कथा गुंडाळल्या शेवटाची

Submitted by नानबा on 28 October, 2009 - 15:10

कथा गुंडाळल्या शेवटाची.
पुर्वपिठीका: http://www.maayboli.com/node/11564
(आधिची कथा वाचलेली नसल्याने रेफरन्स न लागल्यास लेखिका जबाबदार नाही ~ एक प्रसिद्ध पुणेरी पाटी)

लेखिका: शिरीष कोठावळे
सादर कर्ते: माधव जोशी

समस्त मराठी रसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत - "कथा गुंडाळल्या शेवटाची"

नमस्कार मंडळी!
ही कथा एका गुंडाळल्या शेवटाची (हे आत्तापर्यंत तीनदा सांगितल्यानं तुमच्या लक्षात आलं असेलंच.). आपल्या ह्या कथेचा नायक माधव उर्फ मॅडी हा भयकथांचा शौकीन. नारायण धारप, रत्नाकर मतकरी आदी प्रभूतींच्या सगळया कथा ह्यानं केव्हाच पालथ्या घातलेल्या. नव्यानच मायबोली join केलेली - गुलमोहोरवर विशाल, चाफा, कौतुक, बासुरी आणि इतर अनेक मायबोलीकरांच्या कथा वाचता वाचता ह्यालाही स्फुरण चढलं की. अन मग काय विचारता महाराजा! माधवनंही ठरवलं की आपणही काहीतरी लिहायचं. अर्थात विचार पक्का झाला तरी विषय पक्का होईना. जे कुठल्याही aspiring लेखकाचं होतं तेच माधवचंही झालं आणि आजुबाजुला घडणार्‍या प्रत्येक गोष्टीत त्याला एक कथा दिसायला लागली. शेजारची मनी आली बाल्कनीत - झाली प्रेमकथेला सुरुवात , ब्रेक्सचा करकचून आवाज आला - झाली रहस्यकथेला सुरुवात-- तर अशा खूप सार्‍या सुरवाती आल्या आणि गेल्या - पण माधवची कथा काही खर्‍या अर्थानं सुरू व्हायला तयार नव्हती.
आणि अशातच मंडळी, अशी काही घटना घडली की माधवला त्याच्या पहिल्या कथेचं बीज गवसलं.
तर झालं असं: वेळ - लेक्चरची, स्थळ - कँटीन, माधव आणि त्याच्या मित्रांचा कंपू (म्हणजे अनुक्रमे - अव्या, विन्या, सँडी अन दस्तुरखुद्द माधवराव जोशी उर्फ मॅडी) नेहमीप्रमाणे लेक्चर बुडवून कॅन्टीन मधे वडापाव हाणत होता - चवीला होते अव्याच्या पोतडीतले चित्रविचित्र मसालेदार किस्से.
आजचा अव्याचा किस्सा होता तो म्हणजे वाईच्या शिवरामपंत जोश्यांच्या वाड्याचा (हाच वाडा माधवच्या कथेत भानूंचा वाडा म्हणून आलेला चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलाच असेल - उरलेल्यांकरता - म्हणजे, ज्यानी पहिली कथा वाचली नाही, त्यांच्यासाठी हा कंस ;)). अव्याच्या estate agent असलेल्या बाबाकडे हा वाडा विकायला आलेला म्हणे. वाड्याचा इतिहास लक्षात घेता तो खपायचे चान्सेस काही नव्हतेच फारसे, पण पुढच्याच महिन्यात एक पार्टी येणार होती. (अव्याची गाडी चित्तचक्षुचमत्कारीक कथेकडून रुक्ष वास्तवाकडे वळत होती) पण मॅडीचं काही तिकडे लक्ष नव्हतं. त्याला त्याची कथा सापडली होती. तसाही तो भयकथांचा (खरंतर भयकथांचाच) शोकीन होता. ह्या शिवरामपंतांच्या दंतकथेला थोडी उपकथानकं जोडली - आणि हिरो च्या कथानकाची चळचळीत फोडणी दिली की गरमागरम स्टोरी तय्यार! मायबोलीवर वाढायचाच - आपलं - टाकायचाच अवकाश - मॅडी जोशीचे माधवराव जोशी झालेच म्हणून समजा!
अर्थात माधवला कळलं नसेल तर इतकंच की ही एकाच काय - पुढच्या कित्येक घटनांची आणि कथांची फक्त नांदी होती.
आता जोश्यांचा वाडा हे नाव काही मॅडीला रुचेना. एकतर तो स्वतः जोशीच आणि भयकथेकरता हे नाव कसं जरा गुळगुळीत, बुळबुळीत वाटतं. शेवटी भानू मास्तरांचा सूड उगवण्याच्या चालून आलेल्या संधीचा सुयोग्य वापर करायचं त्यानं ठरवलं आणि गोष्टीतला 'जोश्यांचा वाडा' कथेत 'भांनूंचा वाडा' होऊन आपल्या समोर आला. हिरो अर्थातच दस्तुरखुद्द माधवराव आणि साईड हिरो म्हणून विन्या. आता फक्त प्लॉट व्यवस्थित develop झाला की झालं.
माधवनं कुठेतरी वाचलेलं की मोठमोठे लेखक, कवी inspiration म्हणून घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देतात - त्यातून असल्या वाड्याला भेट द्यायची कल्पना भलतीच romantic! त्यामुळे ह्या जोश्यांच्या वाड्याला भेट द्यावी हा विचार मॅडीच्या डोक्याला चिकटला. अव्याच्या बाबांना वाड्याच्या साफसफाई साठी येणार्‍या माणसांवर लक्ष ठेवायला कुणीतरी दोनचार दिवस हवंच असल्यान, किल्ल्या मिळवणही फारसं जड गेलं नाही! आता रहाता राहिला प्रश्न सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा - अव्या तर तयार होताच. कां कूं करत सँडीही तयार झाला - पण मॅडीचा जिगरी विन्या - काही यायला तयार होईना! शेवटी आपल्या लेखन कार्याचं महत्व लक्षात घेऊन, त्याला पुण्यातच सोडून मॅडी आणि co. वाईच्या दिशेनं प्रस्थान ठेवती झाली.

वाई - पन्नास हजार लोकवस्तीचं वाई - बदलत्या काळाबरोबर बदललेलं वाई - अव्याच्या वर्णनाशी अजिबात मिळतंजुळतं नसलेल वाई - हे वाई बघून मॅडी जरा निराशच झाला! पण जोश्यांच्या वाडा मात्र जसाच्या तसा होता. भुरळ पडण्याजोगा! ती घराची जुनी रचना - पडवी, ओसरी, पुढचं अंगण, मागचं अंगण, तिथली विहीर, दिवाणखाना, माजघर, स्वयंपाकघर, कोठीची खोली .... आणि परत वरचा मजला! मॅडी एकदम फिदा! त्यानं इतर कशातही वेळ न घालवता कथा लिहायला घेतली.

"आणि एके दिवशी भर सकाळी ते अंगणातच पडलेले सापडले. उठले ते चालत्या कलेवरासारखे. डोळ्यात शून्य भाव! पुर्णपणे रिकामी नजर. ओठातून गळणारी लाळ! आत 'शिवरामपंत' म्हणून जे काही होतं, ते जिवंत होतं की नाही कुणास ठावुक! शरीर जिवंत म्हणून जिवंत म्हणायचं झालं! अर्थात त्यानंतर ते काही फार काळ जगलेच नाहीत. आठवड्याभराच्या आत त्यांचा म्रुत्यू झाला. (अर्थात त्या संज्ञेला काही अर्थ असेल तर!). पाठोपाठ महिन्याभरात त्यांच्या पत्नीचाही म्रुत्यू झाला. म्रुत्यूसमयी त्यांच्याही चेहर्‍यावर विलक्षण वेदना होती. जणू कशाच्यातरी विरुद्ध त्या प्रचंड झगडल्या असाव्यात."

जे दिसलं, जे वाटलं आणि वाडा बघून जे imagine झालं, त्या सगळ्याचं वर्णन तो करत गेला आणि वातावरणाचा परिणाम म्हणा अथवा आणखीन काही - माधवला बाकीची कथाही भरभर सुचत गेली - एकदम समोर घडावी ना तशी!
"अरे, मी ही असाच दरवाजा शोधत राहिलो, पण तो सापडायचाच नाही. मग काय! मग खोलीमधे बसून राहयचो! आज इतक्या वर्षात सापडला नाही मला.. अन तुला वाटतंय तुला सापडेल!"

मॅडीची कथा ऐकताना सॅडीची चांगलीच बोबडी वळलेली - धोतर घातलेल्या एका गृहस्थाला त्यानं अंगणात पाहिलेलं हे तो शपथेवर सांगायला तयार होता. अर्थातच तो आपल्याला गिर्‍हाईक घेतोय हे चतुर मॅडी आणि अव्यानं ओळखलं आणि त्याच्या बोलण्याला अजिबात धूप घातली नाही.

दुसरा भाग लिहून झाला अन मग मात्र विचार करून माधवलाही जरा भिती वाटायला लागली - जणू त्या घराला, त्या अंगणाला तो वर्षानूवर्ष ओळखत होता - जणू तो संघर्ष त्याच्या पुढे घडला होता.. पण घाबरायला तरी जास्त वेळ कुठं होता म्हणा - कारण राहिलेला फक्त अंतिम भाग - संघर्ष! तो झाला की महाबळेश्वर आणि मग परत पुण्यनगरी!
शेवटच्या संघर्षाचा विचार करता करताच माधवला झोप लागली.
रात्रभर चित्रविचित्र स्वप्न पडत होती. ते न पाहिलेले शिवरामपंत, त्यांची पत्नी .. अंगण, विन्या, अव्या - सगळी सरमिसळ झालेली. मॅडीला जाग आली तेव्हा ऊन्हं चांगलीच वरती आलेली. अव्याला उठवायला म्हणून तो वळला ... आणि...

आख्या खोलीत तो एकटाच होता! अव्या, सॅंडी - दोघही गायब - खोलीत एखादं वादळ येऊन गेल्यासारखा उत्पात - सगळी अंथरूण अस्ताव्यस्त! माधवच्या घशाला कोरड पडली. पाणी प्यायला म्हणून त्यानं तांब्या हातात घेतला - आणि आतलं तांबडभडक पाणी (रक्त? त्याच्या डोक्यातला चोरटा विचार) पाहून तो जवळजवळ किंचाळला. सगळं शहाणपण 'पळून जा' म्हणून सुचवत होतं - पण दरवाज्यापर्यंत जायचं, म्हणजे अंगण ओलांडून जाणं भाग होतं! आणि त्याच्या मित्रांच काय! त्यांना असं संकटात टाकून पळून जाणं योग्य नव्हतं - पण त्यांना शोधायचं - म्हणजे पुन्हा अंगण...
मंडळी , माधवनं दाखवलेल्या धैर्याची खरतर आपण दाद द्यायला पाहिजे. त्याच्या जागी मी असते, तर नक्की पळून गेले असते. पण तो मात्र मित्रांना शोधायला निघाला. हे शौर्य अस्थानी आहे, ह्याची कल्पना नसल्यानं!
धीरानं माधव अंगणात आला. तेच अंगण जिथे शिवरामपंत सापडलेले - तेच अंगण जिथे (कथेतला) विनायक अडकलेला.. (आता माधवही).. आणि ...
आणि बरोब्बर अंगणात असतानाच माधवला "ते" दारातून आत येताना दिसले. धोतर, उपरणं, पगडी - अंगात फक्त हाडंच असावीत असे... "ते"
"होय. मी शिवरामपंत" त्यांची मान अजुनही खालीच होती. "तू आलास बरं वाटलं. "
ते त्याच्या रोखानं आले - त्यांची मान हळूहळू वर येताना पाहून माधवची तोतरी वळली!
शिवरामपंतांची मान पूर्ण वरती आली- आणि आता मात्र माधव किंचाळला - समोर दुसरं तिसरं कुणी नसून चक्क धोतर-पगडीतला विन्या होता..
खो खो हसत अचानक अव्या अन सॅडीही कुठून तरी अवतरले.
त्या क्षणाला 'खरे शिवरामपंत असते - तर परवडलं असतं' अस मॅडीला वाटल्याखेरीज राहिलं नाही - किंबहूना, 'त्यांनी अवतरावं आणि आपल्या मित्रांकडे जरा बघावं' असला दुष्ट विचारही त्याच्या मनाला चाटून गेला. मला वाटतं जास्त सांगायची गरजच नाही - तुम्ही मॅडीचा खजीलपणा पुर्णपणे imagine करू शकता. पुढचे सगळे प्लॅन कँसल करून तो पुण्यास परतता झाला. ती कथा कशीतरी पूर्ण करुन टाकली खरी एकदाची - पण मग प्रसंग काही म्हणावेत तसे रंगले नाहीत. कसे रंगणार म्हणा - शिवरामपंतांच्या जागी खो खो हसणारे तुमचे दोस्त दिसले, तर तुम्हाला तरी लिहिता येईल का? ह्या एकाच घटनेमुळे बरंच काही झालंय- अव्याच्या पोतडीत आणखीन एका किश्याची भर पडलीये, मॅडीनं भयकथा लेखनाला कायमचाच रामराम ठोकलाय. काही लोकांनी त्याला सांगितलं की अरे, शेवट जरा आणखीन रंगव - पण तो काही पुन्हा त्यावर काम करायला तयार नाही - त्यापेक्षा जे लोक आहे तोच शेवट उत्तम म्हणताहेत, त्यांचंच ऐकून तो मूग गिळून गप्प बसलाय.
ह्या सगळ्या प्रकरणात मॅडीच्या दोस्तांना मात्र बराच त्रास पडला बरं का! बरेच दिवस ते त्याची मनधरणी करत होते - त्याला वेगवेगळं लालूच दाखवतं होते. शेवटी डील कशावर तुटलं - हा एका वेगळया कथेचा मुद्दा होईल.. पण त्यांच्या खासगी भानगडीत आपण कशाला पडा. वाईट इतकंच वाटतं की महाराष्ट्र एका भयकथा लेखकाला मुकला. पण जास्त वाईट वाटून घेण्यातही point नाहीये - कारण सध्या ऐकलंय की मॅडी काहीतरी light लिहायच्या भानगडीत आहे.
त्याच्या लेखनाकरता माझ्याकडून पु. ले. शु.!

समाप्त!
----

तळटीप १: पुर्णपणे काल्पनीक. ह्या कथेचं साधर्म्य - कुठल्या व्यक्ती, घटना अथवा कथांशी आढळल्यास तो संपूर्ण योगायोग समजावा. Wink

गुलमोहर: 

सहि क्रिस्पि आहे कथा. It was always swinging in between भयकथा आनि खुसखुशित कथा.
मला नाहि वाट्त कि या कथेमुळे पहिलि कथा hamper होति आहे.
Keep it up .....

"शेवट थोडा गुंडाळल्यासारखा वाटला" असे म्हणणार्‍याला गप्पच केले की तू! अफलातून जमलीये हि कथा.

अवधूत गुप्ते मोड ऑन
नादखुळा! कसली व्हरायटी आहे तुझ्या लेखनात. मागच्या वेळेपेक्षा तुझा हा performance लई म्हंजे लई ब्येस झाला.प्र्त्येक शब्द perfect लागत होता. चित्तचक्षुचमत्कारीक हवाय का? हा घ्या! पु. ले. शु. हवाय का? हा घ्या! एकदम चाबुक कथा!
अवधूत गुप्ते मोड ऑफ

सगळे अवधूतने म्हटल्यावर मी काय म्हणणार? पु. ले. शु. Happy
आणि हो मॅडीला म्हणावं राग जाईल तेंव्हा रहस्यकथा लिही. तशीही शिर्षकाची royalty बाकी आहेच माझी. Happy त्याच्या बदल्यात कथा चालेल.

धन्यवाद मंडळी...
कुठल्या circumstances मधे एखादा लेखक त्याची कथा गुंडाळू शकतो असा विचार करत होते..
दोन ओप्शन्स होते, मला हा जास्त भावला!

अरे वा, अत्तापासुनच माबो करांची फिरकी घ्यायला लागलात? चाफ्याच्या वाटेवरुन चालणार तुम्ही.
छान लिहीता.

खरं म्हणायचं तर ही गोष्ट पहिल्या गोष्टीपेक्षा जास्त आवडली! ह्यात वाचकांशी केलेली स्मार्ट हितगूज यशस्वी झालीय् (एक-दोन ठिकाणी जरा complicated झालीय्, ती सोडून). अन् हिचा शेवट सुद्धा जास्त सुटसुटीत अन् natural वाटतो. हिची लय वेगळी असली तरी हे नक्की कळून चुकतं की एकाच पावलात लेखनाची प्रगति झालीय्. लेखिकेला अभिनंदन!

मी कुठे काय एडिटलं? :O
-- (जर एडिटलं असेल तर मला तरी नाही कळलेलं की मी असं काही केलंय :-|
म्हातारी होत चाल्लीये का काय मी? किन्वा स्मृतीभ्रंश Sad )
टॉप १०: सही आहेस तू! Happy

Lol मस्त.