मी केलेला इब्लिसपणा!!

Submitted by नंदिनी on 23 November, 2009 - 06:04

कधी जाणतेपणाने तर कधी अजाणतेपणाने... आपण सर्वजण इब्लिसपणा करतोच!!

तो इथे लिहालच!!
इब्लिस्पणामधे पी एच डी संपादन केलेले काही मायबोलीकर आहेत, ते आपल्या सर्वाना मार्गदर्शन करतील..

जुन्या मायबोलीवरचा इब्लिसपणा इथे आहे..
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/93663.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेंव्हा मी दहावीला व लहान मामेभाऊ सहावीला होतो. त्याला मित्रांपेक्षा मैत्रीणीच जास्त होत्या व हा पठ्ठया फार शाईनिंग मारायचा Proud एकदा त्याच्या दोन मैत्रीणी घरी आल्या तेंव्हा मी बाहेरच होतो. त्यांनी विचारले "दादा, शोण घरी आहे का?" मी मुद्दामून सांगितलं "तो शी ला गेलाय" Proud शोण्याची व माझी नंतर मारामारीच झाली Proud तो पूर्ण आठवडा शाळेतच गेला नाही नंतर Lol

ह्याच्या कडून कुठलेही काम करुन घ्यायचे असेल तर मला एक युक्ती सापडली होती. आम्ही असेच एकदा मर्द हा सिनेमा सोबत पाहीला होता झी टीव्हीवर. त्यानंतर एक दोनदा मी त्याला "खरा मर्द असशील तर अमुक काम करशील" असे म्हणून माझे काम करुन घेतले होते. एकदा असेच मामी ज्युस करत होती. ज्युसरच्या भांड्यात सगळं रेडी करुन ठेवले व तिला फोन आला म्हणून फोनवर बोलण्यात गुंग, तिथेच साखरेची बरणी ठेवली होती, मी म्हणालो "शोण्या, खरा मर्द असशील तर त्या ज्युस मधे तू एवढी साखर टाकशील' , त्याने खरंच ती बरणी ओतली त्या भांड्यात Lol अजूनही आठवले तर आम्ही खूप हसतो Proud

हा इब्लिसपणा करायचा असेल तर नविन पत्ते खेळायला शिकला असेल असा बकरा ग्रूपमधे हवा. आणि आपली पत्त्यावर पूर्ण नजर बसलेली हवी (अट्टल जुगारी कॅटेगरीतल्या लोकानीच प्रयोग करावा)

बदाम सातचा खेळ सुरू करायचा... पत्ते आपणच पिसायचे.पत्ते पिसत असताना लक्ष विचलित करण्यासाठी एखादा बेफाम हसवणारा किस्सा सांगाय्चा. बदाम सात नेमका काढून लपवायचा. जो बकरा असेल त्याच्या पाठी किवा मांडीखाली किंवा असंच त्याच्या आसपास पत्ता लपवायचा. (त्याच्या लक्षात आलं तर स्वतःचा वेंधळेपणा कबूल करायचा.. अरेच्चा पान उडालं वाटत!!!)

मग पत्ते वाटून झाले की बदाम सात कुणाकडेचा आरडाओरडा सुरू... सत्ती आडवायची नाही हे आपणच सातवेळा आरडायचं... आणि मग ते "लपवलेलं" पान आपण शोधायचं!!! आणी "साल्या, बदाम सात अडवून धरतोस.. ही काय खेळायची पद्धत झाली??" इत्यादि इत्यादि स्तुतीसुमनं उधळायची... इतर लोक त्यात भर घालतीलच.

तो बकरा अख्खा गेम संपेपर्यंत कधीच कुठलं पान आडवणार नाही. याची खात्री बाळगा!!! स्वानुभव आहे... Proud

