नशीब हे शिकलो - भाग ४१

Submitted by विनायक.रानडे on 24 November, 2009 - 06:00

त्या इजिप्शियन जोडप्याचे पहिले मूल असून सुद्धा दुसर्‍या मुलाच्या जन्माचा हा घोळ त्यांनी का घातला ? तो एक वेगळाच अनुभव होता. म्हणूनच अपघाताने, कोणतेही नियोजन न करता देवाची कृपा समजून, बेजबाबदार रित्या बाळाला जन्म देणारे ९० टक्के पालक असतात असे संवेदनक्षम (१/११/२००९) ह्या लेखात लिहिले होते त्याचा हा एक धक्कादायक पुरावा.

दोन दिवस जोडून आलेल्या सुट्टीचा तो दिवस होता, माझे जेवण संपत आले होते, बायकोचे अर्धेच झाले होते. तेवढ्यात माझ्या दारावर जोरात हात मारत इजिप्शियन मित्र ओरडून माझ्या बायकोला बोलवीत होता. त्याची बायको विचित्र अवस्थेत आहे व ति माझ्या बायकोची मदत मागते आहे. मी धावलो, दार उघडले, इजिप्शियन रडत होता, त्याच्या बायकोने मुलाला जन्म दिला होता. माझी बायको हात पुसत त्यांच्या घराकडे धावली, तिने बाकीच्या बायकांना हाक दिली. मला आपत्कालीन मदत वाहिनीला कळवायला सांगितले, मी इजिप्शियन मित्रालाच बोलायला सांगितले. काय घडले असेल हे मी समजू शकलो, माझ्या बायकोने त्यांच्या दारात पाय ठेवलाच होता, मी तिला थांबवले, कोणीही आंत जाऊ नका, त्याचे परिणाम वाईट होतील ह्याची कल्पना दिली. माझ्या बायकोला अरबी बोलता येत असल्याने ति इजिप्शियन बाईला दारातच उभे राहून दिलासा देत होती.

आतल्या परिस्थितीची माहिती बायको बाकीच्या बायकांना सांगत होती, इजिप्शियन बाई खाली रक्ताच्या थारोळ्यात फरशीवर पडली होती, मूल अर्धवट फरशीवर होते. माझ्या बायकोने समोर दिसणारी चादर तिच्या दिशेने फेकली व तिला ति चादर त्या बाळाच्या डोक्या खाली सरकवायला सांगितली जेणे करून ते बाळ थंड फरशीवर राहू नये. वैद्यकीय मदत एका तासाने मिळाली. दोन तरुण सेविका आत गेल्या पण त्यांना ति अवाढव्य इजिप्शियन बाई पेलवत नव्हती, शेवटी दोन पुरुष सेवक मदती करता आत गेले. इजिप्शियन मित्र ओरडून त्यांना आत जाऊ नका म्हणून सांगत होता. बाळ सुरक्षित होते परंतु बाईची परिस्थिती बिघडत होती. कसेबसे बाईला घरातून बाहेर काढले, परंतू त्या निमुळत्या जिन्यातून त्या अवस्थेत त्या बाईला गाडी पर्यंत नेताना १० मिनिटे लागली होती. त्या घटकेला तिथे उभ्या असणार्‍या प्रत्येकाने बांधकामाशी संबंधीत असणार्‍यांवर भरपूर तोंड सुख घेतले. त्या जिन्याची रुंदी फक्त दोन व्यक्ती जाऊ शकतील एवढीच होती.

मदतीला आलेल्या एका सेविकेने जमलेल्या बायकांना कोणी काही मदत केल्याचे विचारले, सगळ्या बायकांनी नाराजी व्यक्त केली, मी त्यांना मदत करू नका म्हणून सांगितले होते. मी असे केल्याबद्दल सेविकेने मला धन्यवाद दिले. कारण अशा परिस्थितीत अनधिकृत व्यक्तीने मदत दिल्यास व रुग्ण दगावल्यास ति व्यक्ती गुन्हेगार ठरते. काही वर्षापूर्वी एका प्रवास कंपनीच्या प्रमुखासोबत दोन मदतनिसांना तीन दिवस ह्याच कारणा करता तुरुंगवास भोगावा लागला होता.

पाच दिवसाने इजिप्शियन बाई एका गोंडस मुलाला घेऊन तिच्या घरी परतली. ति माझ्या बायकोवर मदत न केल्याबद्दल रागावली होती. बायकोने तिला मदत न करण्याचे कारण समजवून सांगितले, तिला ते पटले. पुढे १० दिवस माझ्या बायकोने तिला वेळोवेळी आवश्यक आहार पुरवला होता.

माझा मुलगा बालवाडीत जात असे त्याला ने आण करण्यात काम सांभाळून वेळ काढावा लागत असे. बर्‍याचवेळा मुलगा वाट पाहत शाळेत थांबत असे. काही महिन्यांनी त्या शाळेने गाडी सुरू केली व माझी पळापळ कमी झाली. मधल्या काळात बायकोला पहिल्या मुलाला सोबत असावी असे वाटुलागल्याने आम्ही संवेदनक्षमवाले १० टक्के पालक (१/११/२००९) बनण्याच्या प्रयत्नाला लागलो. दुसर्‍या मुलाच्या जन्माने आम्हा दोघांना मनुष्य स्वभावाचे अजून काही पैलू अनुभवता आले. आमचे यश हे ५० टक्के प्रयत्न होते तर ५० टक्के इतरांनी वापरलेले गतिरोधक ओलांडल्याचे होते. - भाग ४२

(मागील भाग इथे वाचा http://www.maayboli.com/node/all/by_subject/9/228?page=15&order=title&so... )

गुलमोहर: