समीकरण

Submitted by कौतुक शिरोडकर on 30 November, 2009 - 23:25

तुझ्या माझ्या नात्याचं समीकरण आगळं
सुटलं सुटलं म्हणताच, कोडं ठाके वेगळं
येता-जाता दरम्यान नवी चिन्हे फुलतात
दोन ध्रुवांच्या टोकाला मनं झुला झुलतात
बदलता रिती, नव्या उत्तरांचा सडा
गवसेना पडताळ्यात सांधण्याजोगा तडा
'क्ष' म्हणून क्षण जो घेतो कधी हाती
हरवे तो असा, जशी वार्‍यावर माती
कधी वाटतं कशाने हे झालं असेल बरं....
तुझ्यामाझ्या मधलं खरचं नव्हतं का गं खरं ?

चल, पुन्हा गिरवुया तेच जुने धडे
तुझ्या माझ्या भोवतीस विरलेले कडे
चिन्हं सारी, घोळणारी, सारूनिया दूर
बरोबर दोन आडव्या रेषां धरतील सूर
एक जेव्हा वापरेल कुणी... बोलावया काही
दुजा दुजी धरून देईल ऐकण्याची ग्वाही
तसं असतं साधं सोपं नात्यांचं गणित
थोडा वेळ, थोडं लक्ष.... उलगडे गुपित

गुलमोहर: 

>>तुझ्या माझ्या नात्याचं समीकरण आगळं
सुटलं सुटलं म्हणताच, कोडं ठाके वेगळं >> हेच आहे सगळीकडे
हवंय कशाला नात्यांचं समीकरण सुटायला?
जे आहे तेच सुंदर असतं कधी कधी... फार सोडवायला गेलं की जास्तीचे गुंते होतात...

कविता मला तरी आवडली... Happy

एक जेव्हा वापरेल कुणी... बोलावया काही
दुजा दुजी धरून देईल ऐकण्याची ग्वाही
तसं असतं साधं सोपं नात्यांचं गणित
थोडा वेळ, थोडं लक्ष.... उलगडे गुपित>>>>> एक वक्ता असेल तर दुसर्‍याने श्रोता व्हावे

सुखी आयुष्याचे गणित किती सोप्या शब्दात मांड्ले आहे.

अतिशय मनोज्ञ, सगळ्याच संवेदनाशील मनांना पडणारे प्रश्न,
मन नावाच्या हजार पैलुंच्या हीर्‍याचे कवडसे पकडायचा, सुंदर प्रयत्न.

खुप भावली कविता. मी सध्या नात्याच्या एका अवघड वळणावर सध्या असल्यामूळे असेल कदाचित. अशा अनुभवांवर महाकाव्य केली तरी अपुरेच आहे. Happy
इथले सारेच लेखक खुप छान लिहतात. Happy