एका मोठ्या नाटकाच्या ग्रुपमधे आम्ही होतो (कोणता ग्रुप सांगत नाही नाहीतर लोचे व्हायचे..). तिथल्या एक काकू महाभोचक होत्या. जरा कोणी मुलगामुलगी बोलताना दिसले की या त्यांचं केवळ लग्न लावायचंच बाकी ठेवायच्या. इकडचं तिकडे करायचं, प्रत्येक मुलीबद्दल काहीतरी वाईट बोलायचं. सतत सगळ्या तरूण मुलींना ओरडत रहायचं इत्यादी केल्याशिवाय त्यांना रात्री झोप येत नसे. पण सुदैवाने त्यांना भुताची भिती वाटायची. आमचे दौरे म्हणजे एखाद्या शाळेत बिळेत सगळ्यांची सोय केलेली असायची. मग एका दौर्‍यामधे सगळ्या काकवांना तळमजल्याचा वर्ग आणि आम्हा पोरींना त्यांच्या डोक्यावरचा वर्ग मिळाला. मग काकूंना अद्दल घडवायचे ठरले. दिवसभर शाळेच्या आजूबाजूला भूत आहे. मागच्या विहीरीत एका बाईने जीव दिला होता इत्यादी अफवा उठवल्या. आणि रात्री दोरीला घुंगरू नि बांगड्या बांधून वरच्या खिडकीतून सोडून दिले डायरेक्ट खालच्या खिडकीच्या बरोब्बर वरती. वारा आला की दोरी हलायची. घुंगरू आणि बांगड्या वाजायच्या आणि त्या भोचक काकू घाबरून बसल्या व्हायच्या. दुसर्‍या दिवशी त्या ज्या काय टरकलेल्या होत्या की आमचा मुलामुलींचा आख्खा ग्रुप त्यांच्यासमोर खिदळत बसला होता तरी एकदाही त्यांनी वाया गेलेल्या मुली म्हणून आमचा उद्धार केला नाही.

'तो जब तुम्हे दूसरा बच्चा हो जायेगा तो मुझे फोन करना, तेरी सारी तमन्ना पूरी कर दूंगा..' मी म्हणालो
जागोमोहनप्यारे ....झक्कास ! ( मग त्याचा चुकुन ही फोन आला नसेल !)

'तो जब तुम्हे दूसरा बच्चा हो जायेगा तो मुझे फोन करना, तेरी सारी तमन्ना पूरी कर दूंगा..' मी म्हणालो
जागोमोहनप्यारे ....झक्कास ! ( मग त्याचा चुकुन ही फोन आला नसेल !)

मी सातवीत असताना वर्गातला दंगा बघुन ,आमच्या वर्गशिक्षीका माझ्यावर (सीआर असल्यामुळे) शांत भडकल्या,म्हणाल्या तुझ्या डोक्यात काय कांदे-बटाटे भरलेत का ? ....माझ्या मुखातुन चुकुन लगेच तेवढ्याच जलद आणि जोरात प्रतिक्रिया बाहेर पडली, तुमच्या डोक्यात मग काय वांगी भरलेत काय ?
(मअ‍ॅडमच्या डोळ्यात नंतर पाणी आलं,मग मला खूप वाईट वाटलं हा भाग वेगळा ...)

भोपाळला काकांच्या कॉलनीत एक शीख कुटुंब राहायचे. त्यांची वय वर्षे ८, १० व १२ ची मुले माझ्या चुलतभावांबरोबर रोज खेळायला यायची. मी तेव्हा जेमतेम पाच साडेपाच वर्षांची होते. मला त्या मुलांच्या डोक्यावर बांधलेल्या बुचड्याचे फार कुतुहल वाटायचे आणि तो बुचडा सोडायला हात शिवशिवायचे!!

ती मुले चुलतभावांना बोलवायला दारात आली की मी काकांच्या घराच्या दारात उभी राहायचे. घराचा जोता उंच होता, त्यामुळे त्यांची [मुलांची] उंची माझ्या उंचीपेक्षा कमी भरायची. मग त्यांच्याशी गप्पा [धेडगुजरी हिंदीत!] मारता मारता मी पटकन त्या मुलाच्या बुचड्याचा रुमाल ओढून काढायचे आणि त्याचे मोकळे केस खाली घरंगळले की घरातून परसात धूम ठोकायचे व कोठेतरी लपून बसायचे!

बिच्चारी ती मुलं... रोज कोणीतरी ''बकरा'' बनायचेच!
आणि मी तिथं ''पाहुणी'' असल्यामुळे मला ''अभय'' होते!! Proud त्याचा पुरेपूर गैरफायदा घेऊन मी अनेकदा त्या पोरांचे बुचडे सोडले आणि त्यांना घरी रडत रडत जायला भाग पाडले!

१२वी नंतर मी आणि माझ्या चुलत बहिणीने एक कॉम्प्युटरचा कोर्स केला होता. एकदा मॅडम DBase शिकवत होत्या. त्या म्हणाल्या, ही command दिली की cursor नाहिसा झालेला दिसेल. मी हळूच माझ्या बहिणीला म्हणाले, नाहिसा झाला तर दिसेल कसा?

नंतर किती वेळ हसू दाबण्याचा प्रयत्न केला तरी हसू येतच होतं.

~साक्षी.

आमच्या एक इंग्रजीच्या बाईंना सारखे ''लक्षात घ्या'' असे म्हणायची सवय होती. त्यांच्या तासाला माझ्यासकट अनेक मुली त्या किती वेळा ''लक्षात घ्या'' म्हणतात याची नोंद ठेवत असत! आणि नंतर ''हायेस्ट स्कोअर'' कोठल्या दिवशी झाला याच्या गप्पा! त्या बाई खूप छान शिकवायच्या, पण सारखं ''लक्षात घ्या'' ऐकल्यावर आम्हाला जाम हसू तरी यायचं किंवा वैताग!

>>>''लक्षात घ्या'' <<<

अरुंधती, सेम अगदी.................आमच्या शाळेत "साहजिकच" असं म्हणणार्‍या एक बाई होत्या. त्या "साsssजिकच" असा त्या शब्दाचा उच्चार करीत असत. आणि आम्ही सगळे त्यांनी एका तासाला किती वेळा तो शब्द उच्चारला याची मोजदाद करीत असू. आणि तास संपला की प्रत्येक group आपापला आकडा जोरजोरात ओरडत सुटे. एकदा त्या जाम भडकल्या "काय ३५-४० लावलं आहे?" विचारू लागल्या. आणि आम्ही सर्वजण साळसूदपणे माना खाली घालून हसत बसलो. दुसरे एक सर खूप जांभया देत असत. त्याचीही मोजदाद चालत असे. Wink

First year ला असतानाची घटना .
माझा एक मित्र होता. (तसा अजूनही आहे ! )
त्यावेळेस त्याला एक वाईट खोड होती.
उगाच मधे मधे रस्त्यावर मुली छेडण्याची ... ही त्याची सवय मला बिलकुल आवडायची नाही.
मी त्याला कित्तेक वेळेस सांगिलते की असे वागू नकोस .... कमीत कमी मी समोर असताना तरी असे वागू नकोस.
पण जर ऐकला तर तो माझा मित्र कसला ! Wink
मग मी म्हटले ह्याची एकदा मजा घ्यावी.
मी आणि तो आम्ही माझ्या बाईकवर चाललो होतो .... थोडी पुढे एक मुलगी चालली होती..
मी त्याला म्हणालो .... राजा छेड तिला !
पठ्ठ्याने छेडले ..
मी कचकन ब्रेक मारला आणि त्या मुलीला म्हणालो ... "हाय कोमल .. कशी आहेस !!" .. Proud
आम्ही पाचेक मिनिटे गप्पा मारत होतो.. ती माझ्याशी बोलता बोलता मधेच रागाने त्याचाकडे पाहत होती.
आणि आमचा पठ्ठ्या गप मान खाली घालून बसला होता.
नंतर मित्राने मला भरपूर शिव्या घातल्या ! मला म्हणतो की जर ओळखीची मुलगी होती तर छेड म्हणून का सांगितलेस ?
वरून छेड काढली तर गाडी कशाला थांबवायची ?
त्यानंतर मात्र त्याने माझ्यासोमोर मुली छेडणे सोडून दिले. Happy

आमच्या सोसायटीच्या नोटीस बोर्डवर लिहिल होतं -
संडास बाथरुमचे दरवाजे खराब झाले असल्यास श्री. खांडेकर यांच्या कडे (सेक्रेटरी) नावे द्यावीत.

मी दुसर्‍या दिवशी त्यातले बाथरुमचे दरवाजे खराब हे मधले शब्द पुसुन टाकले आणि आम्ही मैत्रिणी खिदळत होतो. पण ते एका शेजारच्या मुलाने पाहिले आणि माझ्या दादाला सांगितले मग काय मस्तपैकी ओरडा मिळाला.

नंदीनी,
सग्ळ्यांनी केलाय ते मंजूर. पण माझ्या नुसत्या असण्याने काय जान येते एकेका धाग्यात पाहिलं नाहीत का तुम्ही गेले वर्षभर? Rofl

धम्माल किस्से आहेत्......डेस्कवर बसुन एकटीच तोंड दाबुन हसतेय्......तर त्या कहर ने कहर केला आणि मी ईतक्या जोरात हसले की सर्व जागेवरुन उठुन माझ्याकडे पाहतायेत् आणि विचारतात काय झाले..मी आपली ओशाळली होऊन मोबाईल कानाला लावुन पोतभर हसले......विचार केला उठुन बघताहेत तर हसुन घ्या.... Lol ........पंचाईतच झाली......कारण माबो वाचतीये हाफिसात हे कसे सांगु.... Proud

पण माझ्या नुसत्या असण्याने काय जान येते एकेका धाग्यात पाहिलं नाहीत का तुम्ही गेले वर्षभर?<< वरती लिंक दिली आहे ना तो जुन्या माबोवरचा धागा वाचून या. मग तुम्हाला तुम्ही किती सज्जन आणि साधेसरळ आहात असा साक्षात्कार होइल. Happy

लोकहो,

मी अजाणतेपणी केलेला एक इब्लिसपणा आठवला.

मी ठाण्यात वाढलो. दहावीला असतांना जोशीबाईंचा इंग्रजीचा क्लास लावला होता. सकाळी शाळा असायची आणि दुपारचा क्लास असे. एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर दुपारी जेवण केलं आणि लवंडलो. नेमका घड्याळाचा गजर लावायला विसरलो. जाग आली तोवर बराच उशीर होऊन गेला होता. वह्यापुस्तकं घेऊन झर्रकन सायकलवर टांग मारली आणि पाच मिनिटांत क्लासात पोचलो. पावसाळ्याच्या आर्द्रतेत धाप लागल्याने चष्म्यावर वाफ साठली होती त्यामुळे वर्गातली मुलं नीटशी दिसली नाहीत. वर्षाची सुरुवात असल्याने फारशा ओळखीही झाल्या नव्हत्या. बाई शिकवत होत्या. खुणेनेच बाईंनी परवानगी दिली आणि मी जरासं धडपडत मागे जाऊन बसलो. बसून थोडं स्थिर झाल्यावर कळलं की आपण दहावीच्याऐवजी नववीच्या क्लासला आलो आहोत.

बाईंच्याही लक्षात आलं की हा मुलगा या वर्गातला नाही. मी वर्ग सोडायची परवानगी मागण्यासाठी उठून उभा राहिलो. बाईंनी काय झालं म्हणून पृच्छा केली. मी लगेच कबुली दिली की घड्याळ मागे पडलं होतं. त्या खडूस बाईंच्या नादी कोणी लागत नसे. बाईंनी जायची खूण केली तसा मी जाण्यासाठी मागे वळलो. सुटलो एकदाचा असे भाव चेहेर्‍यावर उमटले. तोच बाईंनी खोचकपणे विचारलं, "पण नक्की घड्याळ मागे पडलं होतं का?"

आयला, आता काय सांगायचं बरं. मी गजर न लावता ताणून दिली हे सांगायचं नव्हतं. मी गोंधळलेल्या अवस्थेत थिजलो. हा प्रश्न अनपेक्षित होता. पावसाळ्याचे दमट दिवस, त्यात मोडलेली झोप, धावपळीने लागलेली धाप, अंगातून निथळणार्‍या घामाच्या धारा यांच्यामुळे चित्त थार्‍यावर नव्हतं. मग थोडा तर्क लढवला आणि म्हणालो की, घड्याळ मागे नसेल तर कदाचित पुढे असेल.

या वाक्यावर वर्गात भयंकर हशा उसळला! इतका जोरदार की त्यात महाखडूस जोशीबाईसुद्धा वाहून गेल्या.

आ.न.,
-गा.पै.

Pages