तिचं मोठं होणं

Submitted by नविना on 29 October, 2009 - 15:30

लिफ्टचं दार उघडलं आणि मिनूने घाईघाईत बॅग मधून लॅच की काढण्यासाठी बॅगेत हात घातला. तेवढ्यात जिन्यावरुन वर जाण्यार्‍या इशान कडे तिचं लक्ष गेलं. इशान नेहमीप्रमाणेच हसून तिला "हाय मिनू !!! केम छे?" असं विचारत होता तेव्हाच तिच्या हाताला बॅग मधली किल्ली लागली. त्याच्या कडे बघुन हसण्याचा प्रयत्न करत तिने हळूच मान डोलावली आणि दाराकडे वळली. घराचं दार उघडुन ती आत पाय ठेवणार पण अचानक काय झालं कुणास ठाऊक, तिने वर जाणार्‍या इशान ला उद्देशून मोठ्यानी एक वाक्य उच्चारलं, "माझं नाव अक्षया कारखानीस आहे. मला फक्त माझ्या जवळचे लोक मिनू म्हणतात." एवढं बोलून तिने घरात प्रवेश केला आणि धाडकन दार बंद केलं.
इशान ला तर तसे काही समजले नाही , पण इतकं कळलं काही तरी बिघडलंय. "अशक्य असतात या मुली पण!!!" असं स्वत:शीच बोलत तो पुन्हा पायर्‍या चढायला लागला.
इकडे घरात शिरताच कॉलेजची बॅग धाडकन सोफ्यावर फेकून मिनू तिच्या रूममधे गेली. दार उघडण्याचा आवाज आल्याबरोबर किचन मधून बाहेर आलेल्या राधामावशींकडे तिचं लक्षच नव्हता. बाहेरचा संवाद ऐकल्यावर त्यांना कळलं होतं वारं कुठल्या दिशेनी वाहतंय आत्ता ते. त्यांनी शांतपणे सोफ्यावरची बॅग उचलुन मिनू च्या खोलीत नेवुन ठेवली. ती बाथरुम मध्ये होती. बॅग नीट ठेवत असतानाच मिनू बाहेर आली. आणि राधा मावशींनी तिला विचारलं "चहा घेशील?" तिनी मानेनेच हो म्हटलं आणि खिडकीतून बाहेर पाहिलं. ती काय बघतेय ते राधा मावशीना माहिती होतं. खाली पार्किंग लॉट मधली इशानची बाइक दिसत होती. अगदी मिनूने सांगितल्यासारखीच पार्क केलेली.
राधा मावशी स्वयंपाकघराकडे वळल्या आणि मिनूने बेड वर अंग टाकलं. मावशींनी चहा आणला तेव्हा सुद्धा ती तशीच पडून होती. चहाचा कप घेऊन ती हॉल मध्ये आली. तिने टी व्ही चं रिमोट शोधलं आणि तो ऑन केला. समोर काही तरी न्यूज चॅनेल सुरू होतं. तिच्या मनात विचार आला. भाई ने लावलं असेल हे. काय बघतो कुणास ठाउक त्या न्युज मध्ये. पाहवं तेव्हा त्या न्युज सुरू असतात हा घरी असला म्हणजे. असतं काय त्यात तर तेच तेच कोणी तरी कोणाला तरी लाच दिली, कोणीतरी ती घेतली. कोणी कोणाचा खून केला. तिसराच कोणी पकडला गेला. त्याच त्याच निवडणुका काय अन ते पक्ष काय. कधीकधी तर तासन तास ते शेअर मार्केट चालू असतं. चांगली एखादी मुव्ही बघावी, गाणी बघावी. हिरो हिरोइन चं प्रेम प्रकरण बघावं तर असं काहीही नाही. आणि ती खरच चमकली!!!!
हेच तर ते विचार ज्याबद्दल भाइ परवा बोलत होता. भाइ खरंच आपल्याला ओळखतो पुर्णपणे. 'भाई' नाव पण तर तिनेच दिलेलं त्याला. कुठल्यातरी मुव्ही मधे ऐकलेलं. तिला त्यातला त्या माफिया ला सगळेजण भाइ म्हणतात ते फारच आवडलं, आणि तिने पण जाहीर केलं घरात, "दादा आजपासुन मी तुला भाई म्हणणार." तिच्या दादाने, म्हणजे आदित्यनेसुद्धा हसत हसत हो म्हटलं. तसं त्याला तिने काहीही म्हटलं तरी फरक पडणार नव्हता, कारण त्याला माहिती होतं, मीच हिची आई पण आहे, बाबा पण आहे. आणि तिचा दादा नाही नाही भाई पण आहे. इतर कोणाला काही आक्षेप असण्याचा प्रश्णच नव्हता अर्थात. घरात इन मीन तीन मणसं. आदित्य, अक्षया उर्फ मिनू आणि त्यांच्या राधामावशी. राधामावशी त्यांच्या नात्यात नव्हत्या, पण त्यांच्या लहानपणी आईने त्याना कामावर ठेवलं होतं आणि तेव्हा पासुन त्या त्यांच्या सोबतच होत्या. अगदी ५ वर्षांपुर्वी आई-बाबा एक अ‍ॅक्सीडेंट मध्ये गेल्यानंतरसुद्धा. तिच्या बाबांचं एक छोटंसं वर्कशॉप कम गॅरेज कम कार डीलरशीप सेंटर होतं. खूप श्रीमंत नसलेत तरी उच्च मध्यम वर्गीयांमध्ये मोडतील एवढा नक्कीच पैसा कमावला होता तिच्या बाबांनी.
त्यांच्या मॄत्युच्या वेळी आदित्य १९ वर्षाचा होता तर मिनू १२ वर्षाची होती. आदित्य तेव्हा इंजीनीयरींगला होता. आणि मिनू सातवीत होती. त्याच्यापेक्षा खूप लहान असेल म्हणून कदाचित किवा अजुन काही कारणामुळे असेल आदि मिनूला नेहमीच सांभाळत आला होता. आई-बाबांच्या रागवण्यापासून ते बाकीही बर्‍याच बाबतीत तो बराच प्रोटेक्टिव होता. ती त्याची जरा जास्तच लाडकी होती. त्यामुळे आई-बाबांनंतर सुद्धा त्याने तिला कधीच जाणवू नव्हतं दिलं की ते आता नाहीत. त्यांचं घर, व्यवसाय त्याने उत्तम रितीने सांभळला होता. आणि इंजीनीयरींग पुर्ण झाल्याबरोबर तर स्वतःला त्यात झोकून दिलं होतं. सगळं छान चाललं होतं.
ते जिथे राहत होते त्याच बिल्डींग मध्ये वर बाबांचे एक मित्र पण होते. त्याच्यापेक्षा २ मजले वर. काका काकू दोघही छानचं. त्याना सुद्धा २ मुलं. मोठी मुलगी अमृता, आणि लहाना इशान. इशान तिच्यापेक्षा ३ वर्षानी मोठा होता पण लहानपणापासुन त्यांची चांगली गट्टी होती, अगदी बाहेर फिरायला कुठे गेलं तरी ती अगदी आवर्जुन इशान साठी काहीतरी आणणार आणि तो सुद्धा. अगदी एक वेळ तिच्या लाडक्या दादाला ती विसरुन जाई पण इशानला नाही. २ वर्षांपुर्वी त्याची नवीन बाइक आली तेव्हा सुद्धा तिनेच त्याच्या मागे बसून फर्स्ट राइड घेतलेली सगळ्यांना चिडवत. आणि बाइक पार्क कुठे करायची ते पण तिनेच सांगितलं. तिच्या रुमच्या खिडकी समोर म्हणजे तिचं लक्षं राहिल बाइककडे.
दोन्ही घरं तशी एकच म्हणावी इतकी एकमेकांमध्ये गुन्तलेली. त्यामुळे जेव्हा मिनू आणि आदि पोरके झालेत तेव्हा काका काकू दिवसाचे २४ही तास त्यांच्यासोबत असण्याचा प्रयत्न करत. आणि अमृता आणि इशान सुद्धा. हळुहळू सगळं सावरलं , बरचंसं पुर्वपदावर पण आलं पण त्या काळात आणि पुढेसुद्धा दोन्ही घरं जवळच रहिलीत. गेल्या ५ वर्षात चारही मुलांचं प्रत्येक यश सोबत सेलिब्रेट केलं सगळ्यानी. अमृता- आदिचं ग्रॅजुएशन, इशानचं बारावीचं मेरीटला येणं , मग त्याची एका रिजनल कॉलेजला झालेली अ‍ॅडमिशन, मिनूचा दहावीचा छान लागलेला रिझल्ट. अमृताची एन्गेजमेंट. तिचं लग्नं तर अगदी घरच्या सारखंच होतं त्यामुळे मिनु आणि आदिला.
सगळं आठवत होतं मिनूला. बारावी झाल्यावर इशान दुसर्‍या शहरात इंजीनीयरींग साठी गेला. सुट्टीमध्ये घरी येत होता, भेटीगठी होत होत्या. अगदी आत्ता आत्ता पर्यन्त... परवा पर्यन्त तर सगळं छानच होतं. आणि ती पुन्हा परवाच्या त्या संध्याकाळ मधे पोचली.
रविवार होता म्हणून सगळ्यांनी त्यांच्या घरीच जेवायची तयारी केली. इशान मुघल-ए-आझम ची डीव्हीडी घेउन आला होता ती बघता बघताच जेवणं झालीत. सलीम आणि अनारकली दोघांना पण कसं व्यवहारज्ञान नाही आणि त्यांना कसं त्यांच्या लव्ह स्टोरीला यशस्वी करता आलं असतं यावर भरपुर कॉमेन्ट्स करता करता तिघाही मुलांनी भरपुर दन्गा केला.सगळे हसुन हसून थकलेत. पण ह्या सगळ्यांमध्ये आदिची नजर काही गोष्टींकडे जात होती. मिनू इशान च्या अगदी जवळ बसण्याचा प्रयत्न करत होती आणि इशान तिच्यापासून दूर सरकण्याचा प्रयत्न करत होता. तिने २-३ वेळा इशान ला हात धरुन इथे बस असंही म्हटलं पण इशान मात्र तिथून हटून आदिच्या किंवा अजुन कोणाच्या बाजुला जाऊन बसला होता. आदिला ते थोडं विचित्र पण वाटलं होतं कारण असं आधी कधी इशान नी केलेलं त्याला आठवत नव्हतं. पण तेव्हा त्याने फक्त त्याकडे दुर्लक्ष केलं. मिनू ला पण कळलं होतं की भाईला काही तरी वाटलं आहे. तरी ती नेहमीसारखी हसत खेळत पुन्हा सगळ्यांमध्ये सामील झाली.
रात्री बर्‍याच उशीरा सगळी मंडळी आपापल्या घरी पोचली. राधा मावशी आणि मिनू सुद्धा, किचन मधलं आवरुन झोपायला जायला म्हणुन निघाल्या. तोवर आदि घरातला बाकी पसारा आवरत राहिला. थकलेल्या स्वरात मिनू आदिला " good night भाई " असं म्हणुन आपल्या रुमकडे वळणार तेव्हढ्यात त्याने मिनूला थांबवलं. राधामावशींकडे वळून त्याना सुद्धा तो म्हणाला, "थांब मावशी एक काम होतं". दोघीही न सांगता त्याच्या पुढ्यात येउन उभ्या राहिल्या. आदिने त्याना दोघीनाही बसवलं. त्याचा चेहरा खुपच गंभीर होता. मिनू बसल्यावर त्याने कुठलीही प्रस्तावना न करता सरळ विषयालाच हात घातला. "मिनू इशान आवडतो तुला?"
अचानक असा प्रश्न ऐकून मिनू गोंधळली . तिने एकदा मावशी कडे पाहिलं. मावशीनी नजरेनेच तिला आश्वस्त करत उत्तर दे म्हणुन सुचवलं. तरीही मिनूच्या तोंडून शब्द बाहेर नव्हते पडत. तिने चाचपडतच "हो म्हणजे मला असं वाटतं की मला तो आवडतो." आदिने तिच्या गोंधळलेल्या चेहर्याकडे पाहिलं आणि त्याला कळला की त्याची छकुली घाबरली आहे. तो हळूच हसुन म्हणाला "अगं घाबरु नकोस, मी काही तुला खाणार नाही आहे. मला फक्त एवढं सांग की तो तुला काही बोलला आहे का या बाबतीत."
मिनूने मान डोलवून त्याला नाही असं सांगितलं. आदिने शांत स्वरात तिला पुन्हा विचारलं "म्हणजे तुला तो आवडतो पण तसं त्याच्याकडुन काही आहे की नाही हे तुला माहिती नाही."
मिनू ने पुन्हा एकदा फक्त होकारार्थी मान डोलावली.
आदि तिच्याकडे बघुन विचार करत म्हणाला "तुला वाटतं तू त्याला आवडतेस?"
मिनू: " बहुतेक हो म्हणजे मला माहिती नाही. ... म्हणजे मला कधी तो असं बोलला नाही पण ..."
आदि: "तुला असं कश्यावरून वाटलं की त्याला तुझ्याबद्दल काही वाटतं."
"भाई आम्ही नेहमी एकमेकांच्या सोबत खेळलोय, सोबतच राहिलोय, अगदी त्याची बाइक सुद्धा माझीच असं तो म्हणतो, मला माहिती आहे त्याची मी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. मला तो अगदी सगळं सान्गतो, मी पण त्याला सगळं सांगते, अजून काही कशाला त्यानी मला वेगळं सान्गायला हवंय. मुव्ही मध्ये पण तर असच असतं ना? हिरो हिरोइन, लहान पणापासून सोबत असतात, मोठे झाल्यावर मग प्रेम पण करतात. त्याना कुठे एकमेकाना काही सान्गावं लागतं. हे सगळं अगदी त्यातल्यासारखंच तर आहे."
एका दमात ति एवढं सगळं बोलली आणि आदिला कळेचना काय बोलावे ते..पण त्याही परिस्थितीत त्याला सगळ्या रोमँटिक हिन्दी मुव्हीज आठवल्या आणि एकदम हसायला आलं. मिनू ने त्याच्याकडे रागाने पाहिल्यावर तो शांत झाला आणि बोलला "मिनू, बाळा तू अजुन ११वीत आहेस. लहान आहेस. मुव्हीज बघुन त्यातले ते येडे हिरो हिरोइन्स बघुन असा विचार करणं ठीक आहे, पण हे सगळं फक्त मुव्ही मध्येच होतं. नाही म्हणजे प्रत्यक्षात होत नाही असं नाही, पण त्यासाठी दोघांनीही तसा विचार करणं आवश्यक आहे. फक्त तुला वाटतं म्हणून इशान ला पण तू आवडत असावी असं नसतं. त्याच्या वागण्यातून तुला ते जाणवलं असेल तर तसं मला सांग पण आजच्या त्याच्या वागण्यातून मला असं कुठेही वाटलं नाही. त्याला तू एक मैत्रीण म्हणून आवडते हे मला माहिती आहे पण त्याच्या पुढेही जाउन काही असेल असं वाटत नाही. तरीही मी म्हणेन की त्याला अजुन थोडा वेळ दे. पण तुझं आवडणं त्याच्यावर लादू नको. तुम्ही दोघही अजून लहान आहात. बराच मोठा गड सर करायचा आहे तुम्हाला. शिक्षण, करियर सगळंच आहे. हे वय असं असतं की आपण खूप स्वप्न बघतो आणि मग आपल्या आजु बाजुच्या वातावरणात त्या स्वप्नाना फिट बसवायला बघतो. त्यातलीच माणसं मग आपले हिरो बनतात. पण एकदा का थोडं मोठं झालं की आपलं जग विस्तारतं. नविन नवीन लोक भेटतात. आपले विचार सुद्धा बदलतात. आज जे काही आवडतं आहे ते कदाचित तेव्हा एकदम stupid वाटायला लागतं. किंवा याच्या विरुद्ध सुद्धा होतं. त्यामुळे या वयात आपल्या आवडी निवडीना जपायचं असतं पण त्यांचा बाऊ नसतो करायचा. तुला इशान आवडतो पण ह्या गोष्टीकडे लक्षं द्यायला खूप आयुष्य पडलं आहे. तुझा अभ्यास सध्या महत्वाचा आहे. तो स्वतःहून तुला काही बोलला तर मला काहीही प्रॉब्लेम नाही, पण जितकं मी इशान ला ओळखतो त्याला तुझ्याबद्दल असं काहीही वाटत नाही. तुझं हे असं त्याच्याकडे inclination मला कधीच लक्षात आलेलं, म्हणूनच आज तुझ्याशी बोलायचंच असं मी मघाच ठरवलं. तुझ्या भावनांचा अनादर नाही करत मी पण अजून खूप काही बघायचं आहे तुला, खूप मोठ्ठं व्हायचं आहे.. तेव्हा विचार कर, आणि मग तशी वाग. "
त्याचं बोलून संपलं तशी मिनू रागा रागातच तिथून उठली. आदिने तिच्याकडे बघून एकदा तिला "Good Night मिनू " असं म्हटलं तेही तिने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि ती तिच्या खोलीत निघून गेली.
बाहेर आदिचा आवाज अजुनही ऐकायला येत होता. तो मावशीला सांगत होता, तिला साम्भाळून घ्यायला. त्याचं ते बोलणं पण तिने ऐकलं. तो म्हणाला होता "तशी गुणी आहे मिनु पण लहान आहे. कळेल तिला हळूहळू. पण तोवर सांभाळून घ्यायला हवंय." मावशीने सुद्धा हो बरोबर आहे असं म्हटलं होतं.
मिनूला खूप राग आला होता दोघांचा पण, आणि इशानचा सुद्धा. त्याला मी आवडत नाही हे त्यानी मला सांगायला हवंय. मग मी स्वतःच दूर होईन. मला कोणाचे उपदेश नकोत. बराच वेळ झोप लागली नाही तिला. सकाळी तरीही क्लास ला जाणे भाग असल्यामुळे लवकर उठुन जावं लागलं. मग कॉलेज आणि संध्याकाळचा क्लास असं सगळं झालं. थकून गेली होती ती संध्याकाळ पर्यन्त. घरी आली तेव्हा आदि अजुन आलेला नव्हता. तिचं जेवण झालं आणि ती झोपायला गेली तेव्हासुद्धा नव्हता आला. पण तिने मावशीला काहीही विचारलं नाही. तिचा राग अजुनही गेला नव्हता. तशीच झोपुन गेली. सकाळी क्लास ला निघून गेली. आदि रात्री केव्हा आला हेही तिला महिती नव्हता. आज पर्यन्त असं कधीच झालं नव्हतं. रात्री ते नेहमीच सोबत जेवायचे. तो आल्याशिवाय ती जेवतच नसे. आदिलाही हे महिती होतं त्यामुळे तोपण ती वेळ कधी चुकवत नसे. पण काल असं झालं.
मिनू ला आता हा सगळा विचार केल्यावर खूपच अपराधी वाटायला लागलं होतं. तिने भाईबद्दल काही विचारलं पण नव्हतं मावशीला अजूनही. त्यादिवशी भाई जे बोलला ते तेव्हा नाही पण आता सगळं खरं वाटत होतं. त्याची काळजी जाणवत होती तिला त्यातली. किचन च्या दाराशी जाऊन ती मावशीला भाईबद्दल काही विचारणार तेव्हढ्यात बेल वाजली. तिने ओरडुनच मावशीला सान्गितलं की ती बघतेय. आणि दाराच्या दिशेनी जात असतानाच ठरवलंही की भाई ला सॉरी म्हणायचं. दार उघडून बघते तर दारात इशान डबा घेऊन उभा होता. "आईनी पाठवलंय." त्याला अजूनही विश्वास नव्हता मिनू काय बोलेल ते म्हणून तो गुपचुप घरात न शिरताच दारातूनच तिच्या हातात डबा देणार एवढ्यात मिनू त्याला म्हणाली "आत येऊन टेबल वर ठेवला डबा तर तुझे हात दुखतील का?"
"ही ही ही, मला वाटलं मघाचा गाडाभर राग गेलाच नाही तुझा म्हणून म्हटलं नको त्रास देउया उगीच." आणि आत येतच त्याने मावशींना ऑर्डर सोडली "मी चहा घेणार आहे." तिकडे मिनू पण हसत होती, आणि दार बन्द करणार तेव्हढ्यात तिला लिफ्ट मधून हसत हसत येणारा तिचा भाई दिसला आणि तिने मोठ्यानी हाक मारली "हाय भा... ना ना दादा!!"
मिनूची अशी हाक ऐकून आदिला कळलं की प्रकरण आता शांत आहे आणि अचानक वाटून गेलं मोठी झाली माझी मिनू.

एक छोटासा प्रयत्न!!! शुद्धलेखनाच्या चुका टळण्याचा प्रयत्न केला आहे.. काही राहिलं असल्यास नक्की सांगा.

गुलमोहर: 

एका वेगळ्या, तरल, छान विषयाला हात घातलाय. कळतय, कळतय पण नक्की कळत नाहीये असल्या मॅड खोलीचा हा विषय.
मला आवडली कथा... चांगली उतरलीये, नविना. तुमचा "छोटासा प्रयत्नं" बराच मोठ्ठा आहे...
पुढील लेखनाला माझ्याकडून अनेक शुभेच्छा.... लिहित्या रहा.

खुपच छान प्रयत्न... फारच हळुवार विषय आहे हा .. छान मांडणी
बाकी खरया प्रसंगात अशा गोष्टी हाताळनं फारचं अवंघड असंत...

माझ्याकडूनसुध्दा अनेक शुभेच्छा

खरच मस्तं , वेगळा , नाजुक विषय आहे हा आणि तेव्हढ्याच हळुवार पणे हाताळलाय.
पुढील लेखनाला शुभेच्छा. मला गोष्टीचं नावदेखील खुप आवडलं.

सगळ्यांना धन्यवाद!!! मी पण अगदी अशीच एक मिनू पाहिली आणि वाटलं लिहावं तिच्यावरच.
माझ्या पहिल्या कथेला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळेच मी पुन्हा एकदा काही लिहिण्याचं धाडस करू शकले. त्यासाठी सुद्धा सगळ्यांना आभार.
केतन- खरच अवघड असतं. अगदी मान्य.

जाईजुई-- जर आई-बाबा असते तर कदाचितच दादा मधे पडला असता. आणि मग तो प्रश्न आई-बाबांच्या पद्धतीने हाताळला गेला असता. पण ते नव्हते म्हणूनच तर तो पालक बनला. पण "आई- बाबा असते तर...." हा प्रश्न त्यालाही पडला होता.

पूनम-- सुधारणा करतेय.. सुचनेसाठी धन्यवाद.

धनुडी- धन्यवाद!! नावं ठेवण्यात तसेही आपण एक नंबर ना :)!!!

खूपच छान.............
मिनूच्या मनातले विचार, त्यातली आंदोलनं...... सगळं खूप छान व्यक्त केलयत......
खूप आवडली गोष्ट.......