गुस्ताव आयफेल निर्मित एक आश्चर्य

Submitted by सॅम on 28 November, 2009 - 10:43

फ्रान्स म्हणल्यावर डोळ्यासमोर काय येत? ... पॅरिस, आणि पॅरिस म्हणल्यावर... आयफेल टॉवर.

बाकीच्यांच माहित नाही पण मलातरी आयफेल टॉवर सोडला तर फ्रान्सबद्दल दुसरं काही माहित नव्हतं. पहिल्यांदा जेंव्हा मी त्याला प्रत्यक्ष बघितलं तेंव्हा बघतच राहिलो. त्यासमोरील हिरवळीवर बसलो होतो पण मला वाटत होतं कि हे एक स्वप्न आहे. असं वाटत होतं की आपल्यासमोर भलं मोठ्ठं पोस्टर लावलय!!

आयफेल टॉवर बद्दल विकिवर बरंच वाचायला मिळेल. तरी इथे थोडक्यात माहिती देतो. आयफेल टॉवर १८८९ मध्ये पॅरीस मध्ये झालेल्या जागतीक व्यापार संमेलनासाठी बांधण्यात आला. गुस्ताव आयफेल या अभियंत्यानी त्याची रचना केली. संमेलन झाल्यावर हा मनोरा काढण्यात येणार होता पण सर्वांना तो एवढा आवडला कि त्याला तसंच ठेवायचं ठरलं आणि आता तो फ्रान्सचे प्रतिक झाला आहे.

. . . . . . . . .

हा मनोरा फक्त लोखंडी खांब आणि पट्ट्या एकमेकांना जोडून तयार करण्यात आला. त्याच्या राचनाकर्त्याची कल्पकता सर्वांच्या लगेचच लक्षात येणार नाही. विचार करा, या घडीला १२० वर्ष पूर्ण झालेली हि रचना, ज्यावर रोज हजारो पर्यटक जातात, ती किती भक्कम असेल. तरीही आख्या टॉवरचे वजन हे त्याच्या एवढेच क्षेत्रफळ असलेल्या हवेच्या स्तंभाएवढेच (जमिनीपासून आकाशापर्यंत) आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आपण खुर्चीवर बसल्यावर खुर्चीचे पाय जमिनीवर जेवढा दाब देतात तेवढाच दाब आयफेल टोवर जमिनीवर देतो. शिवाय जाळीदार रचनेमुळे वाऱ्याचा विरोधही जास्त होत नाही.

तसे पाहता त्याची भव्यता आणि प्रमाणबद्धता सोडून कलात्मक मूल्य वेगळे नाही. म्हणजे जे सौंदर्य भव्य पुतळ्यात किंवा मोठ्ठाल्या इमारतीत असते ते इथे नाही. याबद्दल एक कथा अशीही आहे कि, १८८६ मध्ये फ्रांसनी अमेरिकेला भेट म्हणून जो स्वातंत्र देवतेचा पुतळा दिला त्याची अंतर्गत रचना देखील गुस्ताव आयफेल यांनी केली होती. तिथेही भव्य आकार असूनही कमी वजन असलेला आणि तरीही पुरेसा भक्कम सांगाडा त्यांनी तयार केला होता. पण बाहेरून असलेल्या पुतळ्यामुळे ही अफलातून रचना लपून राहिली. त्यामुळे जागतीक व्यापार संमेलनासाठी पुन्हा एक संधी मिळाली तेंव्हा गुस्ताव आयफेल यांनी त्या अंतर्गत रचनेचीच इमारत करायचा निर्णय घेतला.

मराठीत 'हा टॉवर' असला तरी फ्रेंच भाषेत 'ही टॉवर' आहे (La Tour Eiffel). इथे त्याला 'old lady' किंवा 'iron lady' म्हणतात. माझ्यासारखेच बरेच फ्रेंच देखील याचे चाहते आहेत. लग्न झाल्यावर या आज्जीबाईंबरोबर फोटो काढायलाच पाहिजे.

. . . . . . . . . . . . . . . . . . .

ह्या टॉवरच्या तीन पातळ्या आहेत. याच्या चारी पायातून वर जाणाऱ्या लिफ्ट आहेत. या लिफ्ट दुसऱ्या पातळीपर्यंत जातात आणि पुढे सर्वात वरती जायचं असेल तर लिफ्ट बदलून जावे लागते. वर्षातल्या कुठल्याही दिवशी इथे गर्दी ठरलेली. खाली रांगेत एक तास तरी उभारावं लागतच. शिवाय वरती लिफ्टला देखील रांग असतेच. वरून पॅरीस छान दिसते ...

. . . . . . . .

... पण त्यात टॉवरबद्दल काही विशेष वेगळं जाणवत नाही... टॉवर वरुन टॉवरला तुम्ही कसं बघणार?!! टॉवरची जवळून ओळख करून घ्यायची असेल तर जिन्याने दुसऱ्या पातळीला जाणे उत्तम. जिन्यानी जाताना आतून हा वेगळाच दिसतो... गर्दीपण नसते त्यामुळे अगदी तुमची आणि टॉवरची वैयक्तिक भेट घडते.

. . . . . . . .

युरोपातल्या कुठल्याही स्मारकांप्रमाणेच हा टॉवर देखील वेगवेगळ्या वेळी पाह्यलाच हवा. दिवसा निळ्या (तुम्ही नशीबवान असाल तर... नाहीतर ढगाळ पांढऱ्या) आकाशासमोर हा टॉवर एकदम भव्य दिसतो. संध्याकाळी बघाल तर वेगळाच दिसतो... तर रात्री काळ्या पार्श्वभूमीवर हा एक छोटासा सोनेरी टॉवर वाटतो.

. . . . . . . . . . . . . . . . . . . .

. . . . . . . . . . . . . . . . . . . .

. . . . . . . . . . . . . . . . . . . .

शिवाय अधून मधून यावर वेगवेगळ्या प्रकारची रोषणाई केली जाते. जसे मागच्या वर्षी फ्रेंच अध्यक्ष सार्कोझी हे युरोपिअन युनिअन चेही अध्यक्ष होते, तेंव्हा नेहमीचा सोनेरी टॉवर निळा झाला होता तर एका बाजूस त्यावर पिवळ्या तारका गोलाकार मांडल्या होत्या... युरोपिअन युनिअनच्या झेन्ड्याप्रमाणे!

. . . . . . . . . . . . . . . . . .

तसेच हे सहस्त्रक सुरु झाले तेंव्हा यावर एक नवीन रोषणाई केली गेली. ही देखील कायमस्वरूपी नव्हती पण सगळ्यांना इतकी आवडली कि आता दर तासाला पाच मिनिटांसाठी ही रोषणाई केली जाते. टॉवरवर असंख्य छोटे छोटे फ्लॅश सारखे लाईट लावलेत. पाच मिनिटांसाठी टॉवारचे लाईट बंद करून हे छोटे लाईटस randomly लावले जातात. टॉवरवर जणू चमकी टाकल्यासारखी वाटाते. मी कितीही वर्णन केलं, प्रकाशचित्र किंवा चलचित्र दाखवली तरीही तो अनुभव मी व्यक्त करू शकणार नाही. त्या वेळी जर तुम्ही जवळपास असाल आणि ही रोषणाई सुरु झाली तर तुमच्या तोंडूनही अगदी नकळत 'आह' निघूनच जाते... आणि जिथे आहात तिथेच थबकून तुम्ही टॉवर बघत राहता. पाच मिनिटे कशी जातात कळत नाही आणि संपल्यावर 'हे काय, एवढ्यात संपलं...' असं होतं.

. . . . . . . . . . . . . . . . .

आर्क दी ट्रायंफ वरुन, ही रोशणाइ सुरु असताना घेतलेले long exposer,

. . . . . . . . .

long exposer सुरु असताना कॅमेरा हलवून मिळवलेला हा फोटो,

. . . . . . . . .

सध्या १२० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष रोषणाई किलीये. साधारण बारा मिनिटे चालणारी ही रोषणाई रात्री ८:०५, ९:०५, १०:०५ आणि ११:०५ ला या ३१ डिसेंबर परेंत असेल. याबाबत जास्त माहिती आणि चलचित्र इथे बघायला मिळेल.

. . . . . . . . .

. . .

. . .

अजूनही वेळ मिळाला कि मला टॉवर बघायला आवडते. तिथे आलेल्या पर्यटकांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव असतात. टॉवर बघून परतताना प्रत्येकजण वळून वळून पुन्हा पुन्हा त्याला शेवटचे बघत असतो. आता तो माझ्यासाठी नवा नाही तरीही तो मला जुना झालेला नाही.

गुलमोहर: 

मस्त माहिती आणि फोटोसुद्ध.
का कुणास ठाउक पण आयफेल टॉवर ला मनात एक स्थान आहे.

मागे कुठेतरी डॉ़क्यु. मध्ये पाहीले होते की या टॉवरला रंग पण असे दिले आहेत ज्याने तो आणखिन भव्य दिसुन येतो. कलर्स खालुन वर लाइट होत जातात असे काहीतरी आणी उघड्या डोळ्यांना तो फरक कळुनही येत नाही.

फारच सुरेख !
आता तो माझ्यासाठी नवा नाही तरीही तो मला जुना झालेला नाही >>> कलाकॄती कालातीत असण्याचा पुरावाच हा.

एका प्रसिद्ध लेखकाला आयफेल टॉवरवरच्या रेस्टरॉन्ट्मधे बसायला खूप आवडायच. त्याला विचारल की तुला इथे रोज यायला का आवडत? तर तो म्हणाला.

This is the only place in Paris from which i can't see the damn tower.

सुरेख, सॅम पॅरिस मधील बागा व म्युजियम्स बद्दल लिहा ना. या नगरीत इतके सांस्क्रुतिक कार्यक्रम होत असतात की नागरिक खरे नशीब वान. अमेली सिनेमातील द टू विंडमिल्स कॅफे खरेच आहे का?

>> आवडत्या दहात गेला
धन्यवाद मृण्मयी, आरती
>> मेरा नंबर कब आयेगा....
निवांत पाटील, आयेगा रे बाबा...
>> टॉवरला रंग पण असे दिले आहेत ज्याने तो आणखिन भव्य दिसुन येतो.
धन्यवाद स्वाती. हे माहिती नव्हतं.
>> This is the only place in Paris from which i can't see the damn tower.
pooh, टॉवर एवढा आवडतो तर सरळ सांगायचं न... हे लेखक म्हणजे..
>> पॅरिस मधील बागा व म्युजियम्स बद्दल लिहा ना. अमेली सिनेमातील द टू विंडमिल्स कॅफे खरेच आहे का?
अश्विनीमामी, जरुर लिहिन वेळ मिळेल तसं! गीमे संग्रहालयाबद्दल याआधी लिहिले आहे. टू विंडमिल्स कॅफे खरेच आहे. इथे बघा.

बाकी विकास, अगो, वत्सला, आशुतोष०७११, स्मितागद्रे, श्री, झकासराव, गजानन, मेधा२००२, पूनम, हिम्सकूल, मदन, धनुडी, साजिरा .... सर्वांचे धन्यवाद!!

उन्हाळ्यात (पॅरिसच्या) गेलात तर प्रचंड गर्दी असते. आम्ही लिफ्टसाठीची रांग बघूनच हबकलो आणि त्यात ३ तास उभे राहायची इच्छा नव्हती. म्हणून एक दुसरी रांग, जी आधीचे काही मजले पायी चढून गेल्यावर मग लिफ्ट मिळते ती घेतली. मला वाटतं त्यात दुसर्‍या पातळीपर्यंत, म्हणजे बरेच मजले पायी चढावे लागले. पण सही आहे हा टॉवर.

सही लिहीले आहेस सॅम. मी आत्तापर्यंत आयफेल टॉवर ३ वेळा बघीतलाय, वेगवेगळ्या वेळी. पण तरीही माझी परत एकदा पॅरीसला जायची तयारी आहे खास टॉवरला भेट द्यायला. कितीही वेळ त्याच्याकडे बघीतले तरी परत परत बघत रहावा वाटतो. मुळात मला पॅरीस खूप जास्त आवडले होते, बाकीची टूरीस्ट शहरे (उदा: लंडन, न्यु यॉर्क, व्हेनीस) बघीतल्यावर ती विनाकारण फार जास्त हाइप केलेली आहेत असे वाटले होते तसे पॅरीसबद्दल वाटले नाही.

मी तीन वेळा तिथे गेलोय. मला तर फार काही वाटले नाही! अर्थात मी एकटाच होतो, हा दोष असेल! हा दोष दुर करुन परत एकदा जाउन बघतो....!

बाकी, सुंदर माहिती, अप्रतिम फोटो!

सुंदर फोटो.
माझा नवराही काही वर्षांपूर्वी ऑफिसच्या कामानिमित्त पॅरिसला गेला होता तेव्हा आयफेल टॉवर पाहून असाच भारावून परत आला होता.

@ चंपक
>>> मी तीन वेळा तिथे गेलोय. मला तर फार काही वाटले नाही!

कमाल आहे !! Uhoh

मी म्युजियम च्या बाजुने पहिल्यांदा गेलो, त्यामुळे त्याची उंची निम्म्याने कमी झालेली असताना दिसली......मग काय...... व्हिएन्ना चे टॉवर बघितलेले असल्याने, हे कमी उंच आहे कि काय असे वाटले....

अन फस्ट इंप्रेशन मधी राडा झाल्याने, पुढे काहीच वाटले नाही! Happy

Pages