्नपूर्णेला ? .अवघड आहे!
हिराने आचरलेल्या service system ची मला सवय नव्हती. rather सवय मोडावी लागली होती. गेली कित्येक वर्षे मी कामवाल्या मावशींनी dine table वर मांडलेल बुफे गिळत होतो. (हो! गिळतच होतो. लोक त्यालाच "जेवत होतो " समजतात.) त्या मुळे माझा आहार किती अन मी खातोय किती याचा आज मेळ बसत नव्हता. सोबत बाप्याच्या मनसोक्त गप्पा पण चालू होत्या. खूप दिवसांनी योग्य श्रोता मिळाल्याने त्याला कंठ फुटला होता. ईतका वेळ माझ्या व्यवहारी मनांत घोळणारे पण हेतुपुरस्सर दाबून ठेवलेले विचार शेवटी ओठावर आलेच...

" बाप्या ! तुझी ही जागा अगदी मोक्यावर आहे. आजुबाजूला development पण चांगली झाली आहे. अशा prime location ला दहा गुंठ्याचा plot म्हणजे आजच्या market rate ला साठ-सत्तर पेटी सहज मिळतील नाही ? "

बाप्या हसून मान डोलवीत म्हणाला...

"खरं हाय तुझं ! लय बिल्डर लोक गळ घालून र्‍हायल्यात ! बक्कळ पैका दिउन्शान आनि वरती र्‍हायला मोट्टा फ्ल्याट पर देतो म्हनत्यात. पर ही दोनी पोरं माज काय बी ऐकाया तयार न्हायती बग ! मी म्हंतु काय हार्कत हाय बिल्डराला ध्यायला ? आं ? हातात जास्तीचा पैका आला तर पोरीला चार डाग करता यतील. मोटा झाल्यावर नातवाला धाडू परदेसात ईंग्रजीत शिकाया . मोट्टा मानुस करू त्याला ! खर का खोटं ? तुच सांग आता ह्यास्नी ! "

हिराने मधेच हस्तक्षेप करून बाप्याच बोलण तोडीत तावातावाने पण ठामपणे स्वतःची अन आपल्या नवर्‍याची बाजू मांडली ..

"आता तुमीच ईचार करा मामंजी ! आमास्नी हे घर म्हंजी देवाच्या देवळा सारकं ! वडिलार्जित आशिर्वादाचा हात ! सासुबाईंची सावली हाये आमच्या डोक्यावर ! बिल्डर ते मोडून-तोडून पाक सपाट करून टाकील ! आमी कसं बगावं त्ये उघडया डोळ्यानी ? परत आस घर हुब र्‍हाईल का सांगा बरं ? पैका काय, आज हाय तर उध्या नाय ! काय गिळायचाय त्येला का डोंबलावर घिउन जायचाय ? आन तुमास्नी पुन्यांदा सांगुन ठिवते ! पोराला नाय पाटिवनार मी पर्देसात शिकाया ! लय लळा हाय त्याला आज्याचा ! आन अंगावर डाग लिउन कुटं मिरवायला जायचया मला ?हा माज्या गळ्यात यवडा मोटा डाग हायेकी ! ह्यची सर यनार हायका दुसर्‍या कोन्च्या डागाला ? "

गळ्यातील काळ्या पोतीत ओवलेल डोरलं दाखवीत हिरा तावातावाने बोलली. मला न्यायाधीश बनऊन हिराने दोन पिढ्यातील गोड तंटा निवाडया साठी माझ्या समोर सादर केला. न्यायदाना बरोबरंच दोन्ही पक्षकारांच्या वकिलकीची जबाबदारी पण माझ्यावरच सोपविली होती. हिरा एक पदवीधर मुलगी असून सुध्दा काळ्या मातीतील खास गावरान बोली बोलत होती. कारण प्रसादशी लग्न करून ती फक्त सासरी नांदायला आली नव्हती तर सासरच्या संस्कृतीत पूर्ण विरघळली होती. मोजक्या साध्या सुध्या शब्दात तिने आपली बाजू ठाम पणे मांडून आम्हा दोघांना निरुत्तर केलं होतं. सासर्‍याने बांधलेल अन सासूने फुलवलेलं हे घर तिच्या साठी फक्त निवार्‍याच स्थान नव्हत तर एक पवित्र मंदिर होतं. भविष्यात वडिलधारे प्रत्यक्ष घरात नसले तरी, या घराच्या रुपाने वडिलधार्‍यांची छाया आपल्यावर अखंड राहील म्हणून तिला हे घर हव होतं. property म्हणून नव्हे ! प्रशस्त flat आणि लाल नोटांची थप्पी हे builder च prapojal तिला या घरा पुढे कवडीमोल वाटत होतं. नकळत पणे हिराने मला अत्यंत महत्वाची दोन "सत्य" सांगीतली होती. ...

एक - पैसा आज असेल तर उद्या नसेल. तो चंचल आहे. त्याच्या अस्तितवाने माणसाची लायकी बदलत नाही. नोटांच्या ढिगार्‍या खाली त्याची खरी लायकी झाकली जाते अन अचानक आलेल्या वावटळीने नोटा उडून जाउन लायकी उघडी पडते.

दोन - पैसा गिळता येत नाही किंवा डोंबलावर सुध्दा घेउन जाता येत नाही. गिळाव लागतं ते अन्न ! आणि अन्न फक्त गिळून भागत नाही तर ते पचायला सुध्दा हवं. असमाधानी माणसाला कोणतच अन्न पचत नाही. मग गिळलेल्या अन्नच बनत ते फक्त वीष ! .

हिराच्या "पैका काय, आज हाय तर उध्या नाय ! काय गिळायचाय त्येला " या शब्दांनी माझ्या डोक्यात थैमान घातल होतं. आज जास्तीत जास्त पैसा कमावण्या साठी प्रत्येक मनुष्य धावतो आहे, धडपडतो आहे तरी सुध्दा त्याची पैशाची भूक भागत नाही. गरज आहे ती एकदा तरी अंतर्मुख होउन स्वतःलाच प्रश्न विचारण्याची. आपल पैसा कमवण्याचं basic objective काय आहे ? ते साध्य होतय का ? आणि ते साध्य झालेवर तरी आपण थांबतो कां ? सुखी होतो कां ? पैसा कमावण्याचं आपल्याला व्यसन तर लाललं नाही नां ?

हिरा माझ्याकडे पाहात होती. माझा न्याय निवाडा ऐकायला उत्सुक होती. मी बोलायला तोंड उघडल पण शब्दच फुटेना, गळा दाटून आला होता. त्या कोमातील कोपर्‍यात कळ आली होती. कसा बसा धीर एकवटून मी तोंड उघडले..

" बाप्या ! हिरा च म्हणन खरच बरोबर आहे. तिच्या लाडक्या घरकुलाला property चा हीन दर्जा देऊन मी त्याच मूल्यांकन पैशात करायला नको होतं. फार मोठी चूक झाली माझी. मला माफ कर. अमूल्य अशा अस्स्ल "हिर्‍या"च जतन करण्या साठी आई अंबाबाईनं निर्मान केलेल कोंदण आहे हे घर ! लाखो builder ओवाळून टाकावेत अस आहे हे तुझ्या लाडक्या सुनेच घरकुल ! ते विक्रीचा जिन्नस होण कदापी शक्य नाही !"

मझ्या या जडावलेल्या शब्दांनी वातावरण गंभीर झाल होत. हिराने मान बाजूला वळउन पदराला गुपचुप डोळे टिपले. तणाव कमी करण्या साठी मी विषय बदलला ......

" बाप्या, खरच तुझी सून सुगरण आहे. खूप दिवसांनी पोट फुटे पर्यंत जेवलो आज. आता तू पुण्याला ये एकदा पोरांना घेउन. "

बाप्याने मान डोलविली. आम्ही घोंगडी वरून उठलो. पडवीच्या कोपर्‍यात उभे राहून हा्त धुतले. तो पर्यंत हिराने पडवीत सुतडा अंथरून त्यावर पितळेचा पानाचा डबा ठेवला होता.
त्या कोमाच्या कोपर्‍यात धडपड वाढायला लागली होती. त्यातून असह्य कळ येण्या पूर्वी मला या वास्तू मधून बाहेर पडण आवश्य्क होतं. तो कोमातील कोपरा जागृत झाला तर माझा मुखवटा गळून पडणार होता. अन अस व्हायला खूप उशीर झाला होता. बाप्या सोबत सुपरी बरोबर चार गोष्टी चघळीत मी निघण्याच्या विषयाला हात घातला ...

" बाप्या, निघतो मी आता. बराच वेळ झाला. महालक्षीच दर्शन घेउन रात्री पर्य़ंत पुण्याला पोहोचायला हवं."

हिरान माझ बोलण मधेच तोड्लं...

" मामंजी ! र्‍हावाकी आता चार दिस ! पैल्यांदाच आलायसा आप्ल्या घरी ! निदान ह्यास्नी भेटून तरी जावा ! तुमचा नातू पन ईल साळतनं आत्ता !"

त्या कोमाच्या कोपर्‍यात हिरान पुन्हा आघात केला होता. त्यातून असह्य कळ निर्माण झाली होती. मी गुदमरून गेलो होतो. ईथून चटकन बाहेर पडण्याच नक्की करून मी उभा रहिलो..

"पोरी ! नको आग्रह करू ! मला आता निघायलाच हवं. घरी सर्वजण वाट पाहात असतील. आता तुम्हीच या सगळे पुण्याला. "

मी चक्क खोटं बोललो होतो. पुण्यात माझी कुणीही वाट पाहाणार नव्हतं. चप्पल घालण्या साठी मी पुढे झाल्याचे पाहून आता मी थांबणार नाही याची हिराला खात्री पटली. चटकन पुढे होउन तिने मला आदबीन नमस्कार केला. मी तृप्त मनाने आशिर्वाद दिला ...

"अखंड सौभाग्यवती भव ! विजयी भव ! सदा सुखी भव ! "

झपझप पावले टाकीत मी कुंपणा बाहेर पडलो. मागे वळून पाहाण्याचे धाडस झाले नाही. डोळ्यात दाबून ठेवलेले अश्रू कुठल्याही क्षणी दगा देणार होते. बाप्या-हिराच्या स्वभावातील पारदर्शकता माझ्यात नव्हती. मी नकळत पणे खोटेपणाचा बुरखा पांघरला होता. त्यांना पुण्याला येण्याच आमंत्रण दिल होत परंतु जाणीव पूर्वक घराचा पत्ता दिला नव्हता. कारण बाप्यान माझ्या घरी यायला मला नको होतं. सत्याला सामोर जायच धाडस माझ्यात नव्हत. सौभाग्य, सुख आणि विजय या तिन्ही गोष्टी हिराला भरभरून मिळाल्या होत्या. मग मी तिला असा आशिर्वाद देऊन काय साधलं होतं? rather हिराला असा आशिर्वाद देण्यास मी लायक होतो कां ? मुळातच स्वतः कडे नाही ते दुसर्‍याला देता येतं कां ?

समोर आलेल्या रिक्षाला हात करून मी सरळ S T Stand गाठले अन पुण्याच्या गाडीत बसलो. पुण्याहून महालक्षीच्या दर्शना साठी आलो अन रस्त्यातच गृहलक्षमीचे दर्शन घेऊन परत निघलो. पुण्याहून निघताना महालक्षीच दर्शन हे objective होतं. प्रत्यक्षात ते बाप्याच्या वास्तू मधून बाहेर पडण्या साठीच कारण ठरलं.

गाडीने कोल्हापुरची वेस ओलांडली होती. मी एकटक खिडकी बाहेर पाहात होतो. अंधार दाटू लागला होता. अजून पांच तासाचा प्रवास. म्हणजे मी रात्री दहा वाजता पुण्याला पोहोचणार होतो. त्या नंतरच्या सर्व activity या machanical स्वरुपाच्या होणार होत्या. pree-deviced plan प्रमाणे मी उतरण्याच्या पूर्वी पांच मिनिटे अगोदर driver ला SMS करणार होतो. ST Stand च्या gate वर driver सिगरेट फुकीत उभा राहाणार होता. यंत्र मानवा प्रमाणे मी ST तून उतरून driver ने आणलेल्या गाडीत बसणार होतो. अर्धी सिगरेट फेकीत driver गाडी start करणार होता. लवकरच त्याची duty संपणार म्हणून मनातले मनात आनंदणार होता. बंगल्याच्या गेट समोर गाडीचा horn वाजलेवर watch man नेहमी सारखा मरगळलेला सँल्यूट ठोकणार होता. gate समोर येण्या पुर्वीच horn देण्याच driver च prime objective हे watch man ला जागं करण, आणि secondary objective हे गेट ऊघडण आहे हे मला पुन्हा एकदा जाणवणार होतं. गाडी आत आलेवर गेट lock करताना watch man सुखावणार होता. कारण आता तो निर्धास्त पणे झोपू शकणार होता.माझ्या वाटयाच्या latch key ने मी दरवाजा उघडणार होतो. driver माझी bag माझ्या bedroom मधे फेकून पसार होणार होता. बंगल्यातील ईतर बंद bedroom पैकी एकही दरवाजा उघडणार नव्हता. पार्किंग मधील मोलकरणीच्या खोलीचा अर्धवट ऊघडा असलेला दरवाजा सुध्दा पूर्ण बंद होणार होता. कारण मला गिळण्या साठी अन्न गरम करून देण्याच टाळायच होत. या बंद दरवाजा मागे किती व्यक्ती हजर आहेत आणि किती व्यक्ती late night party साठी बाहेर आहेत याचा अंदाज फक्त पार्किंग मधील गाडयांच्या संखे वरूनच येणार होता. मी कपडे बदलणार होतो. fresh व्हायच टाळून सरळ डायनिंग टेबलावर जाणार होतो. कामवालीन शिजऊन ठेवलेल थंडगार अन्न गिळण्याची formality उरकणार होतो.तसाच झोपलो तरी त्याचा कुणाला काही फरक पडणार नव्हता. किंबहुना ते कुणाला जाणवणार देखील नव्हतं. family room मधील internal mail box मधे माझ्या साठी माझ्याच बायको-मुलांनी अन सुनांनी ठेवलेले massage वाचणार होतो. त्या नुसार उगवणार्‍या दिवसाच वेळापत्रक ठरविणार होतो. bed room चा दरवाजा बंद करून अजून एक नवीन दिवस उजाडण्याची वाट पाहाणार होतो.

" तो कोमातील कोपरा पुन्हा पूर्ण कोमात जाणार होता !"
" तिथं कसलीही हालचाल जाणवणार नव्हती !
"

ST Driver ने लावलेल्या जबरदस्त ब्रेक नी मी पुढच्या बाकावर आदळून भानावर आलो. पाठोपाठ driver ने मधेच तडमडलेल्या सायकल वाल्याला उद्देशून हासडलेली शिवी पण कानावर आली. गाडीन कराड सोड्लं होतं. लाल डब्याचा प्रवास मला झेपला नव्हता. शरिराचा सांधा-न-सांधा खिळ-खिळा झाला होता. कार नं फिरण्याच व्यसन महागात पडलं होत कि सर्वसामान्य भक्ता प्रमाणे एस.टी. च्या लाल डब्यातूनच प्रवास करायचा हट्ट महागात पडला होता हे माहीत नाही.

बाकाला पाठ टेकीत मी सर्व विचार झटकून टाकीत डोळे मिटले. बाप्या डोळ्या समोरून हटत नव्हता......
प्रवाहाच्या उलट दिशेनं पोहणार्‍या बाप्याला त्याच objective गवसलं होतं.....
तो आज एका अमूल्य "हिर्‍या" चा पालक होता................
माझ्या समोर कायम हार पत्करणार्‍या बाप्यानं आज मला हरवल होतं ! ते हि चारी मुंडया चितपट ! .....
मी हरलो होतो.....
बाप्या जिंकला होता ...
कोमातील कोपरा स्थितप्रज्ञ होता....

---- यशवन्त नवले.
०७-२००७
----------------------------------------------------------------------------------
वाचक मायबाप ! नमस्कार !
चारी मुंड्या चितपट हे फक्त माझ्या चश्म्यातून, मला दिसलेल्या आदर्श समाज व्यवस्थेतील दोन पात्रांना शब्दांकीत करण्याचा एक प्रयत्न आहे. या उपरोक्त काही-काही नाही. - धन्यवाद

गुलमोहर: 

कथा आवडली.. ओघवती आहे..एका दमातच वाचावी अशी!
आज जास्तीत जास्त पैसा कमावण्या साठी प्रत्येक मनुष्य धावतो आहे, धडपडतो आहे तरी सुध्दा त्याची पैशाची भूक भागत नाही. गरज आहे ती एकदा तरी अंतर्मुख होउन स्वतःलाच प्रश्न विचारण्याची. आपल पैसा कमवण्याचं basic objective काय आहे ? ते साध्य होतय का ? आणि ते साध्य झालेवर तरी आपण थांबतो कां ? सुखी होतो कां ? पैसा कमावण्याचं आपल्याला व्यसन तर लाललं नाही नां ?
>> एकदम खरं!
पण मृदुला सारखंच मलाही नाही पटलं की जुनं ते सगळंच चांगलं असतं..
ह. ना आपट्यांच्या सामाजिक कादंबर्‍या वाचल्या की 'आपली संस्कृती' चांगली असं वगैरे काही नाही असं वाटायला लागतं..
हे शेवटी प्रत्येक माणसाच्या maturity वर अवलंबून असतं. त्याची जमीन लाटणारा त्याचा चुलता तर त्याही पेक्षा जुनाच ना?
in fact, आत्ता मी आजुबाजुला जितक्या घरात बघते, तिथे मला सासवा सुनांचं, नणंदाभावजयांचं, दोन साडुंच वगैरे- छान healthy नातं दिसतं - नवरा बायको एकमेकांना किम्मत देतात - खर्‍या अर्थानं 'साहचर्य' अनुभवतात. मुलगी लग्नानंतर "दुसर्‍याची" होत नाही- तर दोन्ही कुटुंब एकत्र येतात - मला तरी ही सगळी एका healthy समाजाची लक्षणं वाटतात.
तुमची कथा चांगली आहे आणि एखाद्याचा अनुभव तुम्ही म्हणता तसा असेलही.
कथेत मुख्य मुद्दा काय वाटला माहितेय मला - "तुम्ही यशाचे समान मापदंड लावू शकत नाही. तुम्हाला यशस्वी दिसणारा प्रत्येकजण यशस्वी असेलच असं नाही आणि उलटंही खरं. म्हणजे, पैसा मिळाला म्हणजे कुणी मोठा होतं नाह, किंवा नाही मिळाला म्हणून लहान होत नाही.
म्हणजे फक्त तुम्हीच ठरवू शकता तुमच्या साठी योग्य काय आहे..." - हे सगळं पटलं म्हणून कथा जास्त आवडली.

खूपच भाबडी कथा. इतकं पण वाईट नसतं सगळीकडे. नऊवार, पितळी भांडी वापरली म्हण्जेच आदर्श झालं का? शहरामधलं आनी गावामधलं रहाणं वेगळवेगळं नाही का? चश्मा बदला.

नऊवार, पितळी भांडी वापरली म्हण्जेच आदर्श झालं का? <<
याच चालीवर...
मुलानं वडील म्हणतील त्या मुलीशी काहीही विचार न करता लग्न करणं,
शिकलेली मुलगी असून घर संसार सांभाळणं,
मामंजी म्हणणं,
कधीही केव्हाही घरी अचानक कोणीही आलं तरी घरच्या बाईनी संपूर्ण स्वैपाक करणं
इत्यादी गोष्टी आदर्श म्हणायच्या असतील तर आदर्श घर नसणंच बरं की.

आणि शहरात एवढ्या बेडरूम्स, इंटर्नल मेल बॉक्स ठेवायला फॅमिली रूम इत्यादी इत्यादी एवढी जागा असलेलं घर म्हणजे गंमतच झाली की..
सासूसासर्‍यांसकट ३-३ भावांचे संसार एकाच खोलीत बिनबोभाट पार पडतात इथे शहरात हे माहीती होतं.
शहरात लोक घरात एकमेकांशी बोलत नाहीत, शहरातल्या लोकांना घरातल्यांच्याबद्दल आपुलकी नसते केवळ कोरडा व्यवहार असतो... इत्यादी assumptions वाचून मला तर गहिवरूनच आलंय.

जुन्या मराठी कथा, कादंबर्‍यांत, सिनेमात कसं एक बाजू चांगली चांगली म्हणजे इतकी चांगली की त्याचाही कंटाळा येईल आणि एक बाजू वा वा वाईट असं असायचं तसं वाटलं.

खरंच चष्मा बदला.

खूपच भाबडी कथा. इतकं पण वाईट नसतं सगळीकडे. नऊवार, पितळी भांडी वापरली म्हण्जेच आदर्श झालं का? शहरामधलं आनी गावामधलं रहाणं वेगळवेगळं नाही का? चश्मा बदला.>>> अनुमोदन!!

माझ्या मनांत एक प्रश्न येऊन गेला. "सुगरण" कुणाला म्हणायचं ?. net वरून गोळा केलेल्या receipe च्या भांडवलावर रुचकर dishes बनऊन, डायनिंग टेबलावर बुफे मांडणार्‍या home minister ला, कि रुचकर पदार्था बरोबर प्रेम, आपुलकी रांधून अथितीला आग्रह पूर्वक पोटभर जेवायला भाग पाडून त्याची शाबासकी मिळवणार्‍या अन्नपूर्णेला ? .अवघड आहे!
>>>> या दोघात फरक काय आहे? नेटवरून रेसीपीज गोळा केलेली होम मिनिस्टर प्रेमाने आपुलकीने आग्रहपूर्वक जेवायला वाढत नाही का?? हे गृहितक कशावरून आलं??

हे जुने ते सर्व चांगले आणि त्याचबरोबर जे नविन आहे ते सर्वच वाईट हे दाखवायचा अट्टहास का?

चालू द्या!!

>खूपच भाबडी कथा.
सहमत. खूप एकांगी कथा.

कथा न आवडणार्‍या लोकांत सगळी मुलींची नावं दिसतायत, म्हणून देणार नव्हतो तरी प्रतिसाद दिला.

आपल्याकडं नसतं ते जास्त आकर्षक वाटतं हे खरंच पण गोष्टीत जरा दोन टोकांचा अतिरेक झालाय.
बाकी कथा म्हणून ठीक आहे.

कथा न आवडणार्‍या लोकांत सगळी मुलींची नावं दिसतायत,<<
हो ना कारण जुनं ते आणि केवळ तेच चांगलं म्हणताना आजकालच्या सुना कश्या चुकीच्या. आणि जुन्या पद्धतीतल्या खालमानेने सगळं करणार्‍या सुनाच कश्या चांगल्या. तश्या सुना असलेले घर चांगले असले फंडे आहेत. हे असलं विकृत उदात्तीकरण कथेतसुद्धा कुठल्याही सेन्सिबल मुलीला डोक्यातच जाईल.

वाचताना मलापण बर्‍याच गोष्टी खटकलेल्या पण जेव्हा शेवट वाचला तेव्हा त्या व्यक्तिच्या दृष्टीनेच गोष्ट गेल्ये अस वाटुन गोष्ट आवडली.. शहरातील त्याचे राहणीमान जेव्हा कळले तेव्हा त्याला त्याच्या मित्राकडचे प्रसंग नक्किच आदर्श वाटले असतिल अस वाटले. प्रसंग थोडे अति आहेत हे नक्किच Happy
कथा म्हणुन चांगली लिहिलीये.
बाकि गोष्टीतला नायकाला एखादी गोष्ट अशी वाटते म्हणुन ती तशीच असावी अस काही नाहिये. Happy शेवटी ती एक कथा आहे.

तुमची शैली सुंदरच आहे, यशवन्त. एकसंध धारेसारखी कथा वाहती राहिली आहे.
आपल्यातल्या "मी"ला कोमात ठेवलेल्या एका कंन्फ्यूज्ड सोलची ही टिपिकल कथा...
चांगली उतरलीये.

नी ला अनुमोदन!!खूप एकांगी कथा वाटली.. जुनं ते सार सोनं आणी नवीन ते सर्व टाकाऊ हे म्हणणे अजिबात पटले नाही.. टोकाच्या दोन फॅमिलीज च वर्णन वाटलं.चश्मा बदला.>>> अनुमोदन!!
नव्या जुन्या गोष्टींमधे कंपॅरिझन करताकरता गोष्टीचा मुळ हेतू हरवल्यासारखा वाटला..

कथा छान आहे... पण कोल्हापुरात स्टॅन्डपासून पाच मिनिटांच्या अंतरावर 'असले' घर असेल असे वाटत नाही... ग्रॅजुएट झालेली मुलगी नऊवारी घालून घरात बसेल आणि सासर्‍याने हाक मारल्यावर उंबर्‍यातून जरा बाहेर येऊन पुन्हा आत सरकून पदर घेणारी असेल, असे वाटत नाही. ( जयश्री गडकर तुम्हाला फार आवडते का? Happy ) हल्लीच्या बायका कानावर पदर घेत नाहीत ..( न्हाईतर मंग स्त्रीमुक्तीचं वारं कानात शिरणार कसं? Proud ) कथा मात्र छानच आहे...

कथेत आदर्श घराची कल्पना टोकाची वाटू शकते खरी . पण इथे काही प्रतिक्रिया पण तेवढ्याच टोकाच्या नाहीत का?
जसे :
शिकलेली मुलगी असून घर संसार सांभाळणं,
मामंजी म्हणणं,
कधीही केव्हाही घरी अचानक कोणीही आलं तरी घरच्या बाईनी संपूर्ण स्वैपाक करणं
इत्यादी गोष्टी आदर्श म्हणायच्या असतील तर आदर्श घर नसणंच बरं की.
>>>> हे का बरं, शिकलेल्या एखाद्या बाईने घर संसार सांभाळणं चूक आहे का? की घरी अचानक आलेल्याला जेवायला बसा म्हणणं चूक आहे?
मला असं म्हणायचंय की "वरील गोष्टी जे करतात ते चांगले अन करत नाहीत ते वाईट " हे गृहितक जसे चूक तसंच "हे सर्व करणारे घर असण्यापेक्षा नसलेले बरे" हे म्हणणं पण तेवढंच चूक ना?

इथे कुठे म्हटलंय की शहरातले , आधुनिक सगळेच वाईट म्हणून? मला ही कथा "एखाद्या शहरी , पण मुळात गावाकडचा पिंड असलेल्या आणि आता यशस्वी , श्रीमंत असून मनातून कुठेतरी काहीतरी हरवलेल्या त्या माणसाला त्या गावाकडच्या घरात गेल्यावर "काय हरवले" ते सापडणे अन त्यातून आलेली हताश भावना अशी वाटली. आता कुणाला काय हवंसं वाटेल हे आपण कसं ठरवणार? त्या माणसाला तेच आदर्श वाटत असेल, कौलारू घर, डोक्यावरून पदर घेणारी सून, घराला देऊळ मानणारी माणसं वगैरे! त्याल जे हवं ते बहुधा त्याला काहीही केलं तरी मिळणार नाहिये अन त्याच्याकडे जे आत्त्ता आहे (पैसा, मोठं घर, शहरी आयुष्य इ.) ते नसेल त्याच्या मते आदर्श.. शक्य आहे की हे. (असं मला तरी वाटलं!)

Pages