फणसाची भाजी

Submitted by सायो on 29 October, 2009 - 13:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

Chaokoh ब्रँडचा फणसाचा एक कॅन, भिजवलेली चवळी-अर्धी ते एक वाटी, हिंग, हळद, मोहरी, कढिपत्ता, लाल तिखट, मीठ, गूळ- चवीप्रमाणे, खवलेलं ओलं खोबरं, कोथिंबीर- अर्धी वाटी, सुक्या लाल मिरच्या.

क्रमवार पाककृती: 

कॅनमधून फणस काढून त्याचे चौकोनी तुकडे करावेत. कुकरच्या भांड्यात हे तुकडे , भिजवलेली चवळी घालून थोडे पाणी घालून कुकरला ३ शिट्ट्या करुन घ्याव्यात.
पातेल्यात तेलाची मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता घालून फोडणी करुन घ्यावी. त्यावर शिजवलेला फणस, चवळी घालून झाकण घालून एक वाफ काढावी. नंतर त्यात गूळ, लाल तिखट, मीठ घालून नीट मिक्स करावे. वर तेलाची लाल सुक्या मिरच्यांची फोडणी घालावी. वाढताना खोबरं, कोथिंबीर घालून वाढावं.

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जणं
अधिक टिपा: 

चाओको ब्रँडचे २ कॅन इं.ग्रो. च्या दुकानात मिळतात. त्यातला हिरवा कॅन घ्यावा.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजिबात नाही काही मसाला वगैरे. जेव्हा मला भाज्या /जेवण करायला कंटाळा येतो तेव्हा ह्या भाजीचा नंबर लागतो. त्या लिस्टमध्ये सुरण, रताळी, पात्रा, मटारची उसळ वगैरे ही येतात Wink
ह्यात लाल तिखट नी गूळ जरा जास्त घातलास तरी चालेल.

हा माझ्याकडच्या फणसाचा कॅन. कोणी वापरून बघितलाय का हा ब्रँड? कसा आहे? एकदा मागे कधीतरी आणलेला कडवट निघाला.

सायो, तुझ्या कृतीनी भाजी करून बघते.

fanas-mb.JPG.

सुरण, रताळी, पात्रा, मटारची उसळ वगैरे ही येतात <<< अगदी ,अगदी.
सायो , ह्या भाजीला टिपिकल फणसी वास किती येतो,मला चालेल पण नवर्‍याची खात्री नाही. मारे कौतुकानी भाजी करीन आणी एकटीच खात बसेन संपेपर्यंत.

कच्च्या फणसाला नाही फणशी वास येत. (म्हणून खाववते भाजी.) Happy

भाजी झब्बू:
भरपूर तेलात कांदा लाल करून, आलं लसून हिरव्यामिरचिची गोळी घालून परतायचं. त्यात धने, जिरे, मिरे, लवंग बडीशोप, दालचिनी ची कच्ची पूड घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तिखट, हळद, मीठ आणि फणसाच्या वाफवलेल्या फोडी घालून ढवळायचं. वरून पाण्याचा शिपका देऊन झाकण ठेवून १०-१५ मिनिटं आणाखी शिजू द्यायचं.

मस्त रेसीपी आहे. घरी फणस आहे. करुन पाहाते. फक्त पन्ना म्हणते तस, चवळी ऐवजी चणे वापरावेसे वाटतात आहेत. मृ. चा मसाला घालुन करते.

अजून एक.

कच्या फणसाचे मुसा काढून तुकडे करायचे. ते तुकडे वाफवून घ्यायचे. त्यानंतर वाफवलेले तुकडे जरा चेचून घ्यायचे. त्यामुळे फणस मोकळा होतो. लसणाची फोडणी करून त्यावर कांदा आणि मिरची परतायची. वाफवलेला फणस टाकून भाजी छान परतायची. चवीनुसार मीठ आणि गूळ. त्यावर भरपूर ओला नारळ घालायचा आणि कोथिंबीर घालायची. हवं तर लिंबू. एकदम फर्मास भाजी तयार. नवरा फणस खाणारा नसला तर वाटेकरी कोणी नाही ह्या आनंदात एकदम चट्टा-मट्टा करायचा.

झी, काळे वाटाणे पण घालतात.
सायो, मिनोतीने दिलेल्या लिन्कवर दिनेशनी लिहिलेली रेसिपी आहे. त्यात आहे आलं-लसूण.

ती लिंक मला फाँट प्रॉमुळे उघडता येत नाहीये. एक्सप्लोररवर जावं लागेल त्याकरता.
आमच्याकडे कोकणात ह्यात आलं-लसूण वगैरे घालत नाहीत म्हणून मला ते समीकरण पचनी पडत नाही.पण वाईट कशाला लागेल म्हणा.

कोरडी भाजी पण करतात परतून. त्यात फोडणीत लाल सुकी मिरची आणि उडदाची डाळ घालायची. वरून मीठ, खोबरं, कोथिंबीर.

फणसाच्या भाजीत चणे, चवळी घालणे म्हणजे अपमान आहे फणसाच्या भाजीचा. तो एक जोक आहे ना, वाढीस येण्यास मटणात बटाटे तसेच फणसाची भाजी खूप खपते मग पुरवण्यास चणे. Happy
माबोच्या भाषेत, 'शाकाहारी मटण' आहे ही भाजी आमच्या घरी. :). आता शाकाहारी मटण म्हणून रेसीपी टाकायला हवी. Wink
पण खरेच मटणाला मागे काढेल जर 'योग्य' प्रतीचा फणस मिळाला तर. त्यात गावी तर मातीच्या भांड्यात बनवलेली अफलातून लागते.
शाकाहारी मटण वर्जन १ :
ह्याच्या भरपूर कांदा टाकून मस्त परतले की भरपूर लसून ठेचून घालायची. फणसाच्या फोडींना व थोड्याश्या ठेचलेल्या आठळा सुद्धा घ्यायच्या ज्या कच्च्याच असतात व नाजूक असतात त्यांना नुसता हळद, ताजा गोडा मसाला लावायचा. मग ह्या कांद्यात परतायचा. तोवर सुखे खोबरे, कांदा मस्त भाजून बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची. वाटताना शेवटी भरपोर्र कोथिंबीर टाकून पुन्हा वाटायचे. गूळ हवाच असेल तरच घालावा. मग शेवटी जरासे आले ठेचून घालायचे. सरतेशेवटी वाटण घालायचे व झाकणावर पाणी ठेवून शिजवायची. पाणी जराही घालून नये. मग तांदूळाची भाकरी बरोबर खायची.

गोडा मसाला:
काळे तीळ, पांढरे तीळ, मेथी दाणे,लवंग,धणे,जीरे, तेजपत्त, दगड्फूल, काळमीरी, वेलची,जायफळ असा स्पेशल फणसासाठी बनवायचा मसाला.
नोटः इकडचे कुठलेही कॅन्ड वा ताजे फणस लाकूड लागले मला तरी.

मनु:स्विनी, कॅन्ड फणस डायरेक्ट नाही वापरायचा. कुकरला शिजवून घ्यायचा. मस्त होते बघ भाजी. Happy

फणसाला शाकाहारी का होईना पण मटण म्हणणे हा मटणाचा अपमान आहे मनःस्विनी Proud

काही भाज्यांत दुसरे घटक घालतो की आपण, कोबीच्या भाजीत डाळ इ. चांगल्या लागतात त्या भाज्या तश्याही. अर्थात मटणात बटाटा हा जोक आहे हे मला मान्य आहे.

कॅन्ड फणस डायरेक्ट नाही वापरायचा. कुकरला शिजवून घ्यायचा>> किति वेळ्?किति शिट्ट्या?..मी कधिच ही भाजि केलि/खाल्ली नाहिये.

वर सायोने लिहिलं आहेच, ती चवळीसकट शिजवते म्हणून थोडं पाणी घालते.
मी फणसात पाणी न घालता (कुकरमधल्या पाण्याच्या वाफेवर) २-३ शिट्ट्या करून घेते. (सौजन्य : मिनोती) Happy

फणसाला शाकाहारी मटण म्हणणे हा फणसाचा अपमान आहे. Happy

अरे मी आपले प्रेफरन्सेस सांगितले, त्यात कोणाला काय वाटते का वाटावे वा असेच वाटलेच पाहिजे/मान्य असलेच पाहिजे ह्याची जबरदस्ती कुठे आहे. Happy कोणाला काय पण वाटेना. Wink
आता शाकाहारी खिमा चालतो मग मटण का नाही? Proud
अपनी अपनी स्टाईल है.. Wink

मी कॅन मधला फणस वापरतेय अनेक वर्षे .

एक कॅन फणस , पाणी निथळून , धुऊन, छोटे ( अर्ध्या इंचाचे ) तुकडे करून
एक वाटी चवळी भिजवून , थोडे मीठ व हळद घालून कुकरमधून शिजवून
अर्धी वाटी खोबरे
एक चहाचा चमचा धणे
४-५ ब्याडगी मिरच्या
असल्यास २-३ शेवग्याच्या शेंगांचे तुकडे
हळद, हिंग, कढीपत्ता, मोहरी, तेल , मीठ, चिंचेचे एक दोन तुकडे.
थोड्या तेलावर धणे, सुक्यामिरच्या परतून घेउन, खोबर्‍याबरोबर वाटून घ्यायच्या - अगदी गंध वाटण झालं पाहिजे. थोडं पाणी घातलं तरी चालेल.

एका पातेल्यात थोडे पाणी घालून शेवग्याच्या शेंगा, फणसाचे तुकडे व थोडे मीठ घालून उकळत लावावे. शेंगा व फणस शिजत आले की चवळ्या घालाव्या. तीन चार मिनिटांनी वाटलेला मसाला, मिक्सर धुतलेले पाणी घालून एक उकळी काढावी. उकळी येतायेता मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, सुक्यामिरच्यांचे तुकडे याची फोडणी करावी व भाजीत फोडणी घालून ढवळून झाकण लावावे.

गरम गरम आमटी भाताबरोबर तर मस्त लागतेच पण दुसर्‍या दिवशी हातसडीचे पोहे आमटीत भिजवून वर थोडे कच्चे खोबरेल तेल शिंपडून खायला पण मजा येते एकदम.

कच्च्या फणसाला कोकणीत कडगी म्हणतात, चवळीला बगडे अन शेंगांना ( गमतीत ) बड्डी ( काठी ) म्हणतात. म्हणून या भाजीचे नाव कडगी बड्डी बगड्या आंबट Happy

रत्नागिरी ऑनलाईन किंवा कोंकण ऑनलाईन अशा कुठल्याशा वेबसाईटवरून उतरवून घेतलेली ही अजून एक कृती

Ingredients :

1 can of green jackfruit pieces, 1 inch piece of ginger, peeled and finely minced, 1 clove of garlic, finely minced, 2-3 fresh green chilies, halved lengthwise, 1 tsp ground cumin, 1 tsp black mustard seed, ½ tsp turmeric, ½ tsp ground coriander, ½ tsp red chili powder, ½ tsp kala or goda masala (or use garam masala), juice of ½ lime, salt to taste.

Method :

Drain the jackfruit, rinse well, drain again and set aside until needed.
In a large karahi or wok on medium high heat, add the oil.
When hot, carefully add the mustard seeds.
When the splattering stops, add the ginger, garlic, green chilies, asafetida and curry leaves.
Add the jackfruit pieces and gently stir, be careful not to break them up.
Add the spices (turmeric, ground coriander, ground cumin, red chili powder, kala or garam masala and salt).
Stir gently to combine and add the green peas.
Reduce the heat, cover and let simmer or 4-5 minutes.
Add the lime juice and garnish with freshly chopped coriander leaves.

यात मी वटाण्याच्या ऐवजी कधी मक्याचे दाणे, कधी भिजवून शिजवलेली चवळी / हिरवे चण, फ्रोझन हिरवे चणे वगैरे पण वापरलेत. गोडा मसाल्याच्या ऐवजी मालवणी मसाला घालून पण छान लागते. वाटण नसल्याने अगदी पटकन होणारी भाजी. रस्सा अगदी बेताचा असतो त्यामुळे डब्यात न्यायला पण एकदम सोयीची.

विदर्भात देखील फणसाच्या भाजीला शाकाहारी मटण म्हणतात. याला दोन कारणे आहेतः

१) फणसाच्या कापलेल्या फोडी शिजल्यानंतर त्या मटणाच्या शिजवलेल्या फोडींप्रमाणेच दिसतात.
२) फणसाच्या भाजीसाठी वाटलेला मसाला आणि मटणासाठी वाटलेला मसाला एकच असतो.

माझ्या घरी आई आधी फणस विळीला तेल लावून कापून घेते. त्यामुळे फणस मग चिकटत नाही. फणसाची पाठ काढून घेते. मग फणसाच्या मध्यम फोडी करते. त्या गरम पाण्यात सोडते. मसाला वाटून घेते. भरपूर तेलात मग वाटण फोडणी देते आणि गरम पाण्यात शिजत आलेले फणस मग फोडणीत घालते. रस्सा दाटसर होतो. छान तवंग येतो भाजीला. आमच्याकडे अजूनही पाटा वरंवटा वापरूणच मसाला वाटतात. त्यामुळे मसाल्याची भाजी आणखीनच लज्जतदार होते.

Pages