नशीब हे शिकलो - भाग ४२

Submitted by विनायक.रानडे on 26 November, 2009 - 06:15

माझ्या बायकोने त्या इजिप्शियन बाईला मदत न करण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण बायकोचा नववा महिना सुरू झाला होता. योजनाबद्ध पालक होण्या करता जी बंधने आम्ही पाळली त्यातलेच ते एक होते, तीच्या मनावर कोणत्याही प्रकारचा ताण पडू दिला नाही. त्या नऊ महिन्याच्या काळातील आहार, व्यायाम, वैद्यकीय मदत ह्या सगळ्याचा विचारा करून दैनंदिनीची आखणी केली होती. सुदैवाने राहत्या जागेच्या त्या इमारतीची १२० फुटाची सरळ साफ गच्ची दिवसातून दोन तीन वेळा चालण्याच्या व्यायामा करता उपयोगी ठरली होती. वैद्यकीय सल्ल्यानुसार पालेभाज्या - फळांचा आहाराचा जास्त भर दिला गेला. त्या संपूर्ण काळात लहान मोठे आजार व ती औषधे घेण्याची वेळ आली नाही व येऊ दिली नाही. हेच आमचे ५० टक्के प्रयत्न झाले.

मोठ्याला लहान भाऊ मिळाला. पण जन्मापासूनच त्रास वाढले. बायकोला तिच्या मैत्रिणींनी मदतीचे आश्वासन दिले होते ते एका विचित्र प्रसंगाने विसरले गेले. पाहिल्या ३० दिवसाचा फार महत्त्वाचा आहार वेळेवर मिळणे आम्हाला विसरावे लागले. बायको दवाखान्यातून घरी आली त्या चार दिवसात मी सकाळी कामावर जाताना तिला मला शक्य होते तसा नाश्ता बनवून देत होतो. चौथ्या दिवशी नेमके कंपनीतल्या त्या गटप्रमुखाने ६० की.मी. दूरचे दुरुस्तीचे काम मला दिले. बाहेरुन खानावळीचे जेवण आणेस्तोवर दुपारचे ३ वाजले होते. पाचव्या दिवसा पासून बायको स्वैपाकाला लागली. इथे मला माझ्या आईने बर्‍याच बाळंतिणींना केलेली मदत आठवली, ती मालीश, ते शेक देणे, ते अळिवाचे / डिंकाचे / मेथीचे लाडू, साजूकतूप / बदामाचा शिरा, ते सगळे आठवले. नशीब त्या बाळंतिणींचे त्यांना इतकी महत्त्वाची मदत योग्य घटकेला मिळाली पण तिच्याच ह्या सुनेला मिळू शकली नाही ह्याचे वाईट वाटले.

ह्या सगळ्या घटनांचा परिणाम तेव्हा जाणवला नाही पण आज तो जाणवतो आहे. श्रेय देण्या घेण्याचा विचार न करता एक अभ्यासक म्हणून मला तेव्हा जे जाणवले व आज जे जाणवते आहे त्याचा उल्लेख मला करावासा वाटतो. माझी बायको त्या लहान बाळाशी काय, मोठ्या मुलाशी काय संवाद साधण्याच्या प्रयत्नांत माझ्या पेक्षा वेगळी होती. त्या मुळे दोन्ही मुलांना माझ्याशी संवाद साधणे जास्त सोयीचे वाटले व आजही वाटते. माझ्या मते आम्ही पालक नव्या पिढीशी संवाद साधण्यात असमर्थ ठरतो त्याचे एक कारण असावे की त्या लहान वयात पालक मंडळी अपेक्षित संवाद साधण्याला महत्त्व देण्यास विसरले असावेत.

१९८५ - ८६ च्या दरम्यान मस्कतच्या मराठी कलाकारांनी एका नाटकाचे चलचित्रण करण्याचे ठरवले. माझ्या एका खास मित्राने त्याचा चलचित्र ग्राहक ( व्हिडिओ कॅमेरा ) मला वापरायला दिला. मी बर्‍या पैकी चित्रण करू शकलो. त्या नाटकाची पार्श्व संगीताची ध्वनिफीत मी बनवली होती. ते नाटक दुबईला दाखवले गेले तिथे मी जाऊ शकलो नव्हतो. पण पार्श्व संगीताचे पारितोषक व प्रशस्तिपत्र एका दुसर्‍यानेच स्वत:चे नाव पुढे करून, मला डावलून मिळवले. त्या नंतर माझ्या डोक्यात सारखा चलचित्र ग्राहक ( व्हिडिओ कॅमेरा ) विषय घोळू लागला. कारण नाटकाचे काम करताना चित्र चौकट ( फ्रेमींग ), प्रकाशाचा समतोल, संपादनातले अडथळे ह्या सगळ्याचा फार चांगला अनुभव मिळाला होता. आता ह्या तंत्रातील बारीकात बारीक गोष्ट, वस्तू, मुद्दे, आवश्यक माहिती भूक लागल्या सारखे शोधू लागलो.

सगळ्यात आधी माझ्या खिशाचे वजन सांभाळत बाजारात काय मिळते ह्याचा शोध सुरू झाला. विक्रेत्यांशी ओळख वाढवली, विक्री पुस्तिकांचे ढीग जमा केले, त्यांचे समीक्षण, विश्लेषण करीत एक चलचित्र ग्राहक ( व्हिडिओ कॅमेरा ) घेण्याचे निश्चित केले. महिन्याच्या पगारातून ६० - ७० रियाल जमत होते, जरुर होती ५०० रियालची. बॅंकेतून कर्ज भविष्य निर्वाह निधी ( प्रॉव्हीडंड फंड ) तारण दाखवून मिळेल असे समजताच चौकशी केली, ५०० रियाल करता कंपनीच्या विभाग प्रमुखाचे विरोध नसल्याचे पत्र आवश्यक होते. गंमत बघा पैसे माझे पण त्याचे मी काय करायचे हे कोणीतरी दुसरा ठरवणार. तसेच झाले २६ वर्षाच्या पदवीधर विभाग प्रमुखाने मला भविष्याची काळजी नाही, माझ्या कुटुंबाचा विचार मी करायला हवा असे सांगत पत्र देण्याचे नाकारले. मी - " फालतू उपदेशाकरता आलो नाही, माझ्या मुलांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून त्याचे योग्य ज्ञान मला आज असणे आवश्यक आहे. निवृत्ती नंतर हे ज्ञान मिळवण्याची मला आवश्यकता नसेल, महत्त्वाचे म्हणजे मुले मोठी झाल्यावर माझ्या कडून काही ज्ञान मिळवण्याच्या मनस्थितीत नसतील ह्याची मला खात्री आहे. पत्र देणार की नाही एवढेच अपेक्षित आहे." तो माझ्या वर भडकला होता.

दैवाने साथ दिली, एका अमराठी मित्राने माझ्यावर विश्वास दाखवला, मला ५०० रियाल काढून दिले. जेव्हा जमतील तेव्हा द्यायचे, अट फक्त एक रकमी देण्याची होती. - क्रमश: -
(मागील भाग इथे वाचा http://www.maayboli.com/node/all/by_subject/9/228?page=15&order=title&so... )

गुलमोहर: