स्नोई

Submitted by झुलेलाल on 2 December, 2009 - 23:40

लोकसत्ता'च्या व्हिवा पुरवणीत (३ डिसें.०९) माझ्या नववीतल्या, इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलीचा- सलोनीचा- हा लेख प्रसिध्द झालाय.)
गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी आणि माझी बहीण-विदिशा- आम्ही दोघंही आई-बाबांच्या अगदी मागे लागलो होतो. एक छानसं कुत्र्याचं पिल्लू घरी आणा म्हणून. शेवटी, सहा-सात महिन्यांपूर्वी बाबांनी तळहातावर धरून एक पपी आणला. जापनीज स्पिट्झ जातीचा.. पांढराशुभ्र.. गोड.. गुबगुबीत, एवढय़ाशा, काळ्याभोर डोळ्यांचा, गुलाबी नाकाचा आणि मऊमऊ तळव्यांचा.. आम्ही लगेच त्याला नाव दिलं स्नोई. जेमतेम महिनाभराचा इवलासा तो गोड जीव, तळहातावर उचलून धरला की आपल्या बटनाएवढय़ा डोळ्यांनी आमच्याकडे पाहायचा, आणि आपोआपच त्याचं कौतुक सुरू व्हायचं. घरी आल्यावर पहिले दोन-तीन दिवस तो खूपच शांत होता. पण नंतर जसजसा तो घरात, आमच्यात रुळत गेला तसतसा तो मस्तीखोर होत गेला. सुरुवातीला त्याला बोललेलं काहीच कळत नव्हतं. हळूहळू त्याला समजायला लागलं. पहिला शब्द जो त्याला कळला, तो ‘मंम्म’ होता. एका काचेच्या बशीतून आम्ही त्याला सेरेलॅक द्यायचो. त्या बशीचा नुसता आवाज आला, तरी तो असेल तिथून धावत येऊन बघायचा. आपल्यासाठी काही खायला तर ठेवलेलं नाही ना.. बशीत काही दिसलं नाही की पुन्हा निमूटपणे आपल्या ठरलेल्या जागी टेबल किंवा सोफ्याखालच्या कोपऱ्यात बसून राहायचा.
काही दिवसांनंतर त्याला आणखी एक शब्द कळायला लागला. ‘भूर चला!’
असं म्हटलं, की त्याची धांदल सुरू व्हायची.. मान उंचावून वर पाहात सोबतीनं पावलं टाकत तो घरभर आमच्याबरोबर चालत राहायचा. बाहेर जाण्यासाठी कुणी तयारी करायला लागलं की त्याची अगदी तारांबळ उडायची. मग पट्टा शोधायची पळापळ सुरू व्हायची.. पट्टा शोधत तो घराचा कानाकोपरा धुंडाळायचा.. ‘इथे बघू या’.. म्हणत आम्ही जिथंजिथं बोट दाखवू, तिथंतिथं वाकून बघायचा आणि दिसला नाही की बिचाऱ्यासारखं आमच्याकडे बघत राहायचा.. आम्ही पट्टा शोधणारच, हे त्याला माहीत असायचं. मग तो शांत उभा राहायचा, गळ्यात पट्टा अडकवून घेण्यासाठी. पण हे फक्त बाहेर जायची खात्री असेल तर. नाहीतर, घरात असतानाही आपल्या गळ्यात पट्टा अडकवतोय असं लक्षात आलं की तो अशा जागी जाऊन गंमत बघत बसायचा की, आमचा हातदेखील तिथे पोहोचणार नाही.
Picture 006.jpg
आता तो मोठा होतोय. त्याला सगळं समजतंय. आम्ही त्याच्याशी मराठीतच बोलतो.. त्याला फक्त बोलता येत नाही. पण आम्ही त्याच्याशी बोलतो. कारण त्याला सगळं समजतं. खूप वेळा तो अगदी शहाण्यासारखं वागतो. पण प्रत्येकानं घरी येताच आधी आपलं कौतुक केलंच पाहिजे, असा त्याचा हट्ट असतो. आई-बाबा किंवा मी आणि विदिशा कुणीही अगदी एक मिनिटासाठी बाहेर जाऊन घरात परतलं, की शेपटीसकट सगळं अंग हलवत कान पाडून तो कुरकुरायला लागतो.. तेव्हा त्याची पळापळ बघण्यासारखी असते आणि शेजारी बसताच शांत होतो. मग त्याच्या गुबगुबीत, केसाळ पाठीवरून बोटं फिरवताना आमचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो.
कधी कधी सगळेजण घरात असताना दरवाजाची बेल वाजते आणि त्याचा अवतार बदलतो. घराची जबाबदारी जणू आपल्यावरच आहे, अशा थाटात तो दरवाजाशी जाऊन गुरगुरायला लागतो. दरवाजा उघडेपर्यंत त्याचं भुंकणंही सुरू झालेलं असतं. बाहेर कुणीतरी पाहुणा, अनोळखी माणूस उभा असला की त्याचं भुंकणं वाढतं. मग त्याला उचलून घ्यावं लागतं. ‘कोण आहे बघू या’, असं म्हटलं, तर तो उचलू देतो. नाहीतर, उचलण्याचा प्रयत्न करणं, त्याला तसं पसंत नसतं. मग तो पाहुणा घरात असेपर्यंत एकदा तरी त्यानं आपल्याशी खेळावं, असा याचा हट्ट सुरू होतो. तेव्हा त्याला दुसरं काहीच सुचत नसतं.. पाहुण्याकडे डोळे लावून शेपटी हलवत आणि घशातून कुरकुरण्याचा आवाज काढत तो पाहुण्याकडे पोहोचायची धडपड करत असतो. पण सगळ्याच पाहुण्यांना कुत्री आवडतात असं नसतं. मग आम्हालाच कसंतरी होतं. गळ्यात पट्टा बांधून आम्ही त्याला आतल्या खोलीत घेऊन जातो. पाहुणा बाहेर असेपर्यंत त्याचं मात्र कशातच मन रमत नाही.
आमचा स्नोई आता आठ महिन्यांचा आहे. घरी आणला तेव्हा तो एकच महिन्याचा होता. कुत्र्याच्या पिल्लाचं सगळं अगदी लहान मुलासारखंच असतं. तो घरात आल्यापासून सात महिने कसे गेले ते कळलंच नाही. आता तो आमच्यात एवढा रमला की घरातल्या सगळ्यांना तो ओळखतो. घरातली सगळीच माणसं त्याला खूप आवडतात. तो शहाण्यासारखा वागतो, पण कधीकधी मस्ती करतोच. त्यानं आम्हाला एवढा जीव लावलाय की, त्याच्याशिवाय आम्हा कुणालाच करमत नाही.
त्याच्या मस्तीखोरपणाची खात्री महिनाभरापूर्वी आम्हाला पटली. आई आणि बाबा कुठेतरी बाहेर जात होते. तो बेडरूममध्ये कपाटाजवळच्या कोपऱ्यात शांत बसला होता. सकाळची वेळ होती. त्याची बाहेरची चक्कर झाली होती. नेहमी तर फिरायला जाऊन आल्यावर तो दोन-तीन तास मस्त झोपतो. पण त्या दिवशी आई-बाबांनी दार उघडलं आणि स्नोई पळत बाहेर आला. काही कळायच्या आत दरवाजाच्या एवढय़ाशा फटीतून बाहेर पळून जिने उतरू लागला. बाबाही त्याच्या मागे पळाले आणि स्नोईनं मागे वळून पाहिलं. बाबा पाठी आहेत अशी खात्री होताच, आता फिरायला जायचंय, असंच त्याला वाटलं असावं. तो जिने उतरू लागला आणि खाली उतरून मोकळेपणानं धावत सुटला. अख्ख्या बिल्डिंगला फेऱ्या मारल्या. झाडांवरचे कावळे, पक्षी, खाली उन्हात बसलेली मांजरं, सगळ्यांच्या मागे स्नोई धावत होता. त्या सगळ्यांची नुसती पळापळ झाली. पुन्हा दोन-तीन दिवसांनंतर तो असाच बाहेर पळाला आणि फिरून आला. स्नोईला त्या दिवशी घरात आणलं, तेव्हा तो इतका शांत होता की हाच तो मस्तीखोर स्नोई, असं त्याच्याकडे बघून कुणालाही वाटलं नसतं.
स्नोईनं आम्हाला अगदी जीव लावला आहे. त्याला काही झालं, की आम्हाला फारच वाईट वाटतं. मागं तो अगदी लहान दोन-तीन महिन्यांचा होता, तेव्हा बेडवर शांत झोपला होता. आसपास कुणीच नव्हतं. अचानक आम्हाला त्याच्या ओरडण्याचा आवाज आला आणि आम्ही आत धावलो. स्नोई खाली जमिनीवर पडला होता आणि कुरकुरत होता. आम्ही त्याला उचलून घेतलं. विदिशाला तर रडूच आलं. तेव्हापासून, त्याला काही होऊ नये, म्हणून आम्ही जपत असतो.
(http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=28449:2...)

गुलमोहर: 

मस्त स्नोई ...आणि त्याचा फोटोही... झुलेलाल : तुमच्या मुलीचं सलोनीचं कौतुक... मस्त जमलाय एकदम.. Happy