नशीब त्यांचे - भाग २२

Submitted by विनायक.रानडे on 24 October, 2009 - 23:41

नेहमी प्रमाणे तेहरानचे काम संपवून मी व माझी होणारी बायको खोरामदार्रेच्या परतीच्या प्रवासा करता शाहायाद मैदानात बस करता उभे होतो. सलग तीन तास बस मिळाली नाही, एक ओमनी व्हॅन ( सुझुकीची ही गाडी १९७७ मध्ये तिथे वापरात होती, किती उशिरा आणि जास्त किंमत देऊन ह्या गाड्या आपण आज वापरतो हे लक्षात घ्या ) समोर येऊन थांबली. हो नाही करीत, चालक सुटाबुटातला असल्याने फारशी शंका न घेता शेवटी त्या गाडीत बसलो. गाडीचालकाने गाडी आम्हाला लवकर घेऊन जाण्या करता मुख्य रस्त्या ऐवजी नवीन तयार झालेल्या रस्त्याकडे वळवली. त्या रस्त्याला रहदारी फार तुरळक होती. आम्हा दोघांना तो रस्ता परिचित होता.

गाडी शहरापासून बरीच दूर आल्यावर गाडी थांबवून चालक खाली उतरला. गाडीच्या चाकांची चाचणी करून आत आला. मग आमच्या विषयी माहिती फारसी भाषेतून विचारू लागला. बायकोला त्याचे प्रश्न विचारणे चुकीचे वाटले म्हणून तिने त्याचे ओळख पत्र मागितले. तो चिडला, त्याने ओळखपत्र दाखवले व दुसर्‍या हाताने माझ्यावर पिस्तूल रोखले. तो गुप्तचर विभागाचा अधिकारी होता. मी अफगाणी हेर असून, इराणी मुलींना फसवणार्‍या टोळीशी संबंधीत आहे व त्याचा शोध घेण्या करता आम्हाला त्या रस्त्याला आणून आमची चौकशी करीत होता. त्याचे बोलणे मला थोडेफार समजले, बायकोने मला पूर्ण अर्थ व गांभीर्य समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. मला हसू आले. मी तिला हसत सांगितले की सगळे कसे चार दिवसा पूर्वी बघितलेल्या इंग्रजी सिनेमा सारखे घडत होते. त्याला सिनेमाचे नाव समजले. त्याने एका हाताने पिस्तूल माझ्या डोक्यावर जोरात दाबले. त्याने दुसर्‍या हाताने बाजूच्या सिटवर असलेली पेटी उघडली त्यातून युझी मशीन गन बाहेर काढली. कंपनी जवळ उभ्या राहणार्‍या पोलिसाच्या हातात मी रोज तसली मशिनगन बघत होतो. मला जाणवले तो अधिकारी पूर्ण तयारीने आला होता.

मी व बायको काही झालेच तर काय करायचे त्याच्या वर कसा हल्ला करता येईल ह्याचा विचार करू लागलो. दोन तास कसे गेले कळलेच नाही. बायकोने घराकरता नवीन मोठ्या सुर्‍यांचा सेट घेतला होता तो तीच्या हातातल्या पिशवीतच होता. तिने मला दाखवण्याचा प्रयत्न केला. तो अधिकारी सावध झाला. त्याने दरडावून विचारले पिशवीत का हात घातला ? बायको घाबरली होती. मी तिला घाबरू नको म्हणून सांगत होतो. तिने थोडेसे चिडूनच त्याला बाकीचे कागद काढून दाखवले त्यात तिचे विम्याचे पुस्तक होते ते त्याला दिसले. तिचे वडील संरक्षण खात्यातील गुप्तचर विभागातले होते त्यामुळे घरातील प्रत्येकाचे मंत्रालयाचे विम्याचे पुस्तक होते. त्याने ते एका हाताने उघडून बघितले, नाव वाचले व वडिलांचे नाव / हुद्दा वाचला.

आम्हाला काय होते आहे हे समजायच्या आत त्याने पटकन पिस्तूल बाजूला केले व बायकोची माफी मागितली. त्याने काही महिने तीच्या वडिलांच्या कडे काम केले होते, त्यांना तो ओळखत होता. पण बाकी कुटुंबीयांशी भेटण्याचा प्रसंग न आल्याने त्याने ओळखले नव्हते. दोन तासात त्याने फक्त माझे कागद व माझी चौकशी केली होती, तिची चौकशी त्याला महत्त्वाची वाटली नव्हती. मग वेगाने गाडी मुख्य रस्त्याला आणून आम्हाला घरा पर्यंत आणून सोडले. लवकरात लवकर आमचे परवाने तयार करून देण्याचे आश्वासन देऊन निघून गेला. दुसर्‍या दिवशी बायकोने कार्यालयात खूप आरडाओरड केली. एका इंग्रजाला तुम्ही एक वागणूक दिली, एका भारतीयाला असली वागणूक का ? व्यक्तिविषेश (पर्सनल) कार्य प्रमुखाने घडलेल्या प्रसंगाची माहिती शोधून काढली - भेटू भाग - २३.

गुलमोहर: