नशीब हे शिकलो - भाग ३६

Submitted by विनायक.रानडे on 11 November, 2009 - 10:04

विदेशी नोकरी मिळवून देणार्‍या काही संस्था उमेदवाराला मोफत सेवा देतात. निवड झालेल्या प्रत्येक उमेदवाराचा खर्च निवड करणारी कंपनी देते. मला प्रथम इराण आणि नंतर ओमान ह्या दोन्ही नोकर्‍यांच्या उमेदवारीचा खर्च करावा लागला नाही. मात्र बर्‍याच संस्था दोन्ही बाजूने लुटा ह्याच मार्गाने मासे (उमेदवार) पकडण्याचा धंदा करतात. मी अशा "दोबालु"संस्था फार जवळून अनुभवल्या, सुदैवाने जाळ्यात अडकलो नाही.

सिडनीला जाण्याचे विसरलो व विदेशी नोकरी शोधात प्रयत्न सुरू केले. निवड होत असे, पण माझ्या पासपोर्टवर इराणी शिक्के व त्यात इराणी पासपोर्ट धारक बायको बघून मला पाच कंपन्यांनी नकार दिला होता. आम्ही दोघे दिवस रात्र भांडण शोधू लागलो, इतकेच नाही तर घटस्फोटाचे विचार . . जावे त्याचा वंशा . . शेवटी बायकोला भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. एकाने माझा जुना पासपोर्ट नवीन करून दिला.

वर्ष १९८२, इंडियन असण्याची घृणा यावी असे अजून एक कारण ... इट हॅपनस ओन्ली इन इंडिया . . . अगदी खरे आहे. सचिवालयातील अधिकार्‍यांनी मला व बायकोला भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे प्रयत्न करण्या बद्दल चक्क वेड्यात काढले होते. नागरिकता अर्ज शोधण्यात दीड महिना गेला, कोणालाच माहीत नव्हते, एका लेखनिकेला माहीत होते ति तीन महिन्याच्या सुट्टीला गेली होती. कसाबसा अर्ज मिळाला. १९५३ सालची पिवळी झालेली टंकलिखित प्रत होती. पार्ल्याच्या माझ्या मेव्हण्यांनी अनमोल मदत केली, फार थोड्या मुदतीत बायकोला भारतीय नागरिकत्व मिळवून दिले.

ओमानची कंपनी युनीलीव्हर युके व एक ओमानी, अशा सहकार तत्त्वावर बरीच वर्ष कार्यरत होती. ह्या कंपनीचे विविध विभाग होते. बहूखणी दुकान ( डिपार्टमेंट स्टोअर ), विदेशी दारू दुकान, कार्यालय व्यवस्थापन व उपकरणे / साधने विभाग. शीत पेटी / हवा विभाग ( एसी / फ्रीज ), सामान्य / खास विमा विभाग वगैरे. युनीलीव्हर युके कंपनी प्रत्येक आखाती देशातून सहकार तत्त्वावर कार्यरत होती. कार्यालय व्यवस्थापन व उपकरणे / साधने विभागाला सेवा व्यवस्थापकाची निवड करायला एक इंग्रज मुंबईला आला होता, तो युनीलीव्हर बाहरिनला व्यवस्थापक होता. माझा अनुभव तपासून त्याने माझी त्या क्षणाला एक तंत्रज्ञ म्हणून निवड केली. ओमानला गेल्यावर माझी व्यवस्थापक म्हणून निवड होईल असे सांगण्यात आले. मला नोकरीची फार गरज होती मी लगेच करार पत्रावर सही केली. बायको व मुला करता सदाशिव पेठ पुण्यात एक भाड्याची खोली घेऊन राहण्याची सोय केली.

१९८३ एके सकाळी १० वाजता मस्कत विमान तळावर उतरलो. कंपनीचा एक बलूची वाहन चालक हातात नावाचा फलक घेऊन उभा होता. त्याच्या जवळ माझ्या सारखे इतर विभागात कामावर रुजू होणारे दोघे उभे होते, त्यातला एक वसईचा होता, एक केरळी होता. विचारपूस झाली बलूची वाहन चालक माझ्या कडे बघत, " आओ, कंपनीमे ईंडीयासे और एक गधा आया, तुमको कौन, कहांसे, क्यों पकडके लाते है ?" बाकी दोघे दोन शिव्या घाकून मोकळे झाले, मी - "मुझे खुशी हुई, यहा पैर रखतेही, मेरी जबान जाननेवाला कोई मिला, एक लंबासा गधा आया था, उसने बताया था, ओमानमे गधे है लेकीन कहने केभी लायक नही है, इसलीए मुझे चुना गया." ( बलूची हिंदी- उर्दू बोलतात ) तो जे चुप झाला ते ५० की.मी अंतरात, विमानतळ ते कंपनी कार्यालया पर्यंत एक शब्द बोलला नाही. तोच वाहन चालक माझा चाहता बनला.

कार्यालय व्यवस्थापकाच्या खोलीत जाऊन उभा होतो. जरा वेळ वाट बघितली आणि मी पाणी मागितले, व्यवस्थापक मुंबईचा सिंधी होता, त्याने मदतनिसाला ओरडून सांगितले, "अरे मुंबईहून भुका प्यासा कोणी आला आहे ह्याला पाणी पाजा." मी त्याला सिंधी पाहुणचाराची आठवण करून दिली, बाहेरून आलेल्याला आधी भाजलेले पापड व पाणी देतात. देश सोडल्या बरोबर विसरून गेलात काय ? त्याने हात जोडले, "मैने तुम्हारे बारेमे सुना था, ठीक है, देखो आगे क्या होगा." कार्यालय वातानुकूल असल्याने थंड होते परंतु बाहेर रस्त्यावर ४० अंश तापमान अंगाला पोळत होते. संध्याकाळचे पाच वाजले. कंपनी वाहनातून राहण्याच्या जागी गेलो, मी आणि वसईवाला एकाच ठिकाणी होतो एका खोलीत दोन पलंग होते, पलंगावर स्प्रिंगची गादी, चादर नाही, उशीला अभ्रा नाही, वातानुकूल यंत्र नावाला होते. थंड करत नव्हते. राहण्याची सगळी व्यवस्था कंपनी देईल असे सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात " रॅगिंगचा " व्यवसायी प्रकार होता. त्या उघड्या गादी वर टॉवेल टाकून केव्हा, कसा झोपलो कळले नाही.

सकाळी उठल्यावर कळले कंपनी जरी ब्रिटिश असली तरी चालवणारे इंडियन गुलाम होते. तो दिवस एका नवीन शिक्षणाची सुरुवात होती, एका गुलामाची गुलामी करून सुखाचा शोध कसा करायचा ? - हे शिकलो - भाग ३७

गुलमोहर: 

तुमच्या ब्लोग वर फक्त भाग ३६ तेवढाच वाचत्ता येतोय. बाकी सगळे भाग एकडे चांगले वाचता येतात पण अगोदरचे भाग आणि ३० भाग इकडे नाही आहेत. खुप मजा आली वाचायला. तुमच्या decision making ला दाद द्यावी तेवढी कमीच आहे. कृपया सगळे भाग वाचता येतील अशी काही तरी सोय करा. दोन भागाम्ध्ये लिंक द्या.

तिथे वाचले हो.. भाग ३० नाहीय... अगोदरचे पन नाहीत.. काय राव... निवांत म्हणजे आळ्शी नाही हो..... Happy

मलाही हे सगळे एकत्र वाचायला आवडेल. लहान लहान खूप भाग झालेत. सगळे भाग टाकून प्रत्येक भागाखाली मागच्या/पुढच्या भागाची लिन्क द्यायला हवी.

१५ पासून पुढे भाग इथे आहेत. त्या आधीचे नाहीत. बरोबर आहे निवांतपणे तुमचे Proud
भाग ३० नाहीय्ये, पण तिकडे आहे ना. ३६ नंतर older posts अशी लिंक आहे त्याने मागचे भाग बघता येतील.

अगदी प्रामाणिक मत द्यायचं तर, मी सगळे भाग वाचलेत आणि वाचते आहे. प्रतिकुल म्हणाव्या अशा परिस्थितीत आपण स्वबळावर आणि हिकमतीवर बरंच काही केलतं याचा यथोचित विस्मय आणि आदर वाटतोय. पण मागे वळुन पाहताना ठायी ठायी तो विखार ? का ? कशासाठी ? त्या झेनकथेप्रमाणे लहानग्या मंकने स्त्रीला उचलून पलिकडे ठेवले आणि संपले, पण त्याच्याबरोबरीच्या वरिष्ठ मंकच्या अस्तित्वालाच ती एकच गोष्ट व्यापुन राहिली आणि स्त्रीला स्पर्श न करताही त्याची मात्र मनःशांती ढळली.
म्हणजे काय सर्व डायबेटिस इंड्युसिंग गोड असावं असं म्हणणं नाही (आयुष्यात वाईट अनुभव सर्वांनीच घेतले असतात, जिंदगी काय कमीनी चीज आहे हे उमजतं, पण सर्व व्यापुन एक मनुष्यत्वाचं सार रहातं का ? आत्ममग्न उद्वेगात ते स्पष्ट दिसु शकेल ?), पण शेवटी या सगळ्यात कुतरओढ तुमचीच होते आहे ना ?
एवढ्या कालकोठडीत उमेदीची सर्व वर्ष घालवून नेल्सन मंडेला जेलरला माफ करु शकतात...
तुम्ही आम्ही निदान स्वतःला तपासुन पाहून "जुने जाऊ द्या मरणालागुनी " म्हणु शकतो का हा मला ही लेखमालिका वाचून पडलेला प्रश्न.
स्पष्टोक्तिबद्दल माफ करा.