नशीब त्यांचे - भाग ३१

Submitted by विनायक.रानडे on 5 November, 2009 - 20:53

बॅन्कॉक मधील पक्षांच्या किलबिलाटात फोन वाजला म्हणून उठलो, बायको शांत झोपली होती. सहल कंपनीच्या मुलीने तासाभरात गाडी घेऊन येणार असल्याची लाडक्या आवाजात मला सूचना दिली. ठीक १० वाजता आमची शहर दर्शन सहल त्या कंपनीच्या गाडीतून सुरू झाली. गाडीत मागच्या सिटवर मी बायको बरोबर बसलो, समोर ती मुलगी बसली व चालक गाडी चालवीत होता. रस्त्याने शहराची माहिती ऐकत होतो. थोड्या थोड्या अंतरावर फळभाज्या विक्रेते दिसत होते, प्रत्येक भाजी निवडलेली, प्लॅस्टिक मध्ये गुंडाळलेली होती. बायकोला फळ खाण्याचा छंद आजही आहे, तेव्हा ही होता, खरंतर प्रत्येक इराण्याला फळ खाणे श्वास घेण्या इतके महत्त्वाचे वाटते की काय अशी शंका मी बायकोला अधुनमधुन विचारीत असतो. चारपाच ठिकाणी थांबून तिने ताज्या स्वच्छ फळांचे जेवण केले, मलाही खाण्याचा आग्रह केला, मला नेहमी फक्त आजारी माणूस फळ खातो असेच वाटते.

पाच तास भटकण्यात कसे संपले कळलेच नाही. बायकोचा आनंदी चेहरा पाहून मला वेगळाच आनंद मिळाला, त्या १५ दिवसात तिचा चेहरा सारखा त्रासलेलाच होता, प्रसंगच तसे घडले होते. हॉटेलच्या जवळ आलेलो असताना सहल वाल्या मुलीने आम्हाला धक्काच दिला. माझ्या बायकोकडे हात करत तिने सरळ प्रस्ताव टाकला होता. " मी तुझी परिस्थिती समजू शकते, दोघांना शारीरिक मालीश वगैरे व्यवस्था मी करू शकते, मी पण ती सेवा देऊ शकेन हे माझे कार्ड." सहल वाल्या मुलीने माझा दंड हळूच दाबून मालीश चा स्पर्श कसा असेल ह्याची झलक देण्याचा प्रयत्न केला होता. माझी बायको माझ्या कडे खास इराणी पद्धतीचे आश्चर्य व्यक्त करीत उभी होती, खालचा ओठ वरच्या दातांनी दाबितं चेहेर्‍यावर मिस्किल हास्य असते, मग दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर आपटून हनवटीच्या खाली धरायचे, मग तोंडाने म्हणायचे " बा: बा: चे खूब, दिघे ची मुन्धे ? बी हया " ( वा: वा: फार छान, अजून काय दाखवायचे राहिले आहे ? कसली भिती नाहीच ! ). असो, तर काय सांगत होतो, मी विषय बदलला, दिवसभर तिने आम्हाला चांगली साथ दिली, तिचे आभार मानले, सकाळी सात वाजता पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत ती निघून गेली.

आम्ही दोघेही थकलो होतो. जरा ताजे तवाने होऊन हॉटेल बाहेर पायी भटकून आलो, बायकोला थोडे चालणे फार गरजेचे होते. परत आल्यावर बायकोने पुन्हा तिचा आवडता फळ आहार संपवला तिला फक्त एग सॅन्ड्विच प्रकारच खावासा वाटला, तिथला तो जेवणाचा प्रकार मलाही फारसा आवडला नव्हता मी पण तिला साथ दिली, पण आयस्क्रिमचे भरपूर प्रकार खाऊन भूक भागवली. टि.व्ही दाखवत असलेला चार्ल्स ब्रॉन्सनचा सिनेमा बघत झोपलो.

सकाळी तयार होऊन सामानाची पेटी घेऊन खाली आलो. संध्याकाळच्या विमानाने मुंबईला परतायचे होते. हॉटेलचा हिशेब संपवला व सहलवालीची वाट बघत थांबलो, सहल संपवून तिच आम्हाला विमान तळावर सोडणार होती. पर्यटन विभागाचा लोक कलांच्या कार्यक्रमाचे स्थळ बरेच लांब होते. बायकोने त्या मुलीला कालच्या प्रकारा विषयी विचारायला सुरुवात केली, एक बाई म्हणून तिचे विचार बायकोला ऐकायचे होते. त्या मुलीचे डोळे भरून आले होते. आदल्या रात्री आम्ही तिची सेवा नाकारल्याने बरेच दिवसांनी ति तिच्या मुलांच्या बरोबर बाहेर भटकायला, जेवणाला एकत्र होती, विशेष हे की मुलांना कुशीत घेऊन झोपली होती. बायकोने तिचे वय विचारले, २० - २२ वय असावे अशी दिसणारी ३४ वर्षाची बाई होती.

वयाच्या १४ - १५ वर्षाची असताना गावाकडच्या प्रियकरानेच तिला शहरात आणून एकाला विकले होते. पाच वर्ष त्रासात काढल्यावर विमानतळावर त्या रात्री आम्हाला भेटलेल्या त्या वाटाड्याशी तिने लग्न केले होते. ( मला व बायकोला तिचे ते लग्न, नाते समजलेच नाही.) शिक्षण, घर, राहणीमान फार महाग असल्याने तिलाच नाही तर बर्‍याच मुलींना / बायकांना देह व्यापार हाच एक कमाईचा व्यवसाय उरला आहे, त्यात वाईट काही नसून, सरकार मान्य व्यवसायी म्हणून ति एक काम करीत होती, तिचे सरकारी ओळखपत्र तिने आम्हाला दाखवले. तिने जे सांगितले ते आम्हाला नाटक वाटणे शक्य नव्हते.

लोक कलांचा कार्यक्रम प्रेक्षणीय होता. भरपूर चित्र रिळे ( फिल्म रोल ) संपवली. कॅनन प्रतिमा ग्राहकाचा व भिंगांचा हाताळण्याचा आनंद वेगळाच होता. बराच वेळ एका ठिकाणी बसण्याचा बायकोला त्रास झाला. थोडा वेळ पायी भटकून विमानतळावर आलो. एक महत्त्वाचा फरक जाणवला सहलवाल्या बाईने बायकोचा हात धरला होता व दोघींनी एकमेकीचा निरोप घेतला त्यात मी नव्हतो.

बॅन्कॉक ला आलो तेव्हा रात्र होती सगळे कसे शांत होते. पण आता बॅन्कॉक सोडून बाहेर जाताना दिवस अर्धा संपला होता. स्वागत कक्षातील वातावरण गावाकडच्या " रेड लाइट " भागाचे आधुनिक रूप वाटत होते. गावठी बायकां - पुरुषांची जागा एखाद्या कंपनी कार्यालयातील स्त्री - पुरषांनी घेतल्या सारखे वाटत होते, परंतु चाळे मात्र " रेड लाइट " भागातील होते. तो प्रवासातील दुसरा धक्का होता. आम्हाला चार तास त्या वातावरणातच बसावे लागले. बॅन्कॉक शहराचे माहिती पत्रक चाळताना एक वाक्य खटकले होते, " येणार्‍या पाहूण्यांचे सर्वतोपरी पाहुणचार करणे आम्ही आमचे कर्तव्य मानतो " त्याचा खरा अर्थ स्वागत कक्षातील वातावरण बघून समजला होता.

त्या काळातील बंबई हवाई अड्ड्या वर विमान उतरले. प्रवासातील तिसरा धक्का बसला ? - भेटू भाग - ३२

गुलमोहर: