" च्यामायला... माझं चुकतय कुठे... ?"

Submitted by धुंद रवी on 24 November, 2009 - 10:51

गेल्या तीन दिवसात माझ्या हातुन अक्षम्य अपराध झालेत आणि माझे सगळे गुन्हे मला मान्य आहेत.
पण प्लीज एकदा माझं ऐका आणि मला सांगा की....
'च्यामायला... माझं चुकतय कुठे... ?'

परवा धोब्याला इस्त्रीसाठी होते-नव्हते ते कपडे दिले आणि काल टॉवेलवर त्या मुर्ख धोब्याची (का मुर्ख मी कोणास ठाउक... !) वाट बघत बसलो. आता ऑफीसला उशीर होणार आणि विनाकारण बॉसच्या शिव्या खाव्या लागणार ह्या विचारानी संतापलो आणि त्या धोब्याच्या घरी जाऊन त्याला धुवावं असं विचार करायला लागलो.
पण बनियन आणि टॉवेलवर जाणं प्रशस्त दिसणार नाही म्हणुन त्याला फोनवरच धुवायचं ठरवलं. त्याला फोन लावल्यावर एक आगाऊ आवाजाच्या बाईनी मला डोक्याला झिणखिण्या आणणारा एक मेसेज दिला...
" आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधु इच्छित आहात, ती व्यक्ती सद्ध्या भारताबाहेर प्रवास करत आहे ".
बेगडेवाडी का घेभडेवाडी... अशा कुठल्यातरी गावावरुन आलेला आपला धोबी कुठं पोहचला अशा विचारात मी बेशुद्ध पडणार इतक्यात दारावरची बेल वाचली. मी जरासं घाबरत... (किंवा लाजत असेल) दार उघडलं...
आणि पाहतो तर काय....
तोच तो आमचा हरामखोर धोबी दात काढत... जणु काही मला दिवाळीची भेट म्हणुन त्यानी कपडे आणले आहेत अशा कौतुकात.... जीवाचा संताप संताप व्हावा इतक्या प्रसन्न चेह-यानी.... मळक्या बनियनवर उभा.
मी निशःब्द आणि निशःस्त्र असल्यानं, कृतकृत्य होऊन अत्यंत कृतज्ञतेने त्यानी केलेल्या लज्जारक्षणासाठी आभार मानुन माझे कपडे ताब्यात घेतले. नेहमीप्रमाणे त्याच्याकडे द्यायला सुट्टे पैसे नसल्यानी त्यालाच ते लक्षात ठेवायला सांगुन, त्याच्या परदेशवारीविषयी विचारताच म्हणाला,
" हं...हं... ते व्हय... त्यो माझा डायलरटोन आहे."
माझ्या तोंडाला फेस आला.
मला कळेना....
तीन किलोमीटर बनियनवर (तो ही मळका.. आणि ते ही धोबी असताना...) येणा-या, अक्षम्य अपराध करुन दात काढणा-या आणि असली इंटरनॅशनल रिंगटोन असणा-या त्या धोब्याचं दरवाज्यापलिकडचं ते स्वछ... आनंदी... मोकळं जग....!!
आणि दरवाज्याच्या आतलं माझं चिडचिडलेलं... मरगळलेलं..... कसलाही टोन नसलेलं बेसुर जग.... ??
'च्यामायला... माझं चुकतय कुठे... ?'

--------------------XX----------------------------

"काय..... ? तीस रुपये ???"
हे मी इतक्या जोरात ओरडलो की.....
थांबा... तुम्हाला सविस्तरच सांगतो.
काय झालं, काल मस्त पावसाळी हवा होती म्हणुन बायकोला जरा भजी किंवा काहीतरी चटपटीत कर असं म्हणालो तर रागातीशयानी बघायला लागली. जसं काही मी तिला शाही रबडीच करायला सांगीतलं होती. "आटे डाल का भाव पता है क्या" असं काहीतरी हिंदीत वैगेरे बोलायला लागली.
त्यात मी हिंदीत तिच्याशी भांडु शकत नाही, हे तिला माहित आहे. (तसं मी तिच्याशी कुठल्याच भाषेत भांडु शकत नाही, पण ह्या वेळेस न भांडण्याचं कारण 'बायकोच्या रागाचा उसळलेला डोंब नसुन माझी हिदीची बोंब' हे होतं.) पिठाचा आणि डाळीचा भजीशी संबंध काय, मला कळेना.
"मग निदान कोथिंबीरीच्या वड्या तरी करं" असं म्हणालो तर कपाटातुन थर्मामीटर घेऊन आली आणि मला ताप आलाय का बघायला लागली.
च्यामायला... मला कळेनाच... माझं चुकतय कुठे... ?
मग इंग्रजीत बडबड करत मी कोथींबीर आणायला बाहेर पडलो. (तसं ती अगदी उच्चविद्याविभुषीत आहे, पण का कोण जाणे, माझं इंग्रजी तिला जडंच जातं थोडं. बहुतेक मी एकदम हाय क्लास शब्द वापरत असणार. .........असो..!)
तर मी सरळ भाजीवालीकडे गेलो. (ही मराठी बाई आहे. मागे एकदा एका हिंदी भाजीवाल्याकडे गेलो आणि "जरा सव्वाशे ग्रॅम पडवळ देना" असं म्हणालो तर अजुबाजुच्या बायका इतक्या हसल्या की त्यानी ते प्लॅस्टीकच्या पिशवीत घालुन वर फुकट दिलं असतं, तरी मी घेतलं नसतं.).
तर मी त्या मराठी बाईकडे कोथिंबीर मागितली आणि ह्या वेळेस आजुबाजुची लोकं माझ्याकडे आदरानी पाहयला लागली. त्या बाईनी मला कोथिंबीर, तिही न मागता एका पिशवीत घालुन दिली आणि म्हणाली "तीस रुपये !"
"काय..... ? तीस रुपये ???"
हे मी इतक्या जोरात ओरडलो की.....
जाऊ द्या.. कशाला उगाच स्वतःची झालेली शोभा सांगा. नाही परवडत एखाद्याला ३० रुपयाची कोथिंबीर. पण म्हणुन काय.... असो.... त्या अमानुष, असुरी, असह्य, अविस्मरणीय धक्क्यातुन मी सावरायच्या आधिच मला एक फोन आला. पलिकडुन एक गोड बाई... माफ करा, गोड आवाजाची बाई जे म्हणाली ते पुढिलप्रमाणे,
"सर... आमच्या कंपनीकडुन तुमची एका लकी कुपनसाठी निवड करण्यात आली आहे आणि त्यानुसार २ वर्षातुन १० वेळा, ७ दिवस आणि ६ रात्री तुम्हाला काश्मीरला एका ५ स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुवर्णसंधी आहे. पण त्यासाठी तुम्हाला ३ दिवसाच्या आत फक्त ९०,००० रुपये भरायचे आहेत. तर कधी येताय... ?"
त्या सगळ्या आकड्यांनी मला इतकं गरगरलं की मी काय बोलतोय मलाच कळेना. मी तिला म्हणालो की हे कुपन तुम्ही दुस-या कोणाला तरी विकुन त्या बदल्यात मला कोथिंबीरीच्या ३ गड्ड्या द्याल का ?
तिनी मला इंग्रजी भाषेत (बीप बीप) शिव्या घातल्या... गड्डी परत दिली म्हणुन भाजीवालीनी मराठीत (बाप बाप) शिव्या घातल्या आणी तसंच घरी परत आलो म्हणुन बायकोनी हिंदीत मेरे इज्जत की धंज्जीया उडा दी !
का वागतात ह्या सगळ्या बायका असं ? च्यामायला... मला सांगा, माझं चुकतय कुठे... ?

--------------------XX----------------------------

आज सकाळी माझ्या ५ वर्षाच्या मुलीचा अभ्यास घ्यायला बसलो होतो. आजकालची मुलं म्हणजे भारी उर्मट आणि आगाऊ आहेत हो ! जराही अभ्यास करायला नको दुसरं काय...
आमच्या वेळेला कसं... म्हणजे मी अभ्यासात जरी हा नसलो तरी एकदम हा ही नव्हतो. म्हणजे खुप काही अगदी हे नाही पण म्हणजे... आमच्या वेळेला अभ्यासापेक्षा व्यवहारज्ञान जास्त महत्वाचं असायचं.. म्हणजे पास नापास काय... म्हणजे अगदी सगळ्याच विषयात किंवा प्रत्येक वर्षी असं नाही पण... असो....
तर मग मी तिच्या होमवर्कची वही घेतली आणि पहिला बॉम्ब इंग्रजीचा. म्हणजे मला तसा काही प्रॉब्लेम नाहीये इंग्लिशचा... पण तिच्या आईलाच जिथं माझं हाय क्लास इंग्लिश कळत नाही, तिथं त्या चिरमुरडीला काय कळणार. मी वही उघडली पण इंग्लिश सारखं काही दिसेना. काहीतरी 'फोनीक साऊंड' असा होमवर्क होता. मला कळेना हो... हे फिजिक्स किंवा इंजीनीयरींग चे विषय हल्ली ज्युनिअर केजीला कधीपासुन आलेत ?
मग कळालं... म्हणजे मुलीकडुनच कळालं की इंग्रजी अक्षरांचे उच्चार आपण ज्या प्रकारे करतो त्याला 'फोनीक साऊंड' म्हणायचं. अर्थात हे सांगताना ती तिच्या आईसारखं डोळ्यातुन "बावळाट" असं म्हणायला विसरली नाही. नंतर ती ते तोंडानी पण म्हणाली. पण माझी चुक नव्हती हो.... आम्ही Z ला झेडच म्हणायचो... आता त्याला ज्ज्ज्ज्ज्ज्ज्सस्स्स्स्झ्झ्झ्झ्झी म्हणतात हे मला बापड्याला कसं कळणार. बर तो विषय टाळुन तिला आय फॉर आयस्क्रिम असं शिकवायला गेलो तर म्हणाली, "चूक ! आय सेझ ई, आय फॉर ईग्लु... नॉट आयस्क्रीम !!"
आमच्या इंग्रजीच्या दाते मास्तरांची शपथ.... ती काय बोलली मला अजुन कळालं नाहीये.
पोमोग्रएनेट म्हणजे नक्की कुठलं फळ.. माहित नव्हतं. मुळ्याला इंग्रजीत काय म्हणायचं... माहित नव्हतं. त्या इंग्रजी कविता वैगेरे आपल्याला कधी जमल्याच नाहीत. गाणी म्हणता येत नाहीत, चित्र काढता येत नाहीत. पर्पल आणि व्हायोलेट ह्याला माझ्याकडे एकच जांभळा हा शब्द आहे हो.... पण तिच्याकडुन तीच ती नजर पुन्हा आल्यानी मी ते ही बंद केलं.... माझं नशीब तिला गणित विषय नाही, नाहीतर....
काय आहे..... माझं गणित पण इंग्लिश सारखं जरा हाय क्लासच आहे. पण म्हणुन जे घडलय ते सगळं तिनी जाऊन आईला सांगणं चुकच होतं.
मग दोघींनी मिळुन माझी शाळा घेतली.... हल्ली माझा मराठी बाणा जरा जागा व्हायला लागलाय पण आज बायको आणि उद्या मुलगी फाडुन खातील म्हणुन गप्प आहे.

एक सांगु तुम्हाला, मी सोडुन बाकीचे सगळे बरोबरच असतात. तो धोबी, ती भाजीवाली, ती टेली-कॉलर, बायको, मुलगी, हे तर असतातच पण वॉचमन, बसचा कंड्क्टर, दुकानदार, ट्रॅफिक पोलीस, भिकारी, ती मराठी माणसं , हिंदी माणसं, इंग्रजी माणसं, कन्नड, तेलगु, हिब्रु माणसं.... आजुबाजुची दिसणारी सगळीच माणसं... सगळेच बरोबर असतात... मी सोडुन !
मला मान्य आहे की मी चुक आहे. पण मला एक सांगा....

" च्यामायला... माझं चुकतय कुठे... ?"

धुंद रवी.

गुलमोहर: 

>>>>>>
आम्ही Z ला झेडच म्हणायचो... आता त्याला ज्ज्ज्ज्ज्ज्ज्सस्स्स्स्झ्झ्झ्झ्झी म्हणतात
<<<<<<

Lol

Pages