...आणि `गोठलेल्या' अश्रूंना पुन्हा वाट फुटली!!

Submitted by झुलेलाल on 24 November, 2009 - 23:31

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून "जीपीओ'कडील रस्त्याने बाहेर पडणारी गर्दी आज नेहमीसारखी "वाहत' नव्हती. या दिशेने बाहेर पडणाऱ्या आणि रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची पावले आज थबकत होती... आणि मूक होऊन पुढे सरकत होती. गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरला याच रेल्वेस्थानकावर अतिरेक्‍यांनी अंदाधुंद गोळीबार करीत पहिला उच्छाद मांडला आणि नंतर अवघ्या मुंबईला वेठीस धरले. आज या स्थानकावर पाय ठेवणाऱ्या जवळपास प्रत्येकालाच "त्या' दिवसाच्या आठवणींचा वेढा पडलेला असतानाच, स्थानकाबाहेरच्या रस्त्यावरचे छायाचित्रांचे प्रदर्शन अंतर्मुख करीत होते. गर्दीच्या मनावरची ती जखम पुन्हा भळभळत होती आणि त्या वेदनाही जाग्या होत होत्या... त्या छायाचित्रांनी रेल्वेस्थानकाच्या त्या परिसराला पुन्हा एकदा त्या कडवट स्मृतींच्या खाईत लोटले होते...

...दुपारी मी या स्थानकावर उतरलो आणि हाच रस्ता पकडला. रस्त्याला लागण्याआधी बस डेपोच्या शेजारच्या फेरीवाल्यांचे आवाज नेहमीसारखेच घुमत होते; पण स्टेशनच्याच आवारात, मेन लाइन आणि लोकल लाइनच्या रस्त्याच्या दुभाजकावरील जाळीसमोरचे चित्र मात्र नेहमीपेक्षा काहीसे वेगळेच होते. तिथल्या प्रत्येक खांबावरच्या छायाचित्रांतून गेल्या वर्षीच्या हल्ल्याची जखम पुन्हा भळभळती झाली होती आणि अस्वस्थ, बेचैन गर्दी ती छायाचित्रे न्याहाळत स्तब्ध झाली होती... बाहेरच्या फेरीवाल्यांच्या कोलाहलाचा, गाड्यांच्या कर्णकर्कश भोंग्यांचा आणि अवघ्या मुंबईच्या गतीचा परिणाम तिथे जणू गोठून गेला होता... मीही त्या गर्दीत मिसळलो... त्याच अस्वस्थतेचा अनुभव घेत एकेक छायाचित्र न्याहाळत पुढे सरकू लागलो. मुंबईतील विविध वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांनी 26 नोव्हेंबरच्या "त्या' भयानक दिवशी जीव धोक्‍यात घालून केलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन तेथे मांडले होते... त्यामध्ये ओबेरॉयमधील थरार होता, ताजमधील आगीचे लोळ होते, भयाने गोठलेल्या वेदनांचा कल्लोळ होता, अतिरेक्‍यांशी सामना करण्याच्या तयारीतले हेमंत करकरेंचे छायाचित्र होते, जीव धोक्‍यात घालून छायाचित्रण करणाऱ्या छायाचित्रकारांच्या धाडसाचे पुरावे होते आणि अपुऱ्या शस्त्रांनिशी अतिरेक्‍यांशी लढण्यास सज्ज झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे "पोझिशन'मधले फोटोही होते. एखाद्या छायाचित्रातील रक्ताची थारोळी न्याहाळत थरकापल्या मनाने प्रवासी पुढे-पुढे सरकत होते; कुणी त्यातलीच काही छायाचित्रे मूकपणे आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात साठवून घेत होते आणि शेवटच्या छायाचित्राजवळ पोचताच सुन्नपणे बाहेर पडत होते...

अतिरेक्‍यांनी केलेल्या या "तबाही'मध्ये शहीद झालेल्यांना "अखेरचा सॅल्यूट' करताना दुःखावेग अनावर झालेल्या त्या मुंबईकराच्या छायाचित्रात जणू प्रत्येकाच्याच भावना ओतल्या गेल्या होत्या... गर्दी सुन्न होत होती.

याच गर्दीसोबत मी पुढे सरकत होतो. नजर छायाचित्रांवर खिळली होती. अखेरचे ते छायाचित्र पाहून मीही पुढे आलो आणि थबकलो... ते प्रदर्शन पाहिले होते, तरीही मी पुन्हा मागे वळलो... ते प्रदर्शन पाहाणाऱ्या गर्दीच्या प्रतिक्रिया मला न्याहाळायच्या होत्या... मी मागे पहिल्या छायाचित्राजवळ आलो आणि सरकत्या गर्दीसोबत पुढे सरकू लागलो... अचानक माझी नजर बाजूनेच चालणाऱ्या एका तरुणीकडे गेली. भिजल्या आणि थिजल्या डोळ्यांनी ती एकेक छायाचित्र डोळ्यांत अक्षरशः साठवून घेत होती... तिच्या डोळ्यांतले थिजलेले भाव पाहताच मी गोठलो आणि तिला कळणार नाही, अशा बेताने तिच्याच गतीने पुढे सरकत राहिलो... प्रत्येक छायाचित्रासमोर तिचा व्याकूळपणा आणखीनच वाढत होता... एका हातानं तिनं तोंडावर रुमाल घट्ट धरला होता; पण तिच्या डोळ्यांतील वेदना मात्र लपली नव्हती. "ताज'मधून बाहेर पडणारे आगीचे लोळ एका छायाचित्रात दिसताच, ते डोळे आणखी व्याकूळ झाले... पुढच्याच छायाचित्रात, दोरखंडाच्या साह्याने अतिरेक्‍यांवर चढाईच्या तयारीतले जवान पाहताच तिचे डोळे चमकले... हेमंत करकरेंचे ते छायाचित्र पाहताच ती बहुधा पुन्हा कळवळली... तिनं तोंडावरचा रुमाल आणखी घट्ट धरला... एका टॅक्‍सीच्या आडोशाने अतिरेक्‍यांच्या कारवाया पाहणाऱ्या पोलिस शिपायांच्या छायाचित्रातील असहाय्यता पाहून ती बहुधा अस्वस्थ झाली... आपल्या कुणा नातेवाइकाच्या विरहाने आणि कदाचित अघटिताच्या बातमीने हंबरडा फोडणाऱ्या एका पाहुणीच्या छायाचित्राने तिला आणखी व्याकूळ केले... आता तिच्या गळ्यातून उमटणारे हुंदकेही मला जाणवत होते. त्यांना आवाज नव्हता; पण ती अक्षरशः हलली होती... ते स्पष्टपणे जाणवत होते... एका छायाचित्रासमोर येताच तिनं डोळेही गच्च मिटून घेतले... गेल्या वर्षीची ही छायाचित्रे पाहतानादेखील तिच्या मनावर असह्य ताण येतोय, हे जाणवून मलादेखील अस्वस्थ वाटू लागले होते... अखेर ती त्या शेवटच्या छायाचित्रासमोर येऊन उभी राहिली... पुढे सरकणाऱ्या अवघ्या गर्दीची पावले तिथे थबकलेलीच होती... सगळी गर्दी मूक झाली होती... एक विचित्र मानसिक दडपण तिथे दाटले होते...

...तीदेखील या गर्दीसोबत तिथे थबकली. तोंडावर पकडलेल्या रुमालाची पकड आणखी घट्ट झाली होती... डोळ्यांमधल्या वेदना आणखी ठळक झाल्या होत्या... आणि आतल्या आत उमटणारे ते हुंदके आता स्पष्ट झाले होते... अनावर दुःखाने शहीदांना अखेरचा, निरोपाचा "सॅल्यूट' करणाऱ्या "त्या मुंबईकरा'च्या छायाचित्रांसमोर येताच ती आणखीनच कोलमडली... आतापर्यंत दाबून ठेवलेला हुंदका तिला आवरत नव्हता... डोळ्यांच्या ओल्या कडांमधून अश्रूंची धार सुरू झाली होती... तिने ते अश्रू तिथेच वाहू दिले... बाहेर पडणारा हुंदकादेखील न रोखता ती क्षणभर तिथे उभी राहिली आणि झटक्‍यात तिनं मान फिरवली... मागे न पाहता ती वेगाने रस्त्यावर आली आणि टॅक्‍सीला हात दाखविला...
वाहत्या मुंबईत तीही नंतर सामील झाली होती,
शहीदांसाठी अश्रूंच्या दोन थेंबांची मूक आदरांजली अर्पण करून !!

(http://epaper.esakal.com/esakal/20091124/5252744312364196537.htm)
(http://zulelal.blogspot.com)

गुलमोहर: 

kahi aatwani tashyas astat.kharach aamchya sarvan kadun tya shahidana shradanjali,---apratim lekhni

एका वर्षानंतर तरी पकडलेल्या अतिरेक्याला देहदंडाची शिक्षा देण्याची सुबुध्दी परमेश्वर या मुर्दांड सत्ताधिशांना द्यावो ही प्रार्थना !!!
अमोल
------------------------------------
मला इथे भेटा

दुर्दैवाने आपण फक्त खेद , दु:खच व्यक्त करतोय. ते कोडग्यासारखे कसाबला पोसताहेत आणि सीमेपलिकडून पुन्हा धमक्या येताहेत. हे कधी संपणार? Sad

कवी प्रसून जोशिन्नि २६/११ नन्तर लिहिलेलि कविता

इस बार नही
­इस बार जब वो छोटी सी बच्ची मेरेपास अपनी खरोंच लेकर आयेगी
मैं उसे फू फू कर नही बहलाउंगा
पनपने दूंगा उसकी तीस को
इस बार नही

इस बार जब मैं चेहरों पर दर्द लिखा देखूंगा
नही गाऊंगा गीत पिडा भुला देने वाले
दर्द को रिसने दूंगा, उतरने दूंगा अंदर गहरे
इस बार नही

इस बार मैं ना मरहम लगाउंगा
ना ही उठाऊंगा रुइ के फाहे
और ना हि कहूंगा कि तुम आंखे बंद कर लो, गर्दन उधर कर लो मैं दवा लगाता हूं
देखने दूंगा सबको हम सबको खुले नंगे घाव
इस बार नही

इस बार जब उल्झने देखूंगा, छटपटाहट देखूंगा
नही दौडुंगा उलझी दूर लपेटने
उलझने दुंगा जब तक उलझ सके
इस बार नही

इस बार कर्म का हवाला दे कर नही उठाउंगा औजार
नही करुंगा फिर से एक नयी शुरुआत
नही बनुंगा मिसाल एक कर्मयोगी की
नही आने दुंगा जिंदगी को आसानी से पटरी पर
उतरने दुंगा उसे कीचड में, टेढेमेढे रस्तों पे
नही सूखने दुंगा दीवारों पर लगा खून
हलका नही पडने दुंगा उसका रंग
इस बार नही बनने दुंगा उसे इतना लाचार
कि पान कि पीक और खून का फर्क ही खत्म हो जाए
इस बार नही

इस बार घावों को देखना है
गौर से
थोडा लंबे वक्त तक
कुछ फैसले
और उसके बाद हौसले
कही तो शुरुआत करनी ही होगी
इस बार यही तय किया है.

मारल्या गेलेल्या, जखमि झालेल्या निरपराधान्ना विसरणार नाहि. मि हुतात्म्यान्ना विसरणार नाहि. माझ्या जखमान्ना विसरणार नाहि हिच माझि श्रध्दान्जलि.

Sad

आज रात्री ८ वाजता डिस्कवरीवर सर्वायविंग मुम्बई हा कार्यक्रम आहे. तो पाहण्याच धैर्य होइल का हा प्रश्न अजुन मनातच होता तोवर हा लेख वाचला.

Pages