घरटं ना रितं !

Submitted by manjushree.kulkarni on 18 November, 2009 - 04:11

चार वर्षांपूर्वी पिल्लू घरट्याबाहेर पडण्याची वेळ येऊन ठेपली. त्याचा मनाजोगता लागलेला निकाल, त्यामुळे हव्या असलेल्या महाविद्यालयात हव्या असलेल्या शाखेत मिळालेला प्रवेश याचा आनंद, एवढं शि़क्षण आर्थिक द्दष्ट्या झेपण्याच दडपण, आणि सर्वात मुख्य म्हणजे घरातलं चैतन्य असणारा माझा लेक आता दूर जाणार ही खंत....
आधी शिक्षण मग नोकरी अन पुढे त्याचं आयुष्य या त्याच्या जीवन प्रवासात आता माझ्या वाट्याला येणार तो किती? असा सगळ्याच आईंना पडणारा हा प्रश्न! त्याचं बालपण , मग शाळा , शिकवणी, अभ्यास, खाण्यापिण्याच्या (खवैय्या असल्यामुळे जास्त) आवडी निवडी अन वेळा अशी तारेवरची कसरत करण्यात घड्याळ धावत असायचं कायम. आता यापुढे? घरात खरं तर सारेच (अभिमानास्पद संयुक्त कुटुंब). अनुजाची गोड भुणभुणही सोबत , पण तरीही अमित माझ्या भोवती नसण्याची कल्पनाही मला सहन होत नव्हती. या भावनांच्या कल्लोळात माझे दडलेले अश्रु कोणाला दिसणार नाही अशा समजूतीत मी त्याची तयारी करत होते. क्षणागणिक ऐकू येणारी 'आई' ही हाक आता कित्येक दिवसांनी कानी पडणार होती. या सत्याच्या प्रहाराने अखेरीस बांध फुटला. मला असं रडताना पाहून अमित चिडला. रडतेस काय अशी? आता मी शिकायला चाललो ना? मग तुला कितीतरी वेळ मिळणार आहे. तुझे सारे अपुरे राहिलेले छंद पुर्ण कर. भरपुर वाचन, लिखाण कर. कधी स्वयंपाक करतांना सुध्दा हाताशी पुस्तक ठेव, कुकर लावला , भाजी फोडणीला घातली की हाती उरलेल्या वेळात पुस्तक वाचायचं........
आण्खी काय काय बोलत होता आणि मी स्तब्ध होउन त्याचं हे नव रुप बघत होती.
आता मनातल्या वादळानी दिशा बदलली, घोंघावणं मात्र सुरुच! पहा अस असतं...आता तर शिकायला चालला
तरी एवढ कठोर होऊन बोलतोय. माझ्या रडण्याचं काही देणं घेणं नाही वगैरै वगैरै........! पण मी लगेच सावरले,
खरं तर त्याच्या बोलण्यातलं तथ्य जरासं पटलेलंही होतं. बंद कपाटातले चित्र, रंग मला जवळ बोलवायला लागलेत, छानसे रांगेत बसलेले पुस्तकं आता आपलीही दखल घेतली जाणार म्हणून कुजबुजू लागले. ' लिहिती हो, लिहिती हो' म्हणत मनातला पाऊस बरसायला लागला. अन या सगळ्या सुखद जाणिवांनी मला घाबरवू पाहणारं एकटेपणाचं दु:ख पार दूर पळालं.
नव्या उमेदीनी त्याची तयारी केली. बॅगमधे साईबाबांचा फोटो ठेउन, सारी भिस्त त्यांच्यावर सोपवून , निश्चीत
मनाने होस्टेलला जाउन त्याची खोली लावून द्यायला आम्ही उभयता सज्ज झालो.पण या सगळ्या प्रसंगानुरुप
भावना मला स्वस्थता लाभू देईनात.म्हणून त्यांना कागदावर उतरवलं..............
मला तुझ्याबद्द्ल जेवढं वाटतं
तेवढंच तुलाही वाटावं
असं मी म्हणत नाही....
आम्ही थोडसं झिजतोय
पुढे तू ही झिजावस
अशी अपेक्षाही नाही
तू निघतांना माझे डोळे पाणावले
तुझ्या डोळ्यातही पाणी यावं
असंही मला वाटत नाही
तू बराच मोठा झालास
हे न समजण्या इतकी लहान
आता मी ही नक्कीच नाही
तूला घरात बंदिस्त करावं
कायम माझ्या जवळ ठेवावं
एवढी स्वार्थी मी खचितच नाही
मात्र..........................
माझं पिलू घरट्यातून उडतंय
क्षितीजावर भरारी मारतंय
घरट माझं रितं होतंय....
हे सत्य स्वीकारायला मन तयारही नाही
पण खरंच...................
खूप मोठा हो.....'माणूस' हो........
सुखी हो....संपन्न हो......
फक्त आईच्या अश्रुंची किंमत 'शुन्य' ठरवू नको
एवढंच ....एवढंच माझं मागणं आहे...........
निघतांना ही कविता त्याच्या हातात दिली.सवयीप्रमाणे त्याची पारखी नजर झरझर कवितेवरुन फिरली. अन आतापर्यंत मोठेपणाचा आव आणलेल्या माझ्या चिमण्या बाळाने डबडबलेल्या नजरेनी आश्वासक शब्दांचा ''जोगवा'' माझ्या ओंजळीत घातला.''आई तू माझ्यासाठी काय आहेस हे मी आत्तच सांगत नाही.त्यासाठी जरा वाट बघ. तोवर माझ्यावर विश्वास ठेव. मी तूझे अन बाबांचे श्रम वाया जाउ देणार नाही. माझी काळ्जी करू नकोस...आणि ...माझ्या कायम सोबत रहा....! त्याच्या या सु़खद जोगव्याने मला कायमची समृद्धी प्रदान केली. मी आता माझ्या नव्या विश्वात शिरले. माझी स्वत:ची ओळख मला गवसली. माझा हा नवा चेहरा अमितलाही वेगळाच आनंद अन बळ देत राहिला. आता लवकरच तो त्याच्या नोकरिसाठी आणखी दूर जाणार अन पूढे त्याच्या स्वतःच्या आयूष्याला सुरवात होणार. पण आता यासाठी मी पूर्णपणे समाधानासह तयार आहे. त्याच्यावरचा 'एकाधिकार' मला कुठल्या क्षणी कमी करायचा ही परिपक्वताही मला माझ्या 'विश्वानी' मिळवून दिलीय. या एकूणच समृद्धीसाठी माझा परिवारही तेवढाच कारणीभूत आहे हे ही तेवढेच खरे! या समृद्दीतले चार कण मी माझ्या सख्यांनाही देउ इच्छिते ज्या स्वत:सोबतच स्वकियांच्याही आयुष्यात नकारघंटा वाजवत राहतात. मुलं मोठी झाली की आपली जगण्याची दिशा बदलावी. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी एकटेपणाचं पालुपद झटकून आवडीच्या क्षेत्राकडे आपली पावलं उचलावीत. संपूर्ण परिवारात आनंदाचं आवर्तन त्यामूळे घडत राहतं. आपल्या प्रेमावर, संस्कारावर अन आराध्यदेवतेवर विश्वास ठेवावा. भविष्य जाणून घेण्यासाठी मग कोणासमोर हाताच्या रेषा मांडण्याची गरज भासत नाही , भविष्यच दाराशी येऊन वर्तमानही सुखी करुन जातं.......!!!

-सौ. मंजुश्री कुळकर्णी

गुलमोहर: 

>>त्याच्यावरचा 'एकाधिकार' मला कुठल्या क्षणी कमी करायचा ही परिपक्वताही मला माझ्या 'विश्वानी' मिळवून दिलीय.
सुरेखच! एक आई म्हणुन हे मनोगत जास्त जवळच वाटले आणि भावलेही.