वांग्याला शेंडी

Submitted by मंजूडी on 10 November, 2009 - 00:32

१४ नोव्हेंबर रोजी असणार्‍या बालदिनानिमित्त नीरजाच्या (माझी मुलगी Happy ) शाळेत तो पूर्ण आठवडा बरेच कार्यक्रम असतात. त्यापैकी एक कार्यक्रम म्हणजे वेशभुषा दिवस. शुक्रवारी म्हणजे ६ नोव्हेंबरला ह्या कार्यक्रमाबद्दल नीरजाबरोबर घरी चिठ्ठी आली. लगेचच १० नोव्हेंबरला कार्यक्रम... मध्ये फक्त एक रविवार. Sad त्यात सुद्धा रविवारी सकाळी मायबोलीकरांचं गटग ठरवलेलं.. म्हणजे अख्खी सकाळ त्यात जाणार हे निश्चित होतं.

विषय होता 'आवडती भाजी/ आवडतं फळ/ आवडतं फूल'. फळ करायचं म्हटलं आंबा/द्राक्षं/संत्रं/सफरचंद वगैरेच डोळ्यासमोर येत होतं. त्यात शेडिंगची कटकट भारी आणि परत ड्रेसही मॅचिंग हवा.. नीरजाचा जांभळा आणि हिरवा परकर पोलका होता म्हणून मग तिला 'वांगं' करायचं ठरवलं. ते रंगवण्यासाठी हिरवा आणि जांभळा असे दोनच रंग आवश्यक. पण तरीही भाजीचं वांगं करायचं की भरताचं वांगं करायचं ते नक्की होत नव्हतं. Proud मी काही चित्रकार नव्हे, त्यामुळे आयत्यावेळी जो आकार उमटेल तो करायचा ठरवलं.

शनिवारी रात्रीच सगळे उद्योग करायला बसले. ऑफिसमधून घरी जाताना वांग्यासाठी कार्डबोर्ड पेपर आणि शेंडीसाठी कार्ड पेपर, रंग, कात्री, फेविकॉल, इलॅस्टीक वगैरे सटरफटर वस्तू घेतल्या होत्या.

सगळ्यात आधी नीरजाची उंची मोजून तिच्या गळ्याचं माप घेऊन कार्डबोर्ड पेपरवर खालील आकृती काढली.

drawing1.JPG

आणि कात्रीने कापून घेतली. ती कापलेली आकृती बघून नीरजा म्हणाली,"आई, हा बटाटा दिसतोय!!" Sad तिला रीतसर झापून हे वांगंच आहे हे डोक्यात भरवलं. Wink

आधी त्यावर नुसताच एक रंगाचा वॉश दिला. (कॅम्लिन वॉटर कलर नं. २५१)

fancy dress brinjal 2.jpg

हा रंग 'मजेंटा' म्हणून घेतला होता. पण तो कार्डबोर्ड पेपरवर तो राणी कलरच दिसत होता. मग तो जांभळा रंग उतरण्यासाठी एका डिशमध्ये त्या २५१ नंबरच्या रंगात काळा वॉटर कलर मिसळला. त्यात चमचाभर डिटर्जंट पावडर घालून पाणी घालून मिश्रण तयार केलं. डिटर्जंट पावडर घातल्यावर कार्डबोर्ड पेपर किंवा थर्माकोलवर रंग पसरवणे सोपे जाते. ते तयार केलेलं रंगाच्या मिश्रणाने कापलेलं वांगं रंगवलं.

fancy dress brinjal 3.jpg

वर देठाच्या आणि पानाच्या जागी सुद्धा खरंतर हिरवा रंग द्यायचा होता. पण नीरजाने मजेंटा रंगाच्या बाटलीत आपला अंगठा बुडवून त्याचे ठसे त्यावर काढून ठेवले होते. Sad (फोटोत दिसताहेत ते). मग रविवारी संध्याकाळी हिरव्या रंगाचा घोटीव कागद आणून तो त्या आकारात कापून वांग्यावर चिकटवून टाकला. ते करतानासुद्धा नीरजाने फेविकॉलची ट्यूब आपल्याच हातावर भसकन् दाबून बराचसा फेविकॉल वाया घालवला. जमेल तेवढा फेविकॉल गोळा करून ट्यूबमध्ये परत यशस्वीपणे भरला. (आम्ही 'कान्हेरे' Wink ) पण तरीही थोडा तिच्या हातावर राहिला होताच. तो सुकल्यावर बया सालं काढण्यात गुंगून गेली. माझ्यासाठी ते बरंच झालं. तेवढीच माझ्या कामात लुडबूड कमी.. Happy

वांग्यावर जो गळा काढला होता त्याच्या दोन्ही टोकांना भोक पाडून त्यातून इलॅस्टिक घातलं. त्यामुळे ते वांगं नीरजाला व्यवस्थित गळ्यात घालता/ काढता येऊ लागलं.

आता राहिली शेंडी. त्यासाठी कार्ड पेपरवर खालील आकृती काढुन कापून घेतली.

cap.JPG

मग त्यावर तो हिरव्या रंगाचा घोटीव कागद चिकटवला. आणि तो आकार गोल वळवून फेविकॉलने चिकटवून आणि स्टेपलर पिन मारून फिक्स करून टाकली. त्याच्याही दोन्ही बाजूंना भोकं पाडून त्यातून इलॅस्टिक घातलं. ते तिला हेअरबँडसारखं कानाच्या मागे घालता येईल असं लावलं त्यामुळे समोरून दिसायचा प्रश्न नव्हता.

आणि हे आमचं फायनल प्रॉडक्ट तयार झालं. Happy

fancy dress brinjal 1.jpg

ह्या कार्यक्रमाच्या दिवशी शाळेत सर्वांसमोर जी काय वेशभुषा केली असेल त्यावर गाणं पण म्हणायचं होतं, ते सुद्धा इंग्लिशमधून. ब्रिंजलवरची कुठलीही पोएम मला आठवत नव्हती. त्यामुळे ती तयार करून नीरजाकडून पाठ करून घेणं हे एक मोठं आव्हान होतं.

I am miss Brinjal
Purple and Green
Cook me with spice
or mix me with rice
I am very tasty
healthy and strong
If you'll eat me
you'll live long

अश्या तीन दिवसांच्या खडतर मेहनतीनंतर आमचं 'वांगं' तयार होऊन शाळेत गेलं. Happy

नर्सरीच्या मुलांना आवडती भाजी/ फळं/ फुलं हा विषय होता. ज्युनियर केजीच्या मुलांना 'आवडतं फुल' आणि सिनियर केजीच्या मुलांना 'आवडता प्राणी/पक्षी'. त्यामुळे स्कूलबसमध्ये लई धमाल होती. Happy मांजरं, ससे, द्राक्षं, सुर्यफुलं, गाजरं, चेर्‍या, कांगारू, गाई, स्ट्रॉबेर्‍या, गुलाब, आंबे वगैरे मस्त सरमिसळ होती. त्यांच्या सगळ्यांच्या 'अ‍ॅक्सेसरीज्' सांभाळताना बसमधल्या मावशी आणि दादाची अगदी भंबेरी उडाली होती. Lol

गुलमोहर: 

वा! मस्तच.. भारीच काम असतं हे मुलांची सजावट, प्रोजेक्ट्स म्हणजे.. छान केलं आहेस मन्जू.. नीरजा एकदम क्यूट दिस्त्ये Happy कविताही सहीये.. हे सगळं माझ्या मुलाला दाखवते, कविता ऐकवते अन् बघते तो खायला लागतो का वांगं Happy

व्वा! सही एकदम Happy कविता पण छान आहे. मी हे आता सानिकाला दाखवते Happy (मावशी बाई माझी काळजी मिटली काय करायच कस करायच ह्याची. काही लागल तर मंजु मावशीला कॉलायच ;))

खुपच छान..........................

Pages