लाईफ इन चायना

Submitted by वर्षू. on 4 December, 2009 - 02:15

मला ताज्या भाजी च्या बाजारात सकाळी सकाळी जायला फार आवडते. लहानपणी नेहमी आजोबांबरोबर आम्ही जात असू. तेव्हापासून ताज्या भाज्यांची पारख झाली आणी कोणत्याही देशात गेलो तर सकाळी उठून त्यांच्या भाजीबाजारात एक चक्कर टाकण्याचा छंद जडला.
चायना चा बाजार मात्र आपल्यापेक्षा अगदी वेगळा आणी अतिशय स्वच्छ. सकाळी 4 पासून गडबड सुरु होते. इथे कमीतकमी 20,25 प्रकारच्या हिरव्या भाज्या दिसतात्,15 प्रकारचे मशरूम्स आणी सर्व फळ भाज्या मिळतात. गंमत म्हणजे कधी कधी कार्ली ,दुधी पेक्षा लांब असतात आणी हिरवी मिर्ची ची लांबी 10 इंच भरते. ताज्या भाज्यांसोबत सुरेख फळे असतात. इकडच्या सारख्या चेरी ,पीचेस मला इतर कोठेही आढळले नाहीत अजून.
एकीकडे कोंबड्या,तीतर, रानकोंबड्या,ससे,कबुतर यांचा कलकलाट सुरु असतो, तर दुसरीकडे एखाद्या छोट्या हौदात विविध प्रकारचे मासे शांतपणे पोहत असतात, . एका मोठ्याशा बादलीत धड्पडणारे खेकडे,बेडूक आणी कासवे दिसतात. पण एख़ाद्या कोप्र्यात बारीक जाळी च्या पिंजर्यात छोटे मोठे विंचू आणी कुठे मुंग्यांची अंडी सुद्धा विकायला असतात. इथे लोकल रेस्टॉरेंट्स मधे रेशमाच्या किड्यांच्या कोषातून रेशीम काढून झाले कि उरलेले किडे छान,कुरकुरीत तळून खूप मीठ,तिखट,मसाला लावून स्नॅक्स म्हणून देतात.इथे लोक कोंबड्यां ची पिसे सोडून (म्हणजे ती खरीच खाता येत नाहीत म्हणून..) बाकीचे सर्व (म्हणजे एकूणएक) भाग खातात.तसे ते इतर प्राण्यांचे ही सर्व भाग आवडीने मट्ट करतात. मी या बाबतीत माझ्या चायनीज मैत्रीणींना विचारले तेंव्हा समजले कि हा भाग खूप खूप वर्षांपूर्वी अगदी बकाल होता आणी गुंड,गुन्हेगार लोकांना शिक्षा म्हणून इकडे सोडून देत. त्यामुळे ते लोक ,जे दिसेल ते खाऊन राहू लागले. म्हणून इथे असे म्हणतात कि ज्या कोणा प्राण्याची पाठ सूर्या कडे बघते ते सर्व खाण्यालायक आहे.
इथली सुपरमार्केट्स लोकल पदार्थांनी भरलेली असतात.मात्र इंपोर्टेड वस्तू फार कमी दिसतात.असल्यास भरमसाठ किमती असतात. इथेही लाइव्ह मासे,कोळंबी, खेकडे,कासवे असतातच. थंडीच्या दिवसात ताज्या मटणा बरोबर कुत्री, सुकवलेले साप इ. प्राणीही दिसून येतात .
वर्णन वाचून इथल्या फूड बद्दल भलत्याच कल्पना होऊ नयेत म्हणून आवर्जून सांगीन कि सिचुवान,हूनान इ. प्रांतातील जेवण अत्यंत चवदार, चमचमीत तिखट असते. हिरव्या भाज्यांचा आणी मांसाचा सुरेख बॅलेंस असतो. येथील लोक नुसतेच मांसाहारी नाहीत. प्रत्येक जेवणात भरपूर भाज्या हव्यातच.भाज्याही स्टर फ्राय केलेल्या, थोड्याशा कच्चटच. नुसते मीठ, बारीक कापलेले आलं लसूण,बस्. इतकच. पण काय छान लागतात.अगदी केल्या केल्या खायच्या.
चायनीज लिपी ही मजेशीर आहे. इथल्या बावीस प्रांतांमधे अनेक भाषा बोलल्या जातात, लिपी मात्र एकच. चित्रलिपी असल्यामुळे जर झाडाचे एक विशिष्ट सिंबल असेल,तर जो तो आपापल्या भाषेत झाडाचा तो तो पर्यायवाची शब्द वाचेल, पण शब्दाचा मूळ अर्थ बदलत नाही. जसे कुणी झाड,तर कुणी पेड ,आणखी कुणी ट्री अस उच्चार करील पण झाड हे झाडच राहील. लिपीच्या या गंमती मुळे संपूर्ण चायनातील माणसे आपसात लिहून आपला विचार स्पष्ट करू शकतात.वेग वेगळ्या प्रांतांच्या भाषा नाही आल्या तरी यांचे त्यावाचून काही अडत नाही.
विशेष म्हणजे इकडे 100% साक्षरता आहे.
या लोकांना लिहून समजावयाची इतकी सवय आहे कि कधी कधी एखादा टॅक्सीवाला आपल्याला जर त्याचे बोलणे समजले नाही तर भराभरा कागदावर लिपी काढू लागतो .तेंव्हा मात्र हसू अनावर होते ,कारण त्यानी कितीही जीव तोडून लिहिले तरी आपल्यासाठी ते अगम्यच असते.मी पण युनिवर्सिटी मधे बोलण्याबरोबर,थोडे थोडे लिहिण्याचा ही प्रयत्न केला. 200,300 शब्द काढायला शिकलेही .पण लिटरेट म्हणवायला साडे तीन हजार शब्द शिकायची गरज आहे,ते ऐकून लिहिण्याचा उत्साह मावळला.आणी रोजच्या व्यवहारातले थोडे थोडे शब्द लिहिता ,वाचता येतात यावरच समाधान मानले. पण स्पोकन मॅंडरीन मधे वर्गात प्रथम येण्याचा मान मिळवला आणी आपल्याला कोणत्याही भाषेचे उच्चार स्पष्ट करता येतात या करता आपल्या भाषेचा बेस असलेल्या संस्कृत चे मनःपूर्वक आभार मानले.
आम्ही इकडे आल्या आल्या एका एजंसी मधून घरकामासाठी एक मुलगी आली. तिचे नाव ' येन' होते. मेड जर वयाने थोडी मोठी असेल तर तिला आदरातीर्थ चक्क आई म्हणतात. त्यामुळे जेंव्हा माझी आई माझ्याकडे आली तेंव्हा मी तिला आई हाक मारते हे पाहून 'येन' पार गोंधळात पडली बिचारी! आणी 'येन' ला इंग्लिश येते असे एजंसी ने सांगितल्यामुळे आम्ही जरा खुषीत होतो ,पण एका तासातच कळले कि तिचे इंग्लिश " गुल मॉलिग (गुड मॉर्निंग) आणी पाय पाय( बाय बाय ) या दोन शब्दांतच संपत होते. तिला मी इंग्लिश शिकवायचा आटोकाट प्रयत्न केला पण तिला ड,द, र,ल,न चा उच्चार कधीही जमला नाही ,आणी जोडाक्षरे तर ... जाऊ दे!! त्यांचा मी उच्चारच केला नाही तर बरे!!
पण एक अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे या लोकांची. वर्क कल्चर जबर्दस्त आहे.ऑफिस तर सोडा, पण साधी घरकामवाली सुद्धा सकाळी कामावर यायची वेळ साडे आठ ची असली तर बरोबर साडे आठ ला बेल वाजणारच. इतक्या वर्षात एकदाही खंड नाही.उलट कधीतरी पाच मिनिटे जरी उशीर झाला तरी दहा वेळा सॉरी म्हणणार.२०० डॉलर पगार,जेवण,9 तास काम, महिन्यातून 2 दिवस सुट्टी बास्! एवढ्यावर खूष असतात. मधे कुठल्या कुठल्या सणांनिमित्त सुट्ट्या नाहीत कि खोट्या कारणांनी बुट्ट्या नाहीत.
येन ला आता पुष्कळच जमतो आपला स्वैपाक. पण तिला डाळींची नावे अजिबात लक्षात येत नाहीत. मग मी एक युक्ती केली . सर्व डाळींच्या डब्यांवर ए,बी,सी प्रमाणे लेटर्स चिकटवले आणी आपल्या सतराशे मसाल्यांना 1,2 3 असे नंबर दिले. त्यामुळे तिला तिच्या वहीत रेसिपी लिहायला सोपे झाले आणी कठीण नावे शिकण्याची शिक्षा वाचली.
असे अनेक उपाय करून आम्ही आमचे येथील जीवन सुकर केले आहे..

गुलमोहर: 

छान आहे लेख! सहा महिन्यांपुर्वी चायना ला धावती का होइना भेट देऊन गेल्यामुळे चित्रं आलं डोळ्यासमोर.

छानच लेख... मस्त Happy , अजुन लिहा..

तिला ड,द, र,ल,न चा उच्चार कधीही जमला नाही >>
होय.. चायनीज लोकाना र उच्चार जमत नाही.. आणि जपानीज लोकाना ल.. ट चा त, ड चा द करतात :फिदी:, जपानीज बोलताना चिनी लोक.. अलिगतो गोजैमस (Thank you, म्हणतात,,)
एकूणात काय.. आपली संस्कृत हीच संपूर्ण भाषा Happy

कागदावर लिपी काढू लागतो >>
हा चिनी-जपानी लोकाचा कॉमन गुण आहे... त्याना लक्षात ठेवायची सवयच नाही.. प्रत्येक गोष्ट नोट करुन.. चित्र काढून सांगतात.. प्रत्येकाकडे त्या Post-it चिठ्ठया असतातच..

वर्षू, तू तिथे निरक्षर का ग? Wink
तिथेही ह्या चित्रलिपीला कांजी म्हणतात की आणखीन काही वेगळं नाव आहे? मँडरिन शिकायला जॅपनीज पेक्षाही कठीण आहे असं माझं मत. जॅपनीज मध्ये कांजीच्या जोडीला हिरागाना, काताकाना येतं त्यामुळे सतत कांज्या वाचण्यापासून थोडा रिलिफ मिळतो Proud पण तुमच्याइथे असं काही नाही. त्यामुळेच की काय चायनीज लोकांना जॅपनीज शिकणं म्हणजे डाव्या हाताचा मळ. माझ्याबरोबर शिकायला ज्या २,३ चायनीज मुली होत्या त्या क्लासला आल्या त्याच मुळी Intermediate लेव्हलवर.
बाकी वर्क कल्चर, भाज्या बिज्यांशी सहमत एकदम. एकदम वक्तशीरपणा आहे ह्या लोकांच्या अंगी.

नी हाव वर्षु नील ,
सोललेले कुत्रे आणि बकरे शेजारी शेजारी टांगल्यावर ओळखता येतात का हो Proud
छान लिहीलयं .

छान ओळख करुन दिलीत तिथली..

सुर्याकडे पाठ दाखवणार काहीही खातात ह्यावरुन मी विचार करत्ये कि एकतरी प्राणी आहे का कि जो सुटलाय? Happy

मस्त लेख !
अजून खूप लिहा चायनाबद्दल, तिथल्या लोकांबद्दल ... वाचायची उत्सुकता आहे Happy
खाद्य संस्कॄतीबद्दल अजून थोडं विस्ताराने लिहा ना. भारतीय माणूस चायनी़ज हॉटेलमध्ये गेल्यावर काय काय खाऊ शकतो, गोड पदार्थ कुठले कुठले असतात, ब्रेडच्या जागी पर्याय म्हणून अजून काही रोटीसारखा पदार्थ असतो का वगैरे वगैरे.

ब्रेडच्या जागी पर्याय म्हणून अजून काही रोटीसारखा पदार्थ असतो का वगैरे वगैरे.>>>> माझ्यामते नसावा. बाकी काय ते वर्षू सांगेलच. जपानमध्येही रोटी, ब्रेड हे पदार्थ रोजच्या जेवणात नाहीतच. सकाळी उठल्या उठल्या एक बोलभर गरम गरम चिकट भात खायचा. बरोबर स्टर फ्राय टाईप काहीतरी आणि मिसो सूप प्यायचं. जोडीला ग्रीन टी हवाच. हा झाला ट्रॅडीशनल ब्रेफा. अजूनही ८०% लोकं हे खातातच.
सॉरी वर्षू, तुझ्या लेखावर आक्रमण केलं.

मस्त ओळख झाली चायनाची! सायोचा छोटासा जपानी ब्रेफा इन्फो आवडला.
अमृताला अनुमोदन. मीही विचार करायला लागले सुर्याकडे पोट दाखवत चालणारा प्राणी आहे का कोणता, other than man.

धन्यवाद सर्व वाचकांचे .. कांजी चं ओरिजिन चीनच आहे .पाचव्या शतकात जपान ने कांजी उचलली कारण त्यांच्याकडे त्यांची स्वतःची भाषाच नव्हती. आता जपान वेगवेगळ्या पद्ध्ती आत्मसात करत आहे आणी मुळचे चायनीज कॅरेक्टर्स हळूहळू जॅपनीज मधून गळत आहेत्..तरी इतक्या लवकर गायब नाही होणार म्हणा.. खर्रर्र्च म्या हिकडे निरक्सरच आहे गं..फकस्त मेट्रो स्टेशन्च्या आणी बस टर्मिनलच्या वर पाट्या वाचता येतात ..माझ्याही बरोबर युनिवर्सिटी मधे कोरिअन मुलांना कान्जी छान लिवता यायची..ते म्हणत त्यांच्या देशातील ही अ‍ॅन्शन्ट भाषा आहे..पण त्या सर्वांना बोलायला मात्र भारी त्रास पडायचा तेन्व्हा अन्धो मे काना राजा बनून कन्वर्सेशन मधे पहिली आले.. Proud
श्री.. कुत्रा आणी बकरीच्या फेस मधे फरक असल्यामुळे ओळखायला येतात.. हां जर तुकडे करून ठेवले तर मात्र नाही रे ओळखता येणार्..आजच सुपर मधे एक छान रोस्टेड प्रकार पाहिला..घेउ म्हणता आधी विचारल काय आहे म्हणून.. बर झालं नाही घेतलं .. रोस्टेड पिग टंग होती की..
ब्रेड ,रोटी काही नाही जेवणात .हां बेकर्यांमधे विविध प्रकारचे बन्स,ब्रेड ची रेलचेल असते.. स्नॅक्स,ब्रेकफास्ट ला लोकं खात असतात..
सायो..आक्रमण कसलं त्यात .. सर्वांना गंमतच वाटते काहीतरी नवीन माहिती वाचायला.. बरोबर आहे तुझं.. जपानला २ वर्षांऊर्वी गेले होते तेन्व्हा पाहिलं होतं..

मस्तच लिहिलाय लेख. आधी कुठेतरी वाचला होता, पण पुन्हा वाचावासा वाटला.

चायनीज संस्कृतीशी तोंडओळख चायनीज कुटुंबांबरोबर घर शेअर केलं तेवढीच. त्यांच्या इतकं शिस्तबध्द आयुष्य आणि डिसिप्लिन्ड खाणं पिणं इतर कुठे बघितलं नाही.

हां.. भारतीय माणसाला जर तो नॉन्व्हेज खात असेल तर चिकन,लॅम्ब, सी फूड म्हण्जे मासे,प्रॉन्स इ. आरामात मिळेल.. व्हेज जरा त्रास्..कारण कोणत्याही भाजीत पोर्क मिन्स किन्वा सुके प्रॉन्स घातले तरी त्यांच्या मते ते व्हेजच असते..आता थोडा बदल दिसू लागलाय ,पण फक्त मोठ्या शहरातून.. जी एका हाताच्या बोटावर मोजण्यासारखी आहेत.. तिकडे भाज्या,तोफू चे प्रकार शुद्ध शाकाहारी मिळतात

कुत्रा आणी बकरीच्या फेस मधे फरक असल्यामुळे ओळखायला येतात.. >>> मला तर सुरुवातीला फरकचं जाणवला नव्हता , नंतर जास्त लक्षपुर्वक पाहील्या वर समजलं होतं Proud

ट्रॅव्हल चॅनलवर अँड्र्यु झिमर्नचा बिझार फूडस पहात जा. डुकराची रोस्टेड टंग म्हणजे एकदम फुस्स वाटेल तुला.
हा माणूस काहीही खातो/खाऊ शकतो नी पचवू शकतो.
वाचकांच्या विनंतीला मान देऊन आणखीन लिहिण्याचे करावे. Happy

प्रतिक्रिया देणार्या सर्वांचे मनःपूवर्क आभार्..कल्पु क्रमशः नव्हते गं कंप्लीटच आहे.. पण अजून कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला इकडल्या जाणून घ्याव्याशा वाटतात त्या त्या मला प्लीज सजेस्ट करत राहा..मग मी तुम्हाला पाहिजे ती माहिती आपल्या सामर्थ्यानुसार पुरवीन..हो..काही गोड पदार्थांची माहिती हवी होती ना..उद्या वेळ मिळाला कि आधी बाजारात हिंडून त्या गमतीदार चायनीज डेझर्टस चे फोटो काढीन्..मग फोटोबरोबर वाचायला अजून गम्मत येईल

छान लिहिलय ... एकंदर माझ्या सारख्या चिकट शाकाहारी प्राण्याला चायना मध्ये रहाण म्हणजे कठीणच होईल... माझे तर इथे अमेरिकेत हि हाल होतात खाण्याचे Sad Proud

मस्त लेख वर्षू...
नुकताच माझा मामा चायना ट्रिप करून आला. त्याच्याकडून ऐकून आणि तू लिहिलंयस ते वाचून चायना ट्रीप एकदा तरी आयुष्यात करायला हवी असं वाटायला लागलंय.
ते शाकाहाराचं मात्र काय करायचं बघूया. Happy

बाकी सास अमेरीकेत शाकाहारी असण्यामुळे हाल होतात हे माझ्यासाठी तरी अनाकलनीय आहे.

अमेरिकेत शाकाहारी असण्यामुळे हाल होतात >>> हे बर्‍याच जणांना अनाकलनीय आहे :)..... ज्यांना जैन धर्मा बद्दल माहिती आहे त्यांना कदाचित अडचण कळेल आणि मी हे मुख्यता बाहेर जाऊन खाण्या बाबत म्हटल , मला घरात बनवुनच खाव लागत स्वयंपाकाला सुट्टी नाही Sad ...मी पिझ्झा हट मध्ये वै. जात नाही ...जीथे नॉन व्हेज मीळत त्या कुठल्याच रेस्टॉरंट मध्ये जात नाही ..... ... बरेच जण सल्ला देतात अ‍ॅडजस्ट कराव लागत पण मला केवळ खाण्या साठी म्हणुन मीक्स हॉटेलात जाण पटत नाही आणि त्यात मला काही अ‍ॅडजस्टमेन्ट हि वाटत नाही ... शाकाहारी हॉटेल नाही म्हणुन मीक्स हॉटेलात जाऊन खा, पण बाहेर खा ह्यात काय आलीय Adjustment (अस माझ मत) ... बाहेर कुठेहि जायच असल कि मला भरपुर स्वयंपाक करावा लागतो सोबत डबा घेऊन जाण्यासाठी हे हाल Proud

सुंदर लेख.
पण एकाच लेखावर थांबवू नकोस. नुसती खाद्यसंस्कृतीच नाही, तर परदेशातल्या अनेक गोष्टी उल्लेखनीय, आधी कधीही न पाहीलेल्या म्हणूनच अद्भूतरम्य वाटणार्‍या असतात. त्या सर्वांबद्दल लिही. वाचायला प्रचंड आवडेल. Happy

वर्षू, तुम्ही मँडेरीन भाषेवर काही अधिक लिहिलंत तर मला वाचायला आवडेल. त्यात भाषेतील गंमतीदार शब्द/वाक्प्रचार, उच्चार, कांजींची तोंडओळख, तुमचे युनिव्हर्सिटीतील मँडेरीन शिकतानाचे अनुभव वगैरे असलं तर आवडेल.
आणखी तिथले मुख्य सण, साजरा करण्याची पद्धत, त्यानिमित्ताने केले जाणारे पोशाख इ.विषयीही वाचायला आवडेल.
तुम्ही सजेस्ट करा म्हणालात म्हणून पडत्या फळाची आज्ञा घेतली Happy

वर्षा, जमलं तर चायनीज शिक्षण पद्धतीवर पण लिहा. म्हणजे कसे कोर्सेस असतात, काय विषय असतात वगैरे वगैरे.. Happy

आमच्या ऑफिसमधले एक जण चायनाला गेले होते. त्याची इन हाऊस जर्नलला मुलाखत घ्यायची होती की तिथलं वर्क कल्चर कसं आहे? मुलाखत संपल्यावर सहज मी तिथल्या रहाण्याबद्दल जेवणाबद्दल. त्यानी सांगितलेली माहिती इतकी इंटरेस्टिंग होती (ते शुद्ध शाकाहारी) की मी ती वर्क कल्चरवाली मुलाखत सोडून त्याच्या या जेवणावरच्या माहितीवरच मुलाखत बनवली Proud बिचारे "असुदे" म्हणून जे काय चिवडा लाडू नेलं होतं त्यावर दिवस काढावे लागले. Happy

वर्षू, अगं ते बिगेस्ट रेस्टॉरंट इन द वर्ल्ड तुमच्या आसपासच आहे का कुठे? त्यावर दाखवलेली डॉक्यु. बघून थक्क झाले.
चक्क तळलेला पण जीव असणारा मासा आणी हलत असणारे सापाचे तुकडे गोलाकार प्लेटमध्ये मांडून सर्व केलेले दाखवले. हे पदार्थ सर्व करताना जर त्यांची हालचाल होत नसेल तर लोकं पैसे देत नाहीत म्हणे.

चायनीज माणसांशी कधी व्यक्तीशः संबंध आला नाही. पण त्यांच्याशी फोनवर कैक वेळा बोललोय. त्या अर्ध्या तासाच्या संभाषणानंतर शेवटी मी मेल पाठवायचो आणि आलेल्या उत्तरामुळे नाईलाजाने पुन्हा फोन करावा लागायचा. चायनीज, थाय, फिलीपिनी अशा लोकांशी इंग्रजी बोलल्यावर मला माझं इंग्रजी अप्रतिम असल्याचा साक्षात्कार झाला होता.
जपानी माणसांशी एका प्रोजेक्टमुळे संबंध आला होता. तीन महीने फोनवर बोलणं आणि मेलव्यवहार चालला होता. नेहमी मोजून दोन माणसं बोलायची आणि तिसरा एकजण मेल पाठवायचा. एकदा सहज म्हणून त्यांना त्यांच्या कंपनीतील माणसाची संख्या विचारली. उत्तर आलं, एकूण तीन. यात एक प्रेसिडंट, एक व्हाइस प्रेसिडंट आणि तिसरा फायनान्स कंट्रोलर. एका पॉवर कंपनीचा हा प्रकल्प होता कुवेतचा आणि प्रोडक्शन होत पुण्याच्या थर्मॅक्स कंपनीचं. आम्हाला पेमेंट मिळालं तीन माणसांच्या जापनीज कंपनीकडून. त्यानंतर एका दुसर्‍या प्रोजेक्टसाठी ते भारतात आले होते. तेव्हा त्यांना भेटलो होतो. टिपीकल कृश शरीरयष्टी असलेल जापनीज. सोबत एक दुभाषी. ती भारतीय होती. दुर्दैवाने त्यां दुभाषीच नाव आता आठवत नाही. पण त्याचं 'जापनीज' आमच्यापेक्षा चांगल आहे, अस सर्टीफिकेट ते जापनीज जाताना देऊन गेले.
विषय निघाला म्हणून वर्षूच्या लेखात घातलेली भर. चायना आणि चायनीज याबद्दल अजून वाचायला नक्कीच आवडेल वर्षू.

Pages