समांतर !

Submitted by कवठीचाफा on 8 November, 2009 - 02:24

" गडकरी काका आत्ता पाच मिनीटांपुर्वीच तुम्ही कॅश विथड्रॉ केलीत ना? मग पुन्हा..? कमी पडली की काय?" समोरच्या पोरगेल्याशा कॅशीयरने विचारलेल्या प्रश्नाने गडकरी पुन्हा एकदा चमकले. गेल्या सहा महीन्यात त्यांना याचप्रकारचे तिन-चार अनुभव आले होते. नेमकं सांगायचं तर त्यांना झालेल्या अपघातानंतर महीनाभरातच हे प्रकार सुरु झाले होते.

" आहो, जाताना चिंटूचा डबा घेउन जा बरं का ! आज पुन्हा बिचारा डबा न घेताच गेला." शालिनीताई म्हणजे गडकरींच्या पत्नींनी आतुन हाक दिली.
महीन्यातुन चार-दोन वेळा असे प्रसंग घडतच असतं. अकाली जडलेल्या गुडघेदुखीमुळे शालिनीताईंना कधी कधी रात्र रात्र झोप लागत नसे त्यामुळे सकाळी उठायला उशीर.. गडकरींच्या त्रिकोणी कुटूंबातला तिसरा कोन म्हणजे त्यांचा जरा उशीराच जन्मलेला मुलगा चिन्मय, वेळेच्या बाबतीत पक्का काटेकोर. शाळेत निघताना एखादे मिनीट देखील उशीर त्याला खपायचा नाही. अश्यावेळी तो डबा न घेताच शाळेत जायचा, मग तो पोहचवायची जबाबदारी गडकरींवर यायची. त्यांनाही त्याचे फ़ारसे काही वाटायचे नाही कारण ऑफ़ीसच्या वाटेवरच एका वळणाच्या अंतरावर त्याची शाळा होती.
आठवणीने चिंटूचा डबा घेउन गडकरी बाहेर पडले. त्याच्या शाळेत डबा पोहचवुन पुन्हा ऑफ़ीसकडे निघाले जेमतेम अर्धा किलोमीटर गेले असतील नसतील ताबा सुटलेल्या एका ट्रकने त्यांच्या स्कुटरला धडक दिली. गडकरी एखाद्या खेळण्यासारखे दुर फ़ेकल्या गेले. जमिनीवर आपटल्यावर डोक्यातुन निघणारी जिवघेणी वेदना आणि डोक्याच्या अवती भवती जमणार्‍या गरम चिकट द्रवाची त्यांना कल्पना येण्यापुर्वीच त्यांची शुध्द हरपली.

त्या नंतर गडकरींची पुढची जाणिव थेट तीन महीन्यांनी त्यांच्या मेंदुने नोंदवली. अपघातानंतर तिन महीने ते कोमात होते. त्या तिन महीन्यात बर्‍याच उलाढाली झालेल्या दिसत होत्या. शालिनीताईंचा चेहरा ओढल्यासारखा दिसत होता, बाजुला उभा असलेल्या चिंटूच्या चेहर्‍यावर जबाबदारीची जाणिव दिसत होती. गडकरींच्या अपघाताची बातमी कळताच आघात सहन न होऊन शालिनीताईंना हार्टअ‍ॅटेक आला होता, त्यात त्या मृत्युच्या जबड्यातुन बाहेर आल्या होत्या. इतके सारे घडले पण गडकरींच्या कंपनीने त्यांना मदतीचा हात दिल्याने कदाचीत त्यांच्यावर योग्य ते उपचार व्यवस्थितपणे झाले.

महीनाभरातच गडकरी पुन्हा नोकरीत रुजु झाले. आता सारं काही सुरळीत होणार असं वाटत असतानाच त्यांच्या बाबतीत ते चमत्कारीक प्रसंग सुरु झाले.
दुपारचा चहा कँटीनमधे न घेता ऑफ़ीस जवळच्या शंकरच्या टपरीवर घ्यायचा त्यांचा प्रघात होता. एकतर तिथे चहा फ़ारच सुंदर मिळत असे आणि त्यात टपरीवर सहसा न अढळणारी कटेकोर स्वच्छता शंकर पाळत असे. पुन्हा ऑफ़ीसला यायला लागल्यापासुन गडकरींनी आपला नित्यक्रम पुन्हा सुरु केला.

त्या दिवशी गडकरी नेहमीसारखेच शंकरच्या टपरीवर चहा घ्यायला गेले. त्यांना बघुन शंकर चकित झालेला दिसला.
" आज मनं लागना जनु कामात, पुन्यांदा आलायसा ते?" चहाचा कप हातात देता देता शंकर म्हणाला. गडकरींनी त्याच्याकडे विचीत्र नजरेने पाहीले.
" काय शंकरराव आज गिर्‍हाईकी जास्त झाली की काल तुम्हाला ‘जास्त’ झाली?" ‘जास्त’ वर जोर देत गडकरी म्हणाले
"म्हंजी......?" बोलण्याचा रोख शंकरला कळला नाही.
" अरे हा आत्ताच येतोय मी तुझ्याकडे आणि तो ही नेहमीच्याच वेळी."
" आयच्यान सायेब, धाच मिन्ट आधी येउन गेलासा की तुम्ही."
" नाही रे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय"
" धंद्याची आण घेउन सांगतो सायेब आत्ताच तुमी येउन गेलासा मी तुमाला च्या बी दिला आनी काय बी न बोलताच तुमी च्या घेउन गेलासा की"
" अरे राहु दे रे, होतं असं कधी कधी" मग तो विषय बाजुला टाकुन गडकरींनी इतर विषयांवर बोलणे सुरु केले.
हा प्रसंग कदाचीत ते विसरुनही गेले असते पण दहा-पंधरा दिवसांच्या अंतराने पुन्हा असाच प्रसंग घडला फ़क्त वेळ आणि जागा वेगळी.

दर महीन्याच्या शेवटी चालु महीना आणि गेला महीना यांचा लेखी ताळेबंद तपासुन पहाण्याची गडकरींना सवय होती. दर महीन्याचे लेखी रेकॉर्ड रेकॉर्डरुम मधे ठेवले जायचे तिथुन सही करुन ते थोड्यावेळाकरीता फ़ाईल आपल्या टेबलावर आणत. त्या ही महीन्याच्या शेवटच्या दिवशी ते मागल्या महीन्याची फ़ाईल आणण्यासाठी रेकॉर्डरुमला गेले. त्यांना बघितल्या बघितल्या तिथला शिपाई म्हणाला.
" साहेब आठवली का कुठली फ़ाईल हवीय ती?"
" त्यात आठवायचेय काय? इंपोर्टेड रॉ मटेरीयलची फ़ाईल काढ"
" दर महीन्याला तीच नेता साहेब मग आजच कसे विसरलात? "
" कुठे विसरलो? तुला सांगितली की आत्ताच"
" पण, मघाशी तुम्हाला आठवत नव्हते ते बराच वेळ...."
" मघाशी..? मघाशी कुठला, आत्ताच येतोय मी"
" नाही साहेब, विस मिनीटांपुर्वीपण आला होतात की ! पण फ़ाईल आठवली नाही म्हणुन परत गेलात"
" असं कसं होईल रे, दर महीन्याला मी एकच फ़ाईल नेतो विसरेन कसा?"
" तेच म्हणतो मी मघाशी कसे विसरलात?"
" बस झालं हं, मी आजच्या दिवसात पहील्यांदाच येतोय"
" थट्टा करता का साहेब गरीबाची? बरं असु दे ही घ्या फ़ाईल आणि हे रजिस्टर मारा सही"
गपचुप रजिस्टरवर सही करुन गडकरींनी फ़ाईल घेतली आणि बाहेर निघाले दरवाजाजवळ असताना त्यांनी डोळ्याच्या कोपर्‍यातुन आत पाहीले तर तो शिपाई चमत्कारीक नजरेनं त्यांच्याकडे पहात होता.

त्या नंतरच्याच आठवड्यात पुढचा अनुभव आला.
दर महीन्याच्या किराण्याची यादी शालिनीताई दुकानात देत असत आणि दुकानदाराचा पोर्‍या ते त्यांच्या घरी पोहचवुन पैसे घेउन येत असे. एक दोन दिवसात ऑफ़ीसातुन घरी येताना गडकरी त्याच्याकडून पक्के बिल घेउन येत असत पक्क्या बिलाशीवाय काहीही व्यवहार करणे त्यांच्या मनाला पटत नसे. यावेळी बिल घ्यायला गेल्यावर दुकानदाराने बिल तर दिले पण.....
" गडकरी साहेब आधीचं बिल पडलं की काय कुठे?"
" नाही.. " अर्थ न समजुन गडकरी म्हणाले.
" नाही, पुन्हा बिल घ्यायला आलात म्हणुन विचारलं, त्याचं काय आहे साहेब.....
दुकानदार पुढे बोलत राहीला पण गडकरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्याने नक्कीच गेल्या तासाभरातली एखादी वेळ सांगीतली असती गडकरी विचारात पडले ‘ आपण विसरभोळे बनत चाललोय की काय?’
त्याच विचारांच्या नादात ते घरी आले ‘ असं का होतं असावं? आपली स्मरणशक्ती आपल्याला दगा देते? एकदा केलेली गोष्ट आपण पार विसरुन जातो?’ अनेक प्रश्नांनी गडकरींचा मेंदु पोखरल्या जायला लागला. त्यांनी आपले सगळे खिसे समोरच्या टीपॉयवर उलटे केले. कदाचीत आधी घेतलेलं वाण्याचं बिल त्यात सापडेल म्हणुन, पण छे..... त्यांच्या खिशात, पाकिटात कुठेही दुसरं बिल त्यांना सापडलं नाही. ‘ मग ते कोण घेउन गेलं?’ या सगळ्या प्रकारात शालिनीताई केंव्हातरी समोर चहाचा कप ठेउन गेल्या हे ही त्यांना कळलं नव्हतं ‘ शालिनीला सांगावं का?’ गडकरींच्या मनात विचार येउन गेला ‘ पण नको, नाहीतरी अ‍ॅटॅक येउन गेल्यापासुन ती जरा हळवीच झालीय कधी कधी अबोलही असते, तिला आणखी त्रास नको’ मनातल्या विचारांना मनातच दडपुन गडकरी पुढच्या उद्योगाला लागले.

त्यानंतर एक आठवडाही झाला नसेल तर हा आताचा बँकेतला प्रकार. मुद्दाम त्यांनी मघाची विथड्रॉ स्लिप पहायला मागीतली. खरंतरं हे नियमबाह्य होतं पण कॅशीयरचे आणि त्यांचे संबंध लक्षात घेता त्याने ती दिली. त्यावरच्या सहीकडे गडकरी झपाटल्यासारखे पहात राहीले, तंतोतंत त्यांचीच सही होती ती ‘ मग मघाशी आपण काढलेले पैसे गेले कुठे?’

ऑफ़ीसातही गडकरींचे लक्ष कामात लागत नव्हते. समोरच्या फ़ाईलकडे सुन्नपणे ते पहात बसलेले असताना अचानक त्यांच्या खांद्यावर कुणीतरी टकटक केले. दचकुन त्यांनी बाजुला पाहीले, त्यांचा सहकारी शिलेदार तिथे उभा होता. तसा शिलेदार त्यांच्यापेक्षा वयाने लहानच होता पण त्यांचे त्याचे चांगले जमत असे, दोघांचेही घरच्यासारखे संबंध होते.
" गडकरी बरेच दिवस पहातोय, तुमचे काहीतरी बिनसलेय" तो त्यांना आहो जाहो करत असे.
" छे रे, तसं काही खास नाही जरा थकवा जाणवतोय इतकंच"
"तुम्ही काही सांगु नका, हल्ली तुमचं कामात लक्श लागत नाही. मधेच कुठेतरी शुन्यात पहात बसता, काही प्रॉब्लेम आहे का?" आपुलकीने शिलेदारने विचारले.
‘याला सांगावं की नाही?’ या विचारात गडकरी सेकंदभर घुटमळले पण एकुणच शिलेदारशी असलेले मित्रत्वाचे संबंध पहाता त्याला विश्वासात घेणे गडकरींना योग्य वाटले. कदाचीत त्याच्याशी बोलल्यावर मनावरचं दडपण तरी कमी होण्याची शक्यता होती !
" शिलेदार, चल आपण कँटीनमधे बसु" उघडपणे गडकरी इतकेच म्हणाले.
एरव्ही कधिही टाईमपास न करणारा माणुस आपल्याला चल म्हणतोय याचा अर्थ काहीतरी सिरीयस गोष्ट असणार याची शिलेदारला जाणिव झाली.

" बोला गडकरी काय प्रॉब्लेम आहे? माझी काही मदत होऊ शकते का?" चहाचे कप काउंटरवरुन उचलुन टेबलाजवळ येत शिलेदारने विचारले.
" तसं म्हणशील तर प्रॉब्लेम आहे सुध्दा आणि नाही सुध्दा, कदाचीत माझ्या मनाचेच खेळ असतील ते" गडकरी चाचरत राहीले.
" तुम्ही मोकळेपणे सांगा तर खरं, मग पाहू काय असेल तर "
या नंतर गडकरी विसएक मिनीटं बोलत राहीले. शंकरच्या टपरीवर आलेल्या अनुभवापासुन ते कालच्या बँकेतल्या घटनेपर्यंत त्यांनी न अडखळता सगळी हकीगत शिलेदारला सांगितली.
" मला वाटतं गडकरी ही गोष्ट खरंच सिरीयस आहे" इतकावेळ त्यांचे बोलणे मन लाउन ऐकणारा शिलेदार म्हणाला.
" अरे, त्यात काय इतकं सिरीयस ? होतो असा विसराळूपणा कधी कधी" मनावरचं दडपण कमी झाल्याने गडकरींना मोकळं वाटत असावं.
" नाही.. हे सारं इतकं सरळ नाही. तुमच्या हकिगतीत असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं तुम्हालाच मिळालेली नाहीत"
" म्हणजे.."
" दुकानातुन घरी गेल्यावर तुम्ही सगळे खिसे तपासलेत मग वाण्याकडून घेतलेलं पहीलं बिल का नाही सापडलं?"
" हरवलं असेल कुठेतरी"
" बँकेतुन काढलेल्या पैशाचं काय?"
"अं....."
" हा सरळ साधा विसराळूपणा नाहीये गडकरी, तसं असतं तर तुम्ही तुमची हकिगत न अडखळता सांगु शकला नसतात. दुसरी गोष्ट जर वेळेचा विचार केलात तर तुम्ही एकाच जागी दोनदा जाण्याइतपत तफ़ावत नक्कीच नाहीये म्हणुन मला असं वाटतं की यात एखाद्या जाणकाराचा सल्ला आवश्यक आहे"
" जाणकाराचा? एकदम.....?"
" होय या घटनांमागे तुमच्या अपघाताची पार्श्वभुमी आहे हे विसरु नका" त्यांचं बोलण मधे तोडत शिलेदार म्हणाला.
" हो पण जाणकार म्हणजे नक्की कोण?"
" माझे एक स्नेही आहेत डॉक्टर पराशर म्हणुन ते न्युरॉलॉजीस्टही आहेत आणि मनोचिकीत्सकही आहेत आपण त्यांची भेट घेउ"
यावर गडकरी थोडे चिडले त्यांची समजुत काढून त्यांना पराशरांची भेट घेण्यासाठी तयार करायला शिलेदारला थोडे श्रम पडले पण अखेरीस ते तयार झाले.

दुसर्‍याच दिवशी शिलेदारच्या ओळखीमुळे डॉ. पराशरांची भेट ठरली. त्याच्यासहच गडकरी पराशरांच्या क्लिनीकमधे गेले. बाहेर आजिबात गर्दी नव्हती त्यामुळे जरा प्रश्नार्थक नजरेनेच गडकरींनी शिलेदारकडे पाहीले त्याचा अर्थ लक्षात आल्याने त्याने काही न बोलताच दरवाजावरच्या पाटीकडे त्यांचे लक्ष वेधले. ओह, ही भर दुपारची वेळ त्यांच्या भेटण्याची नव्हती तर, खास शिलेदारच्या ओळखीदाखल ते गडकरींची भेट घेत होते बहुदा.
समोरचा गुबगुबीत दरवाजा ढकलुन गडकरींनी आत पाऊल टाकले, एकदम वेलफ़र्निश्ड रुम होती ती. समोर ठेवलेल्या काचेच्या टेबला पलिकडे बसलेल्या डॉक्टर पराशरांनी त्यांचे स्वागत केले, एव्हाना शिलेदारही आत आला होता.
काही काळ इतकडच्या तिकडच्या गप्पा चहासोबत झाल्यावर त्यांनी गडकरींना प्राथमीक तपासणीसाठी बाजुच्या रुम मधे चलण्याची सुचना केली. कदाचीत शिलेदारने त्यांच्या प्रॉब्लेम बद्दल आधीच कल्पना देउन ठेवली असावी कारण त्यांनी त्याबद्दल काहीच विचारले नाही.
जुजबी चाचण्या झाल्यावर पराशरांनी गडकरींना अनेक प्रश्न विचारले. आधिच्या आयुष्याबद्दल, घरातल्या वातावरणाबद्दल, ऑफ़ीससंदर्भात आणि इतरही अनेक. त्यातुन त्यांचे समाधान झाले की नाही ते समजायला मार्ग नव्हता. अखेर त्यांनी गडकरींना बाहेर चलण्याची खुण केली आणि गडकरी बाहेरच्या टेबलाजवळ शिलेदारच्या शेजारी जाउन बसले.
" मला वर वर तरी चिंतेचे काही कारण दिसत नाही. अर्थात पुर्ण चेक अप शिवाय मी काही खात्री देउ शकणार नाही " बाहेर येउन आपल्या खुर्चीत विसावल्यावर पराशर म्हणाले.
" पण मग.. यांना आलेले अनुभव?" शिलेदारनेच परस्पर विचारुन टाकले.
" म्हणुनच मी म्हणालो पुर्ण चेक-अप करावा लागेल. त्याचं काय असतं मानवी मन कधी कधी चुकीच्या कल्पना करुन घेतं. अर्थात एक न्युरॉलॉजीस्ट म्हणुन ‘मन’ या संज्ञेलाच मान्यता देत नाही, कारण ‘मन’ हा अवयवच शरीरात अस्तित्वात नसतो. मेंदूने उभी केलेली ती एक प्रतीमा आहे. तर एकुणच मन हा एक फ़सवा प्रकार आहे. पंचेद्रीयांनी दिलेल्या माहीतीचा अर्थ लाउन आपल्या समोर सादर करण्याचे मेंदूचे ते एक साधन आहे. कधी कधी ही माहीती त्यालाच अनाकलनीय असेल तर तो सर्वात जवळचा अर्थ लाउन टाकतो. मग तयार होतात विभ्रम, हे मानसीकही असतात पण गडकरींच्या केसमधे इंटर्नल डॅमेजची शक्यता जास्त वाटते. त्यांना झालेल्या अपघातात मेंदूला झालेल्या इजेचे हे कदाचीत उशीरा जाणवलेले पडसाद असतील.
" मग आता काय करायचं?" गडकरींचा सवाल.
" सध्या तरी मी काहीच उपचार सांगत नाही, पण उद्या तुम्ही माझ्या हॉस्पिटलमधे या, तिथे सी.टी. स्कॅन, ई.ई.जी. केल्यावर साधारण कल्पना येईल. हे माझं कार्ड ठेवा यामुळे तुम्हाला हॉस्पिटलमधे कुठेही अडथळा न येता माझ्यापर्यंत पोहोचता येईल."

पराशरांचा निरोप घेउन दोघेही बाहेर पडले. स्कॅनींग, इ.इ.जी. असले शब्द ऐकल्याने गडकरींचे डोके सुन्न झाले होते, म्हणुन त्यांना जरा बरे वाटावे यासाठी त्यांना घेउन शिलेदार शहराच्या बाजुला असलेल्या एका तळ्याकिनारी गेला.
" पराशरांच्या बोलण्यातुन काहीच जाणवलं नाही पॉझेटीव्ह किंवा निगेटीव्ह " गडकरींनी मनातला प्रश्न मांडला.
" शेवटी ते एक डॉक्टर आहेत, पुर्ण खात्री झाल्याशीवाय काहीच सांगणार नाहीत"
" पण मग हे स्कॅनिंग वगैरे..?"
" एक रुटीन चेक-अप म्हणुन करुन घ्यायचं, तेवढच शंका निरसन."
" माझ्या बाबतीत असं का घडत असेल रे ?" गडकरींचा आर्त प्रश्न.
" तेच तर शोधुन काढायचा आपण प्रयत्न करतोय. बरं ते जाउ दे ! चिंटूच्या ख्रिसमसच्या सुटीचे काय कार्यक्रम आहेत? उद्यापासुनच चालु होतेय ना ?" शिलेदारने मुद्दाम विषय बदलला.
" तो त्याच्या मावशीकडे रहायला जाणार आहे, बरेच दिवस त्यालाही शांतता नाही "
या नंतरही ते बराच वेळ बोलत राहीले. पार सुर्य मावळतीकडे उतरुन अंधार पसरायला लागे पर्यंत. यामुळे एक गोष्ट मात्र साध्य झाली गडकरींच्या मनात कोंडून राहीलेली चिंता काही काळ बाजुला पडली आणि त्यांना जरा मोकळं मोकळं वाटायला लागलं.

दुसर्‍या दिवशीची सिकनोट पाठवुन गडकरी पराशरांच्या हॉस्पिटलात गेले. पराशरांचं म्हणणं रास्त होतं, त्या इतक्या मोठ्या पसार्‍यात पराशरांना भेटायला बरेच कष्ट पडले असते पण त्यांच्या कार्डमुळे सगळे अडथळे बाजुला होऊन पंधराव्या मिनीटाला गडकरी पराशरांच्या केबीनमधे होते.
" गडकरी तुम्ही कसे काय..?" पराशरांच्या स्वरावरुन गडकरींचं येणं त्यांना अपेक्षीत नव्हतं असंच जाणवत होतं.
" तुम्हीच तरं बोलावलं होतंत ना?"
" हो, पण कालच्या तुमच्या बोलण्यावरुन वाटलं नव्हतं तुम्ही याल असं"
" मी कुठे काही बोललो होतो? शिलेदारच तर बोलत होता तुमच्याशी" गडकरींना अचंबा वाटला.
" तेंव्हा नाही, आर्ध्या तासानं तुम्ही पुन्हा आलात एकटेच, तेंव्हाचं बोलतोय मी"
"मी..? पुन्हा आलो होतो? इथुन बाहेर पडल्यावर तर मी थेट तळ्याकाठी गेलो होतो हवं तर शिलेदारला विचारा, तोही होता माझ्या बरोबर."
इथे पराशरांचा चेहरा गोंधळात पडल्यासारखा दिसु लागला.
" नक्की तुम्ही तळ्याकाठी गेला होतात?" पराशरांच्या आवाजात शंका होती.
" हो, वाटल्यास शिलेदारला फ़ोन करुन विचारु शकता"
" ते आपण नंतर पाहू, जर तुम्ही खरंच तिथे होतात तर आधी ही कॅसेट ऐका".
" कसली..?"
" मी मनोचिकीत्सक आहे, माझ्या प्रत्येक पेशंटशी होणारं संभाषण मी रेकॉर्ड करुन ठेवत असतो. त्याचा पुढे मला केसस्टडीसाठी उपयोग होतो. काल दोन्ही वेळी रेकॉर्डींग चालु होतं."
जवळच्या कॅसेटप्लेअरमधे एक कॅसेट सरकावत पराशरांनी तो चालु केला. काही क्षणांच्या शांतते नंतर पराशरांचा आवाज केबीनमधे घुमु लागला. पराशर कुणालातरी पुन्हा येण्याचे कारण विचारत होते. त्यांच्या प्रश्नानंतर काही सेकंदांच्या अंतराने आणखी एक आवाज तिथे घुमला, तो आवाज ऐकताच गडकरींच्या मानेवरचे केस ताठ उभे राहीले, तो त्यांचाच आवाज होता पण भाव विरहीत आणि धमकीभरला. टेस्ट न करण्याबद्दल तो आवाज पुन्हा पुन्हा पराशरांना धमकावीत होता.
खट्टSS.. आवाज करत टेपचा खटका बंद झाला आणि तेवढ्याही आवाजाने गडकरी विलक्षण दचकले.
" ऐकलत..?" केबीनच्या दारात असलेले पराशर गडकरींना विचारत होते.
" हो..... पण.. मी .. तुम्ही शिलेदारला फ़ोन करा "
" त्याची आता गरज नाहीये तुम्हाला कदाचीत वाईट वाटेल पण मी आत्ताच शिलेदारांना फ़ोन केला होता. तुम्ही पुर्णवेळ त्यांच्याच बरोबर होतात."
" मग..? तुमच्या क्लिनीकवर आलेला तो कोण असावा? कदाचीत माझ्यासारखा दिसणारा कुणी.....?"
" नाही , तुमच्यासारख्या दिसणार्‍या कुणाला माझ्या क्लिनीकमधली आपली चर्चा कळणार नाही कारण माझं क्लिनीक साउंडप्रुफ़ आहे."
" मग असं कसं घडलं?"
" मला जरा वेगळाच संशय येतोय, कधी कधी मानवी विचारशक्तीच्या पलिकडल्या काही घटना घडतात, का त्याचं उत्तर माहीत नाही पण माझ्या ओळखीतले एकजण आहेत जे कदाचीत याचा योग्य अर्थ लावु शकतील. हा त्यांचा पत्ता, लोक त्यांना आचार्य म्हणतात" कागदावर एक पत्ता लिहून देत पराशर म्हणाले " निःसंकोचपणे जा आणि त्यांच्याशी बोला एखादा मार्ग नक्की निघेल."

हे सगळं वर्णन गडकरींच्याकडून ऐकताना शिलेदारचा चेहरा गंभीर होत गेला. हॉस्पिटलमधुन परतल्यावर गडकरींनी थेट त्याची भेट घेतली होती.
" जर पराशरांनी आचार्यांची भेट घ्यायला सांगीतलीय तर प्रकार तसाच गंभीर असणार"
" तु ओळखतोस त्यांना?" गडकरींच्या मनात वेगळीच शंका.
" होय, एकदाच भेटीचा योग आला त्यांच्या पण एकाच भेटीत पुन्हा न विसरता येण्यासारखी छाप पडली त्यांची"
" ते कुणी मांत्रीक वगैरे आहेत का?"
" हे फ़ार खुजे शब्द आहेत, ते असल्या सार्‍यांच्या वरती आहेत" शिलेदार जे बोलला तेच इतके गहन वाटत होते की पुढचे त्यांचे बोलणेच खुंटले. आचार्यांकडे त्यांच्यासोबत येण्याचे आश्वासन देउन शिलेदारने त्यांची रजा घेतली.

ठरल्याप्रमाणे त्याच संध्याकाळी शिलेदार आणि गडकरी आचार्यांकडे निघाले. शिलेदार बरोबर असल्याने पत्ता शोधायला काहीच त्रास पडला नाही.
ते एक दुमजली टूमदार घर होतं. आत प्रवेश करतानाच दुतर्फ़ा असलेल्या वेगवेगळ्या फ़ुलझाडांच्या कुंपणासारख्या रचनेपलीकडे काही मुद्दाम लावलेल्या वनस्पती दिसत होत्या. घरात प्रवेश करताच लागलेल्या एका मोठ्या हॉलमधे काही माणसं विखरुन बसलेली दिसली. सगळेच चिंताक्रांत चेहरे. ‘यांच्या चिंतांच निवारण खरंच होतं असेल का इथे?’ गडकरींच्या मनात विचार आला. जवळच्याच एका सोफ़्यावर ते दोघेही बसले.
एक एक करुन लोक आत जात होते, बाहेर येत होते सगळा निशःब्द कारभार. त्यांची वेळ आल्यावर तेही आत गेले.
दारावरचा पडदा लोटून आत प्रवेश करताच इतकावेळ मनावर असलेला जडपणा एकदम गळून पडला. समोर मांडलेल्या सामान्यशा खुर्चीत बसलेल्या साधा कुर्ता पायजमा घातलेल्या प्रसंन्न चेहर्‍याच्या गॄहस्थांनी त्यांचे लक्ष वेधुन घेतले. तेच आचार्य असावेत. आत्तापर्यंत त्यांच्या नावामुळे मनात केलेल्या सार्‍या कल्पना साफ़ कोलमडून पडल्या. समोरच मांडलेल्या खुर्च्यांकडे निर्देश करत आचार्यांनी त्या दोघांना बसण्याची खुण केली.

खुर्चीत बसल्यावर गडकरींनी त्या खोलीचा अंदाज घेतला. जमिनीवर अंथरलेल्या लाल गालीच्यावर मांडलेल्या चार खुर्च्या आणि त्यांच्या मधोमध असलेले एक काचेचे टिपॉय याखेरीज काही फ़र्नीचर दिसत नव्हते. हांSS आजुबाजुला खास उंच फ़ुलदाण्यांमधे ठेवलेल्या भरगच्च फ़ुलांच्या गुच्छांची त्यात भर पडत होती. कदाचीत खोलीत रुम फ़्रेशनर मारला असावा त्याचा मंद सुवास अजुनही वातावरणात दरवळत होता. पुन्हा एकदा त्यांची नजर समोर गेली, आचार्य सस्मित नजरेने त्यांच्याचकडे पहात होते.

मोजक्याच शब्दात गडकरींनी आपली हकिगत त्यांना ऐकवली. ते ही लक्षपुर्वक ऐकत राहीले. गडकरींचं बोलणं पुर्ण होताच त्यांनी काहीतरी खास कळल्याप्रमाणे किंचीत हसत मान डोलावली.
" आता जरा तुमच्या त्या अपघाताबद्दल सांगता का?" प्रथमच आचार्यांनी शब्द उच्चारले. त्यांच्या आवाजात दिलासा देणारा एक विलक्षण स्वर होता, एक विश्वासाची भावना होती.
गडकरींनी पुन्हा आपल्या अपघाताच्या वेळची घटना खुलासेवार त्यांना सांगीतली.
" जमीनीवर कोसळल्यापासुन ते पुन्हा शुध्दीवर येईपर्यंत तुम्हाला काही खास आठवण, जाणिव स्मरते का?" पुन्हा तितक्याच मार्दवाने प्रश्न विचारल्या गेला.
" नाही मधल्या काळातलं मला काहीच आठवत नाही."
या नंतर आचार्यांनी आणखी काही प्रश्न विचारले त्यांचा एकुण रोख त्यांच्या दिनक्रमावर, घरच्या मंडळींच्या मनस्थितीवर होता. अनेक लहान लहान प्रसंगांबद्दल त्यांनी खोदुन खोदुन विचारले. एकंदरीत त्यांना हवी असलेली बरीच माहीती त्यांनी मिळवली असावी. त्यांचे प्रश्न संपताच प्रश्नार्थक नजरेने गडकरी आचार्यांकडे पहात राहीले. त्यांच्याकडे लक्ष गेल्यावर आचार्य पुन्हा निर्मळ हसले.
" हे पहा गडकरी, वरवर साध्या दिसणा-या प्रसंगात काही गर्भितार्थ असतात. तुमच्या बाबतीत तो गर्भितार्थ निश्चीत चांगला नाही"
" म्हणजे भुत प्रेत असलं काही..?"
" ही सगळी आपण दिलेली नावं आहेत गडकरी, त्या पलिकडे त्या काही बर्‍यावाईट शक्ती असतात"
" म्हणजे..? मी समजलो नाही आचार्य"
" सध्यातरी तेच बरं आहे, कधी कधी अज्ञानात जी सुरक्षीतता लाभते तीचा ज्ञानातुन भेद होतो. तरीही मी तुम्हाला जास्त अंधारात ठेवत नाही." थोडं थांबुन आचार्य म्हणाले " माणुस मरतो म्हणजे काय? तर या शरीराचं बंधन तोडून शरीरात असलेल्या शक्तीला बाहेरच्या अंतराळात जायचा दरवाजा उघडतो. केंव्हा केंव्हा जिवनाच्या दुर्धर आसक्तीने मानवी मन तीला परत शरीरात खेचुन आणते. अश्यावेळी नेमकं काय घडत असेल? बाहेरच्या अंतराळात उघडलेल्या त्या दरवाजातुन जिवनशक्ती तर परत येतेच पण तीच्या पाठोपाठ आणखीही एखादी शक्ती आपल्या आवकाशात प्रवेश करते. सनातन कालापासुन मानव ज्या वाईट शक्तींना आपल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेने दुसर्‍या अंतराळात भिरकावुन देत आलाय त्यातलीच एखादी शक्ती जर अशी परत आली तर? सोप्या भाषेत सांगायचे तर घराबाहेर दबा धरुन बसलेले दरोडेखोर आपण बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडल्यावर घरात शिरले तर जे काही घडू शकेल तेच इथे घडते. तुमच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार घडलाय हे निश्चीत आणि आता हे जे काही आलं आहे त्याचा हेतु निश्चीत चांगला नाही."
" तो कशावरुन..?"
" तुमच्या अनुभवांवरुन ते सिध्द होतयं, पहील्यावेळी त्याने तुमच्या बाह्य शरीराची केवळ नक्कल केली. दुसर्‍यावेळी त्याने तुमच्या सवयीचा फ़ायदा घेत पुढे सरकुन पहाण्याचा प्रयत्न केला. तिसर्‍यावेळी त्याने त्यात थोडेफ़ार यशही मिळवले. चौथ्यावेळी त्याने तुमच्या अस्तित्वाचीच यशस्वी नक्कल केली यावरुन असे नाही का वाटत की कुणीतरी तुमची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे! "
" पण.. मग तो एखादा माणुसच असु शकत नाही का?"
" तुम्ही पराशरांना आलेला अनुभव विसरलेला दिसताय "
" मग आता काय करायचं? माझ्या त्या प्रतीकृतीने आणखी काही केले तर?"
" सध्या तरी आपण काही बचावात्मक मार्ग वापरुन पाहू. आता तुम्ही इथुन थेट घरी जा, बरोबर कुणीही नको आणि जाताना घरात शिरेपर्यंत एकही शब्द उच्चारायचा नाही. यानंतरच्या सुचना मी तुम्हाला वेळ येताच देईन. आता तुम्ही निघालात तरी चालेल."
आचार्यांचा निरोप घेउन गडकरी उठले आचार्यांनी दिलेली सुचना शिलेदारने ऐकलेली असल्याने त्यानेही तिथेच गडकरींचा निरोप घेतला.

घरी पोचायला गडकरींना रात्रीचे साडेनऊ- दहा तरी वाजले असतील. घराचे फ़ाटक उघडून आत शिरतानाच त्यांना घरातला अंधार जाणवला. चिंटू मावशीकडे जाणार होता, त्याला तिथे सोडून शालिनी अद्याप परत आलेली नसावी. दरवाजाजवळ पोहोचताच तो कुलुपबंद असेल या कल्पनेने त्यांनी खिशातुन चावी बाहेर काढली आणि कुलुपाचा अंदाज घेण्यासाठी हात कडीला लावला. कर्रर्रSS आवाज करत दरवाजा आत ढकलल्या गेला. ‘देवा ही दरवाजा उघडा ठेउन गेली की काय?’ गडकरींना शंका आली. तरीही शालिनीला हाक मारावी अशी तिव्र उर्मी त्यांना झाली, पण आजुन ते घरात शिरले नव्हते. आचार्यांनी दिलेली सुचना त्यांना पाळायची होती.
उंबरठ्यातुन आत पाउल टाकताच त्यांनी सवयीने उजव्या हाताला असलेल्या स्विचबोर्डवरचे दिव्याचे बटण दाबले. खट्ट.. आवाज झाला पणा दिवा लागला नाही, बहुदा या भागातली विज नेहमीप्रमाणेच गेली असावी. ‘शालिनी घरात असावी का?’ गडकरींच्या मनात विचार आला. प्रवासाने जर शालिनीताईंच्या गुडघेदुखीचा त्रास पुन्हा सुरु झाला असला तर त्यांना जागचे हलता येणं शक्य होणार नाही याची कल्पना गडकरींना होती.
घरातला इंच नी इंच परीचयाचा असल्याने किचनमधे जाउन मेणबत्ती पेटवुन आणणं हे गडकरींसाठी कठीण काम नव्हते.

आपल्यामागे दरवाजाला आतुन कडी घालुन चाचपडतच ते किचनमधे गेले. अंधारात मेणबत्ती शोधुना ती पेटवण्यासाठी त्यांनी काडेपेटी उचलली. खर्रर्रर्र, पहीली काडी नुसतीच पेटून विझली, दुसरी तिसरीही मेणबत्ती पेटवु शकल्या नाहीत अश्याच काही काड्या फ़ुकट गेल्यावर एकदाची मेणबत्ती पेटली. मेणबत्तीचा दुबळा प्रकाश त्या दाट अंधारात स्वतःपुरता मर्यादीत रहात होता. तरीही त्या इवल्याशा प्रकाशाचा मनाला केवढा दिलासा लाभत होता!
गडकरींनी शालिनीताईंना हाका मारायला सुरुवात केली, पण उत्तर नाही. संपुर्ण तळमजल्यावरच्या चारही खोल्या शोधुन झाल्या तरी शालिनीताई कुठेही दिसल्या नाहीत. बैठकीच्या खोलीत गडकरी असतानाच त्यांना वरच्या मजल्यावर काही हालचाल जाणवली. शलिनीताई बहुदा वरच्या बेडरुममधे असाव्यात असा अंदाज करुन गडकरी त्याच खोलीतुन वर जाण्यासाठी असलेल्या लाकडी जिन्याने वरच्या मजल्यावर गेले.
जिना चढून वरच्या मजल्यावर पाउल टाकले खरे, पण ताबडतोब इथुन निघुन घराबाहेर पडावं अशी भावना त्यांच्या मनात तिव्र व्हायला लागली.
" शालिनी, शालिनी अगं ओ तरी दे" अश्यावेळी मोठ्यानं बोललं की मनातली भिती जरा कमी होते. उत्तराची अपेक्षा होती पण उत्तर आलं नाही त्या ऐवजी पॅसेजच्या शेवटच्या खोलीत काही हालचाल मात्र जाणवली.
एव्हाना गडकरींच्या मानेवरुन घामाचे ओघळ वहायला लागले होते. आजुबाजुच्या दमट वातावरणाने असतील, ‘पण भर थंडीच्या दिवसात हवा अशी दमट कशी?’ मनातल्यामनात हा प्रश्न विचारला गेला, आणि गडकरींना वातावरणात होत असलेल्या बदलांची जाणिव व्हायला लागली. इतकावेळ स्वच्छ असलेल्या हवेत आता शिसारी आणणारा कुबट दर्प पसरायला लागला होता. श्वास घ्यायला त्रास होईल इतपत, जणु हवेतला ऑक्सीजन कमी झाला असावा. मघापासुन स्थिर असलेली मेणबत्तीची ज्योत अकारणच जोरात फ़डफ़डली. दचकुन गडकरींनी भिंतीचा आधार घेतला आणि तितक्याच दचकुन ते भिंतीपासुन बाजुला झाले. ऑईलपेंटने रंगवल्यामुळे गुळगुळीत असलेल्या भिंतीचा स्पर्श त्यांना वेगळाच वाटला होता. खात्री करुन घेण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भिंतीवरुन हात फ़िरवला, आणि पुन्हा तोच ओंगळवाणा चिकट बुळबुळीतपणा जाणवताच शहारुन त्यांनी हात मागे घेतला. हळूहळू आजुबाजुचा अवकाशच बदलत असल्यासारखा वाटत होता. नेहमी वावरल्याने परीचीत असलेल्या जमिनीवरच्या फ़रशांचा स्पर्श एखाद्या खडकाळ जमिनीवरुन चालल्यासारखा वाटत होता. पॅसेजच्या कठड्याचा आधार घ्यायचीही भिती वाटायला लागली, न जाणो त्यांचा स्पर्श एखाद्या जनावराच्या कातडीसारखा खरखरीत लागला तर ?

यापुढे जाण्याची हिंमत गडकरींच्यात नव्हती, पण मागे वळण्याचीही भिती वाटत होती कोण जाणे इतकावेळ कुणी मागे दबा धरुन बसलं असेल तर? नकोच ते. थरथरत्या शरीराने हातातली मेणबत्ती घट्ट धरुन त्यांनी मागे न बघताच एक एक पाउल मागे टाकायला सुरुवात केली. ‘जिन्याजवळ पोहोचलो की सुटलो’ मनात एक अंधुक आशा डोकावली. ते जिन्यापर्यंत पोहोचले असतील, नसतील शेवटच्या खोलीचा दरवाजा खाडकन उघडला गेला. बाहेरच्या अंधुक उजेडाच्या पार्श्वभुमीवर त्यांना दाराच्या चौकटीत उभ्या असलेल्या शालिनीताईंची बाह्याकृती दिसली.
"शालिनी इतकावेळ हाका मारतोय उत्तर का दिलं नाहीस?" अजाणतेपणे दोन पावलं पुढे टाकत गडकरींनी विचारले. तेवढ्यानेच मेणबत्तीच्या अपुर्‍या प्रकाशात समोरची अकृती येताच गडकरींच्या तोंडातुन एक अस्फ़ुट किंकाळी निघाली.
नेहमी व्यवस्थित अंबाडा घालुन आपले लांब केस जपणार्‍या शालिनीताईंचे केस अस्ताव्यस्त मोकळे होते. नेहमी टवटवीत वाटणारा त्यांचा चेहरा आता फ़िक्कुटलेला, पांढूरका दिसत होता. मोकळ्या केसांच्या पार्श्वभुमीवर तो जास्तच भयावह वाटत होता. ओठ मागे खेचल्या गेल्याने दात बाहेर आल्यासारखे दिसत होते. आपल्या कवड्यांसारख्या निर्जिव डोळ्यांतुन त्या गडकरींकडेच पहात होत्या.
धडपडून गडकरी मागे सरले त्या गडबडीत त्यांच्या हातातुन मेणबत्ती सुटून खाली पडली सुदैवाने ती न विझता तशीच गडाबडा लोळत जमीनीवर पडून राहीली.
एव्हाना शालिनीताई किंवा त्यांच्या रुपात जे काही असेल ते त्याने पुढे पावले टाकली. ‘असंच वळून धावत बाहेर पडता येईल का?’ गडकरींच्या मनात विचार आला, पण घराचा मुख्य दरवाजा तरी उघडला असता की नाही यात शंकाच होती. तरीही तसा प्रयत्न त्यांनी नक्कीच केला असता पण आता त्यांच्या आणि जिन्याच्या मधे ते भयाण अस्तित्व उभे होते. जमिनीवर फ़डफ़डणार्‍या मेणबत्तीच्या उजेडात क्षणभरच समोरच्या शालिनीताईंच्या निर्जिव डोळ्यात एक आर्त व्याकुळतेची झलक दिसली पण पुढच्याच क्षणी ते डोळे पुन्हा निर्जिव बनले. समोरची अकृती एव्हाना हाताच्या अंतरावर आली ‘आता संपलं सगळं’ केंव्हा त्या थंडगार हातांचा स्पर्श आपल्या शरीराला होतोय या विचाराने गडकरींनी डोळे बंद केले. कमितकमी शेवटच्या क्षणी तरी ते अभद्र रुप डोळ्यासमोर नको.

..... पण काहीच घडलं नाही. धाडकन घराचा मुख्य दरवाजा उघडल्या गेला आणि कडाडत्या आवाजात काही क्लिष्ट स्वरमाला ऐकु आली. बंद डोळ्यांवर पडलेल्या झगझगीत उजेडाच्या जाणिवेने गडकरींनी डोळे उघडले. खालच्या मजल्यावरुन दोन प्रखर प्रकाशशलाका तिथपर्यंत पोहोचत होत्या.
" गडकरी चिंता नको मी आहे" आचार्यांचा आवाज..?
पाठोपाठ चपळाईने जिना चढत आचार्यांची सडपातळ मुर्ती त्यांच्यापर्यंत पोहोचलीसुध्दा.
" आचार्य तुम्ही इथे..?"
" ते आपण नंतर बोलु गडकरी, आधी याचा बंदोबस्त करायला हवा" समोरच गोठल्यासारख्या अवस्थेत अडकलेल्या शालिनीताईंकडे अंगुलीनिर्देश करत आचार्य म्हणाले.
हातांच्या काही विशिष्ठ हलचाली करत आचार्यांनी मुठीतले स्फ़टीक त्या आकारावर भिरकावले. तत्क्षणी प्रत्येक स्फ़टीक सोनेरी झळाळीने उजळत एखाद्या ठिणगीप्रमाणे समोरच्या आकाराला भिडला. काही सेकंद तो आकार आकांताने तडफ़डला आणि आसमंतात एक अमानवी आवाजातली आरोळी घुमली, वावटळ जावी तसे काहीतरी त्या मजल्यावरुन भिरभीरत बाहेर गेले आणि नेमक्या क्षणी घरातले दिवे लागले. समोर शालिनीताईंचा देह अस्ताव्यस्त पडलेला होता. खालच्या मजल्यावरुन शिलेदार वरती धावत येत होता.
" जा मदत करा शालिनीताईंना विलक्षण थकल्या असतील त्या, काही काळजी करु नका गडकरी त्या तुमच्या पत्नीच आहेत" गडकरींच्या मनातली चलबिचल ओळखुन आचार्य म्हणाले.

"हा नेमका काय प्रकार आहे आचार्य?" शालिनीताईंना त्यांच्या बेडरुममधे व्यवस्थीत झोपवल्यावर बेडच्या बाजुलाच मांडलेल्या खुर्च्यांवर बसुन कॉफ़ी घेत असताना गडकरींनी विचारले. शालिनीताईंची आता त्यांना काही काळजी वाटत नव्हती आचार्यांनी आणलेल्या कुपीतला द्रव त्यांना पाजल्यावर त्या शांत झोपी गेल्या होत्या.
" तुम्हाला आठवत असेल, मी तुमच्या अपघाताबद्दाल तुम्हाला खोदुन खोदुन विचारलं होतं. तुमची अपघातानंतरची जाणिव अंधारात होती आणि त्यानंतर थेट तुम्ही शुध्दीवर आलात तोपर्यंत तशीच अंधारात राहीली. शरीरशक्ती जेंव्हा शरीर सोडून जात असते तेंव्हा चमकत्या भुयारासारखी किंवा तशीच एखादी जाणिव मेंदूत साठवली जाते तुमच्या हकिगतीत तसा उल्लेख कुठेच आला नाही. मग तुमची प्रतीकृती तयार करण्याचं काम कोण करत असावं? हा प्रश्न मला होता. म्हणुन मी तुम्हाला एकट्याला जाण्याचा सल्ला दिला, आणि विचारांची तिव्रता वाढावी म्हणुन न बोलण्याची सुचना दिली. त्यामुळे तुम्ही माझ्याकडे आलात ही गोष्ट ताबडतोब ‘त्या’ला कळली.
तुम्ही गेल्यावर मी शिलेदारांना थांबवुन घेतले त्यांचा तुमचा स्नेह तुमच्या वागण्यातुन जाणवला होताच. त्यांच्याशी चर्चा केल्यावर तुमच्या पत्नींच्या अ‍ॅटॅकबद्दल माहीती मिळाली त्यात हे ही कळले की त्यांच्यावर हॉस्पिटलमधे ईलाज चालु असताना त्यांच्या ह्दयाचे ठोके बंद झाले होते. वैद्यकिय प्रयत्नांनी ते चालुही झाले पण इतका काळ अस्तित्वांच्या बदलाला पुरेसा असतो. "
" म्हणजे आत्ता आहे ती.....?"
" त्याबद्दल संशय धरु नका त्या तुमच्या पत्नीच आहेत त्यांच्या अस्मितेनेही पुन्हा शरीरात प्रवेश केला पण त्यांना दुय्यम स्थानी रहावे लागले."
" इतके दिवस हे माझ्या का लक्षात आले नाही?"
" त्यालाही काही कारणे आहेत. एकतर फ़ार काळ तुम्ही बाह्यसृष्टीशी संपर्कात नव्हतात इतका वेळ `त्या'ला शालिनीताईंच्या रहाणीमानाची नक्कल करायला भरपुर होता. त्यानंतर त्यांच्यातल्या बदलांचा संबंध तुम्ही तुमच्या अपघाताशी आणि त्यांच्या अ‍ॅटॅकशी लाउन टाकलात."
" तरीही एक प्रश्न उरतोच, हा प्रयोग माझ्यावर का झाला सतत संपर्कात असलेल्या चिंटूवर का नाही?"
" याचं कारण लहान मुलांचं मन हे अतिशय लवचीक असतं. त्याला आलेल्या अनुभवांवर त्याच्या अंतर्मनाने ताबडतोब पडदा टाकला असता नेमकं हेच घडून चालणार नव्हतं."
" पण माझी प्रतीकृती तयार करुन काय साधणार होतं?"
" तुमची प्रतीकृती ही ‘त्यांची’ दुसरी वसाहत झाली असती आणि हळूहळू अश्या प्रतिकृतींनी सारं जग भरुन गेलं असतं. सार्‍या जगावर ‘त्याची’ आधिसत्ता चालली असती हा फ़ार मोठा धोका होता."
" पण हे सारं तुम्ही मला कल्पना देउनही करु शकला असतात.."
" नाही, तुम्हाला कल्पना दिली असती तर ती तुमच्या मनाच्या माध्यमातुन ताबडतोब त्याला कळली असती मग त्याला तयारीला वेळ मिळाला असता आणि आतासारखा ‘तो’ आपल्याला त्याच्या मुळ स्वरुपात दिसला नसता, आणि ‘त्या’ने तुमच्या पत्नींच्या शरीराचा आधार घेतल्याने त्यांनाच धोका निर्माण झाला असता कारण आपण मदतिला घेतलेली शक्ती ही अखेर शक्ती आहे तीला विचार नसतात आघात करणे हेच तीचे काम यासाठी तुम्ही गाफ़ील असणं गरजेचं होतं."
"आता अखेरचा प्रश्न आचार्य, जर तुम्ही वेळेवर आला नसतात तर?"
" मी वेळेवर येणारच होतो गडकरी" असं म्हणुन आचार्य पुन्हा एकदा प्रसंन्न हसले त्यंच्या हसण्याला कुठेतरी एक गुढ किनार होती.

पहाटेच्या किरणांनी खोलीत हळूवारपणे प्रवेश केला आणि आचार्य गडकरींचा निरोप घेत उठले. त्यांना दारापर्यंत सोडायला आलेले गडकरी बाहेरच्या कोवळ्या उन्हात ताठपणे चालत आपल्या गाडीकडे जाणार्‍या आचार्यांच्या उंच सडपातळ अकृतीकडे आदराने पहात राहीले.

गुलमोहर: 

पल्ली सारखच.. काहितरी अस्पष्ट राहिलय असं वाटतय..
खर तर पहिल्या पासून वाचायला घेतली अन गडकरी रात्री घरी येतात त्या पॅरा पर्यंत..(किंबहुना नंतर ते किल्ली लावून दार उघडणे वगैरे देखिल) अगदी तंतोतंत sixth sense चित्रपटागत वाटत होते, कहाणी तशीच predictable असेल अशी शक्यता नसली तरी ईथे केलेला वेगळा शेवट अजूनही जरा अस्पष्ट वाटतोय.. समांतर शक्ती वगैरे ठीक आहे, अन अख्ख्या कथेची मांडणि अगदी realistic वाटत असताना शेवटी आचार्यांच्या तोंडी लिहीलेले स्पष्टीकरण अगदीच वरवरचे अन न पटणारे आहे.
असो वाचायला (*flow) छान वाटले.

Actually धारपांनी इतकं लिहीलं आहे(कधीकधी Stephen king च्या कथांचा base वापरून).. की असं वाटणं स्वाभाविक आहे..
कथेची पकड चांगली आहे.. शेवटची शालीनीताईंची concept आणखीन फुलली असती तरी चाललं असतं कदाचीत..
पण overall मजा आली..

शरीरशक्ती वगैरे काही मलाही पटलं नाही. तसंच एका न्युरॉलॉजिस्टने गडकरींना आचार्यांकडे पाठवणं वगैरेही. पण ओव्हरऑल गोष्टीचा फ्लो आवडला.
रच्याकने, गडकरी घरात सिरतात आणि आपल्यामागे कडी लावून घेतात. बाहेरुन आचार्य ती उघडू शकतात का?

आचार्यांच्या व्यक्तिरेखेने धारपांच्या अशोक समर्थांची आठवण जागी करुन दिली.>>>>>>
अश्विनी तुमच्या मताशी अगदी सहमत

बाकी कथा आवडली

चाफ्या, पुन्हा एकदा धमाल. शेवट अजून खुलला असता रे. म्हणजे तो अस्पष्टपणाचा ठपका बसला नसता. बाकी ती दरवाजाची कडी बघ जरा.

भयकथेचा चांगला प्रयत्न. जरा साचेबद्धपणा आहे, जो वाचकांना अनेक भयकथा व त्यांतील धक्के परिचित असल्यामुळे जाणवतो. अजून अनपेक्षित वळण दिले असते तर जास्त आवडले असते.
असो. तुम्हाला शुभेच्छा!

समांतर : सर्वप्रथम मनमोकळ्या प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद !
कथानक जसे सुचले तसे लिहीलेय त्यामुळे ते कुठल्या चित्रपटाशी मिळतेजुळते आहे याची कल्पना नाही , आचार्यांचे व्यक्तीमत्वच मुळात धारपांच्या `अशोक समर्थ' या व्यतिमत्वावरुन घेतलेले ( किंवा ढापलेले) आहे त्यामुळे ते तसेच जाणवायला हवे हा माझा प्रयत्न होता. अस्पष्ट राहीलेल्या शेवटाबद्दल म्हणाल तर मुळात आचार्य कथांमधली पहीलीच कथा असल्याने तसा ठेवणं गरजेच वाटलं ( आता पुढच्या कथा कधी लिहीता येतात ते पाहू:) ) आणि सर्वात महत्वाचा मुद्दा ट्वीस्ट किंवा धक्कादायक वळण मला वाटतं हा प्रांत रहस्यकथांचा आहे Happy

मस्तच रे चाफ्या...
जोरदार पुनरागमन...!
<<<रच्याकने, गडकरी घरात सिरतात आणि आपल्यामागे कडी लावून घेतात. बाहेरुन आचार्य ती उघडू शकतात <<<>>>>>

जो माणूस शालिनीबाईंवर ताबा मिळवलेल्या एका अनामिक आणि सामर्थ्यवान शक्तीला पराभूत करू शकतो त्याला आतुन बंद असलेली कडी उघडणे काहीच अशक्य नाही. <<धाडकन घराचा मुख्य दरवाजा उघडल्या गेल<<))) यासाठी खरेतर जादु किंवा कसल्या सिद्धीचीही आवश्यकता नाहीये. मला वाटते बर्‍याच कड्या जरा जोरात धक्का मारल्यास निखळून पडू शकतात. धाडकन हा शब्द वापरलाय त्याअर्थी दाराला बाहेरून जोरात रेटा दिला गेला असला पाहीजे. चाफ्या, आपल्याला तर आवडली रे. राहता राहीला अस्पष्टपणाचा प्रश्न... तर काही गोष्टींचे अर्थ आपण आपल्याला हवे तसे काढायचे असतात किंवा गृहीत धरायचे असतात. Wink

मस्त लिहिलय...आवडल....तुम्हाला मनापासुन दाद..क चाफा