नशीब हे शिकलो - भाग ३७

Submitted by विनायक.रानडे on 13 November, 2009 - 08:28

१९८३ ला ओमानी चलन १ रियाल = ५६ रुपये होते. मला २०० रियाल पगार मिळत होता. रुपयाची किंमत बदलली की माझा रुपयातला पगार बदलायचा. ५० रियाल माझ्या करता ठेवून मी १५० रियाल बायकोला पाठवीत होतो. मस्कतला जाताना मी मुद्दामच रिकाम्या खिशाने गेलो होतो. कंपनीने ५० रियाल पगारातून खर्चाला दिले. सकाळच्या चहा नाशत्या पासून मला खर्च होता. ५० रियाल महिन्याचा खर्च फार सांभाळून करावा लागत असे.

तर, दुसर्‍या दिवशी सकाळी आधी माझ्या विभाग प्रमुखाला भेटायला गेलो. चादर, अभ्रे व वातानुकूल यंत्रा विषयी माझी तक्रार ऐकण्याचे त्याने छानसे नाटक केले, व्यक्तीविषेश (पर्सनल) विभागाच्या प्रमुखाला बोलावले, तो एक विचित्र दिसणारा केरळी माणूस होता. माझी तक्रार ऐकून म्हणतो " हे मुंबईहून येणारे लोक स्वतः:ला राजे समजतात, कंपनीने तुम्हाला जागा दिली आहे मुकाट्याने राहा, २० वार्षा पूर्वी मी ह्या कंपनीत आलो तेव्हा छोटा लाकडी खोका माझी खुर्ची होती, मोठा खोका टेबल होते." मी मुलाखतीत मिळालेला कागद दाखवला, मुलाखत काराचे नाव सांगितले, त्याला विचारले "३० वर्षा पूर्वी तू कपडे न घालता रस्त्यावर भटकत होता, मग आज कोट, गळ्यात पट्टा, वातानुकूल गाडीत बसणे चूक आहे, हो ना ?" वाचकहो, मागच्या भागात म्हणून मी लिहिले होते, इंडियन गुलामाचा गुलाम होणे.

आजच मित्राशी बोलताना आठवले, एकदा ओमानला जाण्या आधी एका मित्राने मला एका मासिकाच्या संपादकाकडे आमंत्रण दिले, माझी व बायकोची मुलाखत मासिकात छापणार होते. संपादकाच्या घरी, पुरुषी थाटातील एक महिलेने स्वागत केले. तिच संपादिका होती. पुण्यातील एका ब्राम्हणाने धर्मांतर केले हा विषय मासिकाची विक्री वाढवेल व तिची समाजवादी, निधर्मी प्रतिमा उंचावेल अशी तिची योजना होती हे थोड्याच वेळात तिच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. (निधर्मी = कर्तव्य विसरलेले, कारण धर्म = गूण / कर्तव्य). त्या बाईने आधी बायकोला बरेच प्रश्न विचारले पण उत्तरे बाईला हवी असलेली चमचमीत नव्हती, तसे तिने बोलून दाखवले. तिचे लक्ष लिहिण्यात होते, मला प्रश्न विचारला, " तुम्हाला धर्मांतर केल्यावर काय वाटले?" मी "बायकोच्या पालकांना व आप्तांना कोणताही त्रास होणार नाही ह्याची काळजी घेतली. माझे धर्माविषयीचे विचार व कल्पना रास्वसंघाने फार सरळ व सोपे केले आहेत . ." हे वाक्य संपताच संपादीकेच्या नाजूक जागी भले मोठे इंजेक्शन टोचल्यासारखी ति एकदम खुर्चीतून उभी झाली, डोळ्यावरचा चस्मा खाली आला, लिहितं असलेली वही बंद झाली, एका महत्त्वाच्या कामाची आठवण तिला झाली म्हणून तिने मुलाखत थांबवल्याचे सांगत आम्हा दोघांचा निरोप घेतला. त्या "इंजेक्शनचा" परिणाम अजून ओसरला नसावा कारण मी त्या अर्ध्याच मुलाखतीला पूर्ण करण्याची वाट पाहतो आहे. वाचकहो, ह्या भारतीय समाजाला परकीयांची भिती नसून विविध माध्यमातून विराजमान असलेल्या अशा स्वकीय धेंडांचीच जास्त भिती आहे.

असो तर ओमान - तीन - चार दिवस सेवा विभागाच्या कामाचे स्वरूप समजून घेण्यात गेले. यांत्रिकी / विद्युत / इलेक्ट्रॉनिक टंक लेखन उपकरणे दुरुस्ती, लहान - मोठे क्षमतेचे प्रत छपाई ( फोटोकॉपी ) यंत्र दुरुस्ती, अमोनियाने तयार होणारे नकाशे छपाई यंत्र दुरुस्ती व महत्त्वाचे मायक्रोफिल्म संबंधीत ग्राहक / प्रक्रिया / वाचन / छपाई यंत्रांची दुरुस्ती अशी विविध कामे व सेवा आमच्या विभागात होत्या. सहा महिन्यात मायक्रोफिल्म सोडून सगळ्या यंत्रसामुग्रीचा अनुभवी तंत्रज्ञ म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. ह्या यंत्र सामुग्री दुरुस्ती कामाचे दर दिवशीचे वाटप आमचा गटप्रमुख करीत असे. त्यात त्याचा कुचटकटपणा व स्वार्थ समजायला जरा वेळ लागला.

आमच्या सेवा विभागात मी एकटाच असा होतो की मस्कतला येताच दुसर्‍या महिन्यात वाहन चालकाचा परवाना मिळवू शकलो. माझी नवीन कोरी मझदा चौथ्या महिन्यात मी घेतली, त्या करता कंपनी जास्तीचे १०० रियाल देत असे, गाडीचे कर्ज मात्र माझ्या स्वतः:च्या नावाने बॅन्केतून घ्यावे लागले होते. ७५ रियाल हप्ता असायचा व २५ रियाल मध्ये पेट्रोल खर्च व दुरुस्ती सांभाळायची अशी ती एक कसरत होती. माझ्या बरोबरच्या बाकी गाडीवाल्यांच्या जुन्या गाड्या होत्या पण त्यांना देखील १०० रियाल खर्च मिळत होता त्यातले २० रियाल पेट्रोल व दुरुस्ती ते सांभाळत होते. तर गटप्रमुखाचा कुचटकटपणा असा की सगळ्यात लांबची कामे माझ्या नावाने जुळवायची व जवळची कामे आपल्या मित्रांना ठेवायची. ३० ते ५० की.मी.कार्यालयापासून दूर, त्यामुळे रोज ६० ते १०० की.मी. जाये होत असे. माझा महिन्याचा पेट्रोल खर्च २५ रियाल पेक्षा जास्त असायचा. लांब अंतरावर जाण्याने जेवणाच्या वेळा बरोबर जमत नव्हत्या, खर्च जास्त होत असे. मायक्रोफिल्म कामे फक्त गटप्रमुख करीत असे. एकदा त्याने मला मदतनीस म्हणून नेले, त्या उपकरणात झालेला बिघाड मी सहज दुरुस्त केला. ते काम मी करणे चूक की बरोबर हे बघूया. - हे शिकलो - भाग ३८

लवकरच - नशीब - वाचकांच्या सोयी करता १० भागांचे एक असे पी.डई.एफ. वाचन व छपाई योग्य तयार होत आहे.

गुलमोहर